मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २ नोव्हेंबर, २०१४

साप्ताहिक सुट्टी आणि नोकरदार वर्ग!


 
मनुष्यजातीच्या प्रगतीच्या कोणत्या एका टप्प्यात साप्ताहिक सुट्टी ह्या संकल्पनेचा उदय झाला असणार ह्यावर माहिती आंतरजालावर थोडा शोध करून पाहिला असता काही विशेष माहिती हाती पडली नाही. सध्या बहुतांशी देशात शनिवार - रविवार अशी सुट्टी दिली जाते. काही मुस्लिम देशात ही शुक्रवारी दिली जाते. वेदिक कालीन भारतात शनिवारी दिली द्यायची असा उल्लेख आढळतो. पण त्याविषयी खात्रीलायक पुरावा नाही.
साप्ताहिक सुट्टीचे प्रयोजन काय असावे ह्याविषयी काही विचार! 
१> मनुष्यप्राणी कोणतीही एकच गोष्ट सतत करू शकत नाही. त्याला एकच गोष्ट करून मानसिक किंवा  शारीरिक किंवा दोन्ही प्रकारचा थकवा येतो. त्यामुळे त्याला त्यात खंड घ्यावासा वाटतो.
२> खंड घेण्यासाठी मनुष्याकडे अन्न आणि वित्त ह्याचा पुरेसा पुरवठा असणे आवश्यक असते. दैनंदिन मजुरीवर काम करणाऱ्या मजुरांची कल्पना करून पहा. बऱ्याच वेळा त्यांच्यापाशी अन्नाचा अथवा द्रव्याचा पुरेसा साठा नसल्याने त्याला दररोज काम करणे आवश्यक असते. 
३> बहुतांशी उदाहरणात खंड घेण्याची चैन परवडू शकण्याची स्थिती सर्वांची असते. मग ह्या सुट्टीचा उपयोग लोक कसे करतात हे पाहणे मनोरंजक ठरेल. सुट्टीचा मुख्य हेतू हा स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या ताजतवानं करणे हा असला तरी ही प्रामुख्याने तुमच्या व्यावसायिक जीवनाची गरज असते. प्रत्येकाला अजून दोन प्रकारची जीवनं असतात ती म्हणजे कौटुंबिक जीवन आणि सामाजिक जीवन. साप्ताहिक सुट्टीच्या कालावधीत तुमच्या कौटुंबिक आणि सामाजिक जबाबदाऱ्यांना न्याय द्यायची अधिकची जबाबदारी तुमच्यावर येऊन पडते.
४> शारीरिक दृष्ट्या स्वतःला ताजतवानं करण्यासाठी विश्रांतीची गरज असते. त्यात काही तडजोड करता येत नाही. पण मानसिक ताजतवानं व्हायच्या दृष्टीने विचार केला तर ज्याप्रकारे व्यवस्थित झोप घेऊन शारीरिक दृष्ट्या ताजतवानं करता येतं. हे शारीरिक ताजेपण काही अंशी जसं मानसिक ताजेपणात परिवर्तित होण्याची शक्यता असते तसंच तसंच व्यवस्थित व्यायामानं किंवा निसर्गातील भटकंतीने सुद्धा मनाला ताजतवानं करता येत. भटकंतीने मानसिक विरंगुळा बहुदा सर्वांनाच मिळतो पण शारीरिक दृष्ट्या ते ताजेतवाने होतात की नाही हे प्रत्येकाच्या शरिरीक क्षमतेवर अवलंबून असते.
आता हा खालील काहीसा विचार करायला लावणारा (आणि थोडा मजेशीरही) तक्ता पहा!


 कृती 
 शारीरिक रिचार्ज 
 मानसिक रिचार्ज
 कौटुंबिक जबाबदारी पार पाडलीत?
 सामाजिक  जबाबदारी पार पाडलीत?
 झोप 
 हो 
काही प्रमाणात हो 
 नाही 
 नाही 
 व्यायाम 
काही प्रमाणात हो
काही प्रमाणात हो
 नाही 
 नाही 
कुटुंबासोबत भटकंती 
काही प्रमाणात हो
काही प्रमाणात हो
 हो 
 नाही 
मित्रांसोबत भटकंती 
 काही प्रमाणात हो
 (बहुदा जास्त प्रमाणात) हो 
 नाही (भयावह स्थिती निर्माण होण्याची शक्यता!)
अल्प प्रमाणात हो!
कार्यालयीन सहकार्यांसोबत भटकंती 
 काही प्रमाणात हो
 (बहुदा कमी  प्रमाणात) पण हो
 नाही 
 अल्प प्रमाणात हो!
 कुटुंबासोबत मॉलभेट 
 नाही 
 बहुदा नाही 
 ११० टक्के हो!
 नाही 
नातेवाईक भेट
 नाही 
 कोणत्या बाजूच्या नातेवाईकांना भेट दिलीत त्यावर अवलंबून!!
 कोणत्या बाजूच्या नातेवाईकांना भेट दिलीत त्यावर अवलंबून!!
 नाही 
निराधार बालक, वृद्धाश्रम अशा संस्थांना भेटी
 बहुदा नाही 
 २०० टक्के आणि अधिक 
 नाही 
 २०० टक्के आणि अधिक
एक ब्लॉग पोस्ट लिहलीत नाही खूपकौटुंबिक पातळीवर थोडीशी धोकादायक स्थिती विषय कोणता निवडलात त्यावर अवलंबून!!
दोन ब्लॉग पोस्ट लिहल्यात  नाही खूपच कौटुंबिक पातळीवर तीव्र  धोकादायक स्थिती विषय कोणता निवडलात त्यावर अवलंबून!!
तीन ब्लॉग पोस्ट लिहल्यात 
नाही 
 आता कसं हलकं हलकं वाटतंय 
 आणीबाणी 
 विषय कोणता निवडलात त्यावर अवलंबून!!

अशी ही यादी अजून लांबत जाईल. ह्यात सोफ्यावर लोळत क्रिकेट सामना पाहिलात, मुलाचा अभ्यास घेतलात, बाजारात जाऊन भाजी आणलीत अशा अनेक गोष्टींचा समावेश करता येईल.
लेखाचा ओघ काहीसा वेगळ्या दिशेने गेला. पण ऑफिसात बरीच उच्चपदीय मंडळी पाहिली की ती जाणीवपूर्वक स्वतःला नवीन आठवड्यासाठी पूर्णपणे मानसिकदृष्ट्या रिचार्ज करण्यासाठी प्रयत्न करत असतात हे नक्कीच जाणवतं. अजूनही आपल्याकडे ह्या विषयी फारशी जाणीव नाही. जसजसा माणूस जबाबदारीच्या वरच्या पायऱ्या ओलांडत जातो तसतसे त्याला स्वतःच्या मेंदूची आणि पर्यायाने स्वतःच्या मानसिक स्थितीची काळजी घेता आली पाहिजे. व्यावसायिक जग खूप निर्दयी असतं. साप्ताहिक सुट्टी असो वा वार्षिक सुट्टी असो, तुम्ही सुट्टीवरून परत आलात म्हणून तुम्हांला तुमच्या कामगिरीबाबत सवलत काही मिळत नाही. त्यामुळे ह्याविषयी सतर्क राहा इतकेच म्हणणे!!
एक गोष्ट आताच जाणवली आणि ती म्हणजे मानसिकदृष्ट्या ताजतवानं होणं नक्कीच गरजेचं असतं. हे मानसिकदृष्ट्या टवटवीत होणे कार्यालयातील चांगल्या कामिगिरीसाठी की जीवनगाणे उत्साहाने गाण्यासाठी हा ज्याचा त्याचा प्रश्न! आता शारीरिक विश्रांती, गुणवत्तापूर्ण कौटुंबिक वेळ, मित्रांबरोबर घालविलेला वेळ किंवा सामाजिक कार्य ह्यातील कशाने तुम्ही मानसिकदृष्ट्या टवटवीत होता हे ओळखणं महत्वाचं!!ते ओळखून त्याप्रमाणे साप्ताहिक सुट्टीत त्या साठी वेळ नक्कीच बाजूला काढून ठेवा! अगदी आपल्या जीवनसाथीशी बोलून!

बाकी गेल्या तीनचार दिवसातील ही तिसरी पोस्ट!!!

शनिवार, १ नोव्हेंबर, २०१४

आकाशी झेप घे रे पाखरा!!


 
उदरनिर्वाहाचे साधन शोधण्यासाठी आपलं मूळ गाव सोडून दुसऱ्या गावी स्थिर होण्याची गरज मनुष्याला पूर्वापार भासत आली आहे. कालांतराने ह्या स्थलांतराची व्याप्ती देशाटनापर्यंत पोहोचली. व्यापार, नोकरी ह्या निमित्ताने लोक परदेशात जाऊन पोहोचली. ह्या ब्लॉग पोस्टची व्याप्ती भारतातील लोकांनी केलेल्या देशांतरापुरती मर्यादित आहे.
व्यापारासाठी देशांतर केलेल्या लोकांना बऱ्याच वेळा कायमच परदेशात राहावं लागतं. कारण इतका जमलेल बस्तान सोडून अचानक मायदेशी परत येणे शक्य होत नाही. पण नोकरीवाल्यांचे मात्र तसं नसतं. त्यांना नोकरीचे ठिकाण बदलण्यासाठी तुलनेने कमी धडपड करावी लागण्याची शक्यता असते.
बऱ्याच वर्षापासून भारतीय युवक मंडळी विविध क्षेत्रात उच्च शिक्षणासाठी परदेशात जाऊन राहिले. नंतर काही वर्षांनी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या बऱ्याच भारतीयांना परदेशी जाऊन रहायची संधी मिळाली. काही प्रांतातील भारतीयांनी व्यापारउदिम करण्यासाठी परदेशात जाऊन वास्तव्य केलं. अशा विविध कारणांसाठी परदेशात जाऊन राहणाऱ्या भारतीयांची संख्या प्रचंड आहे.
मध्यंतरी अपर्णा वेलणकर ह्यांचं "For Here Or To Go?" हे पुस्तक वाचलं होतं. पुस्तकाचं शीर्षक मॅकडोनाल्ड मधल्या विक्रेता ग्राहकाला जो प्रश्न विचारतो त्यावर आधारित आहे. काउंटर ऑर्डर दिल्यावर तिथला माणूस आपल्याला विचारतो, "बाबा रे! तुला हे इथे खायचं आहे की घरी जाऊन तू ह्याचा आस्वाद घेणार आहे!" त्याचप्रमाणे परदेशात राहून जमा केलेली संपत्ती, शिक्षण, सामाजिक स्थान ह्याचा आपण तिथंच आनंद घेणार आहोत की आपल्या देशात परतून? असा प्रश्न परदेशात काही काळ राहिलेल्या प्रत्येक माणसास पडतो. लेखिकेने परदेशात जाऊन वास्तव्य केलेल्या बहुतांशी मराठी लोकांशी भेटून त्यांचं मनोगत जाणून घेतलं होतं. त्यांनाही असा प्रश्न पडलाच होता. हा निर्णय घेण्यामागे असणाऱ्या विविध घटकांचा उहापोह करण्याचा हा प्रयत्न!

१> परदेशात आणि भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाची किंबहुना बचतीची तुलना. जर तुम्हांला भारतात मनासारखं उत्पन्न मिळत असेल तर तुम्ही परदेशात जाऊन स्थायिक होण्याचा विचार करण्याची शक्यता कमी होऊ शकते. काही लोकांच्या बाबतीत परदेशात तुम्हांला भारतात मिळणाऱ्या उत्पन्नाच्या किती पट उत्पन्न मिळू शकते ह्यावर हा निर्णय असतो. जर त्यांना दुप्पट उत्पन्न मिळत असेल तर ते कदाचित जाणार नाहीत पण जर हाच आकडा चारपट झाला तर बहुदा त्यांचा निर्णय बदलेल! ह्यात अजून एक घटक येतो. भारतात समजा दोघंही नोकरी करत असतील तर परदेशात सुद्धा करू शकतात का?

२> तुमच्या क्षेत्रात परदेशात आणि भारतात असणाऱ्या उपलब्ध संधींची तुलना. असं म्हणतात की संशोधन करायचं असेल तर अमेरिका वगैरे देश उत्तम! अशा क्षेत्रात भारतात खूप संघर्ष करावा लागतो.

३> कौटुंबिक जबाबदारी! आई वडिलांची आणि भावंडांची जबाबदारी असल्याने काहीजण परदेशात कायम वास्तव्य करू शकत नाहीत. ह्यात काही वेळा निर्णय अगदी सोपा असतो तर काही वेळा काठावरचा असतो. अशा वेळी आई वडिलांचा, बाकीच्या नातेवाईकांचा समजूतदारपणा ह्या निर्णयात महत्वाचा घटक बनतो.

४> नातेवाईकांच्या गोतावळ्यात राहण्याची सवय असल्यास आपण मनाला किती लगाम घालू शकतो हा ही महत्वाचा घटक बनतो. परदेशात राहत असलं तर महत्वाच्या समारंभाला वर्षातून एकदा नक्कीच भारतभेट करू शकतो! आणि हल्ली संगणकाच्या माध्यमातून दररोज परदेशात राहूनसुद्धा आपल्या प्रिय व्यक्तींना पाहण्याची सोय आहेच! परदेशात राहताना बऱ्याच मित्र मैत्रिणी बनतात. त्या नातेवाईकाची जागा १०० टक्के नसली तरी बऱ्याच प्रमाणात घेऊ शकतात.

५> परदेशातील हवामान! वर्षभर अतिथंड हवामान असल्यास निराशावादी विचार येऊ शकतात. ह्या अतिथंड हवामानासोबत हिवाळ्यातील अगदी लहान दिवसांचा सामना करावा लागतो. ह्यात तुमची मानसिक कणखरता महत्वाची भूमिका बजावते. आपण इथे आपल्या नोकरी व्यवसायासाठी आलो आहोत, पैसा कमवत आहोत, त्यामुळे त्यासाठी आपल्याला बाकीच्या कठीण परिस्थितीचा सामना करावा लागला तरी हरकत नाही अशी स्वतःची समजूत घालता आली पाहिजे.

६> परदेशात आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टीत स्थैर्य निर्माण होते. कमी वाहतूक, प्रदूषण, जीवनावश्यक गोष्टींची मुबलकता आणि चांगला दर्जा! कमी तणावाचे मुलाचं शालेय शिक्षण, चांगल्या दर्जाच्या घर गाड्या आणि सुरक्षितता! ह्या सर्व घटकांमुळे परदेशात गेलेली मंडळी तिथल्या राहणीमानाच्या प्रेमात पडतात. जसजसा काळ पुढे जातो तसतसं त्यांना परत गेल्यावर सामना कराव्या लागणाऱ्या प्रतिकूल परिस्थितीच अधिकाधिक दडपण येऊ लागतं आणि त्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्यांची क्षमता कमी होत जाते. त्याच बरोबर मुलं जन्मापासून तिथंच वाढली असल्याने त्यांच्यासाठी भारतात परत येणे हा मोठा निर्णय ठरू शकतो. कारण त्यांनाही मोठी जुळवणूक करावी लागणार असते.

७> काहीजण मुलं १४ - १५ वर्षांची झाली की परत येतात. कारण परदेशात बॉय फ्रेंड - गर्ल फ्रेंड ह्यांचं प्रस्थ मोठं असतं आणि आपल्या मुलांच्या बाबतीत असले प्रकार घडू नयेत अशी ह्या पालकांची आशा असते. हल्ली भारतात सुद्धा हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरु झाल्याने ह्या घटकाचा  निर्णय घेण्यातील वाटा काहीसा कमी झाल्याचं आढळून येत.

८> म्हातारपण परदेशात घालवू शकण्याची मानसिक तयारी!  कमीत कमी म्हातारपणी तरी आपल्या मित्र नातेवाईकांसोबत काल व्यतीत करता यावा अशी काही जणांची अपेक्षा असते. परंतु त्याच वेळी मुलांच्या संसारात त्यांची किती भावनिक गुंतवणूक आहे हा एक महत्वाचा निर्णय बनतो.

९> काही माणसं दीर्घकालीन परदेश वास्तव्यानंतर बदलून जातात. त्यांचा मूळ गाभा, आत्मा बदलून जातो. त्यांची मायदेशाशी असलेली नाळ तुटते. अशी माणसं कधीच मग मायदेशी परत येत नाहीत.

१०> आता शेवटचा पण काहीसा वादास्पद मुद्दा! मी माझा देश चांगला बनविण्यासाठी काही हातभार लावणार का? मध्यंतरी मी एक लेख वाचला होता, बहुदा लोकसत्तेच्या चतुरंग मध्ये. त्यात लेखिकेचा मुलगा अमेरिकेत होता आणि तिने आपल्या देशातील सर्वोत्तम बुद्धिमत्तेची तरुण माणसं अमेरिकेत जातात असं म्हटलं होतं. त्यासाठी तिनं क्रीम असा शब्दप्रयोग केला होता. जरी थेट म्हटलं नसलं तरी इथे स्वदेशात राहिलेली लोक त्या प्रतिभेची नाहीत असंच सुचित होत होतं. मला ते लागलं, खूप लागलं. दुसऱ्याने बनविलेल्या अनुकूल परिस्थितीत जाऊन चांगली कामगिरी करण्याची शक्यता नक्कीच जास्त असते. पण कधीतरी कोठेतरी पूर्णपणे स्वाभिमानाने / स्वातंत्र्याने जगता येत नाही ह्याची खंत वाटतेच. आणि हल्लीच्या स्थितीत ठरवून भारतात राहिलेली बुद्धिमान मुलं आहेतच की! बदल आपसूक घडत नाही त्यासाठी आपला स्वतःचा देखील हातभार आवश्यक असतो. जर अधिकाधिक बुद्धिमान मुलं भारतात राहायला सुरवात झाली तर मग परिस्थिती बदलणार नाही का? हो त्यासाठी थोडे कष्ट तर घ्यावे लागतील. चकचकीत घरात राहायला सर्वांनाच आवडतं, पण ते दुसऱ्याने बनविलेलं आयतं हवं कि आपलं जुनं घर चकचकीत बनवायचा प्रयत्न करायचा? आपलं जुनं घर दुसऱ्याच्या घराइतक कदाचित कधी सुंदर होणार नाही किंवा आपल्या जिवंतपणी ते सुंदर झालंही नसेल पण आपल्या इथल्या वास्तव्याने इथल्या परिस्थितीत एक सहस्त्रांश जरी फरक पडला तरी धन्य वाटून घ्यायला काय हरकत आहे?


वरील मुद्दे माझ्या नजरेसमोरील! अजून अनेक असणारच आणि त्यांची क्लिष्टता पातळी सुद्धा अधिक असणार!
सारांश इतकाच - निर्णयात फक्त राहायचं की परत जायचं असे दोनच पर्याय असले तरी घेतल्या जाणाऱ्या त्या निर्णयामागची घालमेल मात्र ज्याची त्यालाच कळते!!

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

दिवाळीचे दिवस!






दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑफिसात परतताना कसा कंटाळा येतो. इतकी वर्षे झाली, इतके मोठे झालो तरी मुक्त वातावरणातून बंधनात शिरताना कंटाळा येतोच. एका अर्थी चांगलं लक्षण आहे ते! अजूनही मन पूर्ण यांत्रिकरित्या वागू न लागल्याचं लक्षण! वसईतील दिवाळी अतिउत्तम! पण खरं म्हटलं तर नोव्हेंबरातील दिवाळीची मजा ऑक्टोबरमधल्या दिवाळीला नाही. नोव्हेंबरात थंडी कशी मस्त पडते! असो आपलं पंचांग खूपच जुनं आहे आणि त्यामुळे त्यात बदल करणं वगैरे शक्य नाही.
दिवाळीच्या एक आठवडा आधी अंगणात कणगा काढण्याची पद्धत आहे. पूर्वी तो चुलीच्या राखेने काढत. हल्ली चुली कोणी वापरत नाही, मग रांगोळीनेच काढावा लागतो. लहानपणी हा कणगा काढला की खूप मजा यायची, दिवाळीच्या आगमनाची सूचना मिळायची. बहुदा सहामाही परीक्षा आटोपलेल्या असायच्या. आणि मुलं हुंडारायला मोकळी व्हायची. आई आणि महिलावर्गाची फराळाची धांदल सुरु असायची. मुलांना दुसरा काही उद्योग नसल्याने अंगणात सुई आणि चतुर पकडण्यात त्यांचा वेळ जायचा.
ह्या दिवाळीत सुद्धा काहीसं असंच वातावरण पाहायला मिळालं. सुरवंटानी कहर केला होता. अंगणात तर एका वेळी चार पाच सुरवंट दिसत होती. ही बिचारी अगदी सूक्ष्म दोरीने खाली उतरतात. मोठीआई ह्यांना खूप घाबरते. आणि दिसली रे दिसली की निष्ठुरपणे त्यांना चिरडून ठार करते.  दिवाळीतील एका सकाळी लवकर उठल्यावर वाडीत काढलेलं सुरवंटाच हे एक छायाचित्र!



बाकी ही सुरवंट फुलपाखरात रुपांतरीत झाल्यावर सुरेख दिसतात.

धनत्रयोदशीला मोठ्या श्रद्धेने कपाटांची पूजा केली जाते. खरी दिवाळी सुरु होते ती नरकचतुर्दशीला. आमच्या घरातील वातावरण तसं कडक! पूर्वी फार कडक तर आता त्या कडकपणाच्या काही खुणा शिल्लक राहिलेल्या! नरकचतुर्दशीला सर्वांना पाचच्या आसपास उठवत! एकत्र कुटुंबात मग अंघोळीसाठी नंबर लावायची धावपळ उडे! मी तितक्यात आकाशात चतुर्दशीचा चंद्र कोठे दिसतो काय हे पटकन पाहून येत असे! उटणं, तेल वगैरे लावून मग अभ्यंगस्नान पार पडे. आंघोळीच्या वेळी चिराटे पायाखाली फोडून आम्ही आनंद व्यक्त करू. हे चिराटे कधी कधी पहिल्या फटक्यात फुटत नसे. ते फुटल्यावर मनात होणारा आनंद बोंब मारून व्यक्त करण्याची अनिवार इच्छा होई.  चिराटे फुटायच्या वेळी "नरकासूर को मार दिया!" अशा काहीशा अरसिक ओळींचा मग जन्म झाला. सोहम बिचारा लहानपणापासून ह्या ओळी माझ्या तोंडून ऐकत आल्याने बहुदा हा ही दिवाळी परंपरेचा भाग आहे अशी त्याची समजूत असावी असा मला दाट संशय आहे. उटण्यानंतर साबण लावावा कि नाही हे मला पडलेलं तेव्हापासूनच कोडं! मग सर्व मंडळींच्या आंघोळी आटपेस्तोवर मोकळा वेळ असे. मग मी आणि बंधू (मोठा भाऊ) जाऊन ड्युकच्या चेंडूने क्रिकेट खेळत. केव्हातरी मग फराळासाठी आम्हांला खाली बोलावलं जाई. सर्वजण एकत्र असताना फराळ ही एकत्र बनवला जाई. त्यामुळे फराळाच्या प्लेटची गर्दी नसे. नंतर मग सर्वांच्या वेगवेगळ्या प्लेटा येऊ लागल्या. काळ बदलत गेला तसे मग बाहेरील मिठाईच्या बॉक्सने सुद्धा शिरकाव केला. फराळ झाल्यावर बाकी काही काम नसे. बुधवार, शुक्रवार अथवा रविवार असला तर वसईच्या परंपरेनुसार पावले होळीच्या मासळीमार्केट कडे वळत. "दिवाळीच्या सुद्धा!" हा सोहमने ह्या वर्षी विचारलेला प्रश्न मी फारसा मनावर घेतला नाही. वसईकरांची परंपरा काही वेगळीच!

काही दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकत्रच येई.  त्यामुळे दुपारनंतर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु होई. धाकटे काका दाजी ह्यांच्याकडे बरीच वर्षे लक्ष्मीपूजनाची जबाबदारी होती. दुपारी चार वाजल्यापासून सर्वजण तयारीला लागत. घरी बरीच जुनी नाणी आहेत. काही एकोणिसाव्या शतकातील सुद्धा. ती ह्या दिवशी घासून चकचकीत केली जात. पारनाक्यावर जाऊन बत्तासे वगैरे आणले जात. हॉलमधील सर्व फर्निचरची फेरमांडणी करून पूजेसाठी व्यवस्थित जागा केली जात असे. मग नवीन सतरंजी आणि लोड ह्यांच्या मदतीने लक्ष्मीपूजनाची मांडणी केली जाई. दाजी अगदी शास्त्रोक्त पद्धती चांगली तास दोन तासभर पूजा करीत. मोठे काका अण्णा मात्र इतका वेळ पूजा चालल्याने बेचैन होत. मध्येच आम्हांला फटाका फोड असे नजरेने खुणवत. पण आम्ही तशी आज्ञाधारक पोरे असल्याने कोणत्या दिवशी कोणाचे ऐकायचे हे आम्हांला चांगले माहित होते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरभर पणत्या लावल्या जात. आजी ९९ साली गेली. त्याआधी तिच्या चारही सुना एकत्र ह्या दिवेलावणीचे काम करत. मागच्या वाडीत, उंबराच्या झाडाखाली, ब्रह्म्याला  (आमच्या घराच्या मागे असणारं नारळाचे झाड - जे आमच्या पूर्ण कुटुंबांच श्रद्धास्थान आहे) दिवा लावला गेला आहे की नाही ह्याची ती जातीने तपासणी करत असे. सर्वांना अत्तर वगैरे लावलं जाई. मी लहान असताना नवीन कपडे घालून हॉलमधील मंडळीसमोर आल्यावर कोणीतरी कौतुक करेल अशी जबरदस्त आशा असे. मंडळी सुद्धा हे ओळखून असत त्यामुळं माझा प्रवेश होताच अण्णा, भाई वगैरेपैकी कोणी एक "मस्त शर्ट आहे" असे बोलत. अजूनही ही आशा मनात कोठेतरी तग धरून असते! लक्ष्मीपूजन झाल्यावर मग आम्हांला फटका वाजविण्याची सूचना केली जाई. फटाका वाजवून आल्यावर हात स्वच्छ धुवून मग बत्तासे, तीर्थप्रसाद मिळे. दाजी मग चोपड्याचे वाटप करीत.

बाकी मग गेल्या दोन तीन वर्षापूर्वी दाजींनी प्राजक्ताकडे लक्ष्मीपूजनाच्या जबाबदारीचे हस्तांतरण केले. म्हणजे आता घरात चार वेगळ्या पूजा होतात. गेल्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनाचा हा फोटो!



नंतर येते ती बलिप्रतिपदा! ह्या ही दिवशी लवकर उठायचं असतं. ह्या दिवशीची परंपरा म्हणजे भल्या पहाटे उठून संपूर्ण घराचा केर काढायचा. तो एका टोपल्यात भरायचा. मग घरातल्या एका पुरुषाने ते टोपलं, जुना झाडू, एक पणती घ्यायची, हातात काठी घ्यायची. एकदा का हे सर्व हातात घेतलं ही त्याच्या मागे घरात त्याच्या पत्नीने लाटण्याने ताटावर जोरात आवाज करत तो पुरुष घराबाहेर निघेतोवर त्याला साथ द्यायची. आमच्या घरी गेले कित्येक वर्षे दाजी - दादी ह्या भूमिका पार पाडत. बाहेर पडल्यावर त्या पुरुषाने एकही शब्द उदगारायाचा नाही की मागे वळून पाहायचं नाही. हा घरातील सर्व कचरा गावाच्या वेशीजवळ नेउन ठेवायचा. आताच्या काळात गावची  वेस म्हणजे आमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेली कचरापेटी. तिथून परत आल्यावर दाजी घराच्या गेटपाशी येऊन काठी जोरात आपटत आणि "बळी तो कान पिळी! बळीचे राज येवो!" असे जोरजोरात ओरडत. आणि मग एक फटाक्याची माळही फोडत, इतक्या सगळ्या प्रकारानंतर उरलीसुरली झोपलेली मंडळी निमुटपणे उठत. गेले दोन वर्षे आता मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. बिछान्यात झोपेत असलेला सोहम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मेंदूत नोंदत असतो. संस्कृतीचे हस्तांतरण व्हायला हवं हीच इच्छा!

सर्वांच्या आंघोळी आटोपल्या की पाडव्याच्या ओवाळण्या होतात. आई मुलांना आणि पत्नी पतीला ओवाळतात. सगळं कसं प्रसन्न प्रसन्न वाटत असतं. पूर्वी गोठ्यात गाई होत्या. त्यांना ह्या दिवशी करंजी खाऊ घालत. त्यांना बहुदा विस्तवावरून उडी मारायला लावायची पण पद्धत होती आणि त्यांच्या अंगावर लाल गेरूचे ठसे काढले जात. काहीशी ऐकीव आणि फार लहानपणी पाहिलेली ही प्रथा त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी!

वसईतील वाडवळ अर्थात पानमाळी ही आमची ज्ञाती. दिवाळीच्या दिवसात रवळी आणि तवळी  असे दोन प्रकार करण्याची ह्या ज्ञातीत प्रथा आहे. रवळीला पानमाळ्यांचा केक असेही संबोधले जात. माझ्या आई आणि वडील ह्यांच्या दोघांच्या आई वसईतील घरत कुटुंबातल्या. ह्या दोन्ही घरत कुटुंबीयांनी जुन्या प्रथा खूप टिकवून ठेवल्या आहेत. दरवर्षी ते रवळी बनवितात. त्यातील एका घरची विनम्रने खास आणून दिली. अति स्वादिष्ट होती ती! आणि दुसऱ्या घरची  मानसने फेसबुकवर टाकली. त्या रवळीचा हा फोटो!

बाकी घरची काकी अजूनही तवळी बनविते. हा केळीच्या पानात काकडी वगैरे टाकून केला जाणारा पदार्थ. ह्याची सुद्धा खास एक चव असते. ह्या वर्षी पुन्हा मंडळी फराळाला एकत्र आली. हल्ली सतत गोड खाण्याची क्षमता कमी झाल्याने बटाटवडे सुद्धा आणण्यात आले. अनारसं सुद्धा बनविण्यात आली होती. अनारसं हा सुद्धा बनविण्यास एक कठीण प्रकार, पण जर जमला तर मस्त लागतो!

पुन्हा एकदा मोकळी सकाळ त्यामुळे वाडीत जाऊन छायाचित्रण केलं.



ऑक्टोबर महिन्यात आलेला आंबामोहोर टिपला. किती दिवस टिकतो ते पाहायचं!





नारळावर बसलेली पोपटांची जोडी!



शेवटचा दिवस भाऊबीजेचा! पूर्वी तीन पिढ्यांची भाऊबीज व्हायची. वडील आणि तीन काका असे मिळून चार भाऊ आणि तीन आत्या. ताई वसईत, जिजी मालाडला तर बेन दहिसर. बेन चिंचणीची भाऊबीज आटपून येत. आई आणि काकू मंडळींची सुद्धा भाऊबीज दिवसा आटपे. दोघी जणी माहेरी जाऊन येत तर दोघींचे भाऊ घरी येत. सायंकाळ होऊ लागे तसे सर्वजण घरी जमू लागत. चुलीवरच्या कोंबडी (पूर्वी चिकनला कोंबडी म्हणत आणि बहुदा ती गावठी असे!) आणि मटणाच्या वासाने मंडळी सुखावत. सोबतील वडेही तळले जात असत. जेवण आटोपली की मग तीन पिढ्यांची भाऊबीज सुरु होई. ह्यात बहिण भावांची अनेक कॉम्बिनेशन्स होत. आणि मजेदार गप्पांना ऊत येई. अगदी भराच्या काळात पन्नासेक मंडळी घरी जमत.  दहानंतर मुंबईकर मंडळी परतायची तयारी करू लागत. त्याहून आधीच्या काळात ते मुक्कामाला राहायचे सुद्धा. अकरा वाजले की मग कडक आजी झोपण्याची सोय काय आहे ह्याची चौकशी चालू करे. हॉलमध्येच बिछाने घातले जात. बच्चेमंडळी फारच उदास झालेली दिसली की मोठी मंडळी अजून देव दिवाळी (तुळशीचं लग्न) आहे असे सांगून त्यांची समजूत घालत. आता ही सर्व मजा हळूहळू कमी होत चालली. मागच्या काही भाऊबीजेतील हे फोटो!!
 









असे हे दिवाळीचे दिवस!! परंपरांचे आणि नव्याने अविस्मरणीय क्षणांचा ठेवा देणारे! परंपरा जमतील तितक्या पुढे न्यायच्या बाकीच्या जतन करायच्या - काही अशा लिखाणातून तर काही मनाच्या एका कोपर्यात!



















शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

वन नाईट @ द कॉल सेंटर - चेतन भगत



 
मागे चेन्नई एक्प्रेसच्या पहिल्या दिवशीच्या शोला वसईत आगाऊ (म्हणजे ऍडवान्स) बुकिंग न करता आम्ही गेलो होतो आणि त्यावेळी शेवटची का होईना पण तिकिटे मिळाली होती. त्या आठवणीच्या जोरावर काल Happy New Year पाहण्यासाठी ऐन वेळी गेलो पण तिकिटे मिळाली नाहीत. आता मॉलमध्ये आलोच आहोत तर भटकुयात म्हणताना पावलं पुस्तकाच्या दुकानाच्या दिशेने वळली. 
मी सद्यकाळात बऱ्याच जुन्या गोष्टींचा घोष करत असतो असं मला जाणवतं. त्याला अनुसरून कालही मी आधी जुन्या पुस्तकांकडे वळलो. पण अचानक मग नवीन पुस्तकांचा विभाग सुरु झाला आणि मग चेतन भगतची काही पुस्तके दृष्टीस पडली. माझी पुतणी चेतन भगतची मोठी चाहती. तिच्याकडून चेतन भगतविषयीच्या माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे. चेतन भगत हा नवीन पिढीचा लाडका लेखक! त्यामुळे त्याच्या पुस्तकाद्वारे नवीन पिढीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहता येईल ह्या विचाराने दोन पुस्तकं विकत घेतली. त्यातलं पहिलं म्हणजे ह्या ब्लॉगपोस्टचे शीर्षक! अजून एक गोष्ट, मी ह्या पुस्तकाचं सुप्रिया वकील ह्यांनी केलेल्या मराठी अनुवादरूप विकत घेतलं. माझं काही खरं नाही मंडळी - गडी अमेरिकन कंपनीत इंग्रजीत दैनंदिन व्यवहार करतो पण त्याला त्या व्यवहारापलीकडे इंग्रजी झेपत नाही!
चेतन भगतच्या पुस्तकांची नावं सुद्धा अगदी खास असतात. अगदी तो IIT मधून शिकल्याचं द्योतक असणारी. आता ही सुद्धा (म्हणजे पुस्तकाची अथवा त्यावर आधारित सिनेमाची नावं) ऐकीव माहितीवर आधारित असल्याने चूकभूल दद्यावी घ्यावी! Three Idiot, Two States, One Night @ the Call Center आणि आता Half Girlfriend!! बहुदा गडी बटाटा पाव किलो, १०० ग्राम अर्थात १ तोळा सोने अशी पुस्तकाची नावे पुढच्या काळात निवडेल की काय असा संशय माझ्या मनात निर्माण झाला आहे.
पुस्तक आहे चांगलं. पण शाळा ह्या पुस्तकानं जसं खिळून ठेवलं तशी जाणीव मात्र निर्माण नाही झाली. कॉल सेंटर मध्ये काम करणारा सहा जणांचा एक ग्रुप. त्यांच्या कार्यालयातील जीवनातील रेखाटलेली एक रात्र. ह्या रात्रीत  अशा काही घटना घडत जातात की त्या सर्वांचं वैयक्तिक जीवन आपल्यासमोर येत. ह्या सहा जणांत दोघांचं आधी जमलेलं प्रकरण सध्या मोडलेलं आहे, अजून दोघं अशी आहेत की मुलाला त्या मुलीत रस आहे पण तिला मात्र मॉडेलिंगमध्ये रस आहे. पाचवी आहे ती विवाहित आहे आणि ज्याच्याशी प्रेमविवाह केला त्याच्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. सहावे वयस्क गृहस्थ आपल्या दूर राहणाऱ्या मुलाच्या संसाराशी संपर्क ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आणि ह्या सर्वांचा एक अकार्यक्षम असा बॉस आहे जो अनेक छलकपट करून आपली अमेरिकेतील ऑफिसात वर्णी लावायचा प्रयत्न करीत आहे. आणि हो हे कॉल सेंटर व्यवस्थित न चालल्याने ह्या सर्वांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. ह्या  सर्व कथानकाला अगदी शेवटी एक कलाटणी मिळते आणि मग …
असो आता पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा हेतू हा नवीन पिढीची मानसिकता समजावून घेण्याचा असल्याने त्यासंदर्भातील काही भाष्यं!
१> कॉल सेंटर मधील काम करणाऱ्या लोकांना अनुभवावा लागणारा मानसिक संघर्ष! पुस्तकातील प्रत्येक पात्राला स्वतःच्या खऱ्या नावाबरोबर एक अमेरिकन नावसुद्धा आहे. अमेरिकन ग्राहकांशी बोलताना त्या ग्राहकांना आपलेपणा वाटावा म्हणून देण्यात आलेलं! आपल्या स्वत्वचा महत्वपूर्ण भाग असलेलं नावच जर आपल्याला लपवावं लागत असल्यानं जाणवणारी अस्पष्टशी खंत पुस्तकात अदृश्यपणे जाणवत राहते. एका कॉलमध्ये एक ग्राहक फोनवरील माणूस हाअमेरिकन नसून भारतीय असल्याचं ओळखतो आणि त्याच्याशी अपमानास्पद भाषेत बोलतो. व्रुमला हा अपमान सहन न झाल्याने त्याचा तोल जातो.
२> कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या बऱ्याचजणांची सिगारेट, मद्य ह्यावर अवलंबून असण्याची अगतिकता ह्या पुस्तकात जागोजागी आढळून येते.मी सुद्धा हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. नैतिकतेच्या घसरणीची अजून काही उदाहरणे मग वाचनात येतात. ते सुद्धा बहुदा खरंच असावं.
३> ह्या ग्रुपमधील जे होऊ घातलेलं प्रेमप्रकरण आहे त्यात मुलगा हा फारसा स्थिरावलेला नाही. कॉल सेंटर मधील त्याची नोकरी तिच्या घरच्यांना फारशी पसंत नाही. तिची आई सतत तिला त्यावरून बोलत राहते. एका क्षणी मग तीही त्याच प्रकारे विचार करू लागते. आणि अमेरिकेत स्थिरावलेल्या एका तरुणाशी लग्नाला तयार होते. हा एक महत्वाचा मुद्दा हल्लीच्या युगात दिसून येतो. मुलींच्या मनात चांगल्या प्रकारे सेटल होण्याची खूप इच्छा असते आणि म्हटलं तर सामाजिक दबाबही असतो. त्यामुळे एक तर स्वतःचे करियर व्यवस्थितपणे करावे किंवा कोण्या व्यवस्थित प्रकारे सेटल झालेल्या माणसाशी लग्न करावे ह्यांचा त्यांच्यावर खूप दबाव पडताना दिसतो. ह्यामुळे बऱ्याचदा लग्न उशिरा करताना किंवा मनाविरुद्ध लग्न करताना दिसतात. अगदी लेखकाच्या भाषेत म्हणायचं झालं तर - "पोरी धोरणी असतात. त्या प्रेम प्रणय वगैरे सगळी फालतू बडबड करतील.. पण ठरविण्याची वेळ आली की सगळ्यांत बडी असामी निवडतील, फैटेस्ट चिकन!"
ह्या उलट अजूनही गावाकडे अगदी साधी माणसं अगदी स्थिरस्थावर न झालेल्या तरुण माणसांशी लग्न करतात. बऱ्याचदा अशी जोडपी आयुष्यभर कदाचित स्थिर होतही नसतील पण आयुष्यात आनंदी राहतात.
४> ३५-१० चा एक नियम मधूनच वाचायला मिळतो. बऱ्याच वेळा ३५ वर्षाच्या ग्राहकाचा मेंदू आणि बुद्ध्यांक १० वर्षाच्या भारतीय मेंदूसारखा असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना संयम ठेवावा लागतो. ही काहीशी अतिशोयक्ति वाचावयास मिळाली.
५> ह्या सर्वांचा बॉस लबाड आहे. टीममधील सदस्य कोणताही प्रश्न घेऊन त्याच्याकडे आला की व्यवस्थापनाचं एखादं मोठालं तत्व त्याचा संबंध असो कि नसो त्या सदस्याला सांगून त्याची / तिची बोळवण करायची असा त्याचा हातखंडा. MBA वगैरे केलेल्या बोलबच्चन मंडळींचा व्यावसायिक क्षेत्रात असा अनुभव बऱ्याच वेळ असल्याने सतत 'बिग पिक्चर', 'स्ट्रेटेजिक वेरिएबल' वगैरे संज्ञा सतत वापरणाऱ्या आपण ह्या बॉसच्या कॅरक्टरशी बऱ्यापैकी रिलेट होऊ शकतो.  बाकी द्विमितीवर आधारित चार प्रकारचे बॉस आहेत. (अ) ते किती हुशार वा मूर्ख आहेत (ब) ते चांगले कि दुष्ट आहेत. हे मस्तच वर्गीकरण.
६> शेवटी ह्या पुस्तकातील लक्षात राहिलेली काही वाक्ये
  • प्रेमविवाह केलेल्या आपल्या नवऱ्याच्या आईविषयी आणि एकंदरीत घरातील जुन्या वळणाविषयी बोलताना राधिका म्हणते - "माझं अनुजवर प्रेम आहे आणि त्यानं मला सांगितलंय, की हे माझ्यासोबत आलेलं पॅकेज आहे." - ह्यात नवीन पिढीची फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीशी माणूस म्हणून जुळवून घ्यायची मनोधारणा दिसते. बाकी त्याचे / तिचे सर्व नातेवाईक, घर वगैरे प्रकार पॅकेज म्हणून गणला जाण्याची प्रवृत्ती जास्त!
  • "तू काहीच बोलणार नाहीस?" प्रियांकाने विचारलं. - मुली ज्यावेळी असा प्रश्न विचारतात त्यावेळी खरं तर हा प्रश्न नसतोच. त्यांना तुम्ही काहीतरी बोलायला हवं असतं.
  • बायकांना जखमांची मलमपट्टी करायला फार आवडतं … त्या जखमा फार मोठ्या स्वरूपाच्या नसतात तेव्हा!
  • "कधी चुकूनसुद्धा मला आनंद देवू नकोस," प्रियांकाची आई म्हणाली!
  • कोणत्याही भांडणात जो आधी रडू लागतो त्याला फायदा मिळतो. - लोकांच्या नाटकीय स्वभावा विषयी हे एक मस्त वाक्य!
लेखकानं केवळ योगायोग म्हणून निवडलं की काय ते माहित नाही पण ह्या सहा ही जणांची  वैयक्तिक आयुष्य बऱ्यापैकी अस्थिर! सुखाच्या मृगजळा मागे धावणारी. लेखकाला म्हणायचं नसेल कदाचित, पण माझं मत मात्र असंच की प्रगतीच्या मागे धावून आपण मिळवलं काय? काही लोकांना अशा खूप स्पर्धात्मक जगात यश अगदी निर्विवादपणे  मिळू शकतं, पण बाकीचे सर्वजण तर बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मगच ह्या दुनियेत येऊ शकतात. प्रश्न असा आहे कि ह्या प्रगतीचं किती मोल आपण वैयक्तिक आयुष्यात द्यायचं ? ह्या दुनियेत साधेपणाने जगण्यासारख्या नोकऱ्या राहिल्याच नाहीत काय? का माझ्यासारख्या लोकांच्या  नजरा तिथवर पोहोचतच नाहीत?

 बाकी पुस्तक मग एका दिवसात वाचून संपलं. तसं शाळाही एका दिवसातच संपलं होतं. दोघातला फरक काय असा विचार करू लागलो. हे पुस्तक एखाद्या मॅकडोनाल्डच्या बर्गरसारखं अथवा पिझ्झा हटच्या पिझ्झासारखं वाटलं; शाळा मात्र भरपेट घरगुती जेवणासारखं वाटलं. जुन्या सवयी सहजासहजी जात नाही हेच खरं!

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

शाळा - मिलिंद बोकील



 
बरेच दिवस नवीन पुस्तक वाचन झालं नव्हतं.  एक शालेय मित्र अधूनमधून नवीन  पुस्तकांची शिफारस करत असतो. परंतु कामाच्या बोज्याचा बहाणा करून ही पुस्तकं वाचायची राहून जातात. पण गेला शनिवार चांगला उजाडला. दिवाळीच्या निमित्ताने  हल्ली जी काही अनेक ट्रेड फेयर निघतात त्यातील एकात आपण जाऊयात अशी फर्मानवजा विनंती करण्यात आली. आता शनिवारी सायंकाळी अशी विनंती नाकारण्याचे दुष्परिणाम अनुभवाने माहित झाल्याने मी निमुटपणे निघालो.  आणि हे प्रदर्शन आमच्या समाजाच्या सभागृहात असल्याने आपल्या ज्ञातीतील ओळखींची उजळणी होण्यास मदत होते हा एक साईड बेनिफिट!!
सर्वत्र महिलावर्गाच्या कपड्यांचे, पर्सचे, रंगीबेरंगी पणत्यांचे वगैरे ठेले लागले होते. मध्येच मसाल्याचा, आवळासुपारीचा सुद्धा ठेला लागला. त्यात खरेदी करताना विविध प्रकारच्या सुपारींचा आनंद मी घेतला. अशा वेळी केवळ फुकट स्वाद घेऊ नये ह्या न्यायाने आम्ही तीन चार प्रकारची सुपारी खरेदी केली. अचानक तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पुस्तकांच्या ठेल्याकडे माझे लक्ष वेधले गेले.  मग मी पुढील तासभर त्याच स्टॉलवर होतो. बराच वेळ मी जीए आणि रत्नाकर मतकरी ह्यांच्या विविध कथासंग्रहात डोकावण्यात वेळ व्यतीत केला. ह्या दोन्ही लेखकांची पुस्तके म्हटली म्हणजे दर्जाविषयी तर शंकाच नाही. पण मला नक्की कोणतं पुस्तक / पुस्तके घ्यावीत ह्याचा निर्णय करता येत नव्हता. अचानक माझं लक्ष मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा ह्या पुस्तकाकडे गेलं. ह्या पुस्तकाची काही पान चाळली आणि लगेचच निर्णय झाला की हे पुस्तक घ्यायचच!
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी परतलो आणि पुस्तक पहिल्या पानापासून वाचायला घेतलं. ह्या पुस्तकाच वातावरण आणीबाणीच्या काळातील एका गावातलं! कथानक फिरतं ते लेखक आणि त्याच्या मित्रमंडळी भोवती.  ही सर्व मंडळी नववीत शिकणारी. वयानुसार ह्यांच्या मनात नव्यानेच प्रेमभावना निर्माण झाल्या आहेत. प्रत्येकाला एकेक प्रेमपात्र आहे. ह्यातील काहीजण हे मनातल्या मनात ठेवून आहेत तर काहीजणांमध्ये ही प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करण्याचं धारिष्ट्य आहे. वयानुसार शिक्षकांची खोडीसुद्धा ही मंडळी काढतात. वर्गात अभ्यासू मुलं जशी आहेत तशी केवळ टवाळक्या करणारी सुद्धा आहेत. चिवचिव करणाऱ्या मुली आहेत.
त्या काळाच्या प्रथेनुसार मुलामुलींनी एकमेकांशी बोलायचं नाही ही पद्धत! पण जर एखादी मुलगी आपल्या भागात राहत असेल किंवा तिच्या आईची आणि एखाद्या मुलाच्या आईची ओळख असेल तर मात्र शाळेबाहेर अशा मुली मुलांशी बोलत! लेखकाला प्रथमच हे जेव्हा कळत तेव्हा त्याला अशा मुलांचा खूप खूप हेवा वाटतो. त्याचा एक मित्र आहे फावड्या. आता त्याचे दोन दात पुढे आले म्हणून त्याचं नाव फावड्या! पूर्वीची ही टोपणनाव ठेवण्याची पद्धत अगदी उदाहरणानुसार लेखकाने मस्त टिपली आहे. ह्या फावड्याकडे वर्गातील मुली भाजी घ्यायला आल्या की अगदी मोकळेपणाने त्याच्याशी बोलत. तेव्हा त्याच्याविषयी वाटणारा हेवा लेखक त्याला बोलून दाखवतो तेव्हा आपल्याच वर्गातील मुलींसमोर भाजी विकतानाचा वाटणारा अपमान फावड्या त्याला बोलून दाखवतो. शाळेत काही स्थिरस्थावर झालेली प्रेमप्रकरण आहेत. त्यातील मुलीने कधी मुलांची चुगली केल्यास मुले तिला इंगा दाखविण्यासाठी मराठी व्याकरणाच्या तासाला कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगात तिच्या प्रेमपात्राचा वापर करून तिला कसे हैराण करतात हे खासच! लेखकाची मोठीबहिण खाष्ट असल्याने तिचं नाव अंबाबाई! तिच्या मैत्रिणी गावभर पसरल्याने लेखकाच्या कारवायांवर सतत तिच्या मैत्रिणींच्या हेरगिरीची दहशत!
लेखकाचा मामा नरूमामा! त्याच लग्न जमवायच्या खटपटीत असलेली लेखकाची आई! हा नरूमामा म्हणजे लेखकाचा मार्गदर्शक! लेखकाच्या मनातलं एक शिरोडकर नावाचं प्रेमपात्र! मामाला हे थेट सांगायची भीती वाटत असल्याने आपलीच गोष्ट लेखक मामाला आपल्या मित्राच्या म्हणजे मनोज देसाईच्या कहाणीच्या रुपात सांगतो. मी हे तीनशे पानाचं पुस्तक तसं तीन साडेतीन तासात वाचून काढलं. त्यामुळे काही भाग घाईघाईत वाचून काढला हे खरं असलं तरी लेखकाने शिरोडकरच्या पहिल्या नावाचा मात्र शेवटपर्यंत उल्लेख केला नाही. ही गोष्ट सुद्धा खासच!
लेखकाचे खास मित्र म्हणजे सुऱ्या, फावड्या, चित्रे. सुऱ्याच्या वडिलांनी एक इमारत बांधायला घेतली होती.  त्याचं बांधकाम सुरु असल्याने तिथे अभ्यासाच्या बहाण्याने ही मंडळी शाळेआधी तिथे एकत्र जमत आणि मग शाळेत येणाऱ्या मुलींना चिडवण्याचे उद्योग करीत. लेखक मात्र शिरोडकरच्या बाबतीत काहीसा लाजरा असल्याने ती येताना दिसली की तो अगदी चुपचाप होत असे. ह्या सर्वातील सुऱ्या म्हणजे एक गावरान माणूस. तोंडात शिव्यांचा मुक्त वापर आणि मनातील सर्व भावना अगदी मुक्तपणे बोलून दाखवणार! पौगंडावस्थेत नुकत्याच प्रवेश करत असल्याने त्या अनुषंगाने येणारे विषय सुद्धा लेखकाने गरज पडल्यास सांकेतिक शब्दांचा वापर करीत संयमितपणे हाताळले आहेत. सुऱ्याच्या अशा व्यक्तिमत्वामुळे आपलं शिरोडकर प्रकरण त्याच्यापासून लपवायचा लेखकाचा कल!
वर्गात जमेल तेव्हा लेखक शिरोडकरकडे पाहायचा. कोणाला संशय न येता पाहण्याच्या तंत्राला सुममध्ये असा शब्दप्रयोग लेखक करतो. तत्कालिन मुली हसताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवत. लेखक अगदी पारंपारिक विचाराचा. त्यामुळे शिरोडकर वर्गात जास्त पुढे पुढे करत नाही हे त्याला भावतं. सुरुवातीच्या काळात शिरोडकर कोठे राहते हे माहित नव्हतं. ती साधारणतः साठेवाडीच्या बाजूला राहत असावी अशी माहिती मिळाल्यावर त्याच्या अचानकपणे ध्यानात येतं की वर्गातील मिसाळसुद्धा त्याच बाजूला राहतो. मग लेखक काहीतरी बहाणा करून त्याच्या घरी जातो. मिसाळ हा अजागळ असल्याने त्याला आपला संशय येणार नाही असा लेखकाला विश्वास वाटत असतो. मध्येच एकदा नरूमामा लेखकाकडे येऊन जातो तेव्हा मनोज देसाईने त्या मुलीच्या मनात भरलं पाहिजे मगच ती मुलगी त्याला लाईन देऊ लागेल असा सल्ला देतो. त्यामुळे लेखक वर्गात मस्ती करणे वगैरे प्रकार करून पाहतो. त्यानंतर अचानक त्याला शिरोडकर शिकवणीला जात असल्याचं कळत. नाहीतरी अंबाबाई त्याच्या मागे शिकवणीसाठी लागलेलीच असते. त्यामुळे तो मग त्या शिकवणीला त्याच बॅचला जातो. नंतर कधी तिच्या घरच्या रस्त्यावर उभा राहतो. मग ती हळूहळू लेखकाशी बोलू लागते. लेखक बुद्धिबळात खास असतो. बुद्धिबळाची शालेय स्पर्धा तो जिंकून दाखवतो. लेखक आणि शिरोडकर स्काऊट आणि गर्ल्स गाईडच्या एकत्र शिबिरात जातात. तेव्हा शिरोडकर त्याला चॉकलेट सुद्धा देते. लेखकाकडे जुन्या हिंदी चित्रपटांच्या नावाचं एक पुस्तक असते त्याचा वापर करून तो मुलांना नेहमी चित्रपटाच्या नावांच्या भेंडीची स्पर्धा जिंकून देत असे. पण ह्यात शिरोडकर नेहमीच प्रभावित होणार नाही हे ही त्याला जाणवतं. मग मध्येच एकदा तो शिरोडकरला जिंकून देतो. हे प्रकरण असं प्रगती करत असताना पुढे काय असा लेखक शिरोडकरला प्रश्न विचारतो. "पुढे काय ते माहित नाही!" ती उत्तरते.
बाकी लेखक मग शाळेतील वक्तृत्वस्पर्धा, क्रिकेट सामने अशा प्रसंगांच्या वेळी मुलांनी केलेल्या गडबडीचे मस्त वर्णन करतो. अगदी मनापासून हसायला येतं. अचानक मग सुऱ्या त्याच्या प्रेमपात्राशी बोलायला जातो. आणि मग तिथं सारे काही फिस्कटून जाते. तिचे वडील मुख्याध्यापकांकडे जातात. सुऱ्यासोबत असणारा लेखकही त्यात गोवला जातो. ह्या सगळ्या प्रकरणात शिरोडकर दुखावली जाते. पुस्तकाचा शेवट मी काही इथे सांगणार नाही.
पुस्तक मला जबरदस्त आवडलं. संगणक, इंटरनेट वगैरेने शालेय जीवनावर जबरदस्त प्रभाव करण्याआधी बराच काळ मराठी माध्यमांच्या शाळेत जे काही वातावरण होते ते अगदी समर्थपणे लेखकाने आपल्या लेखणीतून साकार केलं आहे. हे वातावरण जवळजवळ सर्वच मराठी शाळांत आढळून येत असे आणि मुलामुलींचं जे एक विशिष्ट वागणं होत ते अगदी सुंदररीत्या लेखकाने शब्दांत पकडलं आहे.
आपल्या शालेय काळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने विकत घेऊन वाचण्याजोगं पुस्तक!













रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - १०



 
गावाला तातडीने पोहोचताना इवाची तशी धावपळच झाली. ऑफिसातून रजा टाकून मग ती काहीशा अपराधीपणानेच गावाला पोहोचली. आंद्रेईच्या आईनेच तिचं दरवाज्यात स्वागत केलं. इवाला काहीसं आश्चर्य वाटलं आणि थोडाशी निराशाही वाटली. ह्या क्षणाला तिला तिच्या आईशी फक्त एकटीनेच बोलायचं होतं. पण आता काही इलाज नव्हता. आई बिछान्यात बसली होती, उशीला टेकून. समोर स्टूलवर आंद्रेईच्या आईने करून ठेवलेल्या गरम दुधाचा ग्लास होता. इवाला बघताच आईचे डोळे एकदम आनंदाने चमकले. इवा धावतच आईच्या कुशीत शिरली. आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना तिने मोकळी वाट करून दिली. ह्या क्षणी मायलेकींना एकांतात हितगुज करून द्यावे इतकी समज आंद्रेईच्या आई, मरीनाला होती. त्यामुळे काहीतरी निमित्त काढून ती किचनमध्ये गेली.
इवा आणि आई बराच वेळ बोलत राहिल्या. आईची तब्येत इतकी अचानक कशी खालावली ह्याचेच इवाला राहून राहून आश्चर्य वाटत होते. "आमचं आता वय झालं, इवा! एकदा का तुला लग्न झालेली बघितली की कायमचे डोळे मिटायला मी मोकळी!" आई अचानक अशी भावनाविवश झालेली पाहून इवा दचकली. "अरे वा, मग नातवंडांचे कोडकौतुक कोण करणार?" आता दुःखातून आईला बाहेर काढावं ह्या हेतूने इवाने तिच्या आवडत्या विषयाकडे बोलण्याचा ओघ वळवायचा प्रयत्न केला. तिची ही मात्रा अचूक लागू पडली. आई आता खूप मोकळेपणाने बोलू लागली. "आंद्रेई आणि त्याच्या आईवडिलांनी जी मदत केली त्याचे ऋण कसे फेडावे हेच मला समजत नाही" आई म्हणाली. "विशेषकरून मी त्यांना गेल्या आठवड्यातच सांगितलं की इवाच्या मनात दुसरा कोणी तरी आहे. इतकं माहित असून सुद्धा त्यांनी खुल्या दिलाने इतकी मदत केली ही फार मोठी बाब आहे!" आईच्या ह्या बोलण्याने इवा अगदी हादरलीच. एकतर आधी हिनं आपल्याला न विचारता लग्नाचा प्रस्ताव त्यांच्याकडे टाकला आणि आता लगेचच हे सुद्धा त्यांना सांगून टाकलं. इवाच्या मनात विचारांचं वादळ सुरु झालं.
एव्हाना बराच वेळ झाला होता. मायलेकींच्या बोलण्याचा आवाज जसा मोठा झाला तसं आता आपण आत जायला हरकत नाही असं समजून मरीना आत आली. तिने दुपारच्या जेवणाची तयारी आटोपली होती. ईवा आणि आंद्रेई ह्या दोघांचे वडील शेतावर गेले होते, आंद्रेईच्या कामात मदत करायला. मदत करण्यापेक्षा मोकळ्या हवेत वेळ घालविण्याचाच त्यांचा जास्त इरादा होता असे इवाला वाटून गेले.
"इवा चल आपण तिघीजणी जेवायला बसुयात!" मरीना म्हणाली. इवाच्या पोटात तसेही कावळे ओरडतच होते. ती तात्काळ फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर जेवायला आली. मरिनाने जेवण तर सुग्रासच बनवलंच होतं आणि अगदी आकर्षकरित्या टेबलवर मांडून सुद्धा ठेवलं होतं. आई आणि मरीनाच्या गप्पा अगदी मजेत चालल्या होत्या. इवाने झटपट जेवण आटोपलं आणि ती आपल्या खोलीत जाऊन पहुडली.
इवाचे विचारचक्र सुरु झाले होते. ती आणि आंद्रेई ह्या दोघांच्या कुटुंबियांचे चांगलंच जुळलं होतं. दोघांचे वडील एकत्र भटकायला बाहेर पडत होते. मरिनाने तर इवाच्या आईची तिच्या आजारपणात अगदी सुरेख काळजी घेतली होती. आंद्रेई दिसायला बाहेरून राकट असला तरी पहिल्या भेटीत वाटला तितका वागण्याच्या बाबतीत पाषाणहृदयी नव्हता. आणि फारसा शिकलेला नसला तरी आपल्या उद्योगात मात्र पूर्णपणे स्थिरावलेला होता. "आपलं एक हे सर्जीवरचं प्रेमप्रकरण नसतं तर ह्याचा मी खरोखर स्वीकार करायला सुद्धा तयार झाले असते." इवाच्या मनात हा विचार जसा आला तशी ती दचकलीच. पहिल्यांदाच तिने सर्जीशिवाय दुसऱ्या कोणाचा जीवनसाथी म्हणून क्षणभर का होईना विचार केला होता. अपराधीपणाने तिचं मन जड झालं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून ती खोलीबाहेर निघाली. दरवाजा उघडणार तितक्यात तिला मरीना आणि आईचं हळुवार आवाजातील बोलणं ऐकू आलं. "पोरानं, खूपच मनाला लावून घेतलं. इवा त्याला खूप आवडली होती. अगदी आपल्या घरच्यासारखी आहेत ही मंडळी! मोठ्या उत्साहाने तो मला म्हणाला होता. " मरीना आईजवळ आपलं मन हलकं करीत होती. आजच्या दिवसातील इतके धक्के सहन करण्याची इवात ताकद उरली नव्हती. ती तशीच पुन्हा बिछान्यात येऊन पडली. तिला अचानक त्या हिल स्टेशनवरील वोल्गा आणि विक्टरची आठवण झाली. त्यांचं कसं अगदी म्हातारपणापर्यंत प्रेम टिकून राहिलं होतं. असंच आपल्याबाबतीत सुद्धा व्हायला पाहिजे. आपल्या म्हणजे नक्की कोणाच्या इवा - सर्जीच्या कि इवा - आंद्रेईच्या? तिच्या मनात हा प्रश्न येताच ती खूप दचकली. हे आंद्रेई प्रकरण जरी तिच्या आईने आपल्या अकलेनुसार मिटवून टाकलं असलं तरी आपल्या मनात मात्र ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे शिरकाव करून राहिलं आहे ह्याची तिला जाणीव झाली. एक केवळ प्रेम हा निकष लावला असता तर आंद्रेई सर्जीशी तुलनाच करू शकला नसता. पण जीवनसाथी म्हणून ह्या क्षणाला तो इवाच्या मनात सर्जीला तोलामोलाची टक्कर देत होता. आणि हिलस्टेशनच्या म्हाताऱ्या जोडप्याच्या रुपात आपल्याबरोबर आंद्रेईच असल्याचा भास तिला एक क्षणभर झाला. ही एक मोठी बिकट स्थिती होऊन राहिली होती आणि ती सोडवायची होती फक्त तिलाच! तिचा सखा सर्जी आपल्याच उज्ज्वल भवितव्याला मूर्त रूप देण्यात पूर्णपणे गुंतला होता.


(क्रमशः)



कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...