मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

सोमवार, ३० जानेवारी, २०१७

सलाम राहुल !



आपल्या भोवतालच्या लोकांचं थोडं काळजीपुर्वक निरीक्षण केलं तर एक गोष्ट प्रकर्षांनं जाणवते. आपण लोकांचं वर्गीकरण विविध प्रकारात करु शकतो. 

पहिला प्रकार ज्यांना आपल्या स्वतःच्या वैशिष्ट्याविषयी, गुणांविषयी पुर्ण माहिती असते आणि त्याविषयी ते संतृप्त असतात.  त्यामुळं आपण जे काही नाही आहोत ते दाखविण्याचा आणि सोशल मीडियात त्यासाठी गवगवा करण्याचा त्यांचा प्रयत्न नसतो. आपल्या तत्वांशी एकनिष्ठ राहून ही लोक जीवन आपल्या मर्जीनं जगत असतात.  

आता हा पहिला प्रकार स्पष्ट केल्यावर बाकीच्या प्रकारांविषयी बोलणे सुज्ञास न लगे!

गेल्या आठवड्यात कोठंतरी आतल्या पानावर बातमी वाचनात आली. राहुल द्रविड ह्यानं बंगळुरू विद्यापीठानं देऊ केलेली सन्माननीय डॉक्टरेट पदवी नम्रतापुर्व नाकारली. ही पदवी नाकारताना त्यानं स्पष्टीकरण दिलं की सन्माननीय पदवी मिळविण्यापेक्षा संशोधन करुन खरीखुरी डॉक्टरेट मिळवणं मला आवडेल! राहुलला आपण सारे गेले कित्येक वर्षे ओळखतो. तो संशोधनात स्वतःला डुंबून घेईल ह्याविषयी जनांस संदेह नसावा. 

अजून एक गोष्ट! गेली एक दोन वर्षे भारतीय 'अ' संघ आणि युवा संघातून मुख्य क्रिकेट संघात येणाऱ्या गुणी क्रिकेटपटूंची संख्या नियमितपणे वाढीस लागली आहे आणि ती सुद्धा कोणता गवगवा न होता! थोडं डोकावून पाहिलं तर ह्या संघांच्या जडणघडणीत राहुल अगदी जवळून सहभागी झाल्याचं आढळून येतं. पण ह्याविषयी सोशल मीडियावर अजिबात कोठंही आत्मप्रौढी नाही! राहुलने कोठे क्लब विकत घेतला; ज्या खेळाशी त्याचा संबंध नाही त्याची जाहिरात केली असले प्रकार आपणास आढळणार नाहीत! 

एक समाज म्हणून आपण सोशल मीडियावर गवगवा करण्याची एक संस्कृती  गेल्या काही वर्षात उदयास आणली आहे (मी ही त्यात सहभागी आहे). ह्याचा परिणाम असा होतो की एखादं काम १०० टक्के परिपूर्णतेस नेण्याऐवजी ते ७० - ८० टक्के पुर्ण झालं की आपण तात्काळ प्रसिद्धीच्या मागे लागतो. अशी संस्कृती आपली पाळंमुळं रोवण्याच्या मार्गावर आहे अशावेळी शांतपणे आपलं कार्य पाडणाऱ्या राहुलकडं सुद्धा आपल्या सर्वांनी एक क्षणभर लक्ष देऊन योग्य ती शिकवण घेऊयात, हाच आजच्या पोस्टचा संदेश!

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

Trapped - भाग ७



आधीच्या भागाच्या लिंक्स 
भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 

भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html


खऱ्या तर जुन्या पण आताच्या नव्या स्वामींशी जुळवून घेण्याचा योगिनीचा आटोकाट प्रयत्न सुरु होता. ह्या स्वामीला (नवस्वामी) त्याच्या अनुपस्थितीमधील काळातील नक्की किती आणि काय आठवेल हा प्रश्न तिने आधीच्या (परस्वामी) ला विचारुन पाहिला होता. पण त्यानंदेखील काही खात्रीलायक उत्तर दिलं नव्हतं कारण ते त्याला पूर्णपणे माहित नव्हतं. योगिनीला सतत नवस्वामीवर लक्ष ठेवावं लागत होतं. 

नवस्वामीला ऑफिसात जाऊन दोन तीन दिवस झाले असतील पण त्याची चिडचिड काहीशी वाढीला लागली होती. बहुदा त्याला ऑफिसातील सर्वच गोष्टी समजत नव्हत्या. आणि आपल्याला अचानक हे सारं काही समजत नाही हे त्याला कळत नसल्यानं त्याचा संताप होत होता. घरी देखील आर्यन त्याच्या जवळ जात नव्हता. त्या छोट्या जीवानं हा फरक नक्की जाणला असा कयास योगिनीनं बांधला होता. 

नवस्वामी रात्री परतला तो अगदी तणावपूर्वक चेहरा घेऊनच! "काय झालं स्वामी!" योगिनीनं अगदी काळजीपुर्वक स्वरात विचारलं. तिच्या मनात एक दोन दिवसांपासून प्रचंड गोंधळ माजला होता. सुरुवातीची  नवस्वामीविषयीची तटस्थ भावना हळुहळू नाहीशी होत चालली होती. "ह्या साऱ्या प्रकरणात ह्याचा काही दोष नाही, मग आपण ह्याला शिक्षा का द्यायची" असा एकंदरीत तिचा विचार होऊ लागला होता. 
"मला नक्की काय झालंय ते समजत नाही योगिनी!" आर्यन झोपी गेला आहे ह्याची खात्री करुन आलेला नवस्वामी बोलला. "ऑफिसात काही जमत नाहीय, इथं आर्यन माझ्याकडं येत नाही, आणि तू सुद्धा अशी तुटकतुटकपणे वागतेस! माझ्याच्यानं हे सारं सहन नाही होतं!" इतकं बोलुन तो हमसाहमशी रडू लागला. योगिनीनं मनावर घातलेली सारी बंधनं तुटून पडली होती. 

सकाळी नवस्वामी बराच सावरला होता. आर्यन जरी त्याच्या जवळ यायला तयार नव्हता तरी त्यानं मोठ्या प्रेमानं त्याला खेळवला. जाताना योगिनीकडे एक प्रेमळ नजर टाकुन तो ऑफिसला गेला. हातात चहाचा कप घेऊन योगिनी खिडकीत बसली होती. मनातील विचारांचं वादळ थांबण्याचं नाव नव्हतं. रस्त्यावरची वाहतुक सुरळीत चालली होती. अचानक पलीकडं तिला तो वेडा दिसला. अगदी परस्वामीच्या आगमनाच्या पहिल्या आठवड्यात दिसला होता त्यानंतर आज पहिल्यांदा दिसला होता. योगिनीच्या हातातील चहाचा कप निसटता निसटता वाचला. "हे सर्व माझ्याच बाबतीत का घडत आहे!" असं ती स्वतःशीच पुटपुटली आणि भयानं तिनं खिडकी लावून घेतली. 

खिडकी लावून ती मागं वळली आणि तिला अजुन एक धक्का बसला. आर्यन खिदळत छताकडं पाहत होता. त्याला असा खिदळताना तिनं पहिल्यांदाच पाहिला होता. ती धावतच आर्यनच्या पाळण्याकडं गेली. आर्यनला हात लावणार इतक्यात तिला हवेत एक अदृश्य थराची भावना स्पर्शुन गेली. तिला ही भावना ओळखीची होती. मृत्यूनंतर कसा अनुभव येतो आणि तिथंही मी तुला सोडणार नाही ह्याची जाणीव करुन देण्यासाठी परस्वामीने जो तिला अनुभव दिला होता, नेमकी तीच भावना होती. 

"स्वामी, तू इथं आहेस?" योगिनी मोठ्यानं ओरडली. तिचा संयम सुटला होता. "हो!" रागीट स्वरात स्वामीच उत्तर आलं. आर्यन जिथं पाहून खिदळत होता नेमका तिथुनच आवाज आला होता. "मी आलेलं तुला आता कसं आवडणार?" परस्वामीच्या शब्दाशब्दातून क्रुध्दता प्रकट होत होती. "तू असं का म्हणतोयस स्वामी?" योगिनी रडवेल्या स्वरात म्हणाली. "मग काय एका पृथ्वीवासियासोबत तुझा संसार अगदी सुखानं सुरु झाला ना आता!" स्वामी म्हणाला. योगिनीच्या डोक्यात प्रकाश पडला होता. पण मग तिच्या डोक्यात अजून एक विचार आला. हा परस्वामी अगदी केव्हाही आपल्या अवतीभवती अदृश्य स्वरूपात असाच वावरत राहणार काय?  

आर्यनच खिदळणं असंच सुरु होतं. "चूप बस!" रागानं योगिनी आर्यनवर खेकसली. आर्यनचा चेहरा अगदी रडवेला झाला. त्याला पहिल्यांदा योगिनीनं ओरडलं होतं. आर्यन जसा रडवेला झाला तसं परस्वामीचा स्वर अगदी पालटला. "योगिनी, खबरदार त्याला ओरडलीस तर!" तो तारस्वरात ओरडला. योगिनीचं मन झपाट्यानं विचार करु लागलं होतं. सततच्या विपरीत परिस्थितीत राहिल्यानं स्वतःचा बचाव करण्याची वृत्ती तिच्या मनात प्रबळ झाली होती. ह्या परस्वामीपासून बचाव करण्यासाठी आर्यन हे एक साधन होऊ शकतो हा विचार तिच्या मनात आला होता. आपल्या पोटच्या बाळाविषयी असा विचार आपल्या मनात यावा ह्याची तात्काळ पश्चातापपूर्ण भावना तिच्या मनात आली. "मी त्याला घेऊन जाईन!" परस्वामीनं  आपलं अस्त्र बाहेर काढलं. "आला मोठा घेऊन जाणारा! तुझ्या लोकांपासून आपला जीव कसा वाचवायचा ते पहिलं पाहा तू ! " योगिनी एखाद्या वाघिणीपणे लढा देत होती. 
तिचं शेवटचं वाक्य बहुदा परस्वामीला मर्मी वार करुन केलं असावं. "योगिनी!" परस्वामी अगदी तारस्वरात ओरडायला आणि घराच्या दाराची बेल वाजायला एकच गाठ पडली. 
(क्रमशः )

रविवार, १५ जानेवारी, २०१७

सुखाचे पुनर्रव्याख्यीकरण



मुंबई शहर आणि उपनगरांत कबुतरांनी बराच उच्छाद मांडला आहे. त्यांचं मानवी वस्तीच्या अगदी नजिकचं वास्तव्य मनुष्याला आरोग्यदृष्टीनं अगदी घातक आहे. परंतु अनेकजण ह्या वास्तवाला विसरुन कबुतरांच्या घनदाट वस्तीतील वास्तव्याला प्रोत्साहन देत असतात. ह्या विषयावर पोस्ट नंतर कधीतरी!

पोस्टची सुरुवात कबुतरांच्या संदर्भानं करण्याचं कारण म्हणजे ह्या कबुतरांचं एक स्वभाववैशिष्ट्य! समजा तुम्ही काही दिवस तुमची मुंबईतील सदनिका बंद ठेऊन शहराबाहेर गेलात आणि कबुतरांच्या जोडप्यानं तुमच्या सदनिकेच्या उघड्या राहिलेल्या फटीतून अथवा बाल्कनीत ठेवलेल्या कुंड्यामध्ये वा अवतीभोवती आपल्या वास्तव्यासाठी एका जागेची निवड केली तर मग मोठा बाका प्रसंग उद्भवतो! तुम्ही परत येता आणि ह्या कबुतरांना हुसकावुन लावण्याचा प्रयत्न करता, परंतु ह्या ठिकाणी आपल्याला घर बांधता येणार नाही ही समजुत ह्या कबुतरांच्या गळी उतरवताना आपल्या सर्वांना नाकी नऊ येतात. 

आपल्या सर्वांचं सुद्धा असंच असतं नाही का? आपण सुद्धा आपल्या समजुतीनुसार आपल्या स्वतःच्या, आपल्या परिवाराच्या सुखाचं एक चित्र आपल्या मनात रंगवुन ठेवतो. आणि ह्या चित्राशी भावनिकदृष्ट्या आपण स्वतःला प्रचंड प्रमाणात गुंतवून घेतो. भोवतालचं जग अगदी क्लिष्ट बनत चाललं आहे. आपण हे चित्र रेखाटताना विचारात घेतलेल्या भोवतालच्या घटकांच्या स्थित्या, त्यांचे संदर्भ झपाट्यानं बदलत राहतात. भोवतालच्या व्यक्ती बदलतात (ह्यात दुसऱ्या व्यक्ती आपल्या जीवनात येतात आणि असणाऱ्या व्यक्तींचे स्वभाव बदलतात हे  दोन अर्थ अभिप्रेत आहेत). पण आपलं मन मात्र त्या कबुतराच्या जोडीप्रमाणं काहीसं वेडं बनतं. आपल्या मनातील सुखाची मूळ व्याख्या, ते मूळ चित्र आपण अगदी उराशी बाळगुन ठेवतो. आणि मग काहीसं कालबाह्य झालेलं सुखाचं  हे चित्र आपल्याला प्राप्त झालं नाही म्हणून दुःखी बनुन राहतो. मी दुःखी आहे, मला सहानभूती हवी ह्या भावनेत आयुष्य व्यतीत करणारी अनेक मंडळी आपल्याला अवतीभोवती वावरताना दिसतात! 

आजच्या ह्या पोस्टचा मतितार्थ एकच! योग्य वेळी सुखाचं योग्य पुनर्रव्याख्यीकरण करा! अगदी आजचं उदाहरण घ्यायचं झालं तर रविवारच्या सुखाची व्याख्या त्या दिवशीच्या  जेवणाच्या विशिष्ट चित्राशी निगडित असते. आज आलेली संकष्टी विचारात घेता ह्या दिवशीच्या आनंदाची व्याख्या लवकरात लवकर पुनर्रचित करा! सुखी व्हाल !!

शनिवार, ७ जानेवारी, २०१७

शिखरापल्याड!



आंग्ल भाषेत काही समर्पक शब्दप्रयोग आहेत. "Over The Hill" हा त्यातला एक! एखाद्या व्यक्तीनं आपल्या क्षेत्रात आपल्या कारकिर्दीतील कामगिरीचं उत्तुंग शिखर गाठल्यानंतरच्या कालावधीत जेव्हा ती व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रिय असते परंतु आपल्या सर्वोत्तम कामगिरीची बरोबरी करू शकत नाही त्यावेळी ती व्यक्ती  "Over The Hill" आहे असं म्हणण्याचा प्रघात आहे. 

पूर्वी मी माझ्या आवडत्या खेळाडुंच्या कामगिरीबाबत बराच भावुक असायचो. बोरिस बेकर, कपिल देव आणि हल्ली हल्ली रॉजर फेडरर ही काही उदाहरणं! ही मंडळी आपापल्या क्षेत्रात बराच काळ शिखरावर होती. ह्या कालावधीनंतरसुद्धा  ह्या मंडळींनी आपल्या क्षेत्रात सक्रिय राहण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांचा आपला निर्णय होता; आर्थिक बाबीसोबत अजून काही कारणं असतील. बोरिस आणि कपिल ह्यांच्या उदाहरणाच्या बाबतीत माझं तात्कालीन वय पाहता मी व्यावहारिकपेक्षा भावनिक जास्त होतो. आणि त्यामुळं ह्या मंडळींची शिखरापलीकडील कामगिरी पाहणं माझ्यादृष्टीनं फार क्लेशदायक ठरलं. ही लोक निवृत्तीचा निर्णय का घेत नाहीत ह्यावर मी बराच काळ मनात दुःखी होऊन विचार करीत असे. 

हल्लीचा फेडररसुद्धा सारख्या परिस्थितीत आहे. पण जीवनाच्या प्रवासात काही अधिक वास्तवांचा सामोरा केल्यामुळं  रॉजरचं हे रुप मी अधिक सामंजस्यानं समजुन घेतो. आर्थिक बाजुसोबत स्वानंदासाठी हा खेळत असावा अशी समजुत मी करुन घेतो. 

व्यक्तींप्रमाणं संस्थांनासुद्धा अशा कालावधीचा सामना करावा लागतो. पण संस्थांना एक पर्याय उपलब्ध असतो. यु ट्यूबवर The Rebirth of Eagle हा एक सुरेख व्हिडीओ उपलब्ध आहे. एकंदरीत ७० वर्षाचं आयुष्य जगू शकणाऱ्या रुबाबदार गरुडाला मानानं आयुष्य जगण्यासाठी ४० वर्षाच्या आसपास आयुष्याच्या मध्यंतरावर एक कठोर निर्णय घ्यावा लागतो.  त्याला एका अत्यंत कठीण स्थित्यंतराचा  सामना करत आपलं आधीचं रुप आमुलाग्र बदलावं लागतं. हा कठीण बदल स्वीकारण्याचं मनोबल दाखवलं तरच पुढील आयुष्य सुखकर होतं. 

एक प्रजाती म्हणुन मनुष्यजात उत्क्रांतीच्या प्रगत टप्प्यावर आहे. ह्या पुढील काळात मनुष्यजातीच्या व्यवहाराची मापकदंड झपाट्यानं बदलत जाणार आहेत. त्यामुळं आपली परिस्थिती over the Hill झाली की एक तर गरुडाची मानसिकता दर्शवावी लागणार किंवा आहे ती परिस्थिती आनंदानं स्वीकारुन जीवनगाणं उत्साहात गात राहावं लागणार! 

शेवटी जाता जाता Dwarf Star अर्थात खुजा तारा ही संज्ञा आठवली. आपल्या प्रखर तेजानं विश्वाचा एक कोपरा उजळून टाकणाऱ्या ताऱ्याला सुद्धा असलं खुजेपण अनुभवावं लागणं हे त्याचं प्राक्तनच होय! 

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...