मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, ४ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग ३

सकाळी बऱ्यापैकी आराम केल्यानंतर आम्ही दुपारी तीन वाजताच्या सुमारास बाहेर पडलो. आजचा कार्यक्रम होता कनकादित्य आणि महाकाली मंदिराचे दर्शन. कनकादित्य मंदिर गणेशगुळेपासून साधारण २० किमी अंतरावर आहे. दुपारी तीन वाजता भर उन्हात बाहेर पडणे हे काहीसं कठीण काम होतं. 

एकंदरीत प्रवास हा अत्यंत नैसर्गिक भागातून होत होता. पुर्णपणे निर्मनुष्य असा रस्ता होता. अशा भागामध्ये एखादं वाहन बंद पडलं तर कसला दुर्धर प्रसंग उद्भवत असेल याची कल्पना सुद्धा करवत नाही. आमचा ड्रायव्हर आज चांगल्या मुडमध्ये होता. त्यानं बरीच माहिती आम्हांला दिली. पावसाळ्यामध्ये इथं तीन चार दिवस संततधार लागू शकते आणि लोकांना घराबाहेर पडणार देखील अशक्य होतं. त्याचप्रमाणे अशा दुर्गम भागापर्यंत बाहेरील लोकांना सहजासहजी पोहोचणे पावसाळ्यात शक्य होत नसल्यामुळे समजा जर विद्युत पुरवठा खंडित झाला तर इथल्या नागरिकांवर  बरेच दिवस विद्युत पुरवठ्याशिवाय रहाण्याची वेळ येते. एखाद्या नैसर्गिक समृद्धीने नटलेल्या भागात चार-पाच दिवस पर्यटक म्हणून जाणे आणि त्याच भागात कायमचं वास्तव्य करून राहणे  यात जमीन-अस्मानाचा फरक असतो याची जाणीव या प्रवासात बऱ्याच वेळा होत होती. तुमचं मन दिलेल्या परिस्थितीत कशाप्रकारे समाधानाने राहू शकते ह्याबाबत तुमची जी क्षमता आहे ती फार महत्त्वाची आहे.  जर अशी क्षमता तुमच्याकडे असेल तर तुम्ही अशा भागात किंवा कोणत्याही कठीण परिस्थितीत शांतपणे राहू शकता.  उगाच भोवतालच्या परिस्थितीचा दोष देण्यात काही अर्थ नसतो. 

साधारणतः तीस-चाळीस मिनिटांच्या प्रवासानंतर आम्ही कनकादित्य मंदीरापाशी येऊन पोहोचलो. संपूर्ण भारतात सूर्याची फार थोडी मंदिरे आहेत त्यापैकी हे एक अत्यंत प्राचीन असे मंदिर आहे. साधारणतः हजार वर्षापूर्वी या मंदिराची स्थापना झाली असावी अशी दंतकथा आहे.


या मंदिराच्या स्थापनेविषयी एक आख्यायिका इथं  मंदिराच्या आवारात लिखित स्वरुपात उपलब्ध होती. एक नावाडी ही मूर्ती घेऊन समुद्रमार्गे  दुस-या ठिकाणी जात होता. परंतु या ठिकाणावर आल्यावर त्याची नौका ना पुढे जाईना, ना  मागे!! त्यामुळे या देवतेला तिथेच कायमस्वरूपी वास्तव्य करायचं आहे हे त्या नावाड्याने ओळखलं आणि मग भक्तिभावाने या मंदिराची स्थापना करण्यात आली. 



या मंदिराच्या आवाराचे सुशोभिकरण करण्यात येत होते. मंदिरात  भाविकांनी प्रवेश करण्याआधी आपले हात पाय धुवावेत यासाठी विहिरीतून पाणी काढण्यासाठी एका विशिष्ट प्रकारची शास्त्रीय संरचना करण्यात आली होती. 

कनकादित्य मंदिराच्या दर्शनानंतर आम्ही महाकाली देवीच्या दर्शनासाठी निघालो. या मंदिराला आम्ही आमच्या मागच्या कोकणभेटीत सुद्धा भेट दिली होती. या मंदिराच्या परिसरात एकंदरीत ५ देवतांची मंदिरे आहेत आणि कोणत्या क्रमाने त्यांचं दर्शन घेत घ्यावं याची सूचनादेखील मंदिराच्या आवारात देण्यात आली आहे. सर्व देवतांची दर्शन घेऊन झाल्यानंतर मंदिराचा कळस पहावा अशी जी समजूत आहे त्याचं स्मरण मला करून देण्यात आलं. 

महाकाली देवीचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही चहापान केलं. याच हॉटेलमध्ये दोन वर्षांपूर्वी आम्ही आमचं दुपारचं भोजन केलं होतं. चहापानानंतर आम्ही निरूळ या गावाकडे प्रस्थान प्रस्थान केले. हे गावसुद्धा अत्यंत दुर्गम भागात आहे. एकंदरीत तीस-चाळीस मिनिटांचा प्रवास करून आम्ही तिथं पोहोचलो. इथं शंकराचं एक सुंदर मंदिर आहे.  त्याला सांब मंदिर असे म्हणतात असं पुसटसं आठवतं.  या मंदिराकडे पोचण्यासाठी एक काहीसा कमजोर असा लोखंडी पूल आहे. या पुलावरून चालताना आवाज होतो आणि मध्यावर तर अधिकच होतो. परंतु त्याला न घाबरता आपल्याला पुढे जायचं असतं.  मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर पुढं नैसर्गिक पाण्याचा प्रभाव आहे तिथं आपण पाय सोडवून बसायचं असतं आपण तिथे बसलो आणि  स्थिर झालो की पाण्यातील मासे आपल्या पायाभोवती गर्दी करतात आणि आपल्या पायावरील मृत पेशी खातात. अशाप्रकारे एक नैसर्गिक पॅडीक्यूअर आपोआप होतं. मला तर एक दोन माशांनी चावल्याची भावना निर्माण झाल्यानं मी त्यांच्याकडं संशयानं पाहत होतो. 





हा परिसर अत्यंत नैसर्गिक उपाय रुपामध्ये जतन करून ठेवण्यात आला आहे.  मंदिराच्या परिसरात काही अधिक उंचीवर तीन-चार घरे आहेत.  तिथे पुजारी राहात असतात.  पुजाऱ्याच्या घरातील एक मुलगा आम्हाला भेटला. पावसाळ्यात सुद्धा ही मुले इतक्या दुर्गम भागात कशी काय ये जा करत असतील हा विचार आमच्या मनाला शिवुन गेला.  मी पाण्यात पाय सोडुन बसलो असता काढलेला एक फोटो. 
हा  फोटो फेसबुकवर टाकला असता वसईतील नामवंत कवी मार्टिन यांनी एकदम मला संत पुरुषांच्या पंक्तीत बसवून सोडलो! 

Martin Gabriel Sequeira झांकळुनी जल गोड काळिमा पसरी लाटांवर
पाय टाकुनी जळात बसला असला "औदुंबर "......

त्यामुळे मी धन्य झालो! धन्यवाद मार्टिन!!

सायंकाळी हॉटेलात परतल्यावर पुन्हा आम्ही शेजारच्या शेतात गेलो आणि ताजी भेंडी घेऊन आलो.  रिसॉर्टचा खानसामा अत्यंत अचंबित झाला होता. त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत त्याला ताजी भाजी आणून देऊन त्याचा स्वयंपाक करुन देण्याची विनंती करणारे पाहुणे त्याला प्रथमच भेटले होते हे त्याच्या मुद्रेवरुन स्पष्ट होत होते. 

दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा गणेशगुळे येथील एका रम्य सकाळचा अनुभव घेऊन आणि त्याच्या स्मृती मनात साठवून आम्ही या ठिकाणाचा निरोप घेतला. हे ठिकाण मला अजून एका कारणामुळे आवडलं. इथं  मोबाईलची रेंज येत नव्हती त्यामुळे बाह्यजगताशी संपर्क फुटला होता तुटला होता.  परंतु हॉटेलवाल्यांनी मोफत वायफायची सुविधा उपलब्ध केल्यामुळे आम्ही विचलित होत होतो.  गणेशगुळेपासून  निघाल्यानंतर थोड्यावेळातच मोबाईलची रेंज उपलब्ध झाली आणि त्यामुळं घरी फोन लावणं  शक्य झालं.  

यापुढील आमचं ठिकाण ते म्हणजे रत्नागिरी येथील भगवती देवीचं मंदिर.  या मंदिरात प्रवेश केल्यानंतर मनात खास  समाधानाची भावना निर्माण झाली. मंदिरातील मूर्ती आणि मंदिरातील शिल्पकला अतिशय सुंदर आहे. 
कोकण दौर्‍यात विविध मंदिरातील सुंदर मूर्ती पाहून त्यांचा फोटो काढण्याचा मोह अनावर होता. परंतु एकंदरीत या मंदिरांचे आणि तेथील देवतांचे पावित्र्य कायम राखण्यासाठी त्यांचे फोटो न घेऊन देण्याचा निर्णय योग्यच म्हणावा लागेल. तरीही काही बाह्य परिसराचे फोटो मी घेतले. 




रत्नागिरीला माझा शालेय मित्र प्रसाद मांजरेकर राहतो.  त्याने वसईहून रत्नागिरीला काही वर्षांपूर्वी स्थलांतर केलं होते. मला भेटण्यासाठी तो भगवती मंदिरात आला. या मंदिराच्या नूतनीकरणासाठी त्याच्या आजोबांनी मोठाच हातभार लावला होता. प्रसादसह आम्ही सर्वांनी मंदिराच्या भोवतालच्या परिसराचा फेरफटका मारला. या परिसरातून रत्नागिरी बंदराचे अत्यंत नयनरम्य असे दृश्य दिसते. ह्या बंदरात एक ब्रेकवॉटर जेटीसुद्धा आहे. समुद्राच्या लाटा वेगानं समुद्रकिनाऱ्याला आदळून समुद्र किनाऱ्याची झीज होऊ नये यासाठी अशा जेटी उभारल्या जातात. प्रसाद आणि त्याचा मुलगा या समुद्रात नित्यनेमाने पोहण्याचा सराव करतात अशी माहिती त्यांनी दिली.  









त्यानंतर प्रसादचा निरोप घेऊन आम्ही लोकमान्य टिळक यांनी आपल्या आयुष्याची सुरुवातीची 10 वर्षे ज्या वाड्यामध्ये घालवलीत त्या वाड्याला
आम्ही भेट दिली.  इतक्या आदरणीय युगपुरुषाने ज्या वास्तूत वास्तव्य केलं तिथे आपण सुद्धा आलो आहोत या भावनेनं अभिमानानं ऊर भरून आला.  या वाड्यामध्ये लोकमान्य टिळकांची वंशावळ ठळक स्वरूपात नमूद करण्यात आली आहे आणि त्यांच्या जन्म वेळी असणारे ग्रहांची स्थिती देखील मांडण्यात आली आहे. लोकमान्य टिळक अत्यंत विद्वान होते आणि त्यांच्या विद्वत्तेचे दाखले देणारे काही संदर्भ सुद्धा नजरेस पडले. नक्कीच कोकण भेटीतील हा एक अविस्मरणीय क्षण म्हणता येईल !

त्यानंतर आम्ही जवळच असलेल्या रत्नागिरी मत्सालयाकडे गेलो. इथं कॉलेजच्या मुलामुलींची खूप गर्दी पाहून हे सर्व मत्सालय पाण्यासाठी आले असावेत असा आमचा ग्रह झाला. परंतु थोड्याच वेळात फोटो काढण्यासाठी त्यांनी ही गर्दी केली होती हे लक्षात आले.  आपली ही नवीन पिढी कुठे चालली आहे हे देवच जाणे !

बाकी मत्सालय खूप सुंदर होते. यात विविध प्रकारचे मासे होते. या माशांची  ही सुंदर छायाचित्रे!!




















माशांच्या बाबतीत म्हणजे त्यांच्या अभ्यासाच्या बाबतीत तज्ञ नसल्याने मी आवड यावर फारसे भाष्य करत नाही तसं खाण्याच्या बाबतीत म्हणायचं झालं तरीसुद्धा केवळ मोजक्या जातीच मला माहित आहेत. मत्‍स्यालयानंतर त्यांचं माशांचं म्युझियम सुद्धा होतं त्याला आम्ही भेट दिली. तिथं मृतावस्थेतील मासे अथवा त्यांची सांगाडे  जतन करून ठेवण्यातआले आहेत. 


(क्रमशः) 

रविवार, १ एप्रिल, २०१८

कोकण २०१८ - भाग २


The Blue View हॉटेल एकंदरीत चांगलं असलं तरी रात्रभर तिथं थांबलेल्या पाहुण्यांनी बराच आवाज केला आणि आमच्या झोपेचं खोबरं केलं. सकाळी हॉटेलच्या खानसाम्याने बनवलेला उपम्याचा नाष्टा आणि चहा पिऊन आम्ही या हॉटेलचा निरोप घेतला. या हॉटेलच्या व्यवस्थापकाकडे रात्रीच्या गोंधळाविषयी तक्रार नोंदवली असता त्याची प्रतिक्रिया फारशी सकारात्मक नव्हती. 

आता आमची खरी कोकण सहल सुरू होणार होती. आज प्रथम आमचं आगमन पावस येथील स्वरूपानंद महाराजांच्या आश्रमाच्या ठिकाणी झालं. पावस एक मनोरंजक अशी घटना घडली. तिथं एक एसटी बस , ट्रॅक्‍टर आणि आमच्या पुढे असलेली एक मोटार गाडी यांच्यामध्ये ट्रॅफिक जॅम झाला. एसटीचा ड्रायव्हर आणि मोटार गाडीचा ड्रायव्हर हे दोघेही नमतं घेण्यासाठी तयार नव्हते आणि त्यामुळं आश्रमाकडे जाणारा रस्ता पूर्णपणे अडला गेला होता. त्यामुळे आम्हाला तो रस्ता सोडून दुसऱ्या मार्गाने जावं लागलं. त्या पर्यायी रस्त्याने गेल्यावर आम्ही थेट आश्रमापर्यंत पोहोचू शकलो नाही. 

तिथून थोडी वाटचाल करीत आम्ही एकदाचे आश्रमात पोचलो. या आश्रमाचे वातावरण अत्यंत पवित्र आहे.  माझे काका नरेंद्र पाटील स्वरूपानंदांचे परमभक्त आहेत. 

आम्ही प्रथम स्वरूपानंदांच्या मूर्तीचे दर्शन घेतले. तेथील तीर्थप्रसाद घेतला. इथलं तीर्थ हे आमरसाच्या स्वादाच्या रूपात होते. दर्शन घेतल्यानंतर तिथं असलेल्या ज्ञानेश्वरीमधील कोणताही एक पान उघडून आपण वाचू शकतो. त्या पानात आपल्याला बोध घेण्यासाठी खास असा संदेश असतो अशी समजूत आहे. त्याच प्रमाणात माझ्या काकांनी सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये ध्यान करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. आम्ही तेथील सिक्युरिटी गार्ड आणि पुजारी ह्यांची परवानगी घेऊन मंदिराच्या आतल्या भागात ध्यानासाठी गेलो.  तेथील वातावरण अत्यंत शांत आणि मनाला विचार करणारे आहे. मला खरंतर ध्यान करण्याची सवय नाही. पण मागच्या कोकण दौर्‍यात मी इथं 
ध्यान केलं होतं. त्या अनुभवाच्या जोरावर यावेळी सुद्धा मी ध्यान करण्याचा प्रयत्न केला. पण ध्यान करणे ही काही सोपी गोष्ट नव्हे याची प्रचिती यावेळी मला आली. आपल्या मनांत कोणतेही विचार येऊ न देता शांत बसुन राहणं म्हणजेच खरं ध्यान असं म्हटलं जातं किंवा माझी समजूत आहे परंतु तिथं बराच काळ माझ्या मनातील विचारांना मी थोपवू शकत नव्हतो. पण त्यानंतर मात्र थोडसं नियंत्रण मिळवता आलं. जे कोणी खरोखर ध्यान असतात त्यांच्याशी चर्चा करून हे तंत्र अवगत करता यायला हवा असं मला मनोमन वाटून गेलं. आपला जो श्वास आहे त्यावर लक्ष केंद्रित करावं असं असा सल्ला मला एका तज्ज्ञ व्यक्तीनं दिला. अर्धा तास संपला आणि आम्ही वर आलो. काही धार्मिक पुस्तकांची खरेदी करून आम्ही आश्रमाच्या बाहेर पडलो. आश्रमाबाहेर भक्तांसाठी उत्तम सोयीसुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. कोकम सरबत, आंबा पन्हे यांची सोय ही त्यातलीच एक सुविधा. आंबा पन्ह्याचा आस्वाद घेऊन आम्ही मंदिराबाहेर बाहेर पडलो. आश्रमाबाहेरच देसाई यांचं कोकणातील विविध वस्तुंची विक्री करण्याचे  दुकान आहे.  तिथं आंबापोळी, फणसपोळी आणि इतर स्थानिक वस्तूंची खरेदी करून आम्ही या आश्रमाच्या पवित्र परिसरातून निघालो. 

इथं एक आंबा विक्रेत्याशीसुद्धा आमची भेट झाली. सहजच म्हणून त्याला आंब्याचा भाव विचारला असता त्यानं बाराशे रुपये डझन असा भाव सांगुन आमच्या उत्साहावर पाणी फेरलं. यंदाच्या वर्षी कोकणात आंब्याच्या काही खरं नाही हेच खरं, पहिला बहर डिसेंबरातील पावसानं म्हणावा तसा हाती आला नाही आणि दुसर्‍याची अजूनही काही खात्री नाही असं जाणवलं. 

यापुढील थांबा होता तो गणेशगुळे येथीलगणपतीचं एक साधासुधा परंतु अत्यंत मनोहारी असे हे मंदिर. हे मंदिर डोंगराच्या एका बाजूला उभारण्यात आलं आहे. 

गणपतीपुळे येथील गणपती गणेशगुळे इथूनच नेण्यात आला अशी आख्यायिका आहे. गणेशाचे दर्शन घेऊन डोंगराच्या उतारावर वसलेल्या आंब्याच्या आणि पोफळीच्या बागांच्या मनोहारी दृश्य पाहुन आमच्या डोळ्याचे पारणे मिटलं . 




गणेशगुळे ह्या मंदिराचा भोवतालचा प्रदेश अत्यंत रखरखीत आहे. अशा या रखरखीत भागात मार्च महिन्यात सुद्धा आमची गाडी अतिशय तापत होती. आणि या गाडीमध्ये उन्हाळा त्रासदायक होत होतं तरीदेखील त्याचा मुकाबला करीत आम्ही आमच्या दुसऱ्या हॉटेलच्या दिशेने म्हणजेच Oceano Pearl च्या दिशेने निघालो. प्रथमदर्शनीच ह्या गावाच्या प्रेमात मी पडलो आधुनिकतेचा अजिबात स्पर्श न झालेलं हे गाव आहे. 
ह्या गावात प्रवेश केल्यावर इथं काळ साधारणतः एकोणिसाव्या शतकातच थांबून राहिला का काय अशी भावना निर्माण होते. अत्यंत साधी घरं, घराच्या आजूबाजूला असणारे गाई गुरांचे गोठे आणि त्याच्या पलीकडे असणारे छोटी छोटी शेती असा हा गाव पाहून कोणीही त्याच्या प्रेमातच पडेल. आमचं रिसॉर्ट अशाच या रम्य निसर्गरम्य परिसरात वसलं होतं रिसॉर्टच्या समोर गावातून जाणारा रस्ता आणि मागच्या बाजूला नारळाची मोठी बाग आणि त्याच्या पलीकडे समुद्रराया असा हा सुंदर परिसर होता. 


हॉटेलच्या रूमवर स्थिरस्थावर झाल्यावर आम्ही जेवणासाठी हॉटेलच्या रेस्टॉरंटमध्ये किंवा डायनिंग एरिया मध्ये गेलो. 

आता इथे एक गोष्ट नमूद करावीशी वाटते आपण ज्यावेळी मोठाल्या हॉटेल्समध्ये बुकिंग करतो आणि त्यामध्ये ज्यावेळी जेवण समाविष्ट असतं त्यावेळी आपणास खाद्यपदार्थांचे भरपूर पर्याय उपलब्ध होत असतात परंतु ज्यावेळी आपण लंचचा खर्च वेगळा ठेवतो त्यावेळी मात्र आपल्याला मोजक्या स्वरूपात थोडेच पर्याय उपलब्ध होतात, सर्व काही मोजुन मापून दिलं जातं.  

मत्स्याहाराच्या बाबतीत आमच्या समजुतीच्या पूर्णपणे उलट असा अनुभव यावेळच्या कोकण दौऱ्यात आम्हांला आला. माशांचे भाव अव्वाच्या सव्वा होते. उदाहरण द्यायचं झालं तर एक सरंगा पाच जणांत वाटुन बनल्या जाणाऱ्या नॉन व्हेज प्लेटचा दर साधारणतः तीनशे - साडेतीनशे रुपयाच्या घरात जात होता. 

बाकी भाज्या आणि वरणभात ह्यांची प्रत खानसाम्यानं चांगल्याप्रकारे टिकवली होती. भोजन आटपून आम्ही आजूबाजूच्या मोकळ्या भागात फेरफटका मारला. नारळाच्या झाडांना बांधलेले झुले अर्थात hammock हे सुद्धा होते. सुरुवात तरी त्यावर केवळ बसून केली.  दुपारी एक चांगली डुलकी घेऊन, चहाचा आस्वाद घेऊन आम्ही समुद्रकिनाऱ्याच्या  दिशेने निघालो. या समुद्रकिनाऱ्यावर केवळ पाच-सहा लोक होते आणि हा अत्यंत सुंदर शुभ्र वाळूने आच्छादलेला असा हा समुद्रकिनारा होता. ही वाळू अत्यंत मऊ असल्याने त्यावर चेंडू उडत नव्हता आणि क्रिकेट खेळण्याची आमची मनिषा  पूर्ण होऊ शकली नाही.  तरीदेखील निराश न होता आम्ही समुद्राच्या लाटांबरोबर मनसोक्त विहार केला आणि समुद्रकिनाऱ्याचे भरपूर फोटो काढले. 


 





त्यानंतर आम्ही रात्रीच्या जेवणासाठी परतलो इथे आजूबाजूला शेतांमध्ये हव्या तितक्या हिरव्या भाज्या असूनदेखील स्वयंपाकी लोक त्यांचा स्वयंपाकात वापर करत नव्हते. ही गोष्ट आम्हाला फारशी रुचली नाही प्राजक्ताने त्यांच्याशी काही चर्चा केली आणि मनात काही बेत आखूनच ती झोपी गेली. 

एका अत्यंत विरळ लोकवस्तीच्या भागातील सकाळ अनुभवायला हवी तरी ह्या गावात यायला हवं. अनेक प्रकारचे पक्षी आपल्या वैविध्यपुर्ण आवाजांनी वातावरणात प्रसन्नता आणत होते. गावातील शेतकरी भल्यापहाटे आपल्या शेतात कामास लागले होते. 













आम्ही क्रिकेट खेळत असताना सुस्मितताई आणि प्राजक्ता प्रथम शेतांचा फेरफटका मारुन आले. त्यानंतर मी आणि प्राजक्ता पुन्हा परिसराचा फेरफटका मारण्यास निघालो. तिथल्या शेतात भेंडी, चवळी, वांगी, कोबी वगैरे ताज्या भाज्या होत्या. सुकविलेल्या भाताच्या पेंढ्याच्या राशी नेटक्या रचुन ठेवल्या होत्या. तुरळकपणे झाडांना लटकलेले आंबे आम्हांला खुणावत होते. अशाच एका शेतातील काम करणाऱ्या महिलेकडून आम्ही चवळीच्या तीन जुड्या घेतल्या आणि आज हिरवी भाजी खायला मिळणार ह्याचा आनंद व्यक्त करीत हॉटेलात परतलो. 

(क्रमशः)
तळटीप - कोकण शृंखलेतील पोस्टचा बहुतांशी भाग मी बोलुन व्हाट्सअँप / गुगल ह्या द्वयीकडून लिहुन घेत आहे. त्यामुळं शुद्धलेखनाच्या चुका माझ्या प्रूफ रिडींगनंतर देखील बाकी राहिल्यास तज्ञांची माफी असावी. 

कोकण २०१८ - भाग १




24 मार्च 2018
कोकण सहलीचा आजचा हा आमचा पहिला दिवस. भल्या पहाटे साडेचार वाजता उठून आम्ही तयारीस लागलो. नेहमीप्रमाणे मी सर्वांच्या मागे तगादा लावुन सहा वाजता तयार होण्यास हातभार लावला. आगगाडीने दीर्घ पल्ल्याचा प्रवास करण्याची आमची ही पहिलीच वेळ. त्यामुळे आम्ही अधिक सावध होतो. दादर रेल्वे स्थानकामध्ये पोहोचण्यासाठी टॅक्सी बुक करायची की ट्रेनने जायचे याविषयी आमची द्विधा मनःस्थिती होती. शेवटी पक्क्या मुंबईकरांच्या विचारसरणीनुसार आम्ही लोकल ट्रेन जायचा निर्णय घेतला. सव्वासहा वाजताची बोरिवलीहून सुटणारी लोकल ट्रेन पकडली.  कूर्मगतीने जाणारी लोकल ट्रेन पाहून आपण बोरिवलीहून सुटणारी जलद ट्रेन पकडायला हवी होती असा विचार मनात आला. परंतु अंधेरीनंतर लोकल ट्रेनने बऱ्यापैकी जलद वेगाने पुढील स्थानकांचा प्रवास पार पाडला आणि आम्ही 7:15 वाजताच्या सुमारास दादर स्थानकात पोहोचलो. पश्चिम रेल्वेच्या फलाटावरून मध्य रेल्वेकडे जाण्यासाठी एका हमालानेआम्हांस मदत केली. एकंदरीत त्यानं 50 रुपये भाडं आकारलं. परंतु आम्ही त्याला त्याला काहीशी जास्त रक्कम देऊ केली. आमचं बुकिंग मांडवी एक्सप्रेसचे होतं आणि वातानुकूलित ३ स्लीपर कोचने आम्ही प्रवास केला. 

पहिल्यांदाच अशा प्रकारच्या मांडणीनुसार प्रवास करण्याची आमची वेळ असल्याने आम्ही काहीसे गोंधळलो होतो. बसताना एकमेकांनी बाजूला बसायचं परंतु ज्यावेळी झोपायची वेळ येते त्यावेळी या तीन सीट्सचे  झोपण्याच्या 3 आसनांमध्ये परिवर्तन होतं. आमच्यासोबत खरंतर एका दुसऱ्या माणसाचा नंबर होता, परंतु तो एका मोठ्या गटाचा सदस्य असल्याने त्यांनी आपल्या आसनांची आदलाबदली करुन एका वयस्क महिलेला आमच्यासोबत पाठवले.  तिनं काही वेळातच मला आता झोपायचं आहे असा अट्टाहास धरला. त्यामुळं काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी आम्ही तिचं म्हणणं मान्य करून तिला झोपण्यासाठी तिची बर्थ देऊन टाकली. वाट्याला आलेल्या वरच्या बर्थवर कसं चढायचं  याविषयी सोहम प्रथम साशंक होता.  परंतु एकदा का त्याने वरती चढण्याचं तंत्र आत्मसात केलं आणि त्यानंतर तो वरतीच स्थिरस्थावर झाला. तिथं त्यानं आपलं बस्तान बसवलं. तिथेच त्यानं आपला नाश्ता, दुपारचे जेवण आणि संदीपभाईसोबत पत्ते खेळणे हे कार्यक्रम पार पाडले. 

मांडवी एक्स्प्रेस मध्ये खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या फेरीवाल्यांची सतत वर्दळ सुरू असते. वरच्या सीटवर बसलेल्या सोहमला या खाद्यपदार्थांचा एक आकर्षक नजारा मिळत असल्यामुळे तो त्याकडे आकर्षित होत होता. परंतु त्याने मोठ्या कसोशीने आपल्या मनावर ताबा ठेवला होता.  काही वेळातच तिकीट चेकर अर्थात TC यांचं आगमन झालं. त्यांच्याकडे आज प्रत्येक आसनावर कोणी बुकिंग केलं आहे याची यादी होती. त्या बुकिंग केलेल्या माणसाकडे photo identity मागून ते शहानिशा करीत होते. या महाशयांकडे खूप अधिकार असतात आणि ते विविध दर्जाच्या आसनांत फेरफार ऑन द स्पॉट करू शकतात. आमच्यासमोर अशा बरेच अपग्रेड केलेल्या प्रवाशांच्या आसनांची यादी आम्हास पहावयास मिळाली.  खरंतर अशा ट्रेनमधून प्रवास हा प्रवेश करतानाच तुमचं तिकीट तपासण्याची सोय करण्यात यायला हवी. 

कोकण रेल्वे हा भारतीय अभियांत्रिकी कौशल्याचा एक उत्तम नमुना मानण्यास हरकत नाही मार्ग मार्ग केवळ एकेरी लाईन आहे
परंतु विविध स्टेशनांवर स्थानकांवर उभारलेल्या उभारलेल्या फलाटांवर विरुद्ध दिशेने येणाऱ्या गाडीला काढून महत्त्वाच्या गाड्यांना प्राधान्यक्रम दिला जातो अशाप्रकारे अत्यंत किचकट असं असंख्य गाड्यांचे वेळापत्रक मोठ्या कौशल्याने हाताळला जातो पण अभियांत्रिकीची खरी झलक आपल्याला या प्रवासात येणाऱ्या अनुभवातून येते. हे असंख्य बोगदे या अभियंत्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी कसे उभारले असतील असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. 
http://konkanrailway.com/ ह्या संकेतस्थळावर सर्व गाड्यांचं वेळापत्रक, त्यांचं प्रत्यक्ष स्थान वगैरे आपण पाहू शकतो. हे स्थळ दर तीन मिनिटाला अद्ययावत माहितीने अपडेट केलं जातं. 
मुंबईतील मध्यरेल्वेची सर्व स्थानक सोडल्यानंतर साधारणता पनवेलच्या नंतर आता गावाकडील भाग सुरु झाला होता. आमची गाडीसुद्धा अशीच सायडिंगला काढली जात होती.  वीर स्थानकावर काढलेलं हे छायाचित्र!!






 असंख्य बोगद्यांमधून प्रवास करताना एयरटेल नेटवर्क नाहीसे होत होते आणि आम्ही बाहेर येताच पुन्हा नेटवर्क रजिस्टर होत होते आणि पुन्हा तोवर नवीन बोगदा येत होता. अशाप्रकारे रजिस्टर आणि डी-रजिस्टर हा खेळ सुरू होता. दूर पल्ल्याच्या गाड्यांमध्ये उपलब्ध असलेल्या खानपान सेवेविषयी आम्ही काहीसे साशंक होतो. त्यामुळे महिला वर्गाने आपल्या परीनं बनविलेला शिरा आणि पुलाव असा वर्षभर अतिपरिचित झालेला मेनू आमच्यासमोर ठेवला. आम्हीसुद्धा काहीही तक्रार न करता आनंदाने केला. सायडिंगला काढण्याचा आणि पुन्हा मुख्य मार्गावर येण्याचा खेळ सुरू होता आणि अशा या खेळात कधी एकदाचे आम्ही दोन वाजताच्या सुमारास रत्नागिरीस पोहोचलो हे आम्हांस समजले नाही. रत्नागिरीचा पल्ला गाठेपर्यत मांडवी एक्स्प्रेसला अर्धा तास उशीर झाला होता. 

The blue view ह्या बाह्यदर्शनी आकर्षक दिसणाऱ्या हॉटेलच्या प्रवेश द्वारापाशी आम्ही येऊन पोहोचलो. आम्हा दोन कुटुंबांना एक बंगला देण्यात आला होता. या बंगल्याच्या बेडरूममधून समुद्राचं दिसणारा एक आकर्षक रुप!


चहापानानंतर आम्ही स्थळ दर्शनासाठी निघालो. साधारणतः १९१० च्या सुमारास ब्रह्मदेशात थिंबा राजा राज्य करीत होता. त्याची सावत्र आई महत्त्वाकांक्षी होती.  थिंबा राजाच्या माध्यमातून देशाची सत्ता आपल्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तिच्याच एका स्त्री नातलगाने  हे सर्व प्रयत्न फोल ठरवीत सत्ता आपल्या हाती घेतली होती. पुढे ब्रिटिशांनी ब्रह्मदेशात आगमन केलं. मग कधीतरी पुढे ह्या सर्व घडामोडीत थिंबाने ब्रिटिशांविरुद्ध एक छोटसं बंड केलं होतं. पाच-पाच हजाराच्या तीन विविध आघाड्यांवर त्याने ब्रिटिशांची झुंज दिली. परंतु ब्रिटिशांनी त्याला पकडून त्यांना ब्रह्मदेशात जास्त काही गडबड करू नये म्हणून भारताच्या दक्षिण किनाऱ्याला वळसा घालून रत्नागिरीला नजरकैदेत ठेवले. ह्या नजरकैदेत बहुदा थिंबा राजाला खूपच स्वातंत्र्य मिळाले होते.  पुर्ण रत्नागिरीभर त्याचा वावर होता असं उपलब्ध माहितीनुसार वाटतं.  त्यानं स्वतःच्या खास देखरेखीखाली आपल्या राजवाड्याची उभारणी केली. रत्नागिरी थिंबामुळं प्रसिद्ध झाली असे म्हणता येणार नाही पण थिंबा मात्र रत्नागिरीमुळं नक्कीच प्रसिद्ध झाला असं मला वाटुन गेलं. 

थिंबा राजाचा राजवाडा बाह्यदर्शनी थोडा फार आकर्षक वाटतो. त्याच्या आतल्या भागाचं वास्तुसंग्रहालयात रूपांतर करण्यात आला आहे. परंतु स्पष्ट सांगायचं झालं तर काही जुन्या पाषाण वस्तू सोडल्या तर या राजवाड्यात अथवा संग्रहालयात बघण्यासारखं खास काही नाही. या सर्व संग्रहालयांची प्रवेशफी ही अत्यंत माफक आहे. त्यानंतर आम्ही थिंबा पॉईंटच्या दिशेने कूच केलं. ह्या पॉईंट्सचे रुपसुद्धा फारसं वाखाणण्यासारखं नाही. तिथल्या बागेतील हे फुलांचं दृश्य. 

इथून आम्हांला रत्नागिरी शहराचा अप्रतिम नजारा मिळाला. त्याचे हे मनोहारी दृश्य. 
सूर्य मावळतीच्या दिशेने वेगाने चालला होता आणि आम्ही समुद्रकिनारी जाण्याचा निर्णय घेतला. समुद्रकिनाऱ्यावर फारशी गर्दी नव्हती. आम्ही एक उत्तम जागा निवडून छायाचित्रण केलं आणि सुर्यास्ताचा आनंद लुटला.






 तिथंच एक शहाळी विक्री करणारी महिला होती. तिच्याकडून तीन शहाळी शंभर रुपये दराने घेतली. शहाळ्याचं पाणी म्हणावं तितकं गोड नव्हतं. आमच्या ड्रायव्हरचा सल्ल्यानुसार आम्ही स्वतःला आमंत्रण या रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणाकरता आमंत्रित करून घेतलं. आमंत्रणचे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही उत्तम होते. शाकाहारी थाळीमध्ये हिरव्या चवळीची आणि मुगाची भाजी अतिशय स्वादिष्ट होते. मांसाहारी जेवणातील चिकन हंडी अगदी चविष्ट होती. बाकी सोलकढी, ताक, भाकऱ्या वगैरे मेनूनं जेवणाची रंगत अधिकच वाढवली. आणि भोजनानंतर हाती आलेलं माफक बिल पाहुन आश्चर्याचा काहीसा सुखद धक्का बसला.    


(क्रमशः)  

बुधवार, २१ मार्च, २०१८

साद - भाग १



पुन्हा तीच हुरहूर, तीच अस्वस्थता !! रात्रीच्या त्या किट्ट शांततेतुन सदानंद अचानक जागा झाला. त्याची नजर बाजूला झोपलेल्या शारदा आणि छोट्या संगीतावर पडली. त्यांना पाहुन मनाला काहीशी शांतता लाभली असली तरी मनातील हुरहूर मात्र कायम होती. सदानंद काही वेळ तसाच पडुन राहिला. शारदेने झोपेचं सोंग कायम ठेवलं असलं तरी तिची बेचैनी कायम होती. 

थोड्या वेळानं मात्र सदानंदला राहवेना. तो उठला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडला. त्यानं दार उघडलं तसा थंड वारा शारदा आणि संगीताला सकाळची चाहुल देऊन गेला. शारदेनं पटकन चादर संगीताच्या अंगावर ओढून घेतली आणि स्वतःलाही आणखी एका चादरीचं संरक्षण दिलं. शारदा झोपली असली तरी तिचे कान मात्र सदानंदची चाहुल घेत होते. खिडकीतुन दिसणाऱ्या आकाशातील चांदणीचा तिनं वेध घेतला. साधारणतः पाच वाजले असावेत. सदानंदने गोठ्यातल्या गाईंना चारा पाणी दिला असावा. मग थोड्या वेळ शांततेनंतर विहिरीवर पोहऱ्याने पाणी काढण्याचा आवाज ऐकू आला. इतक्या थंडीत भल्या पहाटे विहिरीच्या थंडगार पाण्यानं सदानंद आंघोळ करत होता. शारदेची बैचैनी वाढतच होती. 

सकाळ झाली, सुर्यदेवाचं आगमन झालं. संगीताच्या बोलांनी घर गजबजुन गेलं. तिची शाळेत जायची धावपळ सुरु होती. सदानंद मात्र सर्व काही आटपुन चुपचाप ओटीवर बसुन होता. गावातील येणारी जाणारी मंडळी त्याला हाक देत होती तरी त्यांच्याकडं त्याच लक्ष असावं असं वाटत नव्हतं.  मग थोड्या वेळातच संगीताच्या छोट्या मैत्रिणीचे आगमन झालं. छोट्या चिमण्यांची सगळी वरात शाळेकडे निघाली. खिडकीतुन त्या सर्वांना गप्पा मारत जाताना पाहून शारदेला आपलं लहानपण आठविल्याशिवाय राहणं शक्य नव्हतं.  

संगीता शाळेत गेली आणि मग सदानंदला न्याहारी देण्यात शारदेचा वेळ गेला. सदानंद शांतच होता. तसाच मग तो सावकाराच्या कचेरीत गेला. कचेरीच्या कामात त्याच लक्ष लागेना. पण महत्वाची कागदपत्रं बनविणं आवश्यक होतं आणि त्याचा नाईलाज होता. शेवटी कसबसं काम आटपुन सायंकाळी तो घरी परतला. संध्याकाळ शांतच गेली. संगीताच्या चिवचिवाटाकडं त्याच अजिबात लक्ष नव्हतं. त्यामुळं संगीता कंटाळली होती. "तु त्यांना त्रास देऊ नकोस, बस आपली खेळत बाहुल्यांसोबत!" असं सांगत शारदेनं तिला जुन्या बाहुल्यांची जोडी फडताळातून काढुन दिली होती. 

पहाटे शारदेला जाग आली आणि सदानंद बाजुला नाही हे पाहुन तिला कससंच झालं. वेड्या आशेनं तिनं अंगणात धाव घेतली. सदानंदची कोठेच चाहुल नव्हती. मुक्या गाई तिच्याकडं आशेनं चाऱ्याची वाट पाहत बघत होत्या. अंगातील सर्व त्राण संपल्यानं शारदेनं तशीच अंगणातील पायरीवर बसकण मांडली. 

बरीच पायपीट करत सदानंद एकदाचा गुहेपाशी पोहोचला. बहुदा दोन दिवसाची वाटचाल त्यानं केली असावी. तहानभुकेचं त्याला भान राहिलं नव्हतं. गुहेपाशी पोहोचताच तिथल्या वातावरणानं त्याला खूप खूप बरं वाटलं. आपल्या आसनाची मांडणी करुन तो ध्यानस्थ झाला. बराच वेळ झाला तरी त्याच्या अंतर्मनात कुठं काही चाहुल लागत नव्हती. पण तो बेचैन होणं शक्य  नव्हतं. आणि मग त्याला तो आवाज ऐकु आला! "आलास, खुप उशीर केलास ह्या वेळी सदानंद !!" 

(क्रमशः)  

सोमवार, १९ मार्च, २०१८

कार्तिक महिमा


लहानपणी मी क्रिकेटर बनायची स्वप्ने पहायचो. ह्या स्वप्नांच्या दुनियेतील अविभाज्य घटक म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात जसं की विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची दाणादाण उडाली असताना मी एकहाती सामना फिरवून आणत असे. अशा अनेक स्क्रिप्टस् मी कल्पून ठेवल्या होत्या. पण काल दिनेश कार्तिकनं जी काही खेळी केली ती माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडेची होती. 


एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ३४ धावांची गरज असताना मैदानात खेळण्यास येणं हेच भल्या भल्या लोकांसाठी भंबेरी उडविणारे असू शकतं. आणि त्यात दुसऱ्या टोकाला विजय शंकरसारखा महान फलंदाज असताना एकेरी धाव घेणं म्हणजे सरासरी धावांची गती प्रति षटकामागे ३६ वर आणुन ठेवण्यासारखीच गोष्ट झाली. पण दिनेश कार्तिकने ही गोष्ट साध्य केली. पहिल्या तीन चेंडूवर १६ धावा काढून त्यानं बांगलादेशी खेळाडूंना प्रचंड हादरवुन टाकलं. आणि मग शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार निव्वळ अप्रतिम ! 

क्रिकेट खेळात तुमची गुणवत्ता ही static बाब, तुम्हांला ती एका विशिष्ट पातळीपर्यंत यश मिळवुन देऊ शकते. भारतीय राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांविषयी योग्य आदर बाळगुन, तुमच्याकडे केवळ गुणवत्ता असेल तर तुम्ही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवु शकता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी तुमचं match temperament आवश्यक असतं. नेट प्रॅक्टिसमध्ये तासंतास चेंडू टोलवणे आणि प्रत्यक्ष सामन्यात असे लागोपाठ आठ चेंडू टोलवून २९ धावा टोलवणे ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. काल कार्तिकने हे  match temperament भरभरुन दाखवलं. ह्या एका खेळीने कार्तिकच्या कारकिर्दीला पुनर्जीवन मिळालं असं म्हणता येईल का? बहुतांशी ह्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल ! तरीपण ह्या घडीला तो भारतभर हिरो बनला आहे. 

आता विजय शंकरकडे वळूयात ! १८ व्या षटकात सतत चार चेंडू पुढं येऊन मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील हे नक्की ! आता इथं  match temperament चा मुद्दा येतो. पहिला चेंडू निर्धाव गेल्यावर पुढील चेंडू नुसता तटवून एक धाव काढण्याचा प्रयत्न करायला हरकत नव्हती.  असो अशी परिस्थिती मी कॉलेज सामन्यात स्वतः अनुभवली आहे. काही कारणास्तव मला सलामीला पाठवलं जायचं आणि बारा षटकांच्या सामन्यात साधारणतः पहिली चार षटक बळी जाऊ न देणं ही अपेक्षा असायची आणि मी बऱ्याच वेळा ती पार पाडायचो. पण चार षटकांनंतर माझा  विजय शंकर व्हायचा. पण कप्तानाशी असलेल्या दोस्तीखातर हा प्रकार चार वर्षे चालला. पण २० -३० लोकांसमोर अशी फजिती होणं आणि १०० कोटी क्रिकेटवेड्या जनतेसमोर होणं नक्कीच वेगळं  !!

जाता जाता बांगलादेशविषयी! का कोणास ठाऊक पण आपल्या मैदानावरील वर्तनामुळं ते आपला चाहतावर्ग निर्माण करत नाहीत. उगाचच आक्रस्ताळेपणा करणं आणि केवळ उपखंडातील कामगिरीच्या जोरावर मोठमोठया वल्गना करणं ह्या गोष्टीचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. काही अंशी हेच घटक भारतीय संघाला लागू होतात पण हल्ली काही प्रमाणात आपली सुधारणा दिसून येत आहे. 

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

स्थिर विरुद्ध डायनॅमिक!!


मोठमोठाल्या आर्थिक संस्थांच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागात काम करताना सत्वपरीक्षेचे अनेक क्षण येतात. आज्ञावलीचे तुम्ही कितीही परीक्षण केलं असलं तरी ज्यावेळी ही आज्ञावली आणि तिच्यासोबतचे डेटाबेस, इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्व मित्रमंडळी एकत्र प्रॉडक्शनमध्ये जातात तेव्हा ह्या प्रमाणात त्यांना एकत्र नांदायची सवय नसते किंबहुना ज्या क्रमानं ही मंडळी प्रॉडक्शनमध्ये जातात त्यात थोडी जरी गल्लत झाली तर आभाळ फाटू शकतं. आणि त्यामुळं ज्या दिवशी अशी बरीच मंडळी प्रॉडक्शनमध्ये जाण्याचा दिवस येतो त्यावेळी काहीशी धाकधुक मनात असते. 

तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरी एखादी गोष्ट चुकण्याची जर शक्यता अस्तित्वात असेल तर ती गोष्ट केव्हातरी चुकणारच असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे असा प्रसंग केव्हातरी निर्माण होतो. त्यावेळी प्रत्येक क्षणाला त्या आर्थिक संस्थेचं नुकसान होत असतं. बहुतांशी वेळा त्यावेळेच्या ह्या स्थितीला हातभार लावणाऱ्या घटकांचं एक विशिष्ट अशी युती (combination) निर्माण झालेलं असतं जे उपलब्ध लोकांपैकी कोणी आधी अनुभवलेलं नसतं. त्यामुळं हा एक dynamic (अस्थिर) असा प्रश्न सोडविण्याची स्थिती निर्माण झालेली असते. Dynamic प्रश्नाचं उत्तर शोधताना काही गोष्टी ध्यानात असाव्या लागतात. कोणतंही उत्तर हे १००% टक्के परिपुर्ण नसणार हा पहिला भाग, दुसरी गोष्ट म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे विचार केला असता तुमच्यासमोर दोन तीन पर्याय उभे राहतात. त्यातील सर्वोत्तम पर्याय नक्की प्रश्न सोडवेल की नाही ह्याची शाश्वती नसते परंतु क्षणाक्षणाला तुमचं आर्थिक नुकसान होत असतं त्यामुळं सिंहाची छाती दाखवुन एक निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय योग्य ठरला तर तुमच्या निर्णयक्षमतेचं कौतुक होतं, चुकला तरी त्या क्षणी हार न मानता दुसऱ्या क्रमांकाच्या उत्तराकडं धाव घ्यावी लागते. 

अशा माहिती आणि तंत्रज्ञान विभागात दोन प्रकारची लोक असतात किंवा दोन प्रकारच्या वृत्ती दर्शविल्या जातात. 

पहिली वृत्ती, सर्व काही आलबेल असताना मोठमोठाले सिद्धांत मांडणे. इथं कोणताही प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडविण्याची घाई नसते. तुम्ही जगाला परिपुर्ण बनविण्याचे हजारो सिद्धांत कागदावर मांडु शकता. 

दुसरी वृत्ती म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, जखम भळभळून वाहत असताना पुढं सरसावुन ह्या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन, आपण सुचविलेल्या उत्तराच्या विरोधात येणारे सर्व मुद्दे, व्यक्ती ह्यांना तर्कसंगत उत्तर देऊन ठरविलेला पर्याय वेगानं प्रॉडक्शनमध्ये अंमलात आणणं.  

संस्थेला दोन्ही प्रकारच्या माणसांची आवश्यकता असते. प्रत्येक माणसामध्ये ह्या दोन्ही वृत्ती कमीजास्त प्रमाणात अस्तित्वात असतात. आपण कशा प्रकारे घडलो आहोत आणि स्वतःला किती बदलू शकतो हे ओळखणं आवश्यक असतं. 

एक मात्र खरं - जेव्हा केव्हा हा प्रॉब्लेम संपतो तेव्हा ह्या अनुभवातून गेलेली व्यक्ती अधिक प्रगल्भ बनली असते आणि दुनियेकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदललेला असतो.  

शनिवार, १० मार्च, २०१८

Offline




गेल्या दोन आठवड्यात अशा दोन तीन घटना घडल्या ज्यामुळं सर्वसाधारण माहित असलेली सत्यं स्वतः प्रत्यक्ष अनुभवली. 

श्रीदेवीच्या अकाली मृत्युनंतर तिची आठवण म्हणुन पोस्ट लिहिली आणि जी एका ग्रुपमध्ये पोस्ट केली. तिथं एका अनाहुत स्त्रीने त्यावेळी काही जणांत लोकप्रिय झालेल्या आपण सैनिकांच्या मृत्यूची दखलसुद्धा घेत नाही आणि एका अभिनेत्रीवर मात्र भरभरुन प्रतिक्रिया देतो अशा स्वरूपाच्या दोन तीन कंमेंट्स माझ्या पोस्टवर टाकल्या.  भारतीय सैन्याविषयी असलेला माझ्या मनातील जो अतीव आदर आहे तो सोशल मीडियावर मी व्यक्त करावा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आणि त्यात दुसऱ्या कोणी दखल द्यायची खरं तर गरज नाही. आणि ज्याच्याशी ओळख नाही अशा दुसऱ्या माणसाच्या पोस्टवर अशी अनाहुत प्रतिक्रिया देणं हा उद्धटपणा होय. उद्धट माणसांच्या तोंडी मी चारचौघात लागत नसल्यानं मी गप्प बसलो. प्रत्येक गोष्टीतून शिकावं म्हणतात तसं आता उठसुठ सर्वत्र पोस्ट प्रसिद्ध करणं बंद हा ह्या प्रकरणातून घेतलेला धडा !  

दुसऱ्या घटनेत मी in-depth मध्ये लिहत नाही अशी मला प्रतिक्रिया देण्यात आली. आणि ही प्रतिक्रिया देणारी व्यक्ती मला माझी बाजु मांडण्याची संधी न देता स्वतःचे म्हणणं बोलत राहिली. पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यातुन सामोरा आला की माझ्यात सखोल लिहिण्याची क्षमता नाही असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळं इथं एका गोष्टीचं स्पष्टीकरण देणं मी आवश्यक समजतो. मला ज्या विषयात जी काही थोडीफार माहिती आहे आणि ज्याच्या आधारावर मी चरितार्थ चालवतो त्याविषयावर मी सोशल मीडियावर लिहिण्यास मला परवानगी नाही आणि ह्या निर्णयाचा मी मनापासुन आदर करतो. मला जे वाटलं ते लिहावे ह्यासाठी ह्या ब्लॉगची स्थापना. आणि हे लिहिताना कोणी दुखावलं जाणार नाही ही काळजी घ्यायचा आटोकाट प्रयत्न! 

तिसऱ्या घटनेत सोशल मीडियावरील मतभेद प्रत्यक्षातील जीवनात सुद्धा ओढले जातात ह्याचाही अनुभव आला. 

ह्या सर्वात शिकण्यासारखं बरंच काही ! आपण सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा / ब्लॉग वगैरे लिहिण्याचा निर्णय घेतो त्यावेळी स्वतःला संपुर्ण नेटविश्वातील कोणत्याही माणसापुढं पुढं ठेवत असता! भले तुम्ही स्वतःचे कितीही नियम पाळा, समोरचा माणुस स्वतःच्या अकलेनुसार आणि शिष्टाचाराच्या पद्धतीनुसार तुम्हांला निर्णय देणार. जर तुम्हांला हे झेपत नसेल तर तुमचा सोशल मीडियावरील वावर तुम्ही मोजका ठेवायला हवा आणि जर तुम्ही खमके असाल तर समोरच्याला सुद्धा सडेतोड प्रत्त्युत्तर देता आलं पाहिजे ! 

एक गोष्ट मात्र खरी, सोशल मीडियाचा वापर स्वतःकडं लक्ष खेचुन घेणं, दुसऱ्यांचा अवमान करणं ह्यासारख्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आणि ह्यातुन आपल्या भारतीय समाजाचं विनम्रतेकडून अथवा सौजन्याकडून दूरवर जाणं मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत आहे !

जाता जाता सोशल मीडियापासुन दूर जाणं शांततेच्या दृष्टीनं चांगलं असतं हे मात्र गेल्या काही दिवसांत जाणवलं !

पोह्यांचा ऊहापोह

पारंपरिक मराठी घरांमध्ये दररोज सकाळी सर्वसाधारणपणे शिरा, उपमा आणि पोहा हे तीन होतकरू उमेदवार आपला अर्ज दाखल करत असत. घरातील मुख्य गृहिणी विव...