मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० एप्रिल, २०१६

वीणा वर्ल्ड - हरिद्वार मसुरी नैनिताल जिम कोर्बेट नॅशनल पार्क - दिवस ६



आज सहावा दिवस ३० मार्च! आदल्या दिवशी रात्रीची एक कहाणी सांगायची राहुन गेली. रात्री नेहमीप्रमाणे सचिन दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम आम्हांला समजावून सांगत होता. त्यात पहिला क्रमांक होता हनुमान मंदिराचा आणि मग झु अर्थात प्राणी संग्रहालयाचा! बोलता बोलता सचिन म्हणाला की ह्या प्राणी संग्रहालयापर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ २ किमी अंतराचा चढणीचा रस्ता आहे. हे ऐकुन आमच्या बसमधील काहीजणांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं. ह्या चढणीवरील झुपेक्षा दुसरा एको केव्स (Eco Caves) चा पर्याय बसमधील काही जणांना पसंद होता. 
ह्यावरून मग एक वैचारिक चर्चासत्र झालं. "ठरलेल्या कार्यक्रमापेक्षा जर वेगळे ठिकाण घ्यायचं असेल तर मला मुख्य ऑफिसातून परवानगी घ्यावी लागेल आणि तुम्हां सर्वांना एक लेखी निवेदन द्यावं लागेल!" नियमाला बांधलेल्या सचिनने आपली भुमिका स्पष्ट केली. 

लेखी निवेदनावर सही तर नैनिताल तलावात ठेकेदाराकडून जबरदस्तीने  ब्रिटीश अधिकाऱ्याने सुद्धा घेतली होती. बहुदा नैनिताल आणि जबरदस्तीने सही घेण्याचा जन्मोजन्मीचा संबंध असावा! परंतु इथं आमची मालमत्ता वगैरे काही पणास लागली नव्हती. त्यामुळे आम्ही बिनधास्त सही सकट लेखी निवेदन देण्याचं मान्य केलं! 

सकाळी सात वाजताच वेक अप कॉल आला. आंघोळीला पाणी सुद्धा तिघांनाही गरमागरम मिळालं. वेक अप कॉल जरी सातचा असला तरी मी साडेपाचच्या आधीच उठुन आंघोळ करुन मोकळा झालो होतो. आंघोळ करुन मग पुन्हा चांगली झोप लागते हा अगदी कॉलेजातील अभ्याससुट्टीपासूनचा अनुभव आहे. 

आज जरी ह्या हॉटेलातून चेकआउट करायचं असलं तरी दुपारचं जेवण इथंच असणार होतं. आणि म्हणुन १०२ १०३ ह्या रुम्स आम्हांला ताजेतवाने (फ्रेश) होण्यासाठी राखुन ठेवण्यात आल्या होत्या. सकाळच्या नाष्ट्यामध्ये बोंडा हा आपल्या बटाटावड्याचा मामेभाऊ / आत्येभाऊ वगैरे होता. वीणा वर्ल्डचे ह्या बाबतीत कौतुक करावं तितकं थोडं! सिमला मनाली, उत्तराखंड ह्या सर्व भागातील हॉटेलातील खानसाम्यांना त्यांनी सर्व मराठी पदार्थ कसे बनवायचे ह्याचे सुयोग्य प्रशिक्षण देऊन ठेवलं आहे. पुर्वीच्या मराठी लढवय्यांनी उत्तरेवर कब्जा केला हल्ली आपल्या प्रवाशी कंपन्यांनी त्याचा कित्ता गिरवला आहे असे म्हणावे लागेल. 

सकाळ झाली तरी सचिन मात्र रात्रीच्या प्रकरणाने जरा जोरातच होता. तशातच आता ग्रुप फोटोची वेळ झाली. दोन्ही बसच्या सर्व मंडळींना एका विशिष्ट निकषानुसार ठराविक क्रमांकाने उभं करुन त्यांचा ग्रुप फोटो काढुन मग त्याची एकेक प्रत सर्व मंडळींना सहलीच्या शेवटच्या दिवशी देण्याची वीणा वर्ल्डची एक चांगली प्रथा आहे. ह्यातील विशिष्ट निकष कोणता ह्याविषयी तसा मी साशंक आहे. बहुदा उंची असावा तर नवऱ्याबायकोची उंची वेगवेगळी असु शकते. आणि जर वयानुसार असावा तर मला आणि प्राजक्ताला पाहुन वीणा वर्ल्डचे बहुदा सर्व टूर मॅनेजर बुचकळ्यात पडणार ह्याविषयी शंका नाही! असो काहीशा प्रयत्नानंतर ग्रुप फोटोचे प्रकरण पार पडलं. ह्या हेरीटेज हॉटेलच्या बाह्य भागाचा हा फोटो!



आता वेळ होती ती हनुमान मंदिराला भेट देण्याची. काल ज्या तिबेटी मार्केटला भेट दिली तिथुनच पण वेगळ्या मार्गाने जाणारा हा रस्ता होता. पुन्हा आठ सीटर जीप होती. दुसऱ्या बसमधील त्या स्त्रिया आताशा सोहम आणि श्रीयाकडे लक्ष ठेऊन असत. ह्या जोडगोळीचे लक्ष ज्या जीपवर केंद्रित होत असे त्या जीपच्या बरोबर उलट्या दिशेने ती मंडळी जात. 

हनुमान मंदिराचा परिसर अगदी प्रसन्न होता. मंदिराच्या आतील भागात छायाचित्रणास परवानगी नाही. त्यामुळे आतील सौंदर्य मी आपणास फोटोच्या माध्यमातुन दाखवू शकत नाही. पण ह्या मंदिराच्या आतील भागातील स्वच्छता वाखाणण्याजोगी होती. हनुमान मंदिरातील प्रसाद उत्तम होता. इथं मुख्य मंदिर हनुमानाचे असले तरी बाकीची सुद्धा काही मंदिरे होती. आणि प्रत्येक मंदिराकडे जाण्यासाठी विशिष्ट अंतर चालुन जावं लागत होतं. आणि ह्या चालण्याच्या मार्गात बरीच उंच झाडी होती. अशाच दोन मंदिरातील चालण्याच्या मार्गाच्या दरम्यान अचानक दोन महिला सदस्यांवर माकडांनी हल्लाबोल करुन त्यांच्या हातातील प्लास्टिक पिशवी हिसकावुन घेतली. त्यामुळे काही काळ मग सर्व सदस्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. ह्या प्रसंगी सचिन तारकर ह्यांनी माकडांनी पळविलेल्या त्यांच्या चष्म्याची कहाणी सांगितली. शेंगदाण्याची पुडी देऊन मग ह्या माकडाकडून हा चष्मा परत मिळविता येतो असे त्यांनी सांगितलं.






ह्यापुढील आकर्षण होतं ते एको गुहा गार्डनचे! हे ठिकाण सुखाताल किंवा मल्लीताल इथं वसलेलं आहे. इथली प्रवेश फी प्रति माणशी चाळीस रुपये आहे. ह्या गुहांना वाघ गुहा, कोल्हा गुहा, वटवाघुळ, साळींदर गुहा अशी नावे होती.




पहिल्याच गुहेत प्रवेश केल्यावर अगदी थंड हवेने आमचं स्वागत केलं. आतमध्ये बऱ्यापैकी अंधार होता. आणि विद्युतदिवे लावून उजेडाची व्यवस्था करण्यात आली होती. ह्यातील काही भाग अगदीच निमुळता होता. मध्ये खाली वाकुन तर केव्हा चक्क बसुन आजुबाजूच्या दगडांना टाळावे लागत होते. पण सर्व मंडळी मात्र मस्तपैकी ह्या वातावरणाचा आनंद घेत होती.



















मध्येच एक खोटा खोटा वाघोबा दिसला. बालमंडळीनी त्यावर बसुन आपले फोटो काढुन घेतले. 




सचिन तारकर ह्यांना ह्या गुहेत खुप धमाल वाटू लागली होती आणि ते उत्स्फुर्तपणे फोटोसाठी सज्ज होत होते. गुहेमधला सचिन अगदी एन्जॉय करीत होता आणि गुहेवर उभा असलेला सचिन मात्र अजुनही काहीशा गुश्श्यातच असावा ! :)


अचानक बस क्रमांक दोन मधील आजोबांना आपली सहचारिणी गायब असल्याची जाणीव झाली. "ती ह्या गुहेत गेली आणि बाहेर आलीच नाही" असे विधान त्यांनी केलं. त्यामुळे तंबुत नव्हे गुहेत / गुहेबाहेर भितीचे वातावरण पसरलं. आमची अशाच एका गुहेत आगेकुच सुरु असताना आतिश समोरुन प्रकटला. हा अचानक उलट्या दिशेने कसा आला हे आम्हांला समजेना! तो आजीबाईंच्या शोधात आला होता हे आम्हांला नंतर समजलं. ह्या आजीबाई कोणत्या गुहेत शिरल्याच नव्हत्या. त्या नंतर मग आजोबांना सापडल्या! 


"So मंडळी" सचिन एव्हाना थोडाफार शांत झाला होता. मग आम्हांला फ्रुटी सुद्धा वगैरे देऊन शांत करण्यात आलं. परत आम्ही आमच्या त्या सुप्रसिद्ध हेरीटेज हॉटेलात आलो. आजचा पालक चिकन, खिचडी आणि स्ट्रॉबेरी आईसक्रीम असा होता. श्रीयाचा रिझर्ल्ट लागला होता आणि ती चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली होती. 

आता वेळ होती ती सहलीचे मुख्य आकर्षण असलेल्या जिम कॉर्बेट नॅशनल पार्कसाठी प्रस्थान करण्याची!जेवण आटोपून जडावलेल्या देहाने पुन्हा आम्ही बसमध्ये येऊन बसलो. आम्हांला सोडून बस क्रमांक २ कडे गेलेला आमचा ड्रायव्हर परतला. आणि सर्वांना खास करुन महिला मंडळाला आनंद झाला. "आप हमें छोड के वो बस में क्यु गये?" अशा खास मराठीप्रभावित हिंदी भाषेमध्ये त्यांनी त्याचे स्वागत केलं. गोंधळला बिचारा! पुढे एक तासभर उगाच अधुनमधून ब्रेक मारीत राहिला तो असं मला उगीचच वाटत राहिलं

आता पुन्हा चौतीस किमी अंतराचा उतरणीचा रस्ता होता. निसर्गरम्य नैनिताल सोडताना मनातुन थोडे दुःख होत होते. बसमध्ये सत्तर ऐंशीच्या सुमारातील गाणी लावण्यात आली होती. "ये आपने क्या कह दिया के होने लगा दिल में कुछ कुछ!" हे लहानपणी ऐकलेलं गाणं बऱ्याच काळानंतर ऐकायला मिळालं. भारताचा इंटरनेटच्या विळख्यात न सापडलेला भाग अजुनही आपलं जुनेपण टिकवुन आहे हे खरं

मनात विचारांचं द्वंद्व चालु होतं. असंच मनसोक्त फिरत राहायचं सर्व काही बंधनं सोडुन देत एक मन सांगत होतं. तर आता मस्तपैकी भटकलास आता नव्या जोमानं ऑफिसच्या कामाला लाग! दुसरं मन वास्तवाकडे खेचत होतं

वाटेत विविध प्रकारचे वृक्ष दिसत होते. अशा विशाल वृक्षांना पाहुन मन कसं प्रसन्न होतं!









उतरणीचा रस्ता असल्यानं हे जवळपास ३४ किमीचे अंतर लगेचच कापलं गेलं. आणि मग आलं ते जिम कॉर्बेट म्युझियम! जिम कॉर्बेट ह्यांच्या शिकारीच्या कथा आपण अगदी लहानपणापासुन वाचत / ऐकत आलो आहोत. त्यांच्या जीवनाविषयी सुरेख माहिती ह्या म्युझियममध्ये मिळते. 









जिम कॉर्बेट ह्यांच्या आईचा प्रथम विवाह डॉयल नावाच्या सेनाधिकाऱ्यासोबत झाला होता. १८५८ साली डॉयल ह्यांचा युद्धात मृत्यू झाल्यावर मेरी ह्या आपल्या तीन मुलांसोबत मसुरी इथे आल्या. जिथे त्यांचा परिचय क्रिस्तोफर कॉर्बेट ह्यांच्याशी झाला. आणि मग त्यांचा पुनर्विवाह १८५९ साली झाला. क्रिस्तोफर कॉर्बेटसोबत त्या राहण्यास नैनिताल इथे आल्या. ह्या जोडप्याचे जिम कॉर्बेट हे एकंदरीत आठवे अपत्य. एकंदरीत म्हणजे त्या दोघांच्या आधीच्या लग्नातील अपत्यांची संख्या मिळून! जिम कॉर्बेट ह्यांचा जन्म २५ जुलै १८७५ साली नैनिताल इथं झाला. त्यांनी सुरुवातीला वयाच्या १७ व्या वर्षी रेल्वे मध्ये नोकरीस सुरुवात केली. त्यांनी रेल्वेमध्ये केलेल्या विविध भूमिकांची माहिती खालील फोटोत मिळेल. त्यातील एका भूमिकेत ते मीटर आणि ब्रॉड गेज मधील सामानांच्या हस्तांतरणाच्या वेळी देखरेखीची भूमिका बजावत असा उल्लेख आढळतो. 



पहिल्या जागतिक युद्धात जिम कॉर्बेट ह्यांनी कप्तानाच्या भुमिकेत सैन्यात प्रवेश केला. प्रथम कुमानी आणि त्यानंतर फ्रान्स ह्या ठिकाणी त्यांनी महायुद्धात मोलाची भुमिका बजावली. आणि त्यामुळेच ह्या महायुद्धानंतर त्यांना मेजर हे पद बहाल करण्यात आलं. त्यांचे सैन्याशी असलेले संबंध प्रथम महायुद्धानंतर सुद्धा कायम राहिले. दुसऱ्या महायुद्धात १९४४ साली जंगलयुद्धात सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी म्हणुन त्यांची नेमणुक करण्यात आली. 


जिम कॉर्बेट हे जरी आपल्याला बहुतांशी एक शिकारी, लेखक म्हणुन माहित असले तरी ते एक उत्तम छायाचित्रकार सुद्धा होते. त्यांनी सिने कॅमेराचा वापर करुन वन्यजीवनाचे उत्तम चलतचित्रण केलं होतं आणि त्याचा उपयोग करुन त्यांनी लोकांना वन्य जीवनाची अधिक माहिती सुद्धा दिली असा उल्लेख आढळतो.








जिम कॉर्बेट ह्यांच्या विविध शिकारीचे हे फोटो!

बहुदा जिम कॉर्बेट वास्तव्य करीत असलेल्या घरातील त्यांची बैठकीची साधने!



जिम कॉर्बेट ह्यांनी शिकार केलेल्या वाघांची सालानुसार नावे आणि त्या वाघांनी ठार केलेल्या मनुष्यांची आकडेवारी देणारं हे छायाचित्र!


वाघांचं माहात्म्य सांगणारं जिम कॉर्बेट ह्यांचं हे एक वचन!



एका महान व्यक्तिमत्वाच्या स्मारकाला भेट देऊन समाधानी मनाने आम्ही बाहेर पडलो. आज चहा कॉफी सोबत शिकंजीचा पर्याय उपलब्ध होता. बऱ्याच उत्साही मंडळींनी हा नवीन पर्याय स्वीकारला. विक्रांत हा जातीने ही शिकंजी कशी बनविली जात आहे ह्यावर लक्ष ठेवुन होता. ह्या शिकंजीविषयी एकंदरीत सकारात्मक मत आढळलं. ह्याच्या बाजुला एक पेरुवाला होता. त्याचे पेरु अगदी मस्त वाटत होते. 




आता आम्ही बसमध्ये बसलो होतो ते थेट जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये उतरण्यासाठी! ९१.९ ह्या नवीन रेडिओ स्टेशनवर ज्या प्रमाणे सतत गडबड चालु असते की ' अब तुम्हारे और तुम्हारे फेवरीट सिने स्टार के बीच में कोई नही होगा!' तसंच आमच्या आणि वाघाच्या मध्ये आता कोणीच असणार नव्हतं! अगदी जगातील प्रत्येक समस्येवर उत्तर असणारे सचिन, विक्रांत आणि आतिष सुद्धा! रस्त्याच्या दोन्ही बाजुला विस्तीर्ण शेतं होती.


थोड्या वेळातच आमचं हॉटेल कॉर्बेट टस्कर ट्रेलच्या भव्य परिसरात आमचं आगमन झालं. निर्विवादपणे आमच्या वास्तव्यातील हे सर्वात सुरेख हॉटेल होतं. ह्याचा परिसर अतिशय भव्य होता. स्विमिंग पूलची सोय होती.  

पोहोचताच आमचं चहा बिस्किटांनी आमचं स्वागत करण्यात आलं


खेळण्यासाठी मैदान होतं. ह्या मैदानावर आम्हांला विक्रांत कुंभार ह्यांच्या ताशी १४३.५ किमी वेगाच्या गोलंदाजीचा मुकाबला करण्याचं भाग्य लाभलं! 





आमच्या निवासी खोल्यांच्या भोवताली गच्च झाडी होती आणि विविध प्रकारची फुलझाडेसुद्धा होती.

ह्या हॉटेलच्या परिसराचा हा नयनरम्य नजारा!

ह्या बागेतील हे छोटेसे आंब्याचे झाड! त्याला आलेला मोहोर पाहुन मी मनोमनी अचंबा व्यक्त केला.

 स्वागतकक्ष आणि आमच्या वास्तव्याच्या खोल्या ह्यामध्ये बऱ्यापैकी अंतर होतं. मध्ये मोकळं मैदान होतं. त्यातच ताशी ०.१ किमी ह्या वेगाने आमच्या बॅग्स आमच्या खोलीच्या दिशेने येत होत्या. त्यामुळे अस्वस्थ मंडळी खाली उतरून स्वतः बॅग्सचा ताबा घेण्यासाठी पुढे सरसावली होती. सर्वांना आपलं सामान मिळालं आणि मंडळी तरण तलावात आपलं कौशल्य प्रदर्शनासाठी सज्ज जाहली. मी लहानपणी कसाबसा पोहायला शिकलो होतो. आणि त्यानंतर अमेरिकेच्या वास्तव्यात फिनिक्सला कधीकाळी पोहलो अशीन. त्यामुळे इतक्या वर्षाच्या अंतराळानंतर मी पोहोण्याचे सार्वजनिक ठिकाणी धाडस करण्यास धजावत नाही. मी तरणतलावाला टाळून आजुबाजूचे खेळ खेळत होतो. पण मंडळीचे लक्ष माझ्याकडे गेलेच. "पाटील पाटील अहो कोठे जातायत! या की पोहायला!" मंडळीच्या ह्या हाकेला "हा हा आलोच मी!" असे सांगुन तिथुन काढता पाय घेतला. आमचे सहप्रवासी प्रकाशजी ठाकुर ह्यांच्या सौजन्याने तरणतलावात घेतलेले हे छायाचित्र! 


बाकी ह्या ठिकाणी एक मजेदार प्रसंग घडला. बस क्रमांक दोन मधील महिला वर्ग साड्यांसहित पाय ओले करुन घेण्यासाठी तरणतलावात उतरला आणि मग त्या थंड पाण्याच्या स्पर्शाने प्रफ्फुलित होऊन त्यांनी एक छोटासा उत्स्फुर्त नाच केला. ह्या हॉटेलची जी काही मार्गदर्शक तत्वे होती ती पुर्णपणे धाब्यावर बसविण्यात आली होती! 

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे जिम कॉर्बेट उद्यानाची सफारी होती. त्यामुळे आम्ही अगदी उत्साहित झालो होतो. आम्हां सर्वांना सचिन आणि मंडळींनी साडेआठ वाजता ह्या हॉटेलच्या प्रशस्त हॉलमध्ये बोलाविले होते. प्रथम तिथं दोन तीन मजेदार खेळ खेळण्यात आले. ह्या खेळांची सविस्तर माहिती देऊन मी संभाव्य पर्यटकांची उत्सुकता कमी करणार नाही. पण तुम्हांला सातचा पाढा आणि एकक ठिकाणी ७ येणारे आकडे सहजासहजी आठवता आले पाहिजेत.

मी स्वतःला गणितात तज्ञ समजत असलो तरी ह्या इथे मात्र मी सातच्या एका पाढ्यामध्ये टाळी वाजवुन स्वतःला बाद करुन घेतलं. त्यानंतर देवाचे नाव आणि त्यानुसार मुद्रा असा काहीसा खेळ होता. अशा खेळात तर मी ढ आहे. त्यामुळे पहिल्या संधीत बाद झाल्याने मी धन्य झालो. प्राजक्ताने मात्र ह्या खेळात पहिल्या दोघांत स्थान मिळवत बक्षीस प्राप्त केलं. रिलायंस मध्ये काम करणाऱ्या आरतीने ह्या दोन्ही खेळात बक्षीस प्राप्त केलं. तिसरा खेळ कच्चा पापड पक्का पापड ह्या धर्तीवर न अडखळता बरेच शब्द बोलण्याचा होता. ह्यात मात्र आश्चर्यकारकरित्या मला पहिल्या दोघांत स्थान मिळालं. अशा प्रकारे बऱ्याच दिवसांनी एका स्पर्धेत बक्षीस मिळविण्याचे भाग्य मला लाभलं.






आता खेळ संपला आता लवकर जेवुन सकाळी झोपायला जायला मिळेल ही अंधुक आशा आमच्या कर्तव्यनिष्ठ सचिनने धुळीस मिळविली. जिम कॉर्बेटउद्यानात सकाळी साडेपाच वाजता आणि दुपारी अडीच वाजता एकंदरीत सहा ठिकाणांहून प्रत्येकी तीस जीप निघतात. प्रत्येक जीपमध्ये सहा प्रवाशी, एक मार्गदर्शक आणि अर्थात एक चालक असतो. ह्यातील एकाला लीडर बनावं लागतं. आपली ओळखपत्रे जवळ बाळगा. ओळखपत्राच्या अभावी काही जणांच्या जीपला परत यावं लागण्याची उदाहरणे आहेत आणि त्याची जबाबदारी सर्वस्वी तुमची असेल असा इशाराही त्यांने दिला. बहुदा हे कागदपत्र तपासणारे अधिकारी अमेरिकेच्या इमिग्रेशन विभागात प्रशिक्षण घेऊन कोर्बेटला पाठविलेले असावेत.

पोटात कावळे ओरडत होते आणि सचिनमहाराज तन्मयतेने आपले माहिती सत्र चालु ठेवत होते. जंगलात कोअर, बफर आणि पर्यटकांचा असे तीन विभाग असतात. कोअर भागात फक्त वन्य अधिकाऱ्यांना प्रवेश करण्याची मुभा असते. जंगलात सुमारे १८० वाघ आहेत आणि जवळपास ८०००० हरणे आहेत असेही तो म्हणाला. त्यामुळे हरीण हे वाघांचे डाळभात खाद्य आहे. तुम्ही वन्य प्राण्यांचे लक्ष वेधुन घेईल असे भडक रंगांचे कपडे घालु नका. पण वीणा वर्ल्डची पिवळी टोपी चालेल! :) कारण वाघ बहुदा वीणा वर्ल्डच्या मार्गदर्शकांना ओळखत असावेत! मी ऑफिसात काम करतो तिथे सुद्धा एक टीम कोअर नावाचे अप्लिकेशन सांभाळते. त्याची मला ह्या निमित्ताने आठवण झाली. आणि हो तिथे बफर ही संकल्पना सुद्धा डेटासेटच्या संदर्भात वापरली जाते.

वाघाला जर मुलगा वाघ झाला तर वाघीणीला वाघापासून ह्या पुरुष बच्चे मंडळीचे सरंक्षण करावं लागतं. दोन वाघ एका जंगलात राहू शकत नाहीत. वाघ आपल्या सीमा आखण्यासाठी सु सु चा वापर करतात झाडांवर उभ्या रेघोट्या मारतात. एखाद्या वाघाला दुसऱ्या वाघाच्या हद्दीत जाऊन त्याला आव्हान द्यायचं असेल तर मग ह्या उभ्या रेघांवर हा नवीन वाघ आडव्या रेघा पंज्याने मारतो अशी बरीचशी मनोरंजक माहिती त्याने दिली. बहुदा ह्या सर्व वाघांनी सचिनला मार्गदर्शक म्हणुन नेमायला हरकत नाही. शेवटी साधारणतः  सव्वा नऊच्या सुमारास तल्लीन सचिनचे ज्ञानसत्र संपले. तेव्हा कॉर्बेट उद्यानाला भेट न देता सुद्धा आम्ही तज्ञ बनलो होतो. जेवणाला जाण्याआधी बुरांशचा गोड ज्युस आम्हां सर्वांना देण्यात आला.  


आता इथलं जेवणाचा मेनु नक्की आठवत नाही पण इथलं जेवण अगदी रुचकर आणि आरोग्यपूर्ण होतं. आणि इथं बासरीवर एक मस्त गाणं वाजविण्यात आलं. दिव्यांनी उजळलेल्या मैदानातुन आमच्या रुमवर जाऊन सकाळी सव्वाचारला उठण्यासाठी आम्ही सज्ज झालो! 

(क्रमशः)

आधील भाग 
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post.html http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_9.html
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_10.html
http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_17.html   

http://patil2011.blogspot.in/2016/04/blog-post_20.html

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...