मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३ जून, २०१७

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग २


वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग २


वातावरण ढगाळ होतं आणि पावसास सुरुवात झाली होती. भोजनासाठी आम्ही एका हॉटेलापाशी आलो. वीणा वर्ल्ड आणि केसरी ह्या दोन्ही कंपन्या प्रत्येक ठिकाणी सर्वोत्तम रेस्टारंटची निवड करतात. परदेशी अशी मोजकीच ठिकाणं असल्यानं ह्या दोन्ही कंपन्यांचे प्रवासगट बहुदा सारख्याच वेळी एका भोजनस्थळी येऊन थडकतात. भारतात सुद्धा असं होतं, परंतु भारतातील उपहारगृह प्रशस्त असतात आणि त्यामुळं हा कळीचा मुद्दा होत नाही. परंतु परदेशात मात्र होतो. अशा वेळी प्रत्येक ठिकाणच्या  ज्या काही रितीभाती असतात त्या जाणुन घेऊन त्या पाळण्याचा प्रयत्न करणं, रांगेची शिस्त पाळणं  ही किमान बाब आपण पाळू शकतो. सागर म्हात्रे हा आमचा सहल व्यवस्थापक! त्यानं ही वेळ चांगली निभावुन नेली. जेवण चांगलं होतं, परदेशात प्रत्येक वेळी वीणा वर्ल्डनं भारतीय जेवणाची सोय केली. 

जेवणानंतर शेवटी एकदाचे आम्ही आमच्या हॉटेलपाशी पोहोचलो. चेकइन केलं आणि रूमवर पोहोचल्यावर आमच्या एका बॅगेची चेन तुटल्याचं आणि ती पुढील प्रवासासाठी निकामी ठरल्याचं आमच्या ध्यानात आलं. थोड्या वेळातच परत नाईट सफारीसाठी बाहेर पडायचं असल्यानं झटपट आंघोळ आटपून आम्ही परत बसमध्ये स्थानापन्न झालो. दुसऱ्या दिवशीची सकाळची वेळ मोकळी असल्यानं जुरॉग बर्ड पार्कला येण्यात किती लोकांना रस आहे ह्याची "सागा" आणि "तोफी" ह्यांनी चाचपणी केली. पण केवळ आठ लोकांनी ह्यात रस दाखविल्यानं हा बेत मागे पडला. 

पाऊस थांबला होता आणि संध्याकाळची कोवळी उन्हं वातावरण आल्हाददायक बनवत होती. आम्ही आता सिंगापूर नाईट सफारीला भेट देत होतो. बसमध्ये सर्वांनी आपली ओळख करुन दिली. नाईट सफारीला आम्ही प्रत्येक कुटुंबाच्या गटागटानं बसलो. नाईट सफारी हा एक अविस्मरणीय अनुभव होता. ह्यात फ्लेमिंगो, विविध प्रकारची हरिणे, सिंह, तरस, विविध जातीचे जंगली कुत्रे, जंगली डुक्करे, पाणघोडे, तेपीर (हत्तीसारखी सोंड असलेला डुकरासदृश्य प्राणी), हत्ती, वाघ, मोठी शिंग असलेले बैल, जाड्या कातडीचा गेंडा, अस्वल  ह्या सारख्या वैविध्यपूर्ण प्राण्याचं दर्शन घडलं. स्लॉथ सुद्धा असावा पण आम्हांला मात्र दिसला नाही. रात्रीच्या अंधारमय वातावरणात छायाचित्रण करायचं असेल तर उत्तम कॅमेरा असावा लागतो. ह्या बाबतीत आम्ही चिकित्सक नसल्यानं आमच्या साध्या कॅमेरानं  जे काही फोटो आले आहेत ते वाचकांनी गोड मानुन घ्यावेत ही विनंती !  
















ह्या सफारीत आपणांस जंगली प्राणी अगदी जवळुन पाहण्याची संधी मिळते. ह्यात मी जाणीवपुर्वक त्यांच्या नैसर्गिक वातावरणात असा शब्दप्रयोग केला नाही. स्पष्ट सांगायचं झालं तर मला हा प्रकार काहीसा कृत्रिम वाटला. फ्लॅश फोटोग्राफीला बंदी असली तरी ट्रेनच्या आवाजानं काही प्राणी विचलित होत होते. रात्र झाल्यामुळं रानटी कुत्र्यासारखे काही प्राणी झोपी गेले होते. केवळ आपल्याला हे प्राणी पाहायला मिळावेत म्हणून त्यांना बंदिस्त वातावरणात ठेऊन असल्या रात्रीच्या वेळी आपण त्यांना भेट देतो हा एकंदरीत अयोग्य प्रकार आहे असं मला वाटून गेलं. सफारीनंतर फायर शो होता. ह्यात दोघे कलाकार आगीच्या विविध खेळांचं मनोहारी प्रदर्शन करत होते. 




फायर शो नंतर आम्ही उलु उलु सफारी रेस्टारंट मध्ये जेवणास गेलो. इथं नगरकर आणि कुलकर्णी ह्या कुटुंबासमवेत आम्ही भोजनाचा आस्वाद घेतला. माझ्यासारखा गंभीर माणूस सहलीसुद्धा कसले गंभीर विषय टेबलावर आणू शकतो हे त्यांनी अनुभवलं. इंद्रजित अधुनमधून चर्चेला हलकंफुलकं वळण द्यायचा प्रयत्न करत होता आणि त्यात तो शेवटी यशस्वी झाला!

थकले भागले जीव बिछान्यावर पडताच निद्राधीन झाले त्यावेळी रात्रीचे अकरा वाजून गेले होते. एका रात्रीची झोप आम्ही जवळपास स्किप (गाळली ) होती. 

शनिवार २७ मे  
   
सिंगापुर भारतीय प्रमाणवेळेपेक्षा अडीच तास पुढं असल्यानं स्थानिक वेळेनुसार सकाळी आठ वाजेस्तोवर जाग आली नाही ह्यात नवल नव्हतं. तळमजल्यावर नाश्त्याची सोय होती. नास्ता कॉंटिनेंटल प्रकारातील होता. जगाच्या ह्या भागात शाकाहारी प्रकारात अंडी, कोळंबी आणि कधी कधी चिकनचा सुद्धा समावेश होऊ शकतो असा इशारा सागर ह्यानं आधीच दिला होता. आतापर्यंत आपण अजाणता एकदाही मांसाहारी पदार्थ खाल्ला नाही अशी छातीठोकपणे ग्वाही जगभर फिरणारा कोणताही शाकाहारी माणूस देऊ शकणार नाही. त्यामुळं मी सुद्धा फारसं टेंशन घेतलं नाही. विविध प्रकारचे ज्युस, croissant, पेस्ट्री, फळं ह्यांचा आम्ही फडशा पाडला. 

सिंगापुरात आमच्या सरदार पटेल अभियांत्रिकीच्या १९९४ बॅचचे आशुतोष, पंकज, मिलिंद आणि रजनी असे चौघेजण वास्तव्य करुन आहेत. ह्यापैकी रजनी सध्या सिंगापुरात नव्हती, बाकी तिघांनी मला तू सिंगापुरात येत आहेस तर आपण नक्की भेटू असं मला सांगितलं होतं. शनिवार सकाळ मोकळी असल्यानं आशुतोष मला भेटावयास आला. पंकजचा आज वाढदिवस होता. त्यानं आणि मिलिंदनं रविवारी रात्रीच्या भोजनासाठी भेटण्याचं ठरवलं. 

आशुतोष हा आधी IBM आणि सध्या Deutsche Bank मध्ये काम करणारा उच्चपदस्थ अधिकारी. 




आपला मुलगा मिहीर ह्याला शिकवणीसाठी सोडून तो हॉटेलवर मला भेटण्यासाठी आला. येताना त्यानं MOVENPICK चे अत्यंत चविष्ट आईसक्रीम आणलं होतं. नाश्त्यानं पोट भरगच्च भरल्यानं केवळ चव घेऊन हे आईसक्रीम तसंच रूमवर सोडून त्याच्यासोबत आम्ही सिंगापूरच्या ह्या भागात फेरफटका मारण्यासाठी निघालो. सिंगापूरच्या ह्या भागाची ही काही छायाचित्रे!












फिरत असताना आशुतोषसोबत मस्त गप्पा रंगल्या. शाळा कॉलेजातील मित्रांसोबत गप्पा मारताना विषयांची व्याप्ती विस्तारित असते. आणि त्यामध्ये औपचारिकता अडथळा आणत नाही. 'घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं' सारख्या कसल्या गंभीर आणि अनाकलनीय विषयावर ब्लॉग लिहितोस ह्यावर सुरुवात करून मग चर्चा सिंगापूरमधील भारतीय आणि स्थानिक शिक्षणपद्धती, त्यांचं सखोल विश्लेषण, कॉलेजातील मित्रांची खबरबात, सिंगापुरातील सोशल लाईफ, मुलांचा अभ्यास अशा विविध विषयांना स्पर्शून गेली. आज संध्याकाळी चि व चि सौ का हा मराठी चित्रपट पाहण्यासाठी थेटरात  जाणार हे सांगून आशुतोषनं मला धक्काच दिला. हा चित्रपट इतक्या लवकर सिंगापुरात प्रसिद्ध व्हावा ह्याचं मला आश्चर्य आणि आनंदसुद्धा झाला. आमच्या बसची वेळ होत आली होती. आशुतोषनं मग आमचा निरोप घेतला. 

आमचा पुढील थांबा होता सिंगापुर फ्लायर. तिथंच आसपास आमचं दुपारच्या जेवणाचं हॉटेल होतं. शनिवार सकाळ हा प्रकार सर्वात आल्हाददायी असतो. तौफी सुद्धा मजेत होता. बस सिंगापूरच्या आलिशान भागातुन फ्लायरच्या दिशेनं चालली होती आणि तौफी आजुबाजूला असणाऱ्या महागड्या दुकानात सुरु असणाऱ्या सेलची माहिती देत होता. "ती पहा किती उत्साहात चालणारी महिला, जणू काही संपुर्ण दुकान खरेदी करण्याच्या आविर्भावात चालली आहे ती!" एका रस्त्यावरून चालणाऱ्या स्त्रीकडे निर्देश करुन तो म्हणाला. आधी जेवण करावं की आधी फ्लायरने सिंगापूरचे आकाशातून आल्हाददायी दर्शन घ्यावं ह्याविषयी आमच्या मतांची चाचपणी करण्यात आली. हॉटेलात शनिवारी दुपारी होऊ शकणाऱ्या गर्दीचा अंदाज घेता प्रथम भोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. भोजनाचे हे रेस्टॉरंट ठीकठाक होतं. वरणभात आणि इतर खाद्यपदार्थ होते. खरंतर भरपेट नास्ता आणि मग आशुतोषने आणलेलं आईस्क्रीम ह्यांचा आस्वाद घेतल्यानंतर हे साधं रेस्टॉरंट हा एक चांगला पर्याय होता. जेवणानंतर हॉटेलच्या मागील बाजूस फोटोग्राफी करण्यात आली. इंद्रजित, डॉक्टर विकास ह्यांच्यासोबतचं हे एक छायाचित्र! 


त्यानंतर आम्ही फ्लायरच्या दिशेनं कूच केलं. सिंगापूर फ्लायर ही एक भक्कम संरचना आहे. फ्लायरचे बांधकाम २००८ साली पुर्ण झालं. ह्यामध्ये २८ वातानुकूलित कुप्या (कॅप्सुल्स) आहेत. एका कुपीत २८ पर्यटक सामावु शकतात. ह्या फ्लायरची उंची १६५ मीटर असुन एकेकाळी जगातील सर्वाधिक उंचीचा फेरी व्हील म्हणुन ह्याची ख्याती होती.  


फ्लायरचा वेग एकंदरीत मर्यादित असल्यानं आम्हांला छायाचित्रणास प्रचंड वाव मिळाला. सेल्फी, जोडपीफोटो, ग्रुप फोटो सर्व काही प्रकार एकंदरीत ४५ मिनिटात आम्ही केले. सिंगापूरचे आकाशातून होणारे दर्शन नक्कीच विहंगम होते. मुंबईत नक्कीच असा फ्लायर उभारू नये ही कळकळीची विनंती सर्वांनी व्यक्त केली. 









शेवटी आमची कुपी जमिनीवर आल्यानं आम्ही नाईलाजानं काढता पाय घेतला. सिंगापुरात प्रत्येक पर्यटनस्थळाच्या, राईडच्या एक्सिटच्या ठिकाणी त्या स्थळाशी संबंधित souvenir ची विक्री केंद्रे असतात. अशा ह्या विक्रीकेंद्रातून आपल्या पत्नीला पाच मिनिटाच्या आत काही खरेदी न करता शांततेनं बाहेर घेऊन येता येणं ही मोठी अवघड कला आहे. सिंगापूर डॉलर ४७ रुपयाच्या दराने आहे आणि बोरिवली/ मुंबईत अशा गोष्टी सहज मिळतील हे वाक्य अधुनमधून बोलत राहणं फायद्याचं ठरतं हा अनुभवी माणसाचा सल्ला - भावी पर्यटकांसाठी!

स्कायरनंतर आमचा मोर्चा केबलकारने ल्युजच्या (Luge) सॅन्टोसा बेटाच्या दिशेनं  वळला. इथं जाण्यासाठी केबलकारचा प्रवास होता.  ह्या प्रवासात चांगली हवाई फोटोग्राफी करण्याची संधी मिळाली. 







ल्युज ह्या प्रकारात दोन घटकांचा समावेश होतो. पहिल्या फेजमध्ये आपण एका बैठ्या आगपेटी सदृश्य वाहनात बसुन उतारावरून आपलं वाहन जोरात चालवत नेतो. 




ह्यावेळी प्रत्येकास वयोमानानुसार क्षणभर आपण फॉर्मुला १ मध्ये करियर करू शकतो किंवा का केले नाही असा आत्मविश्वास / खंत निर्माण होते. परंतु इथली आपली कामगिरी फारशी गंभीरपणे घेण्याचं कारण नाही हा अजुन एक अनुभवी सल्ला! बाकी एका ७९ वर्षाच्या आजीबाजींनी सुद्धा ल्युजची राईड घेतली होती हे सागर आणि तौफिक वारंवार आम्हांस सांगत होते. 

आत्मविश्वासानं आपण आकाशात हिंदकोळे घेत असताना अचानक एक बैठा बाक आपणासमोर येतो. खाली इंटरनेटवरुन घेतलेल्या चित्रात एका वेळी चार जण बसलेले दाखविलेले असले तरी आमच्या वेळी मात्र बहुदा ह्यात दोघांनाच बसण्याची परवानगी देण्यात आली. ही फेज दोन ज्याला स्कायराईड म्हणून संबोधिले जाते. 


सोहम त्याचे मित्र इंद्रजित ह्यांच्यासोबत गेला आणि मी प्राजक्तासोबत बसलो. लग्नानंतर इतक्या वर्षांनी केवळ बायकोसोबत हवाई सफर करण्याची संधी देणाऱ्या वीणा वर्ल्डचे आभार ह्यावेळी मी मानले. स्कायराईड मध्ये बसण्याचा हा क्षण! आपण बाकड्यावर बसायचं आणि वरून आपल्यावर एक रॉड येऊन आपणास बंधक बनवतो! 



हा प्रकार जरी आरंभी निरुपद्रवी वाटला तरी वर गेल्यानंतर थोडी गंभीर परिस्थिती निर्माण होते. जवळपास चार पाच मजल्यांच्या उंचीवरून आपण एका बाकड्यावरून प्रवास करत असतो. आणि सोबतीला आपली पत्नी आपणांस फोटो काढण्याचा आग्रह करत असते. चुकून मोबाईल खाली पडला तर होणाऱ्या संभाव्य नुकसानाचा अंदाज आणि फोटो न काढला तर होणारे संभाव्य परिणाम ह्याची आपण तुलना करतो आणि मग फोटो काढतो.  




ही बाकडयावरील सहल बऱ्यापैकी उंचीवर असताना अचानक थांबली. एक दोन मिनिटे हलेचना ! त्यावेळी मात्र समोर सोहम आपल्यासोबत नाही ह्याची प्रथम काळजी आणि मग इंद्रजित त्याच्या सोबत आहेत ह्यानं दिलासा वाटला. स्कायराईड मधून उतरल्यावर मात्र इंद्रजितलाच उंचीची भिती वाटते ह्या वास्तवाची जाण झाली आणि सोहम अजून त्यात इथून आपण पडलो तर वगैरे कॉमेंट्स करुन त्यांना अजून टेंशन देत होता हे कळलं. ज्याचा शेवट सुखदायक ते सर्व काही सुखदायक असा आपला समज करुन आमची पावलं madame tussauds ह्या मेणसंग्रहालयाकडे वळली. ह्या संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी नगरकरांची कन्या ऋचा हिचे तिकीट सापडत नव्हतं आणि ते आपणच हरविले असा तिचा समज झाला असल्यानं थोडी गंभीर परिस्थिती निर्माण झाली. पण नंतर हे तिकीट डॉक्टरांकडं सापडल्यानं परिस्थिती निवळली.  madame tussauds संग्रहालयातील हे काही फोटो! ह्यात सोहम, प्राजक्ता आणि मी ह्यांनी विविध प्रसिद्ध व्यक्तींसोबत आपले फोटो काढून घेतले. बहुतांशी सर्व निरुपद्रवी होते!








पण हा मात्र काहीसा वादग्रस्त! 






madame tussauds ची राईड संपली आणि मग आम्हांला सागरने आईसक्रीम आणि चहाचा पर्याय दिला. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही विंग्स ऑफ टाईम ह्या शो साठी समुद्रकिनारी कूच केलं. सिंगापुर हा एक उत्तम प्रशासनव्यवस्था असणारा देश आहे. इथल्या सार्वजनिक ठिकाणी नळाला येणारं पाणी पिण्यास योग्य असतं. आम्ही वेळोवेळी आपल्या रिकाम्या झालेल्या बाटल्यामध्ये हे पाणी भरून घेत होतो. 

सिंगापुरात असल्यानं आम्हांस नवाकाळ, मुंबई सकाळ वगैरे पेपर वाचण्यास संधी मिळत नव्हती. पण बहुदा कुलकर्णी कुटुंबाच्या राशीत 'पुढील काही दिवसांत गर्दीच्या ठिकाणी चुकामूक होण्याची दाट शक्यता' असं म्हटलं गेलं असावं. आम्ही सर्व ह्या समुद्रकिनारीच्या शो साठी मोक्याच्या सीट्स पकडून स्थानापन्न झालो तरी इंद्रजित ह्यांचा पत्ता नव्हता. मग निहारिकास आमच्यासोबत सोडून अमिता इंद्रजित ह्यांचा शोध घेण्यास बाहेर पडली. काही वेळानं दोघं एकत्र येताना दिसल्यावर आमच्या सर्वांचा जीव भांड्यात पडला. 



साडेसात वाजता सुरु झालेला हा लेझर शो अप्रतिम होता. ह्यात एका मुलाची आणि मुलीची कहाणी ह्या लेझर शोच्या माध्यमातून वर्णिली आहे. ही मुलगी काहीशी धाडशी वाटली आणि ती बरंच काही धुंडाळून पाहू इच्छित होती. दृक माध्यमातील आविष्काराच्या प्रभावाखाली कहाणीकडं आमचं काहीसं दुर्लक्ष झालं. 








शो संपला आणि आम्ही गर्दीमय अशा मोनोरेलनं जेवणाच्या ठिकाणी गेलो. ही जागा प्रशस्त होती. सर्वाना आपापल्या ग्रुपनुसार बसता आलं. जेवताना सर्वांनी आपल्या आधीच्या प्रवासाचे अनुभव सांगितले. अमिता ह्यांनी युरोपातील आपल्या सहलीचे अनुभव विशद केले. जेवण आटपून आम्ही बसमध्ये बसलो. उद्याचा दिवस होता तो युनिवर्सल स्टुडिओ आणि sea aquarium चा! दिलेल्या वेळात अधिकाधिक राईड कशा घेता येतील हे समजावुन सांगण्यात सागर गढून गेला होता. आणि आम्ही दिवसाच्या आठवणी मनात घोळवण्यात रंगून गेलो होतो ! रूमवर परतल्यावर अगदी तुडुंब भरलेल्या पोटाने सुद्धा MOVENPICK चा मोह टाळता आला नाही. त्याचा आस्वाद घेऊन आम्ही निद्राधीन झालो. 


(क्रमशः)

शुक्रवार, २ जून, २०१७

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग १

वीणा वर्ल्डतर्फे आमची ही सहकुटूंब तिसरी सहल आणि त्याचसोबत ही प्रवासवर्णनाची तिसरी श्रुंखला! आधीच्या दोन श्रुंखलाची वर्णने खालील लिंकवर वाचता येतील. 


वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क

(ह्या पोस्टच्या शेवटी आधीच्या सर्व भागांच्या लिंक्स आहेत )

सिमला कुलू मनाली वीणा वर्ल्ड 

(ह्या पोस्टच्या शेवटी आधीच्या सर्व भागांच्या लिंक्स आहेत )

मागं वळून पाहता प्रवासवर्णन करण्याच्या माझ्या शैलीत काहीसा फरक झाल्याचं मला जाणवतंय. सिमला सहलीचं वर्णन लिहिलं त्यावेळी मी भेट दिलेल्या प्रत्येक ठिकाणाचं वर्णन, वाटेत लागलेली गावं ह्यांचं अचूक आणि विस्तृत वर्णन करण्यावर भर दिला होता. हल्ली मी माझ्या मनातील विचार आणि भोवतालच्या परिस्थितीवरील टिपणी ह्यावर जास्त भर देतो असं मला जाणवतं. 

वीणा वर्ल्डतर्फे आमचा हा पहिला परदेश प्रवास. वीणा वर्ल्डची कार्यपद्धती अगदी पक्की ठरलेली असते. जसं की सिंगापुरचा व्हिसासंबंधीचे सोपस्कार यशस्वीरित्या पार पडल्याचा संदेश प्रत्यक्ष सहलीच्या केवळ आदल्या दिवशीच तुम्हांला मिळणार, विमानतळावर तुमची तिकिटं, व्हिसा तुमच्या हातात प्रत्यक्ष उड्डाणाच्या केवळ ३ तास आधी पडणार, ही त्यांची कार्यपद्धती! अगदी काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून निघालेली असली म्हणून काय झालं, माझ्यासारख्या चिंतातुर जंतुच्या मनाची किती ते घालमेल करीत असणार हे त्यांना कसं ठाऊक! बाकी प्रवासात माझे आणि माझ्याहुन जास्त सोहमचे खास दोस्त बनलेले इंद्रजीत कुलकर्णी ह्यांना ज्या ज्या गोष्टींची चिंता वाटते ते पाहुन मला काहीसं बरं वाटलं. म्हणजे कसं तुम्हांला सोबत ही नक्कीच दिलासा देऊन जाते त्यातला हा प्रकार! 

सायंकाळी सात वाजून चाळीस मिनिटांनी सर्वांनी गेट क्रमांक ४ समोर हजर राहावं असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. उबेर वेळेत आली नाही, वेस्टर्न एक्प्रेस समजा गडबडला अशा सर्व विपरीत परिस्थिती एकत्रित आपल्यासमोर ठाकल्या तर उगाचच काही बाका प्रसंग ओढवायला नको म्हणून मी चिंतेत होतो. A380 विमान येणार म्हणून सोहमसुद्धा चार वाजल्यापासून घरात फेऱ्या मारत होता. पाटील कुटुंबियातील दोन पिढ्यांची ही बेचैनी पाहून प्राजक्ताने झटपट तयारी केली आणि त्यामुळं  सायंकाळी साडेपाचलाच मी उबेरला फोन करु शकलो. गडी नेमका आसपासच असावा, दोन मिनिटात उभा ठाकला! रस्तेसुद्धा अगदी कट केल्यानुसार मोकळे मिळाले. सव्वासहानंतर दोन मिनिटांत गेट चारसमोर उतरताना मी प्राजक्ताकडं न पाहता पटापट बॅगा उतरवायला लागलो. हल्ली ट्रॉली प्रकरण सोहम समर्थपणे सांभाळत असल्यानं मी टॅक्सीवाल्याला पैसे देण्यामागे लक्ष केंद्रित केले. बाकी प्रवासातील आमची गडबड ऐकून त्या मराठी टॅक्सीवाल्यानं आम्हांला कोणत्या एजेन्सीद्वारे जात आहात, दर माणशी खर्च किती आणि त्यात सर्व काही समाविष्ट आहे का अशा बऱ्याच चौकश्या केल्या. तो समजा का पुढं मागं वीणा वर्ल्डद्वारे प्रवासास गेला तर एक अधिक संतुष्ट ग्राहक वीणावर्ल्डला मिळवून देण्याचं श्रेय मी घेऊ इच्छितो. वीणाताई ही पोस्ट वाचत असल्यास पुढील सहलीत ह्या बाबीची योग्य ती दखल घ्यावी ही विनंती. घाईगडबडीत पाण्यानं भरलेली बाटली टॅक्सीतच राहिली. नवरे हे विसरभोळे, वेंधळे असतात किंबहुना ही विशेषणे खास नवऱ्यांसाठी मराठी भाषेतच अस्तित्वात आली असावी ह्या सिद्धांताला पुन्हा एकदा दुजोरा मिळाला. 

पुढील दीड तास गेट ४ च्या समोर छायाचित्रण, भोवताली जमलेल्या वीणा वर्ल्डच्या संभाव्य सहप्रवाश्यांचे निरीक्षण करण्यात आम्ही घालवला. मावळत्या सुर्याचं हे एक मनोहारी दृश्य!



हा एक फॅमिली सेल्फी! 



तहान लागल्यानं आणि पाण्यानं भरलेली बाटली मुंबई प्रवासाला गेल्यानं मी साठ रुपयाची बाटली घेऊन आलो. 

सिंगापुरला जाणारे एकंदरीत १२० प्रवासी त्यादिवशी त्या विमानानं जाणार होते. त्यांचे केवळ सिंगापुर, सिंगापूर - थायलंड, सिंगापूर- हॉंगकॉंग असे तीन गटांत विभाजन झाले होते. पुढील सात दिवस ज्यानं आमची अगदी व्यवस्थित काळजी वाहिली त्या "सागा" म्हात्रेशी आमची पहिली भेट इथेच झाली. त्यानं आमचा व्हिसा, खाऊची पुडकी, पोंचो अशा जीवनावश्यक वस्तू आमच्या हातात सोपवल्या.  

चेक-इन बॅग्स सिंगापूर एअरलाईन्सच्या हातात सोपवून आम्ही सुरक्षातपासणीसाठी पुढे निघालो. त्यावेळी सिंगापूर इथं लागणाऱ्या इमिग्रेशनचा फॉर्म आमच्या हाती देण्यात आला. पुढील सात दिवस आमच्या हातात विविध देशांचे गंभीर मुद्रा धारण केलेले अधिकारी अशी कागदाची अनेक चिठोरी आमच्या हाती सोपवत होते, आणि "सागा" म्हात्रे ही सर्व चिठोरी व्यवस्थित सांभाळून ठेवा असे आम्हांला त्या अधिकाऱ्यांहून गंभीर मुद्रेनं सांगत होता. ह्या सात दिवसांत आम्हां सर्वांची ही चिठोरी गायब होत होती आणि नंतर सापडत होती. पतीपत्नीचे सत्तर ऐशी टक्के संवाद पासपोर्ट तुझ्याकडे आहे, चिठोरे माझ्याकडे आहे ह्याभोवती चालले होते. बाकी मग डॉक्टर नगरकर जोडप्यानं "तुझं आहे तुजपाशी" ह्या सूत्राचा यशस्वीरित्या अंगीकार केला पण प्राजक्तानं मात्र "तू भी क्या याद रखेगा!" च्या  आविर्भावानं माझ्याकडं पाहून माझी सर्व कागदपत्र स्वतः सांभाळण्याचं कबूल केलं. 

मासळीबाजारातील गर्दी परवडली असला प्रकार सुरक्षातपासणीसाठी होता. आपण मागं राहतो आणि आपली मौल्यवान बॅग मात्र सर्व तपासण्या पूर्ण करून अशीच बाहेर येऊन राहते असा अनुभव माझ्याच बाबतीत का घडतो हे आजवर मला न उमजेलेलं कोडं आहे. "चिंतातुर जंतू" दुसरं काय! नंतर मग अजून एक गंभीर चेहऱ्याचा इमिग्रेशन अधिकारी! त्याचा यशस्वीरित्या मुकाबला करुन आम्ही एकदाचे बाहेर पडलो. नेहमीप्रमाणं ह्या दोघांनी सबवेचं सँडविच आणि मी डोसा घेतला. त्यानंतर आम्ही चालत चालत इच्छित गेटपाशी येऊन स्थानापन्न झालो. सोहमची भिरभरती नजर ज्याला शोधत होती ते सिंगापुरवरून आलेलं A380 एकदाचं गेटपाशी आलं आणि सोहमचा जीव भांड्यात पडला. 


"अजि मी ब्रह्म पाहिले" च्या आविर्भावातील ही सोहममुद्रा !!  



विमानाने बऱ्यापैकी वेळेत उड्डाण केलं. त्यातील उदघोषणेनुसार  एकंदरीत २३ कर्मचारी वर्ग होता. त्यामुळं रात्रीचं जेवण वेळेत आलं. हिंदू व्हेज मील आणि हिंदू नॉन - व्हेज मील असले दोन प्रकार विमानात उपलब्ध असतात. त्यातील हिंदू नॉन - व्हेज मील पहिल्यांदा सर्व्ह केला जातो ह्याची वाचकांनी नोंद घ्यावी! जमिनीवर असताना विशिष्ट दिवशी शाकाहार पाळणारा मी विमानात मात्र बऱ्याच वेळा मेनू पाहून हे निर्बंध धुडकावून देतो. इथं मदिरेचे काही प्रकार सुद्धा उपलब्ध असतात. त्यामुळं दर्दी रसिक मंडळींची चांगलीच सोय होते. 

विमान स्थानिक वेळेनुसार साडेसात वाजता सिंगापूरला उतरलं. इमिग्रेशन मध्ये फारसं काही टेन्शन नव्हतं. ते सोपस्कार पार पाडून आम्ही बाहेर आलो. वीणावर्ल्ड सारख्या मोठाल्या प्रवासकंपन्या मोजक्या दिवसात, वाजवी दरात  प्रवाशांना अधिकाधिक स्थळांना भेट देण्याची संधी मिळवून देतात. त्यामुळं प्रवाशांनी सुद्धा काही बाबतीत सहकार्य दाखवावं अशी अपेक्षा असते. जसं की आमचं पहिल्या दिवसाचं चेकइन तीन वाजल्यानंतर असल्यानं आम्ही विमानतळावरच ताजतवाने व्हावं असं आम्हांला सांगण्यात आलं होतं. विमानतळावरच ताजतवाने होणं हा माझ्यासाठी अगम्य प्रकार आहे, मला तो अजिबात झेपत नाही. पण बाकीचे काही सहप्रवासी मात्र चांगले फ्रेश होऊन आलेले दिसत होते, बहुदा नवीन टी-शर्ट घातला की त्यांच्या मेंदूचा कप्पा त्यांच्या सर्वांगात "तू टवटवीत झाला आहेस! आता कसा हसतमुखानं वावर बरं!" असा संदेश पोचवत असावं. मधल्या काळात मी मात्र घरच्यांना सुखरूप पोहोचलो हे सांगण्यासाठी मोबाईल डेटा ऑन केला आणि एका मिनिटात दोनशे रुपयांचा फटका खाल्ला. 

विमानतळाबाहेर तौफिकने आमचं स्वागत केलं. स्थानिक कायद्यानुसार प्रत्येक प्रवाशी गटासोबत एक स्थानिक वाटाड्या असणं आवश्यक आहे. तौफिक भारदस्त व्यक्तिमत्वाचा वजनदार आणि गंमतीदार गृहस्थ आहे. रमादान रोझे दुसऱ्या दिवसापासून सुरु असल्यानं त्याची मुद्रा काहीशी चिंतीत असल्याचं मला उगाचच वाटत होतं. आम्ही प्रथम एका साध्या उपहारगृहात नास्ता केला. हे बऱ्यापैकी छोटंसं उपहारगृह होतं, आणि नक्की नाही पण आपल्या सिंगापूर वास्तव्यात मोदींनी इथंच भोजन घेतलं असं "सागा" किंवा "तोफी" म्हणाल्याचं मला स्मरतं. मग अमेरिकन मुद्रेला सिंगापूर डॉलरमध्ये  परिवर्तित करून आम्ही सिग्नेट ह्या कंपनीचं सिम कार्ड घेतलं. ह्यावर मला सिंगापुरचा स्थानिक क्रमांक आणि इंटरनेट वापरण्याचा परवाना मिळाला. आधीच्या आठवड्यात सिंगापुरी आलेला माझा मित्र सतीश ह्यानं ही माहिती दिली होती.  

मग आम्ही सिंगापूर नदीवर फेरफटका मारण्यासाठी कूच केलं. सिंगापूरमधील मोठमोठाल्या कंपन्यांची कार्यालयं ज्या भागात आहेत तिथं आम्ही हा फेरफटका मारला. वातावरण 
  




दूरवर singapore merlion ने आम्हांला दर्शन दिलं. फार पूर्वी सिंगापूरच्या राजाला हा merlion दिसला होता त्यानं राजावर हल्ला न करता तो तसाच तिथून शांतपणे निघून गेला ही कथा "सागा" ने सांगितली. 





बोटीची सफर संपेतोवर वातावरण कुंद होऊ लागलं होतं आणि अशा वातावरणात merlion अगदी खुलून दिसत होता. 


आम्हांला सोडून बस पार्किंगसाठी गेली होती. तिची वाट पाहत आम्ही सर्व पावसापासून आपला बचाव करण्यासाठी आडोशाला उभे होतो. सिंगापूरच डाऊनटाऊन आपला मनोहारी नजराणा आमच्यापुढं पेश करीत होतं. बस आली आणि आम्ही धावतच त्यात शिरलो ते 'Gardens By The Bay' भेट देण्यासाठी. मी सहसा अशा बोटॅनिकल गार्डनला भेट देण्यासाठी नाउत्सुक असतो आणि प्राजक्ता मात्र खूप उत्साही असते. परंतु आत शिरल्यावर मात्र माझ्या डोळ्यांचं पारणं फिटलं. ह्या गार्डनचे छत म्हणजे स्थापत्यशास्त्रातील मनुष्यानं गाठलेल्या प्रगतीचं एक उत्तम उदाहरण आहे.   स्थापत्यशास्त्रातील कौशल्य आणि सौदर्यदृष्टी एकत्र आली म्हणजे काय सुंदर मिलाफ होतो हे ह्या गार्डनच्या संरचनेवरून एकंदरीत आपणास जाणवतं. इथं निवडुंगाचे असंख्य प्रकार आपणास पाहावयास मिळतात आणि सुंदर फुलेदेखील! इथं शब्दांनी त्यांचं सौदर्य टिपण्याचा प्रयत्न करण्याऐवजी चित्रांनाच बोलु देणं उचित ठरतं!

























"गार्डन बाय द बे" च्या भेटीनंतर आम्ही निघालो ते आमच्या भोजनस्थळी! खरंतर एक दिवस - एक पोस्ट असा माझा दंडक असतो. पण आदल्या दिवसापासून सुरुवात केल्यानं ह्या पोस्टपुरता इथंच थांबतो. 

(क्रमशः)

मंगळवार, २३ मे, २०१७

घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं !



म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं! ह्या मागील मुख्य मतितार्थ असा की सत्य परिस्थिती ज्ञात असणं वर्तमानकाळात आनंदानं जगण्यासाठी बऱ्याच वेळा अडथळा बनु शकतं. एकंदरीत जगात धडपडणाऱ्या करोडो लोकांत आपलं नेमकं स्थान कोणतं, आपल्या भविष्यात नेमकं पुढं काय वाढून ठेवलं आहे ह्या बाबतीत सत्य परिस्थितीची जाणीव असणं नेहमीच आनंददायी असतं असं नव्हे. म्हणुन ह्या घटकांविषयीचं अज्ञान सद्यकाळात माणसाला आनंदानं जगू देतं !

आता घोंघावणं म्हटलं म्हणजे मधमाशा आल्या आणि भेंडोळं म्हणजे त्रिमितीय वर्तुळाकार! म्हणून पोस्टच्या आरंभीच्या दोन प्रतिमा! खरंतर ह्या दोघांची मिळुन एक प्रतिमा बनवायला हवी! जन्मापासुन मनुष्याभोवती अनेक शक्यता घोंघावत असतात. बालक कोणत्या देशात, धर्मात जन्मलंय, त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी आहे ह्यावर ह्या शक्यतांच्या भेंडोळ्याचं वैविध्य अवलंबुन असतं. लहानपणी ह्या शक्यतांमधील नेमकी कोणती प्रत्यक्षात साकार होणार आहे ह्याविषयी क्लिष्टता थोडी कमी असते. म्हणजे पोरगं कोणत्या माध्यमाची कोणती शाळा निवडणार, कोणत्या खेळात सहभागी होणार वगैरे वगैरे! 

हळूहळू मग ह्या शक्यता क्लिष्ट रूप धारण करू लागतात. शालेय शिक्षण संपुन महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना कला, वाणिज्य आणि विज्ञान अशी तीन पुर्णतः वेगळी भेंडोळी बालकाभोवती घोंघावू लागतात. कोणतीही एक निवड बालकास अगदी वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारी असते. मग बारावी नंतर समजा अभियांत्रिकीची कोणती शाखा निवडायची हा मोठा यक्ष प्रश्न येतो. पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी, धंद्यातील प्राथमिक निवड ही आपल्याला अगदी वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. तसंच मग जीवनसाथीची निवड! 

ह्या विविध प्रसंगी आपल्याभोवती विविध शक्यता असल्या तरी आयुष्य एकच असतं. त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या वेगवेगळ्या भेंडोळ्यातील केवळ एकच पर्याय आपल्याला निवडता येतो आणि आपण एकच पर्याय निवडलेला असतो. ह्या प्रत्येक Decision Point (निर्णयबिंदूंना) जोडून आपल्या आयुष्याची प्रवासरेषा बनलेली असते. 'इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहे!' हे गाणं केवळ भविष्यात मी ही पोस्ट लिहिणार आहे म्हणुन गुलजार ह्यांनी लिहिलं आहे हा माझा दावा आहे! मोकळ्या वेळात ह्या प्रत्येक milestone च्या वेळी समजा आपण वेगळा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं ह्या शक्यतांच्या भेंडोळ्यांचं कल्पनाचित्र रंगवणं हा माणसांचा आवडता छंद असतो. 

वाढत्या वयानुसार माणसं काहीशी हेकेखोर मनोवृत्ती धारण करतात. भोवती असलेल्या अनेक शक्यतांपैकी बऱ्याचशा शक्यता ते सरळसरळ धुडकावून लावतात, कारण एकच की मला ह्या वयात अशी तडजोड करणं जमणार नाही. आणि मग आयुष्याच्या कोणत्याही क्षणी आयुष्य पुनर्रव्याखित होऊ शकतं हा सिद्धांत निरभ्र आकाशात दूरवर दिसेनासा होतो. हेकेखोर मनोवृत्तीला आपण आपल्यासोबत बाळगत असलेलं baggage (किंवा लोखंडी वजनदार गोळा) असं समजायला हरकत नाही. 

अजून एक मिती! भुतलावर विविध आजार, अपघात ह्या शक्यतांचं भेंडोळं प्रत्येक माणसाभोवती असतंच. काळजी घेऊन ह्यांची शक्यता कमी करणं आपल्या हातात असतं पण ती आपण पूर्णपणे शून्यावर आणू शकत नाही. त्यामुळं जीवनातील ह्या अशाश्वततेबद्दल भान असु देणं इतकंच आपल्या हाती असतं! आता रिमा लागू अचानक गेल्या. आपल्या सगळ्यांना अगदी हुरहूर लावुन गेल्या. त्यांना कधी ह्या शक्यतेच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल काय?  

जाता जाता समजा ह्या विश्वाचा जो कोणी सूत्रधार असेल तो ह्या सर्व शक्यता ह्या विश्वात अशा मुक्त स्वरूपात सोडून देत असेल. आणि जी शक्यता एखाद्या जीवाच्या, वस्तुच्या किंवा वास्तुच्या बाबतीत प्रत्यक्षात साकार होत असेल ते त्या जीवाचं, वस्तूचं वा वास्तूचं प्रारब्ध!! विश्वातील अगणित ग्रहांपैकी केवळ पृथ्वीवर जीवनसृष्टी निर्माण व्हावी आणि बाकी ग्रहांवर होऊ नये हे ही शक्यतांच्या भेंडोळ्याचेच उदाहरण! 

गुरुवार, १८ मे, २०१७

डेट भेट


ह्या आठवड्यात एका सुंदर फ्रेंच भाषेतील चित्रपटाचा काही भाग पाहण्यात आला. ऑफिसातुन आधीच उशिरा आल्यानं तो अधिक उशिरापर्यंत जागून पूर्ण पाहिला नाही. पण जितका काही भाग पाहिला त्यावर ही पोस्ट!

चित्रपटाचं कथानक एका  प्रतिभावंत कलाकाराभोवती गुंफलं गेलं आहे. त्याची प्रतिभा लेखणीद्वारे झरझर व्यक्त होत असली तर प्रत्यक्षात मात्र त्याला ह्या भावना व्यक्त करण्यास जमत नसतं. त्यामुळं ह्या अडचणीवर मात करण्यासाठी परदेशातील चालीरितीनुसार तो ह्या क्षेत्रातील एका तज्ञ सल्लागाराची नेमणुक करतो. आता चित्रपट म्हटला म्हणजे ही सल्लागार एक स्त्री असणं ओघानं आलं. आणि अजुन रंगत आणायची म्हटली तर ही सल्लागारच आपल्या नायकात भावनिकदृष्ट्या गुंतणार हे ही आलंच. 

काही हॉलिवुड चित्रपटातील संवाद खूप अर्थपूर्ण असतात. कथानक सरळसोपं असतं, पात्र मोजकी असतात. कथानक उलगडतं ते केवळ संवादांतून; कथेतील पात्रांच्या भावनांच्या गुंत्यातून हळुवारपणे आपली वाट शोधत! You've got a mail आणि बहुदा Harry met Sally हे ह्या धाटणीतील काही चित्रपट! हा चित्रपट सुद्धा काहीसा त्या धाटणीतील!

सुरुवातीला थिअरीचे पाठ झाल्यावर सल्लागारबाई नायकाला रोल प्ले करायला सांगतात. 

सल्लागारबाई : - "तु रेस्तरॉमध्ये जातोस आणि अचानक तुला आवडणारी मुलगी एकटीच एका टेबलवर बसलेली दिसते, आता तू काय करशील ?" 

नायक - (काही वेळ विचार करुन) "बहुदा मी माझं टेबल पकडून बसेन आणि तिचं माझ्याकडं लक्ष जातंय का ह्याची वाट पाहीन!"

सल्लागारबाई पुर्ण हताश!! त्यांच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहून 

नायक - "मी तिच्या टेबलापाशी जाईन!" 

रोल प्ले 

नायक - "आपली हरकत नसेल तर मी काही वेळ आपल्याला सोबत देऊ का?

नायिका - (एका सेकंदात त्याला आपादमस्तक न्याहाळून केवळ चेहऱ्यावर हावभावाद्वारे होकार देते ! हावभावाद्वारे पुढील भावना योग्यप्रकारे व्यक्त होतात - म्हणजे तुम्ही इथं बसावं अशी माझी मनापासुन इच्छा नाहीए! पण वेळ घालविण्यासाठी माझ्याकडं दुसरा सध्या उपलब्ध पर्याय नाही आणि तु तसा काही मला उपद्रव देशील असं तुझ्या चेहऱ्याकडं पाहुन मला वाटत नाही. )

नायक - "आपण इथं एकट्याच बसला आहात का?" 

नायिका - ("दिसत नाही का तुला, डोळे तपासून घे " - मनातील हे भाव प्रचंड प्रयत्नांद्वारे लपवून ) - "हो मैत्रिणीची वाट पाहत आहे!"

नायक - "असं का? तुमची मैत्रीण ट्रॅफिक मध्ये अडकली असेल का?"  

सल्लागार टाइमआऊटची खुण करते.    

सल्लागार - "इथं मैत्रीण महत्वाची नाही. तू संवाद तुझ्या नायिकेभोवती केंद्रित कर! तिला काही कॉम्प्लिमेंट्स दे !"

रोल प्ले 
नायक - "तुम्ही सुंदर दिसताहात!"

सल्लागार प्रचंड वैतागून टाइमआऊटची खुण करते.

सल्लागार - " This is too direct. तुम्ही आताच संवादाला सुरुवात केली आहे आणि तू असा थेट मुद्याला हात घालू शकत नाही. म्हणजे घालू शकतोस पण ते अप्रत्यक्षपणे व्यक्त व्हायला हवं!

रोल प्ले 
नायक - "बाकी तुझं कसं व्यवस्थित चाललंय ना  "
नायिका - (मला काय धाड भरलीय! मनातील हे भाव महत्प्रयासानं दूर सारून!) "ठीक चाललंय. जीवन बरंचसं एकसुरी बनून गेलंय. जीवनात काही happening असं होतंच नाहीए!"

नायक - (क्षणभर थांबून) - "गेल्या पाच मिनिटात माझं आयुष्य मात्र आमुलाग्र बदलून गेलंय! (इथं आमुलाग्र हा योग्य शब्द आहे का हा वादाचा मुद्दा) माझ्या जीवनात प्रचंड चैतन्य निर्माण झालंय. वगैरे वगैरे "

सल्लागार प्रचंड आश्चर्यचकित होऊन टाईमआउटची खुण करते. "हा संवाद अचानक कुठून ह्या पात्राला सुचला - ही भावना!" 

बाकी क्षणापासुन मग कथानक, संवाद अधिक प्रगल्भ होत जातात. पुढील भाग म्हणजे त्याचा गोषवारा !

संवादात मुख्य जबाबदारी पुरुषावर असते. म्हणजे बरेचसे पुरुष ह्या बाबतीत मठ्ठ असतात. आणि स्त्रिया त्यांना तसंही स्वीकारतात!  तरीपण खालील मुद्द्यांवर त्यांनी प्रयत्न करायला हरकत नसावी.  आधुनिक स्त्रीला बौद्धिक पातळीवरील संवाद आवडतात. पुरुषास फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक क्षेत्रांची माहिती असणं चांगलं. बाकी क्रीडा, राजकारण आणि ऑफिस ह्या विषयांवर स्त्रीने स्वतःहून रस दाखविल्याशिवाय चर्चा सुरु करू नये. फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक ह्या विषयांवर स्त्रीच्या कम्फर्ट झोनची मर्यादा जाणुन घ्यावी आणि चर्चा त्यात मर्यादित ठेवावी. मधुनच स्त्रीला अप्रत्यक्ष दाद द्यावी आणि मग तिला ती दाद आवडल्यास बोलणं चालू ठेवावं. अशा वेळी ती बहुदा शांत राहुन ती दाद मनातल्या मनात घोळवत राहण्याची शक्यता गृहित धरावी. जर स्त्री बोलू लागली तर चांगल्या श्रोत्याची भूमिका निभावता यायला हवी. बोलत्या स्त्रीला मध्येच खंडित करण्याची अरसिकता दाखवेल तो पुरुष आपलं दुर्दैव आपल्या हातानं ओढवून घेतो!

सर्व काही ठीक झालं तर महाराष्ट्रात "हात तुझा हातात" किंवा फ्रांसमध्ये फ्रेंच व्हर्जनने भेटीची सांगता करावी. 

चित्रपट पूर्ण काही पाहता आला नाही. महाराष्ट्रातील विवाहित पुरुषासाठी असं काही मार्गदर्शन मिळण्याची नितांत आवशक्यता आहे. "वांग्याची भाजी चांगली झाली" हे विधान कितीही मनापासुन केलं तर बायकोची संशयास्पद नजर आपला चेहरा निरखून पाहते हे कित्येक वर्ष मी अनुभवलं. त्यामुळं ही कॉम्प्लिमेंट असू शकत नाही. पण "वांग्याची भाजी चांगली झाली" ह्या वाक्यानंतर पॉझ घेऊन मग दबल्या आवाजात "तुझ्या मानानं" किंवा "तुझ्या परीनं " बोलावं. ह्यात तुमच्या विनोदबुद्धीला दाद मिळण्याची शक्यता जास्त असते हा स्वानुभव! बाकी धोकाही असतोच! पण धोका घेतल्याशिवाय दाद मिळणार थोडीच!

रविवार, १४ मे, २०१७

लिंक रोड - दीडेक तास किशोरजींच्या सोबत



आपांनी घड्याळाकडं नजर टाकली. रात्रीचे सव्वानऊ झाले होते. मग त्यांनी आपल्या 'To Do List' कडे नजर टाकली. सकाळपासून त्यातील दोन गोष्टी  संपल्या होत्या आणि चार वाढल्या होत्या. अजुन कार्यालयात थांबण्यात काही अर्थ नाही हे उमजून घेऊन आपा खाली उतरले. 

गोरेगाव स्पोर्ट्स संकुलापर्यंत आपण ताशी पंधरा किलोमीटरचा वेग गाठू शकलो ह्याबद्दल आपा मनातल्या मनात खुश झाले. असंच एकदा मोकळ्या रस्त्यावर 
'मुसाफिर  हूँ  यारों , ना घर हैं ना  ठिकाना 
मुझे  बस चलते जाना हैं,  बस  चलते जाना' !!

हे गाणं गात जावं अशी इच्छा त्यांच्या मनी प्रकट झाली. 

लिंक रोडवर पोहोचण्यासाठी वाहनांची लागलेली रांग पाहून आपा हिरमुसले झाले. पण शेवटी त्यांनी मागचा रस्ता पकडण्याऐवजी हाच रस्ता धरला. काही वेळानं डावीकडे वळण्याचा हिरवा सिग्नल नेमकी आपांची गाडी येताच लाल झाला. तेव्हा दूरवरून त्यांना किशोरचे सूर ऐकू आले. 

'ये लाल रंग  कब मुझे  छोड़ेगा 
मेरा  गम कब तलक मेरा दिल तोड़ेगा '

डावीकडे वळण घेण्यासाठी वाट बघत असलेल्या आपांना रस्त्याच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेला ट्रॅफिक पोलीस दिसला. लाल सिग्नलवर आपण हे वळण घेतल्यावर त्यानं आपल्याला कसं पकडलं होतं ह्याच्या आपांच्या क्लेशदायक स्मृती जागृत झाल्या. किशोरजी एव्हाना आपांच्या बाजूलाच विराजमान झाले होते. किशोरजींनी बहुदा आपांच्या मनातल्या ट्रॅफिक पोलीसांविषयीच्या भावना ओळखल्या असाव्यात. 

खिज़ा के फूल पे आती कभी बहार नहीं 
मेरे नसीब पे मेरे दोस्त तेरा प्यार नहीं! 

किशोरजी गुणगुणत असलेलं हे गाणं आपल्या मनातील ट्रॅफिक पोलीसाविषयीच्या भावना कशा बरोबर व्यक्त करतं ह्याविषयी आपांच्या मनात समाधान निर्माण करुन गेलं. 

लिंक रोड तुडुंब भरुन गेला होता. दुचाकीस्वार, रिक्षावाले आपांच्या गाडीपासून दोन्ही बाजूला ५० मिमी अंतर ठेवून आपली वाहनं पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत होते. आपांची गाडी आपांप्रमाणं दडपणात आली होती. शेवटी एका बाइकनं तिला हळुवार स्पर्श करुन पुढे मुसंडी मारली. आपांचा अनावर झालेला संताप किशोरजींच्या ह्या गाण्यामुळं काहीसा निवळला. 

छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा !

तरीपण गाडीच्या सर्व बाजूला पडलेले ओरखडे पाहून लोक काय म्हणतील हा विचार त्यांच्या मनात आलाच. किशोरजी गाऊ लागले. 

कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम हैं कहना 
छोडो बेकार की बातों को कही बीत न जाये रैना!!

इंफिनिटी मॉल केवळ ३० ते ४० मीटर वर होता. कधी कधी आपण गाडी आणत नाहीत तेव्हा हेच अंतर आपण पाच मिनिटात चालत जातो ह्याची आपांना आठवण आली. पण हल्ली आपण कारनेच आलो हे त्यांना आठवलं. किशोरजींनी काहीशी खूण केली. अचानक लताजींच्या सुमधुर आवाजात गाणं ऐकू आलं. 

आज कल पाँव जमीं पर नहीं पड़ते मेरे।  

ती खूण हे मी लताजींचं गाणं ऐकवतो आहे ह्यासाठी होती हे आपांना आता कळलं. लताजींची दुसरी ओळ आपांच्या मनात दुसराच विचार आणून गेली. 

बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उड़ते हुए!

आपली कार हवेत उडू लागली तर किती बरं होईल ह्या विचारानं आपा थोडे उत्साहित झाले. 

त्यांनी किशोरजींकडे नजर टाकली. 

मंज़िले अपनी जगह हैं रास्तें हैं अपनी जगह 
अगर कदम (ट्रैफिक) साथ ना दे तो मुसाफ़िर क्या करें!

किशोरजींचं गुणगुणणे सुरूच होतं. आज ट्रॅफिक खूपच भयंकर होता. दोन आठवड्यापूर्वी आपण इथंच उबेरमध्ये पन्नास मिनिटं अडकलॊ होतो ह्याची त्यांना आठवण झाली. किशोरजींनी तात्काळ गाणं बदललं.  

वो शाम कुछ अजीब थी  ये शाम भी अजीब हैं 
वो  (ऑटोरिक्षा) कल भी पास  पास  थी  वो  आज भी करीब हैं।  

तीस मिनिटं झाली तरी आपा इन्फिनिटी मॉलपर्यंत पोहोचले नव्हते. मध्येच संतापानं त्यानं एका रिक्षावाल्याला कोपऱ्यात चेपून आपली कार पुढे दामटली. रिक्षावाल्यानं नजरेनं त्यांना जबरा खुन्नस दिली. किशोरजींचं लक्ष रिक्षावाल्याकडं गेलं. 

आपकी आँखोमे कुछ महके हुए से राज हैं 
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज हैं। 

किशोरजींनी  रिक्षावाल्यासाठी इतक्या चांगल्या गाण्याची निवड करावी ह्याचा आपांना तीव्र खेद वाटला. आणि आपा स्वतः गुणगुणू लागले  

मै शायर (ड्रायव्हर) बदनाम ओ मै चला 
महफ़िल से नाकाम मैं चला।  

किशोरजीनी आपांचा मूड ओळखला. आणि ते गाऊ लागले. 

बड़ी सुनी सुनी हैं जिंदगी ये जिंदगी।  

बराच  वेळ शांततेत गेला. किशोरजीनी मग गाण्यास सुरुवात केली. 

कहाँ तक ये मन को अँधेरे छुएंगे 
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे। 

खरंतर मे महिन्यापासून नेहमी आपा पावसाची वाट पाहायला सुरुवात करीत. पण ह्यावर्षी पावसाळ्यात ट्रॅफिकची काय हालत होणार ह्या विचारानं त्यांना खूप चिंताग्रस्त केलं होतं. किशोरनी त्यांच्या मनातील भावना नेमक्या ओळखल्या. 

चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाये 
सावन जो अगन लगाए तो उसे कौन बुझाये।

इन्फिनिटी कसाबसा पार झाला होता. घड्याळ्याच्या काट्यांनी दहा ओलांडले होते. किशोरजींची झोपण्याची वेळ झाली असावी. 

चला जाता हूँ किसी की धुन में 
धड़कते दिल के तराने लिए।  

ह्या ओळी गुणगुणत हा मस्त कलंदर कलाकार माझ्या गाडीबाहेर पडला. वाहतूक मंदगतीनं का होईना पुढे सरकत होती. पण किशोरजींच्या जाण्यानं मन खूप उदास झालं होतं. अशा ह्या ट्रॅफिकमध्ये आपल्यासोबत कोणी नाही हे जाणवलं होतं. 

कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा 
हम किसीके ना रहे कोई हमारा ना रहा !

क्या बताऊँ मैं कहा यूही चला जाता हूँ 
जो मुझे राह दिखाए वो सितारा ना रहा।  

ह्या गाण्याच्या ओळी हवेत विरतात न विरतात तोच आपांचा भ्रमणध्वनी खणखणला. "काय अजून ऑफिसातून निघाला की नाही!" आपल्या धर्मपत्नीच्या ह्या सुस्वरातील धमकीवजा प्रश्नानं आपांची सर्व उदासी दूर झाली होती. मिठचौकी पार पडली होती आणि 'पल पल दिल के पास' हे गाणं गुणगुणत आपा भरवेगानं घराकडं निघाले होते!

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...