गेल्या आठवड्यात लाईफ ऑफ पाय हा चित्रपट बघितला. चित्रपटाच्या आरंभीच येणारे नितांत सुंदर गाण, पोंडेचरीतील वसाहतकालीन शांत जीवन, सुंदर तब्बू सारे काही मस्त. त्यानंतरचे छायाचित्रणातील अद्भुत करामती. माणसाची कल्पनाशक्ती आणि संगणकाची तंत्रे वापरून विविध सुंदर देखावे निर्माण केले गेले आहेत. मानवाच्या मर्त्य जीवनापलीकडे काही असल्यास ते कसे असेल ह्याची विविध लोक वेगवेगळी चित्रे रंगवतात. ह्या चित्रपटातील छायाचित्रणातील अद्भुत करामती पाहून आपणही ह्या वेगळ्या विश्वाची आपल्या परीने चित्र रेखाटू शकतो.
चित्रपटाच्या शेवटी नायक कथेला थोडी रूपकात्मक जोड देण्याचा प्रयत्न करतो. परंतु हा चित्रपट कथानकाच्या पातळीवर भयंकर मार खातो. तंत्रज्ञानाची खूप उंची गाठलेल्या ह्या चित्रपटाने कथेच्या बाबतीत इतका मार खाल्ल्याचे पाहून वाईट वाटते. मग आठवला तो जब तक हैं जान हा चित्रपट. तो ही तसाच. कथानकाच्या पातळीवर सगळी बोंब. मग आठवले ते ह्या वर्षी सुद्धा विकत घेतलेला दिवाळी अंकांचा संग्रह. पूर्वी वाचलेल्या दिवाळी अंकातील दीर्घ कथेच्या आठवणीने मी दर वर्षी दिवाळी अंकाचा संच विकत घेतो आणि दर वर्षी निराशाच पदरी पडते. केबल टीवी वर वर्ल्ड मूवी नावाची एक वाहिनी येते. त्यातील तंत्रज्ञानाच्या प्राथमिक पातळीवर असणारे पण कथानकाच्या आणि कथेतील व्यक्तिमत्वाच्या रंगछटा रंगविण्याच्या बाबतीत विलक्षण पातळी गाठलेले चित्रपट आठवतात. एकंदरीत काय तंत्रज्ञान आणि सर्जनशीलता विरुद्ध दिशेने जात असाव्यात असा मी घाईघाईने निष्कर्ष काढतो.