स्थळ - अहमदाबाद कसोटी मैदान
दिनांक - २६ फेब्रुवारी २०२१
वेळ - सकाळी ७ वाजता
रुट भल्या पहाटे जॉगिंगसाठी मैदानावर येतो. तिथं विराट आधीच उत्साहानं मैदानाला फेऱ्या मारत असतो. रुट त्याला पाहुन मंदस्मित देतो. त्याला पाहुन विराट आपलं धावणं थांबवतो आणि त्याच्याजवळ येतो.
विराट - "भिडु काय म्हणतोस?"
रुट - "काय म्हणणार साहेबा ! रात्रभर डोळ्याला डोळा नाही लागला !"
विराट - "अबे काय झालं? झालं काय तुला ?"
रुट - "पाहुण्यांना वागविण्याची ही काय रीत झाली? लहानपणी आईनं सांगितलेल्या कोल्हा आणि बगळा ह्यांच्या खिरीच्या गोष्टीसारखा हा प्रकार झाला !"
विराट - (चेहऱ्यावर आलेलं हसु महत्प्रयासानं दाबुन ) "अरे तुझ्या आईनं पण तुला सांगितलेली ही गोष्ट !! मला नव्हती सांगितलेली माझ्या आईनं ! पण मागे एकदा अजिंक्यने संत्रा ज्यूसचे चार-पाच प्याले रिचविले तेव्हा त्याला चढल्यावर त्यानं ही गोष्ट सांगितली होती आम्हां सर्वांना !"
रुट आपलं सारे दुःख विसरुन खो खो हसु लागतो.
विराट - "अबे हसतो काय ?"
रुट - "तुम्ही एक तर पार्टीत संत्राज्युस पिता आणि वर असल्या गोष्टी ऐकता !!"
विराट - "ती मुंबईची बाळबोध पोरं रे ती !ते जाऊ दे ! तुला इतकं तोंड मारुन बसायला काय झालं ? जिंदगीत पुन्हा कधी आठ धावांत पाच बळी मिळणार नाहीत हे लक्षात ठेव समजलं ?"
रुट - (हळुवार शब्दांत) "हो रे ! पण काही झालं तरीआपण कप्तान! वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी महत्वाची हो कि नाही?"
विराट - "हो ते ही खरंच !"
रुट - "पण विराटभाई मला एक सांग ! तू पण एक ओव्हर टाकुन बघायची नाही का ? जिंदगीत कसोटी सामन्यात विकेट मिळविण्याची ह्याहून उत्तम संधी मिळणार नाही कधी !"
विराट - "येडा समजला तु मला ! तुझ्या त्या बेन स्टोकचे टाळकं आधीच फिरलेले असते आणि मला समोर पाहुन सहा षटकार वगैरे मारले असते तर सामना फिरला नसता का रे भाऊ?"
रुट - "ते पण खरं रे !"
विराट - (हळुवार शब्दांत) - "खरं सांगु , माझ्या मनात तो विचार आलेला रे मुळे !"
रुट - "मुळे कुठे आला इथं !"
विराट - "तुच रे तो ! पण हे अक्षर आणि अश्विन जबरदस्त लबाड ! सहाव्या चेंडूनंतर माझ्याकडं पाहतच नव्हते! थेट दुसऱ्याला चेंडु द्यायचे ! नाहीतर आयुष्यातील पहिली विकेट मिळाली असती ना रे भाऊ ! "
रुट - "हो असतात दुःख एकेकाची ! बाकी तुझं नशीब जबरदस्त रे भाऊ !"
विराट - "ते कसं काय ?"
रुट - "आख्या सामन्यात तुझ्या त्या पुजाराने ना एक धाव केली ना तुझ्या त्या बुमराहने एक बळी घेतला ! तरीही तु दहा विकेटने जिंकला ना रे ! तुझा तो रोहित काय खाऊन आलाय माहिती नाही !"
विराट - (डोळे विस्फारुन पाहत) - "खरंच की रे भाऊ ! "
रुट - (पुन्हा एकदा हळुवार स्वरात ) "विराट, ते ढोकळे तयार झाले असतील का रे ! मगाशी इथं यायच्या आधी पहिला कॅटीन मध्ये जाऊन आलो ! तर तो म्हणाला थोडा वेळानं ये !"
विराट - "काय माहिती! मी पण जाऊन पाहून आलेलो ! जरा जास्त जातील म्हणुन मैदानाला अधिकच्या दोन फेऱ्या मारल्या रे ! इतकं खिदीखिदी हसायला काय झालं !"
रुट - "तेच म्हटलं, भाऊ सामना जिंकल्यावर दुसऱ्या दिवशी इतक्या लवकर मैदानावर आला कसा ?"
विराट - "काय सांगु ! त्या अनुष्काला ब्रेकफास्ट काय जमत नाय रे आधीच ! इतके दिवस लॉकडाऊन मध्ये कसे काढले माझे मलाच माहिती ! आणि आता वामिका आल्यावर तर काय बघायलाच नको ! त्यामुळं जितके दिवस बाहेर आहे तोवर चांगलं दणकुन ब्रेकफास्ट करतो म्हणतो !"
रुट - "विराट भाऊ, तुझं गणित कसं आहे रे ?"
विराट - (रागानं ) - "xxx - नको ते विषय काढायचे नाहीत मुळ्या !!"
रुट - दचकुन - "सॉरी तसं नाही रे माझं गणित जरा कमकुवत आहे म्हणुन म्हटलं विचारावं !"
विराट - "ठीक आहे ठीक आहे ! मॅटर काय आहे ! म्हणजे आपलं गणित थोडं कच्चं असलं तरी आपला आत्मविश्वास सॉलिड आहे !"
रुट - "म्हणजे ह्या पिंक बॉलचा आणि वर्गमूळ / वर्गचा काही संबंध तर नाही ना !"
विराट - "समजेल असे बोल रे मुळ्या !"
रुट - "म्हणजे बघ ! ऍडलेडला तुम्ही छत्तीसला सर्वबाद झालात !"
विराट - (अगदी भडकुन ) - "xxx - नको ते विषय काढायचे नाहीत मुळ्या !!"
रुट - "ऐकुन तर घे रे कोहली ! म्हणजे बघ आम्ही सुद्धा इथं ८१ ला सर्व बाद झालो ! तुम्ही एकही गडी न गमावता ४९ धावा करुन जिंकलात !"
विराट - (थोडा शांत होत) "मग ह्यात काय मोठं ?"
रुट - "ते मला पण समजलं नाही पहिल्यांदा भाऊ ! पण काल रात्री आमचा तो संख्यातज्ञ मला सांगत होता ३६, ८१, ४९ बघा हे सारे पुर्ण वर्ग ! हा स्कोर पिंक बॉलच्या सामन्यातच का होत असावा ?"
विराट - "पुर्ण वर्ग ! ओह हो !"
रुट - "समजलं नसेल तर इथं थेट बोलायचं रे ! नाटकं करायला ही पत्रकार परिषद नाहीये !३६ म्हणजे सहा गुणिले सहा ! ८१ म्हणजे नऊ गुणिले नऊ ! ४९ म्हणजे सात गुणिले सात !"
विराट - "ओह माय गॉड ! ओह माय गॉड !"
रुट -" तो अजुन एक म्हणाला भारताची पहिल्या डावातील संख्या १४५ = १२ चा वर्ग + १ चा वर्ग ! तुमच्याकडे कोणी आहे की नाही संख्यातज्ञ वगैरे !"
विराट - ताठ मानेनं - "आहेत ना ! बरेच आहेत ! पैसेवाले बोर्ड आहे आमचे !मसालाडोसा खाल्यावर माझी सरासरी किती आणि इडली खाल्ल्यावर किती ह्याचे सॉलिड डिटेल्स आहेत आमच्याकडे ! पण आम्ही शेअर नाही करत ! सॉलिड सीक्रेट आहे ते !"
रुट - "कामाचे काही सांगतात का ते ?"
विराट - "अचानक दुःखी होत - त्याला अक्कल नाही ! नको ते आकडे त्यानं रवी अंकलला दाखविले आणि इतका दहा विकेटने सामना जिंकुनसुद्धा रवी अंकल मला ओरडले ! "
रुट - (खुश होत) "काय म्हणाला तो?"
विराट - "कोणाला सांगणार नसशील तर सांगतो !"
रुट - "नाही सांगणार ! देवाशप्पथ !!"
विराट - "तो म्हणाला पहिल्या डावात इंग्लंड ७४ ला २ अशा स्थितीत होते. तिथुन ११२ ला सर्वबाद आणि दुसऱ्या डावात ८१. म्हणजे ७४ ला २ नंतर नंतर पहिल्या डावातल्या आठ आणि दुसऱ्या डावातल्या दहा अशा अठरा विकेट केवळ ११९ धावांत गेल्या !"
रुट -" xxx - आमचे फलंदाज इतके भयंकर आहेत आता कळलं मला ! पण ह्याच्यात तुला ओरडण्यासारखे काय होते ?"
विराट - "ते रवी अंकल ! आधीच ड्राय स्टेट मध्ये असल्यानं टाळकं फिरलंय त्यांचं ! पुढे काय होणार माहिती नाही ! ते म्हणाले, तुला अक्कल नाही विराट! इशांतची शंभरावी कसोटी म्हणुन त्याला मानाचं एक षटक देऊन पहिल्या डावात सुद्धा अश्विन / अक्षरलाच पुर्ण गोलंदाजी द्यायची नाही का?"
रुट - "पॉईंट आहे ते म्हणाले त्यात !"
विराट - (रागाने) "काय ?"
रुट - (उभा राहत, पवित्रा घेत) "तुला अक्कल नाही विराट! ह्यात पॉईंट आहे ! आणि जोरात पळत सुटतो !"
विराट - "गेला एकदाचा ! आता अनुष्काला फोन लावतो नाहीतर पुन्हा ओरडा बसायचा !"
कसाबसा त्याचा फोन लागतो आणि तो ऐकून घेणं सुरु करतो तितक्यात रुट धावत धावत येतो !
रुट - "कोणाशी बोलतोयस?"
विराट - खुणेनेच - अनुष्काशी
रुट - (मुद्दाम मोठ्यानं) - "विराटभाई मस्त ढोकळा बनलाय कॅन्टीनमध्ये ! घरी गेल्यावर खायला मिळणार नाही असा ढोकळा ! ये लवकर !"
विराट - "हॅलो हॅलो ! .... तोवर फोन कट झालेला असतो !"
विराट हताश होऊन त्या भव्य मैदानाकडं पाहत बसतो !