सर्वप्रथम हा चित्रपट बनविणाऱ्या निर्मात्याचे आणि ह्यात अभिनय करणाऱ्या मराठी कलावंतांचे अभिनंदन! हा चित्रपट एका बंगाली चित्रपटावर आधारित आहे असे वाचनात आले. व्यावसायिकदृष्ट्या एखादा चित्रपट यशस्वी ठरावा म्हणून एखाद्या विशिष्ट सिनेसृष्टीची विशिष्ट समीकरणे असतात. त्यानुसार चित्रपट बनविल्यास सुरुवातीच्या काही दिवसात चित्रपट एक विशिष्ट गल्ला गोळा करतो. पण ह्या निर्मात्याने मात्र पूर्णपणे एक सामाजिक संदेश देण्याच्या दृष्टीने ह्या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाची कथा फिरते ती आपल्या आयुष्यातील समस्यांना कंटाळून झोपेच्या गोळ्यांनी आपलं आयुष्य संपवायचा प्रयत्न करणाऱ्या नायिकेभोवती! काही वर्षापूर्वी आई गेली, मग वडिलांनी आपल्यापेक्षा वयाने बऱ्याच तरुण असणाऱ्या स्त्रीशी लग्न केलं आणि आता कळस म्हणून आपलं ज्याच्याशी लग्न केलं त्यानं आपल्याला फसवलं ह्या सर्वाचा परिणाम म्हणून एका कमकुवत क्षणी नायिका हा निर्णय घेते. तिची ही अवस्था पाहतो तो चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी, जो तिला घेऊन जातो तो आत्महत्येचा प्रयत्न पूर्ण तयारीनिशी कसा करायचा हे शिकवणाऱ्या संस्थेत !
चित्रपटाचा संदेश किंवा चित्रपटात हाताळली जाणारी मुख्य समस्या ही भारतात असणाऱ्या आत्महत्येच्या मोठ्या संख्येविषयी आहे. ही समस्या म्हटलं तर बरीच गहन होत चालली आहे. मध्ये एकदा स्वप्निल अमृताला सुनावतो, " तुम्ही श्रीमंत बापाच्या मुली, आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी तुम्हांला असे काही चाळे करायची सवयच असते! पण ज्या क्षणी तुम्हांला कळत की आत्महत्या म्हणजे पूर्ण शेवट आणि त्यानंतर मात्र तुम्ही जीवनातील कोणत्याच सुखाचा आनंद घेऊ शकणार नाहीत त्या क्षणी मात्र तुम्ही पुढे जायला कचरता!" आणि मग अमृता ते मान्यही करते.
चित्रपटाच्या पूर्वाधात काहीसं गंभीर चित्रण आहे. विविध प्रकारांनी आत्महत्या कशी करायची हे ज्या प्रकारे दाखवलं जात ते काहीसं अति वास्तववादी आहे. अशी संस्था असू शकते हा भाग पटण्यापलीकडचा! पण त्यानंतरचे काही संदेश महत्वाचे! जसे की दुसऱ्यांची दुःखसुद्धा ज्यावेळी आपणास समजतात तेव्हा नक्कीच आपल्या दुःखाकडे बघण्याचा व्यापक दृष्टीकोन आपल्याला मिळतो. जरी समस्या इथे आत्महत्येची मांडली गेली असली तरी संदेश छोट्या छोट्या कारणांनी दुःखी होणाऱ्या लोकांना सुद्धा लागू पडतो. समस्या जशी अगदी गरीब पिडीत लोकांची असते तशीच एखाद्या आयुष्याच्या पूर्वाधात ज्याला खूप यश मिळालं त्याची सुद्धा असू शकते. आयुष्यात आपण सतत यशस्वी राहू शकत नाही हा संदेश महत्वाचा! जसं दुसऱ्यांनी आपलं कौतुक केलेलं आपल्याला मनापासून आवडतं तसं दुसऱ्याच सुद्धा आपल्याला कौतुक करता यायला हवं! यशस्वी माणसाने आपली यशस्वी प्रतिमाच सदैव आपल्या डोळ्यासमोर ठेवणं चुकीचं आहे.
केबलवर एक दोन परदेशी वाहिन्या येतात. त्यात दोन तीन व्यक्तिरेखांभोवती फिरणारे अनेक चित्रपट पहावयास मिळतात. सर्व लक्ष कथेवर केंद्रित असतं. नायक नायिका आजूबाजूचा परिसर सर्वकाही अगदी साधं सुधं असतं! व्यक्तिरेखा फुलल्या जातात, कथा मांडली जाते आणि दीड दोन तासात चित्रपट संपतो! अशा चित्रपटांची आठवण ह्याने करून दिली. इंद्रियदानाचा संदेश सुद्धा दिला. हिंदी चित्रपटातील जुने संदर्भ देण्याचा प्रयत्न टाळला असता तर बरं झालं असतं असं वाटून गेलं.
तसंच मग नायकाला असणाऱ्या गंभीर आजाराचं चित्रण करून सहानभुती मिळविण्याचा प्रकार बाकीच्या चित्रपटाने दर्शविलेल्या No Nonsense दृष्टीकोनाशी काहीसा विसंगत वाटला.
मराठी चित्रपटात बरेच नवीन प्रयोग होत आहेत हे वाचलं होतं. हा चित्रपटसुद्धा ही एक चांगला प्रयोग. माझ्या ब्लॉग पोस्ट्सच्या हिट संख्येवरून मी एका निकषापर्यंत येऊन पोहोचलो आहे. हल्लीच्या मराठी लोकांना गंभीर विषयावरच बोलणं फारसं आवडत नाही, झेपत नाही. हा चित्रपट सुद्धा जवळपास पूर्णपणे गंभीर त्यामुळे त्याच्या बॉक्स ऑफिसवरील कामगिरीविषयी मी साशंक आहे. आपले मराठी लोक माझी ही भीती निराधार ठरवतील ही आशा बाळगतो!! जाता जाता तात्पर्य एकच - दुनियेतील बहुतांशी लोकांना तुमची पर्वा नाही ह्याचं दुःख बाळगू नका! दुनियेत एक जरी माणूस असा असेलच ज्याला तुमची पर्वा असते. त्या माणसासाठी, स्वतःसाठी आयुष्य जगा आणि ते सुद्धा पूर्णपणे स्वतःला जीवनगाण्यात झोकून देऊन! आणि हो चित्रपटाचा संदेश आजूबाजूला नक्कीच पोहोचवा!!