मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ९

 
सर्जीच्या मॉस्कोतील प्रशिक्षणाचे तीन महिने पूर्ण झाले होते. प्रशिक्षण वर्गाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना एका मीटिंगसाठी बोलावलं तेव्हा सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. अभ्यासक्रमाच्या मध्यावर एखादी महत्वाची घोषणा सर्वांना अपेक्षित होती. मुख्य अधिकाऱ्यांनी वर्गात प्रवेश केला तेव्हा एकदम शांतता पसरली. त्यांनी आतापर्यंत सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केलं. "ह्या वर्षीपासून आम्ही एक नवीन योजना सुरु करीत आहोत. ह्या वर्गातील ह्या टप्प्यावरील प्रथम तिघांना आम्ही दुसऱ्या सत्रासाठी तीन महिन्यासाठी जर्मनीला पाठवीत आहोत!" ह्या घोषणेने वर्गात अजूनच उत्सुकता पसरली. "तिसऱ्या क्रमांकावर आहे … , दुसऱ्या क्रमांकावर आहे …. " तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आपलं नाव नसल्याचं पाहून सर्जी नाराज झाला. पहिल्या क्रमांकावर आपण असल्याची शक्यता जवळजवळ नाहीच असंच त्याला वाटत होतं. "आणि पहिल्या क्रमांकावर आहे सर्जी!" ही घोषणा ऐकताच सर्जीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.
आता अचानक तीन महिन्यासाठी जर्मनीला जावं लागणार ह्या गोष्टीने तो एकदम आनंदला होता.
शुक्रवारची रात्र असल्याने सर्जीने आपल्या मित्रांसोबत त्या रात्री मोठी पार्टी केली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपल्या रूमवर परतल्यावर अचानक त्याला इवाची तीव्र आठवण झाली. हा म्हणजे इतका वेळ इवा त्याच्या मनात डोकावत होतीच. पण ह्या क्षणी ती आपल्याजवळ आपलं हे यश आणि त्याचा आनंद अनुभवायला हवी होती. हे त्याला वाटून गेलं. पण आता ती येणं तर शक्य नव्हतं! मग पुढील दीड तास तो इवाला एक मोठं ई मेल लिहित बसला. आपलं करियर कसं आता एकदम भरारी घेईल, बढतीची संधी आता कशी पटापट मिळेल ह्याचं विस्तृत वर्णन त्यात होतं. ई - मेलच्या शेवटी मी जर्मनीवरून परत आल्यावर तुला भेटीन आणि तोवर तुला कसं मिस करीत राहीन ह्याचा ओझरता उल्लेख होता.
आंद्रेई आणि कुटुंबियांसोबतची साप्ताहिक सुट्टी घालवून इवा रविवारी सायंकाळी कझानला परतली. सर्जीला रात्री फोन करूयात असं तिने ठरवलं होतं. त्यात आंद्रेई प्रकरण आणि त्यामुळे आता आपण लवकर सेटल होणं कसं महत्वाचं आहे ह्याचा विस्तृत उल्लेख करायचं तिने ठरवलं होतं. पटकन फ्रेश होऊन तिने ई मेल चेक करावं म्हणून संगणक सुरु केला. सर्जीकडून ई मेल आला आहे हे पाहताच ती बरीच उत्साहित झाली. त्याच उत्साहात तिने ई मेल उघडला. ई मेल मधल्या सर्जीच्या जर्मनीच्या जाण्याची बातमी वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आता हा तीन महिने इथून दूर जाणार; समजा त्याला तिथे कायमची नोकरी मिळाली तर! आणि हो तो इतका मोठा झाला तर आपल्याला विसरणार तर नाही ना!" नाना शंका कुशंकांनी तिच्या मनात गर्दी केली. अचानक ती भानावर आली. "बाकी सर्व राहू दे पण आपल्याला सर्जीचं अभिनंदन करायला हवं!" हा विचार तिच्या मनात आला! क्षणभर थांबून तिने मग सर्जीला फोन लावला. सर्जीने मोठ्या उत्साहात फोन उचलला. "अगं, होती कोठे तू इतका वेळ! तुझ्या भ्रमणध्वनीवर मला संपर्कच करता येत नव्हता!" "अभिनंदन सर्जी! मनःपूर्वक अभिनंदन! तुझी सर्व स्वप्नं आता पूर्ण होणार!!" तिच्या बोलण्यावर सर्जी पूर्ण लक्ष देऊन होता. तिचे शब्द आणि तिच्या स्वरातला भाव ह्यात त्याला बरीच तफावत जाणवली. "सर्व काही ठीक आहे ना इवा?" सर्जीने विचारलं. "हो सर्व काही ठीक आहे! मी आईकडे जाऊन आले!" इवा म्हणाली. पुढे आपल्याला येणारा हुंदका आवरणार नाही हे जाणवून तिने मग बोलणं आवरतं घेतलं. सर्जीलाही थोडं काम होतं. त्याला तयारीतच राहायला सांगण्यात आलं होतं. जर्मनीचा विसा मिळाला की त्याला लगेच निघावं लागणार होतं. "ही आताच गावावरून आली आहे! नंतर सावकाश फोन करू" असा विचार करून त्यानेही मग बोलणं जास्त लांबवलं नाही.
आणि अचानक मग मंगळवारी ह्या तिघांचा विसा आला देखील आणि बुधवारची तिकटं सुद्धा हाती सोपविण्यात आली. इतक्या घाईगडबडीत सर्व काही झालं की कझानला फेरी मारायचा सर्जीचा विचार तसाच राहून गेला.  मंगळवारी संध्याकाळी इतक्या सगळ्या धावपळीत त्याने इवाशी अर्धा तास फोनवरुन बोलणं केलं. सर्जीसाठी हे फक्त तीन महिने होते. इवाला मात्र ह्या तीन महिन्यात सर्जी गाठू शकणाऱ्या भरारीचा अंदाज आला होता. तीन महिन्यांनी आपला सर्जी फार फार पुढे गेलेला असू शकेल ह्याची तिला जाणीव झाली होती. इतका पुढे की त्याच्या वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याइतपत! आपल्या सोबतच्या सर्जीबरोबर हा संवाद जणू काही शेवटचाच असेल अशा आतुरतेने ती त्याच्याशी बोलत होती. मुठ कितीही घट्ट केली तरी त्यातली वाळू निसटून जाते तसे हे क्षण आपल्या हातून निसटून चालले आहेत ह्याचीच तिला खंत वाटत होती.
सर्जी बुधवारी गेला देखील आणि जर्मनीला सुखरूप पोहोचल्याचं त्याच ई मेल सुद्धा आलं. इवाला आपलं आयुष्य ढकलायला लागणारच होतं. असेच एक दोन आठवडे गेले. आणि मध्येच तीन चार दिवस आईचा फोनच आला नाही ह्याची जाणीव इवाला झाली. मग काहीशा अपराधीपणाने तिने आईला फोन केला. वडीलच फोनवर आले. "बरं झालं इवा तू फोन केलास! इतके दिवस आमची स्थिती एकदम वाईट झाली होती! आईला अचानक खूप ताप भरला होता. अगदी धावपळ करून इस्पितळात ठेवावं लागलं! मी तुला फोन करणारच होतो पण आंद्रेईच म्हणाला, "ती नोकरीत खूप धावपळीत असते. तिला आणखीन धावपळ नको! मीच सर्व सांभाळून घेईन! आणि खरंच त्याने सर्व सांभाळून घेतलं!" इवाला अगदी धक्का बसला. "आता कशी आहे आई? तिने मोठ्या काळजीने विचारलं. " आता बरी आहे, आंद्रेई तिला आता घरीच घेऊन येत आहे!" हे सांगताना वडिलांचा स्वर खुलला होता. फोन संपल्यावर इवा अगदी सुन्न होऊन बराच वेळ बसून राहिली होती.

(क्रमशः)


 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ८

 

 रात्रभर इवाच्या डोळ्याला डोळा लागला नाही.  म्हटलं तर चूक तिचीच होती. सर्जीप्रकरण इतकं पुढं गेलं असता तिनं आईला थोडीतरी कल्पना देऊन ठेवावयास हवी होती. आईचं काय? गावात बसून शहरात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही करणार तर मग ती आई कसली? आणि मग तिने आपल्या पद्धतीने आंद्रेई आणि इवाची ओळख करून द्यायचा घाट घातला होता. पहाटेच्या सुमारास इवाला कशीबशी झोप लागली. स्वप्नात सर्जी यावा आणि त्याने असेच आपल्याला उचलून न्यावे अशी तिची फार इच्छा झाली होती. अगदी सर्जीच्या अरसिकपणाला पूर्ण स्वीकारायची तिची आज तयारी होती.
अचानक बाहेरच्या दरवाज्यावरील जोरदार खटखटाने तिची झोप मोडली गेली. खोलीतील घड्याळाकडे तिचे लक्ष गेलं. केवळ सात वाजले होते. "इतक्या सकाळ सकाळी कोण आलं" असा विचार इवाच्या मनात आला. तिने हळूच कानोसा घेतला. आंद्रेई आणि आईचं बोलणं चाललं होतं. आंद्रेईने त्याच्या शेतावर ह्या तिघांना बोलावलं होतं. २० किमी अंतरावर त्याचं गव्हाचं फार मोठं शेत होतं. काही मिनिटात तो निघून गेला. बहुदा त्याला आईने नकार दिला असावा असं समजून इवाला हायसं वाटलं. आणि तिने डोक्यावरून जाडी घोंगडी ओढून घेतली. दोन तीन मिनिटात तिला खोलीत पावलांचा आवाज आला. तरीही तिनं घोंगडी डोक्यावरून बाजूला केली नाही. मग एक मिनिटाने वगैरे "इवा" अशी तिच्या वडिलांची हाक तिच्या कानी आली. वडील आपल्या खोलीत आले हे जाणवताच इवा पटकन उठून बसली. "झोप लागली का पोरी!" वडिलांच्या ह्या प्रेमळ स्वराने तिला अगदी लहानपणाची आठवण झाली. "हो लागली!" वडिलांना बरं वाटावं म्हणून तिने बळेबळे खोटंच उत्तर दिलं. एव्हाना आईचं सुद्धा खोलीत आगमन झालं होतं.
आईच्या आगमनाने वडिलांच्या चर्येत थोडा फरक पडला होता. "पोरी, आंद्रेई आपल्या सर्वांना त्याच्या शेतावर बोलवायला आला होता. तासाभरात त्याच्या जीपमधून आपण निघुयात!" वडील तिची नजर चुकवत म्हणाले. केवळ वडील समोर होते म्हणून इवाने आपल्या रागावर आवर घातला. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग इवाने शांत होऊन आपल्या विचारांना शब्दरूप दिलं. "तुम्ही आंद्रेईला आधीच शब्द देऊन मोकळं झाला आहात काय?" तिच्या ह्या रोखठोक प्रश्नाने वडील थोडे हादरले. मग आई त्यांच्या मदतीला धावली. "अग म्हणजे अगदी शब्द वगैरे दिला नाही, पण येत्या काही दिवसात आम्ही नक्की काय ते सांगू असे मी त्याच्या आईला म्हणाले" आई म्हणाली. "अरे वा म्हणजे हे प्रकरण त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलं वाटत!" इवाने मनातल्या मनात विचार केला. "माझी सर्जी नावाच्या एका मुलाबरोबर सध्या खास मैत्री चालू आहे!" इवाच्या ह्या शब्दांनी आश्चर्यचकित होण्याची पाळी आता तिच्या आईवडिलांची होती. वडिलांना तर काय बोलावे हे कळेना आणि ते खोलीबाहेर गेले. आईसुद्धा मिनिट - दोन मिनिट सुन्न होऊन तशीच बिछान्यावर बसून राहिली. मग उठून जड पावलांनी ती ही बाहेर गेली. आता बिछान्यातून उठण्याची इवाला अजिबात इच्छाच राहिली नव्हती. थोड्या वेळाने वडील पुन्हा खोलीत आले. "मुली, आपण असं आज न जाणं योग्य दिसणार नाही! आजचा दिवस तू कसाबसा निभाव! मग तू परत गेलीस की आम्ही त्यांना कळवू!" वडिलांच्या ह्या शब्दांनी'तिला खूप बरं वाटलं. त्यांनी जसा आपला विचार केला तसा आपणही त्यांचा करायला हवा ह्याची जाणीव होऊन ती बिछान्यातून उठली. "आता कशी माझी शहाणी मुलगी!" असे म्हणत वडिलांनी तिला जवळ घेतलं. आपल्या अश्रूंनी त्यांचा शर्ट ओला होतोय हे कळताच इवा तयारीचं निमित्त काढून त्यांच्यापासून दूर झाली.
तयारी करायला तसा कमीच वेळ होता पण इवाने घाईघाईत तयारी आटपत आणली. तरीही ती केस विंचरत असतानाच जोरात दार ढकलून आंद्रेई घरात प्रवेश करता झाला. दुसऱ्याच्या घरात प्रवेश करायची ही काही पद्धत झाली असा विचार करणाऱ्या इवाच्या चेहऱ्याकडे आंद्रेई पाहतच राहिला. "तू खूप सुंदर दिसते आहेस!" आंद्रेईच्या ह्या उद्गाराने एक शतांश सेकंद सुखाची भावना, त्यानंतर काही क्षण रागाची भावना इवाच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मात्र आपल्याला आयुष्यभर नाही पण आजच्या दिवस तरी ह्याची सवय करून घ्यावी लागणार अशी तिने स्वतःला मनोमन जाणीव करून दिली.
थोड्याच वेळात सर्व मंडळी आंद्रेईच्या जीपमध्ये बसली. आंद्रेईचे आईवडील शेतावरच बाजूला असणाऱ्या घरात सध्या मुक्कामाला होते. शेतीची काम खूप जोरात असली की ते तिथे राहत. आंद्रेई सुद्धा तिथं राही पण ह्या तिघांना घेण्यासाठी म्हणून तो गावातल्या घरात आला होता. इवाला आंद्रेईच्या बाजूच्या सीटवर बसवायचा विचार आईने सध्या सोडून दिला होता. पोरींना शहरात नोकरीशिक्षणासाठी पाठवू नये असे जुन्या बायक्या म्हणत तेच खरं असंच तिला मनोमन वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे आंद्रेई धुमशान गाडी पळवत होता. एव्हाना गावाकडचा रस्ता सुरु झाल्याने अधूनमधून खडबडीत रस्ते लागत. तरीही आंद्रेई जीपचा वेग कमी करायचं नाव घेत नव्हता. शेवटी एकदाचं शेतावर पोहोचल्यावर "तरुण माणसा! आम्हांला सुखरूपपणे इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद!" वडिलांच्या ह्या उद्गारांनी सर्वजण हसले. आणि वातावरणात असणारा आणि ह्या तिघांनाच जाणवणारा अदृश्य तणाव काहीसा निवळला.
मंडळी शेतातील घराकडे जाऊ लागली. वातावरणात खूप थंडावा होता. गव्हाची कापणी आटोपली होती आणि आता ट्रकमध्ये हा गहू भरून शहरात पाठविण्याचं काम सुरु आहे अशी माहिती आंद्रेईने दिली. अजूनही गुश्यातच असणारी इवा ह्या शेताच्या दर्शनाने मात्र खूप खुश झाली होती. पण आपली ही ख़ुशी चेहऱ्यावर दिसणार नाही ह्याची पुरेपूर काळजी तिने घेतली. मंडळींना येताना पाहून आंद्रेईचे आईवडील स्वतःहून बाहेर आले. त्यांनी ह्या तिघांचे स्वागत केले. इवाला पाहून आंद्रेईच्या डोळ्यात उमटलेले खुशीचे भाव जसे इवाच्या नजरेतून सुटले नाहीत तसेच आंद्रेईच्यासुद्धा!
सर्वजण त्या छोटेखानी घरात स्थिरस्थावर होत नाहीत तितक्यात शेतावरील एक कामगार धावतच आला. एक गहू वाहून नेणारा ट्रक बंद पडला होता. त्याने दिलेली ही बातमी ऐकताच आंद्रेई ताडकन उठला. "सॉरी, मंडळी! मला जावं लागेल!" आणि तात्काळ आपल्या जीपला सुरु करून दिसेनासा देखील झाला. "ह्या हिवाळ्यात अडचणींना काही तोटा नाही!" आंद्रेईची आई चेहऱ्यावर कसनुसं हसू आणून म्हणाली. परंतु बहुदा त्यांना असल्या प्रकाराची सवयच असावी. सर्वजण मग गप्पांत गढून गेले. आंद्रेईच्या आणलेल्या स्वादिष्ट नास्त्यावर सर्वजण तुटून पडले.  आंद्रेईचे आईवडील दोघेही अगदी मितभाषी होते. आईमध्ये तर गावाकडची मृदुलता पुरेपूर उतरली होती. सर्वांचा नास्ता आटोपल्यावर घराबाहेर असलेल्या सायकलकडे बोट दाखवत  "मुली, तू ह्या सायकलवरून आंद्रेईला नाश्ता नेऊन देशील का?" असे तिने इवाला विचारलं. "दमली असशील तर राहून दे! जाईन मी पटकन!" असेही ती पुढे म्हणाली. आपण इतका नाश्ता केला, आणि आंद्रेईला पूर्णपणे विसरून गेलो अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली. आणि त्यातच तिने "हो मी जाते!" असे उत्तर दिले. तिच्या ह्या उत्तराने तिच्या आईला मात्र खास आश्चर्य वाटलं.
सायकल जरी असली तरी थंड हवेत इतके अंतर कापायला इवाला थोडा वेळ लागला. बऱ्याच दिवसाने इतक्या मोकळ्या हवेत सायकल चालवायचा अनुभव तिला हवाहवासा वाटत होता. तिला सायकलवर येताना पाहून आंद्रेई बराच विस्मयचकित झाला. ट्रक अजूनही चालू होत नव्हता. इवाने जवळच सायकल ठेवली आणि नाश्त्याचा डबा घेऊन ती ट्रकजवळ पोहोचायला आणि ट्रक सुरु व्हायला एकच गाठ पडली. "ओह, धन्यवाद! तुझ्या येण्याने हा नाठाळ ट्रक सुद्धा सुरु झाला!" आंद्रेई ह्यावेळी मात्र अगदी शांतपणे बोलला. "आणि हो नाश्ता आणल्याबद्दल सुद्धा धन्यवाद!" "यु आर वेलकम!" इवा म्हणाली.   थोड्याच वेळात आंद्रेईने नाश्ता संपवला. आणि हो त्याने इवाला सुद्धा विचारलं. "माझा आताच झालाय!" इवा म्हणाली.
इवाची आता सायकलवरून परतायची तयारी सुरु झाली होती. इतक्यात शेतावर येणारे काही कामगार येणार नसल्याचा निरोप आला. आंद्रेईची चिंतातूर बनलेली मुद्रा इवाच्या नजरेतून सुटली नाही. "माझ्या थांबण्याने काही मदत होत असेल तर मी थांबते इथे!" इवाच्या ह्या उद्गाराने आंद्रेईला हायसं वाटलं नसतं तरच नवल!

(क्रमशः)







शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

I MISS YOU पांगारा!

लहानपणची गोष्ट! वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!

पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे? बाकी वसईत ह्या झाडांची संख्या मग झपाट्याने कमी होत गेली. रमेदी ते पारनाका ह्या रस्त्यांवरील वेगाने कमी झालेल्या जुन्या वाड्यान प्रमाणे!  आज अचानक ह्या पांगार्याची आठवण आली. नेटवर मिळालेला हा एक पांगार्याचा फोटो!



शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ७



 
 मॉस्को ते कझानचा प्रवास तसा कठीणच झाला. इवाला बोलतं करायचे मारियाचे प्रयत्न निष्फळच ठरले. कझानला पोहोचल्यावर इवाला हायसं वाटलं.
आयुष्य पुन्हा चालू झालं होतं. इवाच्या आयुष्यात येऊन गेलेल्या वादळाची ना कोणाला जाणीव होती आणि असती तरी त्याची पर्वा असती की नाही हा ही प्रश्नच होता. आता सर्जी आणि इवा ह्यांच्याकडे एकमेकांचे फोन क्रमांक ही होते आणि ई - मेल सुद्धा! तीन चार दिवस सर्व काही शांत शांत होते. आणि मग अचानक एक दिवस सर्जीचा ई - मेल आला. "इवा, कशी आहेस? मी त्या दिवशी इतकं सारं बोलायला नको होतं! चुकलंच माझं! सॉरी!" हा ई मेल वाचून इवा काही एकदम उत्साहित वगैरे झाली नाही. त्याचं तिलाच मग आश्चर्य वाटलं. पूर्ण आयुष्य उत्साहात जगण्याचा आपला निर्धार असा कसा इतक्या लवकर गळून पडला ह्याची थोडी खंतही तिला वाटली.  सर्जीला तिने दिलेलं उत्तर फारसं काही उत्साहपूर्ण नव्हतं. ई मेल अधून मधून चालू होती पण त्यात थंडी - नोकरीच्याच गोष्टी जास्त चालत होत्या. संवाद चालू असूनही अबोला निर्माण झाला होता.
असंच काही दिवसांनी मग इवाची आई अचानक एका सकाळी कझानला येऊन थडकली. आपल्या गावाकडे राहणाऱ्या आईला पाहून इवाला काहीसं आश्चर्य वाटलं. आठवड्याचा मध्य असल्याने तिला ऑफिसला जाणं तर भाग होतं.  त्यामुळे आईला काही बोलायला संधी मिळाली नाही. संध्याकाळी मात्र आई बोलती झाली. शुक्रवारी संध्याकाळी इवाला गावाला घेऊन जाण्यासाठी ती आली होती. "बरेच दिवस तुझं गावाला येणं झालं नाही, चल दोन दिवसाची!" आईचं हे बोलणं प्रेमाचं असलं तरी तिला नाकारलं तर ती झटकन रौद्र रूप धारण करू शकते हे इवा चांगलेच जाणून होती. त्यामुळे गावाला जाण्याशिवाय आता पर्याय नाही हे इवाला समजून चुकलं होतं. तिने मारियाला सोबतीसाठी विचारलं सुद्धा! पण मारियाला असं अचानक येणं शक्य नव्हतं.
शुक्रवारी संध्याकाळचा प्रवास इवाला कंटाळवाणा वाटला होता. ऑफिसातून एकतर लवकर निघावं लागलं होतं तिला आणि मग शनिवार रविवार कसा घालवायचा ह्याचाच तिच्या डोक्यात विचार चालू होता. गेले कित्येक वर्षे इवा आपल्या घरापासून दूर राहत होती. पहिल्यांदा शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी! सुरुवातीला आपल्या घरच्यांना, गावाला खूप मिस करायची ती! पण जसजशी ती शहरात रुळत गेली तसतशी गावची ओढ कमी होत गेली होती. ओढ कमी होत गेली होती असे म्हणणं चुकीचं ठरलं असतं. ओढ काहीशी आत जाऊन बसली होती.
इवा आणि आई घरी पोहोचले तसे वडिलांनी त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. शेतात ह्या वयात सुद्धा कष्ट करत असलेल्या आपल्या वडिलांकडे बघून इवाचे डोळे काहीसे भरून आले. आई आणि तिचं नातं प्रेमाचं असलं तरी अधून मधून उडणाऱ्या शाब्दिक चकमकींमुळे त्याला काहीसा रांगडेपणा निर्माण झाला होता. पण वडिलांचं आणि इवाचं नात मात्र वेगळ्या पातळीवरच होतं. त्यात शब्दांचा वापर फार क्वचितच होत असे. आपल्या छोट्याशा इवाला इतकी मोठी झालेली पाहून आणि शहरात इतक्या आत्मविश्वासाने वावरताना पाहून तिच्या वडिलांचे डोळे अभिमानाने भरून येत. पण त्याच वेळी तिच्या लहानपणच तिचं निरागस रूप हरवलं म्हणून त्यांना मनातून हळहळही वाटत असे.
इवा ताजीतवानी होऊन आली आणि जेवणाचं काय म्हणून तिनं आईला विचारलं. "शेजारच्या नताशा मावशीकडे जेवायला जायचंय" तिची नजर चुकवत आई म्हणाली. "तू मला आधी नाही सांगायचं का!" अपेक्षेप्रमाणे इवाचा पारा चढला. पुढील काही वेळ मग तिच्या वडिलांनी तिला शांत केलं. शेवटी कशीबशी धुसफुसतच इवा नताशा मावशीकडे जायला तयार झाली. आपल्या नवऱ्याच्या अकाली मृत्युनंतर ही नताशा मावशी बिचारी एकटीच राहत असे. इवाला ती आवडायची पण खरतर ती आज खूप दमली होती म्हणून तिनं इतका त्रागा केला होता.
"या, या ! आपलं स्वागत आहे!" एका रांगड्या युवकानं नताशा मावशीच्या घरात ह्या तिघांचं स्वागत केलं. इवा अगदी आश्चर्यचकित झाली. मावशीकडे अजून कोण असेल अशी तिने अजिबात कल्पनासुद्धा केली नव्हती. "वेलकम इवा! माझे नाव आंद्रेई!" इवाला संधी न देताच त्याने आपल्या खरखरी हातांनी तिच्याशी हस्तालोंदन केले. इवाच्या शहरी संस्काराची आवरणं तिला अधिकाधिक अस्वस्थतेकडे नेत होती. "आपल्याला भेटून आम्हांला आनंद होत आहे!" आईच्या ह्या उदागारावर इवाला आश्चर्य वाटून गेलं. :कोण हा दणकट आंद्रेई! आणि ह्याला भेटून आईला का बरे आनंद व्हावा!" इवाला तर खूप संताप आला होता. आपला हात अजून आंद्रेईने सोडला नाही म्हणून रागाचा एक कटाक्ष सुद्धा तिने त्याच्याकडे टाकला. "जोवर तू मला वेलकम म्हणत नाही तोवर मी तुझा हात सोडणार नाही!" आंद्रेई म्हणाला. "ह्याला काही रीतीभाती आहेत की नाही!" मनातल्या मनात संताप पराकोटीला पोहोचलेल्या इवाने शेवटी नाईलाजास्तव "नाईस मीटिंग विथ यु आंद्रेई!" म्हणत आपला हात त्याच्या हातातून सोडवला.
पुढे दोन तासभर आई, नताशा आणि आंद्रेई ह्यांचीच गडबड चालू होती. इवा आणि वडील मात्र शांतपणे बसले होते. बाकी नताशा मावशीने जेवण मात्र अगदी रुचकर बनवलं होतं. त्यामुळे इवा काही प्रमाणात शांत झाली होती. विविध पदार्थावर आडवा हात मारणाऱ्या आणि मोठ्याने गडबड चालू ठेवणाऱ्या आंद्रेईकडे ती काहीशा विरक्त वृत्तीने पाहत होती. आपला सर्जी असायला हवा होता असे अचानक एका क्षणी तिला वाटून गेलं. पुढच्या दोन दिवसात त्याला नक्की फोन केला पाहिजे असा मनोमन तिने निग्रहसुद्धा करून टाकला.
निघताना "पुन्हा आपली भेट होईलच" असे आंद्रेई म्हणाला तेव्हा काहीशा आश्चर्यपूर्ण नजरेने तिनं त्याच्याकडे पाहिलं. घरचा दरवाजा लावताच तिने आपला  राग आईवर काढण्यास सुरुवात केली. आईच्या चेहऱ्यावरील मिश्किल हसू पाहताच मात्र तिला आश्चर्य वाटलं. "होईल सवय हळू हळू! मी नाही का तुझ्या वडिलांच्या शांत स्वभावाच्या वडिलांशी कसं जुळवून घेतलं!" आईचे हे शब्द लोखंडाच्या तप्त रसाप्रमाणे तिच्या कानात शिरले!

(क्रमशः)


 

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

मदिराप्राशनास समाजमान्यता

काळ कोणासाठी थांबत नाही, तो सदैव पुढेच जात असतो. बदलत्या काळानुसार समाजाने स्वीकारलेल्या रूढी बदलत जातात. पूर्वी वर्ज्य असलेल्या रूढी कालांतराने समाज स्वीकारतो. मद्यपान ही पूर्वीच्या काही पिढ्या वर्ज्य असलेली गोष्ट आज समाजाने बर्याच प्रमाणात स्वीकारलेली आहे. ह्याबाबत असा आक्षेप घेतला जावू शकतो की देव देखील सोमरस पान करायचेच ना ? पण आजच्या लेखाचा विषय प्रामुख्याने सुशिक्षित मध्यमवर्गाशी निगडीत आहे. मी जाणीवपूर्वक मद्यपानाच्या आहारी जाऊन संसाराची परवड करणाऱ्या लोकांविषयी इथे वळत नाही. त्यांचे मनावर नियंत्रण नाही. पूर्वीचा शिक्षित वर्ग जो बहुसंख्येने निर्व्यसनी असायचा तो आज विशिष्ट प्रसंगी मद्यपान करतो. ह्यातील बहुसंख्य लोक एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाहीत. मद्यपानाचा ते आपल्या व्यावसायिक जीवनावर परिणाम होवून देत नाहीत. त्यांना मद्यपान का करावे वाटते? मला ह्यात अनुभव नाही पण एकंदरीत असे जाणवते की व्यावसायिक, वैयक्तिक जीवनातील ताणतणावापासून मुक्त होवून काही काळ एका वेगळ्या विश्वाचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी हा पर्याय स्वीकारलेला असतो. माझे म्हणणे एकच की वेगळ्या विश्वात जाण्यासाठी केवळ मद्यपान हाच एक मार्ग नाही, संगीत, भटकंती, चित्रकला अशा अनेक मार्गांचा आधार आपण घेवू शकतो. हे पर्याय प्रथम अवलंबिण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मला खटकणारा मुख्य मुद्दा म्हणजे घरगुती समारंभात ह्या मद्यपानाचा प्रवेश. ही सर्व दर्दी मंडळी एका वेगळ्या बैठकीच्या खोलीत जावून हा कार्यक्रम करतात. त्यामुळे सर्व लोक एकत्र येण्याची जी संधी होती ती गमावली जाते. घरात मद्यपान करणे हा पुढील पिढीसाठी आपण एक सर्वमान्य शिरस्ता करून ठेवत आहोत हे मला खूपच खटकते. दुर्दैवाने ह्या प्रथेला विरोध करणारी फार कमी अधिकारी मंडळी आता शिल्लक राहिली आहेत.

ह्या लेखात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ह्या विषयावर एक खुली चर्चा व्हावी हाच एक उद्देश!

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ६

 
दुसऱ्या दिवशी इवा अल्बिनाच्या घरातून सकाळी लवकर बाहेर पडली ती कझानला जातानाची दुपारची ३ वाजताची बस पकडायचं ठरवूनच! सर्जीच्या घरी जाताना तिच्या मनात धाकधूक होतीच. सर्जीचा स्वभाव आपणास पूर्ण कळला आहे ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. सर्जीविषयी आपल्याला प्रेमापेक्षा आदरच जास्त वाटतो आहे असे तिला कालपासून वाटू लागलं होतं. आणि प्रेमात पूर्णपणे झोकून देण्याची आपली इच्छा सर्जीसोबत कधीच पूर्ण होणार नाही हे तिला हळूहळू कळू लागलं होतं. आदर, शिस्तप्रिय जीवन ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिची इतक्यात तयारी नव्हती. आपण सर्जीच्या पूर्ण प्रेमात पडलो आहोत ह्याची तिला जाणीव होती पण आपल्या मनात असणाऱ्या प्रेम पूर्णतः अनुभवण्याच्या तीव्र इच्छेला सर्जीसाठी तिलांजली द्यावी लागेल हा विचार तिला नकोसा वाटत होता. प्रेमात त्याग करावा लागतो पण त्यागानेच पूर्ण जीवन व्यापून टाकणं आपल्याला जमेल ह्याची तिला खात्री नव्हती.
सर्जीच्या घरी दरवाजा उघडला तो विवियन ह्यांनी! इवाचं स्वागत करून त्यांनी तिला बसण्याची विनंती केली. "सर्जी आंघोळीला गेलाय, येईल इतक्यातच!" विवियन म्हणाले. एलेना कोठे आहे असं विचारायचं इवाच्या मनात आलं. परंतु ती हा प्रश्न विचारणार त्याआधीच विवियन ह्यांनी सर्जीच्या एकंदरीत प्रशिक्षणाविषयी आणि त्याच्यासमोर असलेल्या उज्ज्वल संधीविषयी बोलणं सुरु केलं. बघता बघता त्यांनी विषयाचा ओघ आपल्या करियरकडे वळवला आणि आपण आपल्या कारकिर्दीत कशी प्रगतीची शिखरं गाठली ह्याचा आलेखच मांडायला त्यांनी सुरुवात केली. आपली ह्यातून कशी सुटका होईल ह्याचा विचार करीत असतानाच सर्जी ताजातवाना होऊन बाहेर यायला आणि खरेदीसाठी बाहेर गेलेली एलेना परतायला गाठ पडली. इवाने सुटकेचा निश्वास टाकला. "ह्यांनी तुला जास्त काही कंटाळवल तर नाही ना? एलेना मिश्किल स्वरात म्हणाली. त्यावर इवाने मनमोकळ्या हास्याने दाद दिली. परंतु आपलं हे मनमोकळ हसू सर्जी आणि विवियन ह्या दोघांनाही फारसं काही रुचलं नाही हे त्यांच्या मुद्रेवर स्पष्टपणे दिसल्याने इवा शांत झाली.
एकंदरीत घरातील वातावरण गंभीरच होते. एलेनाच काय ती एकटी वातावरण खेळीमेळीच ठेवायचं प्रयत्न करीत होती. शेवटी एकदाचा सर्जी म्हणाला, "आम्ही दोघं आता बाहेर निघतो!". इतका वेळ इवाची असलेली अवघडलेली मुद्रा पाहून एलेनानेही तिला थांबण्याचा आग्रह केला नाही. निरोप घेताना "पुन्हा भेटूच लवकर" असे इवाला सांगायला एलेना विसरली नाही.
सर्जी आणि इवा जवळच असलेल्या एका मॉलमध्ये शिरले. "सर्जी, सॉरी हं पण मी तुला दिलेला स्कार्फ हिल स्टेशनला विसरून आले! मी आता एक नवीन स्कार्फ घेतेय!" इवा म्हणाली.  सर्जीच्या डोळ्यात अचानक मिश्किल भाव उमटले. "एक क्षणभर डोळे बंद कर, इवा!" सर्जी म्हणाला. "पण का?" इवाला असला खट्याळपणाच खूप आवडायचा. "मी सांगतो ना, म्हणून!" सर्जी म्हणाला. "नाही करणार जा!" इवाचा खट्याळपणा पूर्ण जागृत झाला होता. सर्जीचा चेहरा काहीसा अवघडल्यासारखा झाला. पुढे काय करावं हे त्याला कळेनासं झालं. त्यानेच पुढे होऊन आपले डोळे घट्ट मिटून घ्यावेत हे इवाची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. काहीशा नाराजीनेच तिने डोळे बंद केले. आपल्या डोळ्याभोवती एक मऊ कपडा बहुदा स्कार्फच गुंडाळला जात आहे हे तिला कळत होते. "उघड आता डोळे आता!" सर्जीचा उत्साहित स्वर तिच्या कानी आल्यावर तिने डोळे उघडले. हळुवारपणे तिने आपल्या डोळ्याभोवती सर्जीने गुंडाळलेला स्कार्फ दूर केला. आता आश्चर्याने थक्क होण्याची तिची पाळी होती. आपला हा हरवलेला स्कार्फ सर्जीकडे कसा आला हे कोडं तिला उलगडलं नाही. "सर्जी, सांग ना हा स्कार्फ तुझ्याकडे कसा आला ते!" सर्जी त्या दिवशी प्रथमच तिला उत्साहित वाटला. उत्साहित चेहऱ्याच्या सर्जीच्या तोंडून स्कार्फची कहाणी ऐकता ऐकता हा असाच सर्जी आपल्याला मिळायला हवा असे तिला वाटून गेलं.
वातावरणात थोडा रोमांच भरला होता. एका रोमॅंटिक रशियन चित्रपटाचा त्या दोघांनी आनंद लुटला. इवा त्या कालावधीत कझानमध्ये दोघांनी एकत्र घालविलेल्या वेळेची आठवण काढत होती. तर सर्जीच्या डोक्यात पुढील आठवड्यातील कामाची यादी नाचत होती. इवाला ३ ची बस पकडायच्या आधी तासभर होता. पटकन दुपारचं जेवण आटपून घ्यायचं दोघांनी ठरवलं.ऑर्डर देऊन पाच मिनिटं झाली तरी आपल्या नावाचा पुकारा होत नाही म्हणून सर्जी बेचैन होता. "आपण लग्न कधी करायचं?" ह्या इवाच्या पूर्णपणे अनपेक्षित प्रश्नाने सर्जी अगदी गोंधळून गेला. ह्या प्रश्नाची त्याने पुढील वर्षभर तरी अपेक्षा केली नव्हती. "आपण ह्या विषयावर आतापर्यंत कधी बोललोच नव्हतो! मला विचार करायला थोडा वेळ दे इवा!" आताशा थोडफार सावरलेल्या सर्जीने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. एव्हाना टेबलावर प्लेट्स आल्या होत्या. पण आता दोघांचही भोजनातून लक्ष उडालं होतं. आपण एकदम हा प्रश्न विचारायला नको होता हे इवाला मनातून कळून चुकलं होतं. पण कधी नव्हे तो सर्जी थोडासा उत्साहित झाल्यावर तिने एकदम पुढची पायरी गाठली होती.
"माझं चुकलं सर्जी!" इवाच्या ह्या अचानकपणे आलेल्या कबुलीने सर्जी पुन्हा एकदा भांबावून गेला. भावनांचा इतका चढउतार इतक्या थोड्या वेळात त्याने कधी अनुभवला नव्हता. त्याच्या मनात एकतर फार कमी भावना येत. इवा आवडली होती त्याला. अगदी मनापासून! आवडलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि तिच्याशी आयुष्यभर सुखाने संसार करायचा इतकं त्याला माहीत होतं. परंतु हा सर्व प्रवास इतका भावनापूर्ण असेल ह्याची त्याला कल्पना नव्हती आणि आता ह्या प्रकारासाठी स्वतःला बदलवून घेण्याचा उत्स्फूर्तपणा त्याच्याकडे नव्हता. सर्जीच्या डोक्यात इतकं सगळं वादळ चाललं होतं तोवर इवा त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.
"सर्जी, मी इतके दिवस तुझी खूप वाट पाहिली. तुझ्याशी काहीच संपर्क नाही. तुलादेखील मला कधी संपर्क करावासा वाटला नाही. मी तर जवळजवळ तुझी आशा सोडून द्यायच्या मार्गावर होते आणि अचानक तू त्यादिवशी बसमधून ओझरता दिसलास! विझत आलेलं सर्व भावना पुन्हा जागृत झाल्या! आणि मग मी मॉस्कोला आले. अचानक आपली भेट झाली. आता अर्ध्या तासात आपली पुन्हा ताटातूट होणार. ह्यावेळी आपण एकमेकांचा फोन, ई मेल सर्व काही जरी घेतलं असलं तरी तुझ्या कामातून तुला वेळ मिळेल काय ह्याची मलाच काय तुलाही खात्री देता येणार नाही!" इतक्या दिवसाच्या मनात दबलेल्या सर्व भावनांना  इवा पूर्ण मोकळीक देत होती.
"हिला आपल्या मनातील भावनांना किती वेगानं शब्दरूप देता येतं" सर्जी अचंब्याने विचार करीत होता. "इवा, मी तुझ्यापेक्षा खूप वेगळा आहे ग!" इतक्या वेळाने सर्जीच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं. "मी प्रेमातील भावनांचे इतके गहिरे रंग असतील ह्याची कल्पना केली नव्हती, इवा!" तो पुढे म्हणाला. "ते ठीक आहे रे! पण तुझ्या तोंडून
  "तू, माझ्याशी लग्न करशील का?" हा प्रश्न ऐकण्याची आपण कझान मध्ये एकत्र असताना आणि गेल्या दोन दिवसात जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी किती आतुरतेने वाट पाहत होते सांगू!"
दोघांचेही बर्गर संपले होते आणि आता निघायची वेळ होत आली होती. सर्जीने आपलं कार्ड बिल भरण्यासाठी पुढे केलं. इतका वेळ सर्जीच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं. कार्ड स्वाईप करून परत आणून देणाऱ्या वेटरला टीप देऊन दोघे बाहेर पडायला निघाले. "इवा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू?" सर्जीने विचारलं. इवाने मानेनेच होकार दिला. "तुझी ही भावनिक गरज आयुष्यभर अशीच राहील असं तुला वाटत का इवा?" बस स्थानकाच्या दिशेने चालता चालता सर्जी म्हणाला. "इवाने काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. "नाही म्हणजे काही काळ इतकं भावनिक होईल मला कदाचित जमेल, पण कायम असं भावनिक बनून राहणं माझ्या मर्यादेच्या पलीकडे आहे!" सर्जी एकदम बोलून गेला. इवा एकदम हादरून गेली. पुढची तीन चार मिनिटे दोघेही जवळजवळ चालत असले तरीही दोघांमध्ये फार मोठा दुरावा निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. बस स्थानक जवळ आलं होतं. आणि ह्या दोघांना येताना पाहून मारियाने सुटकेचा निश्वास टाकला. कझानची बस सुटायला फक्त दोन मिनिटं राहिली होती.
(क्रमशः)

 



रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

विवाह संस्था !


 

२३ जूनच्या चतुरंग पुरवणीत दोन लेख वाचले, एक 'एकाकी नसलेले एकटेपण' आणि दुसरा 'विवाह संस्थेतील ढोंग!' व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर दोन्ही लेखातील मुद्दे योग्य! आयुष्यात एकटेपण बर्याच जणांना अनुभवावे लागते. काहींनी ते ठरवून स्वीकारले असते तर काहींना परिस्थिती ते स्वीकारण्यास भाग पाडते. पूर्वी एकटेपण म्हटले की मनुष्य दुःखी असणार असेच अभिप्रेत असायचे. परंतु आजच्या काळात एकाकी असूनसुद्धा आनंदी असलेले बरेचजण आहेत असा पहिल्या लेखाचा सारांश. दुसर्या लेखात एकंदरीत विवाहसंस्थेची चिरफाड केलेली! आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधात अजूनही बहुतांशी स्त्रिया नवर्यांचा दांभिकपणा कसा सहन करतात यावर या लेखाचा भर. दोन्ही लेख स्त्रियांनी लिहलेले. अतिशय संतुलित विचारसरणीने लिहिलेले. आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही लेखातील विचार एकदम योग्य.
दोन्ही लेखात सध्याच्या जगात प्रकर्षाने जाणवणारे एक समान सूत्र आढळते. ते म्हणजे आजच्या पिढीत वाढलेली स्वत्वाची भावना. हा जो स्व असतो तो सदैव स्वतःसाठी अनुकूल वातावरण शोधत असतो. हवी ती शाळा, हवे तसे घर, हवी ती नोकरी, हवे तसे मित्र अशी ह्या स्व ची मानसिकता असते. ह्या सर्व गोष्टींमध्ये नाही पटले तर त्वरित दुसरा पर्याय शोधला जातो. तसेच जीवन साथीदाराच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. म्हणून काही जण लग्नाचा मार्ग स्वीकारायचे नाकारतात तर काही जण लग्नानंतर हा मार्ग तत्काळ बदलायचे धाडसही दाखवू शकतात. आपल्या भारतातील किंवा जगभरातील ज्या काही विवाहसंस्था आजच्या काळापर्यंत टिकल्या त्यासाठी व्यक्तिगत त्यागाचा मोठा हातभार लागला. प्रेमविवाह असो की जमविलेले लग्न असो, लग्नानंतर संसार करताना दोघा साथीदारांचे सूर सदोदित जुळणे हे बरेचसे कठीण. परंतु ह्या प्रवासात जेव्हा कधी हे सूर जुळतात तेव्हा त्या क्षणाच्या जोरावर बाकीचे मतभेद पचविण्याची प्रगल्भता दोघांकडे हवी. नाहीतर न पटणार्या गोष्टींचाच सदैव विचार केल्यास उरतो तो केवळ दोन समांतर रेषांचा प्रवास.
इथे आपण आपल्या पूर्वजांच्या मानसिकतेचा थोडा विचार करूया. त्यांनी विवाहसंस्थेच्या दुषपरिणामांविषयी विचार केला नसावा असे मला वाटत नाही. त्यांना नक्कीच माहित असणार की तत्कालीन विवाहपद्धतीत (त्यातही एकत्र कुटुंबपद्धतीत) कोणत्या तरी एका बाजूची (९९.९९ टक्के स्त्रियांची) परवड होणारच! त्यांनी त्यांच्यासमोरील दोन पर्यायांचा विचार केला असावा. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! त्यावेळी त्यांनी दुसर्या पर्यायाचा स्वीकार केला. हे हस्तांतरण योग्यरित्या व्हावे यासाठी त्यांना कुटुंबसंस्थेची गरज भासली. त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले असावे की या कामासाठी स्त्रियांचा त्यावेळचा स्वभाव योग्य! म्हणून त्यांनी विविध रीतीभाती निर्माण करून स्त्रियांना त्यात समाविष्ट करून घेतले. खरोखर परखड परीक्षण केले तर असे जाणविते की भारतीय संस्कृतीने, समाजाने स्त्रियांची मेंदूधुलाई केली. स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते अशी भव्य दिव्य विधाने करून त्यानी स्त्रियांना भावनिक पाशात अडकविले. संसार टिकले ते स्त्रियांच्या अपत्यप्रेमापोटी, पतीप्रेमापायी नव्हेत!
आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर दोन पर्याय आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! बदलत्या काळानुसार ह्या दोन पर्यायांतील कोणता स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण त्यातील एक पर्यायच आहे मुळी व्यक्तिस्वातंत्र्याचा! हा स्वीकारताना आपण समाज म्हणून काय गमावतो आहे हा प्रश्न फक्त एकदा स्वतःला विचारून पहावा! विवाह संस्था पूर्णपणे नष्ट होणे सुद्धा कोणालाही आवडणार नाही. आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधापायी, अपत्यप्रेमापोटी, किंवा विवाह संस्थेचा पूर्ण लोप होवून न देण्यासाठी माझा वैयक्तिक हातभार असावा ह्या भावनेपायी बरेचसे विवाह टिकून राहणार. राहिली गोष्ट आदर्श संसाराच्या शोधाची. मृगजळाच्या शोधाप्रमाणे त्याचा शोधही चालूच राहणार.

कोलाहलाच्या पलीकडं !

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील ४ जुलै रोजी ९ टक्क्यांवर आलेली पाण्याची पातळी ८८.०९ वगैरे टक्क्यांवर आली आहे असं आता सकाळी वर्तमानपत्र...