मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ६ जुलै, २०२५

द्वैत -भाग ३


९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

अनिकेतला खरं तर स्थळ आणि वेळेचं भान ठेवायला कठीण जायला हवं होतं. पण तैलबुद्धीचा अनिकेत दमला भागला असला तरीही महत्प्रयासाने आपली विचारशक्ती कायम ठेवून होता.  आज रविवार ९ जुलै. गेल्या शनिवारी रात्री आपण थेट विमान पकडून अमेरिकेला आलो. सोमवारी कामात खूपच चांगली प्रगती झाली होती. आणि अचानक सोमवारी रात्री आपल्याला असं डांबून ठेवण्यात आलं. गेले चार दिवस केवळ एक अनोळखी माणूस पिझ्झा, बर्गर वगैरे आणून देत असे.  आंघोळ वगैरे आटोपण्यासाठी त्याला अंधारातच बाथरूममध्ये सोडलं जात असे. त्यावेळी त्याला अर्थातच बंधनातून मुक्त केलं जाई. पण तिथं करड्या आवाजात त्याला न्हाणीघरातून बाहेर येताच पुन्हा बांधून घेण्यासाठी ताकीद दिली जाई. एकंदरीत अनिकेत शाळेपासूनच मारामारी ह्या प्रकरणापासून दूर राहत असल्यानं इथं तो काही प्रतिकार करण्याची शक्यता नव्हती. तरीही ह्या आपल्या अपहरणकर्त्यांबद्दल तो काहीसं चांगलं मत बाळगून होता.  त्याचबरोबर हे आपल्याबरोबर इतकं चांगलं का वागत आहेत हे त्याला समजणं कठीण जात होतं. 

१० जुलै २०५६ (सॅन दिएगो )

अनिकेतला आश्चर्याचा मोठा धक्का बसला होता. आज सकाळी त्याला नाश्त्याला चक्क त्याच्या आवडीचे पोहे देण्यात आले होते. पोहे काहीसे करपले असले तरीही त्याबद्दल त्याची काही तक्रार नव्हती. आवडीचे पोहे मिळाल्याच्या आनंद काही वेळानं स्थिरावल्यानंतर वैदेहीने पोहे केले असते तर असेच केले असते हा विचार त्याच्या डोक्यात आला. पण तिनं नक्कीच हे पोहे करपवले नसते हे तो जाणून होता. वैदेहीच्या चिंतेनं तो अगदी व्याकुळ झाला होता.  

८ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)

सकाळी अनिकेतला उठायला काहीसा उशीर झाला होता.  वैदेहीला शोधत तो स्वयंपाकघरात आला. "गुड मॉर्निंग!" वैदेहीने त्याला सकाळच्या शुभेच्छा दिल्या. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवारी सकाळी स्वयंपाकघरातून पोह्याचा खमंग वास यायला हवा होता. परंतु इथं तर वैदेहीने झोमॅटोवरून साग्रसंगीत नाश्त्याची ऑर्डर दिली होती.  अनिकेत उठायचीच ती वाट पाहत होती. अनिकेत स्वयंपाकघरात येताच तिनं त्याला दात वगैरे घासून नाश्त्याला यायची सूचना दिली. अनिकेतच्या माहितीनुसार शनिवार सकाळी वैदेही जरा रोमँटिक मूडमध्ये असायला हवी होती. पण इथं तर उलट प्रकार दिसत होता. त्यानं पाठविलेले हे डेटा पॉईंट वाचून चॅनसुद्धा गोंधळात पडला होता.  पण अल्बर्टने मात्र त्याची शंका उडवून लावली होती.  "आपल्या कामावर लक्ष द्या, त्या वैदेहीकडे प्रमाणाबाहेर लक्ष देऊ नका" असं त्यानं चॅनला बजावलं. आपल्या ज्येष्ठ सहकाऱ्याच्या विनंतीवजा आदेशाकडं लक्ष देण्याव्यतिरिक्त चॅनकडे पर्याय नव्हता. 

अनिकेत आणि वैदेही ह्या दोघांनी मिळून जरी न्याहारी संपवली तरी वातावरणातील तणाव दोघांना जाणवत होता. अचानक दरवाजावरील बेल वाजली. "अनिकेत दरवाजा उघड!" वैदेहीने सूचना केली. चॅन अगदी सतर्क झाला होता. ह्या सर्व धावपळीत ह्या शक्यतेचा विचार करायला त्याला वेळ मिळाला नव्हता. त्यानं क्षणार्धात दोघांच्या नातेवाईकांची माहिती तात्काळ अनिकेतपर्यंत पोहोचवली. "या! या! दादा,  वहिनी !" अनिकेतने त्यांचं स्वागत केलं. वैदेहीचे दादा, वहिनी काहीसे आश्चर्यचकित झाले. शक्यतो अनिकेतच्या तोंडून फार कमी शब्द बाहेर पडायचे. पुढील तासभर अनिकेत, वैदेहीसाठी कसोटीचा काळ होता. चॅन वैदेहीच्या वागण्याकडं बारीक लक्ष ठेऊन होता आणि क्षणाक्षणाला त्याच्या चिंतेत भर पडत होती. पण अल्बर्टचा त्याला धाक असल्यानं चॅनकडे गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हता. 

दादा, वहिनी जसे परत जायला निघाले तसा वैदेहीने अनिकेतला अजून एक आश्चर्याचा धक्का दिला. "अनिकेत, मी दादा, वहिनीसोबत ठाण्याला जाऊ का?" अनिकेत सोबत दादा वहिनी सुद्धा आश्चर्यचकित झाले होते. "जाऊ दे तिला!" अनिकेत आपल्याला संदेश पाठवून विचारणा करणार हे जाणून चॅनने त्याला आधीच उत्तर दिलं.  ते तिघंही बाहेर पडले तसं अनिकेत गॅलरीत येऊन उभा राहिला. पावसानं चांगलाच जोर धरला होता. 

शनिवार - रविवार वैदेही अनिकेतची वेळोवेळी चौकशी करत होती. त्याच्या जेवणाची व्यवस्थित ऑर्डर सुद्धा तिनं दिली होती. दादा वहिनीशी कामापुरता संवाद साधून ती आपल्या भ्रमणध्वनीवरच जास्त वेळ घालवत होती. "त्यांचं आपल्यासारखंच लुटुपुटीचं भांडण झालं असावं. चल आपण बाहेर फिरून येऊ !" दादा वहिनीला म्हणाला.

१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार 

आज अनिकेतसाठी कार्यालयात अत्यंत महत्वाचा दिवस होता. केनेडी अमेरिकेतील कार्यालयात स्थानिक वेळेनुसार सकाळी (म्हणजेच भारतीय वेळेनुसार सायंकाळी) येण्याआधी त्याला बरीच कामगिरी पार पाडायची होती. रात्री उशिरा घरी परतलेल्या वैदेहीशी बोलायला त्याला वेळ नव्हता आणि रसही नव्हता. 

९ जुलै २०५६ (सॅन दिएगो )

आपल्यासोबत काय होत आहे हे चॅनला समजत नव्हते.  आज रात्री जागून भारतात परतलेल्या अनिकेतसोबत त्याला मोठा पल्ला गाठायचा होता. पण अचानक त्याच्या डोक्यावर एक फटका मारून त्याची शुद्ध घालविण्यात आली होती. काही तासानं शुद्धीवर येताच "आपल्या खोलीत इतक्या सगळ्या सुरक्षापातळ्या पार पाडून कोण पोहोचू शकतो?" हाच पहिला विचार त्याच्या मनात आला होता. "अल्बर्ट?" हा विचार त्याच्या मनात येताच एक मोठी भयाची लहर त्याच्या सर्वांगाला शहारून गेली. 

१० - जुलै - २०५६ (बांद्रा मुंबई) - सोमवार 

अनिकेत मोठ्या उत्साहानं बांद्रा कार्यालयात पोहोचला होता. व्हिडीओ कॉलवर येताच समोर चॅन आणि अल्बर्टला पाहून तो उत्साहित झाला. "आजच आपण सर्व कामं आटोपून टाकुयात!" अनिकेत मोठ्या उत्साहात म्हणाला. "टेक इट इझी यंग मॅन!" अल्बर्टच्या संयमी शब्दांनी त्याला भानावर आणलं. 

 (क्रमशः )


भाग १ - द्वैत -भाग १  

मंगळवार, १ जुलै, २०२५

द्वैत -भाग २


३ - जुलै - २०५६  सायंकाळ (सॅन दिएगो )

आजच्या दिवसभराचं काम व्यवस्थित आटोपलं म्हणून समाधान पावलेला अनिकेत उबेरमध्ये आरामात बसला. आवडीचं मराठी गाणं भ्रमणध्वनीवर सुरु करून इअरफोन कानात टाकून तो  बाहेरच्या रहदारीकडं पाहू लागला. 

...... 


अनिकेतला बऱ्याच वेळानं जाग आली तेव्हा वेदनेनं त्याचं सर्वांग ठणकत होतं. हात पाय बांधल्याने डोळ्यावरील पट्टी काढण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. नक्की काय झालं असावं ह्याचा अंदाज घेण्याचा तो प्रयत्न करू लागला. 


४ - जुलै - २०५६ सकाळ  (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट कार्यालयाच्या दिशेनं जाणाऱ्या अनिकेतच्या प्रत्येक हालचालीवर सुक्ष्म नजर ठेवून होते. कार्यालयात पोहोचल्यावर अनिकेतने बायोमेट्रिक प्रवेशद्वारातून यशस्वीरीत्या आत प्रवेश केल्यानंतर त्यांनी एकमेकांना हाय फाय देऊन आनंद व्यक्त केला.  "गुड मॉर्निंग सर!" अनिकेतने अभिवादन करताच बॉस केनेडीनं नजरेनंच त्याला प्रतिसाद देतानाच लगेचच माझ्या केबिनमध्ये ये असं सुचवलं. अनिकेत आणि केनेडीची चर्चा बराच वेळ चालली. अनिकेतच्या माध्यमातून ती चर्चा चॅन आणि अल्बर्ट ह्यांना थेट ऐकायला मिळत होती. चर्चेचे सविस्तर तपशील ऐकत असताना चॅनचे छोटे डोळे अगदी विस्फारून जात होते. एकंदरीत योजना यशस्वीरित्या सुरु झाली आहे ह्याविषयी त्यांच्या मनात खात्री निर्माण झाली होती.  

४ - जुलै - २०५६ सायंकाळ  (सॅन दिएगो )

अंधारकोठडीतील अनिकेत संतापानं अगदी पेटून उठला होता. आपल्याशी कोण हा असला खेळ खेळत आहे ह्याची त्याला सुतराम कल्पना नव्हती. त्याच गोष्टीचा त्याला जबरदस्त राग येत होता. त्याच बरोबर केवळ बर्गर आणि पिझ्झा खाऊन त्याच्या संतापाचा पारा अगदी वर गेला होता. 

५ - जुलै - २०५६ दुपार  (सॅन दिएगो )

केनेडी आणि अनिकेतची आजची बैठक सुद्धा अगदी यशस्वी झाली होती.  केबिनमधून बाहेर पडता पडता अचानक अनिकेत म्हणाला, "सर, मी सायंकाळचे फ्लाईट बुक करतो. इथली चर्चा बऱ्यापैकी आटोपली आहे, मी आता उर्वरित काम मुंबईतून करू शकतो. " ह्या अनपेक्षित प्रश्नाने केनेडी क्षणभर गोंधळला. पण दुसऱ्याच क्षणाला सावरत "व्हाय नॉट, आताच तू बेकीला सांगून थेट विमानाची सायंकाळची तिकिटं आरक्षित कर !" असं केनेडी म्हणाला. 

हे सारं ऐकणाऱ्या चॅन आणि अल्बर्ट ह्यांच्या आनंदाला पारावर उरला नाही. त्यांना हवी ती माहिती मिळाली होती.  

सायंकाळी विमानतळाकडे जाणाऱ्या अनिकेतच्या हालचालीवर चॅन आणि अल्बर्ट नजर ठेवून होते. तिथून येणाऱ्या व्हिडिओमध्ये दूरवर दिसणाऱ्या एका कारमध्ये केनेडी आपल्या कुटुंबासोबत विमानतळातून बाहेर पडणाऱ्या दिशेनं जात आहे असा भास चॅनला झाला. त्याच्या दुर्दैवानं अतिवेगाने जाणारी ती कार क्षणार्धात दूर गेल्यानं अथक प्रयत्न करूनही चॅन आपल्या शंकेचा पाठपुरावा करू शकला नाही. आताच कार्यालयात असणारा केनेडी इथं कसा असू शकेल ह्या शंकेला त्यानं थोडा वेळ विश्रांती दिली. कारण अनिकेतचे इमिग्रेशन कसं सुरळीत पार पडेल ह्यावर त्याला लक्ष द्यायचं होतं. 

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
वैदेही सायंकाळी घरी परतली तेव्हा अनिकेत क्षणभर आश्चर्यानं तिच्याकडं पाहतच राहिला. वैदेही काहीशी लाजली हे पाहून त्यानं पुन्हा संगणकात लक्ष गुंतवलं. तरीही ही इतके मॉडर्न कपडे कधीपासून परिधान करू लागली हा विचार त्याच्या मनात रेंगाळतच राहिला. 

(क्रमशः )

भाग १ - द्वैत -भाग १  

सोमवार, ३० जून, २०२५

द्वैत -भाग १

 


१ - जुलै - २०५६ (मुंबई)

"अनिकेत, अमेरिकेतील ह्या महत्वाच्या प्रोजेक्टसाठी तुला मनःपुर्वक शुभेच्छा ! मला खात्री आहे की तू यशस्वी होऊनच परतशील !"  वांद्रा कार्यालयात आपल्या व्यवस्थापकाच्या ह्या शब्दांकडं अनिकेतचे फारसं लक्ष नव्हतं. आपल्याला विमानतळावरून वैदेहीला न भेटताच परस्पर अमेरिकेला जावं लागतंय ह्याची खंत त्याला बहुदा जाणवत असावी. "धन्यवाद जॉन !" म्हणत त्यानं जॉनच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. लगोलग केबिनमधून बाहेर पडत त्यानं वैदेहीला फोन लावला. "ठीक आहे रे, अनिकेत! मला सवय आहे तुझ्या अशा अचानक ठरणाऱ्या ट्रिपची! मी राहीन व्यवस्थित दोन आठवडे ! तू तुझी काळजी घे !" वैदेही रागावली तर अनिकेतला दडपण येत असे, पण अशा प्रसंगी ती रागावली नाही ह्याचं त्याला अधिक दडपण येई !

अनिकेतने अमेरिकेला पोहोचताच वैदेहीला मेसेज करून आपण सुखरूप पोहोचल्याचा संदेश पाठवला. त्याच्या प्रोजेक्टचे स्वरूप गोपनीय असल्यानं दिवसातून एखादाच मेसेज किंवा फोन करता येईल ह्याचा अंदाज त्यानं वैदेहीला देऊन ठेवला होता. 

३ - जुलै - २०५६ (सॅन दिएगो )

चॅन आणि अल्बर्ट आपल्या तयारीच्या अंतिम टप्प्यात होते. वर्षभर अनेक चाचण्या केल्या तरी डिजिटल अनिकेत भारतात विमानानं सुखरूप पोहोचेल ना, तिथं कार्यालयात आपल्याला हवी असलेली कामगिरी पार पाडेल ना ह्या गोष्टींचं त्यांना दडपण आलंच होतं. त्याहूनही अधिक दडपण होतं ते वैदेहीला अनिकेतच्या ह्या रूपाविषयी काही संशय येणार नाही ना ह्याविषयी !

७ - जुलै - २०५६ (दादर मुंबई)
अडीच वाजता घराची बेल वाजली आणि वैदेही दचकून जागी झाली. इतक्या रात्री कोण आलं असणार हा विचार तिच्या मनात आला. अनिकेत घरात नसल्यानं अगदी सावध राहायला हवं हे ही तिनं स्वतःला बजावलं. पीप होल मधून दरवाजाबाहेर अनिकेत आहे हे पाहताच तिची उरलीसुरली झोप उडाली. "अनिकेत, तू आणि इथं कसा काय?" दरवाजा उघडता उघडता ती जवळजवळ ओरडलीच. "अग वैदेही शेजारी जागे होतील ना? मी सारं काही तुला समजावून सांगतो. प्रोजेक्टमध्ये बराच गोंधळ झाला आहे, त्यामुळं मला तातडीनं परतावं लागलं. आताही मला तासभर काम करत बसावं लागेल. तू झोप आता. आपण सकाळी बोलूयात! " अनिकेतने एका दमात सारं काही सांगून टाकलं. "ह्याचं काही जगावेगळंच असतं! " असं स्वतःशीच पुटपुटत वैदेही झोपी गेली. 

सोफ्यावर काम आटपून दमलेला अनिकेत तिथंच झोपी गेला. सकाळी नऊ वाजता त्याला जाग आली तेव्हा घरात अगदी सामसूम होती. "वैदेही गेली कुठं" असा विचार करत अनिकेतने घरात एक फेरी मारली. शेवटी त्यानं भ्रमणध्वनी हातात घेतला तेव्हा त्याला वैदेहीचा संदेश दिसला. "सॉरी अनिकेत, तुला झोपेतून उठवायला मला जीवावर आलं ! मी जातेय ऑफिसला. आपण संध्याकाळी बोलूयात !" अनिकेत आश्चर्यचकित झाला होता. मोजक्या वेळात बरीच कामं आटोपायची होती आणि वैदेहीचं असं अचानक जाणं त्याच्या प्लॅन मध्ये बसणारं नव्हतं !
(क्रमशः ) 

रविवार, २२ जून, २०२५

भावनिक बुद्ध्यांक !



 

आयुष्यात एका वळणानंतर मनुष्याच्या जीवनातील संपत्ती,  नुसता बुद्ध्यांक (IQ) ह्यांचं महत्त्व अग्रस्थानावर कायम राहत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळले तर ह्या वयात तुम्ही काहीतरी नेत्रदीपक करून दाखविण्याची शक्यता मावळू लागलेली असते. पस्तिशी - चाळिशीनंतर कुठंतरी आयुष्यातील उभारीचा काळ संपल्याची जाणीव मनात डोकावू लागते. मग सुरु होतो आपल्या जीवनाचा, भोवतालच्या परिस्थितीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याची धडपड.  ह्या संदर्भातील काही मुद्दे.  

१.   ह्या वयातील व्यावसायिक, वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. आपण स्वतःच्या हुशारीवर, श्रीमंतीवर सर्व काही निभावून नेऊ शकतो हा अट्टाहास चुकीचा ठरू शकतो. त्यामुळं माणसं जोडून ठेवायला हवीत. आपली तत्त्वं आणि माणसं जोडून ठेवण्याची गरज ह्यातील सुवर्णमध्य साधता यायला हवा. तत्त्वांशी विशिष्ट प्रमाणाबाहेर केलेली तडजोड  संवेदनशील माणसाला त्रासदायक ठरू शकते. इथं आपल्या भावनिक बुद्ध्यांकाची कसोटी लागते. त्रासदायक अशी तडजोड काही केल्यांनतर त्या परिस्थितीतून किती झटकन तुम्ही बाहेर येऊ शकता हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून असते. 

२. व्यावसायिक, वैयक्तिक जीवनात तुमची कर्तव्यं असतात. ह्या कर्तव्यांना संबंधित अशा सर्व घटनांवर आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं असतं. एकलव्य बनायचं असतं. पण त्याच वेळी तुमच्या जीवनात घडणाऱ्या इतर घटनांमध्ये तुमची उपस्थिती, तुमचा सक्रिय सहभाग असतो. आपला दिवस, सप्ताह, महिना ह्यांचं एका काल्पनिक कागदावर चित्र आखून कर्तव्यं आणि त्या पलीकडील असलेल्या आयुष्याला त्यावर योग्य ते स्थान देणं हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकाचं महत्वाचं काम !  हे चित्र योग्य कालावधीनंतर बदलत राहतात. 'और क्या ऐहदे वफा होते हैं, लोग मिलते हैं जुदा होते हैं' प्रकार घडत राहतात. 

३. हल्ली बरीच माणसं आयुष्यात काहीच घडलं नाही की निराश होतात. ह्या निराश होण्यासाठी काहीच न घडण्याचा  कालावधी अगदी काही तासांपासून सुद्धा सुरु होऊ शकतो. इथं आपले संस्कार कामी येऊ शकतात. गॅजेटपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकं तुम्हांला स्वत्व गवसेल आणि एकदा का स्वत्व गवसलं की नैराश्यापासून दूर राहायला तुलनेनं सोपं जाईल. आपल्या शहरातील मोकळ्या जागांचा अभाव हा मोठ्या चिंतेचा विषय तो ह्याच कारणास्तव! ह्या अभावामुळं लोक घरात कोंडून घेऊ पाहताहेत किंवा महामार्गावर गाड्या घेऊन वाहतूककोंडीत भर घालीत आहेत. 

४. आयुष्यात दीर्घकालीन आणि तात्कालिक ध्येयं असतात. त्यातही तुमची वैयक्तिक आणि संघटनेची ध्येयं असतात. सतत बदलणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीत सर्वांना सोबत घेत जाऊन ह्या ध्येयांच्या विविध छटांना न्याय देण्यासाठी आवश्यक असणारा गुणधर्म म्हणजे भावनिक बुद्ध्यांक ! 

५. आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वशक्तिमानाशी मिसळून जाण्याची प्रक्रिया जमेल तितकी लवकर सुरु करण्याची प्रगल्भता म्हणजे तुमचा भावनिक बुद्ध्यांक. ह्यासाठी देवांचे नामस्मरण करणे, स्वाभिमानाला योग्य ठिकाणी मुरड घालणे, सखोल वाचनात स्वतःला झोकून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. 

६. गावात वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भावनिक बुद्ध्यांक पाहून मी नेहमीच अचंबित होत आलो आहे. जीवनातील विविध घटनांकडे तटस्थपणे पाहण्याची प्रगल्भता ह्यातील बऱ्याच लोकांकडे असते. निसर्गाची असलेली जवळीक ह्यात मोठा हातभार लावत असावी असा माझा कयास. म्हणूनच पोस्टमध्ये एका डेरेदार वृक्षाचं छायाचित्र! पोस्टशी अजिबात संबंध नसणारी छायाचित्रं पोस्टमध्ये बिनधास्त जोडून देणे ही माझी सवय !

कालच्या वसई भेटीत घरच्या जाणकार मोठ्या लोकांसोबत केलेल्या चर्चेचा ह्या पोस्टमध्ये मोठा सहभाग आहे. 

गुरुवार, १२ जून, २०२५

So what ..अर्थात तर मग काय ?





आधुनिक काळातील मला उमगलेल्या काही गोष्टी !

१.  हल्ली बरीच माणसं, राष्ट्रं अधिकाधिक महत्वाकांक्षी बनताहेत. माणसांच्या महत्वाकांक्षांचा उगम नक्की कुठं झाला आहे हे जाणून घेण्याचा मी प्रयत्न करतो. पण बऱ्याच वेळेला आपली विचारप्रक्रिया भरकटत चालली आहे हे जाणवल्यानं मी हा प्रयत्न मी सोडून देतो. 

२. माणसानं महत्वाकांक्षी असणं चांगलं. प्रगतीसाठी ते आवश्यकच आहे. फक्त ध्येयापर्यंत मार्गक्रमणा करताना आपण जे काही त्याग करतो, ज्या माणसांना गृहित धरतो / दुखावतो त्याची जाणीव असणं आवश्यक आहे. तो एक विचारपूर्वक घेतलेला निर्णय असावा. 

३. ध्येय प्राप्तीनंतर त्याचा आपल्याला कोणत्याही बाह्य घटकांच्या मदतीशिवाय निखळ आनंद व्हायला हवा.  आपल्या आनंदासाठी इतरांच्या कौतुकाची, दाद मिळण्याची अपेक्षा नसावी. आपल्या तोंडावर कौतुक करताना काही खोचक वाक्यं, शब्द वापरण्याची सवय काही जणांना असते. मनुष्यजातीची ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे ह्याची जाणीव ठेवावी.  कोणीही किती मोठी प्रगतीची शिखरं गाठली तरी so what हा प्रश्न विचारला जाणार हे अपरिहार्य आहे. 

४. चाळीस, पन्नाशीनंतर माणसं विचित्र वागु लागली आहेत. मी ही वेगळाच वागतो. आपण वेगळं वागतोय हा संदेश आपल्या मेंदूनं आपल्याला द्यावा ह्याची सूचना मेंदूला द्यावी. आपल्याला हे जाणवु देणारी माणसं भोवताली असतील तर आपण सुदैवी आहात. फक्त अशा माणसांनी प्रतिक्रिया दिल्यावर त्यांना पुढील प्रतिक्रिया देण्यासाठी परावृत्त करेल अशी आपली प्रतिक्रिया नसावी. 

५. मुद्दा क्रमांक चार मुळे आपण आयुष्यभर ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्या माणसांपासून काही घटनांमुळं आपण दुखावलं जाण्याची शक्यता वाढीस लागली आहे. अशावेळी खंत न बाळगता शांतपणे बाजूला व्हावं. आपल्या दैनंदिन, कार्यालयीन कामात व्यस्त करून घ्यावं. जसं त्यांनी आपल्याला दुखावलं असं आपल्याला वाटतं तसंच आपण त्यांना दुखावलं असं त्यांना वाटत असावं ही शक्यता ध्यानात घेऊन गप्प बसावं. 

६. जिथं आपल्या मताला किंमत नाही तिथं व्यर्थ / फुकाची गडबड करू नये. 

७. मर्यादित कार्यक्षेत्रात सक्रिय असणाऱ्या लोकांचा आत्मविश्वास दृढ असतो, त्याला दैनंदिन दिवसात तडा जाईल असं काही घडत नसतं. त्यामुळं त्याच्या नादाला लागू नये. सुसरबाई तुझी पाठ मऊ सांगून गप्प बसावं. 

८. समाजातील एकमेकांविषयीचा विश्वास, आस्था झपाट्यानं लयाला जाऊ लागली आहे. ह्यासाठी कदाचित मुद्दा क्रमांक एक कारणीभूत आहे. आपल्या पूर्वजांनी ह्या युगाला कलियुग म्हटलं त्यामागं हे मुख्य कारण असावं. 

कालच वसईतील ज्ञानी माणसांनी 'जो पुरुष घरात शांत बसू शकतो तो समाधानी, त्याच्या जीवनात समस्या कमी!' असा संदेश पाठवला. ह्या संदेशाचे अनुकरण करत ऋतूकाळाप्रमाणे निसर्गात निर्माण होणाऱ्या हिरव्या भाज्या, डाळ, भात आणि मोजक्या वेळा सामिष आहार घेऊन सुखी जीवन जगावं! 

बुधवार, ४ जून, २०२५

वेडात इंग्लिश खेळाडू झाले सायकलस्वार !


मध्यंतरी युरोपातील एका शहरात सायंकाळी नदीतून पोहत घरी जाणारे नागरिक पाहून मी हैराण झालो होतो. दोन तीन दिवसांतच मला मी मुंबईतील नदीतून पोहत घरी येत असल्याचं स्वप्न पडलं.  हडबडून जागा झालो, बराच वेळ बेचैन होतो. शेवटी वेळ न पाहता स्नान केलं तेव्हा कुठं झोप लागली. 

आज सकाळी वर्तमानपत्र उघडताच अनेक खळबळजनक बातम्या वाचायला मिळाल्या. त्यात लंडनच्या वाहतूककोंडीत अडकल्यानं इंग्लिश खेळाडूंनी लाईम बाईक्स ह्या भाड्यानं सायकली देणाऱ्या यंत्रणेच्या सायकली वापरून ओव्हल मैदान गाठल्याची मनोरंजक बातमी होती. वेस्ट इंडिजचा संघ मात्र बसमध्येच बसून राहिला. त्यामुळं त्यांना मैदानावर पोहोचण्यास उशीर होऊन नाणेफेक सुद्धा उशिरानं झाली. ह्या निमित्तानं माझ्या मनात आलेले काही विचार !

१.  आधुनिक क्रिकेट खेळाडूंना रस्त्यावर आत्मविश्वासानं सायकल चालवता यायला हवी. ह्यात केवळ आपल्याच देशात नव्हे तर जगातील कोणत्याही देशात स्थानिक वाहतुकीचे नियम पाळून सायकल चालवता यायला हवी. 

२. लाईम बाईक्स ह्या कंपनीत ज्यावेळी इंग्लिश कर्णधार हॅरी ब्रुक ह्यानं "मला जरा चांगल्या पंधरा सायकली भाड्यानं हव्या आहेत" असा भ्रमणध्वनीवरून फोन केला असेल त्यावेळी तो फोन घेणाऱ्या स्वागतकक्षातील मनात कोणकोणते विचार आले असतील ह्यावर एक मोठा लेख लिहून होईल. हॅरीने तासाभरासाठी ह्या पंधरा सायकली नोंदविताना दरांमध्ये घासाघीस केली असेल का हा बाळबोध भारतीय विचार माझ्या मनात आला. तरी सध्या बेन स्ट्रोक संघात नसल्यानं अधिक दणकट सायकल द्या असं सांगण्याची वेळ हॅरीवर आली नसावी. 

३. वेस्ट इंडीज संघ मात्र बिचारा बसमध्येच बसून राहिला. सर्वप्रथम माझ्या मनात विचार आला तो म्हणजे अमेरिकेच्या सानिध्यात असल्यानं ते रस्त्याच्या उजव्या बाजूनं वाहनं चालवीत असतील. त्यामुळं रस्त्याच्या डाव्या बाजूनं सायकली चालविण्यासाठी योग्य तयारी नसल्यानं त्यांनी बसमध्ये बसून राहणं पसंत केलं असावं असं मला वाटलं. पण ते ही इंग्लिश वसाहतीचा भाग असल्यानं ते ही रस्त्याच्या डाव्या बाजूनं वाहनं चालवितात असं माहिती मायाजालाने सांगितल्याने हा सिद्धांत मागे पडला. जेव्हा केव्हा शाई होप भेटेल तेव्हा त्याला नक्कीच हा प्रश्न मी विचारेन. 

४. आता लेखातील मुख्य कल्पनाविलास! ह्या कल्पनेवर मी भविष्यात चित्रपट बनविणार. तोवर कोणी चौर्यकर्म करून असा चित्रपट बनवू नये ही आशा. भारतीय संघ वानखेडेवरील क्रिकेट सामन्यासाठी ताज हॉटेलमध्ये राहत असतो. दुपारी अडीच वाजता सुरु होणाऱ्या सामन्यासाठी साडेअकरा वाजता बसमधून निघालेल्या भारतीय संघाची बस अशीच वाहतूककोंडीत सापडते. तात्काळ लिंबूपाणी ह्या ताशी शंभर रुपये भाड्यानं सायकली देणाऱ्या कंपनीला गौतम गंभीर फोन करतो. त्यांच्याशी घासाघीस करून ताशी नव्वद रुपयांपर्यंत तो दर खाली आणतो.  पहिल्या दोन सायकली बसजवळ पोहोचताच रोहित आणि विराट, गिल आणि राहुलवर दादागिरी करून त्या सायकलीवर बसतात. विराटने आपण सायकलवरुन वानखेडेवर जात आहे हे कळविल्यानं तो सायकल व्यवस्थित चालवेल की नाही हे पाहायला अनुष्का आपली सायकल घेऊन तात्काळ तिथं पोहोचते. ते तिघे जरी हेल्मेट घालून रस्त्यावरून मार्ग काढत पुढे पुढे जात असले तरी रस्त्यावरील नागरिक त्यांना लगेचच ओळखतात. लगेचच डझनभर न्युज चॅनेलला ही बातमी कळल्याने त्यांचे प्रतिनिधीसुद्धा लिंबूपाणी कंपनीतर्फे सायकली घेऊन तिथं पोहोचण्याचा प्रयत्न करीत असतात. एव्हाना भाडं ताशी दहा हजार रुपयांपर्यंत गेलं असतं. पुन्हा एकदा वाहतूककोंडीत सापडल्यानं रोहित, विराट, अनुष्का हताश झालेले असतात. इतक्यात एक उमदा तरुण विनू त्यांच्या मदतीला धावून येतो आणि गल्लीबोळातील रस्त्यातून वानखेडेला पोहोचविण्याची ऑफर देतो. अनुष्का लगेचच हो म्हणते. ह्या गल्लीबोळातील रस्त्यावरून जाताना एका गल्लीत स्थानिक दोन संघात टेनिस बॉलने सामना चाललेला असतो. तेथील फलंदाजी करणाऱ्या संघाला जिकंण्यासाठी एक षटकात पंचवीस धावांची आवश्यकता असते. त्यांचा कर्णधार स्थानिक दादा असतो. रोहित आणि विराट ह्यांनी एक षटक फलंदाजी करून आपल्या संघाला जिंकून दिलं तरच पुढे जाऊ देण्यात येईल अशी तो अट घालतो. एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेत अनुष्का त्या दोघांना हो म्हणण्यास भाग पाडते. आता ते दोघे फलंदाजीला जाण्यासाठी निघतात. परंतु रस्त्याच्या मध्यभागी असणाऱ्या पिचवर पोहोचताच त्या दोघांमध्ये बाचाबाची सुरु होते.  सर्वजण धावत धावत त्यांच्याजवळ पोहोचतात. महत्प्रयासाने त्यांना बाचाबाचीचे कारण कळतं. पहिला स्ट्राईक कोणी घ्यायचा ह्यावर त्या दोघांमध्ये एकमत होत नसतं. पुढं काय होतं ते जाणून घेण्यासाठी तुम्हांला माझा आगामी चित्रपट प्रसिद्ध होईपर्यंत थांबावं लागेल!   

गुरुवार, १५ मे, २०२५

आठवणीतील कविता - मुलांस बोध

 


 

आठवणीतील कविता ह्या शृंखलेतील भाग एक आणि दोन ह्या पुस्तकांचं वाचन करत असताना मुलांना बोधपर अशा तीन कविता वाचनात आल्या. ह्या भागात आणि उर्वरित दोन भागात अजूनही ह्याच आशयावरील काही कविता असू शकतात. 

तत्कालीन समाजात लिखित वाङमयानं समाजाला बोध देण्यात नक्कीच महत्वाची भूमिका बजावली असणार. त्यावेळची बुद्धिमान माणसं चांगलं काही वाचण्यासाठी भुकेली असावीत. अशा ज्ञानी माणसांना लिखित स्वरूपात मिळालेलं ज्ञान त्यांनी समाजातील इतर घटकांपर्यंत विविध माध्यमाद्वारे पोहचविण्याचा प्रयत्न केला. कविता ह्या माध्यमातून ज्ञान, संदेश प्रसार सहजरित्या होत असणार कारण एकदा का कवितेला चाल देऊन तिचा सर्व घरात प्रसार झाला की घरातील जुनीजाणती मंडळी, आजी पुढील पिढीपर्यंत ह्या अमूल्य ठेव्याचं हस्तांतरण अगदी अलगदपणे करण्याचं काम नीटनेटकेपणानं बजावत असत. 

ही पोस्ट लिहितांना मनात आलेले काही विचार 

१. व्हॉइस टायपिंग 
प्रारंभीस मी पुस्तकातील कविता व्हॉइस टायपिंगचा वापर करून लिखित स्वरूपात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु जुनी मराठी भाषा आणि माझ्या उच्चारातील त्रुटी ह्यामुळं व्हॉइस टायपिंगनं दिलेलं मूळ रूप दुरुस्त करता करता इतका वेळ लागला की स्वतःच लिहिलं असतं तर नक्कीच लवकर तडीस नेता आलं असतं. तंत्रज्ञान उपलब्ध असलं तरी नक्की कुठं वापरावं ह्याचं भान असणं आवश्यक ! नाहीतर 'माकडाच्या हाती कोलीत' असला प्रकार व्हायचा. 

तरी देखील व्हाट्सअँपला पुढील सूचना करण्याचा माझा मानस आहे. ज्यावेळी एखादा इसम तुमची मराठी व्हॉइस टायपिंग सुविधा वापरू इच्छितो त्यावेळी त्याला / तिला कोणत्या कालावधीतील मराठी लिखित स्वरूपात आणायची आहे असा प्रश्न विचारून त्या कालावधीतील मराठी उपलब्ध करून द्यावी.  

२. अनुस्वार 
त्या काळातील बहुतेक शब्दांतील अंतिम अक्षरावर अनुस्वार आढळून येतात. त्याकाळातील बोलण्यात देखील ह्या अनुनासिक स्वरांचा वापर आपल्याला जुन्या मराठी चित्रपटात / नाटकात आढळून येतो. परंतु आता बहुदा जुन्या पिढीसोबत हीं अनुनासिकें काळाच्या पडद्याआड गेलीं असावीत असें मानण्यास वाव आहे. 

३. र्हस्व दीर्घ संकल्पना 
दहावीत सुद्धा माझा र्हस्व दीर्घ संकल्पनेबाबत गोंधळ उडायचा. आता तर प्रचंड गोंधळाची परिस्थती आहे. मराठी र्हस्व दीर्घ लिखाणाबाबतीचे सर्व नियम संकलित करून एका जागी प्रसिद्ध करावेत अशी मागणी ह्या पोस्टद्वारे मी करत आहे. 

४. भुजंगप्रयात / आर्या 
ह्या कवितेत काही ठिकाणी भुजंगप्रयात / आर्या वगैरे उल्लेख करण्यात आला आहे. भुजंगप्रयास हा छंद असे ऐकून माहिती आहे. ह्याविषयी तज्ञ मंडळींनी खुलासा करावा अशी मागणी मी करत आहेत. 

५. जामीन
ह्या पुस्तकात दोन तीन वेळा जामीन राहू नये असा सल्ला देण्यात आला आहे. जामीन राहून जबरदस्त फटका खाल्ल्याची उदाहरणे त्याकाळी प्रचलित असावीत. 
 
६. रामदास 
रामदासांच्या कवितेतील एक एक ओळी सुवचन म्हणून प्रसिद्ध आहेत. जसे की

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
मरावें परी कीर्तिरूपे उरावे 

ह्या सुवचनांचं स्रोत असलेल्या मूळ कविता वाचनात आल्या ह्याचा मला आनंद झाला. 

७. उपदेश 
ह्या कवितेतील उपदेश मोठ्या माणसांना देखील लागू होतो, अगदी हल्लीच्या काळात सुद्धा ! पुढील काही दिवसात चॅट जीपीटीला ह्या कविता वाचायला देऊन त्यांजकडून ह्या कवितांची सद्यकालीन आवृत्ती लिहून घेण्याचा मानस आहे. 

उदाहरणार्थ 
मूळ पंक्ती  

कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


आधुनिक काळातील उपदेश 

कसा तुला छंदच भ्रमणध्वनीचा 
तासंतास व्हाट्सअँपवर रेंगाळण्याचा 

कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।



आता तीन कविता ह्या दोन पुस्तकांतून घेतलेल्या मूळ रूपात! शुद्धलेखनाच्या चुका टाळण्याचा प्रयत्न केला असला तरी काही चुका राहिल्या असल्यास क्षमस्व! 


मुलांस बोध - रामदास 

भुजंगप्रयात

बरे सत्य बोला यथातथ्य चाला,
बहु मानिती लोक येणें तुम्हांला, 
धरा बुद्धि पोटीं विवेकें तुम्ही हो,
बरा गूण तो अंतरामाजिं राहो ।।१।।

सदा दांत घांसोनि तोंडा धुवावें, 
कळाहीन घाणेरडें, बा, नसावें, 
सदा सर्वदा यत्न सोडूं नये रे, 
बहू काळ हा खेळ कामा नये रे.  ।।२ ।।

दिसामाजि कांहीतरी ते लिहावें, 
प्रसंगी अखंडीत वाचीत जावें.  
गुणश्रेष्ठ ऊपास्य त्यांना करा
वें, 
बरें बोलणें नित्य जीवीं धरा
वें.  ।। ३ ।।

बहु खेळ खोटाची आलस्य खोटा,
समस्तांशि भांडेल तोची करंटा. 
बहुतां जनांलागिं जीवें भजावे,
भल्या संगतीं न्याय तेथे वसावें. ।। ४ ।।

विवेकेंविणें सर्वही दंभ झाला, 
बहु नेटका सज्जला साज केला. 
प्रतीतीवि
णें बोलणें व्यर्थ होतें 
विचारेवि
णें सर्वही व्यर्थ हो तें . ।। ५ ।।

'भला रे भला!' बोलती 
तें करावें, 
बहुता जनांचे मुखें येश घ्यावें. 
परी शेवटी सर्व सोडून द्यावें, 
मरावें परी कीर्तिरूपे उरावे. ।। ६ ।।


 मुलांस उपदेश 

शिवी कोणा देऊं नये ।।
कोणासंगे भांडूं नये ।।१।।

अनवाणी चालूं नये ।।
चालताना धांवूं नये ।।२।।

खोटी साक्ष देऊं नये ।।
जामिन कोणा होऊं नये ।।३।।

दुसऱ्याचें चोरुं नये ।।
खोटें कधीं बोलूं नये ।।४।।

गोड फार खाऊं नये ।।
पाहिलें तें मागूं नये ।। ५ ।।

चित्तीं धरी जो हे बोल ।।
त्याचें कल्याण होईल ।। ६ ।।

अभंग 
सकाळी उठोनी, देवासी भजावें ।।
गुरुसी वंदावे, जीवें भावें ।। १ ।।

वडिलांची आज्ञा, घेतल्यावांचून  ।।
कोठें घरांतून, जाऊं नये ।। २ ।।

शाळेसी जातांना, मुलांनीं वाटेंत ।।
तमाशा पाहात, राहूं नये ।। ३ ।।


नेमियल्या वेळीं, शाळेमध्यें जावें ।।
चित्त तें ठेवावें, विद्येवरी ।। ४ ।।

बालपणीं विद्या, वृक्षासी लावावें ।।
तरुणपणी घ्यावें, फळ त्याचें  ।। ५ ।।

अभंग तुकाराम 

आता तरी पुढें, हाची उपदेश ।।
नका करूं  नाश, आयुष्याचा ।। १ ।।

सकळांच्या पायां, माझे दंडवत ।।
आपुलालें चित्त, शुद्ध करा ।। २ ।।

हित तें करावें, देवाचें चिंतन ।।
करूनियां मन, शुद्ध भावे ।। ३ ।।

तुका म्हणे हित, होय तो व्यापार ।।
करा, काय फार शिकवा
वें ।। ४ ।।


मुलांस उपदेश

श्लोक - उपेंद्रवज्रा  


कसा तुला छंदच खेळण्याचा
मऊ बिछान्यावर लोळण्याचा
कशी तुला वाटत लाज नाहीं 
सदा हंसावें तुजला जनांहीं  ।।१।।


भुजंगप्रयात 

मुलांनों तुम्हीं सर्व हा खेळ सोडा
मनीं काळजी बाळगा ज्ञान जोडा
असा काळ कैसा तुम्हांला मिळेल
पुढे दुःख होतां तुम्हांला कळेल ।। २ ।।

आर्या 

तुमचें वय हें आहे, केवळ विद्या शिकून असण्याचें 
चित्तीं धरूनि ऐसें, टाकुनि द्यावें उगीच फिरण्याचें ।। ३।।

श्लोक - कामदा 

चांगल्यासवें  संगती घरी
त्यामुळे जगीं मान्यता खरी
अन्यथा तुम्हां कोण मानिल
योग्यता जगीं कैशि होईल ।। ४ ।।

शुद्धकामदा


धरुं नका तुम्ही दुष्ट वाट ती
जरी तुम्हांस ती गोड वाटती
करिल नाश ती हे धरा मनीं 
करूं नका हसूं आपलें जनीं ।। ५ ।।

भुजंगप्रयात 

स्मरा नित्य देवा करा मातृसेवा
धरा सुस्वभावा त्यजा वैरभावा
असे केलिया सौख्य तुम्हांस आहे
म्हणूनीच मी नित्य बोधीत आहें ।। ६ ।।

आर्या 
उपदेश हा ठसूं द्या, तुमच्या चित्तावरीच बळकटसा
नाहींपक्षीं तुमचा, होय श्रम आमचाहि फुकट तसा ।। ७।।



कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...