पुन्हा एकदा स्वतःला कोशात अडकवुन घेणं ओघानं आलं! आपलंच मन पुर्णपणे आपलं नाही ही सदैव बोचत राहणारी जाणीव! दुपारच्या वेळी जेवणं वगैरे आटोपली की फुरसत मिळायची. बेडरूमच्या खिडकीतून कॉलनीतला जाणारा रस्ता दिसायचा. दुपारच्या वेळी अगदी शुकशुकाट असायचा त्या रस्त्यावर! दोनच्या सुमारास मुलांना सोडणारी स्कुल बस आली की त्या रस्त्याला जाग यायची! पण ती बस निघून गेली की मात्र अगदी शांतता त्या वसाहतीला व्यापून टाकायची. अचानक एके दिवशी त्या रस्त्यावर तिला एक वेगळाच माणूस दिसला. फाटकी वस्त्रे घातलेला आणि बरेच दिवस अंघोळ न केलेला वगैरे! स्वतःशीच हातवारे करत तो रस्त्यावर फिरत होता. तिला अगदी भिती वाटून गेली आणि मग तिनं खिडकी घट्ट बंद करुन घेतली आणि डोक्यावर पांघरुण घेऊन डोळे बंद करुन ती पडून राहिली. तो वेडा होता! मनाशीच तिनं विचार केला. बाकीचे लोक पाहुन घेतील त्याला तिनं स्वतःशीच समजूत घालून घेतली. कधीतरी मग तिला डोळा लागला.
असेच दोन तीन आठवडे गेले. सुरुवातीला फक्त कोशातच बंद करुन राहण्याची जिद्द करणाऱ्या मनाला तिनं समजावलं. ह्यातून कठीण का असेना मार्ग तर असणारच! बऱ्याच स्त्रियांना वेगवेगळ्या बंधनातुन जाऊन आयुष्यातील आपला मार्ग काढावा लागतच असणार. पण बहुतेक वेळा हा लढा त्यांच्या त्या एकटीनं लढत असल्यानं दुनियेसमोर येत नसणार. माझाही तसाच हा एक लढा आहे. जरा वेगळा असला म्हणुन काय मी तो लढणारच! महत्प्रयासानं तिनं स्वतःला समजावलं.
दोन आठवड्यापुर्वीच्या त्या प्रसंगानंतर स्वामीसुद्धा काही काळ बदलल्यासारखा वाटला होता तिला! त्याच्या वागण्यात पुन्हा तोच यांत्रिकपणा आला होता. सायंकाळ झाली. स्वामी आला. नेहमीप्रमाणं तो ताजातवाना होऊन खुर्चीत बसेतोवर योगिनीनं चहाचा कप आणुन त्याच्यासमोर ठेवला होता.
"स्वामी, पण मलाच का तुम्ही निवडलंत? दुनियेत इतक्या असंख्य लोकांतुन तुम्ही माझीच आणि माझ्या खऱ्या स्वामीचीच निवड का केलीत तुम्ही?" योगिनीने प्रश्न विचारला खरा पण नक्की आपणच प्रश्न विचारला की हा स्वामीने आपल्याद्वारे हा विचारुन घेतला हे तिला कळेनासं झालं. स्वामीने ह्या प्रश्नावर उत्तर काही दिलं नाही. म्हणजे बहुतेक हा आपलाच प्रश्न असावा अशी तिनं आपली समजूत करुन घेतली.
"आणि मग माझा खरा स्वामी गेला कुठं? हा देह तर त्याचाच ना!" आज योगिनीच्या अंगी बराच धीर एकवटला होता. समोर बसलेल्या स्वामीला बहुदा तिची दया आली असावी. "तो कुठं दूरवर गेला नाहीए! त्याला इथंच आम्ही दाबून ठेवलाय! " आपल्या डोक्याकडं खुणावत समोरचा स्वामी उद्गारला! "अगदी सूक्ष्म स्वरुपात! आमचा प्रयोग यशस्वी झाला ना कि त्याला कदाचित मुक्त सुद्धा करु आम्ही!" स्वामीच्या ह्या उद्गारांनी योगिनी अगदी थरारुन गेली ती दोन कारणांनी! पहिलं म्हणजे इथं कोणता तरी प्रयोग सुरु आहे आणि दुसरं म्हणजे आपला स्वामी परत यायला अजुनही वाव आहे तर!
स्वामीशी इतका वेळ सलग संवाद साधायला खरं तर योगिनीला भिती वाटायची पण तिच्या मनातील शंकेनं ह्या भितीवर मात केली. "प्रयोग? कुठला प्रयोग !" ती म्हणाली. "आमच्या प्रजातीचा वंश पृथ्वीवर यशस्वीपणे वाढतो की नाही हे पाहायचं आम्हांला!" अगदी निर्विकारपणे स्वामी म्हणाला! त्याच्या ह्या उद्गारांनी योगिनी अगदी थरारुन गेली. आतापर्यंत तिनं ह्या शक्यतेचा विचारसुद्धा केला नव्हता.
दुसऱ्या दिवशी सकाळी स्वामी ऑफिसात निघुन गेला आणि योगिनी अगदी निग्रहानं विचार करु लागली. केवळ तिच्या एकटीशी संबंधित असणारं हे लढणं सुद्धा तिला झेपत नव्हतं आणि त्यात ह्या नव्या शक्यतेची निर्मिती झाली होती. कोण्या अजाण जीवाला ह्यात आपल्यामार्फत गुंतवलं गेलं तर आपण कोणाची बाजू घेऊ ह्याची तिला शाश्वती वाटत नव्हती. "जर आपण ह्या स्वामीलाच संपवला तर!" तिच्या मनात विचार चमकुन गेला. क्षणभर ती अगदी उत्साहित झाली. आपल्याला ह्या सापळ्यातुन सुटकेचा मार्ग सापडला ह्या विचारानं! पण नंतर तिच्या लक्षात आलं.
सध्याचा स्वामी म्हणाला होता
"तो कुठं दूरवर गेला नाहीए! त्याला इथंच आम्ही दाबून ठेवलाय! " म्हणजे जर ह्या स्वामीला संपवला तर आपला स्वामी सुद्धा नाहीसा व्हायचा त्याच्यासोबत! आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा स्वामी जरी नाहीसा झाला तरी आपल्या मनावर ताबा घ्यायला ह्यांच्यातलाच दुसरा कोणी पुढं व्हायचा!
आज तिच्या मनाच्या विचारांची तर्कसंगती सुसंगत चालली होती. जरी कोणी परका तिच्यावर अंमल ठेऊन होता तरी ज्या बाह्यरूपात तो तिच्या सामोरा यायचा ते रुप तिच्या लाडक्या स्वामीचं होतं. आणि नाही म्हणायला ह्या परक्याची सुद्धा तिला सवय झाली होती. त्याच्या वागण्याच्या तऱ्हा तिला कळल्या होत्या. चहाचा एक घुटका तिनं घेतला. आपण ज्यावेळी बाहेर जातो त्याचवेळी नेमकी आपली ह्या आठवणींची स्मृती कशी नाहीशी केली जाते ह्याचा छडा लावणं आवश्यक आहे हे तिला जाणवलं. जर त्या पद्धतीचा आपणास पत्ता लागला तर त्यावर आपण विजय मिळवु शकतो आणि मग आपली ही बाजू दुनियेसमोर मांडू शकतो. स्वामीशी अगदी चांगलं वागत राहायचं आणि ह्या पद्धतीचा शोध लावायचा असा मनोमन तिनं निर्धार केला आणि तिला खूप बरं वाटलं.
सुधाताई आपल्या कोल्हापुरातील गावी गेले काही महिने अगदी बेचैन होत्या. खरंतर बेचैन व्हायचं काहीच कारण नव्हतं. दोन्ही मुलं संसाराला व्यवस्थित लागली होती. मुलाचा कोल्हापुरातच चांगला व्यवसायात जम बसला होता आणि मुलगी योगिनी परगावी असली तरी संसारात रमली होती. यजमान सुधीर निवृत्तीनंतर आपल्या मित्रपरिवारासमवेत अगदी मजेत दिवस व्यतित करत होते. योगिनीची आणि सुधाताईंची भेट म्हटली तर तशी कमीच व्हायची! म्हणुनच खरंतर परगावी मुलीला स्थळ शोधण्यात त्यांनी सुरुवातीला काहीसा विरोध केला होता. पण शेवटी चांगलं स्थळ म्हटल्यावर मात्र त्यांचा नाईलाज झाला होता. सुरुवातीला योगिनी अगदी मजेत आहे असं त्यांना वाटत असे. पण गेले काही महिने मात्र तिच्या वागण्यात त्यांना काहीसा बदल जाणवला होता. सुधीर ह्यांच्या भाच्याच्या लग्नात दोघीजणी पुण्याला दोन दिवस भेटल्या खऱ्या पण योगिनी अगदी अलिप्तपणे वागत आहे असंच त्यांना वाटत राहिलं होतं. त्यांनी आपली शंका मुलाला आणि सुधीर ह्यांना सुद्धा बोलून दाखवली होती पण दोघांनी तिला वेड्यात काढलं होतं. पण आईचं वेडं मन त्यांना शांत बसू देत नव्हतं. खासकरुन स्वामीचा विषय काढला की योगिनी अचानक शांत व्हायची आणि विषयच बदलुन टाकायची असा त्यांना संशय आला होता. शेवटी न राहवुन त्यांनी एक धाडस केलं होतं. गिरगावातील बहिणीकडं जायचं निमित्त काढून त्या थेट योगिनीच्या घरी धडकल्या होत्या.
आताच नव्यानं जिद्द निर्माण झालेली योगिनी आपल्या जागेवरुन उठायला आणि दाराची बेल वाजायला एकच गाठ पडली. समोर आईला पाहुन तिला आपला हुंदका आवरता आला नाही. क्षण दोन क्षणभर आईच्या मिठीत आपल्या साठवलेल्या अश्रूंना मोकळी वाट करुन देत असतानाच तिला अचानक जाणवलं की आपल्याला अजुनही स्वामीची खरी बाजू आठवतेय आणि आपण आईला ती सांगू शकतोय!
स्वामी ऑफिसात एका महत्वाच्या बैठकीत होता आणि तितक्यात त्याच्या मेंदूत एक अतिमहत्वाचा संदेश आला. "गुप्त रहस्य बाहेर सांगितलं जातंय! तात्काळ कृती करा!" ह्या संदेशाने स्वामी थरारला. हे सारं घडलं कसं ह्याचा विचार करायला त्याच्याकडे वेळ नव्हता. त्यानं तात्काळ योगिनीच्या मेंदुचा तो भाग गोठवण्याची आज्ञा दिली.
"आई, माझ्या मेंदुवर परग्रहवासियांनी ताबा मिळविला आहे आणि स्वामी देखील त्यातला एक आहे! तू मला ताबडतोब इथुन बाहेर घेऊन चल! कोणत्याही क्षणी हे सारं काही मी विसरुन जाईन!" योगिनीने मोठ्या कळकळीनं हे वाक्य उद्गारलं! सुधाताईंना नाहीतरी आधीपासुन संशय होताच. त्यांनी तात्काळ योगिनीला जशी होती तशी घराच्या बाहेर काढली. घराला कुलूप लावायची सुद्धा तसदी न घेता त्या खाली उतरल्या आणि तात्काळ तिला रिक्षात बसवुन रिक्षा स्टेशनाकडं वळवली.
"आई, आई अगं तू कधी आलीस आणि आपण स्टेशनाकडं का जातोय!" योगिनी अचानक ओरडली. "स्वामीला रात्रीचं जेवण कोण देणार? वळवं पाहू रिक्षा घराकडं पुन्हा!" योगिनीचा त्रागा सुरुच होता. "मी मुंबईत आले होते आणि अचानक बाबांची तब्येत सिरिअस असल्याचा फोन आला मला!" आपल्याच यजमानांच्या प्रकृतीविषयी अशी थाप मारणं सुधाताईंच्या जीवावर आलं होतं पण परिस्थिती बघता त्यांच्याकडं दुसरा पर्यायच नव्हता.
आपल्या वडिलांच्या तब्येतीची ही बातमी ऐकून योगिनी हादरली आणि शांतही झाली.
इथं स्वामी आणि त्याच्या कंपूत मात्र प्रचंड कोलाहल माजला होता. सुधाताई कोणतीही पुर्वसुचना न देता योगिनीसमोर आल्या होत्या आणि योगिनीने त्या दोन मिनिटात त्यांच्यासमोर रहस्याचा उलगडा केला होता. सुधाताईंचं आता करायचं काय ह्याविषयी त्या कंपूत जोरदार चर्चा सुरु होती. जी काही कृती करायची ती तात्काळ आणि कोणालाही संशय न येऊ देता करणं आवश्यक होतं!
(क्रमशः)