मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शुक्रवार, २४ जुलै, २०१५

वेगवान मार्गिका !!

 
पुन्हा एक रविवार संध्याकाळ, पुन्हा एक वसईहून बोरीवली परतीचा प्रवास! दहिसर चेकनाक्याच्या साधारणतः १ किमी आधीपासूनच वाहनांची कोंडी! मग कोणती मार्गिका पकडायची हा नेहमी सतावणारा प्रश्न ! मध्येच एक उजवीकडे वळायचा सिग्नल येतो. तिथे बऱ्याच वेळा वाहनं खोळंबून राहतात हे अनुभवाने मिळालेलं ज्ञान! त्यामुळे आपण ही मार्गिका टाळायची हे आधीपासून ठरविलेलं! परंतु प्रत्येक वेळी हा अनुभव, हा ज्ञान प्रथमच अनुभवणारा कोणीतरी ह्या मार्गिकेत असतोच आणि मग त्याची आणि त्याची गाडीची नाक खुपसून बाजूच्या मार्गिकेत घुसण्याची धडपड! 
ह्या सर्व खटाटोपीत बऱ्याच वेळा आपली मार्गिका सोडून बाकीचीच वेगाने जात असल्याचा अनुभव येतो. सोबत सोहम, प्राजक्ता असले की मग "तुम्हांला तरी मी सांगितलं होतं!" हे वाक्य हमखास ऐकायला मिळणार! मग न राहवून मार्गिका बदलण्याची माझीही धडपड! त्यामुळे अचानक मागच्या चालकाचा रोष, हॉर्नचा कर्णकर्कश आवाज, मग त्याने बाजूने जाताना दिलेला मस्त लुक, क्वचितच दोन्ही कार एकमेकाला घासण्याचा दुर्धर प्रसंग ओढविण्याची शक्यता! 
डिस्कवरी वाहिनीवर एक तासाचा कार्यक्रम अशाच संबंधित विषयावर दाखविला गेला होता. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एका मोठ्या वाहतूक कोंडीत सापडतो. "पुढे एखादं वाहन बिघडून बंद पडलं असेल किंवा खड्डा पडला असेल!" असेच काही विचार करीत वाहन चालवत राहतो आणि मग ज्या ठिकाणापर्यंत वाहतूककोंडी झाली असेल तिथे पोहोचतो.  आणि पाहतो तर काय अहो आश्चर्यम!  तिथे काहीच झालेलं नसतं आणि वाहतूक पुढे व्यवस्थित चालू असते. डिस्कवरीवाल्यांचं म्हणणं होतं की हा सर्व खोळंबा बऱ्याच वेळा अधूनमधून मार्गिका बदलायचा प्रयत्न करणाऱ्या उतावळ्या चालकांमुळे होतो. त्यांच्या ह्या प्रयत्नांमुळे मागचा चालकाला ब्रेक मारावा लागतो आणि मग त्याची साखळी प्रतिक्रिया होत राहते. डिस्कवरवाल्यांचा सिद्धांत असा की जर कोणीच मार्गिका न बदलता व्यवस्थितपणे आपली मार्गिका पकडून गाड्या चालवल्या तर सर्व मार्गिकाच वेगवान राहू शकतील! 


चेकनाक्याच्या वाहतूककोंडीने अस्वस्थ असलेलं मन डिस्कवरीचा कार्यक्रम पाहून विचार करू लागलं. स्वाभाविकपणे मनात विचार आला, की हा वेगवान मार्गिकेचा अट्टाहास कशासाठी! काही मिनिटं घरी लवकर पोहोचण्यासाठीच ना! ह्या वाचविलेल्या काही मिनिटांचा जर आपण सदुपयोग करणार असू तरच मग ह्या धडपडीला अर्थ आहे. 

तसं पाहिलं तर वेळेचा सदुपयोग करणे म्हणजे नक्की काय करणं ह्याविषयीचा माझा संभ्रम वाढत्या वयानुसार वाढतच चालला आहे. नियमित अभ्यास करून मग खेळणे म्हणजे वेळेचा सदुपयोग ही शालेय जीवनातील अगदी सोपी व्याख्या आता काहीशी क्लिष्ट बनत चालली आहे. कुटुंबासोबत गुणात्मक वेळ (Quality Time) - हयात 
१) मुलाचा अभ्यास, त्याच्याशी खेळणं, त्याच्यासोबत टीव्ही बघताना त्याला बातम्यातील / खेळातील अधिक संदर्भ देणे ह्यांचा समावेश होतो. 
२) पत्नीशी गप्पा - हे सांगायला अगदी भारदस्त वाटत असलं तरी प्रामुख्याने ह्यात श्रोत्याची भूमिका चांगली वठवता आली पाहिजे. 
३) आई वडिलांसोबत शांत बसणे - ह्यात त्यांच्यासोबत तासभर टीव्ही पाहत बसलं आणि त्यात दोन मिनिटं त्यांच्याशी बोललं तरीही ते खुष असतात. 
४) भाऊबहिण, आणि नातेवाईकांना फोन करणे - ह्या बाबतीत माझी कामगिरी अगदी सुमार आहे.
४) कार्यालयातील उरलेल्या कामात अधिकाधिक कशी परिपूर्णता आणता येईल ह्याचा विचार करणे!
५) शालेय / जुन्या मित्रांना फोन मन रिझविणे!
६) पुस्तके वाचणे, ब्लॉग द्वारे लोकांना ज्ञान देणे!
७) क्रिकेट / चित्रपट संगीत पाहणे

ह्या झाल्या काही अगदी पटकन आठवणाऱ्या गोष्टी! 

हल्लीच्या आयुष्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे आपल्याला मिळालेला मोकळा वेळ कसा योग्य प्रकारे व्यतीत करायचा! वेगवान मार्गिका आयुष्यातसुद्धा आपल्यासमोर येतात! तरुणाईची खुमखुमी असल्याने आपण त्या स्वीकारतो सुद्धा आणि मग आपली ध्येय कधीकधी खूपच आधी प्राप्त होतात. असतं एक शिखर आणि काहीसा एकटेपणा! इथं पोहोचल्यावर काय करायचं ह्याचा विचार आधीपासूनच करून ठेवायला हवा!

मग आठवलं ते पूर्वी कधी वाचलेलं वाक्य! "केवळ ध्येयाकडे लक्ष ठेवून प्रवास करू नका! प्रवासाचा आनंद घेण्यावर लक्ष केंद्रित करा!!"

मंगळवार, १४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ४


 
एकत्र कुटुंब आणि बर्यापैकी मोठी वाडी ह्यामुळे त्यावेळी बऱ्याच कामगार वर्गाचा घरी राबता असे. शेतीत काम करणारी हे सर्व कामगार अगदी घरच्या मंडळीप्रमाणे लहान मुलांची काळजी घेत. ह्यातील प्रत्येकाची खास व्यक्तीवैशिष्टे असत.

मोठी आईचे माहेर मुळगावचे. तिच्या माहेरून आलेला बाबुराव पण घरी काही काळ होता. हा अगदी रंगात आला की "अपलम चपलम" , "तू गंगा की मौज मै यमुना का धारा!!" अशी ठेवणीतील गाणे गाऊ लागे. मग दिदीच्या नेतृत्वाखाली बच्चेमंडळी त्याची फिरकी घ्यायला सज्ज होत. 

रुपजी काका आणि गुलाब काकू हे जोडपे बहुदा ७० च्या दशकापासून घरी राहायला असावे. रुपजी काकाचा उल्लेख बाउल प्रकरणात येउन गेला आहे. त्यांची तीन अपत्ये दीपक, राजू  आणि सुरेखा. दीपकने मला विटी दांडू आणि गोट्या खेळाचे नियम शिकवले. विटी दांडू मध्ये तो मला ९९.९९% हरवायचा. पहिल्या फटक्याने हवेत उडवलेल्या विटीला हवेतच पुन्हा दांडूने मारल्यास दुप्पट गुण मिळत असे मला काहीसं आठवतं. पण मला ह्या दोन्ही खेळात काही विशेष गती प्राप्त न झाल्याने मी ह्या खेळांपासून दुरावला गेलो. दीपक तसा हरहुन्नरी होता. केळीच्या दोन लोदांना (जाड बुध्यांना) मजबूत रस्सीने जोडून त्याने त्याची कामचलावू नौका बनवली होती. गढूळ पाण्याने भरलेल्या बावखलात त्याची ही नौका आणि त्यावर दीपक हे दृश्य मला काहीसं स्मरत. पण पूर्ण खात्री नाही. 

दीपकची मस्ती दिदीला फार खटकायची. एकदा तिचा राग अनावर होऊन तिने त्याला पूर्ण अंगभर बाम चोळला. त्यामुळे कासावीस झालेल्या दीपकला पाहून गुलाबकाकू नाराज झाली होती.

कालांतराने हे जोडपे बेण्यावर स्थलांतरित झाले. रुपजीकाका लवकरच निवर्तले. आणि दीपक, राजू सुद्धा! पण गुलाबकाकू अजूनही काम करते.

अंगमेहनतीची खास कामे करण्यासाठी घाटावरून आलेले तातोबा आणि त्याचे कुटुंब येई. हा तातोबा प्रसिद्ध अभिनेता राजकुमार सारखा दिसायचा. त्यालाही तसंच वाटायचं की नाही हे मला ठाऊक नाही. तो एकदा एका प्रकरणात अडकला. त्याने मग वकील वगैरे केले. हे वकील एकदा अण्णांना भेटायला घरीही येऊन गेले. मग काही वर्षाने बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाल्यावर तातोबा मोठ्या अभिमानाने सांगत आला की "हेच माझे वकील होते!"

मे महिन्यात खूप वेळ असे. त्यावेळी मोठी माणसे सायकलवर फिरत. लहान मुले साधारणतः आठवी नववी पर्यंत ही सायकल चालवू शकत नसत. आणि त्यावेळी लहान मुलांना हजारो रुपयाच्या सायकली विकत घेण्याची पद्धत नव्हती. होळीवर एक दोन दुकाने होती. तिथे भाड्याच्या सायकली मिळत. पन्नास पैसे अर्धा तास आणि एक रुपया एक तास! ज्याला सायकल येते अशा मोठ्या भावंडाची  किंवा मित्राची विनवणी करून त्यांच्याकडून सायकल अंगणापर्यंत आणली जात असे. मग पुढील अर्धा तास मुलं पडत, खरचटवून घेत. पण कधीतरी मग सायकल शिकत! ह्या सायकल शिकण्याच्या कालावधीत मला सायकल चालवता येत आहे ह्याची बऱ्याच वेळा स्वप्ने पडत! दोन्ही हात सोडून काही अंतर सायकल चालवू शकणारा मुलगा प्रसिद्ध असे. 


आईचे माहेर बोर्डीला! तिथे माझी मोठी बहिण सुस्मितताई आणि बंधू बऱ्यापैकी मे महिन्यात राहिले. पण मी मोठा होईस्तोवर आईचे तिथे जाणे हळूहळू कमी होत चालले. तरी देखील बोर्डीचे अण्णा आणि आजीच्या आठवणी मला बर्यापैकी स्मरतात. मे महिन्याची सुट्टी संपून परत यायची वेळ झाली की रमणचा प्रसिद्ध टांगा बोलाविला जाई. आणि मग त्यात भाई, आई, आम्ही तिघे आणि बऱ्याच काही आठवणी घेऊन आम्ही परतत असू ! बोर्डीहून परतणाऱ्या गाड्या अगदी संथ गतीने धावत. तशा अजूनही संथ गतीने धावतात. वाटेत मग डहाणूची डाळ घेतली की आम्ही धन्य होत असू. 
बोर्डीचा समुद्रकिनारा सुंदर आहे. तिथे आम्ही संध्याकाळी फिरायला जात असू. उत्तरेला असेच चालत गेले की झाई गाव लागतं. ते गुजरात राज्यात आहे असे मला सांगण्यात आले होते. एका अशाच संध्याकाळी ओहोटीच्या वेळी आम्ही एक समुद्रातील पाण्याचा प्रवाह (ओढा) ओलांडून पलीकडे गेलो. त्यावेळी बंधू किंवा सुपितताईने मला आपण झाईत म्हणजे गुजरात राज्यात आलो आहोत असे सांगितलं. ती पूर्ण संध्याकाळ मी धन्य होतो. पुढे जून महिन्यात शाळा उघडल्यावर मित्रांना कधी एकदा हे सांगतो असे मला झाले होते. हल्लीच्या मुलांत युरोपला वगैरे गेल्याशिवाय अशी भावना निर्माण होत नाही. 

बोर्डीच्या अण्णांचे कुटुंबीय काही अंतरावर असलेल्या वाडा ह्या ठिकाणी राहत. "अण्णा वाड्यात गेलेत!" हे वाक्य आम्ही बऱ्याचजणांना सांगायचो. अण्णांचे मित्र शांताराम म्हणून होते. ते अण्णांना भेटायला बऱ्याच वेळा यायचे. त्यांची एक खासियत होती. ते अंगणात पडलेल्या सावलीवरून घड्याळाची वेळ अचूक सांगत. ते आले की मी त्यांना वेळ विचारे. मग ते सावलीकडे निरखून पाहत आणि मग मला वेळ सांगत. मग मी धावत जाऊन घरातील घड्याळात वेळ पाहून धन्य होऊन येई. 

बंधू आजूबाजूच्या अण्णांच्या शेजाऱ्यांशी मनमोकळेपणाने गप्पा मारत असल्याने त्यांच्यात प्रसिद्ध होता. समोरच्या पाटलांकडचेअजित बंधुपेक्षा
वयाने बरेच मोठे असले तरी बंधूला दोस्त म्हणत! एकदा जोशात येउन बंधू त्यांना म्हणाला, "इतके दोस्त वगैरे म्हणता तर आइसक्रीम वगैरे खिलवा की!" अजितभाऊंनी ही गोष्ट फार मनावर घेतली. लगेचच सायंकाळी आम्हां सर्वांना समुद्रकिनाऱ्यावरील हॉटेलात घेऊन गेले.खिशातील शंभरची नोट बंधूला दाखवत म्हणाले, " तुझा दोस्त म्हणजे काय कमी समजू नकोस!" गोल्ड स्पॉट किंवा थम्सअप वर दहा रुपयाच्या वर खर्च करायची सवय नसलेल्या आम्हां सर्वांना ह्या गोष्टीचे फार मोठे अप्रूप वाटलं होते. सुपितताईची वसईच्या शाळेतील खास मैत्रीण नंदा हिचे सुद्धा बोर्डीला बहुदा आजोळ होते. त्यामुळे ती सुपितताईला तिथे भेटायची. मग सुपितताई खुश व्हायची. त्यावेळच्या पद्धतीनुसार सुपितताईवर घरातील मोठी मुलगी असल्याने कामाचा तसा बोजा पडायचा. 


बोर्डीला बऱ्याच वेळा पॉलीश न केलेला तांदुळ भातासाठी वापरत त्याचीसुद्धा एक वेगळी पण सुरेख चव असे! बोर्डीला आंब्याच्या वेगळ्या जाती असत. ते ही मनसोक्त खायला मिळत! अंगणात सकाळी वासुदेव येई. एका आठवड्यात विष्णू, राम वगैरे रूपे पाहून खुश झालेला मी नंतर अंगणात रावण प्रकटलेला पाहून पूर्णपणे भयभीत झालो होतो. दुपारी कधी मधी फेरीवाले पत्र्याच्या डब्यात नानाविध बिस्किटे , नानकटाई वगैरे घेऊन येत. ही बिस्किटे पाच रुपयाला शंभर असल्या स्वस्त दरात मिळत.

दुपारी जेवणं वगैरे आटोपली की आम्ही मेंढीकोट खेळायला बसू. खाली गोणपाट अंथरलेले असे. अण्णा सुद्धा सामील होत. हुकुम जो लपवित असे तो चतुराईने पायाखाली लपविलेले पान बाकी कोणाचे लक्ष नसताना हळूच वर करून समोरच्याला दाखवे. मग समोरचा कान पकडून, जीभ बाहेर काढून चौकट, बदाम वगैरे हुकुम असल्याचे खुणेनेच सांगे. बऱ्याच वेळा ही मंडळी पकडली जात मग मोठा गदारोळ माजे! गोणपाट अंथरून त्यावर मेंढीकोट खेळायला बसण्यात ह्या चतुराईला अनुकूल वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न असावा असेच मला अजूनही वाटत आले आहे. पुढे १९८४ साली आजी अचानक स्वर्गवासी झाली आणि मग बोर्डीच्या फेऱ्या खूप कमी झाल्या. 

(क्रमशः)

शनिवार, ४ जुलै, २०१५

रम्य ते बालपण - ३



आधीचे दोन भाग काही महिन्यापूर्वी प्रसिद्ध केल्याने संदर्भासाठी त्यांची लिंक इथे देत आहे. 

http://patil2011.blogspot.in/2014/12/blog-post.html 

http://patil2011.blogspot.in/2014/11/blog-post_206.html 

वसईतील बहुसंख्य लोक पूर्वी स्टेशनवरून गावात परतण्यासाठी एसटी बसचा वापर करीत. पारनाका, होळी, रानगाव, गिरिज, किल्लाबंदर ह्या ठिकाणांसाठी बस सुटत. तशा ह्यातील काही बस अजूनसुद्धा चालू आहेत पण पूर्वीची शान नाही. ह्या बसच्या विशिष्ट वेळा असत आणि डेपोत असलेल्या बसच्या संख्येवरून आपल्याला बस कधी मिळेल ह्याचा अंदाज बांधता येई. बस देताना पारनाक्याला नेहमीच प्राधान्य दिलं जातं अशी होळीवाल्यांची समजूत होती आणि त्यांना त्याचा रागही यायचा. एखाद्या दिवशी बसला खूप उशीर झाला की मग बसच्या रांगेतील सामाजिक जीवनात सक्रिय असणारी मंडळी जाऊन कंट्रोलरला बस देण्यासाठी आपलं म्हणणं पटवून देत. मग थोड्या वेळानं बस येई. म्हटलं तर शाळेत असताना ह्या एसटी बसने प्रवास करायची वेळ क्वचितच येई. पण बाहेरगावी गेल्यावर परतताना नक्कीच एसटीशी गाठ पडे. ह्या एसटीचे ९० सालच्या आसपास स्टेशन ते होळी तिकीट हे ९० पैसे आणि रमेदी पर्यंत तिकीट १ रुपया होते. होळीच्या थांब्याला कंडक्टर बसमधल्या उरलेल्या प्रवाशांकडे नजर टाकून त्यांनी १ रुपयाचे तिकीट काढले असावे की नाही ह्याची खातरजमा करून घेई. अगदीच संशय आल्यास एखाद्याला विचारी सुद्धा! ह्या एसटी बसमध्ये बाकी सर्व दिवे पिवळ्या रंगाचे आणि एखाद दुसरा निळ्या रंगाचा असे. ह्या दिव्याखालची सीट मिळावी म्हणून माझा आटापिटा असे. 

पूर्वी सकाळी ८:४२ वाजता एक बडाफास्ट नावाची लोकल होती. ती बहुदा बोरिवली नंतर थेट बांद्र्याला थांबे. त्या लोकलला आमच्या गल्लीतून जाणारी २-३ मंडळी असत. ती साधारणतः बस पकडण्यासाठी एकत्रच निघत. 

आमच्या गल्लीत जॉनी अंकल राहतात. माझे वडील भाई, काका दाजी आणि जॉनी अंकल बऱ्याच वेळा ऑफिससाठी एकत्र निघत. जॉनी अंकल हे अनेक विद्युत उपकरणांच्या दुरुस्तीमध्ये निष्णात आहेत. मी त्यांना ८० सालांपासून आमच्या घरी विविध उपकरणे दुरुस्त करताना पाहतो. ते अजूनही जमेल तसे येतात. दाजींकडे एक शंख असायचा. थोड्या दूर घर असलेल्या जॉनी अंकलना बोलावयाचे झाले की मग दाजी ह्या शंखाचा विशिष्ट नाद करीत. मग जॉनी अंकलना हा संदेश मिळून ते घरी येत. 

वसई स्टेशनच्या पूर्वेला असलेल्या वालीव ह्या गावी आमची शेती होती. पावसाळा आला की तिथे भाताची लागवड केली जात असे. तिथे एक बेडं होतं. तिथे अण्णा, मोठी आई, बाबा (मधल्या क्रमाकांचे काका) ह्या पावसाळ्याच्या काळात बऱ्याच वेळा जाऊन राहत. तिथे विद्युतपुरवठा वगैरे काहीच नसे. त्या शेताच्या बाजूने एक ओढा वाहत असे. त्या ओढ्याचे पाणी पिण्यासाठी आणि स्वयंपाकाला सुद्धा वापरलं जात असावं अशी माझी आठवण आहे. शुद्धता ती पण किती!! आज घराच्या बाजूला असलेल्या विहिरीतील पाणी थेट पिताना जीव धास्तावतो. भाई मग रविवारी वगैरे ह्या शेतावर जात. माझ्या आठवणीत मी एकदा त्यांच्यासोबत एसटी पकडून गेलो होतो. सर्वत्र पाऊस पडून गढूळ पाणी झालं होतं. शेतात मजूर कामाला होते.  दुपारी गावठी कोंबडीचे जेवण चुलीवर बनवलं होतं. आणि चारच्या आसपास चहा आणि ग्लुकोज बिस्कीट खाऊन आम्ही परतलो होतो. माझे आजोबा भाऊ ह्या वालीवच्या शेतावरून बैलगाडी घेऊन रात्री अपरात्री सुद्धा घरी परतत असत. ती परंपरा बराच काळ बाबांनी चालू ठेवली होती. 
ह्या वालीव शेताच्या बाजूला एक छोटी टेकडी होती. ह्या टेकडीवर आंब्याची अनेक झाडे होती. एका वर्षी ह्या आंब्यांना खूप आंबे आले आणि मग ते पिकण्याच्या सुमारास बैलगाडीत भरून मग घरी आणण्यात आले. ह्यात अनेक प्रकारचे आंबे होते. त्या पिकलेल्या आंब्यांच्या मधुर सुवासाने आजीची खोली भरून गेली. आजी मग आम्हांला प्रत्येक दिवशी ह्या आंब्याचे वाटप करी.

घराच्या मागे असलेल्या बेड्यात दोन कणगे असायचे. त्यात मग ऑक्टोबरच्या आसपास झोडणी करून झालेलं भात आणून भरलं जायचं. आणि बाबा मग लॉरीवाल्यांबरोबर बोलणी करून पेंढा भरून आणत आणि अंगणातील मोकळ्या भागात टाकत. ह्याचं वर्णन मागच्या भागात आलं आहे. हा पेंढा आल्यानंतर काही काळातच मग दिवाळी येई. दिवाळीत आम्ही बाण लावताना ह्या पेंढ्याच्या दिशेने तो लावू नये म्हणून आम्हांला खास सूचना दिल्या जात. 
भाई आणि दाजी ह्यांना एकत्र कुटुंब असेपर्यंत एकच भाजी डब्यात मिळायची. एकदा डांगर वर्गातली एक भाजी कडू निघाली. परंतु ह्या सत्याचा महिलावर्गाला साक्षात्कार होईस्तोवर ह्या दोघातील एक आधीच डबा घेऊन ऑफिसात निघाले होते. त्यामुळे मग दुसऱ्याबरोबर दोघांनी अ-कडू भाजी पाठविण्याचे काम आजीने व्यवस्थित सुनांकडून करून घेतलं. 
आधी एक मजली असणारे घर ८४ च्या आसपास दुमजली करण्यात आले. युसुफभाई कंत्राटदार आणि डिसोजा वास्तुतज्ञ अशी जोडगोळी होती. खालच्या घराची जशी संरचना होती तशीच वरच्या मजल्याची सुद्धा ठेवण्यात आली. ह्या वर्षांतच केव्हातरी घरी पाण्याची मोटार बसविण्यात आली. वरच्या मजल्याचे काम सुरु असताना तिथल्या कच्च्या भितींना दररोज पाण्याने भिजविण्याचे काम मोठी मंडळी उत्साहाने करीत. आपली ह्या कामात मदत होतेय की अडथळा ह्याची चिंता न करता आम्ही सदभावनेने त्यात सहभागी होत असू. ह्या मजल्याचा स्लॅब जेव्हा टाकण्यात आला तेव्हा आम्हां बच्चे मंडळींना मोठे अप्रूप वाटलं. हा स्लॅब कसंही करून एका दिवसात / एका फटक्यात पूर्ण झाला पाहिजे हा महत्वाचा घटक होता. मिक्सरमधून वेगाने निर्माण होणार कॉंक्रीटआणि त्याहून अधिक वेगाने ते वरती चढवायचा प्रयत्न करणारी कामगार मंडळी हे चित्र पाहून मी धन्य झालो होतो. हा स्लॅब यशस्वीपणे पूर्ण झाल्यावर सायंकाळी युसुफभाईच्या चेहऱ्यावर दिसलेले समाधानाचे भाव अजूनही मला आठवतात. 

१९८० साली एक मोठे सूर्यग्रहण झालं होतं. त्यावेळी घरातील सर्व मंडळी सर्व दारं खिडक्या बंद करून घरात बसली होती. पण आमची अनिता दिदी बऱ्यापैकी बंडखोर होती. ती काहीतरी निमित्त काढून घराबाहेर पडली आणि मग घरातील सर्व मोठ्या मंडळींचा संताप झाला होता. 
१९८२ साली एकदा मुंबई पोलिसांनी बंड केले होते आणि त्या संबंधित कारणांमुळे माझ्या वडिलांना रात्रभर ऑफिसात थांबावे लागलं. परंतु त्याकाळी हा संदेश घरी पाठविण्याची सोय नसल्याने घरची मंडळी मात्र रात्रभर चिंतेत राहिली. मी लहान असलो तरी मलाही मोठी चिंता लागून राहिली आणि झोपही आली नाही. सकाळी शाळा होती आणि परीक्षाही होती. शाळेत निघायच्या आधी भाई घरी परतले आणि मग माझा जीव भांड्यात पडला. 
असंच एकदा पावसाळ्यात गल्लीतलं चिंचेचे मोठे झाड विजेच्या तारांवर पडून पूर्ण गल्लीतील विद्युतपुरवठा दोन तीन दिवस खंडित झाला. विहिरीतून पाणी काढून घरात भरणे वगैरे प्रकार करून सर्वांचाच जीव मेटाकुटीला आला. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळांच्या कर्मचाऱ्यांनी शेवटी जेव्हा तीन चार दिवसांनी हा विद्युत पुरवठा पूर्ववत केला तेव्हा सर्वांचाच जीव भांड्यात पडला. 
मला लहानपणी पेपर वाचण्याचा मोठा छंद जडला होता. आंघोळ वगैरे करून मी अंगणात पेपरवाल्याची वाट पाहत थांबे. आता नक्की आठवत नाही पण बहुदा त्यावेळी शुजा नावाचे कार्टून रविवारच्या लोकसत्तेत येई. ते मला भारी आवडे. १९८० सालचे ऑलिम्पिक सुद्धा मला काहीसं आठवत. भारताने ह्यात सलामीच्या हॉकीच्या सामन्यात टांझानियाचा १८ -० असा दणदणीत पराभव केला होता. अंतिम सामन्यात भारताने स्पेनचा ४-३ असा चुरशीच्या सामन्यात पराभव केला. ह्या सामन्याचे धावतं वर्णन मी घरच्या रेडियोवर ऐकलं होतं. नंतर कधीतरी हे ऑलिम्पिक शीतयुद्धाच्या कालावधीत मॉस्कोत झाल्याने त्यावर अनेक देशांनी बहिष्कार टाकला होता हे मला समजलं तेव्हा मला काहीसं वाईट वाटलं. हा वॉल्वचा रेडियो अधून मधून बिघडे मग जॉनी अंकलना पाचारण केले जाई आणि मग ते आपल्या सवडीने हा दुरुस्त करीत. माझ्या आठवणीत त्यांनी हा रेडियो सात आठ वेळा तरी दुरुस्त केला असावा. हा रेडियो चालू स्थितीत असला की भाई न चुकता सकाळी सहा वाजताची मंगल प्रभात आणि रात्रीचा १० वाजताच छायागीत हे कार्यक्रम लावतं. सहा वाजता अडीच अडीच मिनिटाच्या हिंदी आणि इंग्लिश बातम्या झाल्या की मग सुंदर मराठी गाणी लागत. ह्यात भीमसेन जोशी ह्यांचं "माझे माहेर पंढरी आहे भिवरेच्या तीरी" हे खास प्रिय होतं. सहा पस्तीस झाले की मग एक हिंदी गाणं लागून मग ह्या कार्यक्रमाची सांगता होई. ही हिंदी गाणी - "हम होंगे कामयाब" "हर बस्तिका रहनेवाला हमको प्यारा है!" वगैरे असत.
१९८१ च्या साली आमच्या घरी दूरदर्शन संच आला. त्याआधी आम्ही सामने बघायला दामूतात्या यांच्या घरी वगैरे जायचो. नंतर मग जुन्या घरच्याच बंधूनी १९८४ -८५ साली रंगीत दूरदर्शन संच आणला. भारतात रंगीत दूरदर्शन संच इंदिरा गांधी ह्यांनी १९८२ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आणला. ह्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या वेळी भाई, आई, सुपितताई, बंधू आणि मी महामंडळाच्या सहलीला गेलो. ह्यात कर्नाळा अभयारण्य, महाबळेश्वर, गोवा आणि गणपतीपुळे वगैरे ठिकाणांचा समावेश होता. ही सहल एसटी बसने जायची आणि अजूनही जाते. स्वयंपाकी लोक बस मध्येच असत. ठरलेल्या ठिकाणी पोहोचलं की मग ते स्वयंपाकाला लागत. रात्री झोपायला काही ठिकाणी मोठा हॉल असे त्यात सर्व मंडळी झोपत. आमच्याच कुटुंबातील सुभाषबंधू ह्यांच्याकडे आयोजनाची जबाबदारी होती. त्यांनी गणपतीपुळेला हॉटेलमध्ये आम्हांला चांगली रूम दिली. तिथे पौर्णिमेची रात्र होती आणि रात्री वीज गेली होती. त्यामुळे बाहेर समुद्रकिनारी अगदी मनोरम दृश्य होते. मी पेपर वाचत ह्या आशियाई खेळांशी संपर्क ठेवून होतो. सहलीवरून परत आल्यावर मग बाकीचे सर्व सामने पाहिले. गीता झुत्शीला रौप्य पदक मिळाले आणि भारताचा पाकिस्तानने ७-१ पराभव केला ते ही पाहिलं. ते मनाला खूप लागून राहिलं. तरी एकंदरीत १३ सुवर्ण मिळवून भारताने चांगली कामगिरी केली. 
त्याकाळी लग्नाला जायचं म्हणजे बरीच मजा वाटायची. रंगीबेरंगी प्लास्टिक ग्लास मध्ये सरबत, शेव आणि लाडू असे पदार्थ आदल्या दिवशी खायला मिळत. डॉन चित्रपटातील जिसका मुझे था इंतजार हे गाणं बऱ्याच लग्नाच्या आदल्या दिवशी ऐकल्याचे आठवते. 
(क्रमशः)

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...