मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २५ मे, २०१६

एकोणतीस सक !!



लहानपणीची गोष्ट! सहावीत असताना शाळेत एका सरांनी वर्गात आम्हां मुलांना आव्हान दिलं, सर्वांसमोर येऊन २९ चा पाढा बोलुन दाखविण्याचं! मी ते स्वीकारलं का सरांनी ते मला स्वीकारायला भाग पाडलं हे आठवत नाही पण मी समोर आलो आणि २९ चा पाढा सुरु केला. २९ सक १७४ आणि २९ साता २०३ मध्ये कोठेतरी गडबडलो. गानू सर होते ते! त्यामुळे हातावर छडीचा प्रसाद घेऊन जागेवर परतण्याशिवाय पर्याय नव्हता.

नंतर कधीतरी मग लक्षात आलं. २९ चा पाढा थेट लक्षात ठेवायची गरज नाही. ३० चा पाढा संदर्भ ठेऊन आपल्याला २९ चा पाढा पटकन मिळविता येतो. थोडं पटापट मनातल्या मनात वजाबाकी करता आली पाहिजे इतकंच! २९ सक म्हटल्यावर ३० सक १८० दिसायला हवेत आणि त्यात ६ वजा करुन १७४ हे उत्तर मिळवता यायला हवं.

आयुष्य मग हळुहळू क्लिष्ट होत गेलं! २९ च्या पाढ्यापेक्षा नक्कीच जास्त क्लिष्ट! मग जाणवलं की २९ च्या पाढ्याचं तंत्र आयुष्यात बऱ्याच ठिकाणी उपयोगी पडू शकतं. चर्चगेटवरुन कांदिवलीला जायचं असेल तर प्रत्येक वेळी बोरिवली स्लो गाडी पकडायचीच गरज नाही. कमी गर्दीच्या वेळी विरार जलद पकडुन बोरीवलीला येऊन मग मागं कांदिवलीला येऊ शकतो. ह्यात कमी गर्दीची वेळ कोणती ह्याचा निर्णय घेता यायला हवा. ह्या महिन्याच्या आरंभी मालवणहून ५१२ किमी टुकार रस्त्याने कुच करताना नाकी नऊ आले तेव्हाही जाणवलं की गोव्याला विमानाला जाणं आणि मग कमी अंतर रस्त्याने कूच करणं केव्हाही चांगलं झालं असतं!

आपल्या माणसांच्या नात्यांचं सुद्धा असंच काहीसं असतं नाही का! ह्या एकोणतीसच्या पाढ्याच्या विविध छटा आपणास अनुभवायला मिळतात ! 

१) आपण २९ च्या पाढ्यासारखी क्लिष्ट आकडेवारी पदोपदी छोट्या मोठ्या घटनांमध्ये करत राहतो. मागच्या एखाद्या प्रसंगात नक्की योग्य काय झालं असतं ह्याचाच काथ्याकुट करत बसतो. म्हणजे २९ सक १७६ कि १७४ ह्याचाच विचार करत असतो. आणि समोरच्या व्यक्तीला आपण प्रतिसादच देत नाही. खरंतर समोरच्याला १७० - १८० च्या मधलं कोणतंही उत्तर चाललं असतं कारण त्याला महत्व असतं ते आपल्या प्रतिसादाचे! पण आपण मात्र अचुकतेच्या नादापायी तो क्षण गमावुन बसतो! होतं काय की कालांतराने आपणास जरी त्या घटनेतील योग्य अयोग्यतेची जाणीव झाली आणि १७४ उत्तर मिळालं तरी समोरचा माणुस त्याचा २९ चा पाढा घेऊन फार पुढे गेलेला असतो. 

२)आयुष्य खुप गतिमान होत चाललं आहे. काही लोकांनी मनापासुन हे स्वीकारलं आहे आणि ते आपल्या वाढत्या जबाबदाऱ्या आणि आप्तजन, मित्रमंडळी ह्यांच्याशी संपर्क साधुन असतात. अगदी परिपुर्ण नसला तरी सर्वांना वरवर खुश ठेवण्याइतका ! 

पूर्वी आयुष्य तुलनेने संथ होतं. मोजकी नाती आणि मित्रमंडळी होती. आणि वेळही होता त्यामुळे इच्छा असेल तर हे वैयक्तिक ऋणानुबंध परिपूर्णतेने जपता यायचे. ह्या काळातील काही मंडळी ह्या बदललेल्या युगात अजुनही अस्तित्वात आहेत. आणि वर उल्लेखलेल्या मंडळीशी संवाद साधताना त्यांना ही मंडळी काहीशी ढोंगी असल्याचा भास होतो ! पण लक्षात ठेवा दोन्ही विचारधारणा आपापल्या परीने योग्य आहेत!

मंडळी वरील म्हणणं पटलं अथवा न पटलं तरी बोला !
एकोणतीस सक …. !!

सोमवार, २३ मे, २०१६

इस्त्री



शाळा आणि महाविद्यालयातील गोष्ट! तो काळ एकतर वेगळा होता किंवा मी वेगळा होतो किंवा दोन्हीही! म्हणजे शाळेच्या वेळी खात्रीपुर्वक मी सांगु शकतो की आम्ही सर्वजण बिना इस्त्रीचे कपडे परिधान करायचो. महाविद्यालयात माझ्या बाबतीत परिस्थिती बदलली नव्हती आणि आजुबाजूच्या मुलांचे निरीक्षण करुन त्यांनी इस्त्री केलेले कपडे परिधान केले आहेत की नाही हे पाहण्याइतकी माझी कुतुहूलशक्ती विकसित झाली नव्हती. पण बहुदा रुपारेल आणि SPCE ह्या मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचे आधिक्य असलेल्या कॉलेजात माझं शिक्षण झाल्याने बहुतांशी हीच परिस्थिती असावी असं मला वाटत! 

नंतर मग नोकरीला लागल्यापासुन मात्र परिस्थिती बदलली. इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घालुन जाणे ही काळाची गरज बनली. विरार लोकलमधुन अंधेरीला उतरेपर्यंत हे कपडे इस्त्री केले आहेत ह्यावर कोणी विश्वास ठेऊ शकत नसे. पण "मी इस्त्री केलेले कपडे ऑफिसात घातले!" असं मानसिक समाधान का काय म्हणतात ना ते मात्र मिळायचं!

माझे वडील ऑफिसला जाईतोवर स्वतःचे कपडे स्वतः घरी इस्त्री करत. प्रत्येक कपडा अगदी मन लावुन व्यवस्थित! त्यावर पाण्याचे थेंब शिंपडायचे, प्रत्येक बाहीची घडी अगदी व्यवस्थित पडली आहे ह्याची खातरजमा करुन घेत! माझ्याकडे काही बाबतीत व्यवस्थितपणा आहे असे लोक म्हणतात आणि पत्नी सुद्धा म्हणते! म्हणजे नक्की असावा ! पण इस्त्री करण्याबाबतीत मात्र माझ्याकडे इतका काटेकोरपणा नाही. साधारणतः पाच मीटर अंतरावरुन पाहणाऱ्या माणसाला मी इस्त्री केलेले कपडे घातले आहेत असा भास / विश्वास व्हायला हवा इतक्या काटेकोरपणे इस्त्री करावी हे माझे धोरण! वडील निवृत्त झाले आणि मग आम्ही इस्त्रीवाला पकडला. हे लोक जशी मस्त इस्त्री करतात तशी आपल्याला सुद्धा एकदा का होईना करता यावी ही माझ्या मनात जबरदस्त इच्छा! "त्यांची इस्त्री वेगळी असते !" बायकोने मला समजावल्यावर मी काहीशा अविश्वासाने आणि काहीशा नाराजीने तिच्याकडे पाहिलं. 

पुढे अमेरिका गाठली. तिथं इस्त्रीवाला कुठून मिळणार आणि असला तरी आपल्याला दररोजच्या दररोज कोठे परवडणार? अमेरिकेतील लोकांचे एक वागणं आपल्या सर्वांना लगेच लक्षात येईल. जी काही धमाल करायची ती शुक्रवार दुपारपासून ते शनिवार रात्रीपर्यंत! रविवारी का कोणास ठावूक, मंडळी काहीशी दुःखात वाटायची. हाणून सर्वजण घरकामाला लागलेले दिसायचे. आमच्या वसाहतीत कपडे धुवायची यंत्रे सार्वजनिक ठिकाणी असल्याने बरीच पुरुषमंडळी तिथंच भेटायची. पुढे मग रविवारी जास्तच गर्दी व्हायला लागल्यापासुन मग मी माझ्या कपडे धुण्याच्या वेळा बदलल्या ही गोष्ट वेगळी! 

असो तर अमेरिकेत असताना रविवारी रात्रीचे जेवण आटोपलं की मग मी आठवड्याचे सर्व कपडे इस्त्री करायला घ्यायचो! एकदम ब्रह्मानंदी टाळी लागणे वगैरे प्रकार नसला तरी मस्तपैकी मी विचारमग्न व्हायचो. चिंतातुर जंतु असलेल्या माझ्या मनात पुढील आठवड्यात वाढुन ठेवलेल्या कामाव्यतिरिक्त दुसरे कोणते विचार येणं शक्य नव्हते. परंतु हा वेळ मला आवडायचा! माझ्या मनाला तो येणाऱ्या आठवड्यासाठी तयार करण्यासाठी खूपच मदत करीत असे! प्राजक्ता सुरुवातीला सूचना करी पण नंतर तिने माझा नाद सोडला होता. तुझी इस्त्री आणि तुझे ऑफिस - मला काय त्याचं ! अशा निष्कर्षापर्यंत काही काळाने ती येऊन पोहोचली होती. सोहम एक दोन वर्षाचा असेल. हा काहीतरी भयंकर प्रकार आहे हे इस्त्रीने तापलेल्या कपड्यांना स्पर्श करुन त्याने समजुन घेतलं होतं आणि त्यामुळे तो त्याच्याकडे ढुंकूनसुद्धा पाहत नसे. ह्या कारणांमुळे मी आणि माझी इस्त्री असा हा अर्धा तास अगदी एकांताचा काळ मला मननासाठी मिळे! 

आज अचानक हे सर्व इस्त्रीप्रकरण आठवायचं कारण म्हणजे मे महिना आणि इतर काही कारणांमुळे माझ्यावर इस्त्रीची वेळ आली. पुन्हा एकदा मन विचारात गुंतलं. स्वतःचे कपडे स्वतः इस्त्री करणे हे आपल्याला अगदी वास्तवात ठेवण्यासाठी खूप मदत करतं ह्याची जाणीव मला झाली. पैसा टाकुन सोयी मिळविता येतात ह्यात काही संशय नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पण ह्या सोयी मिळाल्याने जो मोकळा वेळ मिळतो त्याचा व्यवस्थित वापर न करता आल्याने अनेक समस्या निर्माण होतात. जमिनीवर बसुन इस्त्री करणे हा एक उत्तम व्यायाम आहे असे मी म्हणतो. त्याचप्रमाणे त्या वेळात आपण आपल्या भ्रमणध्वनीपासून दुर राहतो आणि त्यामुळे घरातील लोकांशी संवाद साधण्याची शक्यता वाढीस लागते. आणि तुमच्याकडे कितीही पैसा असो स्वतः बाजारात जाऊन जीवनावश्यक गोष्टी विकत घेता येणं, प्राथमिक पातळीवरील स्वयंपाक करता येणे, इस्त्री करता येणे, घरातील सर्व उपकरणे आई / पत्नीच्या अनुपस्थितीत वापरता येणे हे प्रसंग तुमच्यावर कधी ना कधी तरी ओढवणारच! त्यावेळी तुम्हांला ते निभावता आले पाहिजेत हे नक्की! 

आधुनिक काळ आपल्यापुढे एका आभासी विश्वाचे चित्र रेखाटण्यात बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे आणि त्यामुळे मुलभूत तत्वांना आपण दुय्यम स्थान देऊ लागलो आहोत. पण अगदी निकटच्या भविष्यात ही मुलभूत तत्वे आपल्या खऱ्या महत्त्वासकट आपल्यासमोर उभी ठाकतील ह्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही! 

हे सर्व काही आज सकाळी कराव्या लागलेल्या इस्त्रीच्या दोन कपड्यांपायी !! :)

सोमवार, १६ मे, २०१६

बावखल

वसई गेले काही वर्षांपासुन सामाजिक स्थित्यंतराचा अनुभव घेत आहे. हे स्थित्यंतर जसे वसईतील नागरिकांच्या व्यवसायातील / राहणीमानाच्या बदलांच्या स्वरुपात आढळुन येतं त्याचप्रमाणे ते त्यांच्या विचारसरणीत होणाऱ्या बदलांच्या स्वरुपात देखील आढळुन येतं. 

वसईतील बराचसा समाज हा काही काळापुर्वी शेतीप्रधान होता. वाडवडिलार्जित शेतीवाडीवर उपजिवीका करणे हा बऱ्याच समाजाचा मुख्य व्यवसाय होता. वाडीतील पिकांच्या सिंचनासाठी त्यावेळी बैलजोडीवर हाकले जाणारे रहाट असत आणि विहिरीऐवजी छोटी तळी ज्यांना बावखल म्हणुन संबोधिले जाते त्यांचा वापर केला जात असे. त्याकाळी विहिरीऐवजी बावखलांची प्रथा वसईत रूढ का झाली असावी ह्याविषयी अधिकृतरित्या माझ्याकडे संदर्भ उपलब्ध नाहीत. पण जमिनीची मुबलकता आणि कदाचित विहिरी खणण्यासाठी / तिला बंधारा घालण्यासाठी बाह्य घटकांवर असणारी अवलंबिता ही मुख्य कारणे बावखलांची लोकप्रियता वाढीस लागण्यासाठी कारणीभूत असावीत. 

वसईतील घराच्या आसपास असणारी वाडी ही उपजिवीकेचे जरी साधन होऊ शकत असली तरी ती तुम्हांला चैनीचे जीवन जगण्यासाठी बहुतांशी उदाहरणात असमर्थ होती. त्यामुळे साधारणतः बहुदा १९५० च्या नंतरच्या काळात सरकारी नोकरीकडे समाजाचा कल वाढू लागला. सरकारी नोकरी ह्या एकतर शिक्षकीपेशातील किंवा कार्यालयीन स्वरूपाच्या होत्या. ह्या काळात वसईत डॉक्टर अथवा अभियंते झाले नाहीत असे मी म्हणत नाहीये. मी एक सर्वसाधारण समाजाविषयी विधान करतोय. जसजसं हे सरकारी नोकऱ्यांचे / शिक्षकी पेशाचे प्रमाण मूळ धरु लागलं तसतसं हा समाज काही प्रमाणात शेती व्यवसायापासून मुख्य व्यवसाय म्हणून दुरावला गेला. काहीजण अजुनही शेतीवर मुख्य व्यवसाय म्हणून विसंबून आहेत. त्यांना सामाजिक जीवनात प्रतिष्ठेचे स्थान मिळायला हवं हा स्वतंत्र पोस्टचा विषय! 

१९९० च्या सुमारास काही बदल होत गेले. सरकारी नोकऱ्या मिळविणे पूर्वीइतके सोपे राहिले नव्हते. लोकलचा प्रवास काहीसा कठीण होऊ लागला होता. वसईत स्थानिक पातळीवर नोकऱ्या निर्माण झाल्या नव्हत्या आणि अजूनही नाहीत. वसई पूर्वेला असलेला औद्योगिक पट्टा अजूनही नोकऱ्यांचे वैविध्य देऊ शकत नाही. त्याचसुमारास नियमात झालेल्या बदलामुळे वसईत इमारतींचे प्रमाण अचानक वाढीस लागलं. आणि त्यामुळे पर्यायी उपजीविकेच्या साधनाच्या शोधात असलेल्या वसईतील काही नागरिकांनी शेतजमिनी विकून इमारती बांधणे हा पर्याय स्वीकारला. 


सुरुवातीला इमारती बांधण्यासाठी आवश्यक असणारी जमीन मुबलकतेने उपलब्ध होती. पण जसजशी वर्षे गेली आणि अधिकाधिक लोक बांधकाम व्यवसायात येऊ लागले तसतशी जमीन दुर्मिळ होत गेली. लोकांनी केवळ इमारती बांधल्या असे नव्हे तर अलिशान बंगले बांधण्यासाठी सुद्धा ह्या जमिनीचा वापर होऊ लागला. जमिनीचे हे दुर्भिक्ष्य एका क्षणी लोकांची नजर ह्या बावखलांकडे जमिनीचा एक संभाव्य स्त्रोत म्हणुन गेली. ही बावखले भराव टाकुन बुजविल्यास इमारतीसाठी जागा उपलब्ध होऊ शकते हे ह्या लोकांनी ताडले. आणि काही जणांनी ह्या मार्गाचा अवलंब केला. 


त्याचसुमारास इतर काही घटना होत गेल्या. 
१> इतर ठिकाणांप्रमाणे वसईत सुद्धा काही प्रमाणात पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवु लागले. परंतु ज्या ज्या ठिकाणी ही बावखले आहेत त्याच्या आसपासच्या विहिरीत मात्र पाण्याची पातळी अगदी कमी पर्जन्यमानाच्या वर्षात सुद्धा बऱ्यापैकी टिकून राहिली. आमच्या पाटील घराण्यात असलेली बावखले हे सुद्धा ह्याचे उदाहरण. 
२> वैचारिकदृष्ट्या समाजाची प्रगल्भता वाढीस लागली. माझ्या वाडवडिलांनी ज्या जमिनीचा वारसा मला दिला तो मला टिकविता आला पाहिजे आणि माझ्या पुढील पिढीस सुद्धा तो मला हस्तांतरित करता आला पाहिजे हा विचार मूळ धरु लागला. 


आणि ह्याचमुळे वसईतील बावखलांविषयी जनतेची जागरुकता आता वाढीस लागली आहे. केवळ बावखले टिकविणे हेच नव्हे तर उन्हाळ्यात त्यातील गाळ काढून ती अधिक खोल करायला हवीत ह्याविषयी सुद्धा चर्चा होऊ लागल्या. मुळगाव येथील कुंभारवाडीतील रहिवाश्यांनी ह्या चर्चेला पुढील रुप देत त्यांच्या गावातील बावखल खोल करण्याचे काम गेल्या आठवड्यात सुरु केले आहे. धीरज वर्तक, प्रशांत म्हात्रे आणि समस्त कुंभारवाडी नागरिकांचे ह्या निमित्ताने अभिनंदन! 

हा नक्कीच स्तुत्य उपक्रम आहे आणि वसई परिसरातील बाकीचे नागरिक ह्यापासून प्रेरणा घेत आपली बावखले टिकवतील आणि पावसाळा सुरु होण्याआधी स्वच्छ / खोल करतील अशी आपण आशा आणि त्यासोबत कृतीही करूयात!


कुंभारवाडीतील ह्या उपक्रमाला खारीचा वाटा म्हणुन न्यु इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी संघातर्फे काल प्रतीकात्मक श्रमदान करण्यात आलं त्याचे हे छायाचित्र!





शेवटी जाता जाता वसईतील जी पिढी आता तिशीच्या पलीकडे आहे त्यांच्या भावनिक आठवणी सुद्धा ह्या बावखलांशी जोडल्या गेल्या आहेत. त्या विषयीची ही एक जुनी पोस्ट!

http://nes1988.blogspot.in/2010/07/blog-post_16.html 
 

मंगळवार, १० मे, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ८ - ९


खरंतर प्रत्यक्षातील ही सहल आटोपून ४० दिवस होतं आले. पण ह्या शृंखलेच्या माध्यमातुन ही सहल पुन्हा एकदा अनुभवली. आज शेवटच्या ह्या दोन्ही दिवसांचं एकत्रित वर्णन ह्या भागात करतोय!

जिम कॉर्बेटचे वर्णन लिहिताना तिथल्या कडीपत्याचे वर्णन करायचं राहुन गेलं. जीपच्या आजुबाजूला बागडणाऱ्या ह्या कडीपत्याची चव घेण्याचा मोह आम्हांला आवरत नव्हता. पण नियमानुसार जीपमधुन बाहेर उतरून ह्याचे पान तोडण्याची परवानगी नव्हती. जणु काही तीन तासात केवळ डरकाळी ऐकवणारा वाघ आमचं एक पाऊल जीपबाहेर पडताच एक दमदार उडी मारुन आम्हांला घेऊन जाणार होता. पण प्राजक्ताबाईंचे धावत्या जीपमधुन ह्या कडीपत्त्याचे पान काढण्याचे अथक प्रयत्न ह्या जीपवाल्याच्याने पाहवले नाहीत आणि मग त्याने एका कडीपत्त्याच्या झाडाजवळ जीप थांबविली. ह्या कडीपत्त्याची चव स्वर्गीय होती. नंतर एका थांब्याच्या वेळी आम्ही ह्या कडीपत्त्याची अनेक पाने तोडून घेतली. गेल्या महिन्याभरात मी बहुदा "सात्विक गलका भाजी विथ सात्विक जिम कोर्बेट कडीपत्ता" किंवा "सात्विक दुधी विथ सात्विक जिम कोर्बेट कडीपत्ता"अशा दीर्घायुष्याची किल्ली असणाऱ्या भाज्या माझ्या अजाणतेपणी खाल्ल्या असणार

कोर्बेट टस्करमधील अतिरुचकर नाष्ट्याचा आजचा हा शेवटचा दिवस! जड अंतःकरणाने आम्ही ह्या सुंदर हॉटेलचा निरोप घेतला. ह्या हॉटेलच्या परिसरातील ही काही अजुन छायाचित्रे!





हे कालच्या नेचर वॉकमधील पुलाचे छायाचित्र!

 

पुन्हा कोर्बेटच्या परिसरातील छायाचित्रण!










 
सहलीतील सर्व महत्त्वाची स्थळे पाहुन झाली होती. आता उरला होता तो दिल्लीचा लांबलचक प्रवास, किंगडम ऑफ ड्रीम्सला भेट आणि मग मुंबईकडे परतीचा प्रवास! बसमधील मूड काहीसा उदास होता. अनुभवी सचिनने हे लगेचच ताडलं. आणि त्याला थोडासा आग्रह करताच त्यानं आपल्याजवळील अनेक मनोरंजक कहाण्यांतील दोन मजेशीर कहाण्या सांगुन आमचा मुड परत हलकाफुलका केला. ह्यात "लगेज आलं का" ह्या चौकशीला " हा हा मी लगेच आलो" असे  उत्तर देणाऱ्या पाहुण्याची गोष्ट होती. आणि आपल्याला जेवणात सुरमईच हवी असा अगदी पहिल्या दिवसापासुन हट्ट धरुन बसलेल्या काकांची सुद्धा गोष्ट होती

बसने मग डिझेल भरण्यासाठी थांबा घेतला. १५०० रुपयाचे ५०.०८ ह्या दराने २९ लिटर पेट्रोल भरले अशी माझ्याकडे नोंद आहे. बस थोडी पुढे निघते तोच तिच्यात काही बिघाड झाला. तापमान पाईप (Temperature Pipe) मध्ये हा बिघाड झाला असे तज्ञ मंडळीनी सांगितलं. ह्या पाईपच्या दुरुस्तीत गुंतलेली ड्रायव्हर आणि त्याची सहकारी मंडळी! बरेचसं कुलंट आणि पाणी पिऊन मग एकदाचा हा बिघाड दूर करण्यात मंडळींना यश आलं. ही सर्व माहिती अर्थात तज्ञ मंडळीच्या सांगण्यावरून



एकीकडे बसबिघाड दुरुस्त केला जात होता तर मागच्या बाजुला हे बगळेमहाराज शांतपणे भटकत होते.

इथं एक निलगिरीचे झाड होते. आम्ही प्रत्येक ठिकाणची आठवण म्हणुन काय घेऊ ह्याचा बेत नसतो. ह्या थांब्याची आठवण म्हणुन आम्ही ह्या निलगिरी झाडाची पाने घेतली. ह्या गावाचं नाव बहुदा काशीपुर हे होतं

पुन्हा एकदा बस मार्गी लागली. ९:४२ ला दिल्ली २१० किमी दूर आणि ९:५३ ला दिल्ली १९५ किमी दूर अशी माझ्याकडे नोंद आहे. मोरादाबाद भाग साधारणतः ११ च्या सुमारास आला आणि आम्ही मग चहाचा थांबा घेतला


एकंदरीत प्रवास अगदी रुक्ष भागातुन चालला होता. नितीन भिसे ह्यांनी ह्याच सुमारास आमच्या बसमधील सर्व प्रवाशांच्या whatsapp ग्रुपची स्थापना केली


त्यातच अनियोजित , बेदरकार कारखाने प्रदूषणात भयंकर भर घालीत होते.


 मग लगेचच जेवणाचा थांबा आला. बिकानेरवाल्याकडील जेवण चांगलं होतं. पण सकाळचा जड नाश्ता अजुनही आपल्या अस्तित्वाची जाणीव करुन देत असल्याने काहीसं हलकंच जेवण घेऊन आम्ही उठलो

 

बसमध्ये आम्ही परतताच ठाकुरबाई पुढे आल्या. त्यांच्या तोंडावरुन आनंद ओसंडून वाहत असला तरी त्या काहीशा भावनाविवश झाल्या होत्या. प्रस्तावनेस फारसा वेळ न लावता त्यांनी आपली गोड बातमी सर्वांना सांगितली. त्या आणि प्रकाशजी ठाकूर आदल्या दिवशी म्हणजे ३१ मार्चला आजोबाआजी झाले होते. त्यांच्या पुत्रास कन्यारत्नाची प्राप्ती झाली होती. आपल्या नातीच्या आगमनाचा आनंद जसा होता त्याचबरोबर आपण ह्या वेळी तिथं प्रत्यक्ष नाही आहोत ह्याची खंत त्यांना होती. त्यांनी आमचे सर्वांचे मिठाई देऊन तोंड गोड केलं.


बसमधील वातावरण आता काहीसं भावुक बनलं होतं. हळुहळू गप्पांचा ओघ प्रत्येकाच्या लग्नाच्या कहाणींकडे आणि त्यानंतर लग्नानंतरच्या सुरुवातीच्या दिवसांकडे वळला. एक ग्रुप म्हणुन आम्ही नक्कीच एकरुप झालो होतो.


सपाट प्रदेशातून सुसाट धावणारी आमची बस तीनच्या सुमारास दिल्लीत पोहोचली. गेल्या शुक्रवारी प्रथम दिसलेला वकिलातींचा भाग पुन्हा दिसला. मग मान्यवरांचे बंगले दिसले. साडेतीनच्या सुमारास आम्ही मग दिल्ली विमानतळ भाग पार करुन गुरुगावच्या दिशेने निघालो ते किंगडम ऑफ ड्रीम्सला भेट देण्यासाठी!

हे किंगडम ऑफ ड्रीम्स एक आकर्षक केंद्र आहे. पण मला तर हा दिखाऊपणाचा कारभार वाटला. ही सहल निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याची होती. ती सर्व ठिकाणे पाहुन झाली होती आणि आता हे कृत्रिमपणाचे उच्चतम माप असणारं हे ठिकाणं ह्या सहलीत समाविष्ट करण्याची गरज नव्हती असे माझं स्पष्ट मत


इथली प्रवेश कुपन आणि आतील अल्पोपहार केंद्रात वापरण्याची कुपने ह्यांचे स्पष्टीकरण करण्यात सचिन आणि मंडळींनी बर्यापैकी मेहनत घेतली. ह्या किंगडम ऑफ ड्रीम्सची ही काही छायाचित्रे! इथं भारतातील विविध शहरातील काही विशेष आकर्षणांची प्रतिकृती बनविण्यात आली होती.










दिलेल्या कुपनात महत्तम फायदा कसा घ्यायचा ह्यावर सोहम आणि श्रीया ह्यांनी बरीच मेहनत घेतली. आणि मग सातच्या आसपास सुरु झाला तो झुमरूचा शो! हा अगदी सुमार पात्रतेचा गायक जो आपल्या नायिकेला प्रभावित करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब करीत असतो पण त्याला तसे अपयश येत असते. मग अशा वेळी स्वर्गीय किशोरकुमार त्याच्या मदतीला धावून येतो. आणि त्याच्या मदतीने झुमरू राष्ट्रीय पातळीवरील गायन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंत येतो. परंतु त्यावेळी किशोर काही कारणास्तव उपलब्ध नसतो आणि त्यामुळे झुमरुचे पितळ उघडे पडणार असतं. झुमरू स्वतः आपल्या ह्या सत्यकथेची कबुली देतो आणि अर्थात शेवटी नायिका त्याला मिळते. ह्या शो मधील हवेत मुक्त संचार करणारे हिरो हिरोईन पाहुन मला सोहमच्या शाळेतील वार्षिक दिनाच्या दिवशी केल्या जाणाऱ्या करामतीची आठवण झाली. ह्या शो मधील किशोरची गाणी अप्रतिम!

त्या नंतर आमचं रात्रीचं भोजन झालं ते लखनौ उपहारगृहात! इथं गाणारा गायक आमच्या फर्माईशीवर गाणी गात होता. ह्यात ओ लाल मेरी वगैरे गाण्याचा समावेश होता. जेवण यथातथाहोते.





बाहेर आल्यावरचे हे दृश्य!




परतीला निघण्याआधी आम्ही आमच्या ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदारांना एक सदिच्छा भेट देऊन आमच्या मनातील त्यांच्या प्रती असलेल्या कृतज्ञतेला मूर्त रूप प्राप्त करुन दिलं

झुमरूच्या शो मधील मध्यंतराच्या वेळेचे हे एक छायाचित्र !!
 

पावणे बारा वाजता हॉटेलात आगमन! आधी पूर्वसुचना दिल्याप्रमाणे हे फारसं काही ठीक हॉटेल नव्हतं.  

दिवस ९ 

आजची सकाळ अगदी शांत शांत  होती. आज सकाळी उठुन कुठं घाईघाईत जायचं नव्हतं. सवडीने आन्हिक आटपुन आम्ही नाश्त्याला आलो. तिथं मग एक छोटेखानी बक्षीस समारंभ करण्यात आला. आम्हांला बाबा आमटे आणि अजून एक अशी दोन पुस्तके बक्षिसे मिळाली



जेवणानंतर आम्ही सर्व काहीसे भावुक झालो. ह्या सहलीतला वीणा बस मधुन शेवटचा प्रवास विमानतळापर्यंत करण्यासाठी आम्ही सज्ज झालो होतो. आम्ही आपापल्या  जाणार होतो पण "द शो मस्ट गो ऑन" ह्या उक्तीनुसार सचिन, विक्रांत आणि आतीष मात्र आता दुसऱ्या ग्रुपच्या आगमनासाठी सज्ज असणार होते! आम्ही सर्वांनी विमानतळावर सचिन, विक्रांत आणि आतीष ह्यांचा भावपुर्ण निरोप घेतला! आमच्या सर्वांची अगदी छोट्या मोठ्या गोष्टीत काळजी घेणाऱ्या सचिन, विक्रांत आणि आतीष ह्यांचं पुन्हा एकदा मनापासुन आभार!

आम्ही २ वाजता चेकइन केलं. विमान ४ चे  होते
पण विमानाला उशीर झाला. विमानात एक तास बसुन काढण्यात आमच्या सहनशीलतेची परीक्षा पाहण्यात आली. विमानात टेक्निकल snag बहुदा वातानुकुलीत यंत्रणेत  दोष होता. माझ्या समोरच्या सीटवर एक चिटुकली होती. ती हळूच माझ्याकडे पाहत होती. का कोणास ठाऊक पण बाकीच्या ग्रुप पेक्षा आम्हांला अगदी वेगळ्या सीट्स देण्यात आल्या होत्या. त्यामुळे हा एक तास अधिकच कठीण झाला. शेवटी एकदाचे पाच वाजता विमान निघालं!





मुंबई विमानतळाच्या आसपास आल्यावर विमानाला थोड्याफार घिरट्या घालाव्या लागल्या. त्यावेळी सुर्यास्ताची वेळ झाली होती. त्यावेळचे हे नयनरम्य चित्र!

 
मुंबई विमानतळावर ३ विमाने एकत्र उतरल्याने थोडी गर्दी  झाली होती. पण थोड्या वेळातच सर्वांना आपापल्या बॅग्स मिळाल्या. सर्वांनी आपल्या Tab / मेरू Cabs पकडून एकमेकांचा भावपुर्ण निरोप घेतला.

एक संस्मरणीय असा हा प्रवास! प्रवासवर्णनाच्या ह्या शृंखलेने तर अधिकच संस्मरणीय झालेला! ही शृंखला अनेक जणांना आवडली आणि प्रत्यक्ष आपला अभिप्राय कळविलात त्याबद्दल मनःपुर्वक धन्यवाद!  

सध्या आमच्या कुटुंबियांसोबत (एकूण २२ जण) कोकणात आलो आहोत. बघायला गेलं तर गेल्या काही वर्षात केलेल्या प्रवासाची तीन प्रकारात वर्गवारी करता येईल

१> २०१ ची केरळ सहल - फक्त तिघांचा. ह्यात उत्तमोत्तम हॉटेल्स आणि कार आरक्षित करून प्रवास करायचा. ह्यात कसं जीवाच्या मर्जीने राहता येतं. स्थळदर्शनाला मुख्य प्राधान्य द्यायचं किंवा नाही हे आपल्यावर अवलंबुन असतं. हॉटेल्सचा आणि त्यांच्या भव्य परिसराचा आनंद घेण्यात सुद्धा आपण वेळ घालवु शकतो. हॉटेल्सचा मेनु हा आपल्या मनाजोगता नसला तरी तक्रार करण्यास फारसा वाव नसतो. दुपारचं जेवण आपल्याला बाहेर कोठेतरी घ्यावे लागते
अशा सहली करण्याआधी आपण ठिकाणी राहणार असु त्या ठिकाणाचा बराच अभ्यास करुन कोणतं ठिकाण बघण्यास चांगलं ह्याचा विचार आधीच करुन ठेवणं आवश्यक! म्हणायला गेलं तर केवळ आपलं कुटुंब सोबत असल्याने सुरक्षितता हा एक मुद्दा विचारात घ्यावा लागतो. उगाचच वाटेल तिथं भटकता येत नाही

२> वीणा वर्ल्ड सोबत शिमला मनाली आणि मसुरी नैनिताल - ह्यात चांगली हॉटेल्स असतात. अगदी सर्वच हॉटेल्स तुम्हांला हवी तशी मिळणार नाहीत. कमी दिवसात अधिकाधिक स्थळदर्शन करायचं असल्याने थोडीफार दमछाक होण्याची शक्यता असते. एखाद्या दिवशी कंटाळा आला तर सकाळी उशिरा उठावे किंवा एक वेळ हॉटेलमध्येच बसुन राहावे हा प्रकार चालण्यासारखा नसतो
प्रत्येक ठिकाणची महत्त्वाची ठिकाणे आपल्याला पाहायला मिळतात. तिन्ही वेळेला अगदी उत्तमोत्तम खाण्यापिण्याची सोय केलेली असते. एकत्र एका ग्रुपमध्ये फिरत असल्याने सुरक्षिततेचा प्रश्न नसतो. प्रवासात अगदी धमाल करता येते. आमच्या नशिबाने आम्हांला दोन्ही वेळेला अगदी मनाजोगते ग्रुप मिळाले.

> एकत्रित कुटुंबाची सहल - सध्या मी कोकणच्या सहलीला आलो आहे ते आमच्या एकत्रित कुटुंबाच्या सहलीला! २२ जणांचा आमचा गट तीन पिढ्यांचा आहे. ह्यात आमच्यासोबत आम्ही आचारी सुद्धा घेऊन आलो आहोत. इथं स्थळदर्शनाला जसं प्राधान्य आहे तसं आपल्या नातेवाईकांसोबत बऱ्याच दिवसांनी फुरसतीचे क्षण घालविण्यालासुद्धा प्राधान्य आहे. आपल्या नेहमीच्या जीवनात आपल्या आत्या, काका ह्यांच्या सोबत आपण फुरसतीच्या गप्पा केव्हा मारल्या होत्या हे आठवायला सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला ताण पडतो. पण ह्या सहलीच्या निमित्ताने ही संधी मिळाली. इथं आचारी सोबत घेऊन फिरत असल्याने स्वयंपाक हा एका विशिष्ट पद्धतीने होण्याची शक्यता जास्त! ही विशिष्ट पद्धत म्हणजे आपल्या घरच्या पद्धतीशी मिळतीजुळती ठेवण्याकडे आपला जास्त कल


११ वर्षाच्या सोहमच्या दृष्टीने हा एक नवीन अनुभव! सध्या तिशी- चाळीशीत असणारे आपण बऱ्यापैकी मध्यमवर्गीय वातावरणात मोठे झालो. साधेपणा हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा पैलू होता. झालंय असं की आपण हे सारं विसरुन जाऊन आपल्या मुलांना मात्र अगदी उच्चभ्रु वातावरणात वाढविण्याचा प्रयत्न करताना दिसतो. परंतु मुलांना साधं आयुष्य म्हणजे काय ह्याची सुद्धा झलक मिळायला हवी असे माझं प्रामाणिक मत! आमच्या कोकणच्या सहलीत काही वेळा ही संधी मिळाली. ज्या ठिकाणी आचाऱ्याना स्वयंपाक करण्याची संधी मिळेल अशीच हॉटेल्स निवडायची असल्याने प्रत्येक वेळी उत्तमोत्तम हॉटेल्स निवडता आली नाहीत. परंतु त्याही परिस्थितीला जुळवून घेता आलं पाहिजे ही शिकवण ह्या निमित्ताने मिळाली. अनुकूल, अथर्व, अनुजा ह्या बालगोपालांच्या आणि संदीपभाईंच्या सहवासात रमलेल्या अनुकूल, अथर्व, अनुजा आणि सोहम ह्या बालगोपालांनी अजिबात हुं की चु केलं नाही. ह्यावरुन आपल्याला मनाजोगती सोबत मिळणं हे भोवतालच्या भौतिक सुखापेक्षा किती श्रेष्ठ ह्याची पुन्हा एकदा जाणीव झाली

मराठी मध्यमवर्गीय लोकांमध्ये प्रवासाची आवड नक्कीच वाढीस लागली आहे. पण आपला एक शब्दप्रयोग मला कधी कधी खटकतो. आमचं काश्मीर, कुलू मनाली झालं वगैरे वगैरे! अरे बाबांनो केवळ एखाद्या ठिकाणाला एक दिवस भेट देऊन ते ठिकाण झालं असं नसतं. अशा प्रत्येक ठिकाणी अनुभवण्यासारख्या किती छोट्या मोठ्या गोष्टी असतात, त्या आपण शोधुन काढायला हव्यात. पण ह्या मध्ये अजुन एक मुद्दा! असला अनुभवण्याचा स्वच्छंदीपणा करण्याची चैन सुद्धा सर्वांना परवडायला हवी! ह्यात चैन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर वेळेचा आणि जबाबदाऱ्यांचा मुद्दा येतो

दिल्ली विमानतळावर विमानाची वाट पाहत असताना सचिन तारकर म्हणाले, "वीणा वर्ल्डने आपल्याला मुख्य ठिकाणं दाखविली, त्या शहराची ओळख आपल्याला करुन दिली. आता आपण ही ठिकाणं अनुभवण्यासाठी स्वतः परत येऊ शकतो!" 

नवीन पिढीतली ही एखादी गोष्ट मनापासुन अनुभवण्याची वृत्ती नक्कीच वाढीस लागल्याचं जाणवतं. वसईचा जवळपास १४ वर्षाने लहान असलेला आणि आता माझा मित्र बनलेला राहुल! ह्याचं एकदा स्टेटस होतं - "जर का फिरणं फुकट असतं तर तुम्हांला मी परत केव्हाच दिसलो नसतो!" मला अगदी मनापासुन त्याचं हे म्हणणं पटलं. आपल्या जीवनाकडे एका तटस्थ पण विशाल वृत्तीने पाहण्याची शक्ती आपल्याला हा प्रवास देतो. ज्या गोष्टींची आपण दैनदिन दिवसात अगदी भयंकर चिंता करत असतो त्या किती क्षुल्लक असु शकतात ह्याची जाणीव हा प्रवास आपल्याला करुन देतं. दैनंदिन दिवसात कदाचित बोअरिंग वाटणारा आपला पार्टनर नक्कीच तसा नाहीयं ह्याची जाणीव करुन देतं हे फिरणं! दोन वर्षापुर्वी बरेचसे लोक केवळ फेसबुकवर आपलं स्टेटस अपडेट करण्यासाठी फिरायला जातात असा माझा समज वाढीस लागला होता तो आता ह्या मागच्या काही प्रवासांनी पार धुळीस मिळवला. जर का तुम्ही लोकांना मुंबईच्या बाहेर काढलंत आणि त्यांच्यासोबत काही फुरसतीचे क्षण / दिवस घालविलेत तर अजुनही तो ७० - ८० चा काळ हृदयाशी जपणारी तुमच्यासारखी अनेक लोक आसपास वावरताहेत ह्याची जाणीव तुम्हांला होते आणि मग बाकीच्या वर्षभरातील मुंबईतील आयुष्यसुद्धा कसं अगदी सुसह्य होऊन जातं

शेवटी गेले काही साप्ताहिक सुट्ट्या मला ह्या पोस्ट्स शांतपणे लिहु देणाऱ्या पत्नी प्राजक्ताचे मनःपुर्वक आभार ! 

हा माणुस फक्त ब्लॉग पोस्ट्स लिहितो का काम वगैरे सुद्धा करतो अशी शंका आपल्या मनात आल्यास ती नक्कीच रास्त शंका आहे. पण मी ऑफिसात काम सुद्धा करतो ह्याविषयी शंका नसावी!  

ही शृंखला आवडली असल्यास प्रतिक्रियेद्वारे जरुर कळवा!
(समाप्त)


आधीच्या भागाच्या लिंक्स

पहिला भाग 
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html  
दुसरा भाग 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_9.html
तिसरा भाग 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_10.html
चौथा भाग 
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_17.html
पाचवा भाग
 http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_20.html
सहावा भाग
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_30.html

सातवा भाग

http://patil2011.blogspot.in/2016/05/blog-post.html


 
 







ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...