आज शिक्षक दिन ! आयुष्यातील विविध टप्प्यांवर शिक्षकांनी आपल्या सर्वांना पाठ्यपुस्तकातील विविध संकल्पनांचे ज्ञान दिलेच पण त्याव्यतिरिक्त कान, डोळे व्यवस्थित उघडे ठेऊन त्यांच्या बोलण्याकडे आणि वर्तवणुकीकडे ज्यांनी कोणी लक्ष दिलं त्या सर्वांना जीवनसंकल्पनांचा फार मोठा ठेवा मिळाला. आजचा हा छोटासा लेख माझ्या शालेय जीवनातील आणि शिकवणीतील सर्व माननीय शिक्षकांना समर्पित ! आदरणीय गुरुवर्गातील नावांचा उल्लेख करणे जाणीवपूर्वक टाळत आहे.
कोणतीही संकल्पना शिकवताना मुलांना अधिकाधिक गुण मिळावेत हा प्राथमिक दृष्टिकोन ठेवून ती संकल्पना शिकविणे किंवा त्या संकल्पनांच्या मूलभूत भागाला स्पर्शुन जाणे हे दोन पर्याय शिक्षकांकडे असतात. त्याकाळी बहुतांशी शिक्षकांनी संकल्पनांच्या मुलभूत भागांवर आपलं लक्ष केंद्रित केलं. १९९० सालानंतर ज्या वेगानं सर्वत्र बदल घडून आले त्याची पुर्वकल्पना ना शिक्षकांना होती ना मुलांना. परंतु ह्या गुरुजनांनी जीवनातील समस्यांचा देखील आपल्या बोलण्यात समावेश केला, जीवन हे काही पायघड्यांवरील वाटचाल असणार नाही हे कळत नकळत मनावर बिंबविले. कदाचित व्यावसायिक जगात अगदी शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला कसं बदलावं ह्या भागाविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविलं नसेल पण आयुष्यातील मोठ्यात मोठ्या अपयशातुन स्वतःला कसं सावरावे, मिळालेल्या यशाकडे सुद्धा काहीसं विरक्तपणे कसं पाहावं ह्याचे अप्रत्यक्ष धडे त्यांनी आम्हांला दिले.
१९९० नंतर झपाट्यानं बदल होण्यास जी काही सुरुवात झाली ते बदल आजही सुरु आहेत आणि पुढेही सुरु राहतील. ह्या बदलांच्या वादळांत , यशापयशांच्या मालिकेत एक माणुस म्हणून आनंदानं जगायला शिकवणाऱ्या माझ्या सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन ! वर्षे जातील, काळ बदलेल पण एखाद्या शांत क्षणी मनाला दिलासा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अनमोल क्षणांचा ठेवा तुम्ही आम्हांला दिला आहे, तो आम्हांला शेवटपर्यंत पुरणार आहे!