जे काही झालं ते नक्कीच भारतीय माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राच्या दृष्टीनं स्पृहणीय नाही. मुर्ती आणि सिक्का दोघंही कामगिरीच्या दृष्टीनं ह्या क्षेत्रात उत्तुंग शिखरं गाठलेली व्यक्तिमत्वे ! नक्की काय चुकलं ह्याचं खोल विश्लेषण करण्याइतकी आतल्या गोटातील बातमी माझ्याजवळ असण्याची शक्यता नाही. पण एकंदरीत दोन विचारसरणीतला जो फरक जाणवतो त्यावर आधारित ही पोस्ट !
१) संघटनेशी निष्ठा
सिक्का हे आधुनिक पिढीतील आघाडीची कामगिरी बजावणाऱ्या गटाचे प्रतिनिधित्व करतात. "मी जितका वेळ एखाद्या संघटनेत व्यतित करीन त्या वेळात मी माझं सर्वोत्तम योगदान त्या संघटनेस देईन. पण त्या बदल्यात मला महत्तम मोबदला मिळायला हवा. ज्या क्षणी माझी ह्या संघटनेतील नव्यानं शिकण्याची / नवीन तंत्रज्ञानावर काम करण्याची प्रक्रिया थांबेल त्याक्षणी मी नवी आव्हानं स्वीकारायला तयार असेन!" ही नव्या पिढीची मानसिकता.
मुर्ती हे इंफोसिसचे आद्य संस्थापक ! संघटनेकडे एक अपत्य म्हणुन पाहण्याची जुन्या पिढीची मानसिकता इथं दिसुन येते. संघटनेची मुल्य, मुळ रुप ह्यांच्यात बदल करण्याची तयारी आहे पण हे बदल इतकेही नकोत ज्यामुळं संघटना तिच्या मुळ रुपापासून ओळखण्यापलीकडं जाईल. आणि एका विशिष्ट पातळीपेक्षा जास्त पैसा कमावणं हे सुद्धा ह्या विचारसरणीच्या काहीसं तत्वांच्या पलीकडचं !
२) संवादकला
नवीन पिढीनं संवादकला चांगलीच आत्मसात केली आहे. संघटनेच्या कार्यासाठी ही संवादकला नक्कीच उपयोगी पडते पण ज्यावेळी ह्या पिढीच्या मनात आपल्यावर अन्याय होत आहे अशी भावना निर्माण होते त्यावेळी ह्या विकसित संवादकलेचा बऱ्याच वेळा आक्रमक वापर दिसुन येतो. उपलब्ध माहिती सोयीस्कररित्या कशी मांडावी ह्याची उत्तम उदाहरणं अशा वेळी दिसुन येतात.
ह्याउलट जुनी पिढी संयत स्वरुपात संघटनेच्या कार्यासाठी संवादाचा वापर करण्यासाठी ज्ञात आहे. आपली स्वतःची प्रतिमा डागाळली जात असेल तर तात्काळ प्रत्त्युत्तर देणं ही ह्या पिढीची खासियत नाही.
सारांश इतकाच की सिक्का ह्यांच्या राजीनाम्यानंतर आणि खास करुन सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या त्यांच्या राजीनामापत्रानंतर मुर्ती ह्यांची ज्या प्रमाणात प्रतिमा मलीन झाली ते योग्य नाही असं मला वाटतं. त्यांनी जे काही आयुष्यभरात साध्य केलं ते पाहता त्यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आपल्यापैकी किती जणांना आहे हा प्रश्न प्रत्येकानं स्वतःला विचारुन पहायला हवा. माझं इतकंच मत - मुर्ती ह्यांच्या मनात इन्फोसिस ह्या नावाशी जी मूळ प्रतिमा निगडीत आहे त्या प्रतिमेपासुन, संस्कृतीपासुन एका विशिष्ट प्रमाणापलीकडं घेतलेली फारकत त्यांना सहन झाली नाही. आणि त्यामुळं एखाद्या वयस्क आजोबांप्रमाणं त्यांनी कंपनीच्या कारभारात दखल द्यायला सुरुवात केली. जरी व्यावहारिकदृष्ट्या शक्य नसलं तरी ज्या क्षणी मुर्ती ह्यांनी सूत्रं आपल्या हातुन दुसऱ्याकडं सोपवली त्या क्षणी जर त्यांनी कंपनीचं नाव बदललं असतं तर हा सर्व प्रकार टाळता आला असता. मूर्तींच्या मनातील इन्फोसिसची प्रतिमा अबाधित राहिली असती आणि सिक्का ह्यांनासुद्धा ही कायापालटाची प्रक्रिया मनमोकळेपणानं राबवता आली असती.