मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २६ मे, २०२४

अनियोजित महानगर वाढ आणि संभाव्य धोके !



आपल्याभोवताली सर्वत्र महानगरांचा कायापालट सुरू आहे.  जर मुंबई शहरात आपण राहत असाल तर सभोवताली मोठ्या वेगानं पसरणारे गगनचुंबी इमारतींचे जाळं, विविध ठिकाणी उभारले जाणारे उड्डाणपूल आणि सर्वत्र खणलेले रस्ते हे चित्र आपल्याला सतत दिसत राहतं.  आजच्या लेखाचा विषय मुंबई शहरात उभारल्या जाणाऱ्या गगनचुंबी इमारती आणि ह्या इमारतींना आवश्यक असणाऱ्या मूलभूत सोयींचं प्रशासनानं कसं सखोल, विचारपूर्वक नियोजन केलं पाहिजे याविषयी आहे.  

पाणीपुरवठा 

सर्वात प्रथम मुद्दा डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ह्या इमारतींमध्ये  वास्तव्य करण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी आवश्यक पाणीपुरवठ्याची तरतूद कशा प्रकारे करण्यात आली आहे? जर मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रामध्ये व्यवस्थित पाऊस पडला आणि ही वाढती लोकसंख्या ध्यानात घेऊन आखल्या गेलेल्या सर्व अतिरिक्त पाणीपुरवठाच्या योजना वेळीच पूर्ण झाल्या तर कदाचित सर्वकाही आलबेल असू शकेल.  परंतु एखाद्या वर्षी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या पाणलोट क्षेत्रावर पावसाने कृपादृष्टी केली नाही तर इतक्या प्रचंड लोकसंख्येला कसा पाणीपुरवठा करणार हा एक मोठा यक्ष प्रश्न होऊ शकतो. मुंबईच्या पाणीपुरवठ्याला प्राधान्य देऊन बाकीच्या शहर, गावांचे पाणी मुंबईकडं खेचलं जाऊ शकतं, पण नैतिकदृष्ट्या ही चुकीची उपाययोजना आहे. 

पावसाच्या पाणीसाठवणाविषयी (Rainwater Harvesting) काही बांधकाम व्यावसायिक जागरूकता दाखवितात. परंतु ह्याची अधिक व्यापकतेने अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. ही बाब जर ऐच्छिक असेल तर ती बंधनकारक करायला हवी.  

प्लॅस्टिक वापर आणि कचरा व्यवस्थापन 

प्लॅस्टिकबंदी ही हल्ली तात्कालिक घटना बनली आहे. काही काळ अचानक प्रशासन जागं होतं आणि प्लॅस्टिकबंदी घोषित केली जाते. काही काळाने पुन्हा येरे माझ्या मागल्या असा प्रकार दिसून येतो. उंच इमारतीमधील रहिवाशी सुजाण असल्याची आशा आपण करू शकतो. त्यामुळं त्यांनी ह्याबाबतीत जागरूकता दाखवावी ह्यासाठी खास प्रयत्न केले जावेत. 

सुका आणि ओला कचरा असे वर्गीकरण करून मगच तो कचरापेटीपर्यंत पोहोचावा ह्याबाबत सुद्धा हीच गोष्ट दिसून येते. ह्या बाबतीत अत्यंत कडक नियम लागू का केले जात नाहीत ही माझ्या समजुतीपलीकडली गोष्ट आहे. दैनंदिन दिवसात जर प्रत्येक नागरिकाने ह्यासाठी काही मिनिटं राखून ठेवली तर पर्यावरण हानी वाचविण्यासाठी आपण मोठा हातभार लावू शकतो. 

विद्युतपुरवठा 

मुंबई शहरातील उन्हाळा हा अत्यंत दाहक होऊ लागला आहे. पूर्वी केवळ मे महिन्यात AC सुरु व्हायचे, पण हल्ली वर्षातील अनेक महिन्यात वातानुकूलित यंत्रणेशिवाय घरात बसणे जवळपास अशक्य होऊ लागले आहे. नवीन पिढीनं शाळेपासूनच वातानुकूलित यंत्रणेनं थंड केलेल्या वर्गात दिवस काढल्याने त्यांना AC शिवाय घरात बसणं म्हणजे मानवाधिकार हक्कांची पायमल्ली वगैरे प्रकार वाटू शकतो.  या इमारतींमध्ये प्रचंड संख्येने निर्माण झालेल्या सदनिकांची वातानुकूलित यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी अत्यंत मोठ्या  प्रमाणात अधिक विद्युतनिर्मिती करणे आवश्यक आहे. ह्या अत्याधुनिक घरांना प्रत्येक गोष्टीसाठी विद्युत पुरवठ्याची गरज लागते.  त्याच बरोबर या बऱ्याच  इमारतींमध्ये पार्किंगसाठी पहिले सात-आठ मजले राखून ठेवण्यात येतात.  बऱ्याच इमारतीमध्ये त्यातील रहिवाशांच्या कार या उद्वाहकाच्या साहाय्यानं वर खाली केल्या जातात. 

इमारतींमध्ये रहिवाशांना, इस्त्रीवाले, झोमॅटो, ऍमेझॉन डिलिव्हरी मुले ह्या सर्वांना वर खाली आणण्यासाठी उद्वाहकांना सतत मोठ्या प्रमाणात वीजपुरवठा करावा लागतो.  मुंबई शहराला हा इतका अतिरिक्त विद्युतपुरवठा सातत्यानं २४ तास करणे शक्य होणार आहे का याचा विचार करणे खूप गरजेचे झाले आहे. 

आपत्कालीन नियोजन (डिझास्टर मॅनेजमेंट) हे एक सद्यकाळातील अत्यावश्यक तंत्र आहे.  ज्या काळी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते त्यावेळी विविध मूलभूत सुविधा कशा सुरळीतपणे चालू ठेवल्या जाऊ शकतील, अशा वेळी निर्णय घेण्याचे अधिकार नक्की कोणाकडे असतील याविषयी अत्यंत बारकाव्यांनिशी  नियोजन करणे आवश्यक असते. हे नियोजन लिखित स्वरूपात असणं आणि आपत्कालीन परिस्थिती घोषित करणाऱ्या अधिकारी व्यक्तीची निवड करणे ह्या सर्व गोष्टी सुस्पष्ट असाव्यात, वेळोवेळी त्यांची तपासणी करून त्यांना अचूक स्वरूपात ठेवायला हवं. 

मुंबईला विद्युतपुरवठा करणारी यंत्रणा जर काही मिनिटं किंवा तासांकरता  खंडित झाली तर या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या जीवनावर त्याचा कसा परिणाम होईल याचा सखोल अभ्यास कशा पद्धतीने केले करण्यात आला आहे हे सर्व नागरिकांना माहीत असणे आवश्यक आहे.  साधा मुद्दा म्हणजे जर विद्युत पुरवठा खंडित झाला आणि बॅकअप प्लॅन म्हणून असलेली जनित्र यंत्रणा सुद्धा जर बंद पडली तर उंचावरील मजल्यावर राहणाऱ्या वयोवृद्ध नागरिकांना आणीबाणीची परिस्थितीत सुरक्षितरित्या कसं खाली आणता येईल ह्याचं नियोजन झालेलं असणं आवश्यक आहे. 

वाहतुकीवर पडणारा अतिरिक्त ताण 

या इमारतींमध्ये प्रत्येक सदनिकेत सरासरी दीड ते दोन कार असणार. ही सर्व वाहने सकाळी किंवा संध्याकाळी गर्दीच्या वेळी एकत्र रस्त्यावर आली तर त्या रस्त्यांची क्षमता हा अतिरिक्त ताण सहन करण्यासाठी सक्षम आहे का याचा विचार कितपत करण्यात आला आहे? प्रशासनाला सतत रस्ते खोदून ठेवण्याची सवय आहे.  रस्त्याच्या एका भागात थोडं जरी खणकाम केलं तरी  बराच लांबवर त्याचे परिणाम जाणवतात.  या उंच मजल्यांच्या इमारतींच्या आसपास ही वाहतूक कोंडी होण्याचे प्रमाण आता अत्यंत वारंवारतेने दिसून येणार आहे. अशावेळी रुग्णवाहिका, अग्निशमनदलाची वाहने ह्यांना आपल्या लक्ष्य असलेल्या ठिकाणी पोहचण्यास विलंब होऊ शकतो जो जीवघेणा ठरू शकतो. 

अग्निशमन दलावर पडणारा ताण 

सात ते आठ मजली उंच इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर पोहोचण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रणा मुंबई अग्निशामक दलाकडे आहे. त्यांनी अशा इमारतींमध्ये अग्निशमन करण्याचे आपले कौशल्य वारंवार प्रदर्शित केले आहे. आपल्या सर्वांना त्याचा यथार्थ अभिमान आहे,  परंतु आता मुंबई शहराच्या विविध भागांच्या उंच इमारती झाल्या आहेत की एकाच वेळी समजा तीन चार ठिकाणी दुर्दैवाने अशा उंच इमारतींमध्ये आग लागली तर मुंबई अग्निशमन दलाकडे  या आगी विझवण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात लागणारं मनुष्यबळ आणि यंत्रणा देखील उपलब्ध आहे का याचा कोणी विचार केला आहे का?

नागरिकांचे मनोस्वास्थ  
अशा इमारतींमध्ये राहणाऱ्या एकट्या राहणाऱ्या वयस्कर नागरिकांच्या मनोस्वास्थ्याचा सखोल विचार करायला हवा? पाचव्या सहाव्या मजल्यावर राहताना  आपण जमिनीजवळ असल्याची भावना सुखदायक असते. काही अनिष्ट प्रकार घडला तर कसे का होईना आपण खालच्या मजल्यापर्यंत पोहोचू शकतो असा आत्मविश्वास किमान सत्तरीपर्यंच्या नागरिकांमध्ये तरी असतो.  परंतु समजा असे नागरिक पन्नासाव्या मजल्यावर राहत असतील तर मात्र त्यांच्या मनात हे भय सदैव राहणार की काही अनिष्ट प्रसंग उठवला तर आपण कसे खाली पोहोचू शकतो?  त्याच बरोबर या मजल्यांवर जो सतत वेगानं वारा वाहत असतो त्याचे परिणाम कसे होतात हे येणारा काळच आपल्याला सांगेल. 

गगनचुंबी इमारतींचा भविष्यातील पुनर्विकास  
साधारणता १९८० - ९० साली बांधण्यात आलेल्या इमारती आता पुनर्विकासासाठी जात आहेत.  त्या इमारतींना ज्यावेळी उद्ध्वस्त केले जाते त्यावेळी जे  सिमेंट, स्टील आणि अतिरिक्त सामानाचे जे भंगार निर्माण होतं ते शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड वर टाकलं जातं.  आज निर्माण होणाऱ्या या तीस - चाळीस मजल्याच्या इमारती पुढील ५० वर्षानंतर ज्यावेळी पुनर्विकासासाठी जातील त्यावेळी निर्माण होणारा बांधकाम साहित्याचा हा अतिरिक्त भार आपल्या जमिनीवर किती प्रदूषणाचे ओझे निर्माण करणार आहे केवळ याचा विचारच असह्य होतो. 

मुलांसाठी मोकळी मैदानं 

ह्या सर्व उंच इमारतीमुळं लोकसंख्येचं केंद्रीकरण होत आहे. ह्या एकत्रित लोकसंख्येला आवश्यक मैदानं आपण पुरवत आहोत का? कमी मैदानांमुळं मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना चालण्यासाठी मोकळ्या जागांची कमतरता भासणार आहे. वातानुकूलित व्यायामशाळेतील व्यायाम सर्वांनाच परवडणारा नसतो आणि तसंही म्हटलं तर मोकळ्या जागेतील खेळण्याचालण्याशी त्याची तुलना होऊ शकत नाही. 

सारांश 

आपल्याभोवताली  शहरात अनेक गोष्टी चुकीच्या पद्धतीने घडत आहेत. त्या आपल्याला दिसतात, जाणवतात.  परंतु आपल्याला त्याविषयी फारसं काही बोलता येत नाही.  कारण हे असंच होणार हे सर्वांनी एकंदरीत गृहीत धरले आहे की काय अशी भोवतालची परिस्थिती आहे.  परंतु ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते त्यावेळी मात्र मग या सर्वांना माहीत असलेल्या गोष्टीच या दुर्घटनेस कारणीभूत ठरल्या आहेत हे जाणवतं.  मुंबई शहर आणि त्यात या झपाट्याने वाढणाऱ्या गगनचुंबी  इमारती या अशा अनेक समस्यांचे मूळ बनणार आहेत.  या संभाव्य समस्यांची प्रशासनास जाण आहे का, प्रशासनानं आपत्कालीन नियोजन किती सखोलपणे केले आहे आणि त्या नियोजनाचे ऑडिट करण्यात आले आहे काय हेच मुद्दे आज मला या पोस्टद्वारे मांडायचे आहेत. नागरिकांच्या बाजूनं विचार करायचा झाला तर भविष्यात मुंबई शहरात राहण्यासाठी आवश्यक असलेली मानसिक कणखरता आपण दाखवू शकतो ह्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करणं आवश्यक आहे. 

मुंबई हे राहण्यासाठी गेली शंभर - दीडशे वर्षे एक उत्तम नगर, महानगर होतं. ह्या शहरात आपल्या पुढील पिढीसाठी एका किमान दर्जाच्या आयुष्याची तजवीज करून ठेवणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.  

शनिवार, ११ मे, २०२४

नाच ग घुमा !

 

शहरी दैनंदिन जीवनातील एक अविभाज्य घटक असणाऱ्या, घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांवर आधारित हा एक सुरेख चित्रपट!  नम्रता संभेराव, मुक्ता बर्वे आणि सारंग साठ्ये ह्यांच्या नितांत सुंदर अभिनयानं सजलेला हा चित्रपट एक महत्वाचा सामाजिक विषय आपल्यासमोर मांडतो. 

आपल्या घरात घरकामासाठी आपल्या मदतीला येणारी स्त्री आपला स्वतःचा संसार सांभाळून, घरकामं आटपून मगच आपल्या घरी येत असते हे आपल्या सर्वांना मनाच्या एका कोपऱ्यात ठाऊक असतं. पण जेव्हा दैनंदिन दिवसाच्या वेळापत्रकाशी जुळवून घेतानाची तारेवरची कसरत सुरु होते त्यावेळी ह्या गोष्टीचा विसर पडतो. कदाचित घरच्या स्त्रीच्या तोंडून ह्या स्त्रियांना बोलणी ऐकावी लागतात. ही बोलणी उशिरा येण्यावरून, छोट्या चुकांवरून असू शकतात. दुसऱ्यांच्या घरात जाऊन काम करत असताना अशी बोलणी करणं हे किती अपमानास्पद असू शकतं ह्याची जाणीव हा चित्रपट करुन देतो. बऱ्याच वेळेला घरकामात मदत करणाऱ्या ह्या स्त्रियांची गावाकडील घरं बऱ्यापैकी मध्यमवर्गीय असतात. परंतु तिथं उदरनिर्वाहाचं माध्यम उपलब्ध नसल्यानं नाईलाजानं त्यांना शहरात स्थलांतर करावं लागतं. इथलं राहणीमान एकट्याच्या पगारात परवडण्यासारखं नसल्यानं मग ह्या स्त्रियांना ही कामं स्वीकारावी लागतात. 

चित्रपटात दाखविल्याप्रमाणं एकदा का घरातील स्त्री आणि ह्या घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांचे भावबंध जुळले की ह्या स्त्रिया अगदी आपल्या स्वतःच्या घराप्रमाणं ह्या घरातील कामं करतात. चित्रपटात म्हटल्याप्रमाणं मुक्ता बर्वे कधी घरातील कपाटांना कुलुपं लावत नाही, आपल्या मुलीला बिनधास्त नम्रताच्या स्वाधीन करून जाते, मुलीच्या शाळेत आपल्यानंतर नम्रताचा फोन नंबर देते. हे सारं पैशाच्या पलीकडील असतं. आणि हो ह्या स्त्रियांच्या अचानक घेतलेल्या सुट्टयांमुळं त्यांचा पगार कमी करण्याचं कठोर कृत्य टाळावे. तुम्हांला ह्या पगारात कपात केल्यानं / न केल्यानं फारसा फरक पडत नाही, पण त्यांना त्यांच्या संसारात मोठा फरक पडू शकतो हे लक्षात ठेवावं. 

मुंबईतील प्रत्येक स्त्रीनं बघावा असा हा चित्रपट! Empathy (कल्पनेनं दुसऱ्याच्या अंतरंगात शिरून त्या व्यक्तीच्या भावना जाणून घेण्याची कुवत!) ही भावना ह्या स्त्रियांच्या बाबतीत दाखवावी ही जाणीव हा चित्रपट अगदी सुरेखपणे दर्शकांना करून देतो. चित्रपटाचे सादरीकरण अगदी परिपूर्ण नसले तरीही मुख्य संदेश, ही जाणीव दर्शकांपर्यंत अगदी अचूकपणे पोहोचवतो. बाकी ह्या संपूर्ण पोस्टमध्ये ह्या घरकामात मदत करणाऱ्या स्त्रियांना ज्या नेहमीच्या संज्ञेने संबोधिले जाते त्याचा वापर मी हेतुपूर्वक टाळला आहे. त्यांना सन्मानानं वागणूक देण्याच्या प्रक्रियेतील ह्या संज्ञांचा वापर न करणे ही पहिली पायरी असू शकते. 

 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...