मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २१ मार्च, २०१८

साद - भाग १



पुन्हा तीच हुरहूर, तीच अस्वस्थता !! रात्रीच्या त्या किट्ट शांततेतुन सदानंद अचानक जागा झाला. त्याची नजर बाजूला झोपलेल्या शारदा आणि छोट्या संगीतावर पडली. त्यांना पाहुन मनाला काहीशी शांतता लाभली असली तरी मनातील हुरहूर मात्र कायम होती. सदानंद काही वेळ तसाच पडुन राहिला. शारदेने झोपेचं सोंग कायम ठेवलं असलं तरी तिची बेचैनी कायम होती. 

थोड्या वेळानं मात्र सदानंदला राहवेना. तो उठला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडला. त्यानं दार उघडलं तसा थंड वारा शारदा आणि संगीताला सकाळची चाहुल देऊन गेला. शारदेनं पटकन चादर संगीताच्या अंगावर ओढून घेतली आणि स्वतःलाही आणखी एका चादरीचं संरक्षण दिलं. शारदा झोपली असली तरी तिचे कान मात्र सदानंदची चाहुल घेत होते. खिडकीतुन दिसणाऱ्या आकाशातील चांदणीचा तिनं वेध घेतला. साधारणतः पाच वाजले असावेत. सदानंदने गोठ्यातल्या गाईंना चारा पाणी दिला असावा. मग थोड्या वेळ शांततेनंतर विहिरीवर पोहऱ्याने पाणी काढण्याचा आवाज ऐकू आला. इतक्या थंडीत भल्या पहाटे विहिरीच्या थंडगार पाण्यानं सदानंद आंघोळ करत होता. शारदेची बैचैनी वाढतच होती. 

सकाळ झाली, सुर्यदेवाचं आगमन झालं. संगीताच्या बोलांनी घर गजबजुन गेलं. तिची शाळेत जायची धावपळ सुरु होती. सदानंद मात्र सर्व काही आटपुन चुपचाप ओटीवर बसुन होता. गावातील येणारी जाणारी मंडळी त्याला हाक देत होती तरी त्यांच्याकडं त्याच लक्ष असावं असं वाटत नव्हतं.  मग थोड्या वेळातच संगीताच्या छोट्या मैत्रिणीचे आगमन झालं. छोट्या चिमण्यांची सगळी वरात शाळेकडे निघाली. खिडकीतुन त्या सर्वांना गप्पा मारत जाताना पाहून शारदेला आपलं लहानपण आठविल्याशिवाय राहणं शक्य नव्हतं.  

संगीता शाळेत गेली आणि मग सदानंदला न्याहारी देण्यात शारदेचा वेळ गेला. सदानंद शांतच होता. तसाच मग तो सावकाराच्या कचेरीत गेला. कचेरीच्या कामात त्याच लक्ष लागेना. पण महत्वाची कागदपत्रं बनविणं आवश्यक होतं आणि त्याचा नाईलाज होता. शेवटी कसबसं काम आटपुन सायंकाळी तो घरी परतला. संध्याकाळ शांतच गेली. संगीताच्या चिवचिवाटाकडं त्याच अजिबात लक्ष नव्हतं. त्यामुळं संगीता कंटाळली होती. "तु त्यांना त्रास देऊ नकोस, बस आपली खेळत बाहुल्यांसोबत!" असं सांगत शारदेनं तिला जुन्या बाहुल्यांची जोडी फडताळातून काढुन दिली होती. 

पहाटे शारदेला जाग आली आणि सदानंद बाजुला नाही हे पाहुन तिला कससंच झालं. वेड्या आशेनं तिनं अंगणात धाव घेतली. सदानंदची कोठेच चाहुल नव्हती. मुक्या गाई तिच्याकडं आशेनं चाऱ्याची वाट पाहत बघत होत्या. अंगातील सर्व त्राण संपल्यानं शारदेनं तशीच अंगणातील पायरीवर बसकण मांडली. 

बरीच पायपीट करत सदानंद एकदाचा गुहेपाशी पोहोचला. बहुदा दोन दिवसाची वाटचाल त्यानं केली असावी. तहानभुकेचं त्याला भान राहिलं नव्हतं. गुहेपाशी पोहोचताच तिथल्या वातावरणानं त्याला खूप खूप बरं वाटलं. आपल्या आसनाची मांडणी करुन तो ध्यानस्थ झाला. बराच वेळ झाला तरी त्याच्या अंतर्मनात कुठं काही चाहुल लागत नव्हती. पण तो बेचैन होणं शक्य  नव्हतं. आणि मग त्याला तो आवाज ऐकु आला! "आलास, खुप उशीर केलास ह्या वेळी सदानंद !!" 

(क्रमशः)  

सोमवार, १९ मार्च, २०१८

कार्तिक महिमा


लहानपणी मी क्रिकेटर बनायची स्वप्ने पहायचो. ह्या स्वप्नांच्या दुनियेतील अविभाज्य घटक म्हणजे एखाद्या महत्त्वाच्या सामन्यात जसं की विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची दाणादाण उडाली असताना मी एकहाती सामना फिरवून आणत असे. अशा अनेक स्क्रिप्टस् मी कल्पून ठेवल्या होत्या. पण काल दिनेश कार्तिकनं जी काही खेळी केली ती माझ्या कल्पनाशक्तीच्या पलीकडेची होती. 


एखाद्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  विजयासाठी शेवटच्या दोन षटकात ३४ धावांची गरज असताना मैदानात खेळण्यास येणं हेच भल्या भल्या लोकांसाठी भंबेरी उडविणारे असू शकतं. आणि त्यात दुसऱ्या टोकाला विजय शंकरसारखा महान फलंदाज असताना एकेरी धाव घेणं म्हणजे सरासरी धावांची गती प्रति षटकामागे ३६ वर आणुन ठेवण्यासारखीच गोष्ट झाली. पण दिनेश कार्तिकने ही गोष्ट साध्य केली. पहिल्या तीन चेंडूवर १६ धावा काढून त्यानं बांगलादेशी खेळाडूंना प्रचंड हादरवुन टाकलं. आणि मग शेवटच्या चेंडूवर मारलेला षटकार निव्वळ अप्रतिम ! 

क्रिकेट खेळात तुमची गुणवत्ता ही static बाब, तुम्हांला ती एका विशिष्ट पातळीपर्यंत यश मिळवुन देऊ शकते. भारतीय राष्ट्रीय स्तरावर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांविषयी योग्य आदर बाळगुन, तुमच्याकडे केवळ गुणवत्ता असेल तर तुम्ही राष्ट्रीय स्तरावर यश मिळवु शकता. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळविण्यासाठी तुमचं match temperament आवश्यक असतं. नेट प्रॅक्टिसमध्ये तासंतास चेंडू टोलवणे आणि प्रत्यक्ष सामन्यात असे लागोपाठ आठ चेंडू टोलवून २९ धावा टोलवणे ह्यात जमीनअस्मानाचा फरक आहे. काल कार्तिकने हे  match temperament भरभरुन दाखवलं. ह्या एका खेळीने कार्तिकच्या कारकिर्दीला पुनर्जीवन मिळालं असं म्हणता येईल का? बहुतांशी ह्या प्रश्नाचं उत्तर नकारार्थी असेल ! तरीपण ह्या घडीला तो भारतभर हिरो बनला आहे. 

आता विजय शंकरकडे वळूयात ! १८ व्या षटकात सतत चार चेंडू पुढं येऊन मारण्याचा अयशस्वी प्रयत्न करणं आयुष्यभर त्याच्या लक्षात राहील हे नक्की ! आता इथं  match temperament चा मुद्दा येतो. पहिला चेंडू निर्धाव गेल्यावर पुढील चेंडू नुसता तटवून एक धाव काढण्याचा प्रयत्न करायला हरकत नव्हती.  असो अशी परिस्थिती मी कॉलेज सामन्यात स्वतः अनुभवली आहे. काही कारणास्तव मला सलामीला पाठवलं जायचं आणि बारा षटकांच्या सामन्यात साधारणतः पहिली चार षटक बळी जाऊ न देणं ही अपेक्षा असायची आणि मी बऱ्याच वेळा ती पार पाडायचो. पण चार षटकांनंतर माझा  विजय शंकर व्हायचा. पण कप्तानाशी असलेल्या दोस्तीखातर हा प्रकार चार वर्षे चालला. पण २० -३० लोकांसमोर अशी फजिती होणं आणि १०० कोटी क्रिकेटवेड्या जनतेसमोर होणं नक्कीच वेगळं  !!

जाता जाता बांगलादेशविषयी! का कोणास ठाऊक पण आपल्या मैदानावरील वर्तनामुळं ते आपला चाहतावर्ग निर्माण करत नाहीत. उगाचच आक्रस्ताळेपणा करणं आणि केवळ उपखंडातील कामगिरीच्या जोरावर मोठमोठया वल्गना करणं ह्या गोष्टीचं त्यांनी आत्मपरीक्षण करायला हवं. काही अंशी हेच घटक भारतीय संघाला लागू होतात पण हल्ली काही प्रमाणात आपली सुधारणा दिसून येत आहे. 

शुक्रवार, १६ मार्च, २०१८

स्थिर विरुद्ध डायनॅमिक!!


मोठमोठाल्या आर्थिक संस्थांच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागात काम करताना सत्वपरीक्षेचे अनेक क्षण येतात. आज्ञावलीचे तुम्ही कितीही परीक्षण केलं असलं तरी ज्यावेळी ही आज्ञावली आणि तिच्यासोबतचे डेटाबेस, इन्फ्रास्ट्रक्चर ही सर्व मित्रमंडळी एकत्र प्रॉडक्शनमध्ये जातात तेव्हा ह्या प्रमाणात त्यांना एकत्र नांदायची सवय नसते किंबहुना ज्या क्रमानं ही मंडळी प्रॉडक्शनमध्ये जातात त्यात थोडी जरी गल्लत झाली तर आभाळ फाटू शकतं. आणि त्यामुळं ज्या दिवशी अशी बरीच मंडळी प्रॉडक्शनमध्ये जाण्याचा दिवस येतो त्यावेळी काहीशी धाकधुक मनात असते. 

तुम्ही कितीही काळजी घेतलीत तरी एखादी गोष्ट चुकण्याची जर शक्यता अस्तित्वात असेल तर ती गोष्ट केव्हातरी चुकणारच असा एक सिद्धांत आहे. त्यामुळे असा प्रसंग केव्हातरी निर्माण होतो. त्यावेळी प्रत्येक क्षणाला त्या आर्थिक संस्थेचं नुकसान होत असतं. बहुतांशी वेळा त्यावेळेच्या ह्या स्थितीला हातभार लावणाऱ्या घटकांचं एक विशिष्ट अशी युती (combination) निर्माण झालेलं असतं जे उपलब्ध लोकांपैकी कोणी आधी अनुभवलेलं नसतं. त्यामुळं हा एक dynamic (अस्थिर) असा प्रश्न सोडविण्याची स्थिती निर्माण झालेली असते. Dynamic प्रश्नाचं उत्तर शोधताना काही गोष्टी ध्यानात असाव्या लागतात. कोणतंही उत्तर हे १००% टक्के परिपुर्ण नसणार हा पहिला भाग, दुसरी गोष्ट म्हणजे उपलब्ध माहितीच्या आधारे विचार केला असता तुमच्यासमोर दोन तीन पर्याय उभे राहतात. त्यातील सर्वोत्तम पर्याय नक्की प्रश्न सोडवेल की नाही ह्याची शाश्वती नसते परंतु क्षणाक्षणाला तुमचं आर्थिक नुकसान होत असतं त्यामुळं सिंहाची छाती दाखवुन एक निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय योग्य ठरला तर तुमच्या निर्णयक्षमतेचं कौतुक होतं, चुकला तरी त्या क्षणी हार न मानता दुसऱ्या क्रमांकाच्या उत्तराकडं धाव घ्यावी लागते. 

अशा माहिती आणि तंत्रज्ञान विभागात दोन प्रकारची लोक असतात किंवा दोन प्रकारच्या वृत्ती दर्शविल्या जातात. 

पहिली वृत्ती, सर्व काही आलबेल असताना मोठमोठाले सिद्धांत मांडणे. इथं कोणताही प्रत्यक्ष प्रॉब्लेम सोडविण्याची घाई नसते. तुम्ही जगाला परिपुर्ण बनविण्याचे हजारो सिद्धांत कागदावर मांडु शकता. 

दुसरी वृत्ती म्हणजे खूप मोठा प्रॉब्लेम झाला असता, जखम भळभळून वाहत असताना पुढं सरसावुन ह्या सर्व प्रकाराची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन, आपण सुचविलेल्या उत्तराच्या विरोधात येणारे सर्व मुद्दे, व्यक्ती ह्यांना तर्कसंगत उत्तर देऊन ठरविलेला पर्याय वेगानं प्रॉडक्शनमध्ये अंमलात आणणं.  

संस्थेला दोन्ही प्रकारच्या माणसांची आवश्यकता असते. प्रत्येक माणसामध्ये ह्या दोन्ही वृत्ती कमीजास्त प्रमाणात अस्तित्वात असतात. आपण कशा प्रकारे घडलो आहोत आणि स्वतःला किती बदलू शकतो हे ओळखणं आवश्यक असतं. 

एक मात्र खरं - जेव्हा केव्हा हा प्रॉब्लेम संपतो तेव्हा ह्या अनुभवातून गेलेली व्यक्ती अधिक प्रगल्भ बनली असते आणि दुनियेकडे बघण्याचा तिचा दृष्टिकोन बदललेला असतो.  

शनिवार, १० मार्च, २०१८

Offline




गेल्या दोन आठवड्यात अशा दोन तीन घटना घडल्या ज्यामुळं सर्वसाधारण माहित असलेली सत्यं स्वतः प्रत्यक्ष अनुभवली. 

श्रीदेवीच्या अकाली मृत्युनंतर तिची आठवण म्हणुन पोस्ट लिहिली आणि जी एका ग्रुपमध्ये पोस्ट केली. तिथं एका अनाहुत स्त्रीने त्यावेळी काही जणांत लोकप्रिय झालेल्या आपण सैनिकांच्या मृत्यूची दखलसुद्धा घेत नाही आणि एका अभिनेत्रीवर मात्र भरभरुन प्रतिक्रिया देतो अशा स्वरूपाच्या दोन तीन कंमेंट्स माझ्या पोस्टवर टाकल्या.  भारतीय सैन्याविषयी असलेला माझ्या मनातील जो अतीव आदर आहे तो सोशल मीडियावर मी व्यक्त करावा की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आणि त्यात दुसऱ्या कोणी दखल द्यायची खरं तर गरज नाही. आणि ज्याच्याशी ओळख नाही अशा दुसऱ्या माणसाच्या पोस्टवर अशी अनाहुत प्रतिक्रिया देणं हा उद्धटपणा होय. उद्धट माणसांच्या तोंडी मी चारचौघात लागत नसल्यानं मी गप्प बसलो. प्रत्येक गोष्टीतून शिकावं म्हणतात तसं आता उठसुठ सर्वत्र पोस्ट प्रसिद्ध करणं बंद हा ह्या प्रकरणातून घेतलेला धडा !  

दुसऱ्या घटनेत मी in-depth मध्ये लिहत नाही अशी मला प्रतिक्रिया देण्यात आली. आणि ही प्रतिक्रिया देणारी व्यक्ती मला माझी बाजु मांडण्याची संधी न देता स्वतःचे म्हणणं बोलत राहिली. पण एक महत्त्वाचा मुद्दा त्यातुन सामोरा आला की माझ्यात सखोल लिहिण्याची क्षमता नाही असा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळं इथं एका गोष्टीचं स्पष्टीकरण देणं मी आवश्यक समजतो. मला ज्या विषयात जी काही थोडीफार माहिती आहे आणि ज्याच्या आधारावर मी चरितार्थ चालवतो त्याविषयावर मी सोशल मीडियावर लिहिण्यास मला परवानगी नाही आणि ह्या निर्णयाचा मी मनापासुन आदर करतो. मला जे वाटलं ते लिहावे ह्यासाठी ह्या ब्लॉगची स्थापना. आणि हे लिहिताना कोणी दुखावलं जाणार नाही ही काळजी घ्यायचा आटोकाट प्रयत्न! 

तिसऱ्या घटनेत सोशल मीडियावरील मतभेद प्रत्यक्षातील जीवनात सुद्धा ओढले जातात ह्याचाही अनुभव आला. 

ह्या सर्वात शिकण्यासारखं बरंच काही ! आपण सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचा / ब्लॉग वगैरे लिहिण्याचा निर्णय घेतो त्यावेळी स्वतःला संपुर्ण नेटविश्वातील कोणत्याही माणसापुढं पुढं ठेवत असता! भले तुम्ही स्वतःचे कितीही नियम पाळा, समोरचा माणुस स्वतःच्या अकलेनुसार आणि शिष्टाचाराच्या पद्धतीनुसार तुम्हांला निर्णय देणार. जर तुम्हांला हे झेपत नसेल तर तुमचा सोशल मीडियावरील वावर तुम्ही मोजका ठेवायला हवा आणि जर तुम्ही खमके असाल तर समोरच्याला सुद्धा सडेतोड प्रत्त्युत्तर देता आलं पाहिजे ! 

एक गोष्ट मात्र खरी, सोशल मीडियाचा वापर स्वतःकडं लक्ष खेचुन घेणं, दुसऱ्यांचा अवमान करणं ह्यासारख्या कारणासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय. आणि ह्यातुन आपल्या भारतीय समाजाचं विनम्रतेकडून अथवा सौजन्याकडून दूरवर जाणं मोठ्या प्रमाणात अधोरेखित होत आहे !

जाता जाता सोशल मीडियापासुन दूर जाणं शांततेच्या दृष्टीनं चांगलं असतं हे मात्र गेल्या काही दिवसांत जाणवलं !

बिबट्या माझा शेजारी -ChatGPT - लिखित भाग

२०२५ च्या अंतिम संध्याकाळी काहीतरी उद्योग असावा म्हणुन बिबट्या माझा शेजारी ही पोस्ट ChatGPT ला विश्लेषणासाठी दिली. ChatGPT ला ह्यात विशेष रस...