मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० मे, २०१५

तन्नू आणि मन्नू - विवाहोत्तर प्रवास


 

पुन्हा मे महिना, एक उन्हाळी सुट्टी, सकाळी साडेतीनच्या आसपास  सुरु होणारा पक्षांचा किलबिलाट, बाग शिंपणे,आंब्यांचा आनंद लुटणे अशा उन्हाळी सुट्टीतील आनंदाच्या अनेक क्षणात हल्ली एखादा नवीन  चित्रपट पाहणे ह्या प्रसंगाची भर पडली आहे. असाच सध्याचा ऐकीव माहितीच्या आधारे चांगला म्हणून गणला गेलेला चित्रपट म्हणजे तन्नू वेड्स मन्नू - रिटर्न्स हा! परंपरेनुसार कोणता चित्रपट पहायचा ह्यावर आमचे बराच काळ बौद्धिक चाललं. सध्याचा अमिताभ डोक्यात जातो, अग बाई अरेच्च्या चे परीक्षण तितकेसे चांगलं नाही अशा सर्व चर्चेनंतर तन्नू वेड्स मन्नू - रिटर्न्स हा भाग्यवान चित्रपट ठरला. 

हल्ली तंत्रज्ञान  प्रगत झालं आहे. पण त्याचा वापर आपण तितक्याच योग्य  करतो  हा वादाचा मुद्दा! संध्याकाळी सहाचा खेळ पाहण्यासाठी तिकिटे उपलब्ध आहेत की नाही  पाहण्यासाठी बुक माय शो च्या संकेतस्थळास  आम्ही चौकशी करण्याच्या हेतूने भेट दिली. तिथे बऱ्याच सीट्स आरक्षित दिसत होत्या. पण काही कारणास्तव आम्ही तिकिटे भ्रमणध्वनिवरून आरक्षित केली नाहीत. सायंकाळी सहाला दहा मिनिटे असताना काहीशी धाकधूक मनात ठेवूनच मल्टीप्लेक्सला पोहोचलो  तेव्हा केवळ ७ - ८ माणसे तिथे आजूबाजूला रेंगाळताना दिसली. तिकीटबारीवर झटकन तिकिटे मिळाली. 

सहाच्या सुमारास आम्हां १० - १५ प्रेक्षकांना आत सोडण्यात आले. एक दोन जाहिराती दाखवून झटपट चित्रपटाला सुरुवात'करण्यात आली. ह्या गडबडीमध्ये राष्ट्रगीत राहून गेलं. हा चित्रपटाचा सिक्वेल म्हणजे दुसरा भाग असल्याने आदर्श परिस्थितीत पहिला भाग पाहून मगच दुसरा भाग पाहायला हवा. पण आदर्श परिस्थिती हल्ली फेसबुकच्या फोटो, स्टेटस शिवाय राहिलंय कुठे? नेहमीप्रमाणे प्रस्तावना बरीच लांबली. 

चित्रपटाची सुरुवात इंग्लंड मधल्या एका ढगाळ, उदास वातावरणाच्या पार्श्वभूमीवर विवाहित जोडप्यांच्या समुपदेशन केंद्रात ! विवाहानंतरच्या चार वर्षात ह्या जोडप्यातील मतभेद पराकोटीला गेले आहेत. हे दोघं आपल्या वैयक्तिक संबंधांची चिरफाड ह्या समुपदेशकासमोर अगदी उघडपणे करताना आढळतात. आपल्या सर्वांना चांगलाच माहित असलेला आणि मी बऱ्याच वेळा मांडलेला मुद्दा! दोन माणसं ती नवरा बायको का असेनात ज्या वेळी सतत एकत्र असतात तेव्हा एकमेकांचे गुण दोष अगदी जवळून दिसतात. पूर्वी पतीला जे परमेश्वराचे रूप दिले जायचे त्यामुळे तो परीक्षणापासून वाचला जायचा. आज असं काही होत नाही, पतीचे थेट परीक्षण होतं अगदी त्याला ८० किलोचं पोतं म्हणेपर्यंत! पती सर्वगुणसंपन्न वा गुणसंपन्न केव्हाच नव्हते. परंतु त्यांना पूर्वी विवाहसंस्थेतील पती ह्या संस्थेचे कवच होते. आज हे कवच नाहीसे झालंय. ह्या प्रसंगात संवाद अगदी उघडपणे, कसलीही भीडभाड न बाळगता बोलले जातात. बहुदा हे आपल्या समाजाने आता पूर्णपणे स्वीकारलं आहे. ह्या पुढे जी आपली नैतिक प्रगती व्हायची ती आजच्या ह्या पातळीला प्रमाण मानून! 
चर्चेत नवरा आपला तोल गमावून बसतो आणि वेड्यांच्या इस्पितळात भरती होतो. आणि बाईसाहेब भारतात परततात. कंगनाचे भारतातील एकत्र कुटुंब म्हणजे धमाल! त्यात अनेक नातेवाईक आणि बळजबरीने घरातील खोली बळकावून बसलेला आणि कायद्याचा अभ्यास करीत बसलेला भाडेकरू. विवाहापूर्वी कंगनाचे बरेच मित्र! त्यातला एक तर रिक्षावाला नेमका तोच तिला स्थानकावर भेटतो. "माझी आठवण येते का कधी कधी!" कंगना त्याला विचारते. "हो येते ना कधी कधी!" तो उत्तरतो. "नक्की कधी?" असा खोचक प्रश्न कंगना विचारते तेव्हा तो सूचक हसतो. तसंच भाडेकरू पहिल्यांदा तिला "दिदी" म्हणून संबोधितो तेव्हा ती त्याला "केवळ संबोधिण्यापुरती दिदी म्हणतो आहेस की मनात सुद्धा तशीच शुद्ध भावना आहे?" असा प्रश्न करते. अशा प्रकारचे संवाद केवळ उत्तर भारतीय चित्रपटात असू शकतात. आज ते अशा प्रकारच्या संवादामुळे सर्व भारतभर पसरू लागले आहेत. अशा संवादामुळे प्रत्येक स्त्री अशाच प्रकारचा विचार करते असा समज अर्धवट अकलेचे लोक करतात. 
भारतात परतण्यापूर्वी आपल्या नवऱ्याची दया येऊन त्याच्या सुटकेची तजवीज कंगना करते ती त्याच्या भावाला सुटकेसाठी इंग्लंडात जायला सांगून! ह्या भावाला आपल्याच लग्नाची घाई लागून राहिली असते. 
माधवन साहेब सुद्धा भारतात परततात ते मनात एकंदरीत ह्या विवाहाविषयी जबरदस्त कडवट चव ठेवूनच. त्यांना विवाहसंस्थेविषयी वैफल्य आले नसावे असं वाटत राहत. काहीशा संभ्रवावस्थेत असतानाच त्यांचं लक्ष कंगनाच्या दुसऱ्या अवताराकडे जाते. माझं कंगनाच्या मूळ रूपावर इतकं प्रेम आहे परंतु वास्तविक जीवनात जे काही चटके बसले त्यामुळे मी तिच्यापासून दुरावलो गेलो. जर ती पुन्हा तिच्या मूळ रुपात माझ्यासमोर आली तर मी पुन्हा तिच्या प्रेमात पूर्णपणे झोकून देईन अशी काहीसा उदात्तीकरणाचा प्रयत्न. पण खरं पाहिलं तर विशीच्या वयातील मुलीच्या प्रेमात ह्या ८० किलोच्या पोत्याने पडायचं काहीच कारण नाही. आणि ह्या प्रेमाचं उदात्तीकरण करणं एका मर्यादेपलीकडे शक्य नाही ह्याच भान काही प्रमाणात दिग्दर्शकाने ठेवलेलं दिसतं. 
आपल्या नवऱ्याच्या ह्या उद्योगाविषयी अनभिज्ञ असलेली कंगना आपल्या स्वभावानुसार आपल्या विवाहापूर्वीच्या मित्रांसोबत आपले उद्योग सुरु ठेवते. ह्यात असतो एक अवस्थी! भाडेकरूच्या शब्दात सांगायचं झालं तर कंगनाच्या लग्नात दोन घोड्या आलेल्या असतात त्यातील एक पाठवणारा हा अवस्थी! पण जो जिता वो सिंकदर ह्या उक्तीनुसार माधवन बाजी मारून गेलेला असतो. पण  माधवनच्या नवीन प्रकरणात सुद्धा अवस्ठीचे पाय अडकलेले असतात आणि त्याचे कारण सुद्धा तेच! कंगनाच्या ह्या अशा वागण्यामागचं कारण शोधायचा दिग्दर्शक प्रयत्न करीत नाही. किंवा पहिला भाग न पाहिल्याने मला हा प्रश्न पडला असावा. कारण बहुदा स्वत्वाचा शोध घेण्याचा प्रयत्न असं आपण म्हणू शकतो. हा स्वत्वाचा शोध घेण्याची चैन मोजक्या लोकांना परवडू शकते. बाकी सर्व आपल्यासारखे सामान्य जीव भाकरीचा शोध घेण्यात जीवन घालवितात. 
कोल्ह्याला द्राक्ष आंबट ह्या उक्तीनुसार भाडेकरू अवस्थी आणि कंगनाच्या वाढत्या मैत्रीची खबर जगजाहीर करण्याचा प्रयत्न करतो आणि मध्येच मग कंगनाला आपल्या पतीउद्योगाची माहिती पडते. मनापासून हादरलेली कंगना आपले स्वातंत्र्याचे प्रयोग थांबवून मग आपला नवरा परत मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न करते. इथे ह्या कंगनाच्या व्यक्तिमत्वाचा शोध घ्यायचा मी प्रयत्न करतो. पण बहुदा हे व्यक्तिमत्व रंगविण्याची दिग्दर्शकाने फारशी तसदी घेतली नसावी त्यामुळे मलाही काहीच हाती लागलं नाही. मी मला वाटेल तितके मुक्तउद्योग करीन पण ज्या क्षणी माझा नवरा माझ्या हातातून निसटू शकेल अशी मला भीती वाटेल त्यावेळी मी मात्र सर्व उद्योग थांबवून सती सावित्री बनेन हा सारांश!
धावपटू कंगनाचे व्यक्तिमत्व काहीसं पटू शकतं. केवळ करियर आणि कौटुंबिक जबाबदारी ह्याच्या पलिकडे विश्व न पाहिलेल्या आणि गावातून शहरात आलेल्या एका मुलीला ज्यावेळी अचानक कोणीतरी आपल्यावर व्यक्ती म्हणून प्रेम करते ह्याची जाणीव होते तेव्हा ती मनातून बहरून जाण्याची शक्यता नक्कीच निर्माण होणार. आणि कंगनाने हे अभिनयातून मस्त फुलवून दाखवलंय. मामला अगदी लग्नापर्यंत पोहोचतो. आपल्याला अनपेक्षितपणे मिळालेलं हे प्रेम मग हातातून निसटून जाऊ नये म्हणून ही तरुण कंगना जीवाचा आटापिटा करते… पण 

चित्रपटातील व्यक्तीमत्वांचा आणि विवाहातील भावनिक नात्यांचं विश्लेषण पाहण्याची अपेक्षा ठेवून चित्रपट पाहायला गेल्यास अपेक्षापूर्ती न होण्याचीच शक्यता जास्त! पण एक अनुभव म्हणून चित्रपट नक्कीच उत्तम! कंगना चित्रपट एकटीच्या खांद्यावर वाहून नेते. 
जाता जाता लक्षात राहिलेला एक प्रसंग! माधवन, भाऊ आणि वडील सोमरसपानाचा आस्वाद घेत बसले असतात. मागे आईची अनेक क्षुल्लक कारणावरून अखंड कटकट चालू असते. अगदीडोक्यात भिडेल अशी. माधवनचे वडील म्हणतात - "संसार हा असाच प्रवास असतो. जोवर झेपेल तोवर सहन करायचा आणि ज्यावेळी सहनशक्तीच्या पलीकडे जाईल तेव्हा … " असं म्हणत ट्यूबलाईट फोडून टाकतात. आधुनिक युगांतील अनेक भारतीय पुरुषांच्या हृदयाला भिडलेला हा प्रसंग!!! आता तिसऱ्या भागाची वाट पाहतोय मी !!!

मंगळवार, २६ मे, २०१५

वसईतील शेतीउद्योगाचे भवितव्य!


 
मी जरी शेतकरी कुटुंबातून आलेला असलो तरी प्रत्यक्ष शेती व्यवसायावर मी उपजीविकेसाठी अवलंबून नाही. असं असलं तरी एकंदरीत शेतीव्यवसाय  दिशेने वसईत चालला आहे ते पाहता भविष्यात ह्या व्यवसायाचे अस्तित्व केवळ नाममात्र राहील अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. ह्या ब्लॉग पोस्टचा हेतू हा वसईतील ह्या विषयातील जाणकार व्यक्तींना आपली मत मांडण्यासाठी प्रोत्साहित करणे असा आहे. माझे ह्या विषयातील ज्ञान हे केवळ पाहून आणि ऐकीव माहितीवर अवलंबून असल्याने त्यातील त्रुटी तज्ञांनी माफ कराव्यात. 

वसईतील शेतीउद्योगाला भेडसावणाऱ्या समस्या 
१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण 
२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
३>  शेतमजुरांची टंचाई 

ह्या तिन्ही समस्यांचा आपण सविस्तरपणे उहापोह करूयात. 

१> अत्यल्प प्रमाणात शिल्लक राहिलेलं दरडोई शेतीचं प्रमाण
साधारणतः १९३० - ४० च्या सुमारास वसईतील शेतकऱ्यांकडे दरडोई बऱ्यापैकी चांगल्या प्रमाणात शेती होती. ह्या शेतीची देखभाल करण्यासाठी म्हणा वा इतर कारणांमुळे ह्या सुमारास कुटुंबाचा आकार सर्वसाधारणपणे मोठा ठेवण्याकडे कल दिसून आला. त्यामुळे त्यावेळी शेतीची देखभाल करण्यास जरी घरचे मनुष्यबळ मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले असले तरी कालांतराने ह्या सर्वांना शेतीवर उपजीविकेसाठी अवलंबून राहणे कठीण होऊ लागले. आणि त्यामुळे हळूहळू शिक्षणक्षेत्राकडे वळण्याचा कल शेतकरी समाजात दिसून येऊ लागला.
आज बहुतांशी सर्व शेतकरी कुटुंबात तरुण पिढी शेतकी व्यवसायापासून दूर गेली आहे.ह्यातील जे जे लोक आपल्या पर्यायी व्यवसायात यशस्वी झाले त्यांना आपल्या वाट्याच्या शेतीच्या तुकड्यात एक छंद म्हणून काही लागवड करण्याची चैन परवडू शकते. 

परंतु जो काही मोजका तरुण वर्ग उपजीविकेसाठी पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्यांची मात्र आजच्या घडीला कठीण परिस्थिती झाल्याचं दिसून येते. अर्थात ह्याला अपवाद असतीलच पण त्यांची संख्या मोजकी असावी. तर ह्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून असणाऱ्या तरुण वर्गास जर शेतीच्या उत्पन्नातून आजच्या काळाशी सुसंगत अशी जीवनशैली अवलंबिता येत नसेल तर तो आपला शेतीचा तुकडा विकण्याचा मोह किती काळ टाळू शकतो? अशा ह्या तरुण वर्गास आपण कशा प्रकारे मदत करू शकतो?

२> शेतकी व्यवसाय करणाऱ्या युवकांना / कुटुंबांना मिळणारी कमी प्रमाणातील सामाजिक प्रतिष्ठा
इथे मला ज्यांच्याकडे कमी प्रमाणात जमीन आहे असा शेतकरी वर्ग अभिप्रेत आहे. आज बाकीच्या व्यवसायातील उत्पन्नाचे प्रमाण भरमसाट वाढलेलं आहे. पण त्या प्रमाणात शेतीचे उत्पन्न वाढलेलं नाही. हल्लीच्या शिकलेल्या मुली कोण्या शेतकऱ्याची पत्नी म्हणून आयुष्य काढायला बहुदा तयार होणार नाहीत. वरवर फारसा गंभीर न वाटणाऱ्या ह्या प्रश्नाची व्याप्ती फार मोठी आहे. वसईतील लग्न समारंभात इतर व्यावसायिकांना (उदाहरणार्थ बांधकाम व्यावसायिक / परदेशस्थित नोकरी) मिळणाऱ्या सामाजिक प्रतिष्ठेचे प्रमाण सामान्य शेतकऱ्यांना मिळणाऱ्या प्रतिष्ठेच्या अनेक पटीने आहे. अर्थात मोठे शेतकरी ह्याला अपवाद असतील पण त्यांचे प्रमाण कमी आहे. ह्यात अजून पुढचा मुद्दा - आजच्या मुली आयुष्यभर शेतकरीण बनून शेतीचे काम पाहायला तयार का नाहीत?

शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नाद्वारे तुम्हांला क्वचितच चैनीचे आयुष्य जगता येतं हे सत्य आहे. त्यासाठी तुमच्याकडे १७ एकर उसाची शेती असावी लागते. होळीबाजारात सकाळी गलका, दुधी, वांगी विकायला येणाऱ्या शेतकरी कुटुंबातील स्त्रिया पाहा. दहा दहा रुपयाला दुधी विकणाऱ्या ह्या स्त्रियांना काय फायदा होत असणार ह्याचा तुम्ही अंदाज बांधू शकता. 

३>  शेतमजुरांची टंचाई 
पारंपारिक दृष्ट्या  ज्या समाजाने वसईतील वाडीत मजुरीचे काम केले त्या वर्गाची पुढची पिढी आज शेतीचे काम करण्यास तयार नाही. आज आपण वसईतील उरल्या सुरल्या वाड्यांना भेट दिलीत तर साठीच्या आसपास आलेले  मजूर आपणास काम करताना दिसतात. ह्यात दोन समस्या आहेत. एक तर नवीन पिढी शेतीकामास येत नाही ही पहिली आणि ह्या जुन्या पिढीस ह्या वयात सुद्धा हे काम करावं लागतं ही दुसरी समस्या. ह्या समस्यांपायी वसईत घेतल्या जाणाऱ्या भाजीपाल्याचे प्रकार हळूहळू बदलत जाणार. पूर्वी वसईची पानवेल ही वसईची शान होती. आज फार आतल्या भागात ह्या पानवेली राहिल्या असाव्यात. हल्ली शेतमजूर कमी प्रमाणात मिळतात म्हणून केळी लावण्याचे प्रमाण वाढीस लागलं आहे. एकदा लहान रोपे लावली आणि नियमितपणे पाणी देत राहिलं की बिचाऱ्या केळी आपसूक वाढत राहतात. त्या केळी  लावाव्यात जेणेकरून त्यांना योग्य महिन्यात लोंगर येतील ह्याचं सुद्धा एक शास्त्र आहे. माझ्या एका जाणकार नातेवाईकाने ते मला समजावून सांगितलं होतं.  

पुढील काही वर्षात शेतमजुरांच्या अभावी वसईतील शेतीव्यवसाय नामशेष होईल काय अशी भिती वाटू लागली आहे. ह्या समस्येवर उपाय म्हणून समजा एखाद्या धडाडीच्या व्यावसायिकाने शेतमजुरांचा पुरवठा करणारी संस्था स्थापन केली तर? ह्या शेतमजुरांना योग्य ते प्रशिक्षण दिले जाईल. नारळाच्या झाडावर चढून नारळ पाडू शकणारा तज्ञ समजला जाईल आणि त्याला जास्त मजुरी मिळेल. ह्या सर्वांना आरोग्यविमा, पगार अशा सुविधा उपलब्ध केल्या जातील. त्यांचा पुर्वेइतिहास तपासून घेतला जाईल. अगदी कल्पनाविलास पूर्ण करायचा झाला तर हा व्यावसायिक एक संकेतस्थळ उभारेल. त्यात आपल्या कर्मचाऱ्यांची आगाऊ तारखांसाठी नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली जाईल. जितक्या आधी नोंदणी कराल आणि जितक्या मोठ्या प्रमाणात नोंदणी कराल तितकी अधिक सवलत. 
कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने त्यांना वर्षभर पगाराची शाश्वति मिळेल. ह्या कर्मचाऱ्यांना असणारे दारूचे व्यसन ही एक मोठी समस्या आहे. ह्या संस्थेद्वारे समुपदेशन सुद्धा करता येईल. 

शेतकऱ्यांच्या दृष्टीने भविष्यात आर्थिकदृष्ट्या फायदेशीर अशी कोणती पिके घ्यावीत ह्या विषयावर चर्चा होणे आहे. पारंपारिक  भाज्या घेणे जर आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत नसेल तर दुसरे कोणते पर्याय समोर आहेत ह्यांचा विचार करायला हवा. सामुहिक शेतीचा प्रयोग वसईत करता येईल का हा सुद्धा अभ्यासून पाहण्याजोगा विषय आहे. 

अजून एक मुद्दा! वसईतील मुळची शेतकरी पार्श्वभूमी असलेल्या पण इतर व्यवसायानिमित्त शेतीपासून आयुष्यभर दूर गेलेल्या लोकांनी निवृत्तीनंतर परत शेतकी व्यवसायात येण्याच्या शक्यतेचा विचार करावयास हवा. अशा लोकांवर शेतीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्याचे दडपण नसल्याने ही लोक शेतीत विविध प्रयोग करू शकतील.

एक गोष्ट लक्षात ठेवा; दिवसेंदिवस लोकसंख्या वाढतच जाणार आहे पण शेतजमिनेचे प्रमाण मात्र कायम अथवा कमीकमी होत जाणार आहे. एक काळ असा येणार आहे की शेती हा एक किफायतशीर व्यवसाय बनू शकतो पण त्या दिवसाचा फायदा उठवण्यासाठी आपण तयार असू का हा महत्त्वाचा मुद्दा आहे! ह्या समस्येचा वैयक्तिक पातळीवर मुकाबला करण्याऐवजी एकत्रितपणे बौद्धिक चर्चा करून त्यातून मार्ग काढणे आवश्यक बनले आहे.

रविवार, २४ मे, २०१५

अघटित - भाग २


 
नासासारख्या संस्थेचा खर्च चालवणं गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेला जड जाऊ लागलं होतं. परंतु अचानक त्यांना गुप्त अभियान चंदनसारखी सोन्याची अंडे देणारी कोंबडी लागली होती. नासाने प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणार एक मध्यम आकाराचं यान विकसित केलं होतं. हे यान विकसित होण्याच्या सुमारास त्यांना दोन प्रकाशवर्षे अंतरावर एक मध्यम आकाराचा ग्रह सापडला होता. ह्या ग्रहाचा शोध लागला तेव्हा त्यावर वास्तव्य करण्यासाठी अगदी अनुकूल अशी परिस्थिती नव्हती. पण गेल्या पन्नास वर्षात ह्या प्रोजेक्टवर नासाने अमाप पैसा खर्च केला होता. हा पैसा काही सरकारचा नव्हता. अमेरिकेतील काही धनाढ्य लोकांनी ह्यात गुंतवणूक केली होती. ह्या अमेरिकेतील लोकांसोबत गल्फमधला एक शेखसुद्धा काही कालावधीने गुंतवणूक करण्यास उतरला होता. सध्यातरी हे सर्व पर्यटनाच्या दृष्टीकोनातून ह्या गुंतवणूकदारांना विकलं गेलं होतं. मधल्या तासाभरात जॉन्सनच्या नजरेसमोर हे सर्व काही चित्र झरझर सरकून जात होतं. पर्यटनाच्या दृष्टीकोनातून प्राधान्यक्रमवारी सुद्धा तयार होती. 
ह्याच तासाभरात गिल्बर्ट ह्यांची मात्र जोरदार धावाधाव सुरु होती. त्यांना मध्येच जॉन्सनशी संपर्क सुद्धा साधावा लागला. परकीय देशांना सद्यस्थितीविषयी कितपत माहिती द्यायची ह्याविषयी निर्णय घेताना जॉन्सनचे मत विचारात घेणे अत्यावश्यक होते. आपण जरी ह्या देशांना माहिती दिली नाही तरी त्यांना ती एव्हाना आपसूकपणे मिळणारच होती ह्यावर एकमत होण्यात त्यांना काही सेकंदाचाच अवधी लागला. त्यानंतर मात्र गिल्बर्ट चीन, युरोपियन सुरक्षा संघ, भारत ह्यांच्या संरक्षण मंत्र्यांशी विडीयो कॉलवर चर्चा मसलत करण्यात गढून गेले. आपल्याजवळील सुरक्षाक्षमता घोषित करण्याची अजूनही कोणाची फारशी तयारी दिसत नव्हती. ह्या तासाभरात जसजशी ह्या संरक्षण मंत्र्यांना आपल्या अंतरिक्ष विभागाकडून ह्या उल्केचे आणि तिच्या विघातक क्षमतेचे गांभीर्य कळत गेले तसतसे मात्र त्यांच्या सुरात फरक पडत गेला. त्यांनी हळूहळू आपल्या जवळील काही माहिती उपलब्ध करून द्यायला सुरवात केली. अर्थात ही माहिती अगदी हातचे राखून घोषित केलेली असणार हे न समजण्याइतके ह्या बैठकीत कोणी दुधखुळे नव्हते. गिल्बर्ट घड्याळाकडे लक्ष ठेऊनच होते. बैठक आटोपती घेण्याची वेळ आली होती. "जगभरातील कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने ही बातमी अगदी मोजक्या लोकांनाच माहिती असावी" ह्याची दक्षता घेण्यास गिल्बर्ट ह्यांनी सर्वांना बजावलं. तोवर जॉन्सन ह्यांनी ह्या सर्वांच्या राष्ट्राध्यक्षांना फोन करून ह्या बैठकीत सहभागी झालेल्या सर्वांना नजरकैदेत ठेवण्याची तजवीज करून ठेवली होती हे मात्र गिल्बर्ट ह्यांना ठाऊक नव्हतं. सर्वांचे आभार मानत पुन्हा ते जॉन्सनना भेटण्यासाठी तयार झाले. 
"ह्या सर्व देशांच्या क्षमतेची बेरीज करून सुद्धा आपली ह्या उल्केचा नाश करण्याची शक्यता १० टक्क्याच्या वर जाणार नाही!" गिल्बर्ट ह्यांनी बैठकीच्या सुरुवातीलाच घोषणा केली. त्यांच्या ह्या वाक्याने विल्यम्स ह्यांच्या चर्चेवर भयाची स्पष्ट छटा उमटून गेली. जॉन्सनच्या चेहऱ्यावर मात्र ह्या वाक्याने फारसा काही फरक पडला नाही कारण आधीपासूनच अगदी गंभीर चेहऱ्याने ते ह्या बैठकीत आले होते. अभियान चंदन सक्रिय करण्याचा निर्णय त्यांनी बैठकीपूर्वीच्या काही मिनिटात मनातल्या मनात जवळपास घेतलाच होता. गिल्बर्ट ह्यांच्या ह्या वाक्याने त्यावर केवळ शिक्कामोर्तब झाले होतं. सर्वसाधारण परिस्थितीत अभियान चंदन सक्रिय करण्यासाठी नासा, अमेरिकेचे उपराष्ट्रपती आणि गुंतवणूकदार ह्यांची संमती घेण्याची एक प्रक्रिया ठरवून देण्यात आली होती. परंतु ही प्रक्रिया सद्यस्थितीत पाळणे शक्य नव्हते म्हणजे दीडशे लोकांच्या यादीवर एकमत होणे शक्य नव्हते. आणि मग सगळाच गदारोळ माजला असता. मग आता ही यादी ठरवायची तरी कशी हा मोठा गहन प्रश्न होता. नैतिकदृष्ट्या विचार केला तर हा मनुष्यजातीच्या पुढील प्रवासाचा प्रश्न असल्याने सर्व राष्ट्रांतील सर्व वंशाच्या लोकांना ह्या यादीत प्रतिनिधित्व देणे योग्य होते. परंतु पुढील आठवड्याच्या कालावधीत ह्या सर्व लोकांची गुप्तरित्या निवड करून त्यांना उड्डाण स्थळापर्यंत आणणे केवळ अशक्य काम होते. त्यामुळे जॉन्सन ह्यांनी मनातल्या मनात हा पर्याय रद्द करून टाकला. आता त्यांचा मेंदू अतिशय वेगाने काम करू लागला. आपण अभियान चंदन सक्रिय करत आहोत हे ज्यांच्याशिवाय हे अभियान तडीस नेणे शक्य नाही त्या लोकांव्यतिरिक्त कोणालाच कळून न देण्याचं त्यांनी ठरविले. त्याचवेळी ही माहिती ज्या लोकांपर्यंत पोहोचली आहे त्यांना कोणत्या तरी पर्यायी मार्गाच्या तयारीत गुंतवून ठेवणं आवश्यक होतं. आणि त्यासाठी जॉन्सन ह्यांना उल्काविनाश मार्गाशिवाय दुसरा कोणताच मार्ग दिसत नव्हता. हा मार्ग अगदी गांभीर्याने आपण घेत आहोत असे भासवायचे आणि त्याचवेळी चंदन अभियानामार्फत आपले कुटुंबीय, विश्वासू मित्रमंडळी आणि खासे अमेरिकन ह्यांना त्या ग्रहापर्यंत पोहोचवायची तयारी पूर्ण करायची अशी त्यांची योजना तयारसुद्धा झाली होती.

दिवस १ 

चीनच्या अध्यक्ष आणि कार्यकारिणी समितीची बैठक सुरु झाली तेव्हा स्थानिक वेळेनुसार सायंकाळचे ७ वाजले होते. अमेरिकन संरक्षण मंत्र्यासोबत झालेल्या बैठकीनंतर ह्या मोजक्या विश्वासू लोकांच्या वर्तुळात जबरदस्त खळबळ माजली होती. ही शक्यता खरी असल्याची त्यांनी आपल्या स्त्रोताद्वारे खात्री करवून घेतली होती. आता उल्केचा विनाश करण्याची जी अमेरिकेची योजना होती तिच्याविषयी चर्चा करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. "उल्केवर विनाशके कोणत्या क्रमाने सोडली जाणार? चीन आपली विनाशके सर्वात शेवटी वापरेल; ही अट मंजूर असेल तरच आम्ही यात सहभागी होऊ!" सदस्य वाँग तावतावाने बोलत होते. हे लोक कधी प्रगल्भ होणार असाच विचार अध्यक्ष हुवान हो ह्यांच्या मनात डोकावला.  पृथ्वीच्या अस्तित्वाचा प्रश्न जरी असला तरी इतक्या वर्षांची स्पर्धा, वैर ह्या संकटामुळे विसरून जाऊन सर्व देश निरागसपणे एकत्र येणार ह्यावर विश्वास ठेवण्याइतपत ते भोळेभाबडे नव्हते. पृथ्वीचा नाश झाला तरी चालेल पण कोणत्याही परिस्थितीत आपल्याकडील विनाशके ४० -५० टक्क्यांच्या पलिकडे कोणताही देश वापरून देणार नाही ह्यांची त्यांना मनोमन खात्री होती. त्यामुळे असल्या मुद्द्यावर चर्चा करण्यात वेळ घालविण्याची त्यांची तयारी नव्हती. जॉन्सन आणि अमेरिकन लोक ह्या एकाच योजनेवर विसंबून राहणार नाहीत हे ही त्यांना माहित होते. पण त्यांची गुप्त योजना ते लोक सहजासहजी सर्वांना सांगतील ह्याची त्यांना खात्री नव्हती किंबहुना ही अशी योजना गुप्तच राहील ह्याची त्यांना पुरेपूर खात्री होती. चंद्रावर आपली मनुष्य पाठविण्याची योजना अजूनही बाल्यावस्थेत आहे ह्याचे त्यांना ह्या क्षणी मनोमन दुःख झाले. 

इथे दिव्यांश मात्र जाम वैतागला होता. एक तर त्याला आपल्या कुटुंबाशी संपर्क साधण्याची परवानगी देण्यात येत नव्हती आणि दुसरे म्हणजे उल्केला पृथ्वीवर आदळू देण्यापासून थांबविण्याचे प्रयत्न नासातर्फे केले जाणार ह्याची त्याला  खात्री होती आणि त्यात आपल्याला अजिबात सहभागी केले जात नाहीये हे त्याचे मुख्य दुःख होते.अचानक त्या दोन बलदंड सैनिकांपैकी एक जिमी आणि दिव्यांश ह्यांच्या कक्षात प्रवेश करता झाला. "आपल्या दोघांना कुटुंबाशी विडीयो कॉलद्वारे संपर्क साधता येईल! तेव्हा तुम्ही माझ्याबरोबर चला!" दिव्यांश आणि जिमीला हा अगदी आश्चर्याचा सुखद धक्का होता. कार्यालयाच्या दुसऱ्या भागात गेल्यावर त्यांची एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गाठ पडली. "अचानक अतिमहत्वाचे काम आल्याने आम्हाला पुढील काही दिवस इथेच थांबावे लागेल" इतकेच बोला आणि बाकी मग कुटुंबियांची चौकशी तुम्ही करू शकता!" असे तो वरिष्ठ अधिकारी त्यांना बजावत होता. आपले प्रत्येक शब्द, वाक्य अगदी तपासून बघितला जाईल आणि मग काही सेकंदाच्या अवधीनंतरच तो आपल्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवला जाईल हे न समजण्याइतके हे दोघे दुधखुळे नव्हते. अचानक दिव्यांशच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. लहानपणी एखाद्या वरवर निरुपद्रवी वाटणाऱ्या संदेशातून गुप्तपणे खरा संदेश कसा पाठवायचा हा खेळ खेळण्यात तो माहीर होता. आता हाच खेळ प्रत्यक्षात खेळून खरी परिस्थिती सौमित्राला सांगण्याची नामी संधी त्याला अनायसे गवसली होती. 

जॉन्सन हे अण्वस्त्रांच्या सहाय्याने उल्काविनाश हाच ह्या खराखुरा मार्ग हे मोजक्या राष्ट्राध्यक्षांना पटवून द्यायचा आटोकाट प्रयत्न करीत होते. शेवटी दमून भागून त्यांनी काम बंद करण्याचा निर्णय घेतला. अतिभव्य अशा व्हाईट हाऊस मधील आपल्या बैठकीच्या खोलीत त्यांनी प्रवेश केला. फर्स्ट लेडी सुझन अगदी चिंताग्रस्त मुद्रेत बसल्या होत्या. हिला ह्या सगळ्या प्रकारातलं काही कळलं की काय जॉन्सन ह्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांच्या येण्याचीच वाट पाहत बसलेल्या सुझन ह्यांनी "टेक्सासचे तापमान खूपच वाढलं आहे, मी पुढील आठवड्यात तुमच्यासोबत नाही आले तर चालणार नाही का?" असा प्रश्न केला.  "म्हणजे हिला काही ठाऊक नाही तर!" टेबलवर ठेवलेल्या संत्र्याच्या रसाचा आस्वाद घेत घेत जॉन्सन ह्यांनी एक सुटकेचा निःश्वास टाकला. पण अचानक त्यांच्या मनात दुसरा विचार आला. इथे काही तासाचा आणि काही अंश सेल्सिअस मधला फरक ह्यांना झेपत नाही तर ह्या आपल्यासोबत एका परक्या ग्रहावर दोन प्रकाशवर्षे इतका प्रवास करून कशा येणार? आणि जर ह्या नसतील येणार तर मी स्वतः तरी जाणार का?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असले म्हणून काय इतका तणाव सहन करायची त्यांनाही सवय नव्हती. त्यामुळेच की काय बसल्या जागी सोफ्यावरच त्यांना डुलकी लागली. 
(क्रमशः)

शनिवार, २३ मे, २०१५

अघटित - भाग १


 
जिमी आणि दिव्यांश आपल्या आवडीच्या रात्रपाळीला आले होते. नासा मधील ही त्यांची नोकरी  आवडीची होती. अवकाशाचे निरीक्षण करणे, त्यातील हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रह ताऱ्यांच्या पृथ्वीसापेक्ष स्थितीची नोंद घेणे ह्या गोष्टींनी त्यांच्या रात्रपाळीची सुरुवात होई. हे कोणी त्यांना नेमून दिलेलं काम नसे. केवळ आपली एक आवड म्हणून ते ह्या सर्व गोष्टींची नोंद ठेवतआणि त्यानंतर मग मात्र ते गहन संशोधनात गढून जात. 
आजची रात्र सुद्धा नेहमीसारखीच सुरु झाली होती. जिमी आपल्या कॉफीचा कप घेऊन आपल्या टेबलावर येऊन बसला होता. त्याने आपला संगणक सुरु केला. दिव्यांश मात्र अजुनही आपल्या टेबलावरील गणपतीच्या मुर्तीची पुजा करण्यात दंग होता. "अरे आज अ[आपलं बरंच काम बाकी आहे. तुझी देवपूजा आटप लवकर!" जिमीच्या ह्या नेहमीच्या शुभप्रभात संदेशाकडे दिव्यांशने तसे दुर्लक्षच केलं. त्याची देवपूजा थोड्या वेळातच आटोपली आणि मग जिमीला तसंच काहीसं खट्याळ उत्तर द्यायला दिव्यांशने त्याच्याकडे आपली नजर वळविली.  जिमीचा चेहरा अगदी गंभीर झाला होता. 

दिव्यांश लगेच आपली खुर्ची सोडून जिमीच्या डेस्कवर गेला. "हे बघ, ही एक महाकाय उल्का अचानक आपल्या रडारवर उमटली आहे. जर का ही कालपर्यंत आपल्या रडारवर नव्हती आणि आज अगदी ठळकपणे दिसतेय म्हणजे तिने एका दिवसात अगदी मोठा पल्ला गाठला असणार." जिमीचे हे बोलणे ऐकून त्याची टर उडविण्याचा आपला इरादा दिव्यांशने बाजूला सारला. लगबग आपल्या डेस्कवर जाऊन त्याने संगणकात डोके खुपसलं. ह्या उल्केचा वेग आणि तिची दिशा ह्याचे अचूक गणित मांडणे आवश्यक होते. आणि हे गणित मांडण्याच्या अचुकतेमध्ये ह्या जोडगोळीचा हात धरणारं तरी कोणी नव्हतं. 
पुढचे सात तास आणि ३७ मिनिटे ही जोडगोळी जागची हलली नाही. दोघातला संवाद सुद्धा फक्त संगणकाद्वारेच चालू होता. नियमानुसार त्यांना ही गोष्ट आपल्या वरिष्ठांना तात्काळ कळविणे आवश्यक होते. परंतु 
पूर्ण माहितीशिवाय अहवाल पाठविणे त्यांच्या कार्यपद्धतीत बसत नसल्याने त्यांनी पहिला अहवाल पाठविण्यास जवळजवळ १ तास घेतला होता. त्यांचा रिपोर्ट वरिष्ठांना पोहोचला आणि तात्काळ सर्व वातावरण हादरून गेलं होतं. एव्हाना मध्यरात्र झाली असली तरी पुढील अर्ध्या तासात नासाची वरिष्ठ मंडळी ह्या जोडगोळीच्या मागे उभी होती. जवळपास प्रत्येक सव्वा तासाच्या अंतराने हे दोघे अहवाल पाठवत होते आणि प्रत्येकाच्या मनातील जी भीती होती ती खरी ठरण्याची चिन्हे दिसू लागली होती. त्यांनी सहावा तास संपत येताना पाठविलेला अहवाल नासाचे प्रमुख विल्यम्स ह्यांच्या हातात पडला आणि त्यांनी अमेरिकेच्या प्रेसिडेंटना फोन लावण्याचा निर्णय घेतला. 
जोडगोळीचा अंतिम रिपोर्ट सकाळी साडेचार वाजता निघाला. तोवर ह्या सर्व अहवालांची पर्यायी स्त्रोतांच्या आधारे तपासणी करण्याचे काम समांतरपणे चालूच होते. ह्या जोडगोळीच्या गणिती कारभारात काही चूक असल्याची जी काही अंधुक आशा होती तीही पाच वाजेस्तोवर संपुष्टात आली. ह्या दोघांची गणिते अचूक होती. त्याही स्थितीत विल्यम्स ह्यांना ह्या दोघांचा अभिमान वाटला.  इतक्या सततच्या क्लिष्ट गणिती  आकडेमोडीने दोघे अगदी थकून गेले होते. कॅफेटेरिआ मध्ये जाऊन गप्पा मारून काहीसं मोकळं होण्याचा दोघांचा इरादा होता. आणि त्या इराद्यानुसार ते दोघे आपल्या जागेवरून उठले सुद्धा! मागे वळून पाहतात तो दरवाज्याबाहेर दोन धट्टेकट्टे सैनिक उभे होते. "सभ्य गृहस्थांनो, आपण हा कक्ष सोडून जाऊ शकत नाहीत. कोड रेड लागू करण्यात आला आहे. आपला बाकीच्या नागरिकांशी संपर्क पुढील सूचनेपर्यंत बंद करण्यात आला आहे. आपल्याला आवश्यक असणाऱ्या सर्व गोष्टी तुम्हांला इथेच आणून दिल्या जातील." त्या दोघातील एक अगदी यांत्रिकपणे हे बोलून दाखवत होता. "अरेच्चा, गेले सात तास भर केवळ आपण ह्याच्या कडे गणिती आव्हान म्हणून पाहिलं; त्याच्या व्यावहारिक गांभिर्याकडे आपलं लक्षच कसं वेधलं गेलं नाही!" काहीशा गंभीर स्वरात जिमी म्हणाला. 
प्रसाधनगृहात जायचं त्यांना इतका वेळ भान राहिलं नव्हतं पण आता जिमीच्या ह्या उदगारांनी मात्र ते दोघे पुरते भानावर आले. "नशीब म्हणायचं, प्रसाधनगृह आपल्याला स्थानबद्ध केलेल्या भागातच आहे!" दिव्यांशच्या मनात विचार आला. तिथे जाऊन तो परतला तर जिमी बर्गर हादडताना त्याला दिसला. इतक्या गंभीर परिस्थितीत सुद्धा जिमीची खाण्यावरील श्रद्धा पाहून दिव्यांशने त्याला मनोमन नमस्कार केला. आपल्या डेस्कवर गेल्यावर मात्र त्याला आश्चर्याचा धक्काच बसला. त्याचा आवडता गरमागरम मसालाडोसा अगदी सांबर, चटणी सकट त्याच्या डेस्कवर होता. ह्यांना आपली आवड कशी माहित झाली ह्याचा त्याला क्षणभर उलगडा झाला नाही. "आपले सर्वांचे मोजके दिवस बाकी राहिलेत म्हणून त्यांनी आपली आवड पूर्ण करायचे ठरविलेले दिसतेय!" जिमीच्या ह्या बोलण्याने त्याला उलगडा झाला. म्हणजे त्यांनी ही आपली सर्व माहिती खास वैयक्तिक डेटाबेसमधून घेतली असणार. "अरे म्हणजे मग सौमित्राची माहिती ह्या लोकांनी काढली असणार!" ह्या विचारांनी त्याला एकदम धक्का बसला. सौमित्राची आपल्याला इतका वेळ आठवणच कशी आली
नाही ह्या विचारांनी त्याला काहीसं अपराधी वाटलं. तो तसाच खिडकीपाशी आला. संपूर्ण इमारतीला एव्हाना खास सुरक्षादलाने वेढलं होतं. सैनिकांची तयारी आणि खाश्या सैनिकांचा गणवेश पाहता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ह्या इमारतीत आले असल्याच्या शक्यतेला वाव होता. 
"सभ्य गृहस्थहो!" राष्ट्राध्यक्षांनी आपल्या धीरगंभीर स्वरात बोलण्यास सुरुवात केली. "ही महाकाय उल्का जर आपण संशोधित केलेल्या मार्गाने आणि अंदाजित वेगाने प्रवास करीत राहिली तर बरोबर १६५ व्या तासाला पृथ्वीवर आदळेल. तिच्या आकाराच्या आणि द्रव्याच्या घनतेचा विचार करता आपली भूमाता ह्या धक्क्यातून वाचण्याची शक्यता शून्य आहे." त्यांचे हे भाषण ऐकण्यासाठी त्यांच्यासमोर नेहमीप्रमाणे शेकडो लोकांचा जमाव नसून केवळ नासाचे अध्यक्ष विल्यम्स आणि अमेरिका सेनाप्रमुख गिल्बर्ट हे दोघेच होते. 
"गिल्बर्टमहाशय आपल्याजवळील सर्व क्षेपणास्त्रे, अण्वस्त्रे आणि अणुबॉम्ब ह्या उल्केच्या मार्गात नेऊन त्याच्या आधारे तिचा विनाश करण्याची शक्यता कितपत आहे?" राष्ट्राध्यक्ष जॉन्सन ह्यांच्या प्रश्नाला गिल्बर्ट ह्यांचा क्षणभर प्रतिसाद आला नाही तेव्हा राष्ट्राध्यक्षांच्या चर्येवर काहीशा आठ्या उमटल्या. "ही शक्यता शुन्य पूर्णाक शून्य सात टक्के आहे" पुढील क्षणाला गिल्बर्टह्यांनी आपल्या नेहमीच्या सवयीनुसार उत्तर दिलं. "आणि चीन, भारत, युरोपियन देशांची मदत घेतल्यास? " जॉन्सन ह्यांनी पुढचा प्रश्न विचारला. 
"हे शोधून काढण्यास मला तासाभराचा अवधी लागेल" गिल्बर्टह्यांनी नम्रपणे उत्तर दिले. 
"ठीक आहे! आपली पुढील बैठक सव्वा सहा वाजता!" आपल्या घड्याळाकडे पाहत जॉन्सन म्हणाले. ही बैठक आटपून जॉन्सन आपल्या कक्षात विश्रांतीला गेले. भल्या पहाटे उठविले गेल्याने त्यांना काहीसा आळस आला हे जरी खरे असले तरी एव्हाना त्यांची झोप पूर्ण उडाली होती. गुप्त अभियान चंदन अमलात आणावे लागेल ह्याची लक्षणे त्यांना स्पष्टपणे दिसू लागली होती. ह्या अभियानात सुटका करू जाऊ शकणाऱ्या मोजक्या दीडशे लोकांची निवड बाकी कोणाला कळू न देत कशी करायची हा मोठा यक्षप्रश्न त्यांच्या समोर होता!!
(क्रमशः)

रविवार, १० मे, २०१५

Generic Medicine - चर्चासत्र


 
वसईतील जागरूक नागरिक संस्था आणि सुविचार मंच ह्यांच्या विद्यमाने वसईतील बंगली येथील लोकसेवा मंडळ हॉल इथे रविवार दिनांक १० मे रोजी सकाळी १० वाजता जेनेरिक मेडिसिन ह्या विषयावर एक परिसंवाद योजण्यात आला होता. ह्या परिसंवादात डॉक्टर, केमिस्ट आणि शासन ह्या तीन महत्वाच्या संस्थांच्या प्रतिनिधींना आपले विचार मांडण्यासाठी बोलावण्यात आले होते. डॉक्टर वर्गाचे प्रतिनिधित्व वसईतील सुप्रसिद्ध डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी, केमिस्ट वर्गाचे प्रतिनिधित्व पालघर जिल्ह्यातील केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष श्री. अनीस शेख ह्यांनी तर शासनाचे प्रतिनिधित्व श्री. गिरीश हुकरे ह्यांनी केलं. ह्या परिसंवादात चर्चिल्या गेलेल्या काही महत्वाच्या मुद्द्यांचा हा आढावा. 

फादर फ्रान्सिस दिब्रिटो ह्यांना ह्या परिसंवादाच्या आरंभी आपले विचार मांडण्यासाठी पाचारण करण्यात आले. त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना सक्रियपणे औषध क्षेत्रातील अन्यायाविरुद्ध, पाडल्या जाणाऱ्या चुकीच्या रूढीविषयी आवाज उठविण्याचे आव्हान केले. जर आपण संघटितपणे ह्या विषयी आवाज उठवला तर नक्कीच परिस्थिती बदलू शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

त्यानंतर डॉक्टर संयोगिता तवकर ह्यांनी आपले विचार मांडले. 
डॉक्टर संयोगिता तवकर
आपल्या डॉक्टरच्या कंपाउंडरने कधीकाळी आपणास जर पुड्यांमध्ये बांधून औषध दिली असतील तर ती आपली जेनेरिक औषधांशी पहिली ओळख. प्रत्येक औषधास तीन प्रकारची नावे असतात असे आपण म्हणू शकतो. 
  • त्या औषधाच्या molecular structure वरून त्याचे पडलेले रासायनिक नाव. 
  • ज्या वेळी एखादे औषध एका विशिष्ट देशातील मानद संस्थेच्या प्रमाणास पात्र ठरते तेव्हा ती संस्था त्या औषधास जे नाव देते त्यास जेनेरिक नाव म्हटले जाते.  
  • ज्या वेळी एखादी कंपनी ह्या औषधाचे पेटंट मिळविते त्यावेळी त्या कंपनीने उत्पादित केलेल्या नावास BRANDED नावाने ओळखले जाते. 
उदाहरण द्यायचे झाले तर क्रोसिन हे एक branded नाव असून PARACETAMOL हे त्याचे जेनेरिक नाव आहे. ह्याचे रासायनिक सूत्र C44H64O24 हे आहे. 
ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीत बरीच तफावत आपणास आढळून येते. ह्या मागील कारण -
कंपनीला अचूक रासायनिक सूत्र शोधून काढण्यासाठी बऱ्याच वर्षाचे संशोधन करावे लागते. ह्या संशोधनामध्ये लक्षावधी डॉलर्स खर्च होतात. इतक्या अथक परिश्रमानंतर त्या ब्रैंडेड औषधाच्या जाहिरातीवर सुद्धा बराच पैसा खर्च करावा लागतो. ह्या मुळे ही कंपनी ज्या वेळी आपले उत्पादन विक्रीस काढते त्यावेळी त्याची किंमत बरीच जास्त असते. ह्या सर्व बाबी लक्षात घेता पेटंट मिळालेल्या कंपनीला पुढील काही वर्षे ह्या औषधाच्या उत्पादनाचा अनिभिषिक्त हक्क दिला जातो. 
पेटंटचा कालावधी संपल्यानंतर बाकीच्या कंपन्या ह्या औषधाचे उत्पादन करू शकतात त्यावेळी ती जेनेरिक ह्या नावाने ओळखली जातात. त्यांना संशोधनावर पैसा खर्च करावा न लागल्याने ह्या औषधांच्या किंमती तुलनेने कमी असतात. 
त्यानंतर डॉक्टर संयोगिता ह्यांनी जेनेरिक औषधाची व्याख्या सांगितली. ह्या औषधाचे गुणधर्म हे मूळ औषधाच्या गुणधर्मासारखेच असायला हवेत. FDA चा प्रमाणित करण्याचा निकष हा ब्रैंडेड आणि जेनेरिक ह्या दोन्हीसाठी सारखाच असतो. 
गोरेगाव येथील प्रबोधन औषधपेढी ही जेनेरिक औषधांची विक्री करते. जेनेरिक औषधांचा वापर केल्यास वयस्क माणसांच्या उपचाराचा खर्च जवळजवळ २० टक्क्यावर आल्याचे (८० टक्क्यांनी कमी) आढळून आले आहे.
सध्या अमेरिका जेनेरिक औषधांवर जवळपास ३०० बिलियन डॉलर्स खर्च करते. अमेरिकेच्या FDA ह्या मानद संस्थेने २९० जेनेरिक औषधांचा वापर प्रमाणित केला आहे; त्यातील ११० औषधे नामांकित भारतीय औषध कंपन्या उत्पादित करतात आणि ती मग अमेरिकेत जेनेरिक म्हणून विकली जातात. 
Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मात्र जेनेरिक औषधांचा वापर करताना दक्षता घ्यावी लागते. अशा प्रकारच्या औषधात अगदी तीव्र संहितेचा कमी मात्रेतील डोस दिला जातो. त्यामुळे ह्या औषधांच्या रासायनिक संरचनेत १००% अचूकता अपेक्षित असते. जेनेरिक औषधांना ह्या बाबतीत काही टक्क्यांमध्ये फरक असल्याची मुभा असल्याने हा फरक Narrow Therapeutic Index औषधांच्या बाबतीत मान्य केला जात नाही. 
अनिस शेख (केमिस्ट संघटना अध्यक्ष)
अमीर खान ह्यांच्या सत्यमेव जयते ह्या कार्यक्रमाने जेनेरिक औषधाविषयी जागृती निर्माण केली. आपल्या ग्राहकांना कमी किमतीमध्ये औषधे मिळावी असाच केमिस्ट लोकांचा दृष्टीकोन असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. भारतातील औषध कायद्यानुसार डॉक्टरांनी लिहून दिलेलेच औषध देणे केमिस्टवर बंधनकारक असते. त्यामुळे आम्हांवर सुद्धा मर्यादा येतात. पूर्वी फॅमिली डॉक्टर असायचा आता फॅमिली फार्मासिस्ट (Pharmacist) असायला हवा जो आपणास योग्य जेनेरिक औषध सुचित करू शकेल. जेनेरिक औषधांच्या वापराने सामान्य नागरिकाचा उपचारांवरील खर्च नक्कीच कमी होईल. 
गिरीष हुकरे 
आपणांपैकी कितीजणांस अन्न आणि औषध प्रशासनाविषयी माहित आहे असा प्रश्न विचारून त्यांनी आपल्या भाषणांची सुरुवात केली. दैनंदिन वापरातील बऱ्याच गोष्टींच्या दर्जाची जबाबदारी माझी / माझ्या गटाची आहे. स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे उलटून गेली तरी दुसऱ्यास दोष देण्याचा खेळ आपण खेळत आहोत. आपण आपल्या भोवतालच्या परिस्थितीचा ताबा घेतला पाहिजे. त्यासाठी सम्यक विचारांचा आपणास आधार घ्यावा लागेल. भारताला जगाची फार्मसी म्हणून ओळखलं जात. जगातील १० टक्के औषधे भारतात उत्पादित होतात. IT क्षेत्रानंतर परकीय चलन मिळवून देणारे हे दुसऱ्या क्रमाकांचे क्षेत्र आहे. ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधांच्या किंमतीतील तफावतीबाबत बोलताना डॉक्टर संयोगिता ह्यांनी सांगितलेल्या कारणांबरोबरच मेडिकल प्रतिनिधी, डॉक्टरांना पुरस्कृत केल्या जाणाऱ्या विविध सवलती ह्या खर्चाचा सुद्धा ब्रैंडेडऔषधांच्या किमती वाढीस लागण्यास हातभार लागतो. ६५% भारतीय औषधांच्या उच्च किंमतींमुळे उपचारांपासून वंचित राहतात. औषधउपचारांवरील खर्च हे भारतीय लोक कर्जबाजारी होण्याचे दुसऱ्या क्रमांकाचे कारण आहे. भारतीय लोक भावनिक असतात, उपचारासाठी सोने, शेतजमीन वगैरे गहाण टाकण्याची आपली मनोवृत्ती असते. भारतात आरोग्यविमा ही संकल्पना अजूनही फारशी प्रचलित नाही त्यामुळे ७९% टक्के भारतीय हे उपचारांचा खर्च स्वतःच्या खिशातून करतात. केमिस्ट लोक ब्रैंडेडऔषधांच्या विक्रीतून जो फायदा कमावतात त्यातील काही हिस्सा त्यांनी सामान्य लोकांसोबत विभागून घ्यायला हवा. कोणत्याही उपचारपद्धतीत तीन D महत्त्वाचे आहेत ते म्हणजे Doctor, Diagnostic and Drug. त्यांनी डॉक्टरांना रुग्णांची जेनेरिक औषधांविषयीची जाणीव वाढविण्याचे आव्हान केले. केवळ जेनेरिक औषधे कमी किंमतीत मिळतात म्हणून ती कमी दर्जाची आहेत असे समजू नकात. बऱ्याच वेळा ब्रैंडेड आणि जेनेरिक औषधे एकाच ठिकाणी उत्पादित होतात पण ती रुग्णांपर्यंत दोन वेगळ्या मार्गांनी पोहोचतात. केवळ केमिस्टने डॉक्टरने सूचित केलेल्या औषधापेक्षा दुसरे औषध दिले म्हणून त्यावर कारवाई केली जात नाही; बऱ्याच वेळा रुग्णास चुकीच्या औषधामुळे झालेला त्रास हा ह्या कारवाईमागचा मुख्य घटक असतो. काही चुकीचं घडलं म्हणून रुग्णांनी, त्यांच्या नातेवाईकांनी  डॉक्टरांविरुद्ध प्रक्षोभक प्रतिक्रिया देण्याचे टाळावे असे आव्हान त्यांनी केलं. 
प्रश्नोत्तरे 
१> मी तुम्हांला ब्रैंडेड औषध लिहून दिलं आहे. जर तुम्हांला जेनेरिक औषध घ्यायचं असेल तर ते तुमच्या जोखमीवर घ्या असे डॉक्टरनी सांगितल्यास काय करावे?

उत्तर - ह्या मागे बऱ्याच वेळा डॉक्टरचे अज्ञान असू शकते. आजच्या परिसंवादासारखा परिसंवाद डॉक्टर वर्गासाठी सुद्धा आयोजित केला जावा असे आव्हान डॉक्टर संयोगिता ह्यांनी केले. 
२> ब्रैंडेडऔषधाचा पुरस्कार करण्यामागे डॉक्टरांचा आर्थिक फायदा हे कारण असू शकते काय? (काहीसा नाजूक प्रश्न)
उत्तर - ही शक्यता कमी असते. जेनेरिक औषधाच्या उपलब्धतेविषयी डॉक्टरचे अज्ञान हा बराच वेळा मुख्य घटक असतो. 
डॉक्टर आणि रुग्ण ह्यांच्यातील सुसंवाद, विश्वास हा मुख्य घटक आहे जो जेनेरिक औषधांच्या वापरास चालना देऊ शकेल. आपले prescription स्वतःहून नुतनीकरण करण्याची जी वृत्ती असते तिचा जनतेने त्याग करावा. मेडिकल दुकानात prescription  शिवाय जाऊन केवळ आपल्या ज्ञानाच्या जोरावर औषधे घेणे टाळावे. ह्या सर्व गोष्टीवर अन्न आणि प्रशासन विभाग लक्ष ठेऊ शकत नाही. 
काही वेळा रुग्ण डॉक्टरची फी द्यायच्या परिस्थितीत नसतो. अशा वेळी त्यांना आम्ही Over The Counter  औषधे देतो असे शेख म्हणाले.  
खरेतर औषधे ही फार्मासिस्टच्या उपस्थितीतच विकली जावीत. जनतेने इन्स्पेक्टरची भूमिका बजावत दुकानात फार्मासिस्ट कोठे आहे असा प्रश्न विचारावा. ज्याचा फोटो दुकानात फार्मासिस्टलावला आहे तो आणि विक्री करणारा हे दोघेही सारखे असल्याची पडताळणी करून घ्यावी. आपणास प्रश्न विचारायला शिकायला हवे असे श्री. हुकरे म्हणाले. 
३> सध्या भ्रमणध्वनीवर एक नवीन अँप विकसित करण्यात आले आहे. अन्न आणि प्रशासन विभागाची त्यास मान्यता आहे काय?
उत्तर - ह्याला कायदेशीर मान्यता द्यायचा सध्यातरी विचार नाही. स्पेलिंग लिहिण्यात रुग्णाने केलेली चूक जीवघेणी ठरू शकते. त्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेतल्याशिवाय स्वतःहून औषध घेऊ नये. 
४> Bio availability and Bio equivalence - ह्या विषयीचे भारतातील स्थिती काय आहे?
उत्तर - भारतात ह्या विषयावर संशोधन सुरु आहे. 
५>  ब्रैंडेडऔषधे MRP लाच का विकली जातात? त्यावर सूट का मिळत नाही?
उत्तर - केमिस्ट वर्गाला ब्रैंडेडऔषधाच्या विक्रीतून भरमसाट फायदा मिळतो हा गैरसमज आहे. केमिस्ट वर्गाला १६ - २०% टक्के फायदा मिळतो. बाकीचा खर्च वगळल्यास हे प्रमाण अगदी नगण्य राहते. फायद्याचा मोठा हिस्सा उत्पादन करणारी कंपनी घेते आणि म्हणून सूट देणे केमिस्टला परवडत नाही 
चिन्मयने वसईतील एका इंग्लंडहून शिकून आलेल्या आणि तिथे सराव केलेल्या डॉक्टरचा अनुभव सांगितला. १९६० - ७० च्या सुमारास अगदी प्रभावी असलेल्या औषधाचे कालांतराने जेनेरिक रूप बाजारात आले आणि मग ह्या औषधाची प्रभावितता इतकी कमी झाली की हल्ली ते बाजारात कोणास ठाऊक सुद्धा नाही. ह्या अनुभवावर आपली प्रतिक्रिया देताना तज्ञांनी अनेक औषध कंपन्याचे फुटलेले पेव हे ह्या मागचं कारण असू शकतं असं प्रतिपादन केले. नामांकित औषध कंपन्या अजूनही चांगली उत्पादने निर्मित करीत असल्याचा अनुभव आहे. 
६> Anti Biotics (बहुदा प्रतिजैविक हा मराठी शब्द) औषधांचा प्रभावीपणा कालांतराने कमी होत असल्याचे माहित असताना सुद्धा त्यांना २० वर्षाचे वगैरे पेटंट देणे कितपत योग्य आहे असाही प्रश्न करण्यात आला. 
बाकी शेवटी मग तज्ञांनी काही साध्या पण महत्वाच्या सूचना केल्या. आपले आजार डॉक्टरपासून लपून ठेवू नयेत. चुकीचे औषध स्वतःहून घेतल्यास त्याचे भयंकर दुष्परिणाम होतात त्यामुळे ते टाळावे. आपल्याला ताप वगैरे आल्यास त्याच्या वेळेनुसार नोंदी ठेवाव्यात; योग्य औषध लिहून द्यायला डॉक्टरला मदत होते. औषधांची वैधता कितीपर्यंत आहे हे नक्की पाहावे. चिन्मयने वसईतील डॉक्टरना prescription कसे द्यावे ह्यासाठी एक standard form तयार केला गेला असल्याची घोषणा करून डॉक्टरांना तो वापरण्याची विनंती केली. 
शेवटी आभारप्रदर्शन आणि राष्ट्रगीतानंतर एका सुंदर कार्यक्रमाची सांगता झाली. 
(हे माझे क्षेत्र नसल्याने नोंदी घेताना चूक झाल्यास क्षमस्व! कार्यक्रमास हजर असलेल्यानी चुका मला सांगाव्यात जेणेकरून त्या दुरुस्त करता येतील! धन्यवाद!!) 

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...