हल्ली शनिवार उजाडला की नवीन पोस्ट लिहायची खुमखुमी येते. मोकळा वेळ सापडताच मनातील विचार लिहायचे आणि पोस्ट प्रसिद्ध करायची असा शिरस्ता गेले काही शनिवार चालु आहे. मान्य तर करायला हवं की पोस्टला कोणी लाईक केलं अथवा त्यावर टिपणी केली की बरं वाटतं. पण मुख्य हेतु लोकांचं लक्ष वेधुन घेणं हा नसुन आपल्या मनातील विचार कागदावर वा संगणकावर उतरविणे हा असतो. रविवार येतो आणि जातो आणि मग पुन्हा कामाच्या रगाड्यात मी वाहुन घेतो.
क्षणभर असं समजा की मी केवळ ब्लॉग लिहुन चरितार्थ करायचं असं ठरवलं तर काय होईल? ह्यात दोन शक्यता उद्भवतात.
१) माझ्याकडं ज्ञानाचा अथवा अनुभवाचा अखंड स्रोत हवा. मी ज्ञानाचे अथवा अनुभवांचे शंभर कण गोळा केले तर मी त्यांचा सारांश १० कणांत मांडुन सर्वांसमोर ठेवावयास हवा.
एकदा मी हा सारांश मांडला की माझा ज्ञानाचा साठा पुन्हा रिता झाला. मग पुन्हा नव्या जोमानं मी ज्ञानउपासना करायला हवी, अनुभव गोळा करायला हवेत आणि मगच लोकांसमोर पुन्हा येण्याचं धारिष्ट्य करायला हवं. हे न करता समजा मी तेच तेच मुद्दे लोकांसमोर मांडत राहिलो तर लोक मला टाळू लागतील.
२) माझ्याकडे खोलवर ज्ञान नाही अथवा अनुभवही नाहीत. जे काही होतं ते आधीच मांडून झालंय आणि माझ्याहुन अधिक ज्ञानी सभोवती आहेत. त्यांच्याशी मी स्पर्धा करु शकत नाही. तरीसुद्धा लोकांचं लक्ष वेधुन घेणं हाच माझा एकमेव हेतु आहे. मग मी जे कोणी प्रसिद्ध अथवा यशस्वी लोक आहेत त्यांच्यावर चिखलफेक करण्यास सुरुवात करीन किंवा सर्वसामान्य जनतेची जी मते आहेत त्याच्या नेमकी उलटी मते मांडीन. मग सर्वजण माझ्यावर पेटून उठतील आणि सोशल मीडियावर माझ्या नावाने खडे फोडतील. माझ्या नावाचं विडंबन करतील.
माझा हेतु साध्य झाला असेल. माझ्या लेखांना व्यावसायिक मागणी राहील. माझ्या उथळ ज्ञानाची मला झळ न बसता मी कायम अर्थार्जन करीत राहीन.
आपल्या अवतीभोवती ही दुसऱ्या प्रकारातील काही तथाकथित प्रतिथयश लेखक मंडळी वावरत आहेत. आपल्या भावनांना चेतवून ही मंडळी आपणास त्यांच्यावर टीका करण्यास उद्युक्त करतात. ज्यावेळी आपण त्यांच्यावर टीका करतो त्यावेळी आपण अजाणतेपणी त्यांच्या प्रसिद्धीला खतपाणी घालत असतो. माझं म्हणणं एकच - अशा सवंग प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या मंडळींकडे दुर्लक्ष करावं. त्यांना अनुल्लेखानं त्यांची जागा दाखवुन द्यावी. त्यांच्या नावावर शाब्दिक कोटीचे मोह सुद्धा टाळावेत.