दुसऱ्या दिवशी इवा अल्बिनाच्या घरातून सकाळी लवकर बाहेर पडली ती कझानला जातानाची दुपारची ३ वाजताची बस पकडायचं ठरवूनच! सर्जीच्या घरी जाताना तिच्या मनात धाकधूक होतीच. सर्जीचा स्वभाव आपणास पूर्ण कळला आहे ह्याची तिला खात्री वाटत नव्हती. सर्जीविषयी आपल्याला प्रेमापेक्षा आदरच जास्त वाटतो आहे असे तिला कालपासून वाटू लागलं होतं. आणि प्रेमात पूर्णपणे झोकून देण्याची आपली इच्छा सर्जीसोबत कधीच पूर्ण होणार नाही हे तिला हळूहळू कळू लागलं होतं. आदर, शिस्तप्रिय जीवन ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिची इतक्यात तयारी नव्हती. आपण सर्जीच्या पूर्ण प्रेमात पडलो आहोत ह्याची तिला जाणीव होती पण आपल्या मनात असणाऱ्या प्रेम पूर्णतः अनुभवण्याच्या तीव्र इच्छेला सर्जीसाठी तिलांजली द्यावी लागेल हा विचार तिला नकोसा वाटत होता. प्रेमात त्याग करावा लागतो पण त्यागानेच पूर्ण जीवन व्यापून टाकणं आपल्याला जमेल ह्याची तिला खात्री नव्हती.
सर्जीच्या घरी दरवाजा उघडला तो विवियन ह्यांनी! इवाचं स्वागत करून त्यांनी तिला बसण्याची विनंती केली. "सर्जी आंघोळीला गेलाय, येईल इतक्यातच!" विवियन म्हणाले. एलेना कोठे आहे असं विचारायचं इवाच्या मनात आलं. परंतु ती हा प्रश्न विचारणार त्याआधीच विवियन ह्यांनी सर्जीच्या एकंदरीत प्रशिक्षणाविषयी आणि त्याच्यासमोर असलेल्या उज्ज्वल संधीविषयी बोलणं सुरु केलं. बघता बघता त्यांनी विषयाचा ओघ आपल्या करियरकडे वळवला आणि आपण आपल्या कारकिर्दीत कशी प्रगतीची शिखरं गाठली ह्याचा आलेखच मांडायला त्यांनी सुरुवात केली. आपली ह्यातून कशी सुटका होईल ह्याचा विचार करीत असतानाच सर्जी ताजातवाना होऊन बाहेर यायला आणि खरेदीसाठी बाहेर गेलेली एलेना परतायला गाठ पडली. इवाने सुटकेचा निश्वास टाकला. "ह्यांनी तुला जास्त काही कंटाळवल तर नाही ना? एलेना मिश्किल स्वरात म्हणाली. त्यावर इवाने मनमोकळ्या हास्याने दाद दिली. परंतु आपलं हे मनमोकळ हसू सर्जी आणि विवियन ह्या दोघांनाही फारसं काही रुचलं नाही हे त्यांच्या मुद्रेवर स्पष्टपणे दिसल्याने इवा शांत झाली.
एकंदरीत घरातील वातावरण गंभीरच होते. एलेनाच काय ती एकटी वातावरण खेळीमेळीच ठेवायचं प्रयत्न करीत होती. शेवटी एकदाचा सर्जी म्हणाला, "आम्ही दोघं आता बाहेर निघतो!". इतका वेळ इवाची असलेली अवघडलेली मुद्रा पाहून एलेनानेही तिला थांबण्याचा आग्रह केला नाही. निरोप घेताना "पुन्हा भेटूच लवकर" असे इवाला सांगायला एलेना विसरली नाही.
सर्जी आणि इवा जवळच असलेल्या एका मॉलमध्ये शिरले. "सर्जी, सॉरी हं पण मी तुला दिलेला स्कार्फ हिल स्टेशनला विसरून आले! मी आता एक नवीन स्कार्फ घेतेय!" इवा म्हणाली. सर्जीच्या डोळ्यात अचानक मिश्किल भाव उमटले. "एक क्षणभर डोळे बंद कर, इवा!" सर्जी म्हणाला. "पण का?" इवाला असला खट्याळपणाच खूप आवडायचा. "मी सांगतो ना, म्हणून!" सर्जी म्हणाला. "नाही करणार जा!" इवाचा खट्याळपणा पूर्ण जागृत झाला होता. सर्जीचा चेहरा काहीसा अवघडल्यासारखा झाला. पुढे काय करावं हे त्याला कळेनासं झालं. त्यानेच पुढे होऊन आपले डोळे घट्ट मिटून घ्यावेत हे इवाची इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे काही दिसत नव्हती. काहीशा नाराजीनेच तिने डोळे बंद केले. आपल्या डोळ्याभोवती एक मऊ कपडा बहुदा स्कार्फच गुंडाळला जात आहे हे तिला कळत होते. "उघड आता डोळे आता!" सर्जीचा उत्साहित स्वर तिच्या कानी आल्यावर तिने डोळे उघडले. हळुवारपणे तिने आपल्या डोळ्याभोवती सर्जीने गुंडाळलेला स्कार्फ दूर केला. आता आश्चर्याने थक्क होण्याची तिची पाळी होती. आपला हा हरवलेला स्कार्फ सर्जीकडे कसा आला हे कोडं तिला उलगडलं नाही. "सर्जी, सांग ना हा स्कार्फ तुझ्याकडे कसा आला ते!" सर्जी त्या दिवशी प्रथमच तिला उत्साहित वाटला. उत्साहित चेहऱ्याच्या सर्जीच्या तोंडून स्कार्फची कहाणी ऐकता ऐकता हा असाच सर्जी आपल्याला मिळायला हवा असे तिला वाटून गेलं.
वातावरणात थोडा रोमांच भरला होता. एका रोमॅंटिक रशियन चित्रपटाचा त्या दोघांनी आनंद लुटला. इवा त्या कालावधीत कझानमध्ये दोघांनी एकत्र घालविलेल्या वेळेची आठवण काढत होती. तर सर्जीच्या डोक्यात पुढील आठवड्यातील कामाची यादी नाचत होती. इवाला ३ ची बस पकडायच्या आधी तासभर होता. पटकन दुपारचं जेवण आटपून घ्यायचं दोघांनी ठरवलं.ऑर्डर देऊन पाच मिनिटं झाली तरी आपल्या नावाचा पुकारा होत नाही म्हणून सर्जी बेचैन होता. "आपण लग्न कधी करायचं?" ह्या इवाच्या पूर्णपणे अनपेक्षित प्रश्नाने सर्जी अगदी गोंधळून गेला. ह्या प्रश्नाची त्याने पुढील वर्षभर तरी अपेक्षा केली नव्हती. "आपण ह्या विषयावर आतापर्यंत कधी बोललोच नव्हतो! मला विचार करायला थोडा वेळ दे इवा!" आताशा थोडफार सावरलेल्या सर्जीने वेळ मारून न्यायचा प्रयत्न केला. एव्हाना टेबलावर प्लेट्स आल्या होत्या. पण आता दोघांचही भोजनातून लक्ष उडालं होतं. आपण एकदम हा प्रश्न विचारायला नको होता हे इवाला मनातून कळून चुकलं होतं. पण कधी नव्हे तो सर्जी थोडासा उत्साहित झाल्यावर तिने एकदम पुढची पायरी गाठली होती.
"माझं चुकलं सर्जी!" इवाच्या ह्या अचानकपणे आलेल्या कबुलीने सर्जी पुन्हा एकदा भांबावून गेला. भावनांचा इतका चढउतार इतक्या थोड्या वेळात त्याने कधी अनुभवला नव्हता. त्याच्या मनात एकतर फार कमी भावना येत. इवा आवडली होती त्याला. अगदी मनापासून! आवडलेल्या मुलीशी लग्न करायचं आणि तिच्याशी आयुष्यभर सुखाने संसार करायचा इतकं त्याला माहीत होतं. परंतु हा सर्व प्रवास इतका भावनापूर्ण असेल ह्याची त्याला कल्पना नव्हती आणि आता ह्या प्रकारासाठी स्वतःला बदलवून घेण्याचा उत्स्फूर्तपणा त्याच्याकडे नव्हता. सर्जीच्या डोक्यात इतकं सगळं वादळ चाललं होतं तोवर इवा त्याच्या उत्तराची वाट पाहत होती.
"सर्जी, मी इतके दिवस तुझी खूप वाट पाहिली. तुझ्याशी काहीच संपर्क नाही. तुलादेखील मला कधी संपर्क करावासा वाटला नाही. मी तर जवळजवळ तुझी आशा सोडून द्यायच्या मार्गावर होते आणि अचानक तू त्यादिवशी बसमधून ओझरता दिसलास! विझत आलेलं सर्व भावना पुन्हा जागृत झाल्या! आणि मग मी मॉस्कोला आले. अचानक आपली भेट झाली. आता अर्ध्या तासात आपली पुन्हा ताटातूट होणार. ह्यावेळी आपण एकमेकांचा फोन, ई मेल सर्व काही जरी घेतलं असलं तरी तुझ्या कामातून तुला वेळ मिळेल काय ह्याची मलाच काय तुलाही खात्री देता येणार नाही!" इतक्या दिवसाच्या मनात दबलेल्या सर्व भावनांना इवा पूर्ण मोकळीक देत होती.
"हिला आपल्या मनातील भावनांना किती वेगानं शब्दरूप देता येतं" सर्जी अचंब्याने विचार करीत होता. "इवा, मी तुझ्यापेक्षा खूप वेगळा आहे ग!" इतक्या वेळाने सर्जीच्या तोंडातून वाक्य बाहेर पडलं. "मी प्रेमातील भावनांचे इतके गहिरे रंग असतील ह्याची कल्पना केली नव्हती, इवा!" तो पुढे म्हणाला. "ते ठीक आहे रे! पण तुझ्या तोंडून
"तू, माझ्याशी लग्न करशील का?" हा प्रश्न ऐकण्याची आपण कझान मध्ये एकत्र असताना आणि गेल्या दोन दिवसात जेव्हा संधी मिळाली तेव्हा मी किती आतुरतेने वाट पाहत होते सांगू!"
दोघांचेही बर्गर संपले होते आणि आता निघायची वेळ होत आली होती. सर्जीने आपलं कार्ड बिल भरण्यासाठी पुढे केलं. इतका वेळ सर्जीच्या डोक्यात विचारचक्र चालूच होतं. कार्ड स्वाईप करून परत आणून देणाऱ्या वेटरला टीप देऊन दोघे बाहेर पडायला निघाले. "इवा, तुला राग येणार नसेल तर एक विचारू?" सर्जीने विचारलं. इवाने मानेनेच होकार दिला. "तुझी ही भावनिक गरज आयुष्यभर अशीच राहील असं तुला वाटत का इवा?" बस स्थानकाच्या दिशेने चालता चालता सर्जी म्हणाला. "इवाने काहीशा प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे पाहिलं. "नाही म्हणजे काही काळ इतकं भावनिक होईल मला कदाचित जमेल, पण कायम असं भावनिक बनून राहणं माझ्या मर्यादेच्या पलीकडे आहे!" सर्जी एकदम बोलून गेला. इवा एकदम हादरून गेली. पुढची तीन चार मिनिटे दोघेही जवळजवळ चालत असले तरीही दोघांमध्ये फार मोठा दुरावा निर्माण झाल्यासारखं वाटत होतं. बस स्थानक जवळ आलं होतं. आणि ह्या दोघांना येताना पाहून मारियाने सुटकेचा निश्वास टाकला. कझानची बस सुटायला फक्त दोन मिनिटं राहिली होती.
(क्रमशः)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा