एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावरील चित्रपटाची चांगल्या पद्धतीनं निर्मिती केल्याबद्दल 'क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम' च्या सर्व चमूचे अभिनंदन! ह्या वाक्यातील मनःपुर्वक शब्दाचा वापर हेतुपुरस्सर टाळला आहे त्याची कारणे पोस्टच्या पुढील भागात उलगडतील अशी आशा !
ह्या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित बरेचजण ह्या विषयावर प्रत्यक्ष आयुष्यातही अगदी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यामुळं ह्या चित्रपटाविषयी फार मोठ्या अपेक्षा बाळगुन गेलो होतो.
सकारात्मक परीक्षण
१. सचिन खेडेकर ह्यांनी चित्रपटाच्या शेवटच्या काही मिनिटांत प्रसारमाध्यमांसमोर व्यक्त केलेलं मनोगत हा ह्या चित्रपटाचा सर्वोच्च बिंदु! मराठी माध्यमाच्या शाळा का टिकायला हव्यात ह्याची कारणमीमांसा अत्यंत तर्कशुध्दपणे त्यांनी मांडली. योग्य त्या परवानगीनिशी हे मनोगत समाजमाध्यमांवर प्रसिद्ध व्हायला हवं. मुलांना मातृभाषेत शिकविलेल्या संकल्पना अत्यंत सखोल पद्धतीनं समजतात हा मुद्दा बऱ्याच जणांनी आधी मांडुन झाला आहे. पण आंतरराष्ट्रीय बोर्ड आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासाला, मराठी संस्कृतीला मुलांपर्यंत पोहोचु देतच नाहीत हा अत्यंत महत्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. खरेतर ह्या मुद्द्यावर भारतातील सर्व राज्यातील लोकांनी एकत्र येऊन बदल घडविण्याचा प्रयत्न करायला हवा.
२. चित्रपट राज्यातील मराठी शाळा कशा झपाट्यानं बंद पडत आहेत ह्याची सखोल आकडेवारी क्षणभर का होईना आपल्यासमोर मांडतो.
३. मराठी भाषेच्या शाळा बंद पडण्यामागं आर्थिक कारणं कोणत्या प्रकारे जोडली गेली आहेत ह्याचं विश्लेषण सुद्धा चित्रपट आपल्यासमोर मांडतो.
४. बहुसंख्य मराठी भाषिक लोकांनी, त्यांच्या खासकरून इंग्लिश माध्यमात शिकलेल्या / शिकत असलेल्या मुलामुलांनी हा चित्रपट पाहिल्यास नक्कीच त्यांना एक महत्वाचा दृष्टिकोन मिळेल!
५. मराठी माध्यमाच्या शाळा टिकविणे ही केवळ सरकारची जबाबदारी नसुन सर्व नागरिकांचा त्यात सहभाग असायला हवा हा एक संदेश चित्रपट देतो. त्याच वेळी इंग्लिश माध्यमात मुलांना प्रवेश घेण्यामागची पालकांची जी रास्त कारणे आहेत ती सुद्धा चित्रपट आपल्यासमोर आणतो.
टीकात्मक परीक्षण
१. एक अत्यंत महत्त्वाचा विषय, चिन्मयी सुमितसारख्या ह्या विषयावर तळमळीनं काम करणाऱ्या जाणकारांचा चित्रपट निर्मितीमधील सहभाग ह्या अनुकूल गोष्टी असून देखील चित्रपटाचा बहुतांश भाग हा सवंग लोकप्रियतेसाठी चित्रीत केला गेला आहे असं मला वाटत राहिलं. सचिन खेडेकरांचे जे मनोगत अगदी चित्रपटाच्या शेवटी आपल्यासमोर येतं त्यातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर बौद्धिक चर्चा संपुर्ण चित्रपटभर करण्याची उत्तम संधी दवडण्यात आली आहे. ह्या कंपूला बौद्धिक विरोध करणारा त्यांचा सहकारी पहिल्या चर्चेनंतर विरोधी मते न पटल्याने निघुन जातो तो कायमचाच ! त्याचं पात्र चित्रपटभर ठेवून एक चांगली चर्चा घडवून आणण्याची संधी गमावण्यात आली आहे.
२. वीस वर्षांपूर्वी दोन मुलं, एक मुलगी नाईट आउट साठी पुरातन वास्तुत जातात हा न पटणारा संदर्भ चित्रपट देतो. विद्यार्थ्यांचा शिक्षिकेवर असलेला क्रश दाखविणं किमान ह्या विषयाच्या चित्रपटात टाळता आलं असतं.
३. चित्रपटातील बरीचशी पात्रं वीस - पंचवीस वर्षांच्या कालावधीत तीच ठेवली असता सायली संजीवची निर्मिती सावंत कशी झाली हे न उलगडणारं कोडं आपल्या मेंदुचा भुगा करत राहतं.
४. का कोणास ठावूक पण सचिन खेडेकर ह्यांचा अभिनय मला कधीच आवडला नाही. आपण चित्रपटातील बाकी कलाकारांपेक्षा काहीसे श्रेष्ठ असं त्यांना वाटत असावं असा मला भास होत राहतो.
माझं मत
१. मराठी माध्यमाच्या शाळा पुढे दीर्घकाळ चालवता येण्यासाठी समाजाला प्रचंड इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे. जर आपली अर्थव्यवस्था स्थानिक उद्योगधंद्यांवर अवलंबुन असती, युवकांना त्यांच्या नोकऱ्या शाबूत ठेवण्यासाठी आपल्या संस्कृतीचं ज्ञान असणं आवश्यक असतं तर मराठी / इतर स्थानिक भाषेच्या शाळा आपसुक सुरु राहिल्या असत्या. पण आपण राहतो त्या समाजातील जवळपास ८० % नोकऱ्या पाश्चात्य अर्थव्यवस्थेंवर अवलंबुन आहेत. हा एक मोठा प्रतिकुल घटक आहे.
२. सचिन खेडेकरांच्या भाषणातील एक मुद्दा उचलुन मी एक विचार मांडू इच्छितो. मराठी माध्यमाच्या शाळा आपल्याला का टिकवायच्या आहेत? ह्याचं नक्की कारण आपण जाणुन घ्यायला हवं. खेडेकरांनी म्हटल्याप्रमाणं आपला दैदिप्यमान इतिहास, संस्कृती ह्याची ओळख आपल्या पुढील पिढ्यांना होत राहायला हवी, मराठी भाषेचं सखोल वैभव आपल्या पुढील पिढयांना ज्ञात असायला हवं. मग सध्या पेव फुटलेल्या शाळांमधुनच मराठीचे सखोल ज्ञान देण्यावर, आपल्या संस्कृतीचा / इतिहासाचा सखोल परिचय करून देण्यावर आपण पूर्ण लक्ष केंद्रित केलं तर? स्थानिक इतिहास सुद्धा मराठी भाषेत शिकवा बाकी विज्ञान, गणित हे विषय इंग्लिश भाषेत शिकवणं सुरु ठेवा ! बघा मंडळी विचार करून पहा! पुर्ण मराठी माध्यमाच्या शाळांमधून आपल्या पिढीनं अनुभवलेली निरागसता काळाच्या उदरात केव्हाच गडप झाली आहे, आता आपण मराठी माध्यमाच्या शाळा जरी टिकवू शकलो तरी ही निरागसता परत आणू शकणार नाहीत.
३. माझा बालवाडीपासूनचा शालेय मित्र अनुप २००९ - २०१० च्या आसपास म्हणाला होता. शाळेतुन बाहेर पडल्यावर काही गोष्टी unlearn कराव्या लागल्या होत्या असं काहीसं तो म्हणाला होता. अगदी बरोबर होतं त्याचं म्हणणं! शाळेत शिकवलं जाणारं सर्व काही बरोबर, मोठ्या लोकांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट बरोबर, त्याला आव्हान देऊ नये अशा काही गोष्टी अशी काहीशी मानसिकता मराठी माध्यमाच्या शाळांनी कदाचित निर्माण केली. हल्लीच्या जगात ही मानसिकता काही प्रसंगी दूर ठेवणं आवश्यक बनतं. मराठी माध्यमाच्या शाळेत शिकुन माझं काही बिघडलं नाही, मी बघा किती उच्च पदावर पोहोचलो असं म्हणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीविषयी मला आदर आहेच, पण जर इंग्लिश माध्यमात मी शिकलो असतो तर ह्यापेक्षा देखील अजुन पुढे गेलो असतो का असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारून पाहावा ही माझी नम्र विनंती !
बाकी मुंबई मेट्रोच्या स्टेशनातून बाहेर पडणारी मार्गिका थेट चकचकीत मॉलच्या दुसऱ्या मजल्यावर प्रवेश करते हे पाहुन माझा ऊर भरून आला. तो अवाढव्य आवाका असलेला मॉल शनिवारी संध्याकाळी सुद्धा काही प्रमाणात ओसाड होता, हे पाहून मनाला बरं वाटलं म्हणजे लोक सायंकाळी घरी मराठी पुस्तकांचं कुटुंबासोबत वाचन वगैरे करीत असतील असे विचार मनात आले!
