सुट्टीमय आठवडा !
या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली. सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन दिवसाची साप्ताहिक सुट्टी मिळण्याचा प्रसंग अत्यंत विरळाच! यामुळे मधला कामाचा आठवडा देखील फक्त तीन दिवसाचा झाला. त्यानिमित्ताने बऱ्याच जणांनी आपल्या स्वतःच्या सुट्ट्यांचा वापर करून एक मोठी सुट्टी स्वतःला बहाल करून घेतली. मला मात्र या दोन तीन दिवसांच्या सुट्ट्यांवर समाधान मानणे इष्ट वाटले.
गेल्या शनिवारी कारने वसईला जाताना मुंबई अहमदाबाद महामार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागलं. ह्या महामार्गाचे काँक्रेटीकरण केले जात असल्यानं आणि मोठाले ट्रक रस्त्यावर एकदम आल्यानं ही वाहतूक कोंडी झाली होती. एक तासाचा प्रवास तीन तासांचा झाला. भविष्यातील सुखांसाठी वर्तमानकाळातील कष्टांना तोंड द्यावं लागतं हे समजावत मागील पिढीप्रमाणं ह्या पिढीचं देखील आयुष्य व्यतित होणार हे नक्की !
दुसऱ्या तीन दिवसाच्या साप्ताहिक सुट्टीचा काल पहिला दिवस होता. तीन दिवस सुट्टी आली की चिंतन संमेलन घोषित करावे असे मी स्वतःला बजावतो. या वेळेला तिन्ही दिवस घरात बसून काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माणसांना जर सुखी राहायचं असेल तर त्यांना शांतपणे घरात बसता येता यावं या तत्त्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे. या तत्त्वांमध्ये अजून काही उपतत्त्वांचा समावेश करता येऊ शकतो. जसे की तिन्ही दिवसात झोमॅटो, स्विगीवरून काहीही न मागवणे, आयपीएल सामने अधूनमधून बघावेत पण त्यात अजिबात गुंतून जाऊ नये. आज सुट्टीच्या दुसऱ्या दिवशी मनात आलेले हे विविध विचार.
आधुनिक आहार - वैद्यकीय साखळी!
शालेय अभ्यासक्रमात जैवसाखळीचे चित्र विज्ञान विषयात समाविष्ट असायचे. सूर्यकिरणांपासून वनस्पतींना मिळणारी ऊर्जा, त्याचा वापर करून हरितद्रव्याच्या माध्यमातून वाढणाऱ्या वनस्पती, त्या वनस्पतीवर उपजीविका करणारे शाकाहारी जीव, शाकाहारी जीवांवर उपजीविका करणारे मांसाहारी प्राणी वगैरे वगैरे... याच जैवसाखळीचा संदर्भ घेऊन आजच्या आधुनिक शहरातील दोन नवीन साखळीचे उदाहरण द्यावेसे वाटते.
पहिली म्हणजे प्रोटीनचा आहारात वापर करून मग जिममध्ये जाणं ही एक साखळी. ही थोडीफार आरोग्यदायी साखळी असे म्हणता येईल. पण यातही शरीरावर सतत जड अन्न पचवण्याचा भार पडत असावा.
दुसरी साखळी म्हणजे मुंबईसारख्या शहरांतील मोजक्या जागेतील घरात सोफ्यावर बसून / बिछान्यात लोळत भ्रमणध्वनी, स्मार्ट टिव्ही वगैरे माध्यमातून सतत वेब सिरीज, सिनेमा यांचा आनंद घेत झोमॅटो, स्वीगीवरून मागवलेल्या तेलकट, खारट पदार्थांचे सेवन करणे. हे सर्व अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागताच विविध वैद्यकीय चाचण्या करणं आणि विविध औषधांच्या आहारी जाणं. हे सर्व टाळायचं असेल तर आपण सर्व घरी बनवलेलं साधंसुधं अन्न ग्रहण करण्याची शिस्त का दाखवू शकत नाही हा एक मूलभूत प्रश्न निर्माण होतो. आपल्याला जिभेवर नियंत्रण ठेवता न आल्यामुळे या सर्व समस्या निर्माण होत आहेत याची जाणीव दुर्दैवाने आपणा सर्वांना नाही.
दुधी, पडवळ, शिराळा, गलका, तोंडली ह्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश केल्यास, संध्याकाळचे स्नॅक्स न घेता आठच्या आत मोजकं जेवल्यास भले तुम्ही अरनॉल्ड होणार नाहीत पण तब्येत प्रसन्न राहील आणि सकाळी उठताच तुम्हांला कडकडून भूक लागलेली असेल.
महानगरातील प्रवास - सुखदुःखाचा संमिश्र अनुभव
मुंबई शहरात फिरताना संताप निर्माण होण्याची शक्यता जवळपास ७० टक्के असावी असा माझा कयास आहे. हे सर्व मुंबईत सर्वत्र खणल्या गेलेल्या रस्त्यांमुळे होत असावं. बहुतांशी रस्ते वारंवार परतपरत का खोदावे लागतात हे माझ्याप्रमाणेच अनेक मुंबईकरांना पडलेले कोडे! या रस्त्यांच्या खणण्यामागं आणि त्यानंतरच्या त्यांच्या बुजविण्यामागं मोठं अर्थकारण दडलेलं आहे हे एक मोठं उघड गुपीत आहे. ह्यामुळं जिथं तीन मार्गिकांच्या दोन, किंवा दोनांच्या एक मार्गिका होतात त्यावेळी दोन सेकंदाआधी रडारवर कुठेही नसलेला रिक्षावाला अचानक डाव्या बाजूनं येऊन आपल्याला कट देऊन जातोच वर छद्मी हास्य सुद्धा देतो. अशावेळी तोंडी अपशब्द येऊ नयेत ह्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागते.
परंतु मेट्रोचा प्रवास करताना मात्र आपल्याला काहीसं बरं वाटतं. मुंबईतील उन्हाळा आत्ताच सुरू झाला आहे. त्यात वर उल्लेखल्याप्रमाणं खणलेल्या रस्त्यांमुळे सर्वत्र वाहतूक कोंडी झालेली आहे. अशावेळी आपण थंडगार मेट्रोमध्ये बसून आगाऊ रिक्षावाल्यांशी हुज्जत न घालता शांतपणे आपल्या कार्यालयात पोहचू शकतो यासारखे सुख नाही.
मेट्रोमध्ये विविध प्रकारचे लोक भेटतात. त्यातील वानगीदाखल दिलेली ही काही उदाहरणे! तीन चार आठवड्यापूर्वी एक कॉलेजकुमारी आणि तिचा मित्र माझ्या बाजूला बसले होते. भोवतालच्या अर्ध्या डब्याला ऐकू जाईल इतक्या मोठ्या आवाजात ती कॉलेजकुमारी आपल्या आत्तापर्यंतच्या तीन अयशस्वी नात्यांविषयी त्या मित्राला सांगत होती. आपल्या परीने ही सर्व नाती टिकवण्याचा मी कसा प्रयत्न केला आणि तरीही ही का यशस्वी झाली नाहीत हा प्रश्न ती त्या मित्राला विचारत होती. माझ्यातच काही प्रश्न नाही ना असा प्रश्न तिनं त्याला विचारला. त्याला उत्तर न सुचल्यानं त्यानं तिला आपला रुमाल देऊ केला.
दुसरी घटना. ही मेट्रो स्टेशन कधी कधी गोंधळून टाकणारी आहेत. तिथं क्वचितच तुम्हांला नक्की कोणत्या दिशेला जायचं आहे ह्याविषयी संभ्रम निर्माण होऊ शकतो. महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर एक मध्यमवर्गीय मराठी महिला मस्त मोबाईलवर गप्पा मारत बसली होती. दहिसरच्या पश्चिमेला ती मेट्रोमध्ये चढली होती आणि तिला दक्षिणेकडे असलेल्या मीठचौकीकडं जायचं होतं. तिनं आधी उत्तरेकडे जाऊन वळण घेत दक्षिणेच्या गुंदवलीला जाणारी मेट्रो पकडली. तिच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. काही वेळाने तिला भान आलं आणि मीठचौकी हे स्टेशन अजून का येत नाही. याची पृच्छा तिने सहप्रवाशांकडे केली. त्यावेळी आपण उलट्या दिशेने जाणाऱ्या मेट्रोमध्ये बसलो आहोत याचा साक्षात्कार तिला झाला. त्यानंतर तिने मीठचौकीला जाण्यासाठी नक्की काय करावे यासाठी विविध सहप्रवाशांनी तिला सूचना देण्यास सुरुवात केली. मीही त्यात सहभागी होतो. एकंदरीत सल्ले देण्यात आपल्या देशातील लोकांमध्ये सदैव उत्साह दिसून येतो. परंतु स्टेशनवर उतरून तिला योग्य मेट्रोमध्ये बसवून देण्यासाठी ना लोकांकडे वेळ होता ना माझ्याकडं !
तिसरा प्रसंग म्हणजे एका अकरा वर्षाच्या मुलीची आई आधीच्या स्टेशनवर उतरून गेली पण मुलगी मात्र मेट्रोमध्येच थांबली. आईने बहुदा आधीच्या स्टेशनवर मेट्रो अधिकाऱ्यांना कळवलं असावं. तत्परतेनं मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी पुढील स्टेशनवर संपर्क केला. ती मुलगी काही वेळापूर्वी नेमकी आमच्यासमोर उभी होती. त्या मुलीच्या वर्णनाची संपूर्ण मेट्रोमध्ये घोषणा केली गेली.मेट्रोचे तीन चार अधिकारी ज्यामध्ये महिला अधिकारी सुद्धा समाविष्ट होत्या तत्परतेने येऊन त्या मुलीला घेऊन गेले. मेट्रोचा अनुभव नक्कीच सुखावह आहे. ह्या आठवड्यात एक दिवस मी लोकल ट्रेनने यायचा निर्णय घेतला. त्यातील गर्दी, उकाडा हे सारं पाहता हा केवळ अपवादात्मक निर्णय असेल हे नक्की!
समाज प्रतिबिंब !
भोवतालच्या समाजातील मनाला खटकणारे विविध मुद्दे ! ह्यातील प्रत्येकावर खरंतर बरंच काही लिहिता येईल पण वाचकांनी आपापली मतं ठरावावीत म्हणून मी जास्त काही भाष्य करणार नाही.
- तत्वांचा, निष्ठेचा अभाव असणाऱ्या IPL स्पर्धा , राजकीय पक्षांनी लढविलेल्या निवडणुका ह्यांनी व्यापून टाकलेली प्रसारमाध्यमं !
- पंचवीस - तीस वर्षांपूर्वी माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात आलेल्या संधींच्या महासागरामुळं युवकांच्या पसंतीयादीवर खूप मागे ढकलली गेलेली पारंपरिक अभियांत्रिकी क्षेत्रं ! आणि आता chat gpt, dev in ह्या सारख्या संगणकाला प्राप्त झालेल्या आज्ञावली निर्माण करण्याच्या क्षमतेमुळं लाखोंच्या संख्येनं माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रवेश घेतलेल्या युवकांच्या मनात आलेलं अस्थिरतेचे भय. जगातील बदलांचा वेग इतका झपाट्यानं वाढला आहे की पुढं कोणतंही करिअर हे स्थिर नसणार ह्याविषयी शंका नाही. अशावेळी तुम्हांला मनोबल देणारी कुटुंबसंस्था आपणच गेल्या काही वर्षात आपल्या कर्माने नष्ट वा कमकुवत केली. पुढील पिढीला तुम्ही मुद्देसूद धीर कसा देणार ह्याची तयारी चाळीशी पार केलेल्या सर्वांनी करणं समाजस्वास्थ्यासाठी फार महत्वाचं ठरणार आहे. "घाबरू नकोस, धीर धर सर्व काही ठीक होईल !" वगैरे विधानं कामाची नाहीत. उलट आमच्या पालकांना आमच्या समस्यांची जाण नाही असा समज होऊन ही नवीन पिढी अजूनच आपल्यापासून दूर जाईल.
- व्यापक मानसिकतेचा अभाव - नवीन पिढीमध्ये नकार पचविण्याच्या क्षमतेचा अभाव आहे असं विधान करता करता कधी एक समाज म्हणून आपण सुद्धा त्याच मानसिकतेमध्ये पोहोचलो हे आपल्याला समजलं नाही. आपल्या विरोधात कुणी काही बोललं, लिहिलं की त्यांच्याशी तावातावानं वाद घालणारे आपण आपल्यालाच अनोळखी वाटू लागलो!
- मराठी व्यावसायिक कुटुंबांची तिसऱ्या पिढीपलीकडे टिकू न शकण्याची सातत्यानं दिसणारी उदाहरणं - एका मराठी अग्रगण्य वर्तमानपत्रात ह्या आठवड्यात आलेल्या लेखातील बरीच विधानं मला पटली. ह्यावर माझी मतं - मराठी समाज बोलण्यालिहिण्यात बरीच शक्ती वाया घालवतो. शारीरिक, बौद्धिक मेहनत करण्याची तयारी / जिद्द नसणं, वैयक्तिक / व्यावसायिक नातेसंबंध टिकविण्याच्या क्षमतेचा अभाव, संवादाद्वारे कोणी विनाकारण दुखावलं जाणार नाही ह्याची दक्षता घेण्याचा अभाव, मोठी स्वप्नं पाहण्यात कदाचित होणारी हयगय ही काही कारणं असावीत.