मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३० नोव्हेंबर, २०१४

रम्य ते बालपण - १



 
बालपण बहुतेक सर्वांना आवडतं. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या बहुतेकांना हे भावतं. पूर्वी तर हे खूपच सुंदर असायचं. वसईसारख्या गावात शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि एकत्र कुटुंबात वाढलेल्या माझ्यासारख्याला तर हे खूपच सुंदर वाटायचं. जबाबदाऱ्या बहुदा नसायच्याच आणि असल्या तरी जीवनातल्या जबाबदाऱ्या काय असतात ह्याची जाणीव नसायची. त्यामुळे आयुष्य अगदी सुखाने भरलेलं वाटायचं.
प्रत्येकाला किती वर्षापासूनच्या आठवणी लक्षात राहतात हे नक्की माहित नाही. मलाही चार ते पाच वर्षापासूनच्या काही आठवणी अंधुकशा आठवतात. माझा जन्म १९७२ सालचा, मी जन्मलो त्या वर्षीच फेब्रुवारीत माझे आजोबा श्री. पांडुरंग पाटील निवर्तले. त्यामुळे त्यांच्या सहवासाचं भाग्य काही मला लाभलं नाही. त्यांना चार पुत्र आणि तीन कन्या. माझी आजी ही वसईच्याच घरत कुटुंबातली. तिचं माहेर होळीवर.
माझी धाकटी आत्या वत्सला (हे तिचं माहेरचं नाव!) लग्न वसईच्या घरीच झालं. हे घराच्या हॉलमध्ये लागलं. हे लग्न १९७५ साली झालं. हे लग्न हॉलमध्ये लागताना पाहिल्याचा मला भास होतोय. भास अशासाठी की तीन वर्षाचा असतानाची आठवण लक्षात राहण्याची शक्यता कमीच! बहुदा ह्या लग्नाचे जुने फोटो एकदा पाहून त्यानंतर मला स्वप्न वगैरे पडलं असेल आणि त्यामुळे ही आठवण माझीच असावी असा मला भास होत असावा.

हे घर बांधलं आजोबांनी १९५२ साली! त्यावेळी ते एक मजली होतं. घरात एक मोठा हॉल, चार खोल्या, एक पंगतीची खोली आणि एक स्वयंपाकघर होतं.  मला कळायला लागलं तेव्हा चौघाही भावांची लग्न झाली होती. आणि धाकट्या काकांनी म्हणजे दाजींनी वरती गच्चीवर त्यांच्यासाठी खोली बनवली होती. चार खोल्यातली एक खोली म्हणजे देवाची खोली त्यात देवघर आणि आजीचं वास्तव्य असे. ह्या खोलीत आजीची खाट असे. आजीच्या खाटेखाली काही महत्वाच्या गोष्टींचा साठा असे. 

माझी चुलतबहिण योगिता ही माझ्यापेक्षा आठ महिन्यांनी मोठी, पण शाळेत ती माझ्यापेक्षा एक वर्षे पुढे होती. तिची पहिली चालू असताना मला बालवाडीत टाकण्यात आलं.  बालवाडीचा वर्ग आमच्या शाळेच्या वाचनालयात त्या काळी भरत असे. सुरुवातीला शाळा हा प्रकार मला फारसा आवडत नसे. मी बराच वेळ शाळा सुटायची वाट पाहत असे. अशा वेळी मध्येच माझ्या धाकट्या काकू नंदिनी (दादी) आपल्या सहशिक्षिका मांजरेकर मॅडम बरोबर मला भेट देऊन जात. आणि त्यामुळे माझा मूड चांगला व्हायला मदत होत असे. भेंड्याची भाजी त्याकाळी मला आवडत नसे आणि त्यामुळे ती डब्यात असली की मला खूप कंटाळा येई.
घरी एकत्र कुटुंबात खूप धमाल असे. आजी आपल्या चारही सुनांवर बारीक लक्ष ठेऊन असे. ह्यातील दोन सुना म्हणजे माझी आई आणि दादी ह्या शिक्षिका होत्या, तर मोठी आई आणि प्रतिभाकाकी ह्या पूर्ण वेळ गृहिणींचे काम करीत. एकत्र स्वयंपाक करायचा म्हणजे कसरतीचे काम असे. सकाळी वाडीतला बाजार काढला जाई आणि मोठीआई, काकी बाजार विकायला जात असत. त्यावेळी पानवेलीचा बाजार मोठ्या प्रमाणात काढला जाई. मोठे काका अण्णा (मधुकर पाटील) ह्या पानवेलीचा व्यापार करणाऱ्या सोसायटीचे सभासद होते. ही पान उत्तर भारतात, गुजरातेत विक्रीसाठी जात आणि मग वर्षातून एक दोन वेळा अण्णा ह्या पानाच्या वसुलीसाठी गुजराथेत, उत्तर भारतात ट्रेनने जात. हा त्यांचा दौरा आठ आठ किंवा कधी कधी पंधरा दिवसापर्यंत चाले. त्याकाळात फोनचा वापर फार कमी असल्याने आणि अण्णांकडून पत्र वगैरे लिहिण्याची अपेक्षा बाळगता येत नसल्याने इतके दिवस केवळ फक्त त्यांची वाट बघण्याशिवाय मोठीआईकडे आणि आम्हा सर्वांकडे पर्याय नसे. मग अचानक अण्णा एखाद्या सकाळी परतत. येताना ते बरीच मिठाई वगैरे घेऊन येत असल्याने आम्हां मुलांची खूप मजा होई. पानवेलीची वाडी करणे हा फार कौशल्याचा प्रकार असे. असे म्हणण्याचं कारण की आता आमच्या वाडीतील पानवेली गायब झाल्या आहेत. पानवेलीची वेल बारीक कारवीच्या सहाय्याने उभी केली जात असे. दोन पानवेलीला आधार देणाऱ्या कारवीमध्ये विशिष्ट अंतर ठेवले जाई. ह्या वेलींना थेट सूर्यप्रकाशाचा मारा सहन न होत असल्याने त्या वेलींमध्ये केळी वगैरे लावण्याची प्रथा असे. 
हल्ली एकंदरीत वसईत पानवेली फार दुर्मिळ होत चालल्या आहेत. वसईतील माझे मित्र श्री. संदेश वर्तक ह्यांच्या सौजन्याने मिळालेली पानवेलीची काही छायाचित्रे!





ह्या वेलींची वारंवार खूप काळजी घ्यावी लागते. उंच झालेल्या आणि कारवीपलीकडे पोहोचलेल्या वेलींना खाली आणणे, त्यांच्या नाजूक खोडाला घट्ट कारवीला बांधून ठेवणे, काही काळाने नवीन वेली आणून लावणे असले कौशल्याचे प्रकार करावे लागत. ही कामे कोणी ऐरा गैरा माणूस करू शकत नसे. त्यासाठी कुशल कामगारांचा संघ लागे. ह्या कुशल कामगारांना वसईच्या भाषेत गो असे म्हणत. ह्या गो मंडळींचा खूप मान ठेवावा लागे. त्यांना सकाळी न्याहारीला होळीवरून जिलेबी, बटाटवडे आणि घरचा चहा द्यावा लागे. हा चहा एका मोठ्या तांब्यातून वाडीत पाठवला जाई आणि मग हे गो लोक केळीच्या पानातून (खोल्यातून) हा चहा पीत. ह्या गो लोकांची न्याहारी वाडीत पोहोचविण्यासाठी बहुदा आमची नेमणूक केली जात असे. ह्या वेलीमध्ये अळू, पालेभाज्या ह्यांची लागवड केली जाई. ह्या वेलीत लावलेली माठ भाजी अगदी ताजी आणि मस्त लागे. का कोणास ठाऊक पण ह्या भाजीस सिनेमातील भाजी असे माझे वडील म्हणत. बहुदा अरुण सरनाईक आणि जयश्री गडकरच्या काळातील मराठी चित्रपटात बायको नवऱ्याला भाजी वाढतानाचे जे दृश्य असे त्या भाजीशी त्यांना माठ भाजीचे साधर्म्य वाटत असावे.
ही पाने वाडीत काम करणाऱ्या कामगार स्त्रिया खुडून घरी आणत. मग रात्री जेवण आटपली की महिला वर्ग ती व्यवस्थित जोडून त्याची कातळ करून ठेवायला बसे. पानाचे दोन प्रकार असत, मोडवण आणि बिबला. छोट्या पानांना मोडवण आणि मोठ्या आकाराच्या पानांना बिबला म्हणत! दुसऱ्या दिवसाला ह्या पानाच्या पाटीला काय भाव मिळणार ह्याची उत्सुकता ह्या पाने करणाऱ्या बायांना असे.

आमच्या घराजवळ एक वाडी आहे आणि दुसरी वाडी थोडी दूर आहे. ह्या दूरच्या वाडीला मसूरवाडी असे म्हटलं जातं. ह्या मसूरवाडीतील सिंचनासाठी वापरली जाणारी विहीर गावातील मुलांमध्ये खूप प्रसिद्ध होती. ह्या विहिरीचे हे चित्र!

मे महिन्यात मुले ह्या विहिरीत पोहायला येत. पहिल्या एक दोन दिवशी त्यांच्या पाठीला डबा बांधून त्यांना विहिरीत सोडलं जाई. नंतर मात्र थेट विहिरीच्या वरच्या पायरीवरून त्यांना पाण्यात ढकललं जाई. एकदा का नाका तोंडात पाणी गेलं की पोरगं आपसूकच पोहायला शिके आणि मग नव्या येणाऱ्या मुलांना विहिरीत ढकलायला तयार होई.

आमच्या पाटील कुटुंबाच्या मूळ घराच्या बाजूला मसूरवाडी आहे. ह्या मूळ घराला आम्ही जुनं घर असेही म्हणतो. ह्या जुन्या घरी कुटुंबाचे गणपती बसतात. इथे जाताना एक पाण्याचा ओहोळ लागतो. त्याला बोली भाषेत वळ असे म्हणतात. हा वळ आमच्या घराशेजारील तळ्याला (बावखल) वसईच्या खाडीला जोडतो. ह्या वळात साधारणतः डिसेंबर जानेवारीपर्यंत पाणी असते. पूर्वी ह्या वळातील पाणी एकदम शुद्ध असे. आणि आम्ही गणपतीला जाण्यासाठी ह्या पाण्यातून बिनधास्त जात असू. लहानपणी गणपतीची आठवडाभर सुट्टी असल्याने आम्ही बऱ्याच वेळ जुन्याघरी गणपतीत जात असू. अगदी रात्रीच्या आरतीला सुद्धा! मग रात्री अंधारातून'ह्या वळातून येताना बऱ्यापैकी भिती वाटे. ह्या रस्त्याच्या बाजूच्या झाडीचे दिवसाचे चित्र!



पहिली दुसरीपर्यंत आमच्या घरात सर्वजण एकत्र जेवण करीत. मग एकदा कधीतरी चार भावांनी वेगळा स्वयंपाक करण्याचे ठरविलं. त्यावेळी आम्हा सर्व लहान मुलांना खूप दुःख झालं होतं.

त्याकाळी मे महिन्यात आम्ही मुले वाडीत खूप खेळत असू. दगड का माती, लपालपी, विटी दांडू आणि गोट्या, क्रिकेट असले खेळ चालू असत. पकडापकडी खेळताना वाडीत लपायला बरे जाई. आमच्या घराच्या बाजूलाच बेडे होते. ह्या बेड्यातील चुलीवर पूर्वी स्वयंपाक केला जाई. पूर्वी आमच्या कुटुंबाची भाताची शेती वालीव ह्या ठिकाणी होती. सुगीच्या दिवसानंतर आलेला तांदूळ साठविण्यासाठी ह्या बेड्यात कणगे होते.



ह्या बेड्याच्या माळ्यावर लाकडे वगैरे साठवलेली असत. लपालपी खेळताना ह्या माळ्यावर आणि पानवेलीत लपायला चांगली जागा मिळे. बेड्याच्या माळ्यावर जायला शिडीवरून चढून जायला लागे. बऱ्याच वेळा ह्या शिडीच्या मधल्या पायऱ्या तुटलेल्या असत त्यामुळे बरीच कसरत करावी लागे.

दोन नंबरची आत्या इंदिरा (जिजी) मालाडला राहते. अनाघाअक्का आणि अभिजीत ही तिची मुले. अभिजीतला लहानपणी वसई खूप आवडायचे. वसई ढकलत मालाडला नेली पाहिजे असे तो म्हणायचा. त्याला भिती हा प्रकार माहीत नव्हता. कोंबड्यांची खुराडी त्यावेळी मोठी असत. त्यात शिरून आतून दरवाजा बंद करून तो कोंबड्यांना घाबरवायचा. बिचाऱ्या कोंबड्या भितीने कलकलाट करायच्या. मग आजी घरातून ओरडायची. मग नाईलाजाने अभिजीतला बाहेर यावं लागे. मे महिन्यात उद्योग कमी असल्याने आम्ही मग बरेच खटाटोप करत असू. करवंटीत पाणी घेऊन त्यात जास्वंदीची फुले पिळून काढून त्यापासून तेलसदृश्य द्रवाची निर्मिती करणे, कैऱ्या पाडून त्याचे पन्हे करणे अशा प्रकारांचा समावेश होई. पन्हे करण्याच्या उद्योगात साखर आवश्यक असल्याने आम्ही काहीसे पेचात पडू. मग मोठीआई आजीची करडी नजर चुकवून एकतर घरातील साखर काढून देई किंवा दोन तीन रुपये देऊन सोसायटीमध्ये साखर आणायला पाठवे.

संध्याकाळी कोंबड्या खुराड्यात झाकणे हा एक मोठा उद्योग असे. खट्याळ कोंबड्या जांभळाच्या आणि आंब्याच्या झाडावर चढून बसत. मग दगडे मारून, काठी फेकून वगैरे त्यांना खाली आणावे लागे. एकाच खुराड्यात अनेक कोंबड्या असत, त्यातील काही कोंबडे / कोंबड्या दादागिरी करून बाकीच्या कोंबड्यांचे हाल करीत. अशा दादागिरी करणाऱ्या कोंबड्यांना काठीने मारून आम्ही वठणीवर आणण्याचा अयशस्वी प्रयत्न करत असू. कोंबड्या अंडी घालत. शिस्तीतल्या कोंबड्या खुराड्यात वेळच्या वेळी अंडी घालत आणि कलकलाट करीत. मग त्यांना सोडण्यात येई. काही कोंबड्या अगदी मुक्त संस्कृतीतील असत. त्या खुराड्यात अजिबात अंडी घालत नसत. मग मोकळ्या सुटल्यावर गोठ्याच्या वरच्या भागात पेंढा वगैरे ठेवला असे तिथे अंडी घालत. बहुदा ही वेळ दुपारची असे. मग त्यांच्या कलकलाटाने झोपलेली आजी उठे. चार सुनांपैकी जी कोणी पहिली नजरेस पडेल तिला अंडे आणण्यासाठी पाठवे. ती सून मनातल्या मनात नाखूष होत नाईलाजाने अंडे आणायला जाई.

वर्षातील काही काळात मोठीआई एखाद्या कोंबडीला अंड्यावर बसवे. बेड्यात एका टोपल्यात पेंढा वगैरे ठेवून त्यात ही गावठी अंडी त्या कोंबडीला दिली जात. साधारणतः एकवीस दिवसांनी पिल्ले बाहेर येत. सुरुवातीला कोंबडीला ह्या अंड्याविषयी इतकीच आत्मीयता नसे पण कालांतराने त्या फक्त पाणी पिण्यासाठी आणि दाणे खाण्यासाठी अगदी थोडा वेळ बाहेर पडत. पिल्ले बाहेर आली की मग अजून कसरतीचा काळ सुरु होई. त्यांना नेहमीच्या खुराड्यात ठेऊन फायदा नसे कारण तिथल्या भोकातून ही खट्याळ पिल्ले बाहेर येऊ शकत असत. त्यांना बहुदा सुरुवातीला टोपल्यातच ठेवलं जाई. मग चार पाच दिवसांनी कोंबडीचा एक पाय दोरीने बांधून तिच्यासोबत ह्या सर्वांना बाहेर सोडलं जाई. कोंबडी मग ह्या सर्वांना दाणे शोधण्याचं आणि खाण्याचं प्रशिक्षण देई. तिला गांडूळ वगैरे मिळाले की घशातून एक वेगळाच आवाज काढून ती ह्या सर्व पिल्लांना बोलवे. असा आवाज आला की सर्व पिल्लं मग आपले उद्योग सोडून तिच्याकडे पळत येत. मग त्यांची ह्या खाद्यासाठी खूप मारामारी होई. आकाशात कावळे मंडळी ह्या पिल्लांवर लक्ष ठेऊन असत.एखादं खट्याळ पिल्लू कोंबडीपासून बरंच लांब गेलं आणि आम्ही पहारेकरी बच्चेमंडळी समजा तिथे नसू तर एकदम झेप घेऊन मग तो कावळा पिल्लाला उचलून नेई. पुन्हा मग एकदा कोंबडीचा कलकलाट होई. समजा कोंबडीला वीस अंडी देऊन बसविली असेल तर त्यातून १२ - १४ पिल्लं बाहेर येत. ह्या एकवीस दिवसांच्या कालावधीत ढगांचा गडगडाट झाल्यास ती गोष्ट अंड्यातील जीवाच्या दृष्टीने चांगली नसे. माझ्या लहानपणी (पहिलीत असताना!) मला एक राखाडी कोंबडी आवडायची. पण ती अचानक गायब झाली. ती बावलाने वगैरे पळविली असा समज करून मी आणि आम्ही सर्व खूप दुःखी झालो. पण अचानक एके दिवशी यशवंतकाका (आमच्या वाडीत काम करणारे) ह्यांना गोठ्याच्या वरती रचलेल्या पेंढ्याच्या राशीतून पिल्लांचा आवाज आला. मग अधिक शोध घेता पेंढ्यात माझी आवडती कोंबडी आपल्या दोन पिल्लांसहित सापडली. त्यावेळी मला कोण आनंद होऊन माझ्या डोळ्यातून पाणी आलं होतं.

ह्या कोंबड्यांच्या शत्रुमध्ये बाउल हा प्राणी वरच्या स्थानावर गणला जाई. हा मांजर वर्गातील प्राणी. काही आक्रमक मांजरांचे बाऊल मध्ये रुपांतर होते अशी माझी लहानपणी समजूत होती आणि अजून तशीच आहे. तर हे बाऊल कोंबडी आणि त्यांच्या पिल्लांना पळवून नेत. एकदा अशाच एका बावलाने खूप कहर केला होता. त्याने पाच सहा कोंबड्यांचा फडशा पाडल्यावर आजीने बैठक बोलावली. आणि मग वाडीत काम करणारी गडी मंडळी आणि अजून काहीजण असे मिळून ह्या बावलाचा नायनाट करण्याचे ठरविण्यात आले. एके दिवशी यशवंतकाकाने हा बाऊल गोठ्याच्या वरच्या भागातील पेंढ्यात लपल्याची खात्रीची खबर आणताच ह्या सर्व मंडळींना बोलावण्यात आले. सर्व मंडळीनी मिळून गोठ्याला वेढा घातला. प्रत्येकाच्या हातात काठी किंवा वाडीत काम करण्यासाठी हत्यार वगैरे होते. या मोहिमेत भाग घेण्याची आमची तीव्र इच्छा असून देखील आम्हांला त्यासाठी योग्य नसल्याचे समजण्यात आले होते. पण खिडकीतून हे सारे पाहण्यात सुद्धा केवढा आनंद आहे हे आम्हांला समजून चुकलं होतं. मंडळींनी चोहो बाजूंनी आवाज करण्यात सुरुवात केली. बहुदा बाऊल भेदरला असावा. काही कोंबड्या खाल्ल्या तर त्याचा ह्या मंडळींनी इतका बाऊ का करावा हे त्याला बहुदा समजले नसावे. 
हा तज्ञ मंडळीनी त्या बावलाला एका कोपऱ्यात घेरले. आम्ही अगदी डोळे मोठे करून हे सारे पाहत होतो. आणि अचानक तो बाऊल रुपजी काकासमोर आला. अचानक आलेल्या बावलाच्या दर्शनाने चकित झालेल्या रुपजीकाकाने आपल्या हातातील हत्यार त्याच्या अंगावर मारण्याआधीच उडी मारून तो बाऊल गायब झाला. खिडकीतून हे सारे पाहत असलेल्या आजीने रुपजीकाकाचा उद्धार केला. हे प्रकरण जीवावर बेतलले पाहून मग बिचाऱ्या बावलाने आमच्या कोंबड्याकडे नंतर आपली वक्रदृष्टी फिरवली नाही.

गोठयामध्ये बऱ्याच गाई आणि बैलही असत. त्यांच्यासाठी वर्षभराचा पेंढा आणून ठेवावा लागे. ह्यात आमचे काका जगदीश (ज्यांना आम्ही बाबा असे संबोधित असू) हे पुढाकार घेत असत. वालीवच्या शेतावरून किंवा मग विकत घेऊन ते लॉरीत टाकून घरी आणत असत. ही लॉरी गल्लीच्या निमुळत्या रस्त्यातून कशीबशी अंगणात पोहोचे. ह्या लॉरीत पेंढा अगदी तिच्या उंचीच्या दीडपट प्रमाणात भरलेला असे. त्यामुळे क्वचितच वरच्या विजांच्या तारांना चुकवून आणण्याची सुद्धा कसरत लॉरीवाल्याला करावी लागे. अशा प्रकारे आडव्या आणि उभ्या अशा दोन्ही पातळीवरून कसरत करून मग पेंढा अंगणात पोहोचे. मग त्यातील कामगार हा पेंढा पटापट अंगणात फेकून टाकत. त्यावेळी पेंढ्यातून त्याचा बराच हलका भाग (नक्की शब्द आता आठवत नाही) घरात शिरण्याची शक्यता निर्माण होई. अशा वेळी घराच्या सर्व खिडक्या झटापट बंद कराव्या लागत.

मग पुढे दोन तीन दिवस हा पेंढा व्यवस्थित एकावर एक लावून ठेवण्यासाठी कामगार मंडळी येत. हा पेंढा व्यवस्थित लावून ठेवला की त्याच्यावर उडी मारण्यासाठी तो लहान मुलांना अगदी आकर्षित करे. कधी एकदम खूप पेंढा आणला की मग त्याचे दोन तीन थर बनत. मग  अंगणात क्रिकेट खेळताना मुद्दाम चेंडू ह्या पेंढ्याच्या राशीवर मारला जाई. त्यावर आम्ही चढलो असता आजी किंवा मोठ्या लोकांनी पकडल्यावर मग आमची काशी होत असे.

माझे वडील कुलाब्याला भाभा अणुशक्ती केंद्रात कामाला होते. समजा गडी आला नाही तर ते ऑफिसला साडेसातला निघण्याआधी गाईचे दुध काढून जात. आणि संध्याकाळी परतल्यावर गाईला बादलीत पाणी देत आणि पेंढ्याची किंवा सुक्या गवताची एक गुंडी देत असत. समजा त्यांना उशीर झाला किंवा ते बाहेरगावी गेले की मग ही जबाबदारी आमच्यावर येई. रात्रीच्या वेळी गोठ्यात जाणे हा अगदी उत्कंठावर्धक अनुभव असे. विहिरीचे पाणी हाताने काढून बादलीत भरायच आणि मग ती बादली घेऊन गोठ्यात जायचं. खाली बसलेली गाय मग शांतपणे उठे आणि हळूहळू पाणी पीत असे. तितक्या वेळ त्या अंधारात थांबावे लागे. लहान असल्याने त्यावेळी उगाच कोठून छोटं जनावर वगैरे निघेल कि काय अशी भीती वाटे.  शुद्ध पक्ष चालू असल्यास आकाशातील चंद्र दर्शन देई. मग केव्हातरी तयार खाण्याचा प्रकार निघाला. सुग्रास, चुनी, भरडा असे प्रकार आले. गाईचे दुध काढण्याआधी त्यांना एका घमेल्यात ह्या सर्वांचे योग्य प्रमाणात मिश्रण करून खायला दिले जाई.

गाई व्याल्या की सुरुवातीच्या दिवसातल्या चिकट दुधाचा खरवस बनवला जाई

माझी आई बोर्डीची. तिच्या वडिलांनी म्हणजे बोर्डीच्या अण्णांनी तिला एकदा म्हैस पाठवली होती. ही म्हैस अगदी धष्टपुष्ट होती.एकदा ही म्हैस तिच्या गळ्याला बांधलेली वेसण तोडून पळाली. पळाली ती पळाली आणि वर मग वाडीत दुध्याचा मांडव होता तिथे जाऊन पोहोचली. तिच्या अंगातील शक्तीला बाहेर पडण्यासाठी तिच्याकडे दुसरे काही साधन नव्हते. म्हणून तिने थेट  संपूर्ण मांडव आपल्या डोक्याने आणि शिंगाने जोरात हलवायला सुरुवात केली. संपूर्ण पाटील कुटुंब हा बाका प्रसंग अगदी प्रचंड तणावाखाली येउन पाहू लागले. तिच्या माहेरची म्हैस असल्याने माझ्या आईला अधिकच तणाव आला.  सर्व पाहणाऱ्या माझ्या मोठ्या भावाने मग प्रसंगाला आवश्यक असणारे धैर्य दाखवलं. सरळ चालत जाऊन त्याने हातात घेतलेली वेसण थेट त्या म्हशीच्या डोक्यात घुसविली आणि एका मोठ्या शूर वीराच्या थाटात गोठ्यात नेऊन बांधली. त्याच्या ह्या थोर पराक्रमावर सर्व पाटील कुटुंबीय (दुधीचा मांडव वाचल्याने) आणि खास करून आई खूप खूष झाली.



(क्रमशः)
Me Marathi!

शनिवार, २२ नोव्हेंबर, २०१४

दुरावा - अंतिम भाग

 



आयुष्याचा हिशेब मांडण्यात इवाची रात्र गेली. झोप लागण्याचा तर प्रश्नच नव्हता. मारियाच्या कहाणीवर विश्वास ठेवायला तिचं मन तयारच नव्हतं. आपण सर्जीचे फोन घेतले नाहीत आणि ई-मेल ही सरळ डिलीट करत गेलो. आणि आता तिला अंधुकसं आठवलं. तिच्या एंगेजमेंटनंतर सर्जीने तिला अजिबात संपर्क केला नव्हता ते! आपली एंगेजमेंट झाली म्हणून त्याने रागाने संपर्क करायचं थांबवलं असाच तिने ग्रह करून घेतला होता. पण आज तिला त्यामागची खरी कहाणी समजली होती. आता तर तिला रडूही येत नव्हतं. आपल्या खऱ्या प्रेमाच्या इतक्या जवळ येऊन सुद्धा आपण इतके दूर राहिलो हे तिला कळून चुकलं होतं. गेलेलं आयुष्य आता काही परत येणार नव्हतं.
घड्याळात तास पुढे सरकत होते. सकाळ झाली तशी घरात लगबग सुरु झाली. आता इथे परत राहायचं तर काही प्रयोजनच नव्हतं. मारियाने जे काही केलं ते आपल्याच आईवडिलांच्या सांगण्यावरून केलं असलं तरी मारियाला माफ करण्याची तिची अजिबात तयारी नव्हती. ह्या सर्व कहाणीत फक्त तिच्याशी संपर्क असणारी मारियाच होती. पाच वर्षापूर्वीच आंद्रेई तिची साथ सोडून गेला होता. आई वडील जाऊन तर बरीच वर्षे झाली होती. आणि सर्जी? सर्जी कोठे असेल हा प्रश्न आपल्या मनात येत असताना देखील तिने त्याच्यावर विचार करण्याचं कसोशीने टाळलं होतं. पण ही सर्व परिस्थिती समजल्यावर मात्र तिच्या मनाचे सर्व निग्रह कोलमडून पडले होते.
मारिया सुद्धा एव्हाना उठली होती. मनावर दगड ठेऊन इवा तिच्या खोलीत गेली. एखाद्या अनोळखी माणसाला भेटताना जसे भाव असतात तसे ह्यावेळी तिच्या मनात होते. मारियाला सुद्धा अपराधी भावनेनं पूर्ण घेरलं होतं. त्यामुळे दोघींमध्ये संवाद असा काही होत नव्हता. अचानक इवाच्या मनात एक प्रश्न आला. खरतरं हा बराच आधी यायला हवा होता. "मारिया, तुला माझा पोलंडमधील पत्ता मिळाला कसा?" इवाने तिला विचारलं.
बराच वेळानं हिनं आपल्या नावाने संबोधून काही तरी विचारलं ह्याचंच मारियाला बरं वाटलं.
"मागच्या महिन्यात मला एका मैत्रिणीचे पत्र आले. जेनी नावाची मैत्रीण! तिनं आपल्या बऱ्याच मैत्रिणींचे पत्ते दिले होते आणि आपण सर्वांनी पुन्हा एकत्र भेटायला हवं असं म्हटलं होतं!" मारियाने आपल्या खोकल्याची उबळ दाबत उत्तर दिलं.
"ही कोण जेनी?" मला तर हे नाव कधी ऐकल्यासारखं वाटत नाही तुझ्या तोंडून!" इवाने काहीसं आश्चर्यचकित होत विचारलं.
"मलाही ही जेनी कोण हे आठवलं नाही. पण म्हटलं आताशा आपली स्मरणशक्ती काही कामाची राहिली नाही! असेल एखादी त्यावेळची कोणी उत्साही मैत्रीण! आणि पत्ते, फोन नंबर तर तिने सर्वांचे बरोबर दिले होते ना!" इवा आता बोलू लागली हे पाहून बरे वाटू लागलेली मारिया काहीशा उत्साहात म्हणाली.
इवाच्या डोक्यात मात्र वेगळाच विचार आला होता.
"मला ते पत्र दाखवं ना! आता इथवर आली आहे तर जमत असेल तर बाकी एक दोघींना सुद्धा भेटून जाईन म्हणते मी!" इवा म्हणाली. परतीचं तिकीट तीन दिवसानंतरच होतं.
"हे बघ इथंच कोठेतरी असेल ते!" मारिया एका पेपरच्या गठ्ठ्याकडे बोट दाखवत म्हणाली.
"ही आयुष्यभर टापटीपपणा काही शिकू शकली नाही म्हणायचं" तशाही परिस्थितीत इवाच्या मनात विचार आला.
त्या पेपरच्या गठ्ठ्यातून ते पत्र शोधताना इवाच्या नाकी नऊ आले. एका क्षणी तर तिने आशाच सोडून दिली होती. पण नशिबाने तिला शेवटी ते एका पुरवणीत सापडलं. ते पत्र हस्तलिखित असेल अशी तिची आशा ते पत्र पाहताच मावळली. संगणकावर टाईप केलेलं ते पत्र होतं.
तिनं ते पत्र पूर्ण तपासून पाहिलं. अगदी एखाद्या गुप्तहेरासारखं! सुरुवातीला तिला त्यात काहीच सापडलं नाही. पण अचानक तिची नजर त्या पत्राच्या कागदाकडे गेली. त्यावर एक वॉटरमार्क होता. आणि त्यावर एका हॉटेलचा पत्ता होता जो ती कधीच आयुष्यभरात विसरू शकली नव्हती.
पुढील दोन तासात काहीतरी बहाणा करून इवा मारियाच्या घरातून बाहेर पडली. थोड्या वेळात परत येईन असं सांगून! त्या हॉटेलचा रस्ता दीड तासाचा चढणीचा आणि वळणावळणाचा होता!!!
इवा त्या हॉटेलात पोहोचली त्या वेळी आकाश भरून आलं होतं. कधीही बर्फवृष्टी होणार होती. हॉटेलच्या रजिस्टरमध्ये इवाने आपल्या नावाची नोंद केली. आपलं लग्नाआधीच नाव टाकायला ती विसरली नाही. ते नाव पाहताच स्वागतकक्षातील त्या स्त्रीच्या चेहऱ्यावरील भाव पालटले. तिने हळू आवाजात एक फोन केला. इवाला पाच मिनिटं थांबण्याची विनंती केली. थोड्या वेळानं तिनं इवाला बोलावलं.
"ही आपल्या रूमची चावी ! आपल्याला प्रतीक्षा करायला लागल्याबद्दल क्षमस्व!" ती म्हणाली.
इवाला मात्र ह्या विलंबाच काही वाटत नव्हतं. हिल स्टेशनच्या ह्या हॉटेलमध्ये उरलेलं आयुष्य घालवायची तिची तयारी होती. तिच्या मनातील संशय खरा असावा असं दर्शविणारी काही चिन्ह आजूबाजूला होती. पण प्रत्यक्ष मात्र काहीच घडत नव्हतं.
आपल्या रुमच्या दिशेने इवा निघाली. इतक्या वर्षानंतर तिला आपल्या पहिल्या भेटीतला रूमचा क्रमांक आठवत नव्हता. पण जशी तिनं खोली उघडली तसं तिला लख्ख आठवलं. हिल स्टेशनवरील तिच्या पहिल्या भेटीतली हीच खोली होती.
"आणि हे काय, ह्या खोलीत सर्व सामान तसंच आहे! ह्या लोकांना काही समजतं की नाही!" इवा रागानेच स्वतःशीच म्हणाली.
अचानक तिची नजर खोलीतील एकमेव खुर्चीकडे गेली. आणि तिचं अंग शहारून उठलं. तिथं कोणीतरी पाठमोरं बसलं होतं. एक सेकंद भयाची भावना तिच्या मनात दाटून आली. पण दुसऱ्याच क्षणी तिनं त्या पाठमोऱ्या केसांच्या वळणाला ओळखलं. पिकले म्हणून काय झालं केसांचं ते वळण ती कधीच विसरू शकणार नव्हती.
हॉटेलचा मालक सर्जी हळूच उठला. गेली दहा वर्षे ह्या रुममध्ये एकट्याने वास्तव्य करताना कधीतरी हा क्षण येईल अशी आशा त्यानं कायम बाळगली होती. पण प्रत्यक्ष हा क्षण जेव्हा उगवला त्यावेळी डोळ्यातील अश्रुंवर तो अजिबात नियंत्रण ठेऊ शकला नाही. परिस्थितीने एकत्र आणू न शकलेले ते दोन जीव बराच वेळ एकमेकांकडे भरल्या डोळ्यांनी पाहत राहिले.
शेवटी इवालाच राहवलं नाही. ती धावत धावत जाऊन सर्जीच्या उबदार मिठीत शिरली. बर्फवृष्टी सुरु झाली होती.
पुढील कित्येक तास दोघंही आपल्या कहाण्या एकमेकांना सांगत होते. सर्जी आयुष्यात खूप यशस्वी झाला होता. आणि अविवाहितच राहिला होता. हे ऐकून इवाच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. तिची नजर खिडकीच्या दिशेने गेली. आणि तिला अजून एक धक्का बसला. भिंतीवर विक्टर आजोबा आणि वोल्गा आजीच्या छबी तिला दिसल्या. हसऱ्या चेहऱ्यांनी ते ह्या दोघांना आशीर्वाद देत आहेत असेच इवाला वाटत राहिलं. वोल्गाचे ते शब्द अजूनही तिच्या कानात घुमत होते.

"दरवर्षी जेव्हा पहिल्यांदा हिमवर्षाव होतो तेव्हा आमच्यापैकी कोणावरही एकट्याने हा हिमवर्षाव पाहण्याची वेळ ईश्वराने येऊ नये, हीच प्रार्थना मी करते! आणि म्हणूनच मी अशी हळवी होते! इतका कडक हिवाळा एकट्याने काढण्याची वेळ कोण्या वैऱ्यावर सुद्धा येऊ नये! पण ही गोष्ट कठोर पुरुषांना कशी कळणार!"

इथं मात्र इवाला एक मृदू स्वभावाचा पुरुष मिळाला होता पण परिस्थितीने त्यांना दूर केलं होतं. आणि आयुष्याच्या संध्याकाळी मात्र दोघांना एकत्र आणलं होतं. 
"मी अजूनही उरलेलं आयुष्य ह्याच्यासोबत काढू शकेन का? की परत मला माझ्या संसाराची काळजी घ्यायला जावं लागेल." इवाच्या मनात विचारांचं वादळ सुरु झालं होतं.
"नाही मला परत जायचं नाहीय! मला माझ्या सर्जीच्याच कुशीत उरलेलं आयुष्य काढायचंच!" इवा मोठ्यामोठ्याने स्वतःचीच बोलत होती.
"इवा, इवा तू ठीक आहेस ना!" तिची ही स्थिती पाहून सर्जी काळजीने म्हणाला.
"हो सर्जी, तू मिळालास मी खूप खुश आहे! मला उरलेलं आयुष्य तुझ्याच सानिध्यात घालवायचं आहे!" इवा अगदी उत्कट स्वरात म्हणाली.
"हो नक्की!" सर्जी मनापासून म्हणाला. त्याची आयुष्यभराची प्रतीक्षा संपली होती.

"इवा, इवा तुला हे काय होतेय!" अचानक इवाच्या चेहऱ्यावरील वेदनेचे भाव पाहून सर्जी काळजीने म्हणाला.
"काही नाही रे अचानक छातीत कळ आली!" चेहऱ्यावर हसू ठेवायचा अयशस्वी प्रयत्न करीत इवा म्हणाली.

"आय ऍम एक्सट्रिमली सॉरी! शी इज नो मोर विथ अस!" तातडीने बोलावललेल्या डॉक्टरचे हे शब्द सर्जिला उद्वस्त करून गेले होते. आयुष्यात पुन्हा सर्जीपासून दुरावा सहन न करू शकणाऱ्या इवाने त्याच्याच मांडीवर प्राण सोडले होते.
  
(समाप्त!)

गुरुवार, २० नोव्हेंबर, २०१४

दुरावा - १३


 

इवा आपल्याच विचारात गुंतली होती. मध्येच हवाई सुंदरीने तिला शीतपेयाविषयी विचारलं. विचाराच्या गुंत्यात अडकलेल्या इवाने वेळ घालवायला म्हणून एक शीतपेय घेतलं सुद्धा! मन अजूनही त्या आयुष्याला कलाटणी देणाऱ्या काळात गुंतलं होतं. 
आईने सर्जीच्या घरी विचारलं हे तिला ज्या दिवशी कळलं तो दिवस तिचा बराच दुःखातच गेला. पण जसजसा दिवस पुढे गेला तसतसं तिनं स्वतःवर नियंत्रण मिळवत आणलं. ती तीन चार दिवसाच्या सुट्टीसाठी गावी आली होती. 
मग दुसऱ्या दिवशी ती फिरायला म्हणून बाहेर पडली तर अचानक आंद्रेई तिच्या बाजूला आपली जीप घेऊन आला. 
"हाय, इवा कशी आहेस?" आंद्रेई म्हणाला. 
"मी ठीक आहे, तू कसा आहेस?" इवाने हसून प्रत्युत्तर दिलं. 
"आज तुला वेळ असेल तर आपण जेवायला बाहेर जाऊयात का?" 
आंद्रेईच्या ह्या प्रश्नाचं तिला आश्चर्य वाटलं. गाव होतं लहान आणि त्यात केवळ एक दोन हॉटेलच होती. आणि तिथं एकत्र जेवायला गेल्यास गावातले सर्व लोक पाहणार हे तर नक्कीच होतं. काही न बोलता दोघं चालत राहिली. इवाच्या डोक्यात विचारचक्र चालूच होते. ह्याला ह्याची आई सर्जीविषयी बोललीच असणार. आणि बहुदा ह्याच्या आशा आता पुन्हा पल्लवित झाल्या असणार. आणि हा मुद्दाम आपल्याला गावातील सर्व लोक पाहतील अशा ठिकाणी एकत्र जेवायला बोलावतो आहे. म्हणजे जवळजवळ हे आपल्याला विचारण्यासारखंच आहे. पण नाहीतरी जर सर्जी आपल्याशी लग्नाला तयार नसेल तर मग काय दुसरा कोणीही चालेल. आणि तसं बघायला गेलं तर आंद्रेई स्वभावाला आहे तसा चांगला, आणि दोन्ही कुटुंब राहतील आनंदात!
"ठीक आहे, संध्याकाळी सात वाजता तू मला घरी घ्यायला ये!" इवा शांतपणे म्हणाली. आंद्रेईच्या चेहऱ्यावरील आनंदाचे भाव तिला अजूनही चाळीस वर्षानंतर पक्के आठवत होते. 
सायंकाळी इवा बऱ्यापैकी चांगली तयार होऊन तयार राहिली. मग आंद्रेई सुद्धा चांगले ठेवणीतले कपडे घालून आला. गावातल्या त्या छोट्या हॉटेलात दोघे एकत्र शिरले तेव्हा सर्वांच्या नजरा त्या दोघांवरच खिळल्या होत्या. 
जेवण तसं साधंच होतं. 
"आंद्रेई, तू मला लग्नासाठी विचारायचं मनात ठेऊन आहेस का?" इवाच्या ह्या अचानक आलेल्या प्रश्नाने आंद्रेईला एक भला मोठा ठसका लागला. तो पीत असलेला सूप त्याच्या शर्टावर काहीसा उडला देखील! 
"अं म्हणजे, तसं म्हणजे…" आंद्रेईला शब्द अगदी सुचत नव्हते. 
"आंद्रेई बघ आपण आता दोघेही जाणते आहोत! मला सर्जी आवडायचा, अजून आवडतो आणि बहुतेक आयुष्यभर आवडत राहील! काही कारणांमुळे, जी मला पूर्णपणे जाणून घेता आली नाहीत आमचं लग्न होत नाहीये! तू एक सज्जन गृहस्थ आहेस आणि प्रेमळही आहेस! मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे! आणि मी आयुष्यभर तुझा संसार सुखाने करीन! पण अधून मधून मला सर्जीची आठवण आली आणि मी दुःखी झाली तर तू मला तितका काळ समजून घ्यायचंस!" एका दमात इवाने आपल्या आयुष्याला कलाटणी देणारे भाषण दिलं होतं. 
आंद्रेईला हे सारं अनपेक्षित होतं. इवाचा भूतकाळ त्याला माहितच होता. पण तिच्या भविष्यकाळातील मानसिक स्थितीविषयीच्या रोखठोक वक्तव्याने तो पूर्णपणे हबकून गेला. 
"मला विचार करण्यासाठी एक दोन दिवसाचा वेळ दे!" शर्टवरील खूप प्रयत्न करून सुद्धा न जाणाऱ्या डागांकडे बघता बघता तो म्हणाला. इवाला त्याचं हे वाक्य खूप आवडलं. तो अगदी उतावळ्या नवऱ्याप्रमाणे हो म्हणाला असता तर तिला ते आवडलं नसतं. 
पुढे दोन दिवसांनी अपेक्षेनुसार त्यानं हो म्हटलं. आणि पुढे दोन महिन्यात लग्नसुद्धा झालं. इवाने कझान मधील नोकरी एव्हाना सोडून दिली होती. 

विमान मॉस्कोला उतरलं. इतक्या वर्षांनी मायदेशी परतल्यानंतर तिला सारं काही बदलल्यासारखं वाटत होतं. कझानला जायची बस नशिबाने तिला पटकन मिळाली. कझानला पोहोचल्यावर मारियाचं घर शोधताना इवाची थोडी धांदलच उडाली. शेवटी नशिबाने तिला घर मिळालं. घरची बेल तिने वाजवली. मारियाच्या मुलानेच दरवाजा उघडला. आपण येत आहोत ह्याची इवाने अजिबात पूर्वसूचना न दिल्याने मारियाचा मुलगा इवाने आपला परिचय करून देताच अगदी हबकून गेला. क्षणभरात सावरून मग त्याने तिला घरात घेतलं. मारियाला झोप लागली होती. त्यामुळे इवाने ताजेतवाने होणे पसंत केलं. घर बऱ्यापैकी मोठं असल्याने इवासाठी एक स्वतंत्र खोली द्यायला जमून गेलं. 

इवानेही मग काही वेळ पडून राहणं पसंत केलं. जरावेळ डोळाच लागला तिचा! मग अचानक जाग आली तर तिच्या बाजूला बिछान्यावर मारिया बसली होती. अगदी कृश झाली होती तिची सखी मारिया! किती वेळ इवा जागी होण्याची ती वाट पाहत होती कोण जाणे! इवा जागी होताच तिने इवाला घट्ट मिठी मारली! दोघींच्याही डोळ्यात बराच वेळ अश्रू वाहत राहिले होते. 

"तू अशी आम्हां सर्वांना सोडून का गेलीस बरं? आणि ते ही अजिबात कोठे गेलीस तेही न सांगता!" मारिया म्हणाली. 
"आंद्रेईला नंतर नंतर ह्या वातावरणापासून दूर जायचं असं वाटायला लागलं!" इवा म्हणाली. 
इतक्यात मारियाची सून आत आली. 
"मारिया, तुम्ही आता तुमच्या बिछान्यावर पडून राहावं हेच बरं! डॉक्टरांनी इतका वेळ बोलायला आणि बसून राहायला तुम्हांला बंद केलं आहे!" ती म्हणाली. 
"इतक्या वर्षांनी जिवलग मैत्रीण भेटल्यावर डॉक्टरचा सल्ला ऐकायला मी थोडीच बसणार आहे!" मारियाने तिचा सल्ला साफ धूडकावून लावला. 
सुनेने मग इवाकडे पाहिलं. 
"ठीक आहे, मारिया मीच तुझ्या खोलीत येते!" इवाने सुवर्णमध्य काढला. 
मारियाच्या खोलीत गेल्यावर इवाने तिला बिछान्यावर झोपवलं. तिचा स्वेटर सारखा केला. हातमोजे, पायमोजे चढवले. अशी जय्यत तयारी करून दोघी जिवलग मैत्रिणी गप्पा मारायला सज्ज झाल्या. 
"मला अधूनमधून सर्जीची आठवण यायची ते बहुदा त्याला खपलं नसावं, म्हणून कशीबशी तिथे नोकरी शोधून त्याने मला पोलंडला नेलं" इवाने आपली कहाणी सुरु केली. 
अचानक सर्जीचा उल्लेख होताच मारियाच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. इवाच्याही ते लक्षात आले. 
"तू आंद्रेईला सर्जीविषयी सांगितलं होतंस?" मारियाने अगदी आश्चर्यचकित होऊन तिला विचारलं. 
"हो त्याला नाहीतरी आधीपासून सर्व माहीतच होतं आणि मी सुद्धा लग्नाआधी सगळं स्पष्ट केलं होतं!" इवा म्हणाली. 
"पण मग मला कधी कधी सर्जीची आठवण यायची ते मग आंद्रेईच्या सहनशक्तीच्या पलीकडे गेलं." इवा म्हणाली. 
"मग कधीतरी एकदा मलाच त्याची बाजू पटली! आणि मग मीच त्याच्या  पोलंडला स्थलांतरित होण्याच्या निर्णयाचं समर्थन केलं!" इवा म्हणाली. 
"सर्जीने तुला कधी पुन्हा संपर्क नाही केला? " मारियाने अगदी केविलवाण्या आवाजात विचारलं. 
"त्याने बराच प्रयत्न केला. फोनही केले! पण एकदा आंद्रेईशी लग्न करायचा निर्णय घेतल्यावर मी मात्र त्याच्याशी संपर्क ठेवणे योग्य समजलं नाही! त्याला त्याची नोकरी इतकी प्रिय होती ना! खरं प्रेम असतं तर सगळं काही सोडून तो कझानला परत नसता का आला!" इवाच्या डोळ्यात इतक्या वर्षांनी सुद्धा पाणी आलं. 
"तो सगळं काही सोडून परत आला होता इवा! आणि त्याने तुला संपर्कही करायचा प्रयत्न केला होता!" हुदंके देत देत मारिया म्हणाली. 
"काय सांगतेस काय तू मारिया!" इवाला आयुष्यातील हा सर्वात मोठा धक्का बसला होता. 
"तुझ्या एंगेजमेंटच्या दिवशी तो त्या हॉलवर आला होता. तू तयारी करीत होतीस आणि तो तुझ्या आई वडिलांना भेटला. माझ्या प्रेमाशी खेळू नकास अशी त्याने अगदी भीक घातली. तो अजिबात ऐकेनाच तेव्हा आईवडिलांनी माझी मदत मागितली. आणि … इवा तू मला ह्या बद्दल कधी माफ करणार नाहीस. पण मी त्याला खोटं सांगितलं की तू त्याला विसरलीस म्हणून! इथवर सांगितलं की तुझ्या मनात आता त्याच्याविषयी फक्त राग आहे, फसवणुकीची भावना आहे! हे ऐकल्यावर मात्र तो एक क्षणभरही तिथं थांबला नाही! मी तुझी खूप मोठी गुन्हेगार आहे!" हमसाहमशी रडत मारिया म्हणाली. आपल्या कुशीत आलेल्या आपल्या जिवलग मैत्रिणीविषयी इवाच्या मनात ह्या क्षणी कोणते भाव होते हे तीही सांगू शकत नव्हती!

(क्रमशः)



मंगळवार, १८ नोव्हेंबर, २०१४

दुरावा - १२

 
चाळीस वर्षांनंतर …. 

पोलंडच्या वार्स्वा शहरात इवा आपल्या नातवंडांना शाळेतून परत घेऊन येत होती. येताना सहजच म्हणून तिने आपल्या पत्राच्या पेटीत डोकावून पाहिलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पेटीत पत्र होतं. बऱ्याच दिवसांनी पत्र आलं म्हणून तिनं आनंदानं ते उचललं खरं, पण घरात शिरताच दोन नातवंडांनी जी काही मस्ती सुरु केली त्यामुळे ती त्या पत्रांविषयी पार विसरूनच गेली. मग अचानक रात्री झोपायला जाताना तिला त्या पत्रांची आठवण झाली. लगेच बिछान्यातून बाहेर पडत तिने ती पत्र उघडलं. 
पत्र उघडून चष्मा घालताना तिला बराच वेळ गेला खरा! पत्र कोठून आलं म्हणून तिनं पाठवणाऱ्याचा पत्ता पाहिला आणि तिला आश्चर्याचा मोठा धक्का बसला. कझान शहरातून आलेलं हे पत्र होतं. तिला रशियातून  आलेलं गेल्या वीस वर्षातलं हे पहिलं पत्र होतं. पहिल्यांदा आई गेली आणि मग बाबा; त्यानंतर आठवणीने पत्र पाठवणार तिथं राहिलं तरी कोण होतं? आणि मग तिची नजर पत्र पाठवणाऱ्याच्या नावाकडे गेली आणि ती क्षणभर अगदी चकितच होऊन गेली. तिच्या मारियाने हे पत्र पाठवलं होतं. तिच्या कॉलेजच्या जीवनातली अगदी पट्ट मैत्रीण असणारी आणि मग अगदी दुरावली गेलेली मारिया! 
इवाने अगदी घाईघाईने पत्र उघडलं. मारियाने बरंच मोठं पत्र लिहिलं होतं. अगदी तरुणपणात केलेल्या गमतीसकट आणि त्यानंतरच्या तिच्या संसाराविषयी. पत्राच्या शेवटी मात्र तिच्या लिहिण्यातून अगदी उदासपणा जाणवत होता. आणि तिने तिचा फोन क्रमांकसुद्धा दिला होता. तिचा फोन क्रमांक पाहताच पुन्हा एकदा इवा पटकन बिछान्यावरून उठली. घाईघाईत उठण्याच्या प्रयत्नात आपली सांधेदुखी बळावण्याचा धोका पत्करायला ती तयारच होती. तिने थेट रशियातला मारियाचा फोन फिरवला. दोन तीन रिंग नंतर सुद्धा फोन कोणी उचलत नाही हे पाहून तिच्या मनात निराशेचे ढग दाटू लागत असतानाच "हॅलो!" म्हणून समोरून आवाज आला. "मी इवा बोलतेय, मारियाची मैत्रीण इवा!" मोठ्या उत्साहाने ती म्हणाली. एका क्षणभराच्या शांततेनंतर "म्हणजे तुम्ही आईची कॉलेजातील मैत्रीण!" समोरचा पुरुष म्हणाला. म्हणजे हा मारियाचा मुलगा तर, इवा स्वतःशीच म्हणाली. "हो, तुझं नाव काय? आई कशी आहे!" इवाने त्याला तात्काळ विचारलं. "मावशी, आईची तब्येत ना खूप खराब आहे! डॉक्टरांनी फार थोड्या दिवसांची मुदत दिली आहे!" अगदी दुःखी स्वरात तो उद्गारला. इवाला हा फार मोठा धक्का होता. इतके वर्षं दुरावलेली तिची जिवलग मैत्रीण आज अचानक भेटली होती आणि ती मोजक्या दिवसाची साथीदार असल्याची बातमी तिला ऐकावी लागत होती. 
इवाचे पुढचे काही दिवस अगदी घाई गडबडीतच गेले होते. आणि तिसऱ्या दिवशी इवा रशियाला जाणाऱ्या विमानात बसली होती. खिडकीजवळची तिला सीट मिळाली होती. विमान रनवे कडे हळू हळू चालले होते. आणि जवळजवळ पंचवीस वर्षांनी रशियाला जाणाऱ्या इवाच्या मनात विचारांचं थैमान चालू होतं. 

तिला आठवत होती ती रात्र ज्या दिवशी ती आपल्या लाडक्या सर्जीशी भांडली होती. त्यानंतर नेहमीप्रमाणे तिने पूर्ण रात्र जागून काढली होती. सर्जीशी भांडण झालं की तिचं असंच व्हायचं. सकाळी उठता उठता सर्जीची मनधरणी करण्याचा तिने निर्धार केला होता. थोड्याच वेळात आंद्रेईची आई आली. इतक्या सकाळी तिला पाहून इवाला आश्चर्यच वाटलं. पण तिचं आणि इवाच्या आईचं एका खोलीत अगदी हळू आवाजात बोलणं सुरु झालं तेव्हा तिथं जाणं इवाला योग्य वाटलं नाही. ती जशी आली तशीच काही वेळातच निघून गेली होती. 

एव्हाना विमानाने उड्डाण केलं होतं. आकाश कसं ढगाळलेले होते. 

आंद्रेईची आई निघून जाताच इवा आईपाशी गेली. 
"आई, ही इतक्या सकाळ सकाळी का बरं आली होती?" इवाने विचारलं. "नाही ग, सहजच आली होती, बाकी तू निघणार किती वाजता?" तिची नजर चुकवत विषय बदलायचा आईचा प्रयत्न ती समजून चुकली. 
"आई, खरं सांग काय झालं ते!" आईचे दोन्ही हात घट्ट पकडत तिच्या नजरेत पाहत इवाने विचारलं. 
आईच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. "मी तिला सर्जीच्या घरी विचारायला सांगितलं होतं, तुझ्यासाठी!"
"काय!" इवा मोठ्याने ओरडली!
"तुम्हांला, हे सुचतं तरी कसं आणि ते सुद्धा मला न  विचारता!" आपली आई असं काही करू शकते ह्याच्यावर विश्वास न बसलेली इवा अजूनही ओरडत होती. 
तिची आई मात्र अगदी पश्चातापदग्ध होऊन तिच्या समोर उभी होती. मिनिट - दोन मिनिट तशीच गेली. इवाच्या डोक्यात अनेक विचार येऊन गेले. शेवटी आपली आई पडली भोळीभाबडी, तिच्या समजुतीनुसार तिने प्रयत्न केला आणि तो सुद्धा आपल्या भल्यासाठी. तिच्यावर चिडण्यात काही  अर्थ नाही हे तिला समजून चुकलं.  
"आणि मग त्यांनी नाही म्हटलं असेल ना!" आता इवाचा खंबीरपणा डगमगू लागला होता. 
"म्हणजे तसं थेट नाही नाही म्हटलं! मुलगा अजून जर्मनीत आहे, त्याला स्थिरस्थावर व्हायला वेळ आहे, असा निरोप त्यांनी दिला आहे!" आईने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. 
इवा एव्हाना कोलमडली होती. आईच्या मिठीत घट्ट शिरून आपल्या अश्रूंना मोकळी वाट करून देण्याशिवाय तिच्याकडे मार्ग उरला नव्हता! हा निरोप नक्कीच सर्जीपर्यंत पोहोचला असणार. आणि तरीसुद्धा त्याने काहीच पुढाकार घेतला नाही अशीच समजूत तिनं करून घेतली. 
तिनं  एक निर्धार केला. आईच्या मिठीतून ती बाहेर निघाली. बाथरूममध्ये जाऊन चेहरा धुऊन आली. 
"आई, झालं ते बरंच झालं, एक अनिश्चितता संपली! आयुष्यात दुसरा मार्ग शोधायला मी मोकळी आहे!" चेहऱ्यावर खोटं हसू आणण्याचा तिचा प्रयत्न आई पूर्ण जाणून होती.
विमान अजूनही ढगाळ वातावरणातून आपला मार्ग काढायचा प्रयत्न करीत होतं. अधूनमधून बसणाऱ्या धक्क्यामुळे हलणारे विमान आपल्या मनातील स्पंदनांना साथ देत आहे असाच भास इवाला होत होता. 

  (क्रमशः)

शुक्रवार, १४ नोव्हेंबर, २०१४

दुरावा - ११

 
सर्जीने बर्लिनमध्ये चांगलाच जम बसविला होता. त्याला बहुदा मोठ्या हुद्द्याची ऑफर आता लवकर मिळणार होती. कामाचं स्वरूप जसं आटपत यायला लागलं तसं सर्जीला आता इवाची अधिकाधिक आठवण होऊ लागली. आपण लवकरच स्थिरस्थावर व्हावं असं त्याला वाटू लागलं होतं. बर्लिन मधील आयुष्य वेगवान होतं. एकंदरीत आपल्या रशियात लोक आयुष्य शांतपणे घालवतात असेच सर्जीला वाटू लागलं होतं. इवासोबत मॉस्कोला घर घेऊन राहावं असाच त्याचा एव्हाना विचार होऊ लागला होता. पण इवाला सुद्धा मॉस्कोमध्ये योग्य नोकरी मिळायला हवी सर्जीच्या मनातील विचारचक्र सुरूच होते. अचानक फोनची बेल वाजली. फोनच्या दृश्य भागात दिसणारा आपल्या घरचा क्रमांक सर्जीनं तात्काळ ओळखला. फोनवर समोर आई एलेनाचा स्वर ऐकून सर्जी खूप उत्साहित झाला. आपल्या ह्या आठवड्यातील घडामोडीची सारी खबर त्याने एका दमात आईला ऐकवली. एलेना सुद्धा अगदी लक्ष देऊन आपल्या पुत्राच्या पराक्रमाच्या गाथा ऐकत होती. अचानक तिला मागून खोकल्याची छोटी उबळ ऐकायला आली. अपेक्षेप्रमाणे मागे विवियन होता. "खूप झालं बोलणं!" जणू काही नजरेनेच त्यांनी सुचवलं. त्यांची मुद्रा पाहत एलेनान मग बोलणं आटपत घ्यायचं ठरवलं. अचानक "एक मिनिटं" असा विवियनचा स्वर ऐकून एलेना काहीशी चकित झाली. बापलेकाचं फारसं फोनवरून बोलणं व्हायचं नाही. झालं तर महिन्यात कधी एकदा! ह्या पुरुषांना आपल्या भावना मनातच ठेवायला जमतं तरी कसं एलेनाच्या मनात नेहमीप्रमाणे विचार आला. बहुदा त्यांच्या मनात भावनाच येत नसतील असा कयास करीत तिनं फोन विवियनच्या हाती सोपवला. विवियनच्या डोक्यात बहुदा कोणता तरी विषय बराच वेळ घोळत असावा आणि म्हणुनच त्याने फोन मागून घेतला असावा हा एलेनाचा अंदाज बरोबर होता. 

पुढे अर्धा तास विवियन सर्जीशी बोलत होते. सर्जीने आपल्या पराक्रमाच्या ताज्या कथा विवियनला ऐकवल्या. त्या ऐकून झालेला आनंद आपल्या बोलण्यात दिसून न देता विवियन ह्यांनी मग पुढे तो कोणता निर्णय घेणार असा प्रश्न केला. "म्हणजे?" विवियनच्या प्रश्नाचा रोख न समजल्याने सर्जीने विचारलं. "हे प्रशिक्षण पूर्ण झालं की मी रशियात परत येतोय!" तो पुढे म्हणाला. "पण जर्मनी, इंग्लंडात खूप मोठ्या संधी असतीलच की!" विवियनने आपल्या मनातील विचार एकदाचा बाहेर काढला. आता मात्र सर्जी अगदी वैतागला. "मला परत येऊन इवाशी लग्न करायचंय!" आपल्या तोंडून निघालेल्या ह्या वाक्याने सर्जी बहुदा ते ऐकलेल्या विवियनपेक्षा जास्त आश्चर्यचकित झाला. विवियनचा हेतू साध्य झाला होता. त्याला ह्या मुद्द्यावर सर्जीशी बरेच दिवस बोलायचं होतं. पण योग्य संधी मिळत नव्हती. आज अशी अचानक संधी आलेली पाहून विवियन मनातल्या मनात खूष झाले. 
"ही इवा कोण? ग्रेगरीकडे भेटलेली तुझी मैत्रीण, तीच का?" विवियनने मुद्दामच खोचक प्रश्न केला. 
"हो तीच! आणि जी दुसऱ्या दिवशी आपल्या घरी आली होती तीच " आपल्या वडिलांचा स्वभाव पूर्णपणे माहित असलेला सर्जी म्हणाला.
 "हं!" विवियन ह्यांनी एक सुस्कारा टाकला. "तिचं करियर मला काही खास दिसलं नाही! साध्याच कंपनीत काम करत होती आपल्याला भेटली तेव्हा!" विवियन ह्यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं. 
"मला तिच्या करियरशी काही देणं घेणं नाहीये! मला ती आवडते, मी तिच्याशी लग्न करणार!" सर्जी म्हणाला. 
"सर्जी, तू थोडी व्यावहारिक दृष्टीकोन ठेवावास असं मला वाटत! एखाद्या चांगल्या करियर करणाऱ्या मुलीशी तू लग्न केलंस तर ती आयुष्यभर तुला बौद्धिकदृष्ट्या अधिक चांगली साथ देऊ शकेल!" विवियनने आपलं घोडं पुढे दामटण चालूच ठेवलं. 
"हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि त्यात तुम्ही दखल देऊ नयेत असं मला वाटतं!" संयम संपलेल्या सर्जीने शेवटचा घाव घातला. 
"ठीक आहे!" असं म्हणत विवियनने फोन ठेवला. 

सर्जीचा मूड ह्या फोन कॉलने पुरता बिघडला होता. इतक्यात पुन्हा फोनची रिंग वाजली. समोर इवा होती. सर्जीला तिचा फोन ह्या क्षणी आला नसता तर बरं झालं असतं असंच वाटून गेलं. इवासुद्धा उदास मूडमध्ये होती. आंद्रेईचा संभ्रम तिच्या मनात दाटून राहिला होता. बोलणं चालू होऊन पाच मिनिटं झाली तरी दोघंही असंच काही आजूबाजूचं बोलत राहिली होती. नभांनी ओथंबून आलेल्या आकाशाला आपल्या भावनांचा पाऊस ओतून मन मोकळं करायची इच्छा तर दोघांचीही होती. पण योग्य संधी मिळत नव्हती आणि पुढाकार घेऊन बोलणं सुरु करणं एकालाही जमत नव्हत. सर्जी आपल्या वडिलांशी झालेलं बोलणं विसरून पूर्णपणे भानावर यायचा प्रयत्न करत होता आणि तोवर वेळ काढायचा म्हणून आपल्या प्रशिक्षणाविषयी बोलत होता. "ह्याला आपल्या प्रशिक्षणाशिवाय काही दिसतच नाही" इवाच्या मनात विचार आला. 
"बाकी तुझी नोकरी कशी चालू आहे, पुढे बढतीच्या वगैरे संधी आहेत की नाही?" सर्जीने विचारलं. खरतरं तो आपल्या डोक्यातील विवियनचं बोलणं काढून टाकायचा प्रयत्न करीत होता. 
"नाही, मला कोणी प्रशिक्षणासाठी युरोपात पाठवणार नाहीये!" इवाने काहीशा त्राग्याने उत्तर दिलं. 
का कोणास ठाऊक सर्जीचा संयम अचानक संपला. 
"तू असं का बोलतेस इवा, मला इथे तुझ्यापासून दूर राहायला काही बरं वाटतंय अशातली गोष्ट नाहीये. मी इतका कष्ट करून राहतोय आणि तुझ्या तोंडून माझ्या कौतुकाचा एकही शब्द नाहीयं!" तो म्हणाला. 
त्याच्या ह्या वाक्याने मात्र इवाला अगदी वाईट वाटलं. ह्या सर्जीच्या आकाशाकडे झेप घेणाऱ्या कारकीर्दीचा तिला अपार अभिमान होता. पण सर्व भावना अशा लांबून बोलून दाखवणं तिला काही जमत नव्हतं. पण सर्जीने ही गोष्ट समजून घ्यायला हवी होती इतकीच तिची माफक अपेक्षा होती. बहुतेक वेळा तिलाच सर्जीला फोन करायला लागायचा. पण त्याही गोष्टीचा तिने कधी उल्लेख केला नव्हता. आपल्या सर्जीला ती जिवापार सांभाळत होती. पण त्याच्याच तोंडून असे शब्द ऐकल्यावर मात्र ती पूर्णपणे संतापली. 
"हो ना मी पडली अनाडी! मला तुझ्यासारख्या आणि तुझ्या वडिलांप्रमाणे करियरचं महत्त्व थोडंच माहित आहे!" इतकं बोलत तिने संतापाने फोन आदळून ठेवला. 

सर्जीला आपली चूक कळून चुकली होती. पण आजचा दिवसच खराब होता. तिला उद्या फोन करून तिची नक्की समजूत काढायची असा त्याने पक्का निर्धार केला. 

(क्रमशः)



बऱ्याच दिवसांनी ही कथा पुन्हा सुरु करत असल्याने आधीच्या भागाच्या लिंक्स!

भाग १०
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_19.html

भाग ९
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_16.html

भाग ८
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_12.html


भाग ७
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_10.html

भाग ६
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_6.html

भाग ५
http://patil2011.blogspot.in/2014/10/blog-post_5.html

भाग ४
http://nes1988.blogspot.in/2014/09/blog-post_30.html

भाग ३
http://nes1988.blogspot.in/2014/09/blog-post_28.html

भाग २
http://nes1988.blogspot.in/2014/09/blog-post_11.html

भाग १
http://nes1988.blogspot.in/2014/09/blog-post_10.html



 

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...