मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४

दिवाळीचे दिवस!






दिवाळीच्या सुट्टीनंतर ऑफिसात परतताना कसा कंटाळा येतो. इतकी वर्षे झाली, इतके मोठे झालो तरी मुक्त वातावरणातून बंधनात शिरताना कंटाळा येतोच. एका अर्थी चांगलं लक्षण आहे ते! अजूनही मन पूर्ण यांत्रिकरित्या वागू न लागल्याचं लक्षण! वसईतील दिवाळी अतिउत्तम! पण खरं म्हटलं तर नोव्हेंबरातील दिवाळीची मजा ऑक्टोबरमधल्या दिवाळीला नाही. नोव्हेंबरात थंडी कशी मस्त पडते! असो आपलं पंचांग खूपच जुनं आहे आणि त्यामुळे त्यात बदल करणं वगैरे शक्य नाही.
दिवाळीच्या एक आठवडा आधी अंगणात कणगा काढण्याची पद्धत आहे. पूर्वी तो चुलीच्या राखेने काढत. हल्ली चुली कोणी वापरत नाही, मग रांगोळीनेच काढावा लागतो. लहानपणी हा कणगा काढला की खूप मजा यायची, दिवाळीच्या आगमनाची सूचना मिळायची. बहुदा सहामाही परीक्षा आटोपलेल्या असायच्या. आणि मुलं हुंडारायला मोकळी व्हायची. आई आणि महिलावर्गाची फराळाची धांदल सुरु असायची. मुलांना दुसरा काही उद्योग नसल्याने अंगणात सुई आणि चतुर पकडण्यात त्यांचा वेळ जायचा.
ह्या दिवाळीत सुद्धा काहीसं असंच वातावरण पाहायला मिळालं. सुरवंटानी कहर केला होता. अंगणात तर एका वेळी चार पाच सुरवंट दिसत होती. ही बिचारी अगदी सूक्ष्म दोरीने खाली उतरतात. मोठीआई ह्यांना खूप घाबरते. आणि दिसली रे दिसली की निष्ठुरपणे त्यांना चिरडून ठार करते.  दिवाळीतील एका सकाळी लवकर उठल्यावर वाडीत काढलेलं सुरवंटाच हे एक छायाचित्र!



बाकी ही सुरवंट फुलपाखरात रुपांतरीत झाल्यावर सुरेख दिसतात.

धनत्रयोदशीला मोठ्या श्रद्धेने कपाटांची पूजा केली जाते. खरी दिवाळी सुरु होते ती नरकचतुर्दशीला. आमच्या घरातील वातावरण तसं कडक! पूर्वी फार कडक तर आता त्या कडकपणाच्या काही खुणा शिल्लक राहिलेल्या! नरकचतुर्दशीला सर्वांना पाचच्या आसपास उठवत! एकत्र कुटुंबात मग अंघोळीसाठी नंबर लावायची धावपळ उडे! मी तितक्यात आकाशात चतुर्दशीचा चंद्र कोठे दिसतो काय हे पटकन पाहून येत असे! उटणं, तेल वगैरे लावून मग अभ्यंगस्नान पार पडे. आंघोळीच्या वेळी चिराटे पायाखाली फोडून आम्ही आनंद व्यक्त करू. हे चिराटे कधी कधी पहिल्या फटक्यात फुटत नसे. ते फुटल्यावर मनात होणारा आनंद बोंब मारून व्यक्त करण्याची अनिवार इच्छा होई.  चिराटे फुटायच्या वेळी "नरकासूर को मार दिया!" अशा काहीशा अरसिक ओळींचा मग जन्म झाला. सोहम बिचारा लहानपणापासून ह्या ओळी माझ्या तोंडून ऐकत आल्याने बहुदा हा ही दिवाळी परंपरेचा भाग आहे अशी त्याची समजूत असावी असा मला दाट संशय आहे. उटण्यानंतर साबण लावावा कि नाही हे मला पडलेलं तेव्हापासूनच कोडं! मग सर्व मंडळींच्या आंघोळी आटपेस्तोवर मोकळा वेळ असे. मग मी आणि बंधू (मोठा भाऊ) जाऊन ड्युकच्या चेंडूने क्रिकेट खेळत. केव्हातरी मग फराळासाठी आम्हांला खाली बोलावलं जाई. सर्वजण एकत्र असताना फराळ ही एकत्र बनवला जाई. त्यामुळे फराळाच्या प्लेटची गर्दी नसे. नंतर मग सर्वांच्या वेगवेगळ्या प्लेटा येऊ लागल्या. काळ बदलत गेला तसे मग बाहेरील मिठाईच्या बॉक्सने सुद्धा शिरकाव केला. फराळ झाल्यावर बाकी काही काम नसे. बुधवार, शुक्रवार अथवा रविवार असला तर वसईच्या परंपरेनुसार पावले होळीच्या मासळीमार्केट कडे वळत. "दिवाळीच्या सुद्धा!" हा सोहमने ह्या वर्षी विचारलेला प्रश्न मी फारसा मनावर घेतला नाही. वसईकरांची परंपरा काही वेगळीच!

काही दिवाळीत नरकचतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन एकत्रच येई.  त्यामुळे दुपारनंतर लक्ष्मीपूजनाची तयारी सुरु होई. धाकटे काका दाजी ह्यांच्याकडे बरीच वर्षे लक्ष्मीपूजनाची जबाबदारी होती. दुपारी चार वाजल्यापासून सर्वजण तयारीला लागत. घरी बरीच जुनी नाणी आहेत. काही एकोणिसाव्या शतकातील सुद्धा. ती ह्या दिवशी घासून चकचकीत केली जात. पारनाक्यावर जाऊन बत्तासे वगैरे आणले जात. हॉलमधील सर्व फर्निचरची फेरमांडणी करून पूजेसाठी व्यवस्थित जागा केली जात असे. मग नवीन सतरंजी आणि लोड ह्यांच्या मदतीने लक्ष्मीपूजनाची मांडणी केली जाई. दाजी अगदी शास्त्रोक्त पद्धती चांगली तास दोन तासभर पूजा करीत. मोठे काका अण्णा मात्र इतका वेळ पूजा चालल्याने बेचैन होत. मध्येच आम्हांला फटाका फोड असे नजरेने खुणवत. पण आम्ही तशी आज्ञाधारक पोरे असल्याने कोणत्या दिवशी कोणाचे ऐकायचे हे आम्हांला चांगले माहित होते.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घरभर पणत्या लावल्या जात. आजी ९९ साली गेली. त्याआधी तिच्या चारही सुना एकत्र ह्या दिवेलावणीचे काम करत. मागच्या वाडीत, उंबराच्या झाडाखाली, ब्रह्म्याला  (आमच्या घराच्या मागे असणारं नारळाचे झाड - जे आमच्या पूर्ण कुटुंबांच श्रद्धास्थान आहे) दिवा लावला गेला आहे की नाही ह्याची ती जातीने तपासणी करत असे. सर्वांना अत्तर वगैरे लावलं जाई. मी लहान असताना नवीन कपडे घालून हॉलमधील मंडळीसमोर आल्यावर कोणीतरी कौतुक करेल अशी जबरदस्त आशा असे. मंडळी सुद्धा हे ओळखून असत त्यामुळं माझा प्रवेश होताच अण्णा, भाई वगैरेपैकी कोणी एक "मस्त शर्ट आहे" असे बोलत. अजूनही ही आशा मनात कोठेतरी तग धरून असते! लक्ष्मीपूजन झाल्यावर मग आम्हांला फटका वाजविण्याची सूचना केली जाई. फटाका वाजवून आल्यावर हात स्वच्छ धुवून मग बत्तासे, तीर्थप्रसाद मिळे. दाजी मग चोपड्याचे वाटप करीत.

बाकी मग गेल्या दोन तीन वर्षापूर्वी दाजींनी प्राजक्ताकडे लक्ष्मीपूजनाच्या जबाबदारीचे हस्तांतरण केले. म्हणजे आता घरात चार वेगळ्या पूजा होतात. गेल्या वर्षीच्या लक्ष्मीपूजनाचा हा फोटो!



नंतर येते ती बलिप्रतिपदा! ह्या ही दिवशी लवकर उठायचं असतं. ह्या दिवशीची परंपरा म्हणजे भल्या पहाटे उठून संपूर्ण घराचा केर काढायचा. तो एका टोपल्यात भरायचा. मग घरातल्या एका पुरुषाने ते टोपलं, जुना झाडू, एक पणती घ्यायची, हातात काठी घ्यायची. एकदा का हे सर्व हातात घेतलं ही त्याच्या मागे घरात त्याच्या पत्नीने लाटण्याने ताटावर जोरात आवाज करत तो पुरुष घराबाहेर निघेतोवर त्याला साथ द्यायची. आमच्या घरी गेले कित्येक वर्षे दाजी - दादी ह्या भूमिका पार पाडत. बाहेर पडल्यावर त्या पुरुषाने एकही शब्द उदगारायाचा नाही की मागे वळून पाहायचं नाही. हा घरातील सर्व कचरा गावाच्या वेशीजवळ नेउन ठेवायचा. आताच्या काळात गावची  वेस म्हणजे आमच्या गल्लीच्या तोंडाशी असलेली कचरापेटी. तिथून परत आल्यावर दाजी घराच्या गेटपाशी येऊन काठी जोरात आपटत आणि "बळी तो कान पिळी! बळीचे राज येवो!" असे जोरजोरात ओरडत. आणि मग एक फटाक्याची माळही फोडत, इतक्या सगळ्या प्रकारानंतर उरलीसुरली झोपलेली मंडळी निमुटपणे उठत. गेले दोन वर्षे आता मी ही जबाबदारी स्वीकारली आहे. बिछान्यात झोपेत असलेला सोहम ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मेंदूत नोंदत असतो. संस्कृतीचे हस्तांतरण व्हायला हवं हीच इच्छा!

सर्वांच्या आंघोळी आटोपल्या की पाडव्याच्या ओवाळण्या होतात. आई मुलांना आणि पत्नी पतीला ओवाळतात. सगळं कसं प्रसन्न प्रसन्न वाटत असतं. पूर्वी गोठ्यात गाई होत्या. त्यांना ह्या दिवशी करंजी खाऊ घालत. त्यांना बहुदा विस्तवावरून उडी मारायला लावायची पण पद्धत होती आणि त्यांच्या अंगावर लाल गेरूचे ठसे काढले जात. काहीशी ऐकीव आणि फार लहानपणी पाहिलेली ही प्रथा त्यामुळे चूकभूल द्यावी घ्यावी!

वसईतील वाडवळ अर्थात पानमाळी ही आमची ज्ञाती. दिवाळीच्या दिवसात रवळी आणि तवळी  असे दोन प्रकार करण्याची ह्या ज्ञातीत प्रथा आहे. रवळीला पानमाळ्यांचा केक असेही संबोधले जात. माझ्या आई आणि वडील ह्यांच्या दोघांच्या आई वसईतील घरत कुटुंबातल्या. ह्या दोन्ही घरत कुटुंबीयांनी जुन्या प्रथा खूप टिकवून ठेवल्या आहेत. दरवर्षी ते रवळी बनवितात. त्यातील एका घरची विनम्रने खास आणून दिली. अति स्वादिष्ट होती ती! आणि दुसऱ्या घरची  मानसने फेसबुकवर टाकली. त्या रवळीचा हा फोटो!

बाकी घरची काकी अजूनही तवळी बनविते. हा केळीच्या पानात काकडी वगैरे टाकून केला जाणारा पदार्थ. ह्याची सुद्धा खास एक चव असते. ह्या वर्षी पुन्हा मंडळी फराळाला एकत्र आली. हल्ली सतत गोड खाण्याची क्षमता कमी झाल्याने बटाटवडे सुद्धा आणण्यात आले. अनारसं सुद्धा बनविण्यात आली होती. अनारसं हा सुद्धा बनविण्यास एक कठीण प्रकार, पण जर जमला तर मस्त लागतो!

पुन्हा एकदा मोकळी सकाळ त्यामुळे वाडीत जाऊन छायाचित्रण केलं.



ऑक्टोबर महिन्यात आलेला आंबामोहोर टिपला. किती दिवस टिकतो ते पाहायचं!





नारळावर बसलेली पोपटांची जोडी!



शेवटचा दिवस भाऊबीजेचा! पूर्वी तीन पिढ्यांची भाऊबीज व्हायची. वडील आणि तीन काका असे मिळून चार भाऊ आणि तीन आत्या. ताई वसईत, जिजी मालाडला तर बेन दहिसर. बेन चिंचणीची भाऊबीज आटपून येत. आई आणि काकू मंडळींची सुद्धा भाऊबीज दिवसा आटपे. दोघी जणी माहेरी जाऊन येत तर दोघींचे भाऊ घरी येत. सायंकाळ होऊ लागे तसे सर्वजण घरी जमू लागत. चुलीवरच्या कोंबडी (पूर्वी चिकनला कोंबडी म्हणत आणि बहुदा ती गावठी असे!) आणि मटणाच्या वासाने मंडळी सुखावत. सोबतील वडेही तळले जात असत. जेवण आटोपली की मग तीन पिढ्यांची भाऊबीज सुरु होई. ह्यात बहिण भावांची अनेक कॉम्बिनेशन्स होत. आणि मजेदार गप्पांना ऊत येई. अगदी भराच्या काळात पन्नासेक मंडळी घरी जमत.  दहानंतर मुंबईकर मंडळी परतायची तयारी करू लागत. त्याहून आधीच्या काळात ते मुक्कामाला राहायचे सुद्धा. अकरा वाजले की मग कडक आजी झोपण्याची सोय काय आहे ह्याची चौकशी चालू करे. हॉलमध्येच बिछाने घातले जात. बच्चेमंडळी फारच उदास झालेली दिसली की मोठी मंडळी अजून देव दिवाळी (तुळशीचं लग्न) आहे असे सांगून त्यांची समजूत घालत. आता ही सर्व मजा हळूहळू कमी होत चालली. मागच्या काही भाऊबीजेतील हे फोटो!!
 









असे हे दिवाळीचे दिवस!! परंपरांचे आणि नव्याने अविस्मरणीय क्षणांचा ठेवा देणारे! परंपरा जमतील तितक्या पुढे न्यायच्या बाकीच्या जतन करायच्या - काही अशा लिखाणातून तर काही मनाच्या एका कोपर्यात!



















शनिवार, २५ ऑक्टोबर, २०१४

वन नाईट @ द कॉल सेंटर - चेतन भगत



 
मागे चेन्नई एक्प्रेसच्या पहिल्या दिवशीच्या शोला वसईत आगाऊ (म्हणजे ऍडवान्स) बुकिंग न करता आम्ही गेलो होतो आणि त्यावेळी शेवटची का होईना पण तिकिटे मिळाली होती. त्या आठवणीच्या जोरावर काल Happy New Year पाहण्यासाठी ऐन वेळी गेलो पण तिकिटे मिळाली नाहीत. आता मॉलमध्ये आलोच आहोत तर भटकुयात म्हणताना पावलं पुस्तकाच्या दुकानाच्या दिशेने वळली. 
मी सद्यकाळात बऱ्याच जुन्या गोष्टींचा घोष करत असतो असं मला जाणवतं. त्याला अनुसरून कालही मी आधी जुन्या पुस्तकांकडे वळलो. पण अचानक मग नवीन पुस्तकांचा विभाग सुरु झाला आणि मग चेतन भगतची काही पुस्तके दृष्टीस पडली. माझी पुतणी चेतन भगतची मोठी चाहती. तिच्याकडून चेतन भगतविषयीच्या माझ्या ज्ञानात खूप भर पडली आहे. चेतन भगत हा नवीन पिढीचा लाडका लेखक! त्यामुळे त्याच्या पुस्तकाद्वारे नवीन पिढीच्या मानसिकतेमध्ये डोकावून पाहता येईल ह्या विचाराने दोन पुस्तकं विकत घेतली. त्यातलं पहिलं म्हणजे ह्या ब्लॉगपोस्टचे शीर्षक! अजून एक गोष्ट, मी ह्या पुस्तकाचं सुप्रिया वकील ह्यांनी केलेल्या मराठी अनुवादरूप विकत घेतलं. माझं काही खरं नाही मंडळी - गडी अमेरिकन कंपनीत इंग्रजीत दैनंदिन व्यवहार करतो पण त्याला त्या व्यवहारापलीकडे इंग्रजी झेपत नाही!
चेतन भगतच्या पुस्तकांची नावं सुद्धा अगदी खास असतात. अगदी तो IIT मधून शिकल्याचं द्योतक असणारी. आता ही सुद्धा (म्हणजे पुस्तकाची अथवा त्यावर आधारित सिनेमाची नावं) ऐकीव माहितीवर आधारित असल्याने चूकभूल दद्यावी घ्यावी! Three Idiot, Two States, One Night @ the Call Center आणि आता Half Girlfriend!! बहुदा गडी बटाटा पाव किलो, १०० ग्राम अर्थात १ तोळा सोने अशी पुस्तकाची नावे पुढच्या काळात निवडेल की काय असा संशय माझ्या मनात निर्माण झाला आहे.
पुस्तक आहे चांगलं. पण शाळा ह्या पुस्तकानं जसं खिळून ठेवलं तशी जाणीव मात्र निर्माण नाही झाली. कॉल सेंटर मध्ये काम करणारा सहा जणांचा एक ग्रुप. त्यांच्या कार्यालयातील जीवनातील रेखाटलेली एक रात्र. ह्या रात्रीत  अशा काही घटना घडत जातात की त्या सर्वांचं वैयक्तिक जीवन आपल्यासमोर येत. ह्या सहा जणांत दोघांचं आधी जमलेलं प्रकरण सध्या मोडलेलं आहे, अजून दोघं अशी आहेत की मुलाला त्या मुलीत रस आहे पण तिला मात्र मॉडेलिंगमध्ये रस आहे. पाचवी आहे ती विवाहित आहे आणि ज्याच्याशी प्रेमविवाह केला त्याच्याशी जुळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. सहावे वयस्क गृहस्थ आपल्या दूर राहणाऱ्या मुलाच्या संसाराशी संपर्क ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. आणि ह्या सर्वांचा एक अकार्यक्षम असा बॉस आहे जो अनेक छलकपट करून आपली अमेरिकेतील ऑफिसात वर्णी लावायचा प्रयत्न करीत आहे. आणि हो हे कॉल सेंटर व्यवस्थित न चालल्याने ह्या सर्वांवर नोकरी जाण्याची टांगती तलवार आहे. ह्या  सर्व कथानकाला अगदी शेवटी एक कलाटणी मिळते आणि मग …
असो आता पुस्तक विकत घेऊन वाचण्याचा हेतू हा नवीन पिढीची मानसिकता समजावून घेण्याचा असल्याने त्यासंदर्भातील काही भाष्यं!
१> कॉल सेंटर मधील काम करणाऱ्या लोकांना अनुभवावा लागणारा मानसिक संघर्ष! पुस्तकातील प्रत्येक पात्राला स्वतःच्या खऱ्या नावाबरोबर एक अमेरिकन नावसुद्धा आहे. अमेरिकन ग्राहकांशी बोलताना त्या ग्राहकांना आपलेपणा वाटावा म्हणून देण्यात आलेलं! आपल्या स्वत्वचा महत्वपूर्ण भाग असलेलं नावच जर आपल्याला लपवावं लागत असल्यानं जाणवणारी अस्पष्टशी खंत पुस्तकात अदृश्यपणे जाणवत राहते. एका कॉलमध्ये एक ग्राहक फोनवरील माणूस हाअमेरिकन नसून भारतीय असल्याचं ओळखतो आणि त्याच्याशी अपमानास्पद भाषेत बोलतो. व्रुमला हा अपमान सहन न झाल्याने त्याचा तोल जातो.
२> कॉल सेंटर मध्ये काम करणाऱ्या बऱ्याचजणांची सिगारेट, मद्य ह्यावर अवलंबून असण्याची अगतिकता ह्या पुस्तकात जागोजागी आढळून येते.मी सुद्धा हे प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं आहे. नैतिकतेच्या घसरणीची अजून काही उदाहरणे मग वाचनात येतात. ते सुद्धा बहुदा खरंच असावं.
३> ह्या ग्रुपमधील जे होऊ घातलेलं प्रेमप्रकरण आहे त्यात मुलगा हा फारसा स्थिरावलेला नाही. कॉल सेंटर मधील त्याची नोकरी तिच्या घरच्यांना फारशी पसंत नाही. तिची आई सतत तिला त्यावरून बोलत राहते. एका क्षणी मग तीही त्याच प्रकारे विचार करू लागते. आणि अमेरिकेत स्थिरावलेल्या एका तरुणाशी लग्नाला तयार होते. हा एक महत्वाचा मुद्दा हल्लीच्या युगात दिसून येतो. मुलींच्या मनात चांगल्या प्रकारे सेटल होण्याची खूप इच्छा असते आणि म्हटलं तर सामाजिक दबाबही असतो. त्यामुळे एक तर स्वतःचे करियर व्यवस्थितपणे करावे किंवा कोण्या व्यवस्थित प्रकारे सेटल झालेल्या माणसाशी लग्न करावे ह्यांचा त्यांच्यावर खूप दबाव पडताना दिसतो. ह्यामुळे बऱ्याचदा लग्न उशिरा करताना किंवा मनाविरुद्ध लग्न करताना दिसतात. अगदी लेखकाच्या भाषेत म्हणायचं झालं तर - "पोरी धोरणी असतात. त्या प्रेम प्रणय वगैरे सगळी फालतू बडबड करतील.. पण ठरविण्याची वेळ आली की सगळ्यांत बडी असामी निवडतील, फैटेस्ट चिकन!"
ह्या उलट अजूनही गावाकडे अगदी साधी माणसं अगदी स्थिरस्थावर न झालेल्या तरुण माणसांशी लग्न करतात. बऱ्याचदा अशी जोडपी आयुष्यभर कदाचित स्थिर होतही नसतील पण आयुष्यात आनंदी राहतात.
४> ३५-१० चा एक नियम मधूनच वाचायला मिळतो. बऱ्याच वेळा ३५ वर्षाच्या ग्राहकाचा मेंदू आणि बुद्ध्यांक १० वर्षाच्या भारतीय मेंदूसारखा असतो. त्यामुळे त्यांच्याशी बोलताना संयम ठेवावा लागतो. ही काहीशी अतिशोयक्ति वाचावयास मिळाली.
५> ह्या सर्वांचा बॉस लबाड आहे. टीममधील सदस्य कोणताही प्रश्न घेऊन त्याच्याकडे आला की व्यवस्थापनाचं एखादं मोठालं तत्व त्याचा संबंध असो कि नसो त्या सदस्याला सांगून त्याची / तिची बोळवण करायची असा त्याचा हातखंडा. MBA वगैरे केलेल्या बोलबच्चन मंडळींचा व्यावसायिक क्षेत्रात असा अनुभव बऱ्याच वेळ असल्याने सतत 'बिग पिक्चर', 'स्ट्रेटेजिक वेरिएबल' वगैरे संज्ञा सतत वापरणाऱ्या आपण ह्या बॉसच्या कॅरक्टरशी बऱ्यापैकी रिलेट होऊ शकतो.  बाकी द्विमितीवर आधारित चार प्रकारचे बॉस आहेत. (अ) ते किती हुशार वा मूर्ख आहेत (ब) ते चांगले कि दुष्ट आहेत. हे मस्तच वर्गीकरण.
६> शेवटी ह्या पुस्तकातील लक्षात राहिलेली काही वाक्ये
  • प्रेमविवाह केलेल्या आपल्या नवऱ्याच्या आईविषयी आणि एकंदरीत घरातील जुन्या वळणाविषयी बोलताना राधिका म्हणते - "माझं अनुजवर प्रेम आहे आणि त्यानं मला सांगितलंय, की हे माझ्यासोबत आलेलं पॅकेज आहे." - ह्यात नवीन पिढीची फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीशी माणूस म्हणून जुळवून घ्यायची मनोधारणा दिसते. बाकी त्याचे / तिचे सर्व नातेवाईक, घर वगैरे प्रकार पॅकेज म्हणून गणला जाण्याची प्रवृत्ती जास्त!
  • "तू काहीच बोलणार नाहीस?" प्रियांकाने विचारलं. - मुली ज्यावेळी असा प्रश्न विचारतात त्यावेळी खरं तर हा प्रश्न नसतोच. त्यांना तुम्ही काहीतरी बोलायला हवं असतं.
  • बायकांना जखमांची मलमपट्टी करायला फार आवडतं … त्या जखमा फार मोठ्या स्वरूपाच्या नसतात तेव्हा!
  • "कधी चुकूनसुद्धा मला आनंद देवू नकोस," प्रियांकाची आई म्हणाली!
  • कोणत्याही भांडणात जो आधी रडू लागतो त्याला फायदा मिळतो. - लोकांच्या नाटकीय स्वभावा विषयी हे एक मस्त वाक्य!
लेखकानं केवळ योगायोग म्हणून निवडलं की काय ते माहित नाही पण ह्या सहा ही जणांची  वैयक्तिक आयुष्य बऱ्यापैकी अस्थिर! सुखाच्या मृगजळा मागे धावणारी. लेखकाला म्हणायचं नसेल कदाचित, पण माझं मत मात्र असंच की प्रगतीच्या मागे धावून आपण मिळवलं काय? काही लोकांना अशा खूप स्पर्धात्मक जगात यश अगदी निर्विवादपणे  मिळू शकतं, पण बाकीचे सर्वजण तर बऱ्याच गोष्टींचा त्याग करून मगच ह्या दुनियेत येऊ शकतात. प्रश्न असा आहे कि ह्या प्रगतीचं किती मोल आपण वैयक्तिक आयुष्यात द्यायचं ? ह्या दुनियेत साधेपणाने जगण्यासारख्या नोकऱ्या राहिल्याच नाहीत काय? का माझ्यासारख्या लोकांच्या  नजरा तिथवर पोहोचतच नाहीत?

 बाकी पुस्तक मग एका दिवसात वाचून संपलं. तसं शाळाही एका दिवसातच संपलं होतं. दोघातला फरक काय असा विचार करू लागलो. हे पुस्तक एखाद्या मॅकडोनाल्डच्या बर्गरसारखं अथवा पिझ्झा हटच्या पिझ्झासारखं वाटलं; शाळा मात्र भरपेट घरगुती जेवणासारखं वाटलं. जुन्या सवयी सहजासहजी जात नाही हेच खरं!

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०१४

शाळा - मिलिंद बोकील



 
बरेच दिवस नवीन पुस्तक वाचन झालं नव्हतं.  एक शालेय मित्र अधूनमधून नवीन  पुस्तकांची शिफारस करत असतो. परंतु कामाच्या बोज्याचा बहाणा करून ही पुस्तकं वाचायची राहून जातात. पण गेला शनिवार चांगला उजाडला. दिवाळीच्या निमित्ताने  हल्ली जी काही अनेक ट्रेड फेयर निघतात त्यातील एकात आपण जाऊयात अशी फर्मानवजा विनंती करण्यात आली. आता शनिवारी सायंकाळी अशी विनंती नाकारण्याचे दुष्परिणाम अनुभवाने माहित झाल्याने मी निमुटपणे निघालो.  आणि हे प्रदर्शन आमच्या समाजाच्या सभागृहात असल्याने आपल्या ज्ञातीतील ओळखींची उजळणी होण्यास मदत होते हा एक साईड बेनिफिट!!
सर्वत्र महिलावर्गाच्या कपड्यांचे, पर्सचे, रंगीबेरंगी पणत्यांचे वगैरे ठेले लागले होते. मध्येच मसाल्याचा, आवळासुपारीचा सुद्धा ठेला लागला. त्यात खरेदी करताना विविध प्रकारच्या सुपारींचा आनंद मी घेतला. अशा वेळी केवळ फुकट स्वाद घेऊ नये ह्या न्यायाने आम्ही तीन चार प्रकारची सुपारी खरेदी केली. अचानक तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पुस्तकांच्या ठेल्याकडे माझे लक्ष वेधले गेले.  मग मी पुढील तासभर त्याच स्टॉलवर होतो. बराच वेळ मी जीए आणि रत्नाकर मतकरी ह्यांच्या विविध कथासंग्रहात डोकावण्यात वेळ व्यतीत केला. ह्या दोन्ही लेखकांची पुस्तके म्हटली म्हणजे दर्जाविषयी तर शंकाच नाही. पण मला नक्की कोणतं पुस्तक / पुस्तके घ्यावीत ह्याचा निर्णय करता येत नव्हता. अचानक माझं लक्ष मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा ह्या पुस्तकाकडे गेलं. ह्या पुस्तकाची काही पान चाळली आणि लगेचच निर्णय झाला की हे पुस्तक घ्यायचच!
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास घरी परतलो आणि पुस्तक पहिल्या पानापासून वाचायला घेतलं. ह्या पुस्तकाच वातावरण आणीबाणीच्या काळातील एका गावातलं! कथानक फिरतं ते लेखक आणि त्याच्या मित्रमंडळी भोवती.  ही सर्व मंडळी नववीत शिकणारी. वयानुसार ह्यांच्या मनात नव्यानेच प्रेमभावना निर्माण झाल्या आहेत. प्रत्येकाला एकेक प्रेमपात्र आहे. ह्यातील काहीजण हे मनातल्या मनात ठेवून आहेत तर काहीजणांमध्ये ही प्रेमभावना मुक्तपणे व्यक्त करण्याचं धारिष्ट्य आहे. वयानुसार शिक्षकांची खोडीसुद्धा ही मंडळी काढतात. वर्गात अभ्यासू मुलं जशी आहेत तशी केवळ टवाळक्या करणारी सुद्धा आहेत. चिवचिव करणाऱ्या मुली आहेत.
त्या काळाच्या प्रथेनुसार मुलामुलींनी एकमेकांशी बोलायचं नाही ही पद्धत! पण जर एखादी मुलगी आपल्या भागात राहत असेल किंवा तिच्या आईची आणि एखाद्या मुलाच्या आईची ओळख असेल तर मात्र शाळेबाहेर अशा मुली मुलांशी बोलत! लेखकाला प्रथमच हे जेव्हा कळत तेव्हा त्याला अशा मुलांचा खूप खूप हेवा वाटतो. त्याचा एक मित्र आहे फावड्या. आता त्याचे दोन दात पुढे आले म्हणून त्याचं नाव फावड्या! पूर्वीची ही टोपणनाव ठेवण्याची पद्धत अगदी उदाहरणानुसार लेखकाने मस्त टिपली आहे. ह्या फावड्याकडे वर्गातील मुली भाजी घ्यायला आल्या की अगदी मोकळेपणाने त्याच्याशी बोलत. तेव्हा त्याच्याविषयी वाटणारा हेवा लेखक त्याला बोलून दाखवतो तेव्हा आपल्याच वर्गातील मुलींसमोर भाजी विकतानाचा वाटणारा अपमान फावड्या त्याला बोलून दाखवतो. शाळेत काही स्थिरस्थावर झालेली प्रेमप्रकरण आहेत. त्यातील मुलीने कधी मुलांची चुगली केल्यास मुले तिला इंगा दाखविण्यासाठी मराठी व्याकरणाच्या तासाला कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोगात तिच्या प्रेमपात्राचा वापर करून तिला कसे हैराण करतात हे खासच! लेखकाची मोठीबहिण खाष्ट असल्याने तिचं नाव अंबाबाई! तिच्या मैत्रिणी गावभर पसरल्याने लेखकाच्या कारवायांवर सतत तिच्या मैत्रिणींच्या हेरगिरीची दहशत!
लेखकाचा मामा नरूमामा! त्याच लग्न जमवायच्या खटपटीत असलेली लेखकाची आई! हा नरूमामा म्हणजे लेखकाचा मार्गदर्शक! लेखकाच्या मनातलं एक शिरोडकर नावाचं प्रेमपात्र! मामाला हे थेट सांगायची भीती वाटत असल्याने आपलीच गोष्ट लेखक मामाला आपल्या मित्राच्या म्हणजे मनोज देसाईच्या कहाणीच्या रुपात सांगतो. मी हे तीनशे पानाचं पुस्तक तसं तीन साडेतीन तासात वाचून काढलं. त्यामुळे काही भाग घाईघाईत वाचून काढला हे खरं असलं तरी लेखकाने शिरोडकरच्या पहिल्या नावाचा मात्र शेवटपर्यंत उल्लेख केला नाही. ही गोष्ट सुद्धा खासच!
लेखकाचे खास मित्र म्हणजे सुऱ्या, फावड्या, चित्रे. सुऱ्याच्या वडिलांनी एक इमारत बांधायला घेतली होती.  त्याचं बांधकाम सुरु असल्याने तिथे अभ्यासाच्या बहाण्याने ही मंडळी शाळेआधी तिथे एकत्र जमत आणि मग शाळेत येणाऱ्या मुलींना चिडवण्याचे उद्योग करीत. लेखक मात्र शिरोडकरच्या बाबतीत काहीसा लाजरा असल्याने ती येताना दिसली की तो अगदी चुपचाप होत असे. ह्या सर्वातील सुऱ्या म्हणजे एक गावरान माणूस. तोंडात शिव्यांचा मुक्त वापर आणि मनातील सर्व भावना अगदी मुक्तपणे बोलून दाखवणार! पौगंडावस्थेत नुकत्याच प्रवेश करत असल्याने त्या अनुषंगाने येणारे विषय सुद्धा लेखकाने गरज पडल्यास सांकेतिक शब्दांचा वापर करीत संयमितपणे हाताळले आहेत. सुऱ्याच्या अशा व्यक्तिमत्वामुळे आपलं शिरोडकर प्रकरण त्याच्यापासून लपवायचा लेखकाचा कल!
वर्गात जमेल तेव्हा लेखक शिरोडकरकडे पाहायचा. कोणाला संशय न येता पाहण्याच्या तंत्राला सुममध्ये असा शब्दप्रयोग लेखक करतो. तत्कालिन मुली हसताना तोंडावर हात किंवा रुमाल ठेवत. लेखक अगदी पारंपारिक विचाराचा. त्यामुळे शिरोडकर वर्गात जास्त पुढे पुढे करत नाही हे त्याला भावतं. सुरुवातीच्या काळात शिरोडकर कोठे राहते हे माहित नव्हतं. ती साधारणतः साठेवाडीच्या बाजूला राहत असावी अशी माहिती मिळाल्यावर त्याच्या अचानकपणे ध्यानात येतं की वर्गातील मिसाळसुद्धा त्याच बाजूला राहतो. मग लेखक काहीतरी बहाणा करून त्याच्या घरी जातो. मिसाळ हा अजागळ असल्याने त्याला आपला संशय येणार नाही असा लेखकाला विश्वास वाटत असतो. मध्येच एकदा नरूमामा लेखकाकडे येऊन जातो तेव्हा मनोज देसाईने त्या मुलीच्या मनात भरलं पाहिजे मगच ती मुलगी त्याला लाईन देऊ लागेल असा सल्ला देतो. त्यामुळे लेखक वर्गात मस्ती करणे वगैरे प्रकार करून पाहतो. त्यानंतर अचानक त्याला शिरोडकर शिकवणीला जात असल्याचं कळत. नाहीतरी अंबाबाई त्याच्या मागे शिकवणीसाठी लागलेलीच असते. त्यामुळे तो मग त्या शिकवणीला त्याच बॅचला जातो. नंतर कधी तिच्या घरच्या रस्त्यावर उभा राहतो. मग ती हळूहळू लेखकाशी बोलू लागते. लेखक बुद्धिबळात खास असतो. बुद्धिबळाची शालेय स्पर्धा तो जिंकून दाखवतो. लेखक आणि शिरोडकर स्काऊट आणि गर्ल्स गाईडच्या एकत्र शिबिरात जातात. तेव्हा शिरोडकर त्याला चॉकलेट सुद्धा देते. लेखकाकडे जुन्या हिंदी चित्रपटांच्या नावाचं एक पुस्तक असते त्याचा वापर करून तो मुलांना नेहमी चित्रपटाच्या नावांच्या भेंडीची स्पर्धा जिंकून देत असे. पण ह्यात शिरोडकर नेहमीच प्रभावित होणार नाही हे ही त्याला जाणवतं. मग मध्येच एकदा तो शिरोडकरला जिंकून देतो. हे प्रकरण असं प्रगती करत असताना पुढे काय असा लेखक शिरोडकरला प्रश्न विचारतो. "पुढे काय ते माहित नाही!" ती उत्तरते.
बाकी लेखक मग शाळेतील वक्तृत्वस्पर्धा, क्रिकेट सामने अशा प्रसंगांच्या वेळी मुलांनी केलेल्या गडबडीचे मस्त वर्णन करतो. अगदी मनापासून हसायला येतं. अचानक मग सुऱ्या त्याच्या प्रेमपात्राशी बोलायला जातो. आणि मग तिथं सारे काही फिस्कटून जाते. तिचे वडील मुख्याध्यापकांकडे जातात. सुऱ्यासोबत असणारा लेखकही त्यात गोवला जातो. ह्या सगळ्या प्रकरणात शिरोडकर दुखावली जाते. पुस्तकाचा शेवट मी काही इथे सांगणार नाही.
पुस्तक मला जबरदस्त आवडलं. संगणक, इंटरनेट वगैरेने शालेय जीवनावर जबरदस्त प्रभाव करण्याआधी बराच काळ मराठी माध्यमांच्या शाळेत जे काही वातावरण होते ते अगदी समर्थपणे लेखकाने आपल्या लेखणीतून साकार केलं आहे. हे वातावरण जवळजवळ सर्वच मराठी शाळांत आढळून येत असे आणि मुलामुलींचं जे एक विशिष्ट वागणं होत ते अगदी सुंदररीत्या लेखकाने शब्दांत पकडलं आहे.
आपल्या शालेय काळातील स्मृतींना उजाळा देण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाने विकत घेऊन वाचण्याजोगं पुस्तक!













रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - १०



 
गावाला तातडीने पोहोचताना इवाची तशी धावपळच झाली. ऑफिसातून रजा टाकून मग ती काहीशा अपराधीपणानेच गावाला पोहोचली. आंद्रेईच्या आईनेच तिचं दरवाज्यात स्वागत केलं. इवाला काहीसं आश्चर्य वाटलं आणि थोडाशी निराशाही वाटली. ह्या क्षणाला तिला तिच्या आईशी फक्त एकटीनेच बोलायचं होतं. पण आता काही इलाज नव्हता. आई बिछान्यात बसली होती, उशीला टेकून. समोर स्टूलवर आंद्रेईच्या आईने करून ठेवलेल्या गरम दुधाचा ग्लास होता. इवाला बघताच आईचे डोळे एकदम आनंदाने चमकले. इवा धावतच आईच्या कुशीत शिरली. आतापर्यंत रोखून ठेवलेल्या अश्रूंना तिने मोकळी वाट करून दिली. ह्या क्षणी मायलेकींना एकांतात हितगुज करून द्यावे इतकी समज आंद्रेईच्या आई, मरीनाला होती. त्यामुळे काहीतरी निमित्त काढून ती किचनमध्ये गेली.
इवा आणि आई बराच वेळ बोलत राहिल्या. आईची तब्येत इतकी अचानक कशी खालावली ह्याचेच इवाला राहून राहून आश्चर्य वाटत होते. "आमचं आता वय झालं, इवा! एकदा का तुला लग्न झालेली बघितली की कायमचे डोळे मिटायला मी मोकळी!" आई अचानक अशी भावनाविवश झालेली पाहून इवा दचकली. "अरे वा, मग नातवंडांचे कोडकौतुक कोण करणार?" आता दुःखातून आईला बाहेर काढावं ह्या हेतूने इवाने तिच्या आवडत्या विषयाकडे बोलण्याचा ओघ वळवायचा प्रयत्न केला. तिची ही मात्रा अचूक लागू पडली. आई आता खूप मोकळेपणाने बोलू लागली. "आंद्रेई आणि त्याच्या आईवडिलांनी जी मदत केली त्याचे ऋण कसे फेडावे हेच मला समजत नाही" आई म्हणाली. "विशेषकरून मी त्यांना गेल्या आठवड्यातच सांगितलं की इवाच्या मनात दुसरा कोणी तरी आहे. इतकं माहित असून सुद्धा त्यांनी खुल्या दिलाने इतकी मदत केली ही फार मोठी बाब आहे!" आईच्या ह्या बोलण्याने इवा अगदी हादरलीच. एकतर आधी हिनं आपल्याला न विचारता लग्नाचा प्रस्ताव त्यांच्याकडे टाकला आणि आता लगेचच हे सुद्धा त्यांना सांगून टाकलं. इवाच्या मनात विचारांचं वादळ सुरु झालं.
एव्हाना बराच वेळ झाला होता. मायलेकींच्या बोलण्याचा आवाज जसा मोठा झाला तसं आता आपण आत जायला हरकत नाही असं समजून मरीना आत आली. तिने दुपारच्या जेवणाची तयारी आटोपली होती. ईवा आणि आंद्रेई ह्या दोघांचे वडील शेतावर गेले होते, आंद्रेईच्या कामात मदत करायला. मदत करण्यापेक्षा मोकळ्या हवेत वेळ घालविण्याचाच त्यांचा जास्त इरादा होता असे इवाला वाटून गेले.
"इवा चल आपण तिघीजणी जेवायला बसुयात!" मरीना म्हणाली. इवाच्या पोटात तसेही कावळे ओरडतच होते. ती तात्काळ फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर जेवायला आली. मरिनाने जेवण तर सुग्रासच बनवलंच होतं आणि अगदी आकर्षकरित्या टेबलवर मांडून सुद्धा ठेवलं होतं. आई आणि मरीनाच्या गप्पा अगदी मजेत चालल्या होत्या. इवाने झटपट जेवण आटोपलं आणि ती आपल्या खोलीत जाऊन पहुडली.
इवाचे विचारचक्र सुरु झाले होते. ती आणि आंद्रेई ह्या दोघांच्या कुटुंबियांचे चांगलंच जुळलं होतं. दोघांचे वडील एकत्र भटकायला बाहेर पडत होते. मरिनाने तर इवाच्या आईची तिच्या आजारपणात अगदी सुरेख काळजी घेतली होती. आंद्रेई दिसायला बाहेरून राकट असला तरी पहिल्या भेटीत वाटला तितका वागण्याच्या बाबतीत पाषाणहृदयी नव्हता. आणि फारसा शिकलेला नसला तरी आपल्या उद्योगात मात्र पूर्णपणे स्थिरावलेला होता. "आपलं एक हे सर्जीवरचं प्रेमप्रकरण नसतं तर ह्याचा मी खरोखर स्वीकार करायला सुद्धा तयार झाले असते." इवाच्या मनात हा विचार जसा आला तशी ती दचकलीच. पहिल्यांदाच तिने सर्जीशिवाय दुसऱ्या कोणाचा जीवनसाथी म्हणून क्षणभर का होईना विचार केला होता. अपराधीपणाने तिचं मन जड झालं आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून ती खोलीबाहेर निघाली. दरवाजा उघडणार तितक्यात तिला मरीना आणि आईचं हळुवार आवाजातील बोलणं ऐकू आलं. "पोरानं, खूपच मनाला लावून घेतलं. इवा त्याला खूप आवडली होती. अगदी आपल्या घरच्यासारखी आहेत ही मंडळी! मोठ्या उत्साहाने तो मला म्हणाला होता. " मरीना आईजवळ आपलं मन हलकं करीत होती. आजच्या दिवसातील इतके धक्के सहन करण्याची इवात ताकद उरली नव्हती. ती तशीच पुन्हा बिछान्यात येऊन पडली. तिला अचानक त्या हिल स्टेशनवरील वोल्गा आणि विक्टरची आठवण झाली. त्यांचं कसं अगदी म्हातारपणापर्यंत प्रेम टिकून राहिलं होतं. असंच आपल्याबाबतीत सुद्धा व्हायला पाहिजे. आपल्या म्हणजे नक्की कोणाच्या इवा - सर्जीच्या कि इवा - आंद्रेईच्या? तिच्या मनात हा प्रश्न येताच ती खूप दचकली. हे आंद्रेई प्रकरण जरी तिच्या आईने आपल्या अकलेनुसार मिटवून टाकलं असलं तरी आपल्या मनात मात्र ते आपल्या कल्पनेच्या पलीकडे शिरकाव करून राहिलं आहे ह्याची तिला जाणीव झाली. एक केवळ प्रेम हा निकष लावला असता तर आंद्रेई सर्जीशी तुलनाच करू शकला नसता. पण जीवनसाथी म्हणून ह्या क्षणाला तो इवाच्या मनात सर्जीला तोलामोलाची टक्कर देत होता. आणि हिलस्टेशनच्या म्हाताऱ्या जोडप्याच्या रुपात आपल्याबरोबर आंद्रेईच असल्याचा भास तिला एक क्षणभर झाला. ही एक मोठी बिकट स्थिती होऊन राहिली होती आणि ती सोडवायची होती फक्त तिलाच! तिचा सखा सर्जी आपल्याच उज्ज्वल भवितव्याला मूर्त रूप देण्यात पूर्णपणे गुंतला होता.


(क्रमशः)



गुरुवार, १६ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ९

 
सर्जीच्या मॉस्कोतील प्रशिक्षणाचे तीन महिने पूर्ण झाले होते. प्रशिक्षण वर्गाच्या मुख्य अधिकाऱ्यांनी सर्व प्रशिक्षणार्थींना एका मीटिंगसाठी बोलावलं तेव्हा सर्वांची उत्सुकता ताणली गेली होती. अभ्यासक्रमाच्या मध्यावर एखादी महत्वाची घोषणा सर्वांना अपेक्षित होती. मुख्य अधिकाऱ्यांनी वर्गात प्रवेश केला तेव्हा एकदम शांतता पसरली. त्यांनी आतापर्यंत सर्वांनी केलेल्या उत्तम कामगिरीबद्दल त्यांचे अभिनंदन केलं. "ह्या वर्षीपासून आम्ही एक नवीन योजना सुरु करीत आहोत. ह्या वर्गातील ह्या टप्प्यावरील प्रथम तिघांना आम्ही दुसऱ्या सत्रासाठी तीन महिन्यासाठी जर्मनीला पाठवीत आहोत!" ह्या घोषणेने वर्गात अजूनच उत्सुकता पसरली. "तिसऱ्या क्रमांकावर आहे … , दुसऱ्या क्रमांकावर आहे …. " तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आपलं नाव नसल्याचं पाहून सर्जी नाराज झाला. पहिल्या क्रमांकावर आपण असल्याची शक्यता जवळजवळ नाहीच असंच त्याला वाटत होतं. "आणि पहिल्या क्रमांकावर आहे सर्जी!" ही घोषणा ऐकताच सर्जीचा आपल्या कानावर विश्वासच बसेना.
आता अचानक तीन महिन्यासाठी जर्मनीला जावं लागणार ह्या गोष्टीने तो एकदम आनंदला होता.
शुक्रवारची रात्र असल्याने सर्जीने आपल्या मित्रांसोबत त्या रात्री मोठी पार्टी केली. पहाटे तीन वाजताच्या सुमारास आपल्या रूमवर परतल्यावर अचानक त्याला इवाची तीव्र आठवण झाली. हा म्हणजे इतका वेळ इवा त्याच्या मनात डोकावत होतीच. पण ह्या क्षणी ती आपल्याजवळ आपलं हे यश आणि त्याचा आनंद अनुभवायला हवी होती. हे त्याला वाटून गेलं. पण आता ती येणं तर शक्य नव्हतं! मग पुढील दीड तास तो इवाला एक मोठं ई मेल लिहित बसला. आपलं करियर कसं आता एकदम भरारी घेईल, बढतीची संधी आता कशी पटापट मिळेल ह्याचं विस्तृत वर्णन त्यात होतं. ई - मेलच्या शेवटी मी जर्मनीवरून परत आल्यावर तुला भेटीन आणि तोवर तुला कसं मिस करीत राहीन ह्याचा ओझरता उल्लेख होता.
आंद्रेई आणि कुटुंबियांसोबतची साप्ताहिक सुट्टी घालवून इवा रविवारी सायंकाळी कझानला परतली. सर्जीला रात्री फोन करूयात असं तिने ठरवलं होतं. त्यात आंद्रेई प्रकरण आणि त्यामुळे आता आपण लवकर सेटल होणं कसं महत्वाचं आहे ह्याचा विस्तृत उल्लेख करायचं तिने ठरवलं होतं. पटकन फ्रेश होऊन तिने ई मेल चेक करावं म्हणून संगणक सुरु केला. सर्जीकडून ई मेल आला आहे हे पाहताच ती बरीच उत्साहित झाली. त्याच उत्साहात तिने ई मेल उघडला. ई मेल मधल्या सर्जीच्या जर्मनीच्या जाण्याची बातमी वाचताच तिच्या पायाखालची जमीनच सरकली. आता हा तीन महिने इथून दूर जाणार; समजा त्याला तिथे कायमची नोकरी मिळाली तर! आणि हो तो इतका मोठा झाला तर आपल्याला विसरणार तर नाही ना!" नाना शंका कुशंकांनी तिच्या मनात गर्दी केली. अचानक ती भानावर आली. "बाकी सर्व राहू दे पण आपल्याला सर्जीचं अभिनंदन करायला हवं!" हा विचार तिच्या मनात आला! क्षणभर थांबून तिने मग सर्जीला फोन लावला. सर्जीने मोठ्या उत्साहात फोन उचलला. "अगं, होती कोठे तू इतका वेळ! तुझ्या भ्रमणध्वनीवर मला संपर्कच करता येत नव्हता!" "अभिनंदन सर्जी! मनःपूर्वक अभिनंदन! तुझी सर्व स्वप्नं आता पूर्ण होणार!!" तिच्या बोलण्यावर सर्जी पूर्ण लक्ष देऊन होता. तिचे शब्द आणि तिच्या स्वरातला भाव ह्यात त्याला बरीच तफावत जाणवली. "सर्व काही ठीक आहे ना इवा?" सर्जीने विचारलं. "हो सर्व काही ठीक आहे! मी आईकडे जाऊन आले!" इवा म्हणाली. पुढे आपल्याला येणारा हुंदका आवरणार नाही हे जाणवून तिने मग बोलणं आवरतं घेतलं. सर्जीलाही थोडं काम होतं. त्याला तयारीतच राहायला सांगण्यात आलं होतं. जर्मनीचा विसा मिळाला की त्याला लगेच निघावं लागणार होतं. "ही आताच गावावरून आली आहे! नंतर सावकाश फोन करू" असा विचार करून त्यानेही मग बोलणं जास्त लांबवलं नाही.
आणि अचानक मग मंगळवारी ह्या तिघांचा विसा आला देखील आणि बुधवारची तिकटं सुद्धा हाती सोपविण्यात आली. इतक्या घाईगडबडीत सर्व काही झालं की कझानला फेरी मारायचा सर्जीचा विचार तसाच राहून गेला.  मंगळवारी संध्याकाळी इतक्या सगळ्या धावपळीत त्याने इवाशी अर्धा तास फोनवरुन बोलणं केलं. सर्जीसाठी हे फक्त तीन महिने होते. इवाला मात्र ह्या तीन महिन्यात सर्जी गाठू शकणाऱ्या भरारीचा अंदाज आला होता. तीन महिन्यांनी आपला सर्जी फार फार पुढे गेलेला असू शकेल ह्याची तिला जाणीव झाली होती. इतका पुढे की त्याच्या वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्याइतपत! आपल्या सोबतच्या सर्जीबरोबर हा संवाद जणू काही शेवटचाच असेल अशा आतुरतेने ती त्याच्याशी बोलत होती. मुठ कितीही घट्ट केली तरी त्यातली वाळू निसटून जाते तसे हे क्षण आपल्या हातून निसटून चालले आहेत ह्याचीच तिला खंत वाटत होती.
सर्जी बुधवारी गेला देखील आणि जर्मनीला सुखरूप पोहोचल्याचं त्याच ई मेल सुद्धा आलं. इवाला आपलं आयुष्य ढकलायला लागणारच होतं. असेच एक दोन आठवडे गेले. आणि मध्येच तीन चार दिवस आईचा फोनच आला नाही ह्याची जाणीव इवाला झाली. मग काहीशा अपराधीपणाने तिने आईला फोन केला. वडीलच फोनवर आले. "बरं झालं इवा तू फोन केलास! इतके दिवस आमची स्थिती एकदम वाईट झाली होती! आईला अचानक खूप ताप भरला होता. अगदी धावपळ करून इस्पितळात ठेवावं लागलं! मी तुला फोन करणारच होतो पण आंद्रेईच म्हणाला, "ती नोकरीत खूप धावपळीत असते. तिला आणखीन धावपळ नको! मीच सर्व सांभाळून घेईन! आणि खरंच त्याने सर्व सांभाळून घेतलं!" इवाला अगदी धक्का बसला. "आता कशी आहे आई? तिने मोठ्या काळजीने विचारलं. " आता बरी आहे, आंद्रेई तिला आता घरीच घेऊन येत आहे!" हे सांगताना वडिलांचा स्वर खुलला होता. फोन संपल्यावर इवा अगदी सुन्न होऊन बराच वेळ बसून राहिली होती.

(क्रमशः)


 

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ८

 

 रात्रभर इवाच्या डोळ्याला डोळा लागला नाही.  म्हटलं तर चूक तिचीच होती. सर्जीप्रकरण इतकं पुढं गेलं असता तिनं आईला थोडीतरी कल्पना देऊन ठेवावयास हवी होती. आईचं काय? गावात बसून शहरात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या भवितव्याची काळजी नाही करणार तर मग ती आई कसली? आणि मग तिने आपल्या पद्धतीने आंद्रेई आणि इवाची ओळख करून द्यायचा घाट घातला होता. पहाटेच्या सुमारास इवाला कशीबशी झोप लागली. स्वप्नात सर्जी यावा आणि त्याने असेच आपल्याला उचलून न्यावे अशी तिची फार इच्छा झाली होती. अगदी सर्जीच्या अरसिकपणाला पूर्ण स्वीकारायची तिची आज तयारी होती.
अचानक बाहेरच्या दरवाज्यावरील जोरदार खटखटाने तिची झोप मोडली गेली. खोलीतील घड्याळाकडे तिचे लक्ष गेलं. केवळ सात वाजले होते. "इतक्या सकाळ सकाळी कोण आलं" असा विचार इवाच्या मनात आला. तिने हळूच कानोसा घेतला. आंद्रेई आणि आईचं बोलणं चाललं होतं. आंद्रेईने त्याच्या शेतावर ह्या तिघांना बोलावलं होतं. २० किमी अंतरावर त्याचं गव्हाचं फार मोठं शेत होतं. काही मिनिटात तो निघून गेला. बहुदा त्याला आईने नकार दिला असावा असं समजून इवाला हायसं वाटलं. आणि तिने डोक्यावरून जाडी घोंगडी ओढून घेतली. दोन तीन मिनिटात तिला खोलीत पावलांचा आवाज आला. तरीही तिनं घोंगडी डोक्यावरून बाजूला केली नाही. मग एक मिनिटाने वगैरे "इवा" अशी तिच्या वडिलांची हाक तिच्या कानी आली. वडील आपल्या खोलीत आले हे जाणवताच इवा पटकन उठून बसली. "झोप लागली का पोरी!" वडिलांच्या ह्या प्रेमळ स्वराने तिला अगदी लहानपणाची आठवण झाली. "हो लागली!" वडिलांना बरं वाटावं म्हणून तिने बळेबळे खोटंच उत्तर दिलं. एव्हाना आईचं सुद्धा खोलीत आगमन झालं होतं.
आईच्या आगमनाने वडिलांच्या चर्येत थोडा फरक पडला होता. "पोरी, आंद्रेई आपल्या सर्वांना त्याच्या शेतावर बोलवायला आला होता. तासाभरात त्याच्या जीपमधून आपण निघुयात!" वडील तिची नजर चुकवत म्हणाले. केवळ वडील समोर होते म्हणून इवाने आपल्या रागावर आवर घातला. काही वेळ कोणीच काही बोललं नाही. मग इवाने शांत होऊन आपल्या विचारांना शब्दरूप दिलं. "तुम्ही आंद्रेईला आधीच शब्द देऊन मोकळं झाला आहात काय?" तिच्या ह्या रोखठोक प्रश्नाने वडील थोडे हादरले. मग आई त्यांच्या मदतीला धावली. "अग म्हणजे अगदी शब्द वगैरे दिला नाही, पण येत्या काही दिवसात आम्ही नक्की काय ते सांगू असे मी त्याच्या आईला म्हणाले" आई म्हणाली. "अरे वा म्हणजे हे प्रकरण त्याच्या आईवडिलांपर्यंत पोहोचलं वाटत!" इवाने मनातल्या मनात विचार केला. "माझी सर्जी नावाच्या एका मुलाबरोबर सध्या खास मैत्री चालू आहे!" इवाच्या ह्या शब्दांनी आश्चर्यचकित होण्याची पाळी आता तिच्या आईवडिलांची होती. वडिलांना तर काय बोलावे हे कळेना आणि ते खोलीबाहेर गेले. आईसुद्धा मिनिट - दोन मिनिट सुन्न होऊन तशीच बिछान्यावर बसून राहिली. मग उठून जड पावलांनी ती ही बाहेर गेली. आता बिछान्यातून उठण्याची इवाला अजिबात इच्छाच राहिली नव्हती. थोड्या वेळाने वडील पुन्हा खोलीत आले. "मुली, आपण असं आज न जाणं योग्य दिसणार नाही! आजचा दिवस तू कसाबसा निभाव! मग तू परत गेलीस की आम्ही त्यांना कळवू!" वडिलांच्या ह्या शब्दांनी'तिला खूप बरं वाटलं. त्यांनी जसा आपला विचार केला तसा आपणही त्यांचा करायला हवा ह्याची जाणीव होऊन ती बिछान्यातून उठली. "आता कशी माझी शहाणी मुलगी!" असे म्हणत वडिलांनी तिला जवळ घेतलं. आपल्या अश्रूंनी त्यांचा शर्ट ओला होतोय हे कळताच इवा तयारीचं निमित्त काढून त्यांच्यापासून दूर झाली.
तयारी करायला तसा कमीच वेळ होता पण इवाने घाईघाईत तयारी आटपत आणली. तरीही ती केस विंचरत असतानाच जोरात दार ढकलून आंद्रेई घरात प्रवेश करता झाला. दुसऱ्याच्या घरात प्रवेश करायची ही काही पद्धत झाली असा विचार करणाऱ्या इवाच्या चेहऱ्याकडे आंद्रेई पाहतच राहिला. "तू खूप सुंदर दिसते आहेस!" आंद्रेईच्या ह्या उद्गाराने एक शतांश सेकंद सुखाची भावना, त्यानंतर काही क्षण रागाची भावना इवाच्या मनात निर्माण झाली. त्यानंतर मात्र आपल्याला आयुष्यभर नाही पण आजच्या दिवस तरी ह्याची सवय करून घ्यावी लागणार अशी तिने स्वतःला मनोमन जाणीव करून दिली.
थोड्याच वेळात सर्व मंडळी आंद्रेईच्या जीपमध्ये बसली. आंद्रेईचे आईवडील शेतावरच बाजूला असणाऱ्या घरात सध्या मुक्कामाला होते. शेतीची काम खूप जोरात असली की ते तिथे राहत. आंद्रेई सुद्धा तिथं राही पण ह्या तिघांना घेण्यासाठी म्हणून तो गावातल्या घरात आला होता. इवाला आंद्रेईच्या बाजूच्या सीटवर बसवायचा विचार आईने सध्या सोडून दिला होता. पोरींना शहरात नोकरीशिक्षणासाठी पाठवू नये असे जुन्या बायक्या म्हणत तेच खरं असंच तिला मनोमन वाटत होतं. अपेक्षेप्रमाणे आंद्रेई धुमशान गाडी पळवत होता. एव्हाना गावाकडचा रस्ता सुरु झाल्याने अधूनमधून खडबडीत रस्ते लागत. तरीही आंद्रेई जीपचा वेग कमी करायचं नाव घेत नव्हता. शेवटी एकदाचं शेतावर पोहोचल्यावर "तरुण माणसा! आम्हांला सुखरूपपणे इथपर्यंत आणल्याबद्दल धन्यवाद!" वडिलांच्या ह्या उद्गारांनी सर्वजण हसले. आणि वातावरणात असणारा आणि ह्या तिघांनाच जाणवणारा अदृश्य तणाव काहीसा निवळला.
मंडळी शेतातील घराकडे जाऊ लागली. वातावरणात खूप थंडावा होता. गव्हाची कापणी आटोपली होती आणि आता ट्रकमध्ये हा गहू भरून शहरात पाठविण्याचं काम सुरु आहे अशी माहिती आंद्रेईने दिली. अजूनही गुश्यातच असणारी इवा ह्या शेताच्या दर्शनाने मात्र खूप खुश झाली होती. पण आपली ही ख़ुशी चेहऱ्यावर दिसणार नाही ह्याची पुरेपूर काळजी तिने घेतली. मंडळींना येताना पाहून आंद्रेईचे आईवडील स्वतःहून बाहेर आले. त्यांनी ह्या तिघांचे स्वागत केले. इवाला पाहून आंद्रेईच्या डोळ्यात उमटलेले खुशीचे भाव जसे इवाच्या नजरेतून सुटले नाहीत तसेच आंद्रेईच्यासुद्धा!
सर्वजण त्या छोटेखानी घरात स्थिरस्थावर होत नाहीत तितक्यात शेतावरील एक कामगार धावतच आला. एक गहू वाहून नेणारा ट्रक बंद पडला होता. त्याने दिलेली ही बातमी ऐकताच आंद्रेई ताडकन उठला. "सॉरी, मंडळी! मला जावं लागेल!" आणि तात्काळ आपल्या जीपला सुरु करून दिसेनासा देखील झाला. "ह्या हिवाळ्यात अडचणींना काही तोटा नाही!" आंद्रेईची आई चेहऱ्यावर कसनुसं हसू आणून म्हणाली. परंतु बहुदा त्यांना असल्या प्रकाराची सवयच असावी. सर्वजण मग गप्पांत गढून गेले. आंद्रेईच्या आणलेल्या स्वादिष्ट नास्त्यावर सर्वजण तुटून पडले.  आंद्रेईचे आईवडील दोघेही अगदी मितभाषी होते. आईमध्ये तर गावाकडची मृदुलता पुरेपूर उतरली होती. सर्वांचा नास्ता आटोपल्यावर घराबाहेर असलेल्या सायकलकडे बोट दाखवत  "मुली, तू ह्या सायकलवरून आंद्रेईला नाश्ता नेऊन देशील का?" असे तिने इवाला विचारलं. "दमली असशील तर राहून दे! जाईन मी पटकन!" असेही ती पुढे म्हणाली. आपण इतका नाश्ता केला, आणि आंद्रेईला पूर्णपणे विसरून गेलो अशी अपराधीपणाची भावना तिच्या मनात निर्माण झाली. आणि त्यातच तिने "हो मी जाते!" असे उत्तर दिले. तिच्या ह्या उत्तराने तिच्या आईला मात्र खास आश्चर्य वाटलं.
सायकल जरी असली तरी थंड हवेत इतके अंतर कापायला इवाला थोडा वेळ लागला. बऱ्याच दिवसाने इतक्या मोकळ्या हवेत सायकल चालवायचा अनुभव तिला हवाहवासा वाटत होता. तिला सायकलवर येताना पाहून आंद्रेई बराच विस्मयचकित झाला. ट्रक अजूनही चालू होत नव्हता. इवाने जवळच सायकल ठेवली आणि नाश्त्याचा डबा घेऊन ती ट्रकजवळ पोहोचायला आणि ट्रक सुरु व्हायला एकच गाठ पडली. "ओह, धन्यवाद! तुझ्या येण्याने हा नाठाळ ट्रक सुद्धा सुरु झाला!" आंद्रेई ह्यावेळी मात्र अगदी शांतपणे बोलला. "आणि हो नाश्ता आणल्याबद्दल सुद्धा धन्यवाद!" "यु आर वेलकम!" इवा म्हणाली.   थोड्याच वेळात आंद्रेईने नाश्ता संपवला. आणि हो त्याने इवाला सुद्धा विचारलं. "माझा आताच झालाय!" इवा म्हणाली.
इवाची आता सायकलवरून परतायची तयारी सुरु झाली होती. इतक्यात शेतावर येणारे काही कामगार येणार नसल्याचा निरोप आला. आंद्रेईची चिंतातूर बनलेली मुद्रा इवाच्या नजरेतून सुटली नाही. "माझ्या थांबण्याने काही मदत होत असेल तर मी थांबते इथे!" इवाच्या ह्या उद्गाराने आंद्रेईला हायसं वाटलं नसतं तरच नवल!

(क्रमशः)







शनिवार, ११ ऑक्टोबर, २०१४

I MISS YOU पांगारा!

लहानपणची गोष्ट! वसईची थंडी मार्च सुरु झाला तरी मागे सरण्याचे नाव काढत नसे. शाळेतील क्रीडा महोत्सव फेब्रुवारी मध्ये व्हायचा. त्यानंतर स्नेहसंमेलन वगैरे झाले की वार्षिक परीक्षांचे वारे सुरु व्हायचे. दहावी बारावीच्या परीक्षा सुरु झाल्यावर आमची शाळा अर्धवेळ म्हणजे दुपारी ३ वाजताच्या सुमारास चालू व्हायची. अशा सुमारास मला अभ्यासासाठी गच्चीवर जायला आवडायचे. आंघोळ, न्याहारी आटपून सकाळी साडेआठ - नऊच्या सुमारास मी दोन तीन विषयाची पुस्तके घेवून जात असे. अभ्यासाबरोबर तिथला एक उद्योग म्हणजे गच्चीजवळील पांगार्याच्या झाडाचे निरीक्षण. मार्च महिन्याच्या सुरुवातीस हे झाड लाल फुलांनी बहरून जाई. आजूबाजूच्या परिसरातील पक्षी ह्या झाडावर गर्दी करीत. पोपट, कोकिळा, कावळा अशा नेहमी आढळणाऱ्या पक्ष्यांसोबत बाकीचे पक्षीही गोळा होत. मग झाडावर चाले तो ह्या पक्ष्यांचा सुमुधुर कलकलाट! ह्या कलकलाटासोबत अभ्यास करण्याचा आनंद वेगळाच. हे सर्व पक्षी ह्या फुलांचा मध पिण्यासाठी एकमेकांशी स्पर्धा करीत. कावळे थोडीफार दादागिरी देखील करीत. एप्रिल मध्ये परीक्षा सुरु होईपर्यंत ही फुले मग हळू हळू नाहीशी होत. उरे मग केवळ काट्यांनी व्यापलेले पांगार्याचे झाड! पुढे पावसाला आला की हेच झाड हिरव्या पानांनी बहरून जाई. आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला आपला पर्णसंभार झाडून देई! ह्या पांगार्याच्या झाडाच्या बिया दगडावर घासल्या की बर्यापैकी गरम होत आणि मग बालमित्रांना चटका द्यायला उपयोगी पडत!

पुढे काळ बदलला. हे झाड आमच्या आणि शेजार्याच्या बरोबर हद्दीवर होते. ह्या जगात नुसत्या कलात्मक सौंदर्याला किंमत नसते, टिकायचे असेल तर एकतर ही कला बाजारात विकता यावी किंवा त्या वस्तूचे व्यावसायिक मोल असावे लागते. बिचाऱ्या पांगार्याच्या झाडाच्या लाकडाला काही व्यावसायिक किंमत नव्हती आणि एके दिवशी येवून लाकूडतोड्यांनी ह्या झाडाला तोडून टाकले. ते झाडही गेले आणि त्याबरोबर नाहीसा झाला तो मार्चच्या सुंदर सकाळचा पक्ष्यांचा सुमधुर किलकिलाट. ह्या नष्ट झालेल्या आनंदस्थळामुळे त्या परिसरातील पक्ष्यांचे दुखावलेले भावविश्व आपणास कसे कळावे? बाकी वसईत ह्या झाडांची संख्या मग झपाट्याने कमी होत गेली. रमेदी ते पारनाका ह्या रस्त्यांवरील वेगाने कमी झालेल्या जुन्या वाड्यान प्रमाणे!  आज अचानक ह्या पांगार्याची आठवण आली. नेटवर मिळालेला हा एक पांगार्याचा फोटो!



शुक्रवार, १० ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ७



 
 मॉस्को ते कझानचा प्रवास तसा कठीणच झाला. इवाला बोलतं करायचे मारियाचे प्रयत्न निष्फळच ठरले. कझानला पोहोचल्यावर इवाला हायसं वाटलं.
आयुष्य पुन्हा चालू झालं होतं. इवाच्या आयुष्यात येऊन गेलेल्या वादळाची ना कोणाला जाणीव होती आणि असती तरी त्याची पर्वा असती की नाही हा ही प्रश्नच होता. आता सर्जी आणि इवा ह्यांच्याकडे एकमेकांचे फोन क्रमांक ही होते आणि ई - मेल सुद्धा! तीन चार दिवस सर्व काही शांत शांत होते. आणि मग अचानक एक दिवस सर्जीचा ई - मेल आला. "इवा, कशी आहेस? मी त्या दिवशी इतकं सारं बोलायला नको होतं! चुकलंच माझं! सॉरी!" हा ई मेल वाचून इवा काही एकदम उत्साहित वगैरे झाली नाही. त्याचं तिलाच मग आश्चर्य वाटलं. पूर्ण आयुष्य उत्साहात जगण्याचा आपला निर्धार असा कसा इतक्या लवकर गळून पडला ह्याची थोडी खंतही तिला वाटली.  सर्जीला तिने दिलेलं उत्तर फारसं काही उत्साहपूर्ण नव्हतं. ई मेल अधून मधून चालू होती पण त्यात थंडी - नोकरीच्याच गोष्टी जास्त चालत होत्या. संवाद चालू असूनही अबोला निर्माण झाला होता.
असंच काही दिवसांनी मग इवाची आई अचानक एका सकाळी कझानला येऊन थडकली. आपल्या गावाकडे राहणाऱ्या आईला पाहून इवाला काहीसं आश्चर्य वाटलं. आठवड्याचा मध्य असल्याने तिला ऑफिसला जाणं तर भाग होतं.  त्यामुळे आईला काही बोलायला संधी मिळाली नाही. संध्याकाळी मात्र आई बोलती झाली. शुक्रवारी संध्याकाळी इवाला गावाला घेऊन जाण्यासाठी ती आली होती. "बरेच दिवस तुझं गावाला येणं झालं नाही, चल दोन दिवसाची!" आईचं हे बोलणं प्रेमाचं असलं तरी तिला नाकारलं तर ती झटकन रौद्र रूप धारण करू शकते हे इवा चांगलेच जाणून होती. त्यामुळे गावाला जाण्याशिवाय आता पर्याय नाही हे इवाला समजून चुकलं होतं. तिने मारियाला सोबतीसाठी विचारलं सुद्धा! पण मारियाला असं अचानक येणं शक्य नव्हतं.
शुक्रवारी संध्याकाळचा प्रवास इवाला कंटाळवाणा वाटला होता. ऑफिसातून एकतर लवकर निघावं लागलं होतं तिला आणि मग शनिवार रविवार कसा घालवायचा ह्याचाच तिच्या डोक्यात विचार चालू होता. गेले कित्येक वर्षे इवा आपल्या घरापासून दूर राहत होती. पहिल्यांदा शिक्षणासाठी आणि मग नोकरीसाठी! सुरुवातीला आपल्या घरच्यांना, गावाला खूप मिस करायची ती! पण जसजशी ती शहरात रुळत गेली तसतशी गावची ओढ कमी होत गेली होती. ओढ कमी होत गेली होती असे म्हणणं चुकीचं ठरलं असतं. ओढ काहीशी आत जाऊन बसली होती.
इवा आणि आई घरी पोहोचले तसे वडिलांनी त्यांचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं. शेतात ह्या वयात सुद्धा कष्ट करत असलेल्या आपल्या वडिलांकडे बघून इवाचे डोळे काहीसे भरून आले. आई आणि तिचं नातं प्रेमाचं असलं तरी अधून मधून उडणाऱ्या शाब्दिक चकमकींमुळे त्याला काहीसा रांगडेपणा निर्माण झाला होता. पण वडिलांचं आणि इवाचं नात मात्र वेगळ्या पातळीवरच होतं. त्यात शब्दांचा वापर फार क्वचितच होत असे. आपल्या छोट्याशा इवाला इतकी मोठी झालेली पाहून आणि शहरात इतक्या आत्मविश्वासाने वावरताना पाहून तिच्या वडिलांचे डोळे अभिमानाने भरून येत. पण त्याच वेळी तिच्या लहानपणच तिचं निरागस रूप हरवलं म्हणून त्यांना मनातून हळहळही वाटत असे.
इवा ताजीतवानी होऊन आली आणि जेवणाचं काय म्हणून तिनं आईला विचारलं. "शेजारच्या नताशा मावशीकडे जेवायला जायचंय" तिची नजर चुकवत आई म्हणाली. "तू मला आधी नाही सांगायचं का!" अपेक्षेप्रमाणे इवाचा पारा चढला. पुढील काही वेळ मग तिच्या वडिलांनी तिला शांत केलं. शेवटी कशीबशी धुसफुसतच इवा नताशा मावशीकडे जायला तयार झाली. आपल्या नवऱ्याच्या अकाली मृत्युनंतर ही नताशा मावशी बिचारी एकटीच राहत असे. इवाला ती आवडायची पण खरतर ती आज खूप दमली होती म्हणून तिनं इतका त्रागा केला होता.
"या, या ! आपलं स्वागत आहे!" एका रांगड्या युवकानं नताशा मावशीच्या घरात ह्या तिघांचं स्वागत केलं. इवा अगदी आश्चर्यचकित झाली. मावशीकडे अजून कोण असेल अशी तिने अजिबात कल्पनासुद्धा केली नव्हती. "वेलकम इवा! माझे नाव आंद्रेई!" इवाला संधी न देताच त्याने आपल्या खरखरी हातांनी तिच्याशी हस्तालोंदन केले. इवाच्या शहरी संस्काराची आवरणं तिला अधिकाधिक अस्वस्थतेकडे नेत होती. "आपल्याला भेटून आम्हांला आनंद होत आहे!" आईच्या ह्या उदागारावर इवाला आश्चर्य वाटून गेलं. :कोण हा दणकट आंद्रेई! आणि ह्याला भेटून आईला का बरे आनंद व्हावा!" इवाला तर खूप संताप आला होता. आपला हात अजून आंद्रेईने सोडला नाही म्हणून रागाचा एक कटाक्ष सुद्धा तिने त्याच्याकडे टाकला. "जोवर तू मला वेलकम म्हणत नाही तोवर मी तुझा हात सोडणार नाही!" आंद्रेई म्हणाला. "ह्याला काही रीतीभाती आहेत की नाही!" मनातल्या मनात संताप पराकोटीला पोहोचलेल्या इवाने शेवटी नाईलाजास्तव "नाईस मीटिंग विथ यु आंद्रेई!" म्हणत आपला हात त्याच्या हातातून सोडवला.
पुढे दोन तासभर आई, नताशा आणि आंद्रेई ह्यांचीच गडबड चालू होती. इवा आणि वडील मात्र शांतपणे बसले होते. बाकी नताशा मावशीने जेवण मात्र अगदी रुचकर बनवलं होतं. त्यामुळे इवा काही प्रमाणात शांत झाली होती. विविध पदार्थावर आडवा हात मारणाऱ्या आणि मोठ्याने गडबड चालू ठेवणाऱ्या आंद्रेईकडे ती काहीशा विरक्त वृत्तीने पाहत होती. आपला सर्जी असायला हवा होता असे अचानक एका क्षणी तिला वाटून गेलं. पुढच्या दोन दिवसात त्याला नक्की फोन केला पाहिजे असा मनोमन तिने निग्रहसुद्धा करून टाकला.
निघताना "पुन्हा आपली भेट होईलच" असे आंद्रेई म्हणाला तेव्हा काहीशा आश्चर्यपूर्ण नजरेने तिनं त्याच्याकडे पाहिलं. घरचा दरवाजा लावताच तिने आपला  राग आईवर काढण्यास सुरुवात केली. आईच्या चेहऱ्यावरील मिश्किल हसू पाहताच मात्र तिला आश्चर्य वाटलं. "होईल सवय हळू हळू! मी नाही का तुझ्या वडिलांच्या शांत स्वभावाच्या वडिलांशी कसं जुळवून घेतलं!" आईचे हे शब्द लोखंडाच्या तप्त रसाप्रमाणे तिच्या कानात शिरले!

(क्रमशः)


 

बुधवार, ८ ऑक्टोबर, २०१४

मदिराप्राशनास समाजमान्यता

काळ कोणासाठी थांबत नाही, तो सदैव पुढेच जात असतो. बदलत्या काळानुसार समाजाने स्वीकारलेल्या रूढी बदलत जातात. पूर्वी वर्ज्य असलेल्या रूढी कालांतराने समाज स्वीकारतो. मद्यपान ही पूर्वीच्या काही पिढ्या वर्ज्य असलेली गोष्ट आज समाजाने बर्याच प्रमाणात स्वीकारलेली आहे. ह्याबाबत असा आक्षेप घेतला जावू शकतो की देव देखील सोमरस पान करायचेच ना ? पण आजच्या लेखाचा विषय प्रामुख्याने सुशिक्षित मध्यमवर्गाशी निगडीत आहे. मी जाणीवपूर्वक मद्यपानाच्या आहारी जाऊन संसाराची परवड करणाऱ्या लोकांविषयी इथे वळत नाही. त्यांचे मनावर नियंत्रण नाही. पूर्वीचा शिक्षित वर्ग जो बहुसंख्येने निर्व्यसनी असायचा तो आज विशिष्ट प्रसंगी मद्यपान करतो. ह्यातील बहुसंख्य लोक एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाहीत. मद्यपानाचा ते आपल्या व्यावसायिक जीवनावर परिणाम होवून देत नाहीत. त्यांना मद्यपान का करावे वाटते? मला ह्यात अनुभव नाही पण एकंदरीत असे जाणवते की व्यावसायिक, वैयक्तिक जीवनातील ताणतणावापासून मुक्त होवून काही काळ एका वेगळ्या विश्वाचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी हा पर्याय स्वीकारलेला असतो. माझे म्हणणे एकच की वेगळ्या विश्वात जाण्यासाठी केवळ मद्यपान हाच एक मार्ग नाही, संगीत, भटकंती, चित्रकला अशा अनेक मार्गांचा आधार आपण घेवू शकतो. हे पर्याय प्रथम अवलंबिण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मला खटकणारा मुख्य मुद्दा म्हणजे घरगुती समारंभात ह्या मद्यपानाचा प्रवेश. ही सर्व दर्दी मंडळी एका वेगळ्या बैठकीच्या खोलीत जावून हा कार्यक्रम करतात. त्यामुळे सर्व लोक एकत्र येण्याची जी संधी होती ती गमावली जाते. घरात मद्यपान करणे हा पुढील पिढीसाठी आपण एक सर्वमान्य शिरस्ता करून ठेवत आहोत हे मला खूपच खटकते. दुर्दैवाने ह्या प्रथेला विरोध करणारी फार कमी अधिकारी मंडळी आता शिल्लक राहिली आहेत.

ह्या लेखात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ह्या विषयावर एक खुली चर्चा व्हावी हाच एक उद्देश!

सोमवार, ६ ऑक्टोबर, २०१४

दुरावा - ६

 
दुसऱ्या दिवशी इवा अल्बिनाच्या घरातून सकाळी लवकर बाहेर पडली ती कझानला जातानाची दुपारची ३ वाजताची बस पकडायचं ठरवूनच! सर्जीच्या घरी जाताना तिच्या मनात धाकधूक होतीच. सर्जीचा स्वभाव आपणास पूर्ण कळला आहे ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. सर्जीविषयी आपल्याला प्रेमापेक्षा आदरच जास्त वाटतो आहे असे तिला कालपासून वाटू लागलं होतं. आणि प्रेमात पूर्णपणे झोकून देण्याची आपली इच्छा सर्जीसोबत कधीच पूर्ण होणार नाही हे तिला हळूहळू कळू लागलं होतं. आदर, शिस्तप्रिय जीवन ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिची इतक्यात तयारी नव्हती. आपण सर्जीच्या पूर्ण प्रेमात पडलो आहोत ह्याची तिला जाणीव होती पण आपल्या मनात असणाऱ्या प्रेम पूर्णतः अनुभवण्याच्या तीव्र इच्छेला सर्जीसाठी तिलांजली द्यावी लागेल हा विचार तिला नकोसा वाटत होता. प्रेमात त्याग करावा लागतो पण त्यागानेच पूर्ण जीवन व्यापून टाकणं आपल्याला जमेल ह्याची तिला खात्री नव्हती.
सर्जीच्या घरी दरवाजा उघडला तो विवियन ह्यांनी! इवाचं स्वागत करून त्यांनी तिला बसण्याची विनंती केली. "सर्जी आंघोळीला गेलाय, येईल इतक्यातच!" विवियन म्हणाले. एलेना कोठे आहे असं विचारायचं इवाच्या मनात आलं. परंतु ती हा प्रश्न विचारणार त्याआधीच विवियन ह्यांनी सर्जीच्या एकंदरीत प्रशिक्षणाविषयी आणि त्याच्यासमोर असलेल्या उज्ज्वल संधीविषयी बोलणं सुरु केलं. बघता बघता त्यांनी विषयाचा ओघ आपल्या करियरकडे वळवला आणि आपण आपल्या कारकिर्दीत कशी प्रगतीची शिखरं गाठली ह्याचा आलेखच मांडायला त्यांनी सुरुवात केली. आपली ह्यातून कशी सुटका होईल ह्याचा विचार करीत असतानाच सर्जी ताजातवाना होऊन बाहेर यायला आणि खरेदीसाठी बाहेर गेलेली एलेना परतायला गाठ पडली. इवाने सुटकेचा निश्वास टाकला. "ह्यांनी तुला जास्त काही कंटाळवल तर नाही ना? एलेना मिश्किल स्वरात म्हणाली. त्यावर इवाने मनमोकळ्या हास्याने दाद दिली. परंतु आपलं हे मनमोकळ हसू सर्जी आणि विवियन ह्या दोघांनाही फारसं काही रुचलं नाही हे त्यांच्या मुद्रेवर स्पष्टपणे दिसल्याने इवा शांत झाली.
एकंदरीत घरातील वातावरण गंभीरच होते. एलेनाच काय ती एकटी वातावरण खेळीमेळीच ठेवायचं प्रयत्न करीत होती. शेवटी एकदाचा सर्जी म्हणाला, "आम्ही दोघं आता बाहेर निघतो!". इतका वेळ इवाची असलेली अवघडलेली मुद्रा पाहून एलेनानेही तिला थांबण्याचा आग्रह केला नाही. निरोप घेताना "पुन्हा भेटूच लवकर" असे इवाला सांगायला एलेना विसरली नाही.
सर्जी आणि इवा जवळच असलेल्या एका मॉलमध्ये शिरले. "सर्जी, सॉरी हं पण मी तुला दिलेला स्कार्फ हिल स्टेशनला विसरून आले! मी आता एक नवीन स्कार्फ घेतेय!" इवा म्हणाली.  सर्जीच्या डोळ्यात अचानक मिश्किल भाव उमटले. "एक क्षणभर डोळे बंद कर, इवा!" सर्जी म्हणाला. "पण का?" इवाला असला खट्याळपणाच खूप आवडायचा. "मी सांगतो ना, म्हणून!" सर्जी म्हणाला. "नाही करणार जा!" इवाचा खट्याळपणा पूर्ण जागृत झाला होता. सर्जीचा चेहरा काहीसा अवघडल्यासारखा झाला. पुढे काय करावं हे त्याला कळेनासं झालं. त्यानेच पुढे होऊन आपले डोळे घट्ट मिटून घ्यावेत हे इवाची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. काहीशा नाराजीनेच तिने डोळे बंद केले. आपल्या डोळ्याभोवती एक मऊ कपडा बहुदा स्कार्फच गुंडाळला जात आहे हे तिला कळत होते. "उघड आता डोळे आता!" सर्जीचा उत्साहित स्वर तिच्या कानी आल्यावर तिने डोळे उघडले. हळुवारपणे तिने आपल्या डोळ्याभोवती सर्जीने गुंडाळलेला स्कार्फ दूर केला. आता आश्चर्याने थक्क होण्याची तिची पाळी होती. आपला हा हरवलेला स्कार्फ सर्जीकडे कसा आला हे कोडं तिला उलगडलं नाही. "सर्जी, सांग ना हा स्कार्फ तुझ्याकडे कसा आला ते!" सर्जी त्या दिवशी प्रथमच तिला उत्साहित वाटला. उत्साहित चेहऱ्याच्या सर्जीच्या तोंडून स्कार्फची कहाणी ऐकता ऐकता हा असाच सर्जी आपल्याला मिळायला हवा असे तिला वाटून गेलं.
वातावरणात थोडा रोमांच भरला होता. एका रोमॅंटिक रशियन चित्रपटाचा त्या दोघांनी आनंद लुटला. इवा त्या कालावधीत कझानमध्ये दोघांनी एकत्र घालविलेल्या वेळेची आठवण काढत होती. तर सर्जीच्या डोक्यात पुढील आठवड्यातील कामाची यादी नाचत होती. इवाला ३ ची बस पकडायच्या आधी तासभर होता. पटकन दुपारचं जेवण आटपून घ्यायचं दोघांनी ठरवलं.ऑर्डर देऊन पाच मिनिटं झाली तरी आपल्या नावाचा पुकारा होत नाही म्हणून सर्जी बेचैन होता. "आपण लग्न कधी करायचं?" ह्या इवाच्या पूर्णपणे अनपेक्षित प्रश्नाने सर्जी अगदी गोंधळून गेला. ह्या प्रश्नाची त्याने पुढील वर्षभर तरी अपेक्षा केली नव्हती. "आपण ह्या विषयावर आतापर्यंत कधी बोललोच नव्हतो! मला विचार करायला थोडा वेळ दे इवा!" आताशा थोडफार सावरलेल्या सर्जीने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. एव्हाना टेबलावर प्लेट्स आल्या होत्या. पण आता दोघांचही भोजनातून लक्ष उडालं होतं. आपण एकदम हा प्रश्न विचारायला नको होता हे इवाला मनातून कळून चुकलं होतं. पण कधी नव्हे तो सर्जी थोडासा उत्साहित झाल्यावर तिने एकदम पुढची पायरी गाठली होती.
"माझं चुकलं सर्जी!" इवाच्या ह्या अचानकपणे आलेल्या कबुलीने सर्जी पुन्हा एकदा भांबावून गेला. भावनांचा इतका चढउतार इतक्या थोड्या वेळात त्याने कधी अनुभवला नव्हता. त्याच्या मनात एकतर फार कमी भावना येत. इवा आवडली होती त्याला. अगदी मनापासून! आवडलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि तिच्याशी आयुष्यभर सुखाने संसार करायचा इतकं त्याला माहीत होतं. परंतु हा सर्व प्रवास इतका भावनापूर्ण असेल ह्याची त्याला कल्पना नव्हती आणि आता ह्या प्रकारासाठी स्वतःला बदलवून घेण्याचा उत्स्फूर्तपणा त्याच्याकडे नव्हता. सर्जीच्या डोक्यात इतकं सगळं वादळ चाललं होतं तोवर इवा त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.
"सर्जी, मी इतके दिवस तुझी खूप वाट पाहिली. तुझ्याशी काहीच संपर्क नाही. तुलादेखील मला कधी संपर्क करावासा वाटला नाही. मी तर जवळजवळ तुझी आशा सोडून द्यायच्या मार्गावर होते आणि अचानक तू त्यादिवशी बसमधून ओझरता दिसलास! विझत आलेलं सर्व भावना पुन्हा जागृत झाल्या! आणि मग मी मॉस्कोला आले. अचानक आपली भेट झाली. आता अर्ध्या तासात आपली पुन्हा ताटातूट होणार. ह्यावेळी आपण एकमेकांचा फोन, ई मेल सर्व काही जरी घेतलं असलं तरी तुझ्या कामातून तुला वेळ मिळेल काय ह्याची मलाच काय तुलाही खात्री देता येणार नाही!" इतक्या दिवसाच्या मनात दबलेल्या सर्व भावनांना  इवा पूर्ण मोकळीक देत होती.
"हिला आपल्या मनातील भावनांना किती वेगानं शब्दरूप देता येतं" सर्जी अचंब्याने विचार करीत होता. "इवा, मी तुझ्यापेक्षा खूप वेगळा आहे ग!" इतक्या वेळाने सर्जीच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं. "मी प्रेमातील भावनांचे इतके गहिरे रंग असतील ह्याची कल्पना केली नव्हती, इवा!" तो पुढे म्हणाला. "ते ठीक आहे रे! पण तुझ्या तोंडून
  "तू, माझ्याशी लग्न करशील का?" हा प्रश्न ऐकण्याची आपण कझान मध्ये एकत्र असताना आणि गेल्या दोन दिवसात जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी किती आतुरतेने वाट पाहत होते सांगू!"
दोघांचेही बर्गर संपले होते आणि आता निघायची वेळ होत आली होती. सर्जीने आपलं कार्ड बिल भरण्यासाठी पुढे केलं. इतका वेळ सर्जीच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं. कार्ड स्वाईप करून परत आणून देणाऱ्या वेटरला टीप देऊन दोघे बाहेर पडायला निघाले. "इवा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू?" सर्जीने विचारलं. इवाने मानेनेच होकार दिला. "तुझी ही भावनिक गरज आयुष्यभर अशीच राहील असं तुला वाटत का इवा?" बस स्थानकाच्या दिशेने चालता चालता सर्जी म्हणाला. "इवाने काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. "नाही म्हणजे काही काळ इतकं भावनिक होईल मला कदाचित जमेल, पण कायम असं भावनिक बनून राहणं माझ्या मर्यादेच्या पलीकडे आहे!" सर्जी एकदम बोलून गेला. इवा एकदम हादरून गेली. पुढची तीन चार मिनिटे दोघेही जवळजवळ चालत असले तरीही दोघांमध्ये फार मोठा दुरावा निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. बस स्थानक जवळ आलं होतं. आणि ह्या दोघांना येताना पाहून मारियाने सुटकेचा निश्वास टाकला. कझानची बस सुटायला फक्त दोन मिनिटं राहिली होती.
(क्रमशः)

 



रविवार, ५ ऑक्टोबर, २०१४

विवाह संस्था !


 

२३ जूनच्या चतुरंग पुरवणीत दोन लेख वाचले, एक 'एकाकी नसलेले एकटेपण' आणि दुसरा 'विवाह संस्थेतील ढोंग!' व्यक्तिस्वातंत्र्याचा विचार केला तर दोन्ही लेखातील मुद्दे योग्य! आयुष्यात एकटेपण बर्याच जणांना अनुभवावे लागते. काहींनी ते ठरवून स्वीकारले असते तर काहींना परिस्थिती ते स्वीकारण्यास भाग पाडते. पूर्वी एकटेपण म्हटले की मनुष्य दुःखी असणार असेच अभिप्रेत असायचे. परंतु आजच्या काळात एकाकी असूनसुद्धा आनंदी असलेले बरेचजण आहेत असा पहिल्या लेखाचा सारांश. दुसर्या लेखात एकंदरीत विवाहसंस्थेची चिरफाड केलेली! आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधात अजूनही बहुतांशी स्त्रिया नवर्यांचा दांभिकपणा कसा सहन करतात यावर या लेखाचा भर. दोन्ही लेख स्त्रियांनी लिहलेले. अतिशय संतुलित विचारसरणीने लिहिलेले. आधी म्हटल्याप्रमाणे व्यक्तिस्वातंत्र्याच्या दृष्टीकोनातून दोन्ही लेखातील विचार एकदम योग्य.
दोन्ही लेखात सध्याच्या जगात प्रकर्षाने जाणवणारे एक समान सूत्र आढळते. ते म्हणजे आजच्या पिढीत वाढलेली स्वत्वाची भावना. हा जो स्व असतो तो सदैव स्वतःसाठी अनुकूल वातावरण शोधत असतो. हवी ती शाळा, हवे तसे घर, हवी ती नोकरी, हवे तसे मित्र अशी ह्या स्व ची मानसिकता असते. ह्या सर्व गोष्टींमध्ये नाही पटले तर त्वरित दुसरा पर्याय शोधला जातो. तसेच जीवन साथीदाराच्या बाबतीत होण्याची शक्यता असते. म्हणून काही जण लग्नाचा मार्ग स्वीकारायचे नाकारतात तर काही जण लग्नानंतर हा मार्ग तत्काळ बदलायचे धाडसही दाखवू शकतात. आपल्या भारतातील किंवा जगभरातील ज्या काही विवाहसंस्था आजच्या काळापर्यंत टिकल्या त्यासाठी व्यक्तिगत त्यागाचा मोठा हातभार लागला. प्रेमविवाह असो की जमविलेले लग्न असो, लग्नानंतर संसार करताना दोघा साथीदारांचे सूर सदोदित जुळणे हे बरेचसे कठीण. परंतु ह्या प्रवासात जेव्हा कधी हे सूर जुळतात तेव्हा त्या क्षणाच्या जोरावर बाकीचे मतभेद पचविण्याची प्रगल्भता दोघांकडे हवी. नाहीतर न पटणार्या गोष्टींचाच सदैव विचार केल्यास उरतो तो केवळ दोन समांतर रेषांचा प्रवास.
इथे आपण आपल्या पूर्वजांच्या मानसिकतेचा थोडा विचार करूया. त्यांनी विवाहसंस्थेच्या दुषपरिणामांविषयी विचार केला नसावा असे मला वाटत नाही. त्यांना नक्कीच माहित असणार की तत्कालीन विवाहपद्धतीत (त्यातही एकत्र कुटुंबपद्धतीत) कोणत्या तरी एका बाजूची (९९.९९ टक्के स्त्रियांची) परवड होणारच! त्यांनी त्यांच्यासमोरील दोन पर्यायांचा विचार केला असावा. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! त्यावेळी त्यांनी दुसर्या पर्यायाचा स्वीकार केला. हे हस्तांतरण योग्यरित्या व्हावे यासाठी त्यांना कुटुंबसंस्थेची गरज भासली. त्यांच्या चाणाक्ष नजरेने ओळखले असावे की या कामासाठी स्त्रियांचा त्यावेळचा स्वभाव योग्य! म्हणून त्यांनी विविध रीतीभाती निर्माण करून स्त्रियांना त्यात समाविष्ट करून घेतले. खरोखर परखड परीक्षण केले तर असे जाणविते की भारतीय संस्कृतीने, समाजाने स्त्रियांची मेंदूधुलाई केली. स्त्री ही एक क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते अशी भव्य दिव्य विधाने करून त्यानी स्त्रियांना भावनिक पाशात अडकविले. संसार टिकले ते स्त्रियांच्या अपत्यप्रेमापोटी, पतीप्रेमापायी नव्हेत!
आधी म्हटल्याप्रमाणे आपल्या समोर दोन पर्याय आहेत. व्यक्तीस्वातंत्र्यास प्राधान्य की आपल्या संस्कृतीचे मनुष्यजातीच्या पिढ्यान मार्फत हस्तांतरण! बदलत्या काळानुसार ह्या दोन पर्यायांतील कोणता स्वीकारायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण त्यातील एक पर्यायच आहे मुळी व्यक्तिस्वातंत्र्याचा! हा स्वीकारताना आपण समाज म्हणून काय गमावतो आहे हा प्रश्न फक्त एकदा स्वतःला विचारून पहावा! विवाह संस्था पूर्णपणे नष्ट होणे सुद्धा कोणालाही आवडणार नाही. आयुष्यातील तथाकथित सुरक्षेच्या, स्थिरतेच्या शोधापायी, अपत्यप्रेमापोटी, किंवा विवाह संस्थेचा पूर्ण लोप होवून न देण्यासाठी माझा वैयक्तिक हातभार असावा ह्या भावनेपायी बरेचसे विवाह टिकून राहणार. राहिली गोष्ट आदर्श संसाराच्या शोधाची. मृगजळाच्या शोधाप्रमाणे त्याचा शोधही चालूच राहणार.

दुरावा - ५

 
 इवाच्या नृत्य कौशल्याविषयी अजिबात शंकाच नव्हती. तिचे ते नृत्यामधील पदलालित्य सर्वांना मोहवून टाकत होते. सुरुवातीला सर्जी पुरता गोंधळून गेला होता. तिच्या त्या अदाकारीला साथ देणे त्याला अगदी अवघड चाललं होतं. आणि मग  तो क्षण आला. सर्जीने इवाच्या नृत्याची लय ओळखली आणि तो ही तिला तितकीच सुंदर साथ देऊ लागला. एव्हाना सर्व जोडप्यांनी ह्या दोघांभोवती वर्तुळ केलं होतं आणि ह्या दोघांच्या स्टेप्स सर्वजण कौतुकाने पाहत होते. त्यात विवियन आणि एलेनाचाही समावेश होता. सर्जीने मध्येच आपल्या पालकांकडे चोरटा कटाक्ष टाकला. एलेना तर त्याच्या बघण्याची वाटच पाहत होती. ती नजरेनेच सर्जीला आपली पसंती दिली. सर्जीला आता स्वर्ग दोन बोटे उरला होता. आता इवाचाही धीर चेपला होता अजून एका काहीशा धीट नृत्याला तिने सुरुवात केली आता मात्र सर्जी बावरला. आणि इवाच्या नाराजीची पर्वा न करता तो तिची रजा घेत आपल्या जागी येऊन बसला. सर्वत्र हास्याचे फवारे उडाले. इवाने जरी मग एकटीनेच पुढे नाच पूर्ण केला तरी ती मनातून खट्टू झाली होती.

नाच संपताच ती दुसऱ्याच कोपऱ्यात जाऊन बसली. आता काय करावं हे सर्जीला कळेना. सर्वांसमोर स्वतःहून उठून तिच्यासोबत जाऊन बसण्याची हिम्मत त्याच्यात नसली तरी ह्या क्षणाला गमावू नये असेही त्याला वाटत होते. हा सारा प्रकार मारिया दुरून पाहत होती. ती सर्जीच्या मदतीला धावून आली आणि मग तिने सर्जीला उठवून इवाच्या सोबतीला नेऊन बसवलं.

आताशा सर्वजण मद्य आणि स्वादिष्ट भोजनात मग्न झाले होते. इवा आणि सर्जी ह्यांचा संवाद काही सुरु होत नव्हता. सगळं  काही अनपेक्षितपणे जुळून आलं असता कुठेतरी तार चुकीची छेडली गेली होती. हे दोघे ह्या एका चुकलेल्या तारेने ही प्रसन्न सायंकाळ गमावून बसणार की त्या दोघातला कोणी एक विस्कटलेली घडी सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेणार  प्रश्न होता शेवटी इवाने पुढाकार घेतला. "कसं चाललंय तुझं इथे? कझानची आणि तिथल्या लोकांची आठवण येते नाही तुला कधीतरी? सर्जी मग बराच वेळ आपल्या कामाविषयी आणि व्यग्र जीवनशैलीविषयी बोलत बसला. हा फक्त आपल्या कामाविषयीच बोलत बसणार असं इवाला वाटून गेलं आणि तिचा काहीसा भ्रमनिरास होत चालला होता. इतक्यात सर्जी म्हणाला, "मी दुनियेच्या पाठीवर कुठेही गेलो तरी कझान आणि तिथली काही जवळची माणसं कायमची माझ्या हृदयात राहतील!".

हा आता मार्गावर आला असं वाटून इवा प्रसन्न होणार इतक्यात एलेना ह्या दोघांच्या दिशेने येताना दिसली. "सर्जी, आता बराच वेळ झाला, तुमचं आटपलं असेल तर आपण निघुयात का आता?" तिच्या ह्या उद्गारांनी दोघांची निराशा झाली. "आई, ही माझी मैत्रीण इवा!" सर्जीने होता नव्हता तितका धीर गोळा करून इवाची आणि आईची ओळख करून दिली. "हो अगदी खास मैत्री दिसते तुम्हां दोघांची!" एलेनाने चिमटा काढायची संधी सोडली नाही. "इवा, उदया सकाळी काही खास कार्यक्रम नसेल तर ये की सर्जीच्या अपार्टमेंटवर!" एलेना म्हणाली.  जी गोष्ट जुळवून आणण्यासाठी आपल्याला अतोनात कष्ट करावे लागले असते ती सर्जीच्या आईमुळे अगदी सहज साध्य होणार असे इवाला वाटून गेले. सर्जी सुद्धा मनातल्या मनात  आपल्या आईचे आभार मानत होता. सर्जीकडे सकाळी एक फेरी मारण्याचे इवाकडून आश्वासन घेऊनच मग एलेना तिथून निघाली.

परतीच्या वाटेत सर्जी आणि विवियन पुढच्या सीटवर बसले होते. ड्रायव्हिंग करणारा सर्जी अगदी शांत शांत होता. एलेना मागून ह्या दोघांकडे पाहत होती. तिला मनातून इवा खूप आवडली होती. सर्जीलाही इवा आवडली होती ह्यात काही शंकाच नव्हती. राहता राहिला प्रश्न विवियनचा. त्याच्या मनात काय चाललंय हे कळायला वाव नव्हता. एक गोष्ट नक्की की जर विवियन खुशीत असता तर तो इतका वेळ शांत बसला नसता!

अपार्टमेंटवर परतल्यावर पहिली संधी मिळताच विवियनने एलेनाला प्रश्न केला, "ही इवा करते काय? आणि राहते कोठे?" "ती कझानलाच राहते, गुणी मुलगी आहे!" एलेनावर पडलेला इवाचा प्रभाव अजुन काही कमी झाला नव्हता! "ते सर्व ठीक आहे, पण आपल्या सर्जी अजून कोठे पूर्णपणे मार्गाला लागला आहे? त्याला मोठा अधिकारी झालेला मला पाहायचं आहे! एकदा का तो ह्या सर्व प्रकारात अडकला मग त्याचं लक्ष विचलित होणार!" विवियनने आपल्या मनातील विचार बोलून दाखवले. "पण लोक करतात की मोठं करियर लग्नानंतर सुद्धा!" एलेना म्हणाली. विवियनच्या चेहऱ्यावरील त्रासलेले भाव पाहून मग तिने हा विषय आवरता घेतला.

काही वेळ सर्जीशी ह्या विषयावर बोलूयात असं ठरवून ती सर्जीच्या खोलीत आली. थकलाभागला सर्जी झोपी गेला होता. "किती कष्ट करतो माझा बाळ!" आईच्या भाबड्या ममतेने एलेनाच हृदय भरून आलं.

(क्रमशः)

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४

Grand Slam स्पर्धां

 
 मी आता एका नव्या ब्लॉगवर स्थलांतरित होण्याच्या मार्गावर आहे. हा ब्लॉग मराठी ब्लॉग विश्वला जोडला गेला आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी ही एक जुनी पोस्ट ह्या नवीन ब्लॉगवर प्रसिद्ध करीत आहे.


सध्या फ्रेंच ओपेन स्पर्धा सुरु आहे. वर्षात होणाऱ्या चार Grand Slam स्पर्धांपैकी ही एक स्पर्धा होय. ऑस्ट्रेलीयन, विम्बल्डन आणि अमेरिकन ह्या उर्वरित तीन स्पर्धा आहेत. ह्या चारही स्पर्धा एका वर्षात जिंकणाऱ्या खेळाडूस Grand slam किताब दिला जातो. ह्या स्पर्धा पुरुष एकेरी , महिला एकेरी, पुरुष दुहेरी , महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, प्रौढ आणि जुनिअर गटांत खेळल्या जातात. प्रत्येक स्पर्धा दोन आठवडे चालते

गुण पद्धती
टेनिस खेळात गेम आणि सेट हे गुण मोजण्याचे मापक आहेत. एक खेळाडू सर्विस करतो आणि दुसरा त्याला तोंड देतो. खेळाडूस पहिल्या गुणास १५, दुसर्या गुणास ३०, तिसर्या गुणास ४० आणि चौथ्या गुणास गेम बहाल केला जातो. दोन्ही खेळाडूंचे ४०-४० गुण असल्यास त्यास ड्यूस असे म्हटले जाते. त्यानंतर ज्याला गुण मिळतो त्याला ADVANTAGE मिळतो. त्यानंतर त्याच खेळाडूने परत गुण मिळवल्यास त्याला गेम मिळतो. परंतु जर दुसर्याने गुण मिळवला तर पुन्हा ड्यूस होतो. हे दुष्टचक्र कोणताही एक खेळाडू गेम जिंकेपर्यंत सुरु राहते. सर्विस करणाऱ्या खेळाडूस गेम जिंकता न आल्यास त्याची सर्विस ब्रेक झाली असे म्हणतात.

जो खेळाडू प्रथम ६ गेम जिंकतो त्यास सेट मिळतो. परंतु ६-५ असा सेट जिंकला जाऊ शकत नाही. ६-५ अशी स्थिती निर्माण झाल्यास १२ वा गेम खेळविला जातो. त्यानंतर ७-५ अशी स्थिती झाल्यास ७ गेम मिळणाऱ्या खेळाडूस सेट बहाल केला जातो. परंतु ६-६ अशी स्थिती झाल्यास टाय ब्रेकर खेळविला जातो त्यात प्रथम ७ गुण मिळवणारा खेळाडू जिंकतो.

पुरुष वर्गातील सामना जिंकण्यासाठी ३ सेट जिंकावे लागतात. महिला वर्गात २ सेट जिंकल्यावर सामना जिंकला जातो. काही स्पर्धांमध्ये पाचव्या सेटमध्ये टाय ब्रेकर खेळविला जात नाही. ६-६ अशी बरोबरी झाल्यास जो पर्यंत दोन गेमचा फरक होत नाही तोपर्यंत सामना खेळविला जातो.

स्पर्धेचा DRAW
प्रत्येक स्पर्धा २ आठवडे चालते. पुरुष आणि महिला एकेरी वर्गात प्रत्येकी १२८ खेळाडू भाग घेतात.
१> पहिली फेरी - १२८ खेळाडू - पहिला आठवडा - सोमवार ते बुधवार

२> दुसरी फेरी - ६४ खेळाडू - पहिला आठवडा - बुधवार ते शुक्रवार

३> तिसरी फेरी - ३२ खेळाडू - पहिला आठवडा - शुक्रवार / शनिवार

४> चौथी फेरी (उप-उपांत्यपूर्व फेरी - PRE QUARTER FINAL) - १६ खेळाडू - दुसरा आठवडा - सोमवार / मंगळवार

५>पाचवी फेरी अर्थात उपान्त्यपूर्व फेरी - QUARTER FINAL - ८ खेळाडू
पुरुष - दुसरा आठवडा - बुधवार - गुरुवार
महिला - दुसरा आठवडा - मंगळवार - बुधवार

सहावी फेरी - उपांत्य फेरी - सेमी फायनल - ४ खेळाडू
पुरुष - दुसरा आठवडा - शुक्रवार
महिला - दुसरा आठवडा - गुरुवार

सातवी फेरी - अंतिम फेरी - फायनल - २ खेळाडू
पुरुष - दुसरा आठवडा - रविवार
महिला - दुसरा आठवडा - शनिवार
शाळेत असताना उप-उपांत्यपूर्व फेरी या शब्दाने मला मोहवून टाकले होते. पहिल्या फेरीस उप-उप-उप-उप-उपांत्यपूर्व फेरी का म्हंटले जाऊ नये असा माझा प्रश्न होता. विजय अमृतराज विम्बल्डन स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल ही लोकसत्तेतील बातमी आणि दुसर्या दिवशी त्यांच्या पराभवाची बातमी ह्या लक्षात राहिलेल्या गोष्टी. जॉन मकेंरो अंतिम १६ जणात दाखल या बातमीने मी चक्रावून गेलो होतो. जॉन मकेंरो पहिल्या क्रमांकाचा खेळाडू असताना तो अंतिम १६ मध्ये कसा या प्रश्नाने मला हैराण केले. थोडे दिवसांनी कळले कि अंतिम १६ जण म्हणजे उप-उपांत्यपूर्व फेरीत दाखल झालेले खेळाडू!

ऑस्ट्रेलियन स्पर्धा - ही जानेवारी महिन्याच्या तिसर्या आठवड्यात सुरु होते. ही स्पर्धा हार्डकोर्ट वर खेळली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेची दिवस आणि रात्र अशी दोन सत्रे खेळवली जातात. या स्पर्धेत पाचव्या सेट मध्ये टाय ब्रेकर खेळविला जातो

फ्रेंच स्पर्धा - ही मे महिन्याच्या तिसर्या/चौथ्या सोमवारी सुरु होते. ही स्पर्धा मातीच्या कोर्ट वर खेळली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचेकेवळ दिवस सत्र खेळवले जाते. या स्पर्धेत पाचव्या सेट मध्ये टाय ब्रेकर खेळविला जात नाही

विम्बल्डन स्पर्धा - फ्रेंच ओपन स्पर्धा संपल्यानंतर दोन आठवड्यांनी ही स्पर्धा सुरु होते. ही स्पर्धा गवतावर खेळली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेचेकेवळ दिवस सत्र खेळवले जाते. या स्पर्धेत पाचव्या सेट मध्ये टाय ब्रेकर खेळविला जात नाही. ह्या स्पर्धेत पांढरे कपडे घालून खेळणे अनिवार्य आहे

अमेरिकन स्पर्धा - ही ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरु होते. ही स्पर्धा हार्डकोर्ट वर खेळली जाणारी स्पर्धा आहे. या स्पर्धेची दिवस आणि रात्र अशी दोन सत्रे खेळवली जातात. या स्पर्धेत पाचव्या सेट मध्ये टाय ब्रेकर खेळविला जातो
 

दुरावा - ४

 
 मारियाने मग मावशी अल्बिनाच्या घराचा ताबा घेतला. घर बऱ्यापैकी मोठं होतं. मुख्य म्हणजे मोठा हॉल होता, त्यामुळे मावशीने बोलाविलेल्या पंचवीस तीस पाहुण्यांना कसं सांभाळायचं ह्याची चिंता करायचं कारण नव्हतं. आधी काही काळ सर्व काही शांतपणे निरखत बसलेल्या इवाने मग हळूहळू स्वयंपाकघराचा ताबा घायला सुरुवात केली. सैबेरिअन डम्पलिंग बनविण्यात तिचा हातखंडा होता. काही वेळातच डम्पलिंग मस्तपैकी आकार घेऊ लागले आणि त्यांचा खमंग सुगंध घरभर पसरला. मारियाने वेलकम ड्रिंक आणि वोडका विभागांची जबाबदारी उचलली होती. मावशी मेन कोर्सच्या मागे लागली होती. चिकन, रेड मीट ह्यांचे विविध पदार्थ आणि पास्ताच्या डिशेस ह्या मध्ये तिचा हातखंडा होता. काही वेळाने इवाला थोडी फुरसत मिळाली. तिच्या चेहऱ्यावरील नाराजी स्पष्ट दिसत होती. कोपऱ्यात नाराज होऊन बसलेल्या इवाकडे तिचं लक्ष गेलं. नजरेनेचं तिने इवाला शांत रहायची खुण केली.
स्वयंपाक जसा आटोक्यात आला तसा तिघीजणी गप्पा मारायला बसल्या. परंतु इवाला मात्र ह्या गप्पांत करमेना. तिने त्यांची रजा घेऊन ती बाहेर एक चक्कर मारायला गेली. संध्याकाळी कोण कोण येणार ह्यांची नावं मावशी मारियाला आठवून आठवून सांगत होती. इतक्या मावश्याजी ग्रेगरी ह्यांनी येउन मावशीची थोडी चेष्टा मस्करी केली. "आणि हो कझानवरून आलेल्या तुम्ही दोघीच नाही हो! माझा मित्र विवीयन अरीस्तोव आणि त्याची पत्नी सुद्धा येणार आहेत!" ग्रेगरी म्हणाले. "मला न सांगता तुम्ही अजून किती जणांना बोलावलं आहे, ते एकदा पूर्णपणे मला सांगायची तसदी घ्याल का?" मावशी लटक्या रागानं बोलली. ऐन वेळी पूर्वसूचना न देता ग्रेगरीने बोलविलेल्या त्याच्या पाहुण्यांना सुग्रास जेवण खाऊ घातल्यावर त्याच्या चेहऱ्यावर उमटणारे खुशीचे भाव आपल्या नजरेत सामावण्यात गेले पंचवीस वर्षे ती आनंद मिळवत आली होती."हो एलेनाला जशी काय तू ओळखतच नाही वाटत!" ग्रेगरीने तिला टोमणा मारायची संधी सोडली नाही.
बघता बघता सायंकाळ झाली. आपला वेडिंग गाऊन घालून आलेली अल्बिना अगदी सुंदर दिसत होती आणि तिच्या सोबतीला देखणा ग्रेगरी होताच. आपल्या संसारवेलीवर कधी फुल उमललं नाही ह्याचं ह्या क्षणी उफाळून येणारं दुःख बाजूला सारून सर्व पाहुण्यांच्या स्वागतात ते रंगून गेले होते. एकेक करून पाहुण्याचं आगमन होत होतं आणि मारिया, इवा दोघीजणी पाहुण्याच्या स्वागतात गढून गेल्या होत्या. बऱ्यापैकी सर्व पाहुणे आल्यावर इवा जरा फ्रेश होण्यासाठी म्हणून आत गेली. "अजून विवियन का बरं आला नाही बरं!" ग्रेगरी ह्यांनी पुटपुटायला आणि दाराची बेल वाजायला एकच वेळ साधली गेली.
"वेलकम माय डियर फ्रेंड!" आपल्या खणखणीत आवाजात ग्रेगरींनी विवियन आणि एलेनाचे स्वागत केले. विवियन आणि ग्रेगरींनी एकमेकाला घट्ट मिठी मारली. काही क्षणांनी विवियन "एक मिनिटं हं! असे म्हणून बाहेर जाऊ लागले. "सर्जी आम्हांला सोडायला आला होता. बऱ्याच वर्षांनी इथे आलो त्यामुळे हे तुझेच घर का ह्याविषयी खात्री नव्हती म्हणून त्याला बाहेर थांबायला सांगितलं" विवियनच्या ह्या उदगारांनी ग्रेगरी आणि अल्बिनाच्या चेहऱ्यावर प्रचंड नाराजीचे भाव उमटले. ग्रेगरीने जवळजवळ बळाचा वापर करून विवियनला खुर्चीत बसवलं. आणि स्वतः सर्जीला भेटायला बाहेर गेले.
दोन तीन मिनिटात नाराजीचे पराकोटीचे भाव चेहऱ्यावर घेऊन आलेल्या सर्जीला ग्रेगरी हॉलमध्ये घेऊन आले. आपण ह्या सर्व म्हाताऱ्या मंडळीच्या कोणत्या संकटात सापडलो ह्याचा प्रचंड खेद सर्जीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. सर्व म्हातारी मंडळी मोठ्या कौतुकाने सर्जीकडे पाहत होती. मारियादेखील सर्जीच्या व्यक्तिमत्वाने भारून गेली होती. परंतु सर्जी ह्या नावाचा आणि कझान शहराचा संदर्भ तिच्या मनात वेगळीच शंका निर्माण करीत होता.
इतक्यात ग्रेगरीच्या "ओह Here comes the most Beautiful Lady of the Evening" ह्या स्वरांनी सर्वांचं लक्ष हॉलच्या दुसऱ्या टोकाने प्रवेश करणाऱ्या इवाकडे गेले. नाईलाजाने सर्जीने सुद्धा मागं वळून पाहिलं आणि तो आपलं भान हरवून बसला.
पार्टी सुरु झाली होती. मंद संगीत सुरु होतं. सर्वजण ग्रेगरी आणि अल्बिनाला आणलेल्या भेटवस्तू देत होते. इवाच्या हृदयात अर्ध्या तासापूर्वी सुरु झालेली जोरदार धडधड थांबण्याचं नाव घेत नव्हती. मारियाने तर तिला नजरेनेच तू किती सुदैवी आहेस असा अभिनंदनाचा संदेश दिला होता. सर्व पाहुण्यांची भेट झाली हे पाहून ग्रेगरीने "The Floor is open for Dance" अशी घोषणा केली. "पंचवीस वर्षे झाली तरी ह्याला अल्बिना बरोबर नृत्य करायची किती घाई!" एक मित्राच्या ह्या मजेशीर उद्गारांनी सर्वत्र हास्याचे फवारे उडाले.
हुशार मारियाने अजून एका वयस्क मावशीच्या मैत्रिणीला आपल्यासोबत पाहुण्यांची सरबराई करायला घेतलं. एव्हाना मंच सर्व वयस्क जोडप्यांनी भरला होता. नृत्यात कुशल असलेल्या विवियन आणि एलेनाचाहि त्यात समावेश होता. मंद प्रकाश असला तरी त्यात नजरेचे खेळ खेळणाऱ्या त्या तरुण प्रेमी युगुलाला रंगे हात पकडण्यात अनुभवी ग्रेगरीला वेळ लागला नाही. आणि आपल्या नजरेनेच त्यानं संगीत थांबविण्याची खुण करून "आजच्या सर्वात देखण्या जोडप्याला मी आता मंचावर आमंत्रित करीत आहे" अशी घोषणा केली. आपल्या पायाखालची जमीन दुभंगून आपल्याला आत घेईल तर बरं असेच इवाला वाटून गेलं. "आपण नृत्याचे धडे घ्यायला हवे होते आणि थोडीजरी कल्पना असती तर जरा चांगले कपडे घालून असतो" असा विचार करणारा सर्जी आता पुढील प्रसंगाला कसे तोंड द्यायच ह्याचा विचार करीत होता.
चवदार जेवण, संगीत, नृत्याने भरलेल्या त्या मॉस्कोतील एका प्रेममय सायंकालची ही तर फक्त सुरुवात होती

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...