मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २६ ऑक्टोबर, २०२२

दिवाळी




सणांना तोटा नसलेल्या भारतदेशात दिवाळी सणाचं महत्त्व अनन्यसाधारण आहे.  मनात दडून बसलेल्या बालपणीच्या दिवाळीच्या मनोहर आठवणी, त्यावेळी चिंताविरहित भावनेत अनुभवलेले आनंदाचे, कौतुकाचे क्षण आपण कितीही मोठे होत गेलो तरी दर दिवाळीला मनःपटलावर नव्यानं उमटत राहतात. मग सुरु होते ती आजच्या काळात त्या आठवणींना शोधण्याची, पुन्हा अनुभवण्याची धडपड!

दिवाळी खरंतर तीन-चार दिवसांची. पण ह्या तीन - चार दिवसांनी उत्साहानं आयुष्य जगण्याची उमेद वर्षभर पुरणारी. आपल्यापासून कायम दूर निघून गेलेल्या प्रियजनांच्या आठवणी दररोज तर येत असतातच पण दिवाळीच्या दिवसांत त्यांची उणीव प्रकर्षानं जाणवते. त्यांना बरं वाटलं असतं अशा पद्धतीनं दिवाळी साजरी करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वर्षी बरेचजण दिवाळीनिमित्त भेटायला आले. जुन्या आठवणी निघाल्या. खरंतर आयुष्याच्या एका टप्प्यानंतर आपण स्वतंत्ररित्या आपल्या पद्धतीनं आयुष्य जगायला शिकलो असतो. परंतु आधीच्या पिढीचं भोवताली असणं खूप आश्वासक असतं. अगदी कसोटीच्या प्रसंगी त्यांचा सल्ला अगदी सुखावह असतो. त्यांच्या निघून जाण्यानं प्रचंड एकाकी वाटत राहतं. आपल्यापरीनं आयुष्यात गुंतून घेत ह्या एकाकीपणापासून दूर पळण्याचा प्रयत्न करणं हेच आपल्या हाती असतं. 

ह्या वयात वरच्या पिढीचं छप्पर असणं खूप आधार देणार असतं हे बोलणारा सुजित भेटला. अभ्यंगस्नानासाठी सकाळी लवकर उठणं नक्कीच महत्वाचं पण साडेतीन म्हणजे जास्तीच लवकर होते अशी काहीशी हळुवार तक्रार प्रज्ञाताईनं केली.  गावातील सर्व वडीलधाऱ्या माणसांना भेटायला निघालेला राकेश तासभर गप्पा मारत बसला. कधीही हक्कानं गप्पा मारायला येऊ शकतो अशा घरांपैकी तुमचं हे घर हे त्याचं वाक्य लक्षात राहिलं. पूर्वी गावागावांत आदरानं ज्यांच्याकडं पाहिलं जायची अशी काही घरं असायची. परंपरा, शिष्टाचार कसे पाळावेत हे ज्यांच्याकडून शिकावं अशी ही घरं असायची. काळाच्या ओघात ही घरं, त्यातील आदरणीय माणसं विखुरली गेली आणि संस्कार ज्यांच्याकडून शिकावेत अशा संस्था नाहीशा झाल्या.    

सण हा समूहानं साजरा करण्याचा प्रसंग. सणाच्या आठवणी कुटुंब, घर, गांव, मित्रमंडळी ह्यांच्यासोबत जोडल्या गेलेल्या असतात. ज्यांनी हे अनुभवलं आहे ती सारी माणसं आयुष्यभर ह्या आठवणींसोबत जगत राहतात. सणांचं खरं सणपण अनुभवण्यासाठी जुन्या परंपरा, आठवणींना शक्य तितका उजाळा देत ते कुटुंबासमवेत घरी  साजरे करणं हेच इष्ट होय. रस्त्यातील ट्रॅफिक जॅममध्ये स्वतःला कोंडून घेत बऱ्याच कालावधीनंतर रिसॉर्टवर पोहोचुन साजरी केली गेलेली दिवाळी आता मूळ धरु पाहतेय! बघुयात काय होतंय ते ! 

बलिप्रतिप्रदेच्या दिवशी भल्या पहाटे घरातील कचरा घराबाहेर काढून थोड्याफार थंडीत आंघॊळ केल्यानंतर मिळालेल्या मोकळ्या वेळात लिहलेली ही पोस्ट ! बळी तो कान पिळी! 

रविवार, १६ ऑक्टोबर, २०२२

Pushing ourselves to the brink! (कडेलोटाच्या दिशेनं )


संदेशभाऊ वर्तक ह्यांना शनिवारी सायंकाळी बोरिवली ते नायगांव हे तीस किलोमीटर अंतर कारने कापण्यासाठी तीन तास लागले. शुक्रवारी सायंकाळी आलेल्या अचानक पावसानं इन्फिनिटी मॉलच्या बाजुच्या रस्त्यावर मी कारमध्ये एकाच ठिकाणी दहा मिनिटं अडकून होतो. मालाड ते बोरिवली ह्या टप्प्यात मेट्रोच्या कामामुळं मेट्रोच्या बरोबर खालच्या बाजूला असलेल्या रस्त्याच्या कडेला अत्यंत खडबडीतपणा आला आहे आणि दुसऱ्या कडेला वाहनं अनधिकृतरित्या पार्क करुन ठेवलेली असतात. त्यामुळं बऱ्याच वेळा कृत्रिमरीत्या वाहतुक कोंडी होत राहते. नागरिक मग उलट्या दिशेनं वाहनं चालविणे, सिग्नल तोडणे असले प्रकार करत राहतात. 

प्रचंड वेगानं अजूनही वाढत असलेल्या मुंबई महानगराच्या पाणी, वीज पुरवठ्याच्या गरजा त्याच प्रमाणात वाढत चालल्या आहेत. संबंधित यंत्रणा अजुन तरी ह्या गरजा पुर्ण करण्यात यशस्वी होत असली तरी ही यंत्रणा अत्यंत तणावाखाली असल्याचं वेळोवेळी जाणवत राहतं. सध्यातरी त्यांच्याविषयी माझ्या मनात आदरमिश्रित कौतुकाची भावना असली तरीही भविष्यात कुठंवर ते वाढत्या शहराच्या गरजांना तोंड देऊ शकतील ह्याविषयी चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. 

मुंबईला भाजीपुरवठा करणाऱ्या परिसंस्थेवर सुद्धा ताण पडत राहतो. इतकं सारं असलं तरीही विनु म्हणत असल्याप्रमाणं मुंबईतील परिसंस्था बिनबोभाट सुरु ठेवण्याकडं अधिकृत यंत्रणेची महत्तम शक्ती खर्च पडत असते. मुंबईत तुमच्याकडं पैसा असेल तर सर्व काही मिळू शकते. गावात तुम्ही कितीही श्रीमंत असलात तरीही तुम्हांला सुद्धा वीजपुरवठा खंडित होणं, अनियमित पाणीपुरवठा वगैरे प्रकारांना तोंड द्यावं लागतं. ह्या सर्व प्रकारांमुळं गांव सोडून मुंबईकडं / परदेशात धाव घेण्याची प्रवृत्ती वाढीस लागली आहे. त्यामुळं मुंबई आणि महानगरांवर अधिक ताण पडत राहतो. 

आमच्या एका घरातून एका दिवसात बाहेर पडणारा कचरा पाहून चिंता वाटू लागते. तीच गोष्ट ई-कचऱ्याच्या बाबतीत! भ्रमणध्वनी, संगणक ही सारी मंडळी मोजक्या वर्षांत एकतर कालबाह्य किंवा नादुरुस्त होतात. लगेचच आपण नवीन घेण्याच्या मागे धाव घेतो. तीच गोष्ट थोड्याफार फरकानं टीव्ही, कार ह्यांच्या बाबतीत. दहा वर्षात ह्या गोष्टी बदलाव्या लागण्याची शक्यता अधिक असते. ऍमेझॉन, झोमॅटो, स्विगी आपल्यासाठी सोयीचे, पण एका शर्टांसोबत, एका मसाला डोश्यासोबत त्यांनी आपल्या घरात आणून टाकलेलं प्लॅस्टिक, आवरणाचा कचरा भयंकर असतो. आपल्यापैकी मोजके लोक प्लॅस्टिक रिसायकल करतात. झोमॅटो, स्वीगीने आपल्या शरीरात आणलेल्या जास्तीच्या कॅलरी जाळण्यासाठी आपल्यातील काहीतरी जिममध्ये जातात, काही जात नाहीत. दोन्ही वर्गातील काही लोकांना विविध आरोग्य समस्येनं ग्रासण्याचं प्रमाण वाढत चाललंय. मोठाली इस्पितळं, आरोग्यविमा ह्या संस्था आता तिथं होणाऱ्या अविश्वसनीय खर्चामुळं आता आश्वासक ऐवजी भितीदायक वाटू लागल्या आहेत. 

आपल्या पुढील पिढ्यांसाठी आपण पृथ्वी कोणत्या स्थितीत सोडणार आहोत हा प्रश्न मनाला भेडसावत राहतो.  गावांमध्ये  उपलब्ध असणाऱ्या उपजीविकेच्या पर्यायांची  कमतरता किंबहुना असे पर्याय निर्माण करण्यात एक राष्ट म्हणून आपल्याला आलेलं अपयश हे महत्वाचं कारण ज्यामुळं सर्वांना शहराकडं धाव घ्यायची आहे. शहरात, परदेशात एकदा मूलभूत गरजा पूर्ण झाल्यानंतर सुरु होते ती प्रतिष्ठेची शर्यत! तुमचं घर, नोकरी, कार, तुमच्या सहलींची ठिकाणं, तुमच्या मुलांचा शैक्षणिक प्रवास / यश  ह्यावरुन तुमचं मूल्यमापन करण्यात रस असणारी मंडळी !  तुम्हांला सामाजिक वर्तुळाचा भाग बनून राहायचं असेल तर ह्या मंडळींशी पडणारी तुमची गाठ अनिवार्य आहे.  सर्वात प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या वर्तमानपत्रातील मुखपृष्ठाला ज्यावेळी जाहिरातीची पहिली दोन तीन पानं मागच्या क्रमांकावर ढकलतात त्यावेळी समाजाच्या प्राधान्यक्रमाची आपल्याला स्पष्ट कल्पना येते. मान्यवर व्यक्ती तंबाखूच्या जाहिराती करतात त्यावेळी भोवताली खरोखरच चिंतादायक परिस्थिती निर्माण झाली आहे ह्याची खात्री पटते.  

हे कसं थांबविता येईल ह्याचा आता आपण विचार केला नाही तर पुढील काही वर्षांत परिस्थिती हाताबाहेर जाणार आहे. महत्वाची गोष्ट अशी आहे की हल्ली कोण कोणाचं ऐकायला तयार नाही. त्यामुळं आपण आपला विचार करावा. ठेवले ईश्वरे तैसेची राहावे ! ह्या उक्तीला अनुसरुन वागण्याचा जमेल तितका प्रयत्न करावा. प्रगती करण्याचा प्रयत्न नक्कीच करावा पण एका मर्यादेपलीकडं स्वतःला खेचू नये. महानगराच्या बाहेर सुद्धा अनेक मंडळी आनंदात राहतात. ती कशी काय आनंदात राहू शकतात हे जाणून घ्यायचा प्रयत्न करावा. थोड्याच वेळात आपण आपल्याभोवती निर्माण केलेल्या गैरसमजुतींचे जाळं दूर करण्यात नक्कीच यश मिळेल ! 

Happy Sunday! 

सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

निवडीचा संभ्रम

सोमवार सकाळी मी अत्यंत शिस्तबद्ध मनःस्थितीत असतो.  साधारणतः लोक १ जानेवारीला वर्ष कसं घालवायचं ह्याविषयी जे काही निर्धार व्यक्त करत असतात त्याप्रमाणं मी रविवारी सायंकाळी / सोमवारी सकाळी आठवडा कसा शिस्तीत घालवायचा ह्याविषयी मनसुबे रचतो. आज सकाळी एक तास कार्यालयीन काम अगदी गंभीरपणानं केल्यानंतर हा निर्धार मोडकळीस आल्यानं ही पोस्ट लिहीत आहे किंवा ही पोस्ट लिहायचा विचार आल्यानं हा निर्धार मोडला जात आहे. विषय काही नसताना सुद्धा लोकांना छळायचं हा सुप्त मनसुबा ही पोस्ट लिहिताना मनात आहे. 

सध्या महिलांचा T20 आशिया चषक बांगलादेशात खेळला जात आहे. त्यात थायलंड, मलेशिया, संयुक्त अरब अमिरात वगैरे आपण कल्पना करु शकणार नाहीत असे देश सुद्धा सहभागी होत आहेत. ह्या महिला ज्या चित्रविचित्र आवाजात सामनाभर ओरडत असतात त्यामुळं घरातील शांततेचा भंग होतो असं आमचं म्हणणं आहे. संयुक्त अरब अमिरात संघात बहुसंख्य भारतीय वंशांच्या महिला आहेत. त्यात एक गोखले सुद्धा आहे! बांगलादेशात एकाच मैदानावर ही स्पर्धा खेळवली जात आहे. त्या दिवशी ह्या स्पर्धेत मोठा चमत्कार झाला. थायलंड संघानं पाकिस्तान संघाला नमविले. दुसऱ्या दिवशी आपण विविध प्रयोग करुन पाकिस्तान संघाकडून हरण्यात यश मिळविलं. 

भारताचा महिला संघ म्हणा की पुरुष संघ असो, आपल्याकडं गरजेपेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असल्यानं सातत्यानं आपण बदल घडवत राहतो. Only thing which is constant in current world is CHANGE हे वाक्य टाळ्या मिळविण्यासाठी चांगलं असलं तरी ह्या बहुपर्यायानं आणि त्याच्या अनुषंगानं येणाऱ्या सततच्या बदलांमुळं भारतीय महिला क्रिकेट संघ,  पुरुष क्रिकेट संघ आणि एकंदरीत भारतीय शहरी नागरिक पुर्णपणे गोंधळलेला आहे. ह्या बहुविध पर्यायांतुन आपल्यासाठी नक्की कोणता पर्याय चांगला हेच मुळी आपल्याला समजेनासं झालं आहे. भारतीय पुरुष संघात निवड होऊ शकणारे जे काही वीस बावीस खेळाडू आहेत ते ही जबरदस्त मानसिक तणावाखाली आहेत. जर तुम्ही रोहित शर्मा अथवा विराट कोहली नसाल तर तुम्ही सतत दोन - तीन खेळीनंतर संघाबाहेर जाता. 

BCCI अगदी मनाला येईल तसं वागत राहतं. आपला मूळ (कदाचित तथाकथित ह्या विशेषणासहित ) संघ ऑस्ट्रेलियाला पाठवून आपल्या fringe player च्या संघासहित दक्षिण आफ्रिकेच्या खऱ्या संघासहित पन्नास षटकांचे सामने बिनधास्त खेळतोय. वर्षातील बावन्न रविवारपैकी किती रविवार भारतीय संघ टीव्हीवर जाहिरातींचं उत्पन्न मिळवून देतो ह्याचं विश्लेषण मी निवृत्त झाल्यावर नक्की करणार आहे. तोवर भारताचे (पुरुष आणि महिला) अ, ब , क वगैरे संघ नक्की रविवारी खेळत असतील. इतके सर्व खेळाडू पस्तिशीच्या आसपास निवृत्त झाल्यावर त्यांना समालोचक म्हणून काम मिळण्यासाठी अधिक सामने नक्कीच असायला हवेत. 

घरी घेतलेल्या जिओमुळं सुद्धा विविध पर्याय माझ्यासमोर उभे आहेत. हे पर्याय टीव्ही, भ्रमणध्वनीवर उपलब्ध आहेत. नशिबानं पाच सहा महिन्यातच ह्या बहू पर्यायांचा उबग येऊन त्यातील मोजक्या पर्यायांकडंच मी हल्ली वळतो. 

एकंदरीत आपल्याकडं काहीच नसणं हा जसा प्रश्न असू शकतो तसंच बरेच पर्याय असणं हा तितकाच गंभीर प्रश्न असू शकतो. शहरी भारतीय समाजाचा हाच मोठा प्रश्न बनला आहे. त्यामुळं आपल्या स्वतःसाठी , कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याचा निर्णय जे घेऊ शकतात तेच लोक ह्या काळात समाधानी राहू शकतात. 

जाता जाता माझ्या एका अमेरिकन व्यवस्थापकाचं आवडतं वाक्य - Let Perfect be not the enemy of Good. परिपूर्ण निवडीचा शोध घेतांना आपल्यासमोर आलेल्या चांगल्या पर्यायांना सातत्यानं धुडकावून लावण्याची चूक करु नकात ! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...