रविवार, २३ एप्रिल, २०२३
Sponge, Fresh Farm Produce वगैरे वगैरे
सोमवार, १७ एप्रिल, २०२३
अगतिक
गेल्या दोन दिवसांत मन सुन्न करणाऱ्या दोन घटना घडल्या. पन्नाशीतील एक हसतमुख, उत्साही मित्र अगदी अचानक हृदयविकाराच्या धक्क्यानं गेला. त्यानंतर काल एका शासकीय कार्यक्रमात ११ जण उष्माघातामुळं मृत्युमुखी पडले.
मध्यमवर्गीय पुरुष हृदयविकाराच्या धक्क्यानं अचानक मृत्यूमुखी पडण्याचं प्रमाण वाढीस लागलं आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक बांधिलकी पार पडतांना स्वतःकडे कदाचित दुर्लक्ष होत असावं. स्त्रियांना नैसर्गिक कारणांमुळं बऱ्याच कालावधीपर्यंत हृदयविकाराच्या धक्क्यापासून उपजत संरक्षण मिळतं असं पत्नी म्हणाली. इथं काही महत्वाचे मुद्दे
१. कुटुंबाचा जीवनस्तर उंचाविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत असं कर्त्या पुरुषाला वाटणं स्वाभाविक आहे. परंतु कुटुंबासाठी आपलं अस्तित्व त्याहून महत्वाचं आहे.
२. प्रत्येकाची शरीररचना, क्षमता वेगवेगळी असते. आपल्या मर्यादा वेळीच ओळखायला हव्यात. नाही म्हणायला शिका. आपले मित्र, नातेवाईक तुमच्यावर रागावतील. पण त्यांना शांतपणे मला आरामाची गरज आहे हे सांगा. मी हे वारंवार करतो.
३. शरीर वेळोवेळी आपल्याला संदेश देत राहतं. त्याकडं लक्ष द्या.
४. जर का आपल्याला काही त्रास होत असेल तर आपल्या कुटुंबाला चांगल्या प्रकारे त्याची जाणीव करून द्या. आपल्याला आरामाची गरज असेल तर परिवारातील सदस्यांना ते स्पष्ट सांगा.
५. तेलकट, तिखट, मीठ अधिक असलेल्या पदार्थांना कटाक्षानं टाळा. जिभेवर नियंत्रण ठेवा.
आता वळूयात ते कालच्या दुर्घटनेकडं.
१. हा समारंभ भर दुपारी उघड्या मैदानात दीड वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता. लाखो लोकांना ह्या समारंभासाठी बहुदा ट्रकमधून आणण्यात आलं होतं.
२. ही लोक रात्री कुठं राहिली, त्यांना सकाळी काही खायला देण्यात आलं होतं की नाही ह्याचा अंदाज नाही.
३. दीड वाजता समारंभ संपल्यानंतर इतक्या सगळ्या लोकांना तिथून बाहेर पडायला अजून एक - दीड तास लागला. इतक्या रखरखत्या उन्हांत ह्या लोकांना पुरेसं पाणी मिळालं की नाही'ह्याचा अंदाज नाही.
ही लोक स्वतःहून तर नक्कीच आली नसणार. केवळ पैशाची अगतिकता ह्या लोकांना ह्या समारंभात घेऊन आली असणार. व्यासपीठावरील लोकांनी फक्त एकच विचार करायला हवा होता की मी माझ्या आईवडिलांना, पत्नी, मुलांना ह्या उन्हात बसविले असते का? लाखोंचा समुदाय आपल्याला कशासाठी हवा आहे ? ह्या मृत्युमुखी पडलेल्या बिचाऱ्या जीवांच्या नातेवाईकांना मदत देऊन काय साध्य होणार आहे?
सर्वपक्षीय नेत्यांना एकच कळकळीची विनंती - "तुम्ही शपथ घ्या की ह्यापुढं अशा मोठ्या सभांचे आयोजन करण्याचा अट्टाहास मी धरणार नाही !"
सोमवार, १० एप्रिल, २०२३
Life ऑफ सदानंद ! -भाग ४ Testing (परीक्षण)
बराच वेळ काही न सुचल्यामुळं सदानंद खिडकीबाहेर टक लावून पाहत होता. ज्या झाडाकडं सदानंद टक लावून पाहत होता बहुदा त्याच झाडावर तो बसला होता. फडफड उडत तो खिडकीवर येऊन बसला.
"तू माझ्याकडं का पाहत आहेस?"
"छे छे ! मी असाच बाहेर खिडकीबाहेर बघतोय. "
"गेली पाच मिनिटं तू काही न करता बाहेर कसा काय पाहू शकतोस? तुझ्या कामाच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होणार नाही का?"
"प्रत्यक्ष संगणकावर घालवलेला वेळ आणि उत्पादकता समप्रमाणात असणं हे समीकरण केवळ यांत्रिक कामांच्या बाबतीत लागू होतं. बौद्धिक कामाच्या बाबतीत तुम्ही संगणकावर घालवलेल्या वेळेपेक्षा तुमच्या कामाच्या दर्जा महत्वाचा ठरतो. सतत संगणकावर काम करण्यापेक्षा तुम्ही विचारपूर्वक दीर्घकालीन धोरण आखणं हे अधिक महत्वाचं आहे"
"अबब, सदानंद महाराज आता कसलं धोरण आखात आहेत? ChatGPT च्या वादळाला कसं तोंड द्यायचं त्याचं ?"
ChatGPT प्रकरण अगदी ह्यांच्यापर्यंत कसं पोहोचलं ह्याचं आश्चर्य करण्याची ही वेळ नव्हती.
"मी आणि माझ्या टीमने विकसित केलेल्या आज्ञावलीवर विविध प्रकारचे परीक्षण करून मगच ती प्रत्यक्ष production मध्ये अंमलात आणायची असते, त्यात सुद्धा मानवानं स्वतः परीक्षण करण्यापेक्षा विविध स्क्रिप्ट्स विकसित करून संगणकाला केवळ एका कळीच्या आधारे ह्या स्क्रिप्ट्स धावायला सांगायच्या ह्यावर खरंतर भर आहे. बोलायला आणि वरिष्ठांसमोर रंगीबेरंगी स्लाईडसच्या आधारे सादर करायला हे सारं सोपं असलं तरी प्रत्यक्षात अंमलात आणायला खूप विचार करावा लागतो"
"तुम्हांला त्याचेच पैसे मिळतात. बाकी तू माझ्याशी बोलताना एक तर धड पूर्ण मराठीत बोलत जा किंवा पूर्ण इंग्लिश मध्ये! उगाचच अधूनमधून इंग्लिश शब्दांचा वापर करतोस, मराठी शब्दांचा हास्यास्पद वापर करतोस जसे की स्क्रिप्ट्स धावायला"
"अजूनही माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील साधारणतः २५ टक्के संज्ञांना योग्य असे पर्यायी मराठी शब्द नाहीत. त्यामुळं तू मला दोष देऊ नकोस !"
"बरं ते जाऊ देत ! तुम्हां माणसांचं मला कळत नाही. एकीकडं तुम्ही म्हणता की आज्ञावलीवर विविध प्रकारचे परीक्षण करून मगच ती प्रत्यक्ष production मध्ये अंमलात आणायची असते, आणि दुसरीकडं नव्या पिढीनं लग्नाआधी लिव्ह - इन च्या गोष्टी केल्या की तुम्ही नाकं मुरडता !"
सदानंदला मोठा धक्का बसतो. ह्याला सर्व कसं माहिती हे अगदी समजेनासं होतं. पण हार मानेल तो सदानंद कसला !
"अर्धवट ज्ञान हे संपूर्ण अज्ञानापेक्षा धोकादायक असतं असं म्हणतात ते खरंच आहे. अरे आज्ञावलीचं परीक्षण करण्यासाठी वेगळे environment असतं. तिथं केलेल्या टेस्टिंगमुळे प्रत्यक्ष प्रॉडक्शनवर काही परिणाम होत नाही. लिव्ह - इनचं तसं नसतं तिथं तुम्ही थेट तुमच्या आयुष्याशी खेळत असता !"
"सर्व काही मीच समजावून सांगायचं का तुम्हांला ? अरे तुम्ही मोठमोठाली आभासी जगं उभारता , तुमचे विकसित अवतार बनवता. मग तुमची तरुण जोडपी त्यांच्या अवतारांना आभासी दुनियेत लिव्ह - इन ला का पाठवत नाहीत? "
त्याच्या ह्या प्रश्नावर सदानंदकडं उत्तर नव्हतं. कदाचित ही कल्पना एखाद्या स्टार्टअपला विकावी असा विचार त्याच्या मनात आला.
"आणि हो नुसतं टक लावायला हेच झाड नेहमी निवडणार असशील तर नक्की सांग ! मी दुसरीकडं जाऊन बसेन. मलाही झोन मध्ये असायला आवडतं !"
बुधवार, ५ एप्रिल, २०२३
Life ऑफ सदानंद ! -भाग ३ सम्यक विचार साधी राहणी
कारचे सारथ्य करत महानगरातील सिग्नलवर थांबलेल्या असलेल्या सदानंदची विचारशृंखला कॅव् कॅव् ह्या आवाजानं भंगली. काचेवर तो बसला होता. खरंतर तो सदानंदच्या विचारशृंखलेचा अविभाज्य घटक होता. सदानंदने काच खाली करुन त्याला आत घेतलं.
"इतक्या गंभीरपणे कसला विचार करतोयस?"
"ह्यांचा, ह्यांचा !" समोरील बांधकाम सुरु असलेल्या गगनचुंबी इमारतीकडं अंगुलीनिर्देश करत सदानंद म्हणाला.
"अगदी वखवखल्यासारखं एका चांगल्या शहराला ओरबाडून घेण्याचा चंग बांधला आहे जणू त्यांनी !"
"संतापण्याचं काही कारण नाही. इतक्या सर्वाना व्यवस्थित पाणीपुरवठा केला जातोय, वाहतुकीसाठी सदैव नवनवीन माध्यमांचा वापर केला जातोय. असलेल्या माध्यमांना सुधारलं जातंय. घरबसल्या खाद्यपदार्थ, किराणा माल, कपडे इतकंच काय तर मदिरासुद्धा उपलब्ध होत आहे. शहरात राहणाऱ्या माणसाच्या जीवनाच्या दर्जात सदैव सुधारणा होतेय! म्हणून तर तुझ्यासारखी माणसं गावं सोडून शहराच्या दिशेनं धाव घेताहेत"
सदानंद काहीसा सावध झाला. त्याच्या बोलण्याचा वरवर दिसतो तसा अर्थ घ्यायचा नाहीये हे त्याला बऱ्यापैकी समजलं होतं.
"मला कमी वेळ असतो त्यामुळं माझ्याशी प्रदीर्घ संवाद करुन हळुवारपणे तुला हव्या त्या मुद्द्याकडं मला घेऊन जायला आपल्याला वेळ नाही. त्यामुळं तुला हवं ते स्पष्टपणं सांग. मागच्या वेळेसारखं अगदी मुद्द्यांना क्रमांक देऊन सांगितलं तरीसुद्धा चालेल!"
"अगदी कसं शहाण्यासारखं बोललास" ची नजर देऊन तो बोलू लागला.
"पृथ्वीची निर्मिती ज्यावेळी झाली त्यावेळी पृथ्वी अगदी संतुलित अवस्थेत होती. मानवजातीच्या उत्क्रांतीतील प्राथमिक टप्प्यापर्यंत ही संतुलित अवस्था कायम होती. काही कारणास्तव सर्वशक्तिमानानं मनुष्याच्या शरीरात असा मेंदू दिला जो काळानुसार प्रगत होत गेला. ह्या प्रगत मेंदूचा वापर मनुष्यानं प्रारंभींच्या काळात आपल्या जीवनात स्थैर्य आणण्यासाठी केला . त्यानंतर मात्र जमीनविस्तार, संपत्तीसंकलन, धर्मप्रसार, शस्त्रास्त्रं अशा दिशेनं त्याची वाटचाल झाली. आता त्यात चंगळवादाची भर पडली आहे. "
"आधुनिक काळातील माणूस ज्या ज्या वेळी चंगळवादी गोष्टीचा वापर करतो त्या त्या वेळी तो पृथ्वीला संतुलित स्थितीपासून दूर नेत असतो. पृथ्वीला एका विशिष्ट प्रमाणाबाहेर संतुलित स्थितीपासून दूर नेल्यास निसर्गचक्र बिघडतं आणि त्याचे दृश्य स्वरूपातील दुष्परिणाम मानवाला भोगावे लागतात. सध्यातरी निसर्गाचा कोप स्थानिक पातळीवर दिसतोय. परंतु ज्या वेगानं हे सारं काही ढेपाळत आहे तो वेग पाहता जागतिक पातळीवर निसर्गाचा कोप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हे सारं मानवाला कळतंय . परंतु हे थांबविण्याची इच्छाशक्ती मानवाकडं नाही. काहीजण आपल्या परीनं प्रयत्न करत आहे. परंतु ते अल्पसंख्य आहेत आणि इतके बलाढ्यसुद्धा नाहीत की हे दुष्टचक्र थांबवू शकतील. "
जोरात सुरु असलेल्या AC मध्ये सुद्धा सदानंदला घाम फुटला होता.
"ह्यावर काही उपाय नाही का?"
"खात्रीचा असा उपाय नाही. पण गावात जाऊन राहिल्यास जेव्हा केव्हा मोठा नैसर्गिक कोप येईल तेव्हा तुमच्या वाचण्याची शक्यता अधिक असेल. नैसर्गिक कोप आल्यास शहरातील आपत्कालीन व्यवस्था किती सहजपणे कोलमडून पडते ह्याचा अनुभव तर तू घेतलाच असेल. एकदा का शहरात प्राथमिक सुविधा कोलमडून पडल्या की मानवांनी परिधान केलेले बुरखे कोलमडून पडायला आणि त्यांचे राक्षसी चेहरे बाहेर येण्याची शक्यता दाट आहे.
गावात मात्र अगदी प्राथमिक पातळीवरील गरजा पूर्ण होण्याची आणि माणसांची माणुसकी टिकून राहण्याची शक्यता अधिक असेल !"
"तुझं काय ?" न राहवून सदानंदने विचारलं.
"काच वरती कर , येतो मी !" असे म्हणत तो उडून गेला. आपल्या प्रश्नात काही खोट होती का ह्याचा विचार करत सदानंद गाडी पार्क करण्यामागं लागला.
२०२४ अनुभव - भाग १
२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...
-
लंडनच्या हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर जुन्या आठवणी जागृत झाल्या. २००० साली प्रथमच परदेशी दौऱ्यावर हीथ्रो विमानतळावर उतरलो होतो. त्यावेळी स...
-
बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्ड...
-
नुकत्याच आटोपलेल्या बारा दिवसांच्या युरोप दौऱ्यानंतर मनात अनेक सकारात्मक भावना दाटल्या आहेत. भव्य ऐतिहासिक वास्तू, निसर्गाची डोळ्यात साठवून ...