मौशी म्हणाली दिवाळीवर काहीतरी लिही. बरेच दिवस गुडी गुडी लिहुन काहीसं समाधानी वाटत नव्हतं. म्हणुन मग वाक्य लिहिलं
"बालपणीच्या त्या रम्य आठवणींचा शोध दर दिवाळीत सुरुच आहे
ती रम्य दिवाळी अजून दुरवर जाण्याची प्रथा यंदाही चालूच आहे"
काहीजणांना लगेचच संदर्भ लागला, काहीजणांना नाही लागला आणि काही जणांनी मला माफ केलं. ज्यांना लागला त्यात मोठ्या भावाच्या मित्रानं FB वर दिलेली प्रतिक्रिया "अगदी मनातलं" लाखमोलाची. शाळेच्या ग्रुपवर मात्र मला रोखठोक प्रश्न विचारण्यात आला -
बालपणची दिवाळी आणि आताची दिवाळी यात काय फरक आहे?
फराळ ,कंदिल, नातलग , मित्रमंडळ (अजून वाढल) सगळ तर तसच आहे
आता प्रश्न रोखठोक होता. एखादं नाट्यमय वाक्य लिहुन फेसबुकवर लाईक घ्यायचे पण त्या वाक्याचं स्पष्टीकरण मात्र आपण ज्याच्या त्याच्यावर सोडायचं हे योग्य नव्हे. त्यामुळं हा प्रश्न विचारणाऱ्या अनघाचे आभार !
आता आज सोमवार सकाळ! त्यामुळं ४० - ४५ मिनिटांत जे काही सुचेल ते खरडवुन ही पोस्ट संपवावी लागेल, त्यामुळं ही पोस्ट अगदी थेट मुद्द्यांच्या रूपांत !
- पुर्वीच्या दिवाळीत घरात प्रत्येकाला मिळणारी जागा छोटी असली तरी त्यातील एकोप्यानं, माणसांच्या संख्येनं ते घर खुप मोठं बनुन जायचं. संपुर्ण घराचे अलिखित नियम असायचे आणि घरातील सर्वजण धाकानं नव्हे तर एका विशिष्ट श्रद्धेनं हे नियम पाळायचे. नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदा ह्या दिवशी चार, साडेचारला उठणं हे सक्ती म्हणुन नव्हे तर त्या वर्षीच्या दिवाळीच्या आठवणीसाठी मनापासुन जमायचं.
- वर्षात नवीन कपडे मिळण्याच्या मोजक्या प्रसंगांपैकी (बहुतेकांसाठी एकमेव प्रसंगांपैकी ) दिवाळी हा एकमेव प्रसंग असायचा. त्यामुळं आपण ह्या नवीन कपड्यात हे आरश्यात (fb वर नव्हे )कसे दिसतो पाहण्याची खूप उत्सुकता असायची.
- भाऊबीजेच्या दिवशी सर्व आत्या, लग्न झालेल्या बहिणी घरी यायचे. माणसं, माणसांच्या जबाबदाऱ्या इतक्या मोठ्या झाल्या नव्हत्या की भाऊबीजेच्या दिवशी सर्वांना एकत्र जमणं शक्य होऊ नये ! आजी, काका काकी, मामा मामी, आत्या आत्याजी, मावशी, सर्व भावंडं - आपल्या संपुर्णत्वाची जाणीव देणारी ही नाती. दिवाळीत ही सारी एकत्र यायची आणि आपल्याला मानसिक समाधानाच्या खूप खूप उंच पातळीवर घेऊन जायची. आता ही सारी एकत्र नाही भेटत.
- आमच्यासारख्या काही कुटुंबात लहानपणीचा काही काळ अगदी चुलीवर पाणी तापवुन आंघोळ करावी लागायची. ज्यांनी सकाळी चार वाजता उठुन पेंगत पेंगत चुलीवर स्वतःसाठी पाणी तापवलंय त्यांना त्यातील अवर्णनीय मजा माहितच असेल.
- नरकचतुर्दशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी सात वाजता आंघोळ आटोपल्याने प्रचंड मोकळा वेळ असायचा आणि लोक गावातील नातेवाईक, मित्रमंडळींकडे घरी बनविलेल्या फराळाचा आनंद घेण्यासाठी जायची. हल्ली सकाळी कसबसं सात वाजता उठुन आंघोळी आधी WA, FB शुभेच्छा पाठविण्याची पद्धती रुढ झाली आहे आणि नातेवाईक, मित्रमंडळींसोबत दिवसा भेटण्याची पद्धत दुर्मिळ होत चालली आहे.
- सकाळी एकत्र केलेल्या फराळात बहुतांशी पदार्थ घरी बनविलेले असतं आणि एखाद - दुसरा मिठाईच्या दुकानातील असे. अजुनही घरी पदार्थ बनतात पण त्यातील बरेच पदार्थ वर्षभर उपलब्ध असतात त्यामुळं त्यांचं दिवाळीपण मागे सरत चाललं आहे. आणि दुकानातील मिठायांनी फराळाच्या ताटातील मानाचं स्थान पटकावलं आहे.
- पुर्वी मुलांना पोहणं, फटाके फोडणं हे शिकविण्यासाठी पालकांची सोबत लागत नसे. प्रत्येक परिसरातील मुलांचा गट जीवनावश्यक गोष्टींचं हे 'transition' नवीन मुलांना करण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत असे. त्यामुळं कोणतीही माळ बिनधास्त कशी फोडायची आणि फटाके संपत आले की लवंगी, केपा, टिकली वगैरे छुटपूट फटाक्यांकडे कधी आपला मोर्चा वळवायचा हे मुलांना लगेचच कळायचं.
यादी अजुन वाढू शकते पण सोमवार सकाळ असल्यानं थांबायला हवं. पण ह्यात एक मुद्दा! हे सर्व काही लहानपणीच्या नजरेतुन ज्यावेळी जबाबदारी अगदी शुन्य असायची. त्यावेळी मोठ्या असलेल्या आपल्या आईवडिलांना, काका - काकुंना, आत्या, मावश्यांना पण ही दिवाळी आनंदमयी वाटायची का? हा सुद्धा महत्वाचा प्रश्न! पण आयुष्यात काही आदर्शवत वाटणाऱ्या गोष्टींचा जास्त उहापोह न करता त्यांचं आपल्या मनातील आदर्शपण तसंच कायम ठेवावं हेच योग्य अशी माझी भुमिका ! दिवाळी redefine होतेय हेच खरं! कदाचित २०३७ साली मागे वळुन पाहिलं तर २०१७
सालची दिवाळी अगदी पारंपरिक वाटेल!
कालाय तस्मै नमः !
कालाय तस्मै नमः !