मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, २८ सप्टेंबर, २०१७

Finished But Not Perfect


व्यावसायिक जीवनात ज्या गोष्टींमध्ये अडखळायला झालं अशा गोष्टींची यादी खुप मोठी नसली तरी अगदीच छोटीसुद्धा नाही. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे एखाद्या दिलेल्या कामातील (Task) पूर्णत्वाचा ध्यास कोणत्या क्षणी सोडुन द्यायचा! 

३०- ४० वर्षांपुर्वी मध्यमवर्गीय घरातील लहानपणी आयुष्याचं गणित ज्या गोष्टींनी बनायचं त्या बऱ्यापैकी सरळसोप्या असायच्या. त्यामुळं त्याकाळातील बालकाच्या नजरेतुन पाहिलं असता बऱ्याच गोष्टी कळायच्या. आईवडिलांची आर्थिक व्यवहारातील शिस्त (खर्च केलेल्या पैं पै चा हिशोब ठेवणं, घरातील मोजक्याच गोष्टी जागच्या जागी ठेवण्याची पद्धत, सर्वांची घरात येण्या-जाण्याची ठरलेली वेळ, एकत्र जेवण) हे मोजकेच महत्वाचे घटक सरळसोपे होते. 

ह्या सर्व घटकांचा अप्रत्यक्ष परिणाम मनावर झाला होता. आयुष्यात जे काही करायचं ते परिपुर्ण असलं पाहिजे असं वाटायचं. ह्या तत्वाला पहिला धक्का बसला तो अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जीवनात! तिथं बऱ्याच गोष्टींचं स्वरुप dynamic होतं. तुम्हांसमोर पुर्ण करायला असलेल्या गोष्टींची संख्या बरीच असली की त्यातील एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे बाकीच्या गोष्टींत अपयशाला निमंत्रण देणं. अनुभवानं शिकत गेलो, पूर्णत्वाचा ध्यास हळुहळू मागं पडत गेला. 

हल्लीचं आयुष्य बरंच बदललं. खुपच dynamic झालं. तुमच्यासमोरील असलेल्या गोष्टींची संख्या, प्राधान्यक्रम प्रत्येक दिवशी, तासातासाला बदलत राहतो. मेंदुच्या एका कोपऱ्यात ह्या दोन गोष्टींचं अदृश्य चित्र तयार असणं खुप आवश्यक असतं. हे चित्र अगदी अचुकपणे रेखाटणं कोणालाच शक्य नसतं पण ज्यांना हे चित्र reasonably अचूकतेने आपल्या मेंदुत सतत राखणं शक्य होतं, ती माणसं यशस्वी होण्याची शक्यता वाढीस लागते. 

पण शेवटी माणुस माणुस असतो, यंत्र नव्हे. त्यामुळं आपल्या स्वभाववैशिष्ठयांमुळं आपण एखाद्या टास्कला त्याच्या गरजेपेक्षा थोडा जास्तच वेळ देतो कारण हे करताना आपल्याला बरंच समाधान मिळतं. बऱ्याचवेळा आपण हा निर्णय जाणीवपुर्वक घेतो. दुनियेच्या गदारोळात समाधानाचे क्षण पुर्णपणे नाहीसे झालेत असं नाही पण त्यांना शोधण्याच्या  कलेने आपली काठिण्यपातळी मात्र दिवसेंदिवस उंचावत नेली आहे. 

जाताजाता - ह्या सर्व कशाबशा संपवलेली पण परिपूर्ण नसलेली कामं आपल्याला सहजासहजी सोडत नाहीत. ती आपल्यामागं मनात कोठंतरी भुणभुण करीत राहतात. काही काम थोडीशी भुणभूण करुन मनःपटलावरून नाहीशी होतात तर काहींची भुणभूण दीर्घकाळ रेंगाळत राहते. आणि ह्या सर्वात लहानपणी पाहिलेली नीटनेटकी लावलेली, मोजक्याच गोष्टींनी भरलेली खोली उगाचच डोळ्यासमोर येत राहते! 

शनिवार, २३ सप्टेंबर, २०१७

अंतर्मुख



ह्या आठवड्यात एक लक्षवेधी वाक्य ऐकायला मिळालं. अंतर्मुख लोक ऊर्जा मिळविण्यासाठी स्वतःच्या आत डोकावतात तर बहिर्मुख लोक समाजाशी झालेल्या संपर्कातुन ऊर्जा मिळवितात. हे वाक्य तसं रूढार्थानं Heavily Loaded होतं. 

ह्या वाक्यावर विचार करण्यासाठी त्यावेळी जास्त वेळ मिळाला नाही. पण आज शनिवारी सकाळी मात्र हे वाक्य आठवलं आणि म्हटलं की ह्यावर दोन चार शब्द खरडवुया. माणसाला ऊर्जेची गरज का भासते? विविध माणसांच्या ऊर्जानिर्मितीच्या गरजा वेगवेगळ्या असतात. आपलं वैयक्तिक, व्यावसायिक काम व्यवस्थित करता यावं ह्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज असते. अगदी मोठं विधान करायचं झालं तर "आपल्याला स्वतःविषयी चांगलं वाटावं" ही मनःस्थिती आणण्यासाठी आपण धडपडत असतो. कलाकार ह्याबाबतीत अगदी खास असतात. आपल्या मनाची एक विशिष्ट स्थिती असल्याशिवाय ते आपली सर्वोत्तम कला पेश करु शकत नाहीत.

अंतर्मुख माणसांची स्वतःची अशी काही खासियत असतात अशी माझी अटकळ आहे. 

ह्या व्यक्तींचं आणि त्यांच्या अंतर्मनाचे एक dedicated communication channel असतं. आणि ह्या चॅनेलला बाह्यव्यत्ययापासुन सुरक्षित ठेवण्याची कला त्यांना उत्तम साधली असते. अशा माणसांमध्ये आपल्या स्वतःच्या क्षमतेविषयीची खात्री आणि जितकं यश आपल्या स्वतःच्या हिकमतीवर मिळवता येईल त्यावर समाधान मानण्याची तयारी ह्या गुणांचा काहीसा मिलाफ दिसुन येतो. अंतर्मनाला सतत नवनवीन विचारांचा, ज्ञानाचा पुरवठा करणं ही ह्या अंतर्मुखी माणसांची महत्वाची गरज / जबाबदारी असते. 

काही माणसं जन्मतः अंतर्मुख असतात तर काहींना परिस्थिती अंतर्मुख बनवते. परिस्थितीनं अंतर्मुख बनवलेल्या माणसांच्या बाबतीत कधी कधी काही लोकांनी दिलेल्या कठोर अनुभवांची परिणिती संपुर्ण जगाविषयी विरक्तीची भावना निर्माण होण्यात झालेला दिसुन येतो. 

जन्मतः अंतर्मुख असलेली माणसं आयुष्यभर अंतर्मुखच राहतील असंही नाही. बाह्यवातावरणात आपलं अस्तित्व टिकवुन धरण्यासाठी त्यांना आपलं मुळ रुप / स्वभाव बाजुला सारुन बहिर्मुख बनावं लागतं. परंतु बऱ्याच वेळा असल्या माणसांचं अवघडलेपण त्यांच्या वागण्यातुन दिसुन येतं. 

वरील लेखात मी माणसांचं introvert आणि extrovert अशा दोन अगदी टोकाच्या प्रकारात थेट वर्गीकरण केलं. पण लिहितालिहिता जाणवलं की खरंतर प्रत्येक माणसात हे दोन्ही गुणधर्म थोड्या-अधिक प्रमाणात अस्तित्वात असतात. ज्या गुणधर्माचं प्रमाण जास्त त्यानुसार आपण त्या व्यक्तीला ओळखतो. अजुन खोलवर पाहिलं तर कोणतीही व्यक्ती ठराविक settings मध्ये अंतर्मुख बनते आणि काही वेगळ्या settings मध्ये तिला बहिर्मुख बनायला जमतं. माणसाचं आयुष्य कसं काय उलगडत जातं आणि त्यांना अंतर्मुख / बहिर्मुख बनायला भाग पडणारी settings किती प्रमाणात त्यांच्यासमोर पेश होतात ह्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा बाह्य थर बदलत राहतो. 

(तळटीप - हा माणुस उगाचच इतकं गंभीर का लिहितो असा विचार तुमच्या मनात येणं साहजिकच आहे. हल्लीच्या सर्वत्र ऊतू जाणाऱ्या आत्मविश्वासाचं लोण काही प्रमाणात माझ्यापर्यंत सुद्धा पोहोचलंय !)

रविवार, १७ सप्टेंबर, २०१७

Return of मन वढाय वढाय !!



रविवारचे अनेक प्रकार असतात, त्यातील एक असतो अगदी शांत रविवार. प्राजक्ता आणि मी चांगल्या गप्पा मारतो. घरात बसुन शांतपणे गप्पा मारणं ज्याला जमलं त्याला सुखी आयुष्याची किल्ली सापडली असे फंडे वगैरे मी देतो. काही वेळ ऐकुन घेतल्यावर मग हळूच ती पळ काढते. मला कधी असा शांत वेळ मिळाला की मग मी उगाचच आधीच्या आयुष्याच्या आठवणी काढत बसतो. २००५ सालापासून काही वर्षे न्यु जर्सीत काढली होती. कधीही मोकळा वेळ मिळाला की ह्या काळाच्या आठवणी हमखास येतात. मागे ह्या काळातील आठवणींविषयी एक चांगली शृंखला मी लिहिली होती. 



  
आजही ह्या आठवणी आल्या. इथं आम्ही Avis ह्या भाड्यानं कार देणाऱ्या कंपनीच्या IT ऑफिसचा कारभार सांभाळायचो. त्यांचे अनेक व्यवस्थापक पन्नाशीच्या पलीकडचे होते. माझे त्या सर्वांशी चांगले पटायचे. त्यातील एक देशी होता. त्याचा स्वतःचा भला मोठा तीन मजली बंगला होता. मागे मोठं बॅकयार्ड होतं. आणि त्याच्या पलीकडं चक्क नदी वगैरे होती. त्याची दोन्ही मुलं अमेरिकेच्या दुसऱ्या राज्यांत कामासाठी स्थिरस्थावर झाली होती. तो बऱ्याच वेळा आम्हां लोकांना सहकुटुंब शनिवारी जेवणासाठी बोलवायचा. आमची सर्वांची मस्ती आनंदानं सहन करायचा. इतक्या मोठ्या घरात दोघांनाच राहायला कससंच वाटत नाही का ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला टाळायचा. 

अमेरिकेत असताना का कोणास ठाऊक पण शांत क्षण मिळायचे. आयुष्याचा खुप विचार करायला मिळायचा. पण इथं परतल्यापासून मात्र का कोणास ठाऊक ते कमी झाले. शांत बसुन विचार करायला लागल्यावर हमखास येणारा प्रश्न म्हणजे "ही सारी धडपड कशासाठी आणि ही कोठंवर करायची?" 

मुख्य प्रवाहात राहायची आपल्याला इतकी ओढ का लागते? बऱ्याच वेळा मुख्य कारण म्हणजे मुख्य प्रवाहात न राहिल्यानं आपण बरंच काही गमावतो आहोत ही भिती असते. जे काही व्यावसायिक आयुष्य पाहिलं आहे त्यावरुन एक म्हणायचं धाडस करु इच्छितो. "एका विशिष्ट कालावधी व्यतीत केल्यानंतर तुम्हांला सर्वसाधारणतः अगदी वरच्या पातळीपर्यंत काय घडत असावं ह्याचा अंदाज येतो आणि ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळालंच पाहिजे ह्याची आस कमी होते." जगात मनाचा खंबीरपणा, वाचन, संगीत आणि बौद्धिक चर्चेची भूक भागवणारी संगत लाभण्याचं सुदैव ज्यांना मिळालं आहे ती लोक केवळ मुख्य प्रवाहापासुन दूर राहण्याचं टाळावं म्हणुन उगाचच धडपड करत नाहीत. 

सात वर्षांपूर्वी हा ब्लॉग सुरु केला होता तेव्हा एक "चौथी पास" नावाची पोस्ट लिहिली होती. सुखी संसारासाठी चौथी पास पत्नी करावी असं मी विनोदानं माझ्या बहिणींच्या घोळक्यात म्हटलं असल्याचा त्यात उल्लेख होता. गंभीरपणानं बोलायचं झालं तर नवराबायकोपैकी एकानं घरी राहुन थोडा कमी टेन्शन देणारा उद्योग देत मुलांकडं लक्ष द्यावं असं मला मनापासुन वाटतं. थोडासा कालबाह्य विचार असला तरी मला आवडतो. 

शांतपणे बसुन (जमल्यास वाय - फाय, दिवे, टीव्ही सर्व काही बंद करुन) नुसतं मनाला मोकळं सोडा. मुंबईबाहेर असाल तर आकाशातील चांदण्या दिसतील अशा स्थितीत बसा.  सर्व चिंता, मागील आयुष्याचे विचार, पुढील आयुष्याविषयी वाटणाऱ्या सर्व चिंता सर्वांना मनाच्या मैदानात मोकळं सोडा. आयुष्य किती झटपट हातातुन निसटुन चाललं आहे ह्याची एक भितीदायक जाणीव अगदी प्रखरपणे तुमच्यासमोर उभी राहील. आणि आपल्याला ह्या क्षणी वाटणाऱ्या चिंता गेले कित्येक वर्षे आपल्याला केवळ त्रस्त करत राहिल्या आहेत आणि आपण त्यावर काहीच केलं नाही हे ही जाणवेल. मग मनात अजुन विचार येईल की जर आपण ह्यावर काहीच करत नसु तर त्याची चिंता तरी का करावी? 

थोडक्यात काय तर मनाच्या शांत स्थितीचा शोध घ्या! 
 
वैधानिक इशारा - एका शांततेचा अतिरेकी पुरस्कार करणाऱ्या माणसानं एका टोकाच्या शांत रविवारी रात्री लिहिलेली ही पोस्ट आहे. तिला गंभीरपणं घ्यायचं असेल तर ज्यानं त्यानं स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावं. 

बुधवार, १३ सप्टेंबर, २०१७

उदंड समीक्षक !



तात्या - "साला आपल्याला पण मीडियावर समीक्षक बनलं पाहिजे !"

वासु - "का रं बाबा, सगळं काही चांगलं चाललं असताना असले नको ते उद्योग का सुचतात तुला"

तात्या - "त्याचं काय आहे बघ वासु , सगळीकडं समीक्षकांची झुंड बाहेर पडली आहे. पावसाच्या आधी दोन दिवस घरात पुर्वी मुंग्या निघायच्या तसे अचानक इकडेतिकडे समीक्षक उगवलेत. तो आदित्य पाटील सुद्धा दररोज काही बाही लिहीत असतो. लोकं वाचो ना वाचो! "

वासु - "असला काही विचार करु नको तात्या, आपलं हे दररोज संध्याकाळी भेटणं, त्यानंतरची चर्चा सगळं काही व्यवस्थित चाललंय"

तात्या - "पण त्यात काय मजा नाय वासु ! मी दोन वाक्य बोलली कि तू त्यात खोड घालणार. मग माझ्या विचाराची लिंक तुटते ना! आता गावस्कर, मांजरेकर मंडळी बघ ना, T20 सामन्यामध्ये मोजुन २४० चेंडू टाकले जातात आणि त्यावर ही मंडळी २४००० वर शब्द लिहुन मोकळी होतात. एखादा खेळाडु दोन सामन्यात अपयशी ठरला तर त्यामागे मोठमोठ्या थियरी लिहितात. "अजिंक्यने टॅटू काढल्याशिवाय त्याला भारतीय संघात प्रवेश नाही" असं लिहून मोकळा होता येतं त्यांना. 

आपल्या गल्लीतला तो अमर! GST पासुन उत्तर कोरियाच्या अणुचाचणीचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम अशा सर्व विषयावर फेसबुक, ट्विटरवर अगदी आत्मविश्वासानं लिहितो.  मी जर का असलं इथं बरळलो तर तुझ्या शेलकीतल्या पाच दहा शिव्या खाव्या लागतील मला !"

वासु - "***** जा आता जेव आणि झोप! उद्या टाळकं ठिकाणावर आलं की भेटूच !"

दुसऱ्या दिवशीची सायंकाळ !

तात्या निमुटपणे वासूच्या हाती एक वही आणुन ठेवतो. 

वासु - "आता हे काय ?"

तात्या - "फेसबुकवर टाकायच्या आधी म्हटलं तुला दाखवावं ! आयुष्यभराची सवय एका दिवसात थोडीच जाणार !"

वासु - डोळे मोठे करून, "विषय कोणता आहे?" 

तात्या - "पडवळाच्या फसलेल्या भाजीच्या निमित्तानं " 

आपली हरपलेली शुद्ध सावरायला वासु काही क्षण घेतो . मग मुकाट्यानं वही वाचायला घेतो. 

पडवळाच्या फसलेल्या भाजीच्या निमित्तानं - लेखक तात्या अबकड 
आजची पडवळाची भाजी अबकड कुटुंबाच्या पाककलेच्या गौरवशाली इतिहासाला साजेशी नव्हती. तेल, मीठ, मसाला ह्यांचं प्रमाण दिवसेंदिवस घटत आहे. घटत आहे म्हणण्यापेक्षा त्यात सतत चढउतार दिसुन येत आहेत. पत्नीशी ह्याविषयी चर्चा केली असता तिनं मी ज्या प्रकारचे पडवळ बाजारातुन खरेदी केले त्याविषयी नाराजी व्यक्त केली. पडवळ एका विशिष्ट भाजीवालीकडुन खरेदी करावे ही सुचना न पाळल्यामुळं हे सर्व काही झालं असं तिचं म्हणणं होतं  ... 

वासु (वही बाजुला सारुन) -  "बस  बस ह्यापुढं वाचलं जात नाही!"

तात्या (अगदी नाराज होत ) - "का बरं? सोशल मीडियावर कसं सगळ्यांच्या पोस्ट्स वाचत असतोस, लाईक करतोस आणि कॉमेंट्स पण देतोस!

वासु - "अरे तो सोशल etiquette चा भाग आहे. आता हीच पोस्ट तु सोशल मीडियावर टाकली तर तुला नक्कीच शेकडो लाईक्स मिळतील, आणि माझी कॉमेंट सुद्धा मिळेल!"

तात्या - "हे असं कसं ? "

वासु - "अरे माझ्या ठरलेल्या कॉमेंट्स मी आलटून पालटुन टाकत असतो. आणि त्यातुन स्वतःला सुद्धा सिद्ध करीत असतो ! आणि त्यामुळं साईड इफेक्ट म्हणुन तुझा आत्मविश्वास बळावला तर it's ok for me!" 

तात्या - "ओह ओके ! ठीक आहे आताच जाऊन हे सर्व पोस्ट करतो "

वासु - "ठीक आहे ! पण उद्या घरी जेवण मिळणार नाही असलं काही वाक्य पोस्टमध्ये नाही ना ह्याची खातरजमा करुन घे ! नाही म्हणा तसं काही घडलंच तर गमभन कुटुंबाचं दार तुला सदैव उघडं असेल !"

(तळटीप - हल्लीचं वातावरण बघता अबकड आणि गमभन ह्या आडनावांची निवड करण्यात आली आहे. त्यातुन काही निष्पन्न होत नसल्यानं पहिल्या नावांवरून उगाचच काही तर्कवितर्क करु नयेत !)

मंगळवार, १२ सप्टेंबर, २०१७

निश्चितता की अनिश्चितता !



जगातील विविध लोकांना निश्चितता आणि अनिश्चितता ह्यांचं त्यांच्या जीवनातील आवडणारं, झेपणारं प्रमाण वेगवेगळं असतं. वयानुसार, समोरच्या व्यक्तीनुसार वैविध्याचे हे झेपणारं गुणोत्तराचं बदलत जाते. 

प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना जगात तग धरण्याची जबरदस्त आस (survival instinct) सोबत घेऊन येते. जोवर जगात तग कसं धरावं ह्याचं सुत्र जमत नाही तोवर माणसाचं वागणं काहीसं unpredictable असतं. जीवनाचं गणित जमविण्याचे विविध प्रयोग सुरु असतात. कधी काळी मग हे गणित जमल्याचा समज त्या माणसास होतो. मग पुढील काही काळ माणसं ह्या स्थितीस धरुन ठेवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी त्यांचं वागणं एका प्रकारच्या पॅटर्ननुसार होतं. म्हणजेच predictable होतं. मग पुढे कधी काळी आपला स्वतःचा USP निर्माण करण्याच्या प्रयत्नात माणसं मनातील एक छंद प्रत्यक्ष अंमलात आणतात. कधी हा छंद ठरवुन ठेवलेला असतो तर कधी अचानक गवसलेला असतो. बाह्य जगात आपण मान्य करो वा ना करो पण आपला एक विशिष्ट USP आहे अशी प्रत्येकाची मनोमन समजुत असते. आणि ही आपली मनातील समजुत जी लोक ओळखतात, त्या समजुतीला जोपासतात त्यांच्याशी आपलं साधारणतः चांगलं जमतं. 

काही गोष्टीत समोरच्या गोष्टीतील निश्चितता झेपण्याची आपली भुक (appetite) मर्यादित असते. वाहतूककोंडी, घरातील विद्युतपुरवठा ह्या आधुनिक काळातील गोष्टीसोबत हल्ली घरातील वाय - फाय कनेक्शन हा प्रकार सुद्धा समाविष्ट झाला आहे. जुनी माणसं (ह्यात पुरुष आणि सासवा ह्यांचा प्रामुख्यानं समावेश होतो) ह्या बाबतीत जबरा असायची. भाजीतील मीठाचं प्रमाण, दोरीवर वाळत घातलेले कपडे सगळं कसं अगदी प्रमाणात लागायचं. परंतु ही माणसं ह्या मोजक्या गोष्टींच्या निश्चिततेच्या इतकी प्रेमात पडली की मग ती काहीशी कालबाह्य झाली. 

काही प्रकारच्या नोकऱ्यांमध्ये तुमची वेळेवर ऑफिसात येण्याची निश्चितता, काम करण्याच्या पद्धतीतील निश्चितता तुम्हांला तुमच्या जॉबची काही काळ खात्री देऊ शकते. पण बदलत्या काळानुसार ह्या निश्चिततेचे सुद्धा शेल्फ लाईफ असतं. 

हल्ली निश्चिततेचे दोन प्रकार आढळुन येतात. नैसर्गिक आणि कृत्रिम. तुम्ही जसे आहात त्याचप्रकारे तुम्ही जेव्हा सतत वागत राहता त्यावेळी ती नैसर्गिक निश्चितता! इथं तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता ! ज्या प्रकारात समाजमान्यता मिळावी म्हणुन तुम्ही सोशल मीडियावरील आपलं वागणं एका विशिष्ट साच्यात (पॅटर्नमध्ये) आणण्याचा प्रयत्न करता ती झाली कृत्रिम निश्चितता! जी माणसं तुम्हांला जवळुन ओळखतात त्यांना हा बदल काहीसा आश्चर्यकारक वाटतो पण कालांतराने ते सुद्धा ह्याला सरावतात.

आतापर्यंतच्या मानवी उत्क्रांतीच्या प्रवासात मनुष्याने आपली आपल्या जवळच्या माणसांनी आपल्याशी एका नैसर्गिक निश्चित स्वरुपात वागावं ही गरज शाबुत ठेवली आहे. जोपर्यंत  ही गरज शाबुत राहील तोवर माणसांचं माणुसपण कायम राहील. 

कोणताही माणुस समोर आला की त्याच्या / तिच्या स्वभावाचं तीन विभागात वर्गीकरण करा. 
१) नैसर्गिक निश्चितता
२) कृत्रिम निश्चितता
३) अनिश्चितता

१) नैसर्गिक निश्चितता - ही माणसाच्या survival instinct चे प्रतिनिधित्व करते. अशी माणसं संसारी वृत्तीची असतात. 
२) कृत्रिम निश्चितता - ही माणसातील "मला समाजाच्या मुख्य प्रवाहात ठेवा" ह्या वृत्तीचे आणि काही अंशी ढोंगीपणाचे प्रतिनिधित्व करते.  
३) निश्चितता - ही माणसातील जिवंतपणाचे लक्षण आहे. अशा माणसांना वल्ली म्हणून समजलं जातं. माझे काका "अण्णा" अशा माणसांना एक चीज आहे असं म्हणतात. 

असो वेळेअभावी लेख आटोपता घेऊन ह्या सगळ्या प्रकारात मी कुठं बसतो ह्याचा काही वेळ विचार करतो. 

रविवार, १० सप्टेंबर, २०१७

Bariwali



दूरदर्शनची लोकसभा वाहिनी दर शनिवारी रात्री ९ वाजता एक पारितोषिक विजेता प्रादेशिक चित्रपट दाखवते. हाच चित्रपट रविवारी दुपारी २ वाजता पुनर्प्रक्षेपित केला जातो. शनिवारी रात्री मध्ये एकही जाहिरातीचा अडथळा नसलेले हे चित्रपट पाहणं हा माझ्यासाठी एक आनंदअनुभव असतो. 

काल रात्री पाहिलेला चित्रपट "बारीवाली"- म्हणजे घरमालकीण. हा मी समजत असलेला उच्चार चुकला असल्याची शक्यता आहे. किरण खेर ही आपल्या नोकरांसोबत आपल्या भल्या मोठ्या वाड्यात एकाकी आयुष्य जगणारी मध्यमवर्गीय स्त्री. अचानक तिच्या वाड्यात आपल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी परवानगी मागण्यासाठी एक चित्रपट दिग्दर्शक येतो. पुढं चित्रीकरणादरम्यान ही घरमालकीण मानसिकदृष्ट्या ह्या दिग्दर्शकामध्ये गुंतत जाते, तो विवाहित आहे हे माहित असुनही ! मग पुढं चित्रपट सरकतो आणि शेवटी किरण खेरच्या आयुष्यात पुन्हा एकदा एकाकीपण ठेवून निघुन जातो. 

मला असे एकाच वास्तुत मोजक्या व्यक्तिरेखांभोवती फिरत असणारे चित्रपट पाहायला आवडतं. बाकीचे लक्ष वेधुन घेणारे घटक नसल्यानं चित्रपटाचा दिग्दर्शक आपलं सर्व सामर्थ्य ह्या चित्रपटातील मोजक्या व्यक्तिरेखांचे पैलु उलगडुन दाखविण्यासाठी पणाला लावतो. ह्या चित्रपटाचा कल एका स्त्रीचं मनोविश्व उलगडुन दाखविण्याकडं झुकला होता. "माया मेमसाब" ने सुद्धा असाच प्रयत्न केला होता. कथा आणि हृदयनाथ ह्यांचं काहीसं गूढ संगीत ह्या दोन गोष्टी चित्रपटाला संस्मरणीय बनविण्यासाठी पुरेशा होत्या. 

स्त्रीचं मनोविश्व ही फार गूढ गोष्ट आहे. पुर्वीच्या कथेतील राजकुमारींना एखादा देखणा शूर राजपुत्र, ज्याचं मोठं राज्य आहे आपला वर म्हणुन अपेक्षित असायचा. आणि गोष्टीत तो त्यांना मिळायचा देखील! प्रत्यक्षात मात्र अपेक्षेनुसार वर मिळणं हे बऱ्याच वेळी कठीण असायचं, आहे आणि असेल. जसं स्त्रीच्या बाबतीत तसं पुरुषांच्या बाबतीत सुद्धा होतं. पण ह्या विषयावर बरेचसे पुरुष एकतर भावुक नसल्यानं अथवा बाह्यदर्शी आपला भावुकपणा दर्शवित नसल्यानं फारसं काही लिहिलं, बोललं गेलं नसावं. 

आपलं विवाहानंतरचे आयुष्य कसं असेल ह्याविषयी मुली जे काही चित्र रेखाटतात त्यात वास्तवपणे महत्वाच्या किती गोष्टींबाबत विचार केला गेलेला असतो हे जाणुन घेणं तसं कठीणच! पण उपलब्ध साहित्यानं किंवा जुन्या कृष्णधवल चित्रपटांनी जी प्रतिमा रंगवली त्यानुसार एकत्र कुटुंबात सर्व मोठ्यांच्या नजरा चुकवून आपल्या पत्नीसाठी गजरा / वेणी आणणारा, क्वचितच गाणं म्हणु शकणारा, ऑफिसात नोकरी करणारा वगैरे गुण आपल्या अंगी बाळगणारा नवरा मिळणं हे मुलींनी स्वप्नवत मानलं. प्रत्यक्ष संसारात पडून मुलं वगैरे झाल्यावर मात्र हे सर्व प्रकार मागे पडावेत अशी एकत्र कुटुंबपद्धतीची अपेक्षा असायची. आयुष्याच्या कोणत्यातरी एखाद्या टप्प्यावर मग मन बंड करुन उठायचं पण अशा बंडखोर मनाची मजल वहीत काव्य लिहिण्यापुरता किंवा मैत्रिणीशी सुचक शब्दात गप्पा मारण्यापुरता सीमित असायची हे चित्र रेखाटलं गेलं आहे. 

लहानपणी काही काळ आपल्यापेक्षा मोठ्यांना जास्त समजतंय अशी भावना मनात बाळगायची, तरुण वयात नोकरी, लग्न ह्या बाबींमुळं मन गर्क असतं. पण एक क्षण असा येतो की ज्यावेळी अगदी पर्वताइतक्या नसलं तरी किमान एका टेकडीसारख्या उंचीवर बसल्याची जाणीव मनात धरुन आपल्या आयुष्याविषयी, भोवतालच्या समाजाविषयी अनेक विचार मनात येतात. जर आतापर्यंत आपल्या आयुष्यानं आपल्याला जे काही दिलं त्याविषयी आपण काहीसे निराश असु आणि ह्या क्षणी आपल्या आयुष्यात ह्यापुढं फारसा काही मोठा बदल घडुन येण्याची आशा बाळगत नसु तर मग मनातील ही खिन्नता आपल्या संवादांतून, वागण्यातुन कुठंतरी बाहेर पडते. 

पण सर्वत्र असं चित्र नसतं. काही व्यक्ती जी काही परिस्थिती आहे त्यातुन सर्वात आशादायी असं चित्र रेखाटतात आणि ते प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करतात. हा एक महत्वाचा मुद्दा ! प्रत्येक व्यक्तीनं मनात रेखाटलेलं आयुष्याचं एक स्वप्नमय चित्र असतं. आणि ह्या स्वप्नमय चित्राचा प्रत्यक्ष जीवनातील एक equivalent असतो. स्वप्नमय चित्र बऱ्याच जणांचं सारखं असु शकतं पण त्याचं  equivalent मात्र प्रत्येकाचं आपापलं वेगवेगळं असतं. आणि ह्या equivalent च्या प्रवासाचा मार्ग आपल्यालाच आखायचा असतो आणि जमेल तसं त्याला upgrade करत राहायचं असतं. आपल्या स्वप्नमय चित्राचा equivalent न सापडल्यानं किंवा त्यासाठीची तडजोड करता न आल्यानं दुःखी राहिलेली मंडळी पाहणं दुसऱ्यांना सुद्धा क्लेशदायक असते. 

कसं असतं पहा ना ! ज्यांना स्वप्नमय चित्रं खूप चांगली रंगवता येतात ती बऱ्याच वेळा खूपच भावुक असतात आणि ज्यांना  equivalent लवकर समजतो ती नको तितकी वास्तववादी मंडळी असतात. बारीवाली ही स्वप्नमय चित्र रंगविण्याच्या पहिल्या पायरीवर होती तर माया मेमसाब ही पुर्णपणे आपल्या स्वप्नमय जगात वावरत होती. अशा स्वप्नमय माणसांच्या जीवनात एखादी वास्तववादी व्यक्ती येणं आवश्यक असतं. नाहीतरी आपला कोश विणुन ही मंडळी त्यात राहतात आणि कदाचित रुढ जगापासुन दुर निघुन जातात.  

राहता राहिली ती आपला equivalent नको तितक्या लवकर समजलेली मंडळी! बाह्यजगाच्या नजरेतुन पाहिलं तर ही मंडळी कदाचित निरस आयुष्य जगत आहेत असा भास होण्याची शक्यता असते पण ह्या मंडळींनी आपलं स्वप्न कोठंतरी जतन करुन ठेवलेलं असतं आणि जमेल तसं त्या ध्येयाकडं त्यांची वाटचाल सुरु असते.   

शनिवार, २ सप्टेंबर, २०१७

यंत्रांचे शिक्षण आणि कृत्रिम बुद्धिमत्ता !


जीवनात सोप्या आणि क्लिष्ट गोष्टी अवतीभोवती घडत असतात. 

सोप्या गोष्टींच्या बाबतीत आपण एकदा का त्यांचा अनुभव घेतला की त्या अनुभवांच्या आधारे भविष्यात आपण ती गोष्ट घडत असताना त्याच्या परिणामाची (Outcome / Result) सहज अटकळ बांधु शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादी गोष्ट उंचावरुन खाली सोडली की ती जमिनीवर पडायलाच हवी, काचेवर दगड मारला आणि ती सर्वसामान्य काच असेल तर ती फ़ुटायलाच हवी वगैरे वगैरे. गणित आणि विज्ञान ह्यांच्या बाबतीतसुद्धा काही बाबतीत आपण समीकरण, सुत्र (Formula) सहजासहजी मांडु शकतो. 

पण जीवन नेहमीच सोपं नसतं. आपल्या अवतीभोवती काही क्लिष्ट गोष्टी सुद्धा असतात. भारतासारख्या खंडप्राय देशात वार्षिक पावसाचा अंदाज बांधणं, एखाद्या ठिकाणी भुकंपाची शक्यता वर्तविणे ह्या गोष्टी बऱ्याच क्लिष्ट आहेत. क्लिष्टता येते ती दोन बाबतीत 
१. पाऊस, भुकंप ह्यासारख्या घटनांवर परिणाम करु शकणाऱ्या सर्व घटकांना ओळखुन काढणं. 

२. ह्या सर्व घटकांना ओळखुन काढल्यावर मग त्यांच्यातील अन्योनसंबंध प्रस्थापित करुन त्याच एखादं सुत्र किंवा समीकरण बनविणं. 

आतापर्यंत माणसाची बुद्धिमत्ता अशा क्लिष्ट गोष्टींच्या बाबतीत अचुक सूत्र, समीकरण प्रस्थापित करण्याइतकी प्रगत झाली नाही. त्यामुळं मग माणसाचा कल आपणच निर्माण केलेल्या संगणकांचा वापर करुन ह्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याकडे वळतो. इथं अचुक सुत्र, समीकरण नसल्यानं ह्याऐवजी मॉडेल ह्या प्रकाराचा वापर केला जातो. ह्या मॉडेल्सना आतापर्यंतची सर्व माहिती / डेटा आणि त्यावेळी आलेले रिझल्ट्स (निकाल) पुरवले जातात. संगणकाने विकसित केलेली ही निर्णय घेण्याची बुद्धिमत्ता ढोबळमानाने Artificial Intelligence ह्या नावानं ओळखली जाते. आणि ह्या क्षमतेचा वापर करुन प्रचंड प्रमाणातील माहितीचे पृथ्थकरण करुन त्या घटनेच्या भविष्यातील शक्यतेचे निदान करण्याच्या तंत्रास ढोबळमानाने Machine Learning असं म्हटलं जातं. ह्यातसुद्धा दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारची मॉडेल्स (Unsupervised Models) फक्त input डेटाचा वापर करुन निकालाची शक्यता वर्तवितात तर दुसऱ्या प्रकारची मॉडेल्स (Supervised Models) input आणि output ह्या दोन्ही माहितीचा वापर करुन निकालाची शक्यता वर्तवितात. 

सुज्ञ वाचकांनी आतापर्यंत ओळखलंच असेल की ह्या सर्व प्रकारात वर्तविलेली निकाल १००% अचुक असण्याची शक्यता विरळच. जे मॉडेल अधिकाधिक अचुक निकाल वर्तवु शकेल ते उत्तम मॉडेल!

आता आदित्य स्पेशल ! केवळ वरील तांत्रिक माहिती द्यायची असती तर मी ही पोस्ट लिहिली नसती. ह्याविषयावर शेकडो तज्ञ लोक बसली आहेत आणि मी वर दिलेल्या वरवरच्या माहितीत ते चुका काढतीलही. माझा मुद्दा आहे वेगळाच !  बऱ्याच वर्षांपासुन माझ्या मनात ही शंका होतीच. आता हे AI / ML प्रकरण जास्त तापायला लागल्यापासुन माझ्या मनातील ह्या शंकेनं जोरदार बळ पकडलं आहे. 

आपलं मनुष्यजातीचं ह्या भुतलावरील अस्तित्व हा आपल्याहुन बुद्धिमान शक्तीचा खेळ आहे. आपण सर्व मॉडेल्स आहोत. मॉडेल्स म्हणजे तसली मॉडेल्स नव्हेत तर आपण प्रयोगशाळेतील पात्र आहोत. चांगल्या प्रकारची एक शक्ती आणि वाईट प्रकारची एक शक्ती - ह्या दोघांनी आपापले हस्तक आपल्या रुपानं ह्या पृथ्वीवर पाठवले आहेत. आणि हे Supervised Model आहे. आपण आयुष्यभर सर्व अनुभव गोळा करतो, शिकतो.  ह्या आपल्या खऱ्या शक्तींना आपले आयुष्याभरातील अनुभव हवे असतात. त्यामुळं आपल्याला मरणं क्रमप्राप्त आहे. जेणेकरुन आपले हे मालक आपल्या अनुभवांचा वापर करुन अधिक बुद्धिमान चांगली / वाईट मॉडेल्स भविष्यात पृथ्वीवर पाठवेल. 

आता संगणकाच्या बाबतीत आपल्याला कसं भय आहे की ते एके दिवशी आपल्यापेक्षा बुद्धिमान होतील आणि आपल्यावर नियंत्रण करतील. त्याचप्रमाणं भविष्यातील आपल्यातील एखादा बुद्धिमान माणुससुद्धा ह्या आपल्या मॉडेलचं रहस्य उलगडुन काढेल आणि त्या मालकाशी लढा देईल. 

सारांश - इथं तिघेजण आहेत. शक्तिमान, माणुस आणि संगणक. पहिली शक्यता अशी की शक्तिमानानेच आपल्याला संगणकाची निर्मिती करण्याची बुद्धी दिली. जेणेकरुन ज्यावेळी आपण शक्तिमानाशी लढा द्यायला तयार होऊ त्याचवेळी शक्तिमान आपल्याविरुद्ध संगणकांना बंड करायला लावेल. 

दुसरी शक्यता. भविष्यातील बुद्धिमान माणुस संगणकांना आपल्यासोबत घेऊन मग त्या शक्तिमानाच्या अस्तित्वाचं कोडं उलगडुन काढेल आणि त्यांच्याशी लढा सुरु करेल. त्यावेळी हा बुद्धिमान माणुस मरण्यास सुद्धा नकार देईल.   



शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

मुंबईचा पाऊस !



लहानपणी किर्लोस्कर मासिक घरी यायचं. त्यात अनेक चांगली सदरं आणि कथा असायच्या. बहुदा त्याच मासिकात वाचलेली 'मुंबईचा पाऊस' ही कथा अजून चांगलीच लक्षात आहे. एक धडाडीचा उद्योजक, परंतु काही घटनांमुळे व्यावसायिक प्रवासात गटांगळ्या खात असलेला. अचानक त्याला एक चांगलं प्रकाशनाचे काम मिळतं. अट अशी असते की त्या छपाईच्या कामाच्या हजार प्रती एका आठवड्यात प्रिंट करायच्या असतात. प्रिटिंग प्रेसचा तो जमाना! ह्या उद्योजकाचा पूर्वीचा ओळखीचा प्रिटिंग प्रेसवाला काही कारणास्तव हात वरती करतो. हातची आलेली संधी गमवावी लागणार म्हणुन पुन्हा एकदा हताश झालेला हा माणुस इराण्याच्या हॉटेलात चहा पीत असताना त्याला त्याचा जुना मित्र भेटतो. खरंतर हा दारूच्या आहारी गेलेला असतो. ह्याची सुद्धा प्रिटिंग प्रेस असते पण त्याच्या दारु पिण्याच्या सवयीमुळे त्याला हे काम द्यायला उद्योजक तयार नसतो, पण आता परिस्थिती अशी आलेली असते की उद्योजकाचा नाईलाज असतो. तो त्याला ऍडव्हान्स आणि छपाईची कच्ची प्रत त्याच्या प्रेसमध्ये नेऊन देतो. परिषद रविवारी असते आणि शनिवारी उद्योजकाला ह्या प्रती आयोजकांना नेऊन द्यायच्या असतात, आणि काही अनपेक्षित घडामोडीमुळं ह्या उद्योजकाला पुढील तीन - चार दिवस ह्या दारुड्या मित्राशी संपर्क ठेवता येत नाही. शुक्रवारी संध्याकाळी मात्र तो धावतपळत ह्याच्या प्रिंटिंग प्रेसमध्ये पोहोचतो. तिथली परिस्थिती पाहुन त्याला मोठा धक्का बसतो. हजार प्रतींसाठी फक्त कागदं आणुन ठेवलेली असतात आणि हे महाशय दिलेल्या ऍडव्हान्सच्या आधारे दारुच्या नशेत चुर्रर्र असतात. ह्या उद्योजकाला पाहुन त्याची नशा धाडकन उतरते. पश्चातापाने दग्ध होऊन तो ह्या उद्योजकाला अजुन एक संधी देण्याची विनंती करतो. राखेतुन बाहेर यायची समोर आलेली संधी अशी जाताना पाहुन उद्योजकाला मोठा धक्का बसतो. तो तसाच घरी परततो. निराश मनात येणाऱ्या सर्व विचारांना मोठ्या प्रयत्नपूर्व मागं सारुन तो सकाळ येईपर्यंत धीर धरतो. मध्यरात्रीच्या आसपास केव्हातरी संततधार सुरु होते. आणि सुरुच राहते. सकाळी गुडघाभर पाण्यातुन वाट काढत हा उद्योजक कसाबसा आयोजकांच्या ऑफिसात पोहोचतो ते सर्व कबुली देऊन माफी मागायला! पावसानं नखशिखांत भिजलेल्या त्याला पाहुन आयोजक अगदी भारावुन जातात. त्याला बसायला देतात. विषयाला कशी सुरुवात करायची असा संभ्रम मनात बाळगुन असलेल्या उद्योजकाची अडचण आयोजक दूर करतात. "ह्या जोरदार पावसानं मुंबई सगळी कोलमडून पडली आहे! आमच्या बाहेरगावच्या बऱ्याच पाहुण्यांनी आम्ही उद्या येऊ शकत नाही असं कळवलंय आणि त्यामुळं ही कॉन्फरन्स आम्हांला पुढील रविवारी ढकलावी लागत आहे! आणि हो त्यामुळं आम्हांला प्रुफात काही बदल करावे लागत आहेत." आयोजकांचं हे बोलणं ऐकुन उद्योजकाचे विश्व बदलुन जातं. पुढं मग तो दारुडा प्रिंटर अगदी दृष्ट लागण्याजोगं काम करुन देतो आणि मग उद्योजक / प्रकाशकाची डुबती हुई नाव तरून जाते. 

हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे ह्या आठवड्यातील मुंबईचा पाऊस ! मंगळवार सकाळी ऑफिसात पोहोचलो तेव्हा मनाचा ९९.९९ % भाग हा ऑफिसच्या विविध कामांच्या विचारांनी व्यापुन गेला होता. ह्यातील प्रत्येक काम महत्त्वाचं आहे असंच वाटत होतो आणि त्यांना प्राधान्यक्रम देताना नेहमीप्रमाणं गोंधळ होत होता. ह्यातील एक जरी काम झालं नाही तर जणु काही दुनिया होत्याची नव्हती होणार होती. अचानक दोननंतर पावसानं जोर पकडला आणि मग मात्र सर्व चित्रच पालटुन गेलं. सर्वांच्या प्राधान्यक्रमावर एकच गोष्ट होती आणि ती म्हणजे सर्व कर्मचारी (IT
मधल्या लोकांना कर्मचारी हा शब्द वापरताना कससंच होतंय) सुरक्षितरित्या घरी पोहोचतील की नाही!

यथावकाश आमच्या ऑफिसातील सर्वजण सुखरुप घरी पोहचले. पण मुंबईतील सगळेच काही इतके सुदैवी नव्हते. डॉक्टर अमरापुरकर ह्यांचं ह्या पावसामुळं दुर्दैवी निधन झालं. एक तिशीतला तरुण कारमध्ये अडकुन मरण पावला. नेहमीप्रमाणं मुंबईच्या स्पिरिटला लोकांनी दाद दिली. आणि पालिकेवर हवं तितकं तोंडसुख घेतलं. टीव्हीच्या उथळ खासगी वाहिन्यांच्या माथेफिरु अँकरनी आक्रस्ताळेपणाने तारस्वरात उगाच गडबड केली. ह्या अँकर लोकांनी माझं डोकं फिरवलं आहे. पुढील काही दिवसांत त्यांच्यावर एक पोस्ट !

आता मुळ मुद्दा ! एक शहर म्हणुन आपल्या मुंबईनं सामान्यतेच्या मर्यादा केव्हाच ओलांडल्या आहेत. शांतपणे सर्व नागरिकांना आपले दैनंदिन व्यवहार पार पाडता येतील अशी स्थिती राहिली नाही. दररोज सकाळी ऑफिसात आणि रात्री घरी पोहोचलो की दोन मिनिटं बसुन स्वतःचीच पाठ थोपटुन घ्यावीशी वाटते. ज्याप्रमाणात शहर अनियंत्रितपणे विस्तारलं आहे ते पाहता शहराचं दैनंदिन चक्र बिघडण्यासाठी अगदी छोटीशी गोष्ट देखील पुरेशी होते. मेट्रोने अर्ध्याहुन अधिक शहराच्या वाहतुकव्यवस्थेचा बोऱ्या वाजवला आहे. उरल्यासुरल्या रस्त्यात एक छोटी गाडीदेखील जर बंद पडली तरी मागे दोन तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागतात. सामान्य माणसांना आपल्या भवितव्याची इतकी चिंता लागली आहे की त्यांना समाजकारणात भाग घ्यायला वेळ मिळत नाही आणि त्यामुळं राजकारणी लोकांचा दर्जा पुर्ण घसरला आहे. आणि सामान्य लोक केवळ त्यांना दोष देऊन पुन्हा आपल्या कामाला लागत आहेत. 

सारांश - मुंबई सहजासहजी ब्रेकडाऊन होईल अशी पाच - सहा कारणं आहेत. सरासरीच्या नियमानुसार ती अधूनमधून घडत राहणार. किंबहुना दररोजच्या दिवशी सकाळी आपल्या मनाच्या कोपऱ्यात आपण ही शक्यता घेऊनच उठत असतो आणि रात्री झोपताना ह्यातील एकही शक्यता वास्तवात उतरली नाही तर सर्वशक्तिमानाचे आभार मानुन आपण झोपी जातो. त्यामुळं ज्यादिवशी ह्यातील एखादी घटना घडेल तर शांत डोक्यानं त्यातुन मार्ग काढावा. उगाचच प्रशासनाला दोष देऊ नये. ह्या शहराच्या सिस्टिमचा भाग असण्याचा निर्णय आपणच घेतला आहे आणि सद्यस्थितीला  काही अंशी आपणही जबाबदार आहोत त्यामुळं धुतल्या तांदळासारखं स्वच्छ असल्याचा आव आणुन उगाचच गडबड करु नये. हा प्रकार अगदी सहन होत नसेल तर एखाद्या गावात जाऊन शांतपणे जीवन व्यतित करायला तुम्हांला कोणी थांबवलं नाही! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...