मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २६ जून, २०१६

शिखरमार्ग !

"जया अंगी मोठेपण तया यातना कठीण" अशी मराठीत उक्ती आहे. व्यावसायिक जगात वावरताना अशा काही उच्चपदस्थ व्यक्तींना पाहताना किंवा त्यांच्याविषयीची पुस्तकं वाचताना त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे काही पैलु जाणवले त्याविषयीची आजची ही पोस्ट! 


१) दीर्घ दिनचर्या - 
हल्ली सर्वच क्षेत्रात दीर्घ वेळ काम करावं लागतं. इतकंच नव्हे तर काही जणांना विविध शहरांत, देशांत सतत प्रवास करावा लागतो. बहुतेक वेळा दीर्घ प्रवासानंतर इच्छित स्थळी पोहोचल्यावर तात्काळ आपल्या कामास किंवा अगदी महत्वाच्या मिटिंगला सुरुवात करावी लागते.  तिथं वेगळ्या प्रकारचा आहार मिळतो त्यास सुद्धा जमवुन घ्यावं लागतं. ह्या सर्व बदलत्या परिस्थितीचा मुकाबला करताना ज्यावेळी प्रत्यक्ष कामास सुरुवात होते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करावीत अशी अपेक्षा असते.

२) उत्तम स्मरणशक्ती -  
ही सर्व उच्चपदस्थ मंडळी अनेक लोकांशी आपल्या कामानिमित्त संवाद साधत असतात. एका दिवसात ह्या लोकांना संवाद साधाव्या लागणाऱ्या लोकांची संख्या शंभर किंवा त्याहुनही सुद्धा जास्त सहज जाऊ शकते. अशावेळी आपण संवाद साधत असलेल्या मंडळींसाठी नक्की महत्वाच्या गोष्टी कोणत्या, त्यांच्याशी आपण शेवटी ज्यावेळी बोललो त्यावेळी आपली चर्चा नक्की कोणत्या विषयावर झाली होती, त्यांना आपण काही आश्वासन दिलं होतं काय हे सर्व'लक्षात राहायला हवं! ह्यातील काही लोक त्यांच्या संघटनेतील पाचशे, हजार वगैरे लोकांची नावे लक्षात ठेवू शकतात. ह्यावरची गोष्ट म्हणजे ह्यातील बऱ्याच कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांची नावे सुद्धा लक्षात ठेऊ शकतात.


३) उच्च भावनांक -
ही मंडळी ज्या बैठकीत भाग घेत असतात त्यात अगदी महत्वपूर्ण आणि दुरपांगी परिणाम करणारे असे निर्णय घेतले जातात. ह्या निर्णयांमुळे कोट्यवधी रकमेचा नफा / तोटा होऊ शकत असतो आणि हजारो लोकांची आयुष्ये प्रभावित होऊ शकत असतात. हे सर्व असताना देखील आपण एक व्यक्ती म्हणुन ह्या निर्णयांशी भावनिक बंध जोडणं चुकीचं असतं. आपण एक कर्तव्य म्हणुन हा निर्णय घेत आहोत ह्याची जाणीव असणं आवश्यक असतं. एखादा इतका महत्वाचा निर्णय घेऊन बैठकीबाहेर पडल्यावर लगेचच एखाद्या खेळीमेळीच्या बैठकीत हसऱ्या चेहऱ्याने सहभागी होता आलं पाहिजे. 

त्याचप्रमाणे तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही घडामोडी घडत असोत पण त्याचा यकिंचितही परिणाम तुमच्या व्यावसायिक जीवनावर होता कामा नये.

४)  उत्तम संवादकला - 
ह्या लोकांनी बोललेला प्रत्येक शब्द, लिहिलेलं प्रत्येक वाक्य असंख्य लोक वाचत / ऐकत असतात आणि आपापल्या बुद्धीनुसार त्याचा अर्थ लावत असतात. त्यामुळे ह्या संवादामध्ये चूक करण्यासाठी अजिबात वाव नसतो. 

ज्यावेळी ह्या व्यक्ती १:१ पातळीवर संवाद साधत असतात त्यावेळी साधत असतात त्यावेळी त्या समोरच्या व्यक्तीला मार्गदर्शन करणे, त्याला उत्तम कामगिरी करण्यासाठी उत्साहित करणं आणि त्या व्यक्तीला खास वाटून देणे ह्या सर्व कामगिऱ्या एकाच वेळी पार पाडता यायला हव्यात.

५) कौटुंबिक समतोल - 
 निःसंशयपणे ह्या व्यक्तींना बऱ्याच दीर्घ कालावधीपर्यंत आपल्या कुटुंबापासून दूर राहण्याची वेळ येते किंवा कमीत कमी वेळ कुटुंबासोबत व्यतित करण्याची संधी मिळते. अशा परिस्थितीत जो वेळ ह्या व्यक्ती कुटुंबासोबत घालवतात त्यावेळी त्यांना इतकं खुष ठेवता यायला हवं कि बाकीच्या वेळची आपली कमतरता सहन करण्याची शक्ती त्यांना मिळावी. हे वाक्य लिहायला कितीही सोपं असलं तरी प्रत्यक्षात आणण्यास अत्यंत कठीण असतं. 

६) विनोदबुद्धी - 
 कार्यालयातील गंभीरातील गंभीर परिस्थिती सांभाळण्यासाठी कधीतरी विनोदबुद्धीचा वापर करता येऊ शकतो. हा योग्य प्रसंग कोणता आणि ह्या प्रसंगी योग्य विनोद कोणता ह्याची उत्तम जाणीव काही उच्चपदस्थ व्यक्तींना असल्याचं जाणवुन येतं. 

७) शिस्तबद्ध दिनचर्या - 
ठरलेल्या वेळी बैठकीला उपस्थित न राहणे, आजारी पडल्यामुळे अनुपस्थित राहिल्याने महत्त्वाच्या बैठकी चुकणे ह्या गोष्टी ह्या उच्चपदस्थ व्यक्तींना अजिबात परवडण्यासारख्या नसतात.  त्यामुळे शिस्तबद्ध दिनचर्या हा एक महत्त्वाचा घटक ह्या लोकांना स्वीकारावा लागतो. हल्ली नियमित व्यायाम करुन अगदी फिट राहणे हा ही एक गुणधर्म बनत चालला आहे. रात्रीचे जेवण कमी करणे किंवा खूप आधी घेणे हा सुद्धा हल्ली आढळून येणारा गुणधर्म! हृदयविकाराच्या आजारापासून आपणास कसं दूर ठेवावं ह्यासाठीचे प्रतिबंधक उपाय म्हणून हे स्वीकारले जातात.


८) बदलांस सामोरी जाण्याची क्षमता - 
शिखरावरील वास्तव्य बऱ्याच वेळा दीर्घकाळ नसतं. आपला काळ संपत आला की त्याची चिन्ह ओळखता येणं आणि नवीन शिखराची वास्तव्यासाठी योग्य वेळी निवड करणे ही सुद्धा कला ह्या लोकांना जमायला हवी. ह्यासाठी आपल्या आणि संबंधित क्षेत्रातील घडामोडी आणि Business Knowledge सहजगत्या अवगत करण्याची कला अंगी असावी.


आता काही वेगळे मुद्दे! काही नव्याने शोध लावलेल्या अँपच्या बाबतीत एक नवीन कल्पना यशस्वीपणे अमलात आणली असता अशा व्यक्तींना आरंभीच्या काळात कमी स्पर्धेचा मुकाबला करावा लागतो. अशावेळी त्यांना वरील सर्वच गोष्टींचा स्वीकार करण्याच्या बंधनांपासून त्यांना बरीच मुक्तता मिळू शकते. 

शिखरावर एकच व्यक्ती असली तरी शिखरमार्गावर सुद्धा काही जागा उपलब्ध असतात. वरील उल्लेखलेल्या गुणधर्मातील केवळ काहीच  गुणधर्म ज्यांच्याकडे आहेत त्यांच्यासाठी ह्या जागा योग्य असतात. आपल्या गुणधर्मानुसार आपली योग्य जागा ओळखता येणं ही सुद्धा एक महत्त्वाची कला आहे!

रविवार, १९ जून, २०१६

सैराट - एक विश्लेषण






बहुतांशी सर्वसामान्य माणसं दोन विचारसरणीने जीवन जगत असतात. 

पहिली विचारसरणी (धोपटमार्गाने वाटचाल) - त्यांच्या जीवनाचा बराचसा भाग हा आपल्या चरितार्थाची सोय लावण्यात व्यापून गेलेला असतो. लहानपणापासुन आईवडील त्यांना लवकरात लवकर आपल्या पायावर उभा राहायला शिक असं सांगुन त्यांच्या मतीनुसार शिस्तीतल्या जीवनाचा स्वीकार करण्याचा उपदेश करीत असतात. ह्या विचारसरणीनुसार वागताना विशिष्ट वयात शाळा पास होणे, नोकरीधंद्याला लागणे, आई वडिलांनी निवडलेल्या साथीदाराशी लग्न करणे, पुढे पालक म्हणुन मुलांचे संगोपन करणे, मग आदर्श आजी आजोबा बनणे, भजनाला जाऊन बसणे असा मार्ग साधारणतः सांगितला जातो. 

दुसरी विचारसरणी (धोपटमार्गापासून फारकत) - वरील विचारसरणी बहुतेक सर्वांना स्वीकारावी लागत असली तरी किती प्रमाणात ती स्वीकारावी ह्याविषयी प्रत्येक व्यक्ती जसजशी मोठी होत जाते तसतसं स्वातंत्र्य मिळत जाते. ह्यातील काही गोष्टीतील धोपटमार्गापासूनची फारकत फारशी गंभीर नसते. शाळा कॉलेज पास होणे एखादं वर्ष मागे पुढे झालं तरी आयुष्यावर मोठा परिणाम पडत नाही. म्हणजे पुन्हा एकदा जीवनगाडी रुळावर आणायला तुम्हांला दुसरी संधी मिळते. पण काही गोष्टीतील धोपटमार्गापासुनची फारकत तुमच्या आयुष्यावर फार मोठा परिणाम करते. लहान वयातील घरच्यांचा विरोध पत्करून केलेलं लग्न ही त्यापैकी  एक गोष्ट ! ह्यातील प्रत्येक वेळा ही गोष्ट तुमच्या आयुष्यावर वाईट परिणाम करते असं नव्हे पण … 

सैराट 

आता वळूयात सैराटकडे. त्यातील काही गोष्टींचे हे विश्लेषण!

१) आर्चीचे परशाच्या प्रेमात पडणे - परशा आपल्याकडे सतत पाहत आहे हे लक्षात आलेली आर्ची मग लवकरच त्याच्या प्रेमात पडते. ह्यामध्ये त्यांचा बौद्धिक संवाद वगैरे प्रकार नाही! नाही म्हणायला त्याला बारावीत चांगले गुण असतात. नागराजने मुद्दामच हे प्रथमदर्शनी प्रेम म्हणुन खुलविले असावे असा माझा अंदाज! ह्यात बहुतांशी जनतेला आपल्या बाबतीत हे असं काही घडू शकते अशी आशा नागराज निर्माण करतो. 

२) आर्चीचा बिनधास्तपणा - आर्ची चित्रपटाच्या पूर्वाधात जबरदस्त बिनधास्तपणा दाखविते. खोखो खेळताना आपल्याकडे बघणाऱ्या परशाची हजेरी घेताना असो कि त्याच्याशी कॉलेजात हाणामारी करणाऱ्या मंग्याचा सर्वांसमोर समाचार घेणे असो की परशाच्या आईची आत्याबाई म्हणुन ट्रॅक्टरवरुन येऊन खबरबात घेणे ह्या सगळ्या प्रकारात तिचा बिनधास्तपणा अगदी मस्तपणे समोर येतो. अशी बिनधास्त प्रेमिका आपल्याला मिळावी अशी जी मनोकामना बहुतांशी सर्वसामान्य तरुणांच्या मनात असते तिला आर्चीच्या रूपाने हुबेहूब मूर्तस्वरुप देण्याची कामगिरी नागराजने उत्कृष्टपणे बजावली आहे. 

आर्ची ही अगदी श्रीमंताघरची लेक! त्यामुळे हा बिनधास्तपणा अगदी वास्तववादी वाटतो!

३) चित्रपटाचा वेग आणि नेत्रदीपक फ्रेम्स  - पुर्वार्धात चित्रपट अगदी वेगाने पुढे सरकतो आणि प्रेक्षकाला खुर्चीला खिळवुन ठेवतो. चित्रपटात घेतल्या गेलेल्या काही फ्रेम्स अगदी नेत्रदीपक! हिरवगार शेत, घोड्यावरील रपेट हे सीन्स उत्तमरित्या चित्रित करण्यात आले आहेत.

४) Honour killing - हा प्रकार महाराष्ट्रात अस्तित्वात आहे का आणि असल्यास किती प्रमाणात? ह्या विषयी हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण करतो. चित्रपटाच्या शेवटी प्रेमिकांना कायमचं दुरावताना दाखवुन प्रेक्षकांची सहानभुती मिळविण्याची ही ट्रिक एक दुजे के लिये, कयामत से कयामत तक वगैरे चित्रपटापासुन प्रचलित आहे. जर ह्या चित्रपटाचा सुखांत दाखवला असता तर चित्रपट इतकाच यशस्वी झाला असता का हा विचार करण्यासारखा प्रश्न! 

५) ट्रेनच्या तालावर नाचणं  - कॉलेजात असेपर्यंत मुलं जो काही मनसोक्त धतिंगपणा करतात त्याची रूपं वेगवेगळी ! गावात ह्यासाठी मोजके पर्याय उपलब्ध! परंतु त्यामुळे आपल्या सृजनशीलतेला बंधन येऊ देतील ते कॉलेजकुमार कसले! केवळ ट्रेनचा आवाज हे पार्श्वसंगीत घेऊन त्याच्या तालावर मनसोक्त नाचण्याचा आनंद लुटणे ही तर तरुणाईची खासियतच!

६) लसूण सोलणं  -   पळुन जाणं सोपं पण त्यानंतर मात्र जीवनाची दाहक वास्तवता समोर उभी ठाकते! बाहेर भेटून मग आपआपल्या घरी जाण्याचा काळ वेगळा आणि २४ तास एकत्र राहण्याचा प्रसंग वेगळा! मुलांना लहानपणापासुन आईच्या हातच्या जेवणाची सवय असते आणि हे जेवण आयतं मिळण्याची सुद्धा बहुतांशी उदाहरणात सवय असते. त्यामुळे लग्नानंतर ही जबाबदारी आपसुकपणे बायकोने स्वीकारावी ही मानसिकता बरेच तरुण बाळगुन असावेत. त्यामुळे लसूण सुद्धा न सोलता येणारी बायको मिळाली तर कठीणच!

७) लग्नानंतरचे वाद विवाद व्यवस्थापन  - लग्नानंतर वाद विवाद होतातच. सामाजिकदृष्ट्या दोन अगदी वेगळ्या स्तरावर असणाऱ्या जोडप्यात वाद झाला आणि त्यातील कनिष्ठ स्तरावरील साथीदाराने आपल्या घरातील / ज्ञातीतील काही आक्षेपार्ह भाषा वापरली किंवा वर्तवणूक केली तर दुसरा साथीदार त्याला माफ करु शकतो काय? चित्रपटात हे शक्य होऊ  शकत असलं  तरी वास्तवात मात्र कठीण आहे. 

मुख्य म्हणजे आपण व्यक्ती म्हणुन नक्की कसे आहोत आणि व्यक्ती म्हणुन नक्कीआपणास काय हवं आहे ह्याची पुर्ण जाणीव बहुदा कोणालाच नसते. त्यामुळे मतभेदाचे प्रसंग उद्भवल्यास त्यावेळी त्यावर तोडगा म्हणुन नक्की काय हवं आहे त्याविषयीची संदिग्धता बऱ्याच जोडप्यांना महागात पडते. 

८) आर्चीचा आईला फोन - आर्ची अचानक दोन वर्षांनंतर आईला फोन का करते हे मला आधी न उलगडलेलं कोडं! म्हणजे चित्रपटाच्या कथेची ती नक्कीच गरज आहे कारण त्या कॉलमुळे तिच्या घरच्यांना तिचा ठावठिकाणा कळतो! आर्ची स्वतः आई बनल्यावर तिला आपल्या आईची मानसिकता अधिक चांगल्या प्रकारे कळते, ती तिच्याशी अधिक चांगल्या प्रकारे कनेक्ट होते आणि म्हणुन तिला फोन करते ! आज आमच्या कौटुंबिक ग्रुपवरील मला प्राची, निऊ  आणि प्राजक्ताने  जे काही ज्ञान दिलं त्यातील हा एक मुद्दा! आणि दोन वर्षानंतर का फोन तर त्यांच्या मुलाची बाहेर पडणारी कोवळी पावलं ही कथानकाची गरज म्हणुन दोन वर्षानंतर हा कॉल! हे सर्व उमजल्यावर अचानक कोणत्या तरी प्रसंगाने आर्चीला आईची अगदी जोरदार सय येते असा काही प्रकार दाखवता आला असता असं मला राहुन राहून वाटून गेलं!

९) आर्ची परशाची निरागसता - ह्या दोघांची निरागसता हा ह्या चित्रपटाचा USP! ह्या चर्चेपायी आपली मध्यरात्र ओलांडुन गेली तरी chat करणारी निऊ म्हणाली. मी लगेचच मान्य केलं!

तर लोकहो सैराट पाहताना लक्षात ठेवायची मुख्य गोष्ट म्हणजे पोस्टच्या सुरुवातीला उल्लेखलेली विचारसरणी १ आणि २! मी पक्का विचारसरणी १ चा! अधुनमधून विचारसरणी २ कडे झुकतो तो असली पोस्ट लिहिण्यापुरता! विचारसरणी २ साठी असलेली आपआपली appetite किती आहे हे प्रत्येकाने ओळखुन असणं सर्वांच्या दृष्टीने किती बरं असतं नाही का!  

शुक्रवार, १० जून, २०१६

मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघात


मुंबई पुणे एक्सप्रेस वे हा २००२ सालापासुन कार्यान्वित झालेला देशातील पहिला सहा मार्गिकेचा द्रुतगती महामार्ग आहे. ह्या महामार्गावर ठिकठिकाणी टोल गोळा केला जातो. ह्या टोलची एकंदरीत रक्कम किती ह्याविषयी एकंदरीत गुप्तता पाळण्याचेच धोरण दिसुन येतं. ह्या महामार्गाने मुंबई पुणे प्रवासाचे अंतर हे सरासरी दोन तासावर आणलं आहे असं म्हणता येईल.

ह्या महामार्गावरील टोलच्या उत्पन्नामुळे शासनासाठी हा एक महत्त्वाचा मार्ग ठरतो. पण ह्या महामार्गावरील सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना केल्या गेल्या आहेत कि नाहीत हे पाहणं महत्वाचं ठरतं. ह्या महामार्गावरील कमाल वेगमर्यादा ८० किमी आहे. ही वेगमर्यादा जगातील बहुतांशी महामार्गांवरील वेगमर्यादेपेक्षा कमी आहे. परंतु ह्या महामार्गावरील चालक ह्या बाबतीत अनभिज्ञ असल्याचच आढळून येतं. आणि त्यामुळेच ह्या महामार्गावरील मृत्यूंचे प्रमाण हे जागतिक संख्यावारीच्या मानाने बरंच जास्त असल्याचं आढळून येतं.

१) ह्या महामार्गावरील चालकांची इतक्या वेगाने वाहन चालविण्याची पात्रता - अशिक्षित चालक आपल्या अज्ञानाने बाकीच्या लोकांच्या जीवनाला धोका पोहोचवतात. इतक्या वेगात वाहन चालवत असताना लेन कशा प्रकारे बदलावी, बिघाड झालेलं वाहन कोठे थांबवायचे ह्याविषयी योग्य ज्ञान असणे आवश्यक आहे. Blind Spot ह्या संकल्पनेविषयीचे अज्ञान  सुद्धा बऱ्याच चालकांत दिसुन येतं !  
शासनाकडून अपेक्षा - ह्या महामार्गावर वाहन चालविण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या चालक परवान्याचे (License) निर्माण. ह्या महामार्गावर वाहन चालविण्यासाठी प्रत्येक चालकाकडे हे License असणे आवश्यक! 

२) महामार्गावरील इतर नियमांविषयीचे ज्ञान - इतक्या वेगाने वाहन चालवायचं असेल तर आपलं वाहन योग्य स्थितीत आहे किंवा नाही ह्याची तपासणी करुन घेणे. नाहीतर इतक्या वेगाने वाहन चालवत असताना गाडीचा टायर फुटून अपघात होण्याची शक्यता वाढीस लागते. 

शासनाकडून अपेक्षा - ह्या महामार्गावर येणारं प्रत्येक वाहनाचा नमुद केलेल्या निकषावरील maintenance गेल्या सहा महिन्यात केला गेला असणे आवश्यक! त्याशिवाय वाहन ह्या महामार्गावर येऊ शकत नाही!



३) वेगमर्यादा / चालकाची शारीरिक परिस्थिती - पुरेशी विश्रांती न घेता मोठी वाहने वेगाने चालविणारे चालक - 
शासनाकडून अपेक्षा - मोठ्या मालवाहू ट्रक, बस ह्यासारखी वाहने चालविणाऱ्या चालकाची ड्युटी किती तास झाली आहे ह्याचा रेकोर्ड त्यांच्या मालकाने नमूद करणे आवश्यक आहे. रात्रीच्या वेळी इथली वेगमर्यादा ६० वर आणावी. वेगमर्यादा भंग करणाऱ्या चालकांना जबरी दंड बसवला जावा त्यांचं License किमान सहा महिने रद्द केलं जावं. 



४) महामार्गाची देखभाल - पावसाळ्यात दरड कोसळुन अपघात होतो अशा वेळी पूर्वकाळजी घेऊन महामार्गाच्या दरड कोसळण्याच्या संभाव्य ठिकाणी प्रतिबंधक उपाय योजणे.
काही अपघात अतिवेगाने जाणारं वाहन दोन दिशांनी जाणाऱ्या मार्गीकांमधील Divider तोडून दुसऱ्या दिशेने येणाऱ्या वाहनांशी Head on collision होऊन होतात. हे divider अगदी Best-in-the-class असायला हवेत.
शासनाकडून अपेक्षा -क्रमांक चार मधील सर्व मुद्दे ही शासनाची जबाबदारी! 

५) अपघात उपचार  केंद्र -

शासनाकडून अपेक्षा - योग्य अंतरावर Trauma Care Center ची स्थापना 

मेहनतीने आपलं जीवन जगणाऱ्या कित्येक मध्यमवर्गीयांचा जीव ह्या एक्प्रेस वे ने गेल्या काही वर्षात घेतला आहे. ह्यातील बहुतांशी अपघात किमान खबरदारीच्या उपायांनी वाचू शकले असते. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपण ह्या बाबतीत पुढाकार घेऊन हे किमान प्रतिबंधक उपाय तातडीने लागु करावेत ही कळकळीची विनंती!



मागच्याच आठवड्यात पुन्हा एकदा ह्या महामार्गावर भीषण अपघात होऊन १६ जणांचा जीव गेला. ख्यातनाम अभिनेते शरद पोंक्षे ह्यांनी ह्या बाबतीत शासनाकडे जनतेच्या प्रतिक्रिया घेऊन जाण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांना पाठींबा म्हणून मी त्यांना वरील मुद्द्यांचे पत्र लिहित आहे. तुम्हांला जर पटलं तर तुम्ही सुद्धा त्यांना ponkshesharad@gmail.com वर पत्र लिहा.

गुरुवार, ९ जून, २०१६

दहावीची शिकवणी !

सोमवार, ६ जून, २०१६

इंटरनेट ऑफ द .. - भाग २





नारदमुनी मोठ्या आशेने महाराष्ट्र देशी अवतरले खरे पण लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या सर्व निर्मात्यांनी त्यांना जवळजवळ ठुकरावूनच लावलं.

"आमचं व्यवस्थित चाललंय! सासु, सुना, सासरे, नणंद, जाऊ, दीर, प्रियकर हे घटक एका बाजूला, प्रेमळ, खाष्ट, धूर्त वगैरे स्वभावछटा दुसऱ्या बाजुला घेऊन मनाला येईल तशा व्यक्ती आणि स्वभावछटा ह्यांच्या जोड्या बनवायच्या. बेस्टचा बसस्टॉप, रिक्षावाला, ज्यूसवाला अशी पात्रं घुसवायची. त्यात उत्तर भारतीय व्यक्तिरेखा घुसावायच्या कि मग पुरुषमंडळी सुद्धा रस घेऊन पाहतात मग हे नवीन खूळ हवाय कोणाला!"  एकंदरीत सर्वांच्या बोलण्याचा सारांश होता.

 "बाकी तुम्हांला रस असेल तर आम्ही तुम्हांला आमच्या मालिकेत घ्यायला तयार आहोत!" असं सांगायला मात्र ते विसरले नाहीत.

भगवान विष्णु स्वर्गलोकातून नारदमुनींची ही सारी धडपड पाहत होते. शेवटी त्यांना नारदमुनींची दया आली.

नारदमुनी अगदी हताश होऊन त्या शेवटच्या लोकप्रिय निर्मात्याच्या ऑफिसातून बाहेर पडत होते. त्यांनी बनविलेल्या यादीतील सर्व लोकप्रिय निर्मात्यांची कार्यालये भेट देऊन झाली होती. लिफ्टला गर्दी होती आणि म्हणुन त्यांनी जिन्याने खाली उतरण्याचे ठरविलं. स्वर्गलोकी भगवान विष्णुंना कसं सामोरं जायचं ह्याची मोठी भिती त्यांच्या मनात दाटून राहिली होती. एक दोन मजले उतरल्यावर अचानक त्यांचं लक्ष त्या मजल्यावरील एका जुनाट कार्यालयाकडे गेले. "वि. वि. सामंत - मराठी निर्माता" अशी धुळीने काहीशी माखलेली पाटी त्यांच्या नजरेस पडली. नारदांच्या मनात कोणता विचार आला हे फक्त भगवान विष्णुच जाणोत!

पुढील अर्धा तास सामंत आणि नारदमुनी ह्यांची चर्चा अगदी खोलवर रंगली. नारदमुनींच्या हेतुविषयी खात्री पटल्याने सामंत ह्यांनी आपली संहिता त्यांच्या हातात सोपवली.

भाग १

सन २०२५
मालिकेचा युवा नायक अनिल हा एका अत्याधुनिक भारतीय बँकेत अधिकारी पदावर काम करतोय. त्याची आई सुनंदा ही त्याच लग्न जमवायच्या खटपटीत आहे. सकाळ होतेय. अनिलचा भ्रमणध्वनी गेले दहा मिनिटं त्याला उठवायचा निष्फळ प्रयत्न करतोय. अनिलला वेक अप कॉलच्या कोणत्या ट्युन्स आवडत नाहीत हे त्याच्या मेंदूत निर्माण होणाऱ्या वैतागलहरी बरोबर पकडताहेत. ह्या वैतागलहरींना पकडून त्यांचं विश्लेषण अनिलच्या भ्रमणध्वनीच्या गजरापर्यंत पोहोचविण्याचं काम भ्रमणध्वनीच "वैतागपकड" ऍप बरोबर करतंय. शेवटी न राहवून भ्रमणध्वनीचा गजर त्याच्या बॉसचा आवाज ऐकवतो. आता मात्र अनिल नाईलाजाने उठतो.

अनिलच्या जिमप्रशिक्षकाने पाठविलेला त्याचा आजचा नाश्ता सुनंदाताईच्या भ्रमणध्वनित केव्हाचा येऊन पोहोचला होता. भ्रमणध्वनीने घरातील फ्रीजला संदेश पाठविला होता. १३७ ग्रॅम ओट्स आणि ३२१ मिली दुध अशी सुचना फ्रीजच्या सुचनाफलकावर झळकली होती. ही सुचना पाहताच सुनंदाताईचे बीपी थोडं वाढलं. लगेचच त्यांच्या मोबाईलने फ्रीजला आगाऊपणा कमी करण्याची सुचना दिली. फ्रीजने तात्काळ ती मानुन "एक वाटी साजुक तुपातील शिरासुद्धा ह्याला पर्याय होऊ शकतो" असा संदेश झळकावला. लगेचच सुनंदाताईच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले. आणि त्या शिऱ्याच्या तयारीस लागल्या. तुप संपत आल्याचं कळताच फ्रिजच्या पोटात गोळा आला आणि त्याने तात्काळ रस्त्यापलीकडील सुपरमार्केटला अर्धा किलो तुपाची ऑर्डर देण्याची तयारी चालविली. त्याची ही धडपड सुनंदाताईच्या भ्रमणध्वनीने ओळखली. "तुला वेड लागलंय का? " सुनंदाताईच्या भ्रमणध्वनीने त्याला खरमरीत संदेश पाठविला. "तो भैय्या ५०० मीटर अंतरावर आहे - त्याला लगेचच कळवितो मी!" सुनंदाताईच्या भ्रमणध्वनिने गेल्या महिन्यातील आठवण लक्षात घेऊन पुढाकार घेतला.
शिऱ्यात तूप टाकायची वेळ यायला आणि प्यारेलाल तूप घेऊन दाराची बेल वाजवायला एकच गाठ पडली. "किती गुणांचं माझं फ्रीज!" सुनंदाताईच्या कौतुकाच्या ह्या शब्दांनी त्यांचा भ्रमणध्वनी मात्र संतापाने लालेलाल झाला! "अरे चिडक्या! तुझं c.p.u.किती तापलंय बघ!"थंडगार फ्रीजने भ्रमणध्वनीच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केलं. 

साजुक तुपाचा प्रसन्न गंध अनिलपर्यंत येऊन पोहोचला तसं त्याने आपल्या तयारीचा वेग वाढविला. न्याहारीला प्रसन्न मुद्रेने बसलेल्या अनिलला पाहून सुनंदाताईच्या मनात अजुन एक विचार डोकावला. अनिलचे पिता मोहन अनिलवर पाळत ठेऊन होते. त्याची माधुरी नावाच्या मुलीशी सोशल मीडियावर ओळख जरा जास्तच वाढली आहे असं त्यांनी सुनंदाला सांगितलं होतं. सुनंदाताईने एक पाऊल पुढे टाकुन माधुरीचा पत्ता शोधून काढला होता. आज सायंकाळी अनिल ऑफिसातून परत येताना त्याची कार माधुरीच्या घराच्या आसपास बंद पाडण्याचा संदेश देण्याचा आदेश देण्याची विनंती त्यांनी मोहनरावांना केली होती. ही कार मोहनरावांनीच अनिलला भेट दिली असल्याने हे कारस्थान ते करू शकत होते. "पण ती दीडशहाणी कार माझी सुचना सहजासहजी ऐकेल असं मला वाटत नाही!" मोहनरावांनी आपलं म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करुन पाहिला.

(क्रमशः)

रविवार, ५ जून, २०१६

इंटरनेट ऑफ द .. - भाग १



नारद मुनी नेहमीप्रमाणे स्वर्गात प्रवेश करते झाले. "नारायण नारायण" म्हणतच त्यांनी विष्णुदेवांना प्रमाण केला. विष्णुंनी त्यांचा प्रणाम स्वीकारला खरा पण भगवान विष्णुंची चिंतातुर मुद्रा नारदमुनींच्या नजरेतुन सुटली नाही. 

"प्रभो आपण अगदी चिंतीत दिसत आहात! स्वर्गलोकी सर्व काही ठीक तर आहे ना?" नारदांनी विष्णुंना प्रश्न केला. 

"नारदा स्वर्गलोकी तर सर्व काही ठीक आहे! पण भुतलावर जो काही प्रकार चालला आहे तो माझ्याच्याने पाहिला जात नाही!" विष्णु आपली चिंतित मुद्रा कायम ठेवत म्हणाले. 

"प्रभो, सध्याच्या कलियुगात पृथ्वीवर अनेक अनिष्ट गोष्टींचे पेव फुटलं आहे. त्यातील कोणती आपणास ह्या क्षणी खटकत आहे ते जाणुन घेण्याची माझ्या मनी इच्छा निर्माण झाली आहे!" नारद म्हणाले. 

"महाराष्ट्रदेशी मराठी सिनेमा गेले काही वर्षे ऊर्जितावस्थेत आला असताना उपग्रहवाहिनीसारखं प्रभावी माध्यम सुद्धा मराठी निर्मात्यांच्या हाती गवसलं ह्याचा कोण आनंद मला झाला होता!" विष्णु म्हणाले. 

"होता म्हणजे काय प्रभो! ह्या क्षणी सुद्धा माझा हा आनंद कायम आहे! "सौभाग्यवती", "का हे दिया परदेस" ह्या सारख्या मनोरंजक मालिकांचा एकही भाग चुकवू नये .. " विष्णुंची क्रोधित मुद्रा ध्यानात घेत नारदांनी आपलं बोलणं  आवरतं घेतलं. 

"अरे शिवबांचा हा महाराष्ट्र ! शिवबा घडले ते जिजाऊमातेच्या संस्कारामुळे! आणि त्यांनी अवघ्या महाराष्ट्राला एक नवीन दिशा दिली, उर्जितावस्था प्राप्त करुन दिली! आणि आजच्या मराठी माता, आज्या आहेत कोठे? ज्या आपल्या उद्योगधंद्यात मग्न आहेत त्या असोत की गृहिणीपद सांभाळणाऱ्या असोत, ह्यातील बऱ्याच स्त्रिया ह्या निरर्थक मराठी मालिकांच्या नादी लागुन आपला वेळ व्यर्थ घालवीत आहेत! आणि बाह्ययुगात ज्या काही बदल घडवुन आणणाऱ्या गोष्टी आहेत त्यांच्याबरोबर आपली ज्ञानपातळी कायम ठेवण्याची अमोल संधी वाया दवडित आहेत! " विष्णुंनी आपल्या मनात इतके दिवस साठवुन ठेवलेल्या संतापाला मोकळी वाट करुन दिली. 

नारद कधी नव्हे ते अगदी गोंधळुन गेले. विष्णूंचा संताप कमी करावयाचा म्हटलं तर त्यांना ह्यावर काहीतरी उपाय सुचवायला हवा. परंतु ही समस्या पडली ती समस्त महाराष्ट्रदेशीय महिलांची! ह्यावर उपाय शोधायचा झालं तर प्रत्येक स्त्रीला जाऊन भेटणं आणि तिचं मतपरिवर्तन करायचं हा मार्ग आहे कि काय!

"नारदा, नारदा !" नारदांच्या चेहऱ्यावरील संभ्रम पाहुन विष्णु अधिकच संतप्त झाले. नारदाच्या मनात कोणता संभ्रम चालला आहे ह्याची थोडीफार कल्पना त्यांना आलीच होती. 

"अखिल महाराष्ट्रातील समस्त महिलावर्गाला तु भेट द्यावीस असे माझे म्हणणे नाही. ह्या सर्व महिलावर्गाला हा वेळ घालविणारा नाद लावणाऱ्या मराठी मालिकांच्या निर्मात्यांची तु भेट घ्यावीस आणि त्यांना योग्य प्रकारे समज द्यावीस अशी माझी इच्छा आहे!" विष्णूंचा क्रोध आता काहीसा निवळला होता. आपला एक संभ्रम दूर झाला म्हणुन नारदमुनींच्या चेहऱ्यावर प्रसन्नता दिसु लागली. 

"नारदा, तु निर्मात्यांना योग्य समज देशील ह्याविषयी माझ्या मनात यकिंचितही शंका नाही. पण त्यांना तु सध्याच्या काळास योग्य असा विषय सुचवावा असं माझं म्हणणं आहे. आणि असा विषय शोधुन काढण्यात तु सक्षम आहेस ह्याविषयी माझ्या मनात तिळमात्रसुद्धा शंका नाही!" विष्णू काहीशा मिश्किल स्वरात म्हणाले. 

नारदमुनींच्या चेहऱ्यावर दिसु लागलेली प्रसन्नता एका क्षणात नाहीशी झाली! 

"प्रभो, प्रभो मला क्षमा करा!" माझ्या हातुन कोणता प्रमाद झाला असेल त्याचे थेट प्रायश्चित मला द्या! पण अशी ही अप्रत्यक्षपणे शिक्षा नको!" नारदमुनी विष्णूंचे पाय धरत म्हणाले. 

"नारदा, तु सद्यकाळाशी अद्ययावत राहिला असशील अशी माझी अपेक्षा होती आणि अजुनही आहे! असो - सध्या मी मानवाने नव्याने मांडलेल्या "इंटरनेट ऑफ द थिंग्स" ह्या संकल्पनेने पुरता भारावून गेलो आहे. मराठी निर्मात्यांनी ह्या नवीन काळाशी सुसंगत अशा विषयावर मालिका निर्माण करुन सद्यकालीन महाराष्ट्रदेशीय जिजाउंना प्रेरणेचा नवीन स्त्रोत दाखवुन द्यावा अशी माझी इच्छा आहे!" विष्णु आपली इच्छा व्यक्त करुन पुन्हा एकदा धारणेत मग्न झाले. 

निसंशयपणे आतापर्यंतची एक सर्वात कठीण अशी जबाबदारी अंगावर घेऊन नारद भुतलाच्या दिशेने कूच करते झाले! 

(क्रमशः)

बुधवार, १ जून, २०१६

Fast Tracking



जून उजाडला! सरणाऱ्या प्रत्येक वर्षागणिक शालेय जीवनातील मनात दडलेल्या जूनच्या आठवणी जुन होत असल्या तरी अजुन मनात दडुन बसल्या आहेत. वर्गशिक्षिका कोण असणार ह्याची उत्सुकता मे महिन्याच्या सुट्टीच्या शेवटच्या आठवड्यात अगदी उचल धरुन यायची. आता रम्य आठवणींचं ते S.S.C. बोर्डची लोकमान्यता अगदी ओहोटीस लागली. बहुतांशी सर्वजण C.B.S.E, I.C.S.E अथवा I.B. बोर्डात आपल्या मुलांना प्रवेश देऊ लागलो.

थेट मुद्द्याकडे! ह्या C.B.S.E, I.C.S.E अथवा I.B. बोर्डांनी शालेय जीवनात आमुलाग्र बदल घडवुन आणला. ही बोर्ड होती आधीपासुनच वेगळी आणि त्यात त्यांनी बदलत्या काळानुसार अजुनच बदल घडवुन आणला. जणु काही ह्यात शिकणारा प्रत्येक मुलगा / मुलगी CEO, आघाडीचा कलाकार, खेळाडू बनणार अशा धाटणीचे शिक्षण, अतिरिक्त कलाकुसर आणि मुख्य म्हणजे अशी मनोवृत्ती जोपासण्याचा प्रयत्न ह्या शाळा करताना दिसतात.

ह्या सर्व शैक्षणिक संस्थांनी १० आणि १२ पर्यंतच्या शिक्षणाचं स्वरुप आमुलाग्र बदलवुन टाकलं. प्रामुख्यानं IIT किंवा Regional Colleges मध्ये प्रवेश मिळविण्यासाठी योग्य अशा पद्धतीच्या प्रवेश परीक्षा सद्यकाळी आपला प्रभाव वर्षोगणिक वाढवत असल्याचं चित्र आपणास दिसतं. परंतु १२च्या विज्ञान शाखेच्या परीक्षेला बसणाऱ्या मुलांपैकी कितीजण ह्या IIT किंवा Regional Colleges मध्ये प्रवेश मिळविण्यासाठीउत्सुक आहेत किंबहुना त्यांच्यासाठी ह्या संस्था सुयोग्य आहेत ह्याचा विचार होताना दिसत नाही.

होतंय काय कि आपण आपल्या मुलांच्या क्षमतेचा आणि त्याहुन महत्वाचं म्हणजे ह्या उच्चशिक्षणादरम्यान सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या दबावाला तोंड देण्याच्या क्षमतेचा विचार करताना दिसत नाही. व्यावसायिक जीवनात एक संज्ञा वापरली जाते - Fast Tracking! एखाद्या विशिष्ट व्यावसायिक गरजेचे  (Requirement) नजिकच्या काळातील बाजारमूल्य खुपच जास्त असल्याची भावना जर उच्चपदस्थ व्यक्तींच्या मनात निर्माण झाली तर ह्या requirement ला एका प्रोजेक्टच्या रूपात आणुन त्याला Fast Tracking वर टाकलं जातं. ह्यात बऱ्याचशा गोष्टी ज्या नेहमी एकामागोमाग एक अशा केल्या गेल्या असत्या त्या आता समांतर स्वरुपात केल्या जातात. सर्वसाधारण प्रोजेक्टला मिळावयास लागणाऱ्या परवानग्या, त्यावर काम करणारे अभियंते मिळविण्यासाठी ज्या ठरलेल्या मार्गाचा वापर केला जातो त्यापेक्षा ह्या लाडक्या बाळास खास वागणूक देऊन हे बाळ झटपट मार्केटमध्ये आणलं जातं कारण विशिष्ट वेळेला ते मार्केटमध्ये असणं आवश्यक असतं.  

आपण आपल्या मुलांना पण Fast Tracking वर टाकतोय! ह्या Fast Tracking वर फक्त पहिल्या काही स्थानकांपर्यंत आपण त्यांना सपोर्ट करु शकतो त्यानंतर मात्र जरी ती आपल्यासोबत घरी राहत असली तरी त्यांची स्थानक पुढे गेलेली असतात. Pyramid च्या संकल्पनेनुसार ह्यातील फक्त काहीजणच हे fast tracking संपुर्ण कारकिर्दीत सुरु ठेऊ शकतात. इतरांच्या बाबतीत गाडी इतका वेग पकडते की त्यांना त्या वेगासोबत धावणं शक्य होतं नाही आणि मग ३५ - ४० च्या आसपास कधीतरी ते ह्या गाडीतुन बाहेर फेकले जातात.

मुद्दा हाच! आपल्या मुलांना fast tracking वर टाकण्याआधी आपण ह्या सर्वासोबत किती काळ धावू शकु ह्याचा विचार करा! स्वतःशी प्रामाणिक राहा! आपलं S.S.C. बोर्ड आणि आयुष्यभर शांतपणे करु शकणाऱ्या नोकऱ्या ह्यांचंसुद्धा स्वतःच महत्व आहे. ह्या मार्गाने जाणारी लोकसुद्धा आनंदात आयुष्य जगु शकतात. आजुबाजूला डोळसपणे पहात राहा! पुढील काळात कोणता पेशा निवडणं योग्य राहील ह्याचाही सतत मागोवा घेत राहा. आणि हो महत्वच म्हणजे आयुष्यभर केवळ एकच पेशा निवडुन त्यायोगे उदरनिर्वाह करण्याचा काळ झपाट्याने मागे पडत चालला आहे ह्याचीसुद्धा जाणीव ठेवा विशेषकरुन जर तुम्ही आपल्या मुलाला त्या राजधानीच्या मार्गावर सोडणार असाल तर!!

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...