मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २८ डिसेंबर, २०१६

यशस्वी भव!


माणसानं आयुष्यात यशस्वी बनण्यासाठी कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या टाळाव्यात ह्यासाठी माहितीजालावर अनेक संकेतस्थळ मार्गदर्शन करत असतात. अशीच एक लिंक वाचनात आली आणि त्यावर आधारित ही पोस्ट! ह्यातील बरेचसे मुद्दे ह्या लिंकवर आधारित आहेत पण उदाहरणं मात्र मी माझी देण्याचा प्रयत्न केला आहे. 

आता इथं एक स्पष्टीकरण आवश्यक आहे. यशस्वी भव म्हणजे प्रत्येकानं आपापल्या क्षमतेचा महत्तम वापर करुन जीवनात शक्य तितकं उच्चत्तम स्थान गाठणं! दुनियेच्या नजरेत तुम्ही कदाचित सर्वसामान्य असू शकाल पण जर तुम्ही उपलब्ध परिस्थितीत आणि तुमच्या मर्यादेत शक्य तितकी ध्येये साध्य केलीत तर तुम्ही यशस्वी झालात!  

  1. आरोग्यपूर्ण जीवनसरणी. 
    • मदिराप्राशन करू नका असं मी जरी म्हणू इच्छित असलो तरी म्हणणार नाही कारण हल्ली बरेच यशस्वी लोक मदिराप्राशन करत असतात. त्यामुळं जर तुम्ही मदिराप्राशन करणारच असाल तर आपला तोल कोणत्याही क्षणी जाणार नाही इतक्या बेतानंच करा असा सल्ला मी देईन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे  आहार मर्यादित ठेवा! 
  2. अल्पमुदतीची ध्येये टाळा. 
    •  ह्या मुद्द्यातील महत्त्वाचा भाग असा की आपलं दीर्घमुदतीचे ध्येय कोणतं हे माहित असणं. हे जर तुम्हांला माहित असेल तर तुम्ही त्या ध्येयापर्यंतचा मार्ग शोधुन काढण्याची शक्यता बरीच वाढीस लागते. 
  3. अपयशासाठी बहाणे शोधणे टाळा. 
    • काही विशिष्ट कारणांमुळं मला एखादी गोष्टी शक्य होत नाही असं म्हणू नये. सतत अशी कारणं देत राहिल्यास थोड्याच वेळात लोक त्या कारणांचा संबंध तुमच्या  मर्यादित कुवतीशी लावतात. 
  4. ठराविक विचारसरणीचा त्याग.  
    • सद्ययुगात तुम्ही सतत नवनवीन गोष्टी करत राहायला हवं. आणि नवनवीन गोष्टी यशस्वीरित्या करायच्या झाल्या तर तुम्हांला नवीन तंत्रांचा वापर करायला शिकायला हवं. आणि नवीन तंत्र शिकायची म्हणजे एका विशिष्ट पद्धतीनं विचार करणं सोडुन देणं ओघानंच आलं. 
  5. रामबाण उपाय वगैरे प्रकारांवर विश्वास ठेवू नका. 
    • संपूर्ण जगात तुम्ही एकटेच स्मार्ट नाही आहात. त्यामुळे जगात यशस्वी बनायचं असेल तर प्रत्येक दिवशी मेहनत करणं आवश्यकच आहे. एखाद्या मॅजिक स्टिकच्या वापरानं यश तुमच्या पायाशी येईल अशी समजुत सोडून द्या.  
  6. परिपूर्णतेचा ध्यास सोडा.  
    • एखादी गोष्ट एखाद्या विशिष्ट् मर्यादेपेक्षा परिपूर्ण करण्याचा मोह सोडुन द्या. घरातील सर्व गोष्टी अगदी टापटीप असाव्यात असं वाटणं ठीक पण त्यातील परिपूर्णतेपायी बाकी सर्व गोष्टींचा विसर पडू देणं हे चुकीचंच! 
  7.  एका वेळी अनेक गोष्टीवर लक्ष देणं टाळा. 
    • एका विशिष्ट् क्षणी / दिवशी / वर्षी आपल्या जीवनात काही मोजक्या गोष्टी / व्यक्ती महत्वाच्या असतात. ह्या गोष्टी / व्यक्ती ओळखता येणं आणि त्यावर लक्ष केंद्रित करणं हे महत्वाचं!
  8. सर्व गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचा ध्यास सोडा.  
    • आपल्या नियंत्रणात केवळ एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे आपली मानसिकता! आपली मानसिकता सोडून बाकी सर्व गोष्टी नियंत्रणात आणण्याचा आपण कितीही प्रयत्न केलात तरी त्यावर प्रभाव टाकणारे अन्य घटक असतात आणि ते तुम्हांला निराश करु शकतात.  
  9. सर्वांना खुश करण्याचा मोह टाळा. 
    • सर्वाना खुश करण्याच्या प्रयत्नात तुमच्या मूळ ध्येयापासून तुमचं लक्ष विचलित होऊ शकतं!
  10. नकारात्मक लोकांची संगत शक्य तितकी टाळा.  
    • जे लोक आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करुन आयुष्यात प्रगतीपथावर आहेत अशा लोकांची प्रयत्नपूर्वक साथ जोडा. 
  11. आपण सर्वांचे आवडते असावं हा विचार डोक्यातुन काढून टाका.
    • काहीसा मुद्दा ९ शी संबंधित! लोकांचं आवडतं बनण्याच्या मोहापायी आपण आपल्या मूळ रूपापासून, ध्येयापासुन दूर जातो. 
  12. सोशल मीडियावरील आपलं अवलंबित्व सोडा.  
    • आपलं आनंदी राहणं आपल्या सोशल मीडियावरील अवताराशी निगडित ठेऊ नका. 
आणि हो यशस्वी बनणं म्हणजे प्रत्येक क्षणी यशस्वी होणं असं नव्हे! यशाच्या  एक क्षणामागं अपयशाची अनेक वर्षे दडली असू शकतात!


(संदर्भ - ही पोस्ट Key to Success ह्या संकेतस्थळावरुन स्फुरण घेऊन लिहिली गेली आहे. )

सोमवार, २६ डिसेंबर, २०१६

WhatsApp वर्गीकरण



आपण प्रत्येकजण विविध WhatsApp  गटांचे सदस्य असतो. ह्या सहभागामुळं आपल्याला विविध गटांचे गुणधर्म जाणवत असतात. ह्या गुणधर्मांना शब्दरूपात मांडण्याचा आणि २०१७ वर्षासाठी ह्या WhatsApp गटांना उद्दिष्ट नेमून देण्याचा हा प्रयत्न !

एखाद्या WhatsApp गटात पाठविले जाणाऱ्या संदेशांचे ढोबळमानाने खालील प्रकारात वर्गीकरण केलं जाऊ शकतं.   


  1. बौद्धिक चर्चेसंबंधित - ही चर्चा कोणत्याही विषयावर असू शकते जसे की निश्चलनीकरण ते जडेजाच्या गोलंदाजीवर लेग स्लिप लावावी कि नाही ?
  2. सदस्यांचे स्वतःचे अथवा लग्नाचे वाढदिवस 
  3. दणादण पुढे सरकविलेले (फॉरवर्ड केलेले) संदेश 
  4. सामाजिक जीवनातील खास केंद्रित केलेल्या व्यक्तिमत्वांवरील विनोदाचे संदेश 
  5. कोडी / गाणी 
  6. काहीसा १ शी संबंधित; बौद्धिक चर्चेदरम्यान झालेले मतभेद प्रगल्भतेने मिटवून टाकण्याची एखाद्या गटाची क्षमता!
आता प्रत्येक गटामधील पाठविल्या जाणाऱ्या संदेशांची आकडेवारी गोळा करुन त्याचे विश्लेषण केलं असता असं जाणवेल की प्रत्येक गटात काही विशिष्ट प्रकारच्या संदेशांचे बहुमत आढळून येतं. काही गटात केवळ फॉरवर्ड केलेले मेसेज येतात तर काही गटात नुसते विनोद!

सामाजिक जीवनात कायदा आणि सुव्यवस्था ह्याची जबाबदारी आपल्या डोक्यावर भगवंताने सोपविली आहे असा ठाम समजूत असणारा मी! म्हणून एखाद्या गटात विशिष्ट प्रकारच्या संदेशांचं किती प्रमाण असावं ह्याची काही मार्गदर्शक तत्वे मी जाहीर करत आहे. 

  1. बौद्धिक चर्चेसंबंधित - किमान ४०%
  2. सदस्यांचे स्वतःचे अथवा लग्नाचे वाढदिवस - कमाल १२%
  3. दणादण पुढे सरकविलेले (फॉरवर्ड केलेले) संदेश - कमाल १२%  
  4. सामाजिक जीवनातील खास केंद्रित केलेल्या व्यक्तिमत्वांवरील विनोदाचे संदेश - कमाल ७%
  5. कोडी / गाणी - कमाल १२% 
  6. काहीसा १ शी संबंधित; बौद्धिक चर्चेदरम्यान झालेले मतभेद प्रगल्भतेने मिटवून टाकण्याची एखाद्या गटाची क्षमता! - १५%


प्रत्येक गटाच्या म्होरक्याने (ऍडमिन) प्रत्येक महिन्यात आपल्या गटात आलेल्या संदेशांचे सांख्यिकी वर्गीकरण करुन त्याचा रिपोर्ट प्रसिद्ध करावा. ह्या संख्यात्मक दृष्ट्या केलेल्या विश्लेषणाच्या आधारावर प्रत्येक WhatsApp ग्रुपचे वर्गीकरण केले जाईल जसे की बौद्धिक गट, उत्सवी गट, सरक्या गट (फॉरवर्ड ग्रुप ) वगैरे वगैरे!

त्याचप्रमाणं WhatsApp वर होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या वागणुकीवरुन त्या / तिलाही WhatsApp व्यक्तिमत्व रिपोर्ट दिला जाईल. 

आणि शेवटी ग्रुप आणि व्यक्तिमत्व विश्लेषण आधारावर एखाद्या व्यक्तीला  एखादा ग्रुप किती मानवतो अथवा एखाद्या ग्रुपला एखादी व्यक्ती कितपत झेपते ह्याचाही रिपोर्ट उपलब्ध असेल. 

एखादी व्यक्ती आपलं मनःस्वास्थ बिघडलं अशी तक्रार घेऊन मानसोपचार तज्ञाकडे गेली तर तिचा WhatsApp compatibility Report पडताळून पाहिला जाईल! 

तुम्हांला ही सर्व संकल्पना वेडसर वगैरे वाटण्याची शक्यता आहे. लक्षात ठेवा की जगातील सर्व बुद्धिमान संकल्पनांच्या जनकांना तात्कालीन समाजाने वेड्यातच काढलं होतं. 

शेवटी महत्वाचं - ह्या पोस्टद्वारे मी आदित्य पाटील, ह्या संकल्पनेचं पेटंट घेत आहे! ही संकल्पना प्रत्यक्षात आल्यास प्रत्येक रिपोर्टमागे १% फी माझ्या बँक खात्यात जमा  करावी . 

रविवार, १८ डिसेंबर, २०१६

विचारमंथन !

वर्षाचे अखेरचे काही दिवस शिल्लक राहिले. गेल्या आठवड्यात कंपनीतील व्यवस्थापक मंडळींची विचारमंथन बैठक हैद्राबादेत पार पडली. ही बैठक आटोपली की वर्षातील जबाबदारीच्या बैठकी पार पडल्या असे मानायला हरकत नसते.  हे विचारमंथन ३ दिवस चाललं. त्यातील बहुतांशी तपशील गोपनीय. त्यामुळं इथं मांडण्यास वाव नाही. पण काही वाक्य लक्षात राहण्याजोगी!
यश म्हणजे ९९% टक्के अपयश होय! (Success is 99% Failure)!
ह्या वाक्यानं माझं लक्ष वेधलं. बहुदा एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे ह्या वाक्याचा मतितार्थ इथेही अभिप्रेत असावा! आयुष्य वलयांकित, प्रसिद्धीच्या झोतात राहुन जगण्याचा अट्टाहास करणं चुकीचं आहे हाच संदेश ह्यातुन मिळतो. पण एक मात्र खरं की आपल्या मेहनतीचं फळ आपल्यालाच मिळावं ह्यासाठी सुद्धा योग्य ते प्रयत्न करायलाच हवेत. 

डिसेंबरातील शेवटच्या दोन आठवड्यात मग बहुतेकांच्या सुट्टीचे दिवस सुरु होतात. सर्वांनी आपापल्या कुटुंबासोबत वेळ व्यतित करा, वर्षभराचा ताण घालवुन पुढील वर्षासाठी नवचैतन्याने भारून जानेवारीत परत या!! वगैरे वगैरे संदेश येतात. ह्यातील हेतू अत्यंत चांगला असतो.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबियांशी वर्षभरात फारसे कनेक्ट नसाल तर शेवटच्या दोन आठवड्यात अचानक तुम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध होऊन त्यांच्याशी पूर्णपणे मिसळून जाऊ शकाल ह्याची अपेक्षा करणं चुकीचं! त्याचबरोबर कुटुंबियांसोबत वेळ व्यतित करणं म्हणजे पर्यटनस्थळी जाणं असाच अर्थ काढणं हे ही सदैव योग्य नाही. खरी अपेक्षा काय तर स्वतःला त्यांच्या जागी ठेवून पहा. त्यांच्या विश्वात नक्की काय चाललं असावा ह्याचा आराखडा बांधा आणि मग ज्या गोष्टींची त्यांना गरज वाटते त्याविषयी संवाद साधा! बऱ्याच वेळा त्यांच्या ह्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी फार दूरवर जायची गरज नाही हेच आपल्याला जाणवेल. 

मानसिकदृष्ट्या प्रगल्भ असणं हा आजच्या काळात मोठा गुण आहे. तुम्हांला दुःख झालंय का? तुम्ही उदास आहात का? हे पाहायला कोणाकडं वेळ नसतो. म्हणजे सर्वजण काही अचानक दुष्ट बनले असं काही नाही! पण बहुतेक सर्वांना त्यासाठी वेळ मिळत नाही. आता वेळ मिळत नाही ह्याचं काहीसं खोलवर जाऊन विश्लेषण! आपल्याकडं वेळ नसतो हे चुकीचं म्हणणं! खरंतर तर आपल्याला मोकळा वेळ मिळतो पण तो bits and pieces मध्ये असतो. अधुन मधून पाच दहा मिनिटाची फुरसत मिळते. पण आपण बऱ्याच वेळा हा वेळ सोशल मीडियावर काहीशा टाईमपास गोष्टीत घालवतो. ह्याच थोड्या वेळात तुम्ही एखाद्या जवळच्या मित्रास, नातेवाईकास फोन केलास तर त्यांना बरं वाटेल ह्यात शंका नाही. २०१७ सालात काही विशिष्ट कारण नसताना सुद्धा दररोज एका जवळच्या व्यक्तीस फोन करावा असं ध्येय ठेवण्यास काय हरकत आहे? 

एक गोष्ट आपण सर्व अनुभवतो; आपण भारतीय लोक अधिकाधिक बुद्धिमान आणि त्याचबरोबर आक्रमक बनत चाललो आहोत. आपल्या मुलांना आपण विविध गोष्टीत परिपुर्ण बनविण्यासाठी अगदी झटत असतो. माझं म्हणणं तर एकच - त्यांना मानसिकदृष्ट्या संतृप्त बनवा! त्यांच्यासाठी ही फार मोठी देणगी असू शकते! आर्थिकदृष्ट्या बहुतेक सर्वजण बऱ्यापैकी स्थिरस्थावर स्थितीत आहोत आणि पुढेही असणार! म्हणजे अगदी अतिश्रीमंत नसलो तरी आपल्या किमान गरजा भागविण्यापुरते तरी आपण सदैव सुस्थितीत राहणारच! जर आपण आपल्या पिढीला मानसिकदृष्ट्या संतृप्त बनवलं तर त्यांना आपल्यापेक्षा श्रीमंत, अधिक बुद्धिमान, अधिक भारदस्त व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीचा हेवा वाटणार नाही आणि जरी वाटला तरी ते त्यातून लवकर बाहेर पडतील. दुसऱ्यांची बौद्धिक आक्रमकता शांतपणे परतवुन लावण्याचे सुद्धा अनेक मार्ग असतात. त्यासाठी आपल्याला आक्रमक बनण्याची आवश्यकता नेहमीच नसते! 

वर्ष संपत आलं! ब्लॉगमध्ये ह्यावर्षी काही पोस्टची चांगली भट्टी जमली तर काहींची नाही! शेवटच्या आठवड्यात Trapped चा शेवट करावा असा विचार आहे. शेवटी ह्या विचारमंथन बैठकीच्या ठिकाणचा माझ्या सहकाऱ्याने काढलेला हा प्रेक्षणीय फोटो!

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०१६

स्वभावपैलु


एखाद्या माणसाच्या स्वभावाचं वर्णन करताना आपली शब्दप्रतिभा बहरुन येते. तापट, प्रेमळ, साधासुधा, धूर्त, आक्रमक, उतावळा, वेंधळा अशी वेगवेगळी विशेषणं आपण वापरतो. त्या व्यक्तीचा विचार मनात आला की आपल्या नकळत हे विशेषण त्या व्यक्तीसोबत आपल्या मनात प्रवेश करतं. 

एका  विशिष्ट व्यक्तीचा जगाला जाणवणारा स्वभाव म्हणजे त्या व्यक्तीमध्ये वास्तव्य करुन असलेल्या  विविध स्वभावपैलुंचे एकत्रित स्वरूपात बाह्यजगताला होणारं दर्शन! ह्या वाक्यात जगाला जाणवणारा स्वभाव आणि बाह्यजगताला हे महत्वाचे शब्द आहेत. बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या व्यक्तीचा खरा स्वभाव असतो वेगळाच पण काही कारणास्तव त्या व्यक्तीचं वेगळंच रूप प्रथमदर्शनी आपणासमोर येतं. मग त्या व्यक्तीसोबत जसजसा अधिकाधिक काळ आपण व्यतीत करतो तेव्हा मग त्या व्यक्तीचं खरं स्वभावदर्शन आपणास होतं. मग "तो आहे फणसासारखा - बाहेरून काटेरी (कठोर) पण आतून गोड (फणसाच्या गऱ्यासारखा)! वगैरे शब्दप्रयोग आपण करतो! 

 अरे बाबा वरचं सर्व ठीक पण वर दिलेल्या परीक्षानळ्या आणि ही पोस्ट ह्याचा संबंधच काय असा विचार तुमच्या  मनात आला असणं स्वाभाविक आहे! ही संपुर्ण चौकट म्हणजे मनुष्याचा एकत्रित स्वभाव आणि ह्यातील प्रत्येक नळी म्हणजे एक स्वभावपैलू! 

जेव्हा आपण एखाद्या माणसाच्या सानिध्यात केवळ काही काळ येतो त्यावेळी ह्यातील फक्त काही परीक्षानळ्यांवर प्रकाशझोत पडतो आणि फक्त त्याच  स्वभावपैलुंची आपणास ओळख होते. त्यामुळं संपूर्ण चौकटीचं दर्शन झाल्याशिवाय आपण एखाद्या माणसाच्या स्वभावाविषयी अंतिम मत बनविण्याची घाई करु नये. 

अजून एक मुद्दा! प्रत्येक पैलूच्या नळ्या मनुष्य जन्मतो त्यावेळी जितक्या भरल्या असतात त्या आयुष्यभर तितक्याच भरलेल्या राहतात का? उत्तर कदाचित नाही! जन्मतः मनुष्याला जो स्वभाव मिळालेला असतो तो बऱ्याच प्रमाणात आनुवंशिक असतो. कालांतराने मनुष्याला जशी शिकवण मिळते, जीवनानुभव मिळतात त्याप्रमाणे ह्यातील काही नळ्यांतील द्रव अधिक भरला जातो तर काही कमी होत जातो. 

आयुष्य जसजसं पुढं सरकत जातं तसतसा आपल्या आयुष्याविषयी आपल्या मनात एक विशिष्ट् भावना निर्माण होत जाते. जसं की माझ्या आयुष्याचं सार्थक झालं, माझ्या आयुष्याचं वाटोळं झालं वगैरे वगैरे! आणि ही अदृश्य भावना नकळतपणे आपल्या एकंदरीत स्वभावावर परिणाम करत राहते.

रविवार, ४ डिसेंबर, २०१६

तमसो मा ज्योतिर्गमय!


माझे काका नरेंद्र पाटील ह्यांनी गॅलरीतून काढलेला हा एक सुरेख फोटो! हा फोटो त्यांनी आमच्या कुटुंबाच्या व्हाट्सअँप ग्रुपवर टाकला आणि मग छायाचित्रणातील त्यांच्या कौशल्याच्या कौतुकाबरोबर आमच्या ग्रुपवरील संबंधित चर्चेला उधाण आलं. हे चित्र पाहुन नक्की काय वाटतं ह्यावर ह्या चर्चेचा रोख वळला. 
हल्ली आपले विचार मांडण्यात मी अग्रेसर असतो आणि का कोणास ठाऊक बऱ्याच वेळा लोक मला अडवत नाहीत. मी खुप ज्ञानी झाल्याने असं होत असावं ह्याची शक्यता कमी असल्यानं माझ्या लिहिण्या-बोलण्यानं सर्वांचं चांगलं मनोरंजन होत असावं असं मी वाटून घेतो आणि आपलं काम चालूच ठेवतो. 
हा फोटो पाहून मला ज्ञानप्राप्तीच्या क्षणाची सर्वप्रथम आठवण झाली. सर्वत्र अंधकारमय असताना अचानक सर्व काही स्पष्ट करणारा प्रकाश आपल्यासमोर यावा आणि मग मनातील सर्व शंका, भिती दूर व्हावी ह्या घटनेची मला आठवण झाली. 
ज्ञानप्राप्तीचे क्षण अनेक असु शकतात. जीवनमरणाच्या रहाटातून सुटकेचा क्षण यावा आणि मोक्षप्राप्ती होताना सर्वत्र उजेडानं व्यापुन टाकावं हा एक ज्ञानप्राप्तीचा क्षण! 
एखादा शास्त्रज्ञ मोठ्या संशोधनात गढुन गेला असावा; बरीच वर्षे उपलब्ध माहितीच्या भंडाराच्या काहीसा गोंधळला असावा आणि अचानक मग सर्व काही स्पष्ट करणारा, सर्व माहिती भंडाराला सुसूत्रतेनं एकत्र एका सूत्राने जोडणारा धागा त्याला मिळावा असा हा युरेका क्षण! 
पंधरा-वीस वर्षे संसारात बांधून ठेवलेला नवरा बायकोच्या कधी अनपेक्षित बाहेर जाण्यानं अचानक गवसलेल्या स्वातंत्र्यानं गोंधळून जावा आणि त्याला सर्वत्र अंधारमय परिस्थितीचा भास व्हावा आणि अचानक बायको येण्याच्या चाहुलीनं त्याच्या मनातील ह्या गोंधळाचा संपूर्ण निचरा व्हावा हाच तो ज्ञानप्राप्तीचा क्षण! 
हल्लीच्या परिस्थितीमध्ये चांगला तासभर उभं राहिल्यावर मिळालेल्या त्या नोटांच्या स्पर्शानं होणारा हा प्रकाशमय क्षण!
संध्याकाळी दाजींबरोबर ह्या विषयावर मोठी चर्चा झाली. चर्चा म्हणण्यापेक्षा त्यांनी अध्यात्माच्या बऱ्याच पैलुंना बोलताबोलता अगदी लीलया आमच्यासमोर उलगडून ठेवलं. त्यांचा अध्यात्म ह्या विषयावर गाढा अभ्यास! आयुष्याच्या कोणत्यातरी एका क्षणी प्रत्येकास मी कोण? मी आलो कोठून आणि जाणार कोठे ह्याचा संभ्रम निर्माण होतो आणि आपापल्या परीनं त्याचा उलगडा करण्याचा जो तो प्रयत्न करतो. ही तर एका मोठ्या साधनेची तयारी! ह्यासाठी हवी मोठी एकाग्रता आणि आपल्या मनाशी संवाद साधण्याची क्षमता! पण हा संवाद साधायचा कसा? देह नश्वर आहे; देहाच्या जिवंतपणाचे लक्षण म्हणजे श्वास! ध्यान लावून ह्या श्वासावर लक्ष केंद्रित करावं आणि हा श्वास नक्की जातो कोठे ह्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करावा! दाजी आम्हां सर्वांना ज्ञानकण वाटून देत होते. त्यांनी ओम शब्दाचं, vibrations चं महत्त्व अशा अनेक गोष्टींना स्पर्श केला. खरंतर चर्चा अशीच बराच वेळ चालली असती पण घरातील स्त्रियांनी ह्या चर्चेमुळं लांबणीवर पडत चाललेल्या जेवणाकडं आपापल्या परीनं लक्ष वेधलं आणि मग आम्हां सर्वांचा ज्ञानप्राप्तीचा क्षण आला!  

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...