गेल्या शनिवारी बारावी परीक्षा सुरु झाली. हल्ली दरवर्षी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवडीचा पात्रतानिकष बदलण्याची पद्धत सुरु झाली आहे. ह्या वर्षी बारावीच्या उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत (HSC) मध्ये मिळालेल्या गुणांना ४० टक्के प्राधान्य आणि IIT Main परीक्षेत मिळालेल्या गुणांना ६० टक्के प्राधान्य (किंवा जडत्व) असा नियम अस्तित्वात आहे असे ऐकण्यात आले. काही विशिष्ट कारणांमुळे पुढील वर्षी हा नियम बासनात गुंडाळला जाऊन CET (सामायिक प्रवेश परीक्षा) उच्च माध्यमिक शालांत परीक्षेसोबत अस्तित्वात येईल असे ऐकण्यात येत आहे.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या निवडीचा पात्रतानिकष ठरविणाऱ्या ज्या अधिकृत व्यक्ती किंवा संस्था आहेत त्या कोणत्या निकषांचा आधार घेऊन हे निर्णय घेतात ह्याविषयी अजिबात पारदर्शकता नाही. ही पारदर्शकता असणे फार महत्वाचे आहे. पुढील वर्षी जे बारावीची परीक्षा देणार आहेत, त्या विद्यार्थ्यांनी यंदाचे अकरावीचे वर्ष IIT Main चा अभ्यास करण्यात गुंतविले असेल. आता अचानक पात्रतानिकषात बदल झाल्याने त्यांना आपले धोरण बदलावे लागणार. त्यांना झालेल्या ह्या मनःस्तापाची जबाबदारी कोणाची?
आदर्श जगात पुढील दहा वर्षात भारतात / जगात कोणत्या शाखेच्या अभियंत्यांची गरज असणार त्यानुसार आपण अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विविध शाखेत प्रवेश दिल्या जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ठरविली पाहिजे. पण हे कधी होणार नाही हे आपण सर्व जाणुन आहोत. ज्या अभियांत्रिकी महाविद्यालयातून उत्तीर्ण होणाऱ्या अभियंत्यांना मिळणाऱ्या नोकरीचे प्रमाण अगदी अल्प आहे त्या महाविद्यालयात सुद्धा प्रवेशासाठी झुंबड उडाल्याचे चित्र दिसते. अभियांत्रिकी नंतर नोकरी नाही मिळाली की मग पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असे द्रुष्टचक्र सुरु राहते.
मूळ मुद्दा असा आहे की जोवर आपण अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या नियंत्रित करीत नाही तोवर प्रवेशाचा निकष ही काही फार महत्वाची गोष्ट नाही. निकष कोणताही ठेवा जोवर पैसा देऊन प्रवेश मिळतो तोवर दर्जा हा घसरणारच! असे असताना मग सतत निकष बदलून आधीच अभ्यासाच्या ओझ्याखाली दबलेल्या मुलांना अजून दडपण का द्यावे?
ह्या वर्षी काही चांगले निर्णय घेण्यात आले. उत्तरपत्रिका अर्धा तास आधी आणि प्रश्नपत्रिका दहा मिनिटं आधी हा नक्कीच चांगला निर्णय आहे. उत्तरपत्रिका अर्धा तास आधी मिळाल्यावर विद्यार्थी त्यावर पेन्सिलीने कोणते कच्चे काम करू शकतात ह्याविषयी काहीशी संदिग्धता माझ्या मनात आहे. आदर्श जगात त्यांनी खालील गोष्टी कराव्यात
१> उत्तरपत्रिका चांगल्या स्थितीत आहे हे तपासून घ्यावं. गरज पडल्यास बदलून देण्याची विनंती करावी.
२> आपला आसनक्रमांक योग्य ठिकाणी लिहावा.
३> प्रत्येक विषयात काही क्लिष्ट सूत्रे, आकृत्या असतात. एकदा प्रश्नपत्रिका हाती आली की आपले लक्ष प्रश्नांकडे जाते. त्यामुळे केवळ उत्तरपत्रिका हातात असताना ही सूत्रे, आकृत्या कच्च्या रुपात मागच्या पानावर आधीच उतरवून ठेवण्याची विद्यार्थ्यांना परवानगी असायला हवी. ती बहुदा सध्या नाही. ह्या बाबतीत कोणाला खात्रीलायक माहिती असल्यास त्यांनी ह्या पोस्टला अभिप्राय द्यावा.
त्यानंतर मुख्य वेळेच्या दहा मिनिटे आधी प्रश्नपत्रिका हाती पडल्यावर तिला आधी मनोभावे नमस्कार करावा :)! त्यानंतर आपण कोणते प्रश्न सोडवणार आहोत हे ठरवून त्यावर पेन्सिलने खुणा कराव्यात. ते प्रश्न कोणत्या क्रमाने सोडवणार हे ही ठरवावं, आणि तीन तासाच्या पेपरात दर तासाच्या टप्प्याला आपले किती प्रश्न सोडवून झाले असले पाहिजेत ह्याचाही अंदाज मांडून ठेवावा! ह्या सर्व आदर्श जगाच्या गोष्टी!
दहावी बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा!