मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, २० ऑगस्ट, २०१६

अनुल्लेख!



हल्ली शनिवार उजाडला की नवीन पोस्ट लिहायची खुमखुमी येते. मोकळा वेळ सापडताच मनातील विचार लिहायचे आणि पोस्ट प्रसिद्ध करायची असा शिरस्ता गेले काही शनिवार चालु आहे. मान्य तर करायला हवं की पोस्टला कोणी लाईक केलं अथवा त्यावर टिपणी केली की बरं वाटतं. पण मुख्य हेतु लोकांचं लक्ष वेधुन घेणं हा नसुन आपल्या मनातील विचार कागदावर वा संगणकावर उतरविणे हा असतो. रविवार येतो आणि जातो आणि मग पुन्हा कामाच्या रगाड्यात मी वाहुन घेतो. 

क्षणभर असं समजा की मी केवळ ब्लॉग लिहुन चरितार्थ करायचं असं ठरवलं तर काय होईल? ह्यात दोन शक्यता उद्भवतात. 

१) माझ्याकडं ज्ञानाचा अथवा अनुभवाचा अखंड स्रोत हवा. मी ज्ञानाचे अथवा अनुभवांचे शंभर कण गोळा केले तर मी त्यांचा सारांश १० कणांत मांडुन सर्वांसमोर ठेवावयास हवा. 
एकदा मी हा सारांश मांडला की माझा ज्ञानाचा साठा पुन्हा रिता झाला. मग पुन्हा नव्या जोमानं मी ज्ञानउपासना करायला हवी, अनुभव गोळा करायला हवेत आणि मगच लोकांसमोर पुन्हा येण्याचं धारिष्ट्य करायला हवं.  हे न करता समजा मी तेच तेच मुद्दे लोकांसमोर मांडत राहिलो तर लोक मला टाळू लागतील. 

२) माझ्याकडे खोलवर ज्ञान नाही अथवा अनुभवही नाहीत. जे काही होतं ते आधीच मांडून झालंय आणि माझ्याहुन अधिक ज्ञानी सभोवती आहेत. त्यांच्याशी मी स्पर्धा करु शकत नाही. तरीसुद्धा लोकांचं लक्ष वेधुन घेणं हाच माझा एकमेव हेतु आहे. मग मी जे कोणी प्रसिद्ध अथवा यशस्वी लोक आहेत त्यांच्यावर चिखलफेक करण्यास सुरुवात करीन किंवा सर्वसामान्य जनतेची जी मते आहेत त्याच्या नेमकी उलटी मते मांडीन. मग सर्वजण माझ्यावर पेटून उठतील आणि सोशल मीडियावर माझ्या नावाने खडे फोडतील. माझ्या नावाचं विडंबन करतील. 

माझा हेतु साध्य झाला असेल. माझ्या लेखांना व्यावसायिक मागणी राहील. माझ्या उथळ ज्ञानाची मला झळ न बसता मी कायम अर्थार्जन करीत राहीन. 

आपल्या अवतीभोवती ही दुसऱ्या प्रकारातील काही तथाकथित प्रतिथयश लेखक मंडळी वावरत आहेत. आपल्या भावनांना चेतवून ही मंडळी आपणास त्यांच्यावर टीका करण्यास उद्युक्त करतात. ज्यावेळी आपण त्यांच्यावर टीका करतो त्यावेळी आपण अजाणतेपणी त्यांच्या प्रसिद्धीला खतपाणी घालत असतो. माझं म्हणणं एकच - अशा सवंग प्रसिद्धीच्या मागे लागलेल्या मंडळींकडे दुर्लक्ष करावं. त्यांना अनुल्लेखानं त्यांची जागा दाखवुन द्यावी. त्यांच्या नावावर शाब्दिक कोटीचे मोह सुद्धा टाळावेत.

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

पालकत्व - जुनं आणि नवं!




यंदा सोहम सातवीत पोहोचलाय! त्यामुळं मी सध्या आम्हां दोघांना मुरलेल्या पालकांत गणायला लागलोय! असंच कधीतरी मग आपलं लहानपण आठवतं. मग त्यावेळचं पालकत्व आणि आजचं पालकत्व ह्यात अभावितपणे मन तुलना करु लागतं. ह्यात एक स्पष्टीकरण असं की मी इथं जे काही जुन्या जमान्यातील पालकत्व उल्लेखतो आहे ते एकंदरीत त्याकाळच्या सर्व मध्यमवर्गीय पालकांचं एकत्रित पालकत्व आहे! 


सुरुवात राहणीमानापासुन! पूर्वीचा पालकवर्ग निःसंशयपणे अगदी साध्या राहणीमानाचा अंगिकार करणारा होता. हाताच्या बोटावर मोजण्याइतके कपड्यांचे जोड बाळगुन असणारा! आफ्टरशेव, जीन्स हे प्रकार साठीनंतर आपल्या मुलांकडून माहिती झालेला आणि अंगी अगदीच धीटपणा असेल तर ते स्वीकारलेला! 

ह्या काळातील बऱ्याच पालकांना एकत्र कुटुंबपद्धतीमुळे घरी निर्णयस्वातंत्र्य मिळण्यास बराच काळ लागला. त्यामुळं पालकत्व स्वीकारलंय पण हाती अधिकार नाही अशी परिस्थिती उद्भवली होती. कार्यालयात सुद्धा ह्यातील फार थोड्या जणांकडे मोठया हुद्द्याच्या जागा होत्या. त्यामुळं आपलं प्रभुत्व गाजविण्यासाठी त्यांना एकमेव संधी आपल्या पाल्याच्या रुपानं मिळत असे.  पण ह्या पिढीने त्याचा अतिरेक कधीच केला नाही. आपल्याला आयुष्यात जी उंची गाठता आली नाही ती आपल्या पाल्यांनी गाठावी अशी निर्व्याज भावना मनी बाळगुन त्यांनी हे पालकत्व निभावलं. 

ह्या पिढीनं आपल्या पालकांशी अथवा बॉससोबत स्वतः कधी मुक्त संवाद अनुभवला नव्हता. त्यामुळं मुलं थोडी मोठी झाल्यावर त्यांचा आपल्या मुलांशी संवाद काही प्रमाणात कमी व्हायचा. अभ्यास व्यवस्थित चालला आहे का वगैरे हे सहीसाठी आणलेल्या प्रगतीपुस्तकांवर कळायचं. मुलांच्या कपडा खरेदीचा प्रसंग बहुदा दिवाळी - दसऱ्याला उजाडायचा. मुलांच्या दृष्टीकोनातुन पहायला गेलं की साधारणतः आठवी नववीच्या आसपास मुलं पालकांपेक्षा मित्रांच्या सहवासात जास्त रमायला लागायची. आणि मग कळत नकळत आपल्या बाबांची दुसऱ्यांच्या बाबांसोबत मनातल्या मनात तुलना देखील व्हायची. आपल्या आईबाबांनी घेतलेल्या काही निर्णयांमागची खोलवर कारणं कळायचं ते वय नसायचं. त्यामुळं ह्या वयापासुन ते मग बहुदा लग्न होईपर्यंत आईवडिलांशी कुरबुरी व्हायच्या. ह्यातसुद्धा वडिलांशी जास्तच! कारण बिचारी आई - तिच्या आणि आपल्या समस्या बऱ्याच वेळा सारख्या असल्यानं तिची आपणास बरीच सहानभुती असायची!
काळ पुढे सरकत गेला आणि आज मागे वळून पाहता आपल्यातील प्रत्येकाच्या मनात आईवडिलांविषयी केवळ आदराची भावना आहे. त्यांनी आपल्या लहानपणी घेतलेला प्रत्येक निर्णय मागे वळून पाहता आपल्याला पटतोय. कदाचित अजुनही पटत नसला तरी त्यामागची त्यांची विचारधारणा समजतेय! आणि मग आता उरलंय ते एक केवळ आदराचं नातं!

आता वळुयात आजच्या पालकत्वाकडे! आज सर्वत्र पारदर्शकता हा मूलमंत्र बनला आहे. आपण घेतलेला प्रत्येक निर्णय का घेतला हे समजवुन सांगण्याची अपेक्षा जशी कार्यालयात असते तशी ती अपेक्षा आजकाल पिता ह्या भुमिकेत सुद्धा असते. थोडं विनोदी वळण! ही अपेक्षा पती ह्या भुमिकेत तेव्हाही नव्हती आणि आजही नाहीये! कारण आज पती ह्या भूमिकेत स्वतःचा निर्णय घेतोय कोण! 
आजच्या पिढीतील सर्वच पालक पूर्णपणे आधुनिक बनले आहेत असंही म्हणता येणार नाही. काहींजण दोन्ही विचारपद्धतीचा मिलाफ गाठुन आहेत. आधुनिक पालकत्वाचं अतिरंजित वर्णन म्हणजे नक्की काय? बाबा हा कूल असावा! त्याला नवी चित्रपटातील गाण्यावर डान्स करता यायला हवा! आयपॅड, मोबाईल ह्यांची लेटेस्ट मॉडेल्स त्याला माहित असावीत. परीक्षेतील मिळालेले कमी गुण त्याने मनावर घेऊ नयेत. उलट चुकून जर दुःख झालं असेल तर ते कमी करण्यासाठी त्याने सर्वांना हॉटेलिंगला बाहेर न्यावं. ड्रिंक्स न घेणारा बाबा म्हणजे थोडा जुन्या मताचा! 
असो आधी म्हटल्याप्रमाणे हे थोडं अतिरंजित वर्णन! पण एक गोष्ट मात्र खरी - आजचा बाबा हा मुलाचा मित्र असावा! तुम्हांला मित्र बनण्याच्या अनेक संधी असतात. त्याच्यासोबत खेळावं, त्याला न समजणारा विषय समजवुन द्यावा, आधीच अवास्तव अभ्यासाच्या दबावाखाली दडपून गेलेल्या पाल्यास एखादं प्रोजेक्ट वेळेत पुर्ण नाही झालं म्हणुन न ओरडता स्वतः पूर्ण करण्यास मदत करावी. जर तुम्ही अट्टाहासाने त्याला उच्चभ्रु शाळेत टाकलं असेल तर केवळ तिथली आकाशाला भिडणारी फी भरली की आपलं कर्तव्य संपलं असं समजु नये. तिथल्या मुलांचे राहणीमान कसं असतं, तिथली मुलं उन्हाळ्यात सुट्टीस कोठे जातात ह्या सर्व बाबींचा अभ्यास करावा! जमल्यास आपण त्या गोष्टी कराव्यात. जमत नसेल तर एक तर मुलाला विश्वासात घेऊन सगळी वस्तुस्थिती स्पष्ट करुन सांगावी अन्यथा सरळ आपल्या परिस्थितीला अनुरुप अशा शाळेत टाकावं. कोणत्याही परिस्थितीत आपल्या मुलाचा आत्मसन्मान कमी होऊ देता कामा नये. आत्मसन्मानाशिवाय मोठं होणं हा प्रकार चुकीचा असला तरी तो मागच्या पिढीत चालुन गेला कारण स्पर्धा इतकी तीव्र नव्हती आणि हे दुःख कमी करायला संगत मिळायची. पण आजच्या पिढीत मात्र आत्मसन्मानाशिवायआपल्या मुलांस वाढताना पाहिलंत तर लगेचच जागे व्हा आणि योग्य उपाययोजना करा! आजच्या जगाची एक चांगली बाजु म्हणजे तुम्ही कोणताही पेशा निवडा आणि त्यात सर्वोत्तम बनाल तर तुम्हांला धन, मान-सन्मान सर्व काही मिळतं. त्यासाठी केवळ पुस्तकाचाच आधार घ्यावा लागतो असं नाही. 
पूर्वी असं म्हणायची पद्धत होती की वडिलांच्या पायातील वहाण मुलाला यायला लागली की त्याला मित्र समजा! आज मी असं म्हणेन ज्या दिवशी तुमचा मुलगा तुम्हांला मोबाईल, आयपॅडचं एखादं फीचर समजावुन सांगेल त्यावेळेपासुन त्याला मित्र समजायला सुरुवात करा! जाता जाता हे ही सांगायला हरकत नाही की आमच्या बाबतीत ह्या गोष्टीला बरीच वर्षे उलटून गेली! पण अजुनही एकोणतीस सक ह्या प्रश्नाचे उत्तर मात्र मीच आधी देतो!

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

वाट - हरवलेली , गवसलेली






२००६ सालची अमेरिका वास्तव्यातील गोष्ट! न्यु जर्सीतील रँडॉल्फ गावात आमचं वास्तव्य होतं. एका शनिवारी फ़्लैंडर्स गावातील बॉसने त्यांच्या घरी जेवणाचं निमंत्रण दिलं. कार्यक्रम व्यवस्थित पार पडला. हिवाळा असल्यानं साडेचारच्या आसपास सुर्यास्त होऊन अंधाराने आपलं साम्राज्य पसरवायला सुरुवात केली होती. आम्ही हळुहळू निघण्याची तयारी सुरु केली. सकाळी येताना आम्ही व्यवस्थित आलो होतो त्यामुळे परतताना काही दिशा वगैरे विचारण्याची तसदी आम्ही घेतली नाही. 
एका ठिकाणी रूट १० आणि अजुन एक रस्ता ह्यामध्ये आमची गल्लत झाली. माझ्यासोबत प्राजक्ता, छोटा सोहम आणि राकेश होता. मागुन सुभाष आम्हांला फॉलो करत होता. आमचा रस्ता चुकला हे समजायला आम्हांला तीन चार मिनिटे गेली. तोवर आम्ही काहीसे पुढे आलो होतो. अमेरिकेच्या प्रथेप्रमाणे सहजासहजी परतीचा रस्ता पकडायला वाव नव्हता आणि त्यामुळे आम्ही पुढे पुढे जात राहिलो. अंधार आता पुर्णपणे स्थिरावला होता आणि आजुबाजूचा प्रदेश आपलं रूप झपाट्यानं बदलु लागला होता. जंगलसदृश्य भागाला सुरुवात झाली होती. ह्या अगदी सुनसान भागात अधुनमधून एखादं घर दिसायचं पण अशा घरात जाऊन बेल वाजविण्याची हिंमत करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नाही. हकनाक trespasser म्हणुन समजलं जाऊन बंदुकीच्या गोळीने जीव जायचा. मग एका ठिकाणी कार थांबविली. तिघांनी मिळून चर्चा केली. आता सुभाष पुढे आणि मी मागे असा क्रम ठरवला. थोडा वेळ परिस्थितीत काहीच फरक पडला नाही पण एका क्षणी त्या टेकडीवरुन खालुन जाणारा रुट १० दिसला. मग मात्र आम्ही मोठ्या सावधानतेनं तिथं जाण्यात यश मिळविलं. एकदा का रुट १० मिळाल्यावर मात्र आम्ही राजे होतो आणि व्यवस्थित घरी पोहोचण्यात आम्ही यश मिळविलं. 

अशीच आठवण अमेरिकेतील एका मित्राची! तो तर जवळजवळ २० किमी एकटा जंगलात भटकत होता. त्याच्यासोबत असणारी त्याची पत्नी आणि मुलगी झोपेत असल्यानं त्यांना हा प्रकार कळला नाही. बहुदा त्याच्या GPS ने त्याला दगा दिला असावा. त्याने अनुभवलेल्या प्रसंगाचं गांभीर्य नक्कीच आमच्या अनुभवापेक्षा जास्त होतं. 

आयुष्यात सुद्धा बऱ्याच वेळा असं होतं नाही का? एखाद्या नात्याची रुळलेली वाट अचानक हरवुन जाते. आपल्या आयुष्यात अगदी महत्वाचे स्थान असलेली मंडळी अचानक दुरावली जातात. आपल्याला जायचं असतं रुट १० वर आणि एखादं वळणं असं येतं की आपल्यासमोर असलेल्या दोन पर्यायातील एक आपण निवडतो. 

कधी ह्या निवडीनं आपल्या आयुष्यातील ती महत्वाची व्यक्ती इतकी दुखावली जाते की मग पुन्हा कधी जवळ येऊ शकतच नाही. ह्या निर्णयाची तीव्रता अगदी छोटी ते कायमस्वरूपी परिणाम करणारी अशी असू शकते. मागं वळून पाहता कधी कधी वाटून जातं की आपण ह्या विशिष्ट् क्षणी हा निर्णय का घेतला हे स्पष्ट करण्याची संधी जर आपणास मिळाली असती किंवा तितकी तसदी आपण घेतली असती तर कदाचित ही वाट हरवली नसती. 

कधी हा निर्णय इतका गहन असतो आपण दुसऱ्या एका व्यक्तीला हे स्थान देऊन टाकतो. आणि मग पहिल्या व्यक्तीची ही वाट पूर्णपणे बंद होऊन जाते. 

काही आप्त, मित्रमंडळी ह्यांच्याकडे आपलं आयुष्याच्या एका टप्प्यावर सतत येणंजाणं असतं. आणि मग आपण आपल्या आयुष्यात अधिकाधिक मग्न होत जातो; आपला प्राधान्यक्रम बदलतो आणि मग हे सारं एकत्र येणं कमी होतं जातं. 
 
जरी व्यवहारात आपण ह्या वाटांवरून प्रवास करु शकत नसलो तरी ह्या वाटा आपल्या मनात कोठेतरी दडून बसल्या असतात. आणि ह्या वाटांवरुन प्रवास करतानाचे आपलं रुप सुद्धा आपल्या लक्षात असतं. आयुष्याचा प्रवास आपल्याला अंतर्बाह्य बदलवून टाकतो पण आयुष्यातील आधीची आपली काही रुपं आपल्याला हवीहवीशी वाटतात. एखाद्या भावुक क्षणी ह्या रुपात परतण्याची इच्छा सुद्धा होते पण आज ते शक्य नसतं. आणि त्या रुपाची निरागसता आपल्याला पेलवेल ही रास्त शंका सुद्धा आपल्या मनात असते. 

नात्यांच्या वाटा जशा हरवतात तशा कधी त्या आयुष्याच्या एका वळणावर अचानकपणे सामोऱ्या सुद्धा येतात. ह्यातील काही जुन्या असतात तर काही नव्या! कधी कधी जुन्या वाटा नवं रुप घेऊन आपल्यासमोर येतात. प्रत्येक वेळी त्यांनी नवं रुप घेतलेलंच असतं असंही नव्हे! आपली बदललेली दृष्टीच आपल्याला त्या नात्यांचं नवं रुप दाखवतं. आपल्या नात्यात किंवा अगदी ऑफिसात सुद्धा आपल्या आजुबाजूला दीर्घकाळ वावरणारा एखादी व्यक्ती असते. तिचं अस्तित्व आपण गृहित धरलेलं असतं पण एखादा प्रसंग असा येतो आणि त्या व्यक्तीच्या स्वभावाचा एखादा आपणास पुर्णपणे अज्ञात असलेला पैलु आपणासमोर येतो आणि मग नवीन नातं, एक नवीन वाट गवसते. 

ह्या वाटा जशा व्यक्ती व्यक्तींमधील नात्यांमध्ये असतात तशाच त्या व्यक्ती आणि एखादी वास्तू, एखादं स्थळ किंवा एखादा लाडका प्राणी ह्यांच्यात सुद्धा असु शकतात. गावातील एखाद्या छोट्याशाच देवळाच्या परिसरात बसुन अनुभवलेली सायंकाळ आणि मनात सामावुन घेतलेली शांतता; लहानपणाच्या निरागस जीवनात समुद्रकिनारी मावळत्या सुर्याच्या साक्षीने बांधलेले किल्ले, शालेय जीवनात आपलं अगदी आवडतं असणारं कुत्र्याचं पिल्लू - हे सारं काही आपल्या मनाच्या कोपऱ्यात दडुन बसलेलं असतं आणि त्या आठवणींकडे जाणाऱ्या वाटा अधुऱ्या का होईना पण अस्तित्वात असतात! 

बऱ्याच वेळा हरवलेल्या वाटांच्या सुरेख आठवणी आपल्या मनात असतात आणि आयुष्य कधी कधी पुन्हा ह्या वाटांवर प्रवास करण्याची संधी देतं. आणि आपण मोठ्या अपेक्षांनी ह्या वाटांवरील पुर्नप्रवासाला जातो आणि कदाचित आपला भ्रमनिरास सुद्धा होऊ शकतो. संदर्भ बदललेले असतात, आपण बदललेलो असतो आणि मग ह्या वाटेवरुन पुन्हा आलोच नसतो तर बरं झालं असतं किमान त्या रम्य आठवणी तरी कायम राहिल्या असत्या असं वाटुन जाऊ शकतं ! 

अशा ह्या वाटा! काही हरविलेल्या तर काही गवसलेल्या!! 

बुधवार, ३ ऑगस्ट, २०१६

वसईची लाईट!


आमची वसई अगदी हिरवीगार! पावसाळ्यात तर अगदी नयनरम्य! घरी बसावं आणि चांगलंचुंगलं खात पीत आजुबाजूच्या निसर्गाचा आनंद लुटावा ह्या बाबतीत अगदी उत्तम! पण सर्व काही कधीच परिपुर्ण नसतं. वसईत राहायचं म्हटलं तर काही तडजोडी कराव्या लागतात. मुंबईपासुन दुरवर दररोज गर्दीत प्रवास करावा लागतो आणि हो अनियमित विद्युतपुरवठ्याशी सामना करावा लागतो! 

पूर्वी वसईत मंगळवार आणि मग शुक्रवारी हमखास वीजपुरवठा काही तास खंडित व्हायचा! सध्या पावसाळ्यात तो कधीही खंडित होतो. जोराचा पाऊस सुरु झाला आणि झाडं विजेच्या तारांवर पडली किंवा पडण्याची भिती निर्माण झाली की मग तात्काळ वीजपुरवठा खंडित होतो. मग आमच्या शाळेचा whatsapp ग्रुप अगदी गजबजुन जातो. आमची लाईट आता पाच मिनिटांपूर्वी गेली, तुमच्याकडे आहे का? वगैरे वगैरे! आपले समदुःखी शोधण्याचा प्रयत्न चालु असतो. माझ्यासारखे काही मुंबईत स्थलांतरित झालेले, ह्या चर्चेकडे अगदी मन लावुन लक्ष देत असतात. वर वर पाहता आम्ही सुखी आणि अंधारात असलेले आमचे वसईकर दुःखी असा भास होत असला तरी खोलवर पाहिलं तर परिस्थिती उलट असल्याचं जाणवतं. 

रात्रीचा अंधार आपल्याला मनन करण्याची, आपल्या घरातील मंडळींशी गप्पा मारण्याची संधी देतो. त्यावेळी भ्रमणध्वनी मात्र दूर ठेवावा! आपण आदिमानवापासुन कितीही लाखो करोडो वर्षे दूर आलो असलो तरी आपल्या मनात त्याचा छोटासा अंश असावा असं माझं मत आहे. निसर्गाच्या सानिध्यातील अंधारात आकाशाकडे पाहत आपल्या मनातील ह्या अंशांशी जोडण्याचा प्रयत्न करावा! आकाश जर निरभ्र असेल आणि कृष्ण पक्षातील चंद्र आकाशात येण्यास जर वेळ असेल तर वसईत रात्री आकाशात छोटे ठिपके प्रवास करताना दिसतात. हे मानवनिर्मित उपग्रह असतात. मुंबईतील फार कमी लोकांना हे उपग्रह पाहण्याचं भाग्य लाभलं आहे. मी अजूनही आकाशात सप्तर्षी ओळखू शकतो. 

अगदी आदिमानवापर्यंत जायचं नसेल तर आजुबाजूला वावरणाऱ्या रातकिड्यांच्या आवाजाचा आनंद लुटावा. पावसाळा येण्यापूर्वी यंदा वसईच्या काही भागात काजव्यांनी आपल्या नयनरम्य ज्योतींनी बहार आणली होती!

आदिमानव, रातकिडे वगैरे झालं की मग अंतर्मनाकडं वळावं! प्रत्येक दिवशी आपण भावनांच्या वादळातून जाण्याची शक्यता हल्ली वाढीस लागली आहे. माझा एक मित्र शहरात राहणाऱ्या प्रत्येक माणसास भावनांचा चालताफिरता प्रेशर कुकर म्हणतो! जर ह्या भावना मोकळ्या करण्यासारखं माणूस तुमच्या आसपास नसेल तर त्यांचा उद्रेक होऊ शकतो. जर कोणी माणुस नसेल तर आपल्या अंतर्मनाला ह्या अंधारात आतल्या आत मोकळं होऊन द्यावं. सुरुवातीला ह्या भावना फसफसून बाहेर निघतात. हा काहीसा खळबळीचा वेळ तुम्ही जर का यशस्वीरित्या परतवुन लावलात तर मग मात्र अगदी शांतपणे मन आपल्याशी संवाद साधतं. दिवसातील प्रत्येक घटना अगदी स्पष्टपणे नजरेसमोर ठाकते! मग आपण झोनमध्ये जातो आणि मग वेगानं आयुष्याच्या मागच्या वर्षांत डोकावत राहतं. 
तुमच्या आयुष्यात सुखदुःखाच्या घटना तर चालुच असतात. तुमचं मन कोणता भाजक (denominator) घेऊन ह्या घटनांकडे पाहतं आहे त्यावर ह्या सुखदुःखाच्या घटनांमुळे तुमच्या मनात होणाऱ्या भावनांची तीव्रता अवलंबून राहते. जर तुम्ही एखाद्या दुःखाच्या घटनेसाठी संपुर्ण आयुष्यच भाजक वापरला तर त्याची तीव्रता नक्कीच कमी होते. म्हणजे आपण जन्माला आलो तर आयुष्यात काही दुःखद घटनांचा सामना करावाच लागणार. अशी एक घटना आज घडली असे विश्लेषण आपण करु शकतो आणि मग मन लवकर पूर्वपदावर येण्याची शक्यता वाढीस लागते. आनंदाच्या क्षणी मात्र एका दिवसाचाच भाजक लावावा! Live that moment to the fullest! 
आता मला सांगा की अंतर्मनाशी इतका खोलवर संवाद लाईट असताना होऊ शकेल काय? तर मननाची इतकी मोठी संधी देणाऱ्या वसईच्या विद्युतबोर्डाचे जाहीर आभार! आणि ह्या विषयी नेहमी व्हाट्सअँपवर आपलं मन मोकळं करणाऱ्या सुगंधाताई आणि न्यू इंग्लिश स्कुलच्या मित्रमंडळींचे खास आभार! जाता जाता उल्लेख ह्या ग्रुपवरील खास मित्राचा! त्यालासुद्धा हा अंतर्मनाशी संवाद खूप आवडत असावा! अगदी मुंबईत राहून सुद्धा त्याचं विद्युतबिल पाचशेच्या वरती कधी जात नाही! त्यावर पोस्ट लिहिण्याची उबळ मी किती दिवस दाबुन ठेऊ शकतो हे पाहुयात!
 

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...