RBS च्या बंगलोर शाखेतील निवडीने नीलाच्या अंगात नवीन जोम शिरला होता. मनावर घेतलं तर आपणसुद्धा अगदी स्कॉलर जनतेच्या बरोबरीने अभ्यास करू शकतो हे तिला नव्यानेच जाणवलं होतं. केवळ हेच सिद्ध करायचं होतं की आणखी काही हे मात्र तिला उमगत नव्हतं. सुशांतची सुद्धा तिथंच निवड झाली हे तिला कळलं होतं. अजून काही महिने बाकी असल्याने तिने फारसं दडपण घेतलं नव्हतं.
वरवर पाहिलं तर सुशांतचे आयुष्य अगदी दृष्ट लागण्याइतपत परिपूर्ण होतं. तो महाविद्यालयातील एक टॉपर होता, एक लठ्ठ पगाराची नोकरी त्याने मिळवली होती. बाबा नवनिर्वाचित आमदार होते. लक्ष्मी आणि सरस्वती एकत्र नांदत नाहीत असं म्हणतात खरं; पण सुशांत आणि रावांच्या घरी मात्र ह्या दोघीही सुखाने नांदताना वर वर का होईना पण दिसत होत्या.
हे झालं वरवरचं चित्र! पण मनातून मात्र सुशांत विचलित होता. आमदारकी मिळाल्यावर घरी आता वेगळ्या प्रकारची लोक भेटायला यायला लागली होती. पूर्वी नियमितपणे घरी येणारे साधे सुधे कार्यकर्ते बाबांना भेटायला उत्सुक असायचे पण बहुदा त्यांना भेटण्यासाठी बाबांकडेच वेळ नसायचा. त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही अशी सबब पुढे करणाऱ्या बाबांकडे मात्र मोठ्या उद्योगपतींना भेटण्यासाठी वेळ असायचा. त्यांच्या ह्या बैठकी मात्र बराच वेळ चालायच्या. पूर्वी वर्षातून क्वचितच एखाद दुसऱ्यांदा मदिरासेवन करणारे बाबा आता ह्या श्रीमंती लोकांच्या सहवासात नियमितपणे उंची मद्य प्राशन करू लागले होते. एकदा आईने ह्याबाबतीत त्यांना विचारलं सुद्धा! "हल्ली इतकं टेन्शन येतं कि अधून मधून घ्यावीच लागते!" त्यांचं हे उत्तर त्यांना स्वतःलासुद्धा पटत नसल्याने आईला पटण्याची तर त्यांनी अपेक्षासुद्धा केली नव्हती.
सुशांतला नीला कॉलेजात दिसायची पण भेटायची नाही. दोघांच्याही शाखा वेगवेगळ्या होत्या आणि नेमके वर्ग दोन वेगवेगळ्या मजल्यावर होते. नीलाविषयी सुशांत मनात अगदी गंभीरपणे विचार करीत होता. आपलं तिच्यावर प्रेम वगैरे आहे की नाही हे समजून घेण्याचा त्याचा अट्टाहास नव्हता. त्याला नीला हवी होती पत्नी म्हणून आणि तिथंच त्याचा मोठा संभ्रम होता. ज्या प्रकारे आपल्या घरातील वातावरण बदलत चाललं होतं ते त्याला अजिबात पटत नव्हतं. एक सुसंस्कृत मध्यमवर्गीय घर पूर्णपणे पैशाच्या मागे धावताना दिसत होतं. पैसा कमावणे चुकीचं असं त्याचं केव्हाही म्हणणं नव्हतं पण बाबा ज्या लोकांच्या संगतीत अधिकाधिक वेळ घालवत आहेत ती लोक सरळ मार्गांनी जाणारी नाहीत हे न समजण्याइतका तो आता लहान राहिला नव्हता. एकदा आईकडे त्याने विषय सुद्धा काढला होता. तिलाही हे सारं पटत नव्हतं पण बहुदा बाबांवर श्रेष्ठींकडून निधी गोळा करण्याची जबाबदारी टाकली गेली होती ह्याची कुणकुण तिला लागली होती. बाबांचा बहुदा नाईलाज झाला असावा असं तिचं म्हणणं होतं. सुशांतला तिचं हे म्हणणं काही पटलं नव्हतं.
अशा ह्या बदलत्या घरात नीलाला सून म्हणून आणण्याची त्याची मानसिक तयारी झाली नव्हती. आपण चांगलीशी नोकरी मिळवावी आणि जमलं तर स्वतंत्र घरट उभारायचं इतक्या थराला तो गेला होता. पण नीलाचं वागणं मात्र त्याला गोंधळात टाकायचं. आधी तिने बाबांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता त्यावेळी एका शब्दानेसुद्धा मी ही जबाबदारी घेऊ का असं तिने त्याला विचारलं नव्हतं आणि त्यामुळे तो काहीसा दुखावला गेला होता. तरी पण नंतर अधून मधून जेव्हा नीला त्याला शंका विचारायची तेव्हा तो सुखावला जायचा. प्रत्यक्ष व्यक्त केल्या गेल्या नसल्या तरी एकमेकांविषयीच्या भावनांची त्यांना जाणीव होती. म्हणजे सुशांतला तर नक्कीच होती. पण बहुदा नीलाला त्याने त्या भावनांचं उघडपणे प्रकटीकरण केलेलं आवडलं असतं. आणि तिथंच गाडं अडलं होतं. आणि मग हे RBS प्रकरण उद्भवलं होतं. नीला आणि सुशांत ह्यांची एकत्रपणे निवड झाल्यावर कॉलेजातील टवाळ कंपूला आयताच विषय मिळाला होता. तसं म्हटलं तर सुशांतने त्याच्याकडे दुर्लक्षच केलं असतं पण एके दिवशी नीलाची सुद्धा RBS मध्ये निवड होण्यात रावांचा हात आहे अशी अगदी धादांत अफवा कॉलेजात पसरविण्यात दृष्ट प्रवृत्तींना यश मिळालं होतं. आणि तेव्हापासून तर क्वचितच होणारी नजरभेट आणि लपून दिलेलं हसू सारं काही संपल होतं. आता तर नीला पूर्णपणे अभ्यासात गुंतून गेली होती. अशा वेळी आपल्या भावना तिच्यापर्यंत पोहोचविल्या तर उगाचच ती डिस्टर्ब व्हायला नको म्हणून सुशांत सुद्धा गप्प राहिला होता. हे वर्ष काय बघता बघता निघून जाईल आणि मग त्यानंतर आपण विचारपूर्वक कृती करूयात असंच त्याने ठरवलं होतं.
दारची बेल वाजली तेव्हा नीलाची आई काहीशी आश्चर्यचकित झाली. नीला कॉलेजात गेली होती आणि बाबा ऑफिसात! अशा वेळी घरी कोण येणार अशा विचारातच तिनं दरवाजा उघडला. समोर शलाकाला पाहून तिला आश्चर्यच वाटलं. "हिला आज कॉलेज वगैरे कसं नाही!" अशा विचारातच त्यांनी तिचं स्वागत केलं. "ये ना शलाका! आज किती दिवसांनी येतेस तू!" त्यांनी शलाकाला म्हटलं. शलाका हॉलमध्ये खुर्चीवर बसली. "आज माझं किनई माझ्या चुलत मावशीकडे काम होतं म्हणून मी आज दांडी मारली कॉलेजला!" नीलाच्या आईची साशंक नजर चुकवायचा प्रयत्न करीत शलाका बोलत होती. "हो का! सहजच काम निघालं वाटतं मावशीकडे !" आई म्हणाली. शलाकाने एक दीर्घ श्वास घेतला. "मावशी, मला खास तुमच्याशीच बोलायचं होतं! म्हणून कॉलेजात न जाता मी थेट आज इथे आले!" शलाकाने थेट मुद्द्यालाच हात घातला.
पुढील जवळजवळ दीड तासभर दोघी बोलत होत्या, नीला आणि सुशांतबद्दल! नीलाला सुशांत मनापासून आवडला आहे हे तिच्या प्रत्येक कृतीतून शलाकाने गेलं वर्षभर पाहिलं होतं. पण आता ज्या प्रकारे रावांचे शत्रू जिथे संधी मिळेल तिथे ह्या दोघांना त्रास देण्याचा प्रयत्न करीत होते त्यामुळे नीलाला खूपच मानसिक त्रास होत होता. आणि त्यामुळेच तिनं स्वतःला अभ्यासात पूर्णपणे गुंतवून घेतलं होतं. "मावशी, तिला बंगलोरला कोणत्याही परिस्थितीत जाऊन देऊ नका! म्हणजे जिथं सुशांत जाईल तिथं नको! त्या दोघांचं भलं होईल अशीच माझी मनापासून इच्छा आहे पण हे राजकारणी लोक आपापसातल्या वैरापायी उगाच ह्या दोघांचा बळी घायला नकोत!" शलाका अगदी कळकळीने सांगत होती. आईला तिचं म्हणणं बऱ्यापैकी पटत होतं पण नीलाला समजवायचं कसं हा मोठा प्रश्न होता. शेवटी मग मी बाबांशी बोलून बघते असं म्हणत आईने शलाकाचा निरोप घेतला. रात्री मग बाबांशी आईने हा विषय काढल्यावर ते ही चिंतेत पडले.
दिवस भरभर निघून जात होते. सातव्या सेमिस्टरची परीक्षा हा हा म्हणता आली आणि संपून सुद्धा गेली. नीलाने पूर्णपणे अभ्यासात झोकून दिलं होतं परिणामी पेपर अगदी झकास गेले आणि निकाल लागला तेव्हा त्याची प्रचिती आली सुद्धा! तिच्या शाखेत नीला दुसऱ्या क्रमांकावर आली होती. सुशांत आपला पहिला क्रमांक राखून होता. दिवसागणिक नीलाच्या आईवडिलांची चिंता वाढत चालली होती. बंगलोरला जाऊ नकोस हे नीलाला कसं सांगायचं हे त्यांना समजत नव्हतं. "आपण सुधीररावांशी थेट बोलूयात का? " आईच्या ह्या प्रश्नाकडे बाबांनी साशंक नजरेने पाहिलं. तिला नक्की काय म्हणायचं आहे हे त्यांना समजल नव्हतं. "म्हणजे थेट लग्नाविषयी विचारून पाहिलं तर!" काहीही म्हणतेस तू असं बाबांनी नजरेनेच तिला ताबडतोब उत्तर दिलं खरं पण मग ते सुद्धा त्या पर्यायावर थोडा गंभीरपणे विचार करू लागले. जर रावांनी हो म्हटलं असत तर सर्वच प्रश्न सुटणार होते. पण जर नाही म्हटलं तर! त्यांचं डोकं सुद्धा चालेनासं झालं होतं.
गेले काही दिवस सुधीररावांची वाढती बेचैनी गीताताईंच्या लक्षात येत होती. शेवटी न राहवून त्यांनी रावांना विचारलं. "सर्व काही ठीक चाललंय ना! कामाचा खूप ताण होतोय का! नाहीतर तुम्ही कशी आठवडाभराची सुट्टी काढा बरं! आपण मस्तपैकी कोकणात जाऊन येऊयात! मस्त थंडी पडली असेल तिथं!" आपल्या अनुपस्थितीत सुशांतचे हाल होतील हे माहित असूनसुद्धा गीताताई म्हणाल्या. रावांची बेचैनी त्यांना पाहवत नव्हती. "गीता मी पूर्ण फसवला गेलो गं! एक मोठे आर्थिक प्रकरणात मोठा उद्योगपती आणि पक्षश्रेष्ठी ह्यांच्यात मी मध्यस्थी करत होतो. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं पण अगदी शेवटच्या क्षणी त्या उद्योगपतीला ते कॉन्ट्रैक्ट न देता दुसऱ्या कोणाला तरी देण्यात आलं! आता तो उद्योगपती पूर्ण बिथरला आहे. त्याचे भली मोठी रक्कम ह्या व्यवहारात अडकली आहे. तो श्रेष्ठींचा तर बदला घेऊ शकत नाही पण तुम्हांला पूर्णपणे आयुष्यातून उठवून टाकीन अशी धमकी त्याने मला दिली आहे!" डोळ्यातील अश्रुंवर ताबा न ठेवता आल्याने त्यांना मोकळेपणाने वाहून देत राव म्हणाले. गीताताईना हा मोठा धक्काच होता. आतापर्यंत अगदी सचोटीने व्यवहार करणारे राव ह्या प्रकरणात असे कसे अडकू शकतात ह्याचाच त्यांना उलगडा होत नव्हता. पुढील काही दिवस त्या रावांना धीर देण्याचा आटोकाट प्रयत्न करीत होत्या. पण परिस्थितीत काहीच फरक पडत नव्हता.
निवडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना RBS ने संपर्क केला होता. आणि बरीच कागदपत्रे भरून मागितली होती. काल रात्रीच नीलाने हा विषय आईवडिलांकडे काढला तेव्हा ते दोघे अगदी गप्पच राहिले होते. ही गोष्ट अगदी उत्साहात असलेल्या नीलाच्या कशी कोणास ठाऊक पण लक्षात आली नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून नीला चहाचा कप घेत खुर्चीवर विसावली. सवयीप्रमाणे तिनं वर्तमानपत्राचे मुख्य पान उघडलं आणि तिचा आपल्या डोळ्यावर विश्वासच बसेना! "आमदार सुधीरराव ह्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली काल रात्री अटक!" अगदी मोठ्या अक्षरातील ही बातमी वाचून क्षणभर तिच्या डोळ्यासमोर काळोखी आली!
(क्रमशः )