सिनेमा पडदा / प्रोजेक्टर व्यावसायिक - त्या काळात रमेदी विभागातील तेली कुटुंबीय, पारनाक्यावरील भाटकर कुटुंबीय आणि होळीवरील फडके हे तीन व्यावसायिक वसई गांव आणि भोवतालच्या परिसरात सिनेमा पडदा / प्रोजेक्टर ही सेवा पुरवत असत.
तत्कालीन वसई ग्रामस्थांच्या मनोरंजन विश्वात पडद्यावर दाखविले जाणारे चित्रपट अगदी महत्वाचे स्थान बाळगून होते. त्यामुळं कामगारदिनानिमित्त होणाऱ्या सत्यनारायण पूजेनंतर रात्री कोणता चित्रपट दाखवावा, गावातील तीन व्यवसायिकांपैकी कोणाकडून ही सेवा उपलब्ध करून घ्यावी हे निर्णय घेण्यासाठी कार्यकारी मंडळ घमासान चर्चा करत असे. घमासान हे विशेषण शक्यतो युद्धाच्या संदर्भात वापरलं जातं. कालच्या चॅटवर हे विशेषण चर्चेसाठी वापरण्यात आलं. ह्यावरून ह्या चर्चेची तीव्रता, त्यात गुंतल्या गेलेल्या भावना ह्याचा अंदाज बांधता येतो.
ह्या व्यावसायिकांच्या निवड प्रकियेमध्ये त्यांच्याकडं जातीने जाऊन उपलब्ध असलेल्या चित्रपटांची यादी पाहणे, प्रिंटचा दर्जावर कार्यकारी मंडळातील सदस्यांमध्ये होणारे बौद्धिक हे अत्यंत महत्वाचे टप्पे असत. चित्रपट मराठी असावा की हिंदी ह्यावरून सभासदांमध्ये दोन तट पडत. इंग्लिश चित्रपट सार्वजनिक ठिकाणी कुटुंबासमोर दाखवू नये हे तारतम्य सर्व सभासद बाळगून असल्यानं तिसरा तट पडत नसे. मराठी विरुद्ध हिंदी वादाला शमविण्यासाठी आळीतील जुनीजाणती मंडळी पुढाकार घेत असत.
आळीतील बालगोपाळांचा ह्या पिक्चरच्या निवडप्रक्रियेत सहभाग नसला तरी सत्यनारायणाच्या पूजेची वर्गणी गोळा करण्यासाठी ही मंडळी आपल्या आळीबाहेर, वडीलधारी मंडळींनी आखून दिलेल्या हद्दीबाहेर जाऊन सुद्धा वर्गणी गोळा करत असत. त्यांच्या ह्या व्रात्य हरकतींमुळं वसईतील दोन आळींमधील गुण्यागोविंदाच्या संबंधांना बाधा आल्याचं उदाहरण ऐतिहासिक बखरींमध्ये आढळत नाही.
एप्रिल महिन्यात तत्कालीन वसईतील शालेय मुलांच्या जीवनात आळीत दोन किंवा तीन शिफ्टमध्ये रबरी चेंडूने क्रिकेट खेळणे, गोळेवाल्याकडून दहा पैशाला एक गोळा (अधिक रंगासहित) खाणे, शेजारच्या आळीतील कैऱ्या दगडानं पाडून त्यात मसाला, मीठ टाकून कोशिंबीर (हा अगदी पांढरपेशा मराठी शब्द झाला) करून खाणं वा पन्हं बनवून पिणं आणि तीस एप्रिलला घोषित होणाऱ्या निकालाची वाट पाहणं ह्याव्यतिरिक्त फारसं काही इंटरेस्टिंग नसल्यानं कामगारदिनानिमित्त दाखविल्या जाणाऱ्या ह्या चित्रपटांशी संबंधित घडामोडी एप्रिल महिना थोडाफार मनोरंजक बनवत असत. पूजेनंतर झालेल्या प्रीमियर शो नंतर उर्वरित सुट्टी ह्या शोच्या आठवणी आळवण्यात जाई.
अजूनही तेली कुटुंब डिजिटल प्रोजेक्टर, स्क्रीन, डिजिटल पडदा भाड्याने देण्याच्या व्यवसायात आहेत. फक्त सिनेमा ग्राहकांनी निवडायचा आणि त्यांनीच स्वतःच्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉप वरून प्रोजेक्टरला कनेक्ट करायचा हे बदल घडून आले आहेत.
सार्वजनिक ठिकाणी पडदा उभारून पिक्चर दाखवणारी वसईतील प्रसिद्ध ठिकाणं
इथं बऱ्याच वेळा सिनेमा ऐवजी पिक्चर ह्या शब्दाचा जाणीवपूर्वक वापर करण्यात आला आहे. तत्कालीन बरेच नागरिक पिक्चर हाच शब्दप्रयोग करीत.
- कोळीवाडा, पोलीस लाईन, पारनाका ह्या ठिकाणी असे सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित होणारे चित्रपट पाहता येत असत.
- खोचीवडा, भंडारआळी, नायगाव, दरपाळे, खोचीवडा कोळीवाडा, किरवली, पापडी बाजार, पापडी ब्राह्मणआळी, वसई पारनाका, प्रभूआळी, झेंडा बाजार, चोबारे, चणेबोरी, भुईगांव ह्या ठिकाणी सुद्धा ह्या चित्रपटांचा आनंद लुटता येत असे.
- वसईत पूर्वी बहुतेक देवतलाव जवळ एक चंद्रलेखा नावाचे walk in थिएटर होते. तिकडे खुर्च्या नव्हत्या. जाऊन थेट जमिनीवर बसून picture बघावा लागे असे ऐकिवात आहे. लगेचच ह्या माहितीला दुजोरा देण्यात आला. "मी चंद्रलेखाला 'दुनिया मेरी जेब मे' हा सिनेमा पहायला गेलो होतो... without entry pass" असे मुख्य जाणकारांनी तात्काळ सांगितलं.
- रमेदी दत्त मंदिर इथं "वो कौन थी" हा चित्रपट पाहिल्याची आठवण काढण्यात आली.
- हनुमान जयंतीनिमित्त झेंडाबाजारात दरवर्षी जत्रा भरायची. त्यानंतर रात्री पडद्यावर सिनेमा दाखवित असत.
- झेंडाबाजारात संजय दत्तचा रॉकी चित्रपट पाहिला असल्याचं आठवतं असं जाणकार म्हणाले. ह्यावरून संजय दत्त ह्यांच्यासारखी पिळदार देहयष्टी बनविण्याची सुप्त इच्छा जाणकार बाळगून होते ह्या जुन्या दाव्याला पुष्टी मिळते.
- किल्लाबंदरला जाणारी शेवटची बस गेली की (बहुदा) रस्त्यावर पडदा उभारून चित्रपट दाखवला जात असे. उपलब्ध परिस्थितीत मार्ग कसा काढावा हे ह्या उदाहरणातून अगदी उत्तमरित्या आपल्यासमोर उभं राहतं.
- बाजीपुर कॉलेजच्या मैदानावर दरवर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या फडके, होळी ह्यांच्याकडून आणलेला भयपट दाखवला जाई. इतरांना रात्री घाबरलेले बघून भारी वाटायचे. ह्या विधान मानवी स्वभावाच्या एका महत्वाच्या पैलूचा उलगडा आपल्याला होतो. फडके ह्यांच्याकडे रामसे बंधूंच्या चित्रपटांचा भरपूर खजिना असायचा असे जाणकार म्हणाले.
- आता जिथे सुरतवाला complex आहे तिथे लहानपणी सुरतवाला चाळ होती. त्यासमोर देसाई वाडा आणि चाळ होती. "जागृती मित्र मंडळ" ही आमच्या वाड्यातली सक्रिय संस्था. गेल्या काही वर्षांपासून ते सुरतवाला इथं सार्वजनिक गणपती बसवतात. पूर्वी दरवर्षी डिसेंबर महिन्यात सकाळी वार्षिक सत्यनारायण पूजा आणि रात्री शेवटची बस गेली की पडद्यावरचा चित्रपट असे. सिध्दार्थनगर आणि पोलीस लाईन मधले लोक पडद्याच्या पलीकडे बसत ( त्यामुळे त्यांना अमिताभ right handed आणि धर्मेंद्र left handed दिसत असे). ही अत्यंत मनोरंजक माहिती पुरविण्यात आली. उलट्या बाजूनं बसून चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांना चित्रपटाचा खराखुरा आनंद मिळत असावा का ह्याविषयी जाणकारांनी आपलं मत व्यक्त करावं.
- पोलिस लाईनीत गणेशोत्सव एप्रिल-मे महिन्यांत सार्वजनिक सत्यनारायणाची पूजा असायची. ह्या दोन दिवशी पडद्यावर चित्रपट दाखवला जायचा. नंतरच्या काळात VCR आले..भाड्याने VCR आणि कॅसेट आणून रात्री तीन चित्रपट दाखवले जायचे. तरीदेखील एक दिवस मात्र पडद्यावरचा चित्रपट असायचाच. त्यावेळी शाळेला हरितालिका ते अनंत चतुर्दशी अशी सुट्टी असायची .
- आम्ही सर्व मित्र, भावंडं फाटक आळीत दरवर्षी सत्यनारायणाच्या पूजेच्या दिवशी फाटक आळीत सिनेमा बघायला जायचो. 'बॉम्बे टू गोवा' हा चित्रपट बघितलेला मला आठवतोय.
- खोचिवड्यात दरवर्षी त्यावर्षीचा सर्वात हिट पिक्चर (जसं की शोले, जानी दुश्मन, जॉनी मेरा नाम, दिवार) आणून लोकांना त्याचा आनंद लुटण्याची संधी दिली जात असे.
- माझ्या दरपाळे गावात पण मे महिन्यात पडद्यावर पिक्चर असायचा.
- वसई मार्केटमधील नगरपालिकेच्या नाट्यगृहात पुजा असताना पडद्यावर सिनेमा दाखवला जायचा.विपुल स्विट कॉर्नर ते बाफना क्लॉथचा कॉर्नर असा पडदा लावायचे. एकदा सिनेमा चालू असताना कस्टम ऑफिसर फियाटमधुन आला. पब्लिकला माहिती नव्हते. त्याला जाऊन दिलं नाही म्हणून त्याने फायरींग केले.पब्लिकने त्याची गाडी फोडली. तेव्हापासून सिनेमा बंद झाला.
- पडद्यावर सिनेमा पाहणे ही एक पर्वणीच असायची. जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तेव्हा रस्त्यावर चित्रपट बघायलाही काही वाटायचं नाही स्वतःचं आसन, पाणी आणि खाऊ घेऊन योग्य जागा निवडून बसायचं ,खरंच किती छान होते ना दिवस!
- वसईच्या मार्केटमध्ये वसईतील मोठं नाट्यगृह होते. इतरवेळी तेथे फुलवाल्या व भाजीपालावाले बसायचे.
वसईतील चित्रपटगृहं - प्रभात, जानकी, सपना, पार्वती K. T. Vision.
- त्याकाळी असलेल्या वसई विरार आणि परिसरातील थिएटरची नाव ठिकाणासहित सांगा? असा प्रश्न जाणकारांनी बाकी सदस्यांसमोर उपस्थित केला.
- वुडलँड - विरार, धनंजय (नालासोपारा), पार्वती व के. टी. विज़न (वसई स्टेशन), जानकी व सपना - वसई गाव असे अचूक उत्तर तात्काळ दुसऱ्या जाणकारांनी दिलं.
- प्रभात चित्रपटगृहाचं नूतनीकरण करून त्याला मग 'जानकी' असं नांव देण्यात आलं.
- प्रभात सिनेमामध्ये कोणी कुठला सिनेमा बघितलेला आहे असा स्मरणशक्तीला ताण देणारा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला.
- प्रभात थिएटरमध्ये राज कपूरचा एक सिनेमा पाहिला होता. राज कपूरच्या मागे पोलिस किंवा गुंड लागले असतात आणि तो पळत असतो. अशी माहिती पुरविण्यात आली.
- प्रभात मध्ये मी दादा कोंडके यांचा "राम राम गंगाराम" हा पिक्चर पाहिला होता असं जाणकार म्हणाले.
- प्रभातमध्ये बघितला आहे एकच, आता नाव आठवत नाही. ह्या उत्तराला मदत करण्यासाठी जाणकार पुन्हा धावून आले. कदाचित तो "बाळा गाऊ कशी अंगाई" हा चित्रपट असावा असं मत त्यांनी व्यक्त केलं.
- जानकी चित्रपटगृह जेव्हा सुरू झाल तेव्हा पहिला सिनेमा कोणता होता? हा पुन्हा आत्यंतिक काठिण्य पातळीचा प्रश्न जाणकारांनी उपस्थित केला. थोड्याच "नसीब" हे अचूक उत्तर देण्यात आलं. जाणकारांनी लगेचच मी हा चित्रपट FDFS पाहिला होता ही मौल्यवान माहिती पुरवली. FDFS म्हणजे First Day First Show हे उमगायला मला बराच वेळ लागला. FDFS ची हौस पुरविण्यासाठी अडीच रुपयांचं तिकीट दहा रुपयाला घेतलं होतं असे जाणकार म्हणाले. तत्कालीन वसईतील जीवनखर्चाचा अंदाज बांधण्याच्या दृष्टीनं ही अत्यंत मौल्यवान माहिती आहे.
- "नसीब" नंतर कर्झ हा चित्रपट होता अशी उपयुक्त माहिती पुरविण्यात आली.
- आताच मला जाणकारांनी दहावीच्या मे महिन्याच्या सुट्टीत दिलेली अजून एक मौल्यवान माहिती आठवली. फेअर आणि लव्हली क्रीम लावून तीन तास सिनेमागृहात बसल्यास चेहरा अगदी उजळून निघतो असं ते त्यावेळी म्हणाले होते.
- त्याकाळी शाळेतर्फे सुद्धा मुलांना जानकी आणि सपना चित्रपटगृहात निवडक चित्रपट पाहण्यासाठी नेण्यात येत असे.
- शिवाजी महाराजांच्या जीवनावरील चित्रपट दाखविण्यात आला होता.
- "श्यामची आई, लॉरेन अँड हार्डी हे सपना येथे तर रॉबिनहूड हा जानकी थेटरला पाहायला गेल्याचे मला आठवते. श्यामची आई सिनेमा पाहायला गेलो होतो तेव्हा भरपूर पाऊस पडत होता" असं जाणकार म्हणाले.
- छोटा चेतन हा त्रिमितीय चित्रपट पाहण्यासाठी नेण्यात आलं होतं.
- जानकीला तिकिटं तीन प्रकारची होती. लोअर स्टॉल, अप्पर आणि बाल्कनी. मज्जा यायची. पण एक असे होते की जानकी व सपनावाले एकावेळी कधीच सारखे सारखे चित्रपट प्रदर्शित करत नसत.
- दुकानात मिळणाऱ्या शाळेच्या वह्यांवर पण चित्रपटाचे नाव असे. मला शोलेची वही आठवते.
- अनोखा बंधन चित्रपट एकानं जानकीमध्ये तर दुसऱ्यानं सपना चित्रपटगृहात पाहिला होता .
- वडील आम्हाला रवींद्र महाजनी ,अशोक सराफ ,अरुण सरनाईक यांचेच चित्रपट दाखवायचे अशी तक्रारवजा माहिती पुरवण्यात आली.
- सपना आणि जानकी ह्या दोनच टॉकीज मध्ये पिक्चर बघितलेत; पार्वती आणि के. टी. व्हिजनला कधी बघितले नाहीत. हे विधान गावातील बऱ्याच मुलांच्या बाबतीत लागू होते. सिनेमा पाहण्यासाठी खास स्टेशनला जाण्याची हौस वा चैन पुरविण्याच्या मनःस्थितीत पालक नसायचे.
- दिलीप प्रभावळकर यांचा एक डाव भुताचा हा चित्रपट जानकी टॉकीज ला पाहिला आहे.
- दादा कोंडके यांचं नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बुक मध्ये आहे. त्यांचे सलग नऊ चित्रपट गोल्डन जुबीली झालेले आहेत.
- दादा कोंडके ह्यांच्या आणि त्यांच्या चित्रपटांच्या ख्यातीमुळं त्यांचा "गनिमी कावा" हा एकमेव चित्रपट पाहिला गेल्याचं उदाहरण सामोरे आले.
- माझी आठवण - आमचं महामंडळ सव्वीस जानेवारी, एक मे अशा दिवशी जानकी थेटरमध्ये चित्रपटाचा शो आयोजित करत असत. बहुदा मोहोळ कुटुंबीय त्यांना चित्रपटगृह विनामूल्य उपलब्ध करून देत असत.
- वसई गावातील मर्यादित लोकसंख्या आणि गावातील दोनच सिनेमागृहे ह्यामुळं सुट्टीच्या दिवशी कुतूहलापोटी एखादा पिक्चर पाहायला जावं आणि नेमके शिक्षक समोर यावेत असे दुर्धर प्रसंग मित्रमंडळींवर ओढवले आहेत. अशा वेळी शिक्षकांनी बहुदा मुद्दाम कानाडोळा करून पुढं कधीच ह्या प्रसंगाची चर्चा केली नाही.
अशा चर्चा जुन्या काळातील आठवणींना उजाळा देतात. कमी पैशात जीवन कसं सुखी होतं, एकमेकांशी स्पर्धा करण्याची भावना अस्तित्वात असली तरी जाणवण्याइतकी कशी प्रखर नव्हती हे आठवून बरंही वाटतं पण त्याच वेळी आजच्या जगात जे काही मिळवलं त्यासाठी गमावलेल्या अमूल्य गोष्टींची आठवण येऊन मन खंतावतं.
युरोप सहलींचे उर्वरित भाग पुढील महिनाभरात नक्की प्रसिद्ध करण्यात येतील.