मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ३१ डिसेंबर, २०१७

२०१७ मनन




आठवडाभरची ख्रिसमस सुट्टी बघताबघता संपली. सोहम न राहवून म्हणाला, "बाबा सुट्टी किती लगेच संपली ना?" 

फंडे द्यायच्या मुडमध्ये असल्याने मी त्याला म्हणालो, "सुट्टीचे काय घेऊन बसला आहेस, आयुष्यसुद्धा असं झरझर डोळ्यासमोरुन निघून चाललं आहे!"
माझा मुड पाहून सोहम स्थितप्रज्ञ मोडमध्ये गेला. म्हणजे पाहिजे तितके बोला, मी ऐकून घेतो.
मग मी त्याला म्हणालो, " अगदी आता आतापर्यंत शाळेत होतो असं वाटतं, काळ झपाट्याने पुढे सरकतो. " बाकीचं त्याला नाही बोललो. 
पण वाटुन गेलं, बरेचजण भुतकाळात जमेल तितके अडकून बसलेले असतात, वर्तमानकाळातील आवश्यक व्यवहार आटोपून तत्परतेने भुतकाळाकडे  मनानं धाव घेतात.

भुतकाळात वावरण्याची मानसिकता चुक की बरोबर ह्यावर भाष्य करणं योग्य नव्हे असं हल्ली मला वाटु लागलंय.    एकंदरीतच ज्या आत्मविश्वासानं जुनी मंडळी एखादी गोष्ट बरोबर हे सांगायची तो आत्मविश्वासच नाहीसा होऊ लागला आहे. म्हणजे योग्य आत्मविश्वास असणारी मंडळी नाहीत असं नाही पण ते आपलं ज्ञान उगाचच नको त्या माणसांसमोर ( इथं नको त्या म्हणजे ज्यांना आपल्या ज्ञानाची कदर नाही हा अभिप्रेत आहे) व्यक्त करण्याचे टाळतात.

सार्वजनिक क्षेत्रातील योग्य व्यक्तीचं अधिकारीपदावरील झपाट्याने कमी होणारे प्रमाण ही आपल्या समाजाची खंत आहे.  आणि ज्या व्यक्ती राजकीय अथवा प्रशासकीय क्षेत्रात अधिकारपदावर आहेत त्यातील काही सन्माननीय अपवाद वगळता इतर सर्वांना आपल्या पदाची जबरदस्त घमेंड आहे, व्यासपीठाचा मोह आहे.

जी गोष्ट दिवाळीत जाणवली ती आता ख्रिसमसमध्ये सुद्धा जाणवली. पुर्वी समाजात असणारी स्नेहभावना झपाट्याने लोप पावत चालली आहे किंवा माझा असा समज होऊ लागला आहे. आपलं काही बरं वाईट झालं तर समाज आपल्यामागे आपल्या कुटुंबाकडे लक्ष देईल असा विश्वास काही प्रमाणात असायचा हल्ली तो कमी प्रमाणात दिसतो, कारण एक कुटुंब योग्य प्रमाणात चालविण्यासाठी हल्ली प्रचंड प्रमाणात मेहनत, आर्थिक शक्ती आवश्यक आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे आपल्याला वेळ आली तर ज्या प्रमाणे दुसऱ्याचा भार वाहता येणार नाही त्याप्रमाणे दुसऱ्यांकडून सुद्धा ही अपेक्षा बाळगणे रास्त ठरणार नाही हे प्रत्येकजण जाणून असतो. ह्यामुळं झालंय काय तर असुरक्षिततेच्या भावनेने सर्वांना ग्रासले आहे. ह्या असुरक्षिततेच्या भावनेवर उपाय म्हणून सर्वजण प्रचंड प्रमाणात पैसा, मालमत्ता गोळा करण्याच्या मागं लागले आहेत.
आपल्या समाजाला जितका काळ भूतकाळात रममाण व्हायला आवडतं तितकाच काळ किंवा तुलनेने समप्रमाणात जर आपण समाजाच्या भविष्यातील जडणघडणीविषयी विचार करण्यात घालवला तर योग्य ठरेल. आर्थिक संपन्नतेकडील समाजाची वाटचाल बर्याच वेळा समाजाचं कौटुंबिक आणि सामाजिक स्वास्थ बिघडवून टाकते हे आपण पाहिले आहे. आपल्या समाजाची वाटचालसुद्धा बहुदा त्या दिशेने चालली असावी असं वाटते. ती जर का आपल्या वैयक्तिक प्रभावक्षेत्रापुरती थांबवायची झाली तर प्रत्येक जण प्रयत्न करु शकतो का हे प्रत्येकाने ठरवायला हवं. हल्ली बर्याच वेळा ऐकायला मिळतं त्याप्रमाणे समाधान हरवलंय आणि आपण सारे long weekend मध्ये, परदेशी सहलींमध्ये ह्या समाधानाचा शोध घेतोय. पण ते तिथं मनापासून सापडत नाही आणि भविष्यात हे समाधान म्हणून जे काही आहे ते सापडण्याची शाश्वती कोणालाही नाही आणि हीच सर्वांची न बोलुन दाखवली जाणारी खंत आहे.

२०१७ मधील ही शेवटची पोस्ट. गंभीर विषयावरील पोस्ट लोकांना जास्त वाचायला आवडत नाहीत हे निरीक्षण ह्या वर्षात सुद्धा कायम राहिले. २०१८ साल काही बदल घेऊन येईल अशी आशा करून तुम्हां सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देत ही पोस्ट संपवतोय.

गुरुवार, २८ डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ४

Lounge चा आनंद घेत असताना किंवा एकंदरीतच एकट्याने प्रवास करीत असताना आपल्या सामानावर बारकाईने लक्ष द्यावे. कोणत्याही क्षणी आपले सामान नजरेआड होता कामा नये. Restroom चा वापर करताना देखील आपल्या बँग्जस आपल्या सोबत घेऊन जाणे इष्ट.

Travel Light ही उक्ती शक्य तितक्या प्रमाणात आचरणात आणावी. त्याचा एकट्याने प्रवास करताना विशेष फायदा होतो.
युरोपातुन किंवा पुर्व आशियाई देशातुन विमानाने अमेरिकच्या दिशेने उड्डाण केलं की त्या प्रवासात तुम्हांला कधीतरी अमेरिकेतील कस्टम अधिकार्यांना द्यावा लागणारा अर्ज देण्यात येतो. तो तुम्हांला काळजीपूर्वक भरावा लागतो. मी मागील भेटीत हा अर्ज भरला तेव्हा केवळ पहिल्या प्रश्नाचे (Are you on Business visit) उत्तर हो असे होते. बाकी सर्व प्रश्नांची उत्तरं नकारार्थी होती. आपल्या चेकइन बँग्जसमध्ये नक्की काय आहे ह्याची आपल्याला माहिती असावी.
अमेरिकत उतरल्यावर बाह्यगमनाच्या सुचना पाळत गेल्यास आपली गाठ अमेरिकन immigration officer ह्या व्यक्तीशी पडते. आपली सर्व विनोदबुद्धी, वाह्यातपणा ह्या इसमाशी बोलताना बाजूला ठेवून द्यावा.

आपण ह्या अधिकार्याचे शंकासमाधान केले की मग आपल्या फिंगरप्रिंट घेण्यात येतात. डाव्या हाताची चार बोटं, डाव्या हाताचा अंगठा, उजव्या हाताची चार बोटं, उजव्या हाताचा अंगठा अशा क्रमाने ठसे घेण्यात येतात. तुम्हांला व्हिसा देण्यात येताना जे ठसे घेतले जातात त्यांच्याशी हे ठसे जुळवून पाहिले जात असावेत.

शेवटी एकदाचे हे महाशय तुमच्यावर प्रसन्न झाले की तुमच्या पासपोर्टवर शिक्का मारतात. अमेरिकेच्या ह्या भेटीत तुम्ही किती काळ वास्तव्य करू शक्यता ह्याची नोंद तुमच्या पासपोर्टवर केली जाते. ह्या मुदतीचे उल्लंघन करण्याचा विचारसुद्धा मनात आणु नये.
Immigration officer नं तुम्हांला पासपोर्ट शिक्कामोर्तब करून दिला की तुम्ही आपले चेकइन लगेज ताब्यात घेऊन कस्टमच्या दिशेनं जाता. इथला अधिकारी तुमच्याकडे काही आक्षेपार्ह सामान नाही ना याची तपासणी करतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची बी बियाणे आणली नाही ना हा त्यांचा आवडता प्रश्न असतो. अरे मित्रा हल्ली वसईच्या वाडीत जायला वेळ नाही तर इथं बर्फाळ वातावरणात शेती करण्यात मला अजिबात रस नाही असं उत्तर देणं शक्य झाले तर टाळावं.

बाकी अमेरिकेत आंतरराज्य विमानप्रवास करताना भारतातुन आणलेल्या वजनदार बँग्जस तुम्हांला डोकेदुखी ठरु शकतात. आंतरराज्य विमानप्रवास हा तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचाच सलग भाग असेल तर ठीक नाहीतर तुम्हांला प्रत्येक एअरलाईन्सनुसार डाँलर्स द्यावे लागतात. अमेरिकन एअरलाईन्सचा दर एक बँग २५ डाँलर्स, दोन बँग्जस ६० डाँलर्स आणि तीन बँग्जस २१० डाँलर्स असा चढ्या दराने आहे.
अमेरिकेतील वास्तव्याचा आनंद घेऊन झाला आणि सोशल मीडिया गाजवुन सोडलं की मग तुम्हांला परतीच्या प्रवासाचे वेध लागतात.

जर परतीच्या प्रवासात तुम्हांला आंतरराज्य विमानप्रवास करावा लागणार असेल तर त्या प्रवासाला तुमच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा भाग बनविणे श्रेयस्कर! माझ्याकडून ही चुक दोन वेळा झाली आहे. आताच उदाहरण द्यायचं झालं तर कोलंबस ते फिलाडेल्फिया हे वेगळं तिकीट आणि फिलाडेल्फिया -   फ्रँकफर्ट -मुंबई हे वेगळं तिकीट असं आरक्षण मी केलं. ह्यात दोन प्रकारच्या गैरसोयी होतात. फिलाडेल्फियाला आपल्या बँग्जस ताब्यात घेऊन terminal F ते terminal A हा प्रवास स्वतः करावा लागला. आणि आतुन हा मार्ग न सापडल्याने मी हे मार्गक्रमण उणे किती तरी तापमानात केलं. आणि हो ट्रोली फुकटात मोजक्या देशात मिळतात, अमेरिकेत नाही.
दुसरा तोटा म्हणजे तुमच्या आंतरराज्य विमानास उशीर होऊन तुमचे आंतरराष्ट्रीय विमान चुकल्यास ती तुमची जबाबदारी असते आणि त्यामुळे तुम्हांला जबरदस्त आर्थिक भुर्दंड पडू शकतो. सुदैवाने माझ्यावर हा प्रसंग ओढवला नाही.

चार भागांची ही मालिका इथं आटोपती घेतोय. माझ्यापेक्षा बराच जास्त प्रवास केलेले अनेक लोक आहेत. पण त्यातले बरेच जण लिहायचा कंटाळा करतात, पण मी करत नाही. त्यामुळं इथली माहिती परिपूर्ण नसली तरी गोड मानुन घ्यावी.

समाप्त

भाग पहिला
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post_19.html

भाग दुसरा
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post.html

भाग तिसरा
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post_20.html

बुधवार, २० डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग ३

विमानांना आपल्या प्रवासात Turbulence अर्थात वादळी हवामानास तोंड द्यावं लागतं. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी वापरली जाणारी विमानं भलीमोठी असल्यानं आतल्या प्रवाशांना हा Turbulence बऱ्याच वेळा कमी प्रमाणात जाणवतो. पण तुम्ही youtube वर शोधलं असता Turbulence ने घाबरलेल्या प्रवाशांचे अनेक विडिओ पाहावयास मिळतील. अशावेळी विमानं अचानक कित्येक फूट / मीटर खाली जातात. मराठी प्रवाशांवर अशी परिस्थिती ओढवली असता अनेक पिढ्यांपासुन वापरात असलेलं "भीमरुपी महारुद्रा" स्तोत्राचं स्मरण करावं हा लेखकाचा सल्ला ! आंतरदेशीय प्रवासासाठी वापरलं जाणारं हे छोटूस विमान. ह्यात केवळ १८ रांगा आणि ५४ सीट्स होत्या आणि त्यात मला १८ वी रांग मिळाली.  सुदैवानं मारुतीरायाची आठवण करायची वेळ आली नाही. 


आंतरदेशीय विमानांत बऱ्याच वेळा टुकार खानपान सेवा आढळुन येते. ह्या टूकारपणाच्या बाबतीत भारतीय आंतरदेशीय सेवा परवडल्या असं म्हणण्याची वेळ अमेरिकन आंतरदेशीय सेवा पाहिल्यानंतर येते. तिथं बऱ्याच वेळा pretzel किंवा खारवलेले शेंगदाणे खाऊन वेळ मारुन नेण्याची पाळी येते. ह्यावरुन आठवली ती इंडिगोची मुंबई हैद्राबाद फ्लाईट! ह्यात जर तुम्ही ६ क्रमांकांची सीट घेतली असेल तर हवाईसुंदरी ज्याप्रकारे स्नॅक्स सर्व्ह करतात त्या क्रमवारीमध्ये तुम्हांला सर्वात शेवटी स्नॅक्स मिळतं. अवघा एका तासाची उड्डाण वेळ असणारं हे फ्लाईट ! त्यात तुम्हांला साधारणतः ३५ व्या मिनिटाला स्नॅक्स मिळु शकतं आणि मग लुटुपुटीचा पाच मिनिटाचा वेळ देऊन हवाई सुंदर / सुंदरी तुमच्याकडे आवरणांची मागणी करायला येतात. एखादा पुणेकर ह्या प्रसंगी त्यांना काय उत्तर देतो हे पाहण्यासाठी अशा नमुनेदार पुणेकराची मुंबई हैद्राबाद हवाई सहल प्रायोजित करायचा मी विचार करतोय. 

३५००० फुटावर आपला मेंदु जमिनीवरील आपल्या मेंदूपेक्षा काहीसा वेगळा विचार करतो हे मला माहीत नव्हतं. पण मी ज्यावेळी हिंदी चित्रपटसृष्टीतील महान अभिनेत्री श्रद्धा कपूर ह्यांचा हाफ गर्लफ्रेंड हा चित्रपट साधारणतः एक तासभर मन लावून पाहिला त्यावेळी मी दचकलो. आणि मग मन ताळ्यावर आणण्यासाठी मी The Circle सारखे २०१७ सालातील सोशल मीडियाच्या अतिरेकी व्यावसायिकरणाचे दुष्परिणाम दाखविणारा चित्रपट पाहिला. 

आता थोडं गंभीर होऊयात! बऱ्याच वेळा आपण Lufthansa किंवा British Airways सारख्या एअरलाईन्सने प्रवास करताना आशियाई शाकाहारी जेवण किंवा भारतीय हिंदू मीलची आगाऊ नोंदणी करतो. परंतु बऱ्याच वेळा हे अगदीच टुकार निघण्याची शक्यता असते. मागील आठवड्यात अगदी सुगंधी, चांगल्या फुललेल्या बासमती भातासोबत केवळ कांदा घालुन उकडलेले छोले मला देण्यात आले. त्याआधी स्टार्टर म्हणुन सुद्धा हेच छोले, lettuce आणि कांद्यासोबत मला देण्यात आले होते. जवळपास तशीच पूर्ण प्लेट परत करताना त्या जर्मन हवाईसुंदरीने असे जेवण पुरविल्याबद्दल खेद व्यक्त केला. मग ह्यापासून धडा घेऊन पुढील टप्प्यात मी चक्क हवाईसुंदरीने सुचविलेली जर्मन डिश मागविली. आणि ती जबरदस्त चविष्ट निघाली. ज्या गावी जावं तिथल्या स्थानिक डिशेस चाखुन पाहाव्यात असं म्हणतात त्याची आठवण झाली. 

तुम्ही जर अमेरिकेला जात असाल तर हल्ली थेट फ्लाईट उपलब्ध आहेत. त्यांचा अवधी १५ - १६ तास असतो. इतका वेळ विमानात सतत बसणं अवघड असु शकतं पण ह्याउलट तुम्ही युरोपात / पुर्व आशियात उतरुन जात असाल तर तुम्हांला परत सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या सुरक्षातपासणीचा, मैलभर लांब असणाऱ्या गेटचा शोध घेण्याची जबाबदारीचा सामना करावा लागतो.  

ज्यावेळी तुम्ही विमानातुन उतरत असता त्यावेळी अगदी लोकल ट्रेनमधुन उतरल्यासारखी घाई करु नये. आपण प्रवेशद्वाराच्या दिशेनं जात असताना जी मंडळी त्यांच्या सीटवरुन बाहेर पडण्यासाठी थांबुन राहिलेली असतात त्यांना प्रथम बाहेर पडण्याची संधी द्यावी, जमलं तर "After You" वगैरे म्हणावं! दाराशी हवाई सुंदर / सुंदरी आपल्याला Thank You म्हणत असतात, अशा वेळी केवळ आपल्याला आवडलेल्या हवाई सुंदरीलाच "Thank You" न म्हणता सर्वांना Thank You म्हणावं. 

युरोपात थांबा असला की विमानातुन उतरल्यावर आपल्याला दुसऱ्या उड्डाणासाठी असणाऱ्या गेटचा शोध घ्यावा लागतो. फ्रँकफर्ट विमानतळावर A,B,C,D टर्मिनल नंतर बहुदा थेट  Z टर्मिनल आहे. जर तुमचं अमेरिकेहून फ्रँकफर्टला किंवा मुंबईहुन फ्रँकफर्टला येणारं विमान उशिरानं आलं तर तुमचं जोडणी विमान (connecting flight) चुकण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. त्यात आधी आलेलं विमान Z टर्मिनलवर असेल आणि जोडणी विमान समजा  C टर्मिनलवर असेल तर तुम्हांला मोठी पायपीट आणि ट्रेनचा प्रवास करावा लागतो. 





ह्या पायपिटीदरम्यान तुम्हांला विविध टर्मिनलची दिशा दर्शविणाऱ्या पाट्यांकडे लक्ष ठेवावं लागतं. ह्या प्रवासात मग तुम्हांला पुन्हा एकदा सुरक्षा तपासणीस सामोरं जावं लागतं. अमेरिकेला जाताना तिथल्या स्त्री अधिकारीने मला जणु काही ती अमेरिकेची इमिग्रेशन अधिकारी आहे ह्या थाटात प्रश्न विचारले. "तुम्ही अमेरिकेला का जात आहात?" ह्या तिच्या प्रश्नाला - "घरी करमत नाही", "मुंबईच्या ट्रॅफिकला वैतागलो", "अमेरिकेचा बर्फ पाहायचा आहे" "तात्यांना भेटायचं आहे!" आणि तत्सम उत्तरांपैकी एक उत्तर द्यायचा मला मोह झाला होता. थोडं गंभीर होत - ह्या सुरक्षा तपासणीत तुम्हांला आपलं लक्ष एकाग्र ठेवत, सामानाकडे लक्ष ठेवणं आवश्यक असतं. हे अधिकारी इथं येणारा प्रत्येकजण सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचा माणुस असु शकतो ह्या मानसिकेत असल्यानं त्यांच्याशी आदरानं वागावं. सुरक्षा तपासणी झाली की मग पुन्हा ड्युटी फ्री शॉप, लाउंज वगैरे प्रकार असतात. तिथं उपलब्ध वेळ, आपली आवड, मदिरेची ओढ ह्या घटकांनुसार वेळ घालवावा. इथं फ्रँकफर्ट - पुणे विमानाची नोंद बोर्डवर पाहुन मी धन्य झालो. फ्रँकफर्ट - ड्युटी फ्री शॉपमध्ये चॉकोलेट घेतल्यावर विक्रेत्यानं माझं (आणि सर्वांचंच) पारपत्र तपासुन पाहिलं. 

(क्रमशः )


भाग २


भाग १






मंगळवार, १९ डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग २



विमानात प्रवेश केल्यावर आपण आपल्या आसनाकडं प्रस्थान करतो. आपलं आसन शोधणं हा सोपा प्रकार असला तरी काही अक्षरं आणि खिडकीचे आसन ह्यांच्या बाबतीत क्वचितच गोंधळ होऊ शकतो. इथं आपल्याला खिडकीचे आसन मिळावं असं कितीही वाटत असलं तरी सीट क्रमांकानुसार आसनस्थ व्हावं लागतं. केबिन लगेज वरच्या कप्प्यांमध्ये ठेवणं किंवा समोरील सीटच्या खाली ठेवणं हे पर्याय तुमच्याकडे असतात. 

अमेरिकेतील स्थानिक प्रवासात तुमच्याकडं confirmed ticket नसलं आणि तुम्ही प्रतीक्षायादीवर पहिल्या दोन - तीन क्रमांकात असाल तर तुम्ही गेटजवळ येऊन थांबु शकता. जर तुम्ही frequent flier असाल तर तुम्हांला अशा परिस्थितीत confirmed ticket मिळण्याची शक्यता वाढीस लागते. एअरलाईन्स ज्यांना घाई नाही अशा प्रवाशांना काही डॉलर्स देऊन नंतरची फ्लाईट घेण्यास प्रोत्साहित करते. 

सर्व प्रवासी आसनस्थ झाले की "All Passengers are Boarded" अशी घोषणा केली जाते. सर्व प्रवासी आसनस्थ झाले आणि सर्वांच्या बॅग्स विमानाच्या पोटात शिरल्या की मग विमान आकाशात झेपावण्यास तयार होते. अशा वेळी हवाईसुंदरी वर्ग सुरक्षाप्रात्यक्षिक करुन दाखवतो. "Please fasten your seat belts" वगैरे ठीक असतं पण "कुर्सी की पेटिया" वगैरे आलं की माझं लक्ष विचलित होतं. आणि तसं म्हणायला गेलं तर खरोखर आणीबाणीचा प्रसंग ३५००० फूट उंचीवर आला तर ह्या सर्व सुचनांमधील नक्की काय आठवेल आणि त्याचा कितपत उपयोग होईल ह्याविषयी मी साशंक असल्याने मी बहुदा त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. 

विमानानं उड्डाण केलं आणि ते त्याच्या ठराविक उंचीवर (साधारणतः ३५००० फीट) स्थिरस्थावर झालं की मग बऱ्याच गोष्टी घडू लागतात. तुम्ही आपल्या समोर असलेल्या स्क्रीनवरील उपलब्ध सिनेमे, संगीत किंवा विमानाचा प्रवासमार्ग ह्याचा आनंद लुटू शकता. समोरील स्क्रीनचा रिमोट आणि हेडसेट नक्की कुठं लपवुन ठेवले आहेत आणि ते कसे वापरायचे ह्याविषयी प्रत्येक विमानाचे मॉडेल वेगवेगळ्या पद्धती अवलंबत असल्यानं तुम्ही काही वेळ गोंधळून गेलात तर त्यात तुमचा दोष नाही आणि तुम्ही एकटे नाही आहात. विमानाचा प्रवासमार्ग स्क्रीनवर येत असताना मी बराच वेळ तो पाहत राहतो. आखाती देशावरुन विमान जात असल्यास रात्रीच्या वेळी खाली दिसणारी गावं आणि त्या गावातील मिणमिणते दिवे माझे लक्ष वेधून घेतात. इथं विमानाला आपत्कालीन उतरणं करावं लागलं तर तिथली लोक आपलं स्वागत कसं करतील वगैरे विचार माझ्या मनात येतात. परंतु पॅसिफिक किंवा अटलांटिक महासागरावरुन उड्डाण करीत असताना आपत्कालीन उतरण्याचे विचार मनात येऊन देणं योग्य नाही हे मी मनाला बजावतो. 

प्रत्येक विमानाच्या वेळेनुसार त्यात जेवण, नास्ता प्रवाशांना कधी आणुन द्यायचा ह्याविषयी मापदंड असतात. ह्याविषयी आपण मनात बांधलेले आडाखे कधी कधी चुकतात. दोन आठवड्यापुर्वी फ्रँकफर्टला जाताना पहाटे तीन वाजता निघणारं विमान एक तास उशिरानं म्हणजे चार वाजता निघालं. सुरुवातीला संत्र्याचा रस स्वागतपेय म्हणुन देण्यात आल्यावर मी पुढील खाद्यपदार्थाची अपेक्षा केली होती. पण अपरडेकवर असलेली बहुतांश जर्मन मंडळी विमान ३५००० फूट उंचीवर जाताच आपली सीट आडवी करुन डोक्याखाली उशी घेऊन, अंगावर पांघरूण घेऊन अगदी शिस्तीतल्या लहान मुलासारखी झोपुन गेली. संपुर्ण अंधार! मला खरंतर झोप येत नव्हती पण सर्व मंडळी (आणि ती ही हिटलरच्या देशातील) झोपली असताना लपवुन ठेवलेला रिमोट आणि हेडसेट शोधुन त्याचा योग्य वापर करण्याचा मार्ग शोधून काढणं आणि त्या प्रयत्नात होणाऱ्या आवाजानं सहप्रवाशांची झोप मोडणं मी प्रशस्त समजलं नाही. त्यामुळं मी ही आपली सीट आडवी करुन झोपून गेलो. आणि अहो आश्चर्यम ! मला कधी नव्हे ती दोन तास झोप लागली सुद्धा! दोन तासाने उठलो तरीही सर्व शिस्तबद्ध मंडळी झोपलीच होती. मग मी सीट सरळ करुन खिडकीबाहेर पाहू लागलो. सुर्योदयापासून विमान अधिकाधिक दूर जायचा प्रयत्न करीत होते. 

विमानप्रवासात देण्यात येणारी जेवणं, ड्रिंक्स, नास्ता ह्या बाबतीत काही निरीक्षणं मी केली. आपण तिकिटाचे पैसे भरले आहेत त्यामुळं त्याचा पुरेपूर उपयोग करणं आणि आपल्याला नको असलं तरी नुसतंच चव घ्यायला म्हणुन देण्यात येणारं प्रत्येक मील स्वीकारणं कितपत योग्य आहे ह्याचा आपण विचार करायला हवा. कर्तृत्वाने भारतीय मंडळी मोठी झाली आहेत पण सार्वजनिक जीवनातील आचारपद्धतीत अजुन सुधारणेस प्रचंड वाव आहे. काटे, सुरी आणि चमच्यानं व्यवस्थित जेवता येणं ह्याचं प्रशिक्षण आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या जमेल तितक्या सर्व भारतीयांनी (त्यात मी सुद्धा समाविष्ट ) घेणं आवश्यक आहे. 

अजुन एक मुद्दा! विमानातील lavatory मधील पद्धती थोड्या वेगळ्या असतात. आपण वापरण्याआधी तिथं जी स्वच्छता असते ती आपण तिचा वापर केल्यानंतरसुद्धा तशीच असली पाहिजे ह्याचं भान आपण सर्वांनी राखणं आवश्यक आहे. सर्वसाधारणपणे आपण भारतीय ह्या विषयावर बोलत नाही पण इथंही सुधारणेस प्रचंड वाव आहे. 

(क्रमशः)

भाग १ - 
http://patil2011.blogspot.in/2017/12/blog-post.html

सोमवार, १८ डिसेंबर, २०१७

विमानप्रवास - मुलभूत माहिती - भाग १


खरंतर स्वतःसाठी गेल्या आठवड्यातील प्रवासाची नोंद ठेवणं योग्य ठरेल असा विचार प्रथम मनात आला आणि मग पोस्टमध्ये त्याचं रुपांतर करावं ह्यात तो परिवर्तित झाला. आंतरराष्ट्रीय प्रवास करताना आपणास सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या विविध टप्प्यांचे वर्णन करणं हा मुळ हेतू आहे. मुंबई विमानतळावर आपला प्रवास सुरु होत आहे असं इथं गृहितक आहे. 

१> विमानतळ प्रवेश 
आपल्याला विमानतळावर घेऊन येण्यासाठी केलेली कॅब  विमानतळाच्या प्रवेशद्वाराशी सोडते. तिथं उभा असणारा पोलीस आपल्याजवळ प्रवासासाठी आवश्यक असणारी कागदपत्रं आहेत की नाही ह्याची खातरजमा करुन घेतो. आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पासपोर्ट आणि योग्य तिकीट असणं आवश्यक आहे. हल्ली वेब चेकइनचा जमाना असल्यानं काहीजण आपल्या मोबाईलवरील बोर्डिंग पाससुद्धा वापरतात.  

२> चेक इन लगेज 
प्रवेश केल्यानंतर तिथल्या kiosk वर बोर्डिंग पास प्रिंट करण्याची सोय असते. जर तुमच्याकडे चेकइन बॅग्स नसतील तर तुम्ही बोर्डिंग पास घेऊन थेट सुरक्षा तपासणीच्या दिशेनं प्रस्थान करु शकता. चेकइन बॅग्सचे महत्तम वजन तुम्ही प्रवास करत असलेली एअरलाईन्स, तुमच्या तिकिटाचा क्लास ह्यावर अवलंबुन असते. एकदा का ह्या वजनदार बॅग्स तुम्ही त्या एअरलाईन्सच्या हवाली केल्या की तुमच्या डोक्यावरील ओझे बऱ्याच प्रमाणात कमी होते. ह्या क्षणी तुमच्या हातात पासपोर्ट, बोर्डिंग पास, चेक इन सामानाची रिसीट आणि तुमचं केबिन लगेज असायला हवं. 

३> सुरक्षा तपासणी 
आता आपली पावलं सुरक्षा तपासणीच्या कक्षाकडे वळतात. ह्या कक्षात शिरण्याआधी तुम्ही आपल्याजवळील द्रवपदार्थ एकतर संपवुन टाकायला हवेत किंवा त्यांच्या बाटल्या फेकुन द्यायला हव्यात. बिसनेस क्लासच्या तिकीटधारी लोकांसाठी हा काहीसा शांत अनुभव असतो पण इकॉनॉमी क्लासच्या तिकीटधारी लोकांसाठी हा तापदायक अनुभव असतो. इथं मोकळ्या ट्रे मध्ये आपलं केबिन लगेज, खिशातील सर्व ऐवज ठेवायचा आणि स्वतः सुद्धा X Ray तपासणीला सामोरे जायचं असते. काही ठिकाणी तुम्हांला आपले बुट, बेल्ट वगैरे सुद्धा ट्रे मध्ये काढून ठेवावे लागतात. X Ray तपासणी कक्षामध्ये दोन पावलं असतात त्यावर आपली पावलं ठेवून आणि हात वरती करुन ह्या तपासणीला सामोरे जायचं असतं. इथुन बाहेर पडल्यावर तात्काळ ट्रे मधुन येणाऱ्या आपल्या सामानाकडं लक्ष ठेवुन त्याचा ताबा घ्यायचा असतो. 

४> इमिग्रेशन 
सुरक्षा तपासणी झाली की इमिग्रेशन कक्ष आपणासमोर उभा ठाकलेला असतो. इमिग्रेशन अधिकारी तुमच्या पारपत्राची तपासणी करतो. तुम्हांला देशाबाहेर जायला सरकारने बंदी वगैरे घातली आहे का हे तपासुन पाहतो. ह्या कक्षाच्या पलीकडं एक रेषा असते, ही रेषा तुम्ही पार केलीत की तुम्ही भारत देशाच्या नियंत्रणापलीकडं गेलात असं काही प्रमाणात म्हणता येईल. इथं ड्युटी फ्री सामानांची गर्दी आढळून येते. त्याचप्रमाणं अडीचशे रुपये दरानं मसालाडोसा विकणारी दुकानं सुद्दा आढळून येतात. बिझनेस क्लास मधुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लाऊंज ह्या आलिशान कक्षाची सोय केलेली असते. इकॉनॉमी क्लास तिकीटधारी अधिक पैसे भरुन ह्या कक्षात प्रवेश घेऊ शकतात, इथं स्नॅक्स, मदिरा, फळं ह्यांचं मुक्त हस्ते वाटप करण्यात येत असतं. काही विमानतळावर प्रत्येक एअरलाईन्सची स्वतःची वेगळी लाऊंज असते तर काही ठिकाणी विमानतळ प्राधिकरण एका सामायिक लाऊंजची सुविधा पुरविते. मुंबई विमानतळाची GVK
लाऊंज ही एक सर्वोत्तम लाऊंज मानण्यास हरकत नसावी. 





काही लाऊंजमधुन (विशेष करुन जिथं प्रत्येक एअरलाईन्सची स्वतःची वेगळी लाऊंज असते तिथं) थेट विमानात प्रवेश करण्याची  असते, पण बाकी ठिकाणी मात्र ह्या लाऊंजच्या बाहेर येऊन आपल्याला आपल्या गेटसमोर वेळेत हजर होण्याची काळजी घ्यावी लागते. मुंबई विमानतळ हे शांत विमानतळ म्हणुन घोषित झाल्यानं इथं लेट लतीफ प्रवाशांसाठी घोषणा वगैरे प्रकार नसतो.  

५> बोर्डिंग 
विमानात प्रवेश करताना ज्यांच्या सोबत लहान मुलं आहेत, ज्या व्यक्ती व्हीलचेयर वर आहेत त्यांना सर्वप्रथम प्रवेश दिला जातो. त्यानंतर फर्स्ट क्लास, बिझनेस क्लास  इकॉनॉमी क्लास ह्या क्रमानं प्रवेश दिला जातो. काही वेळा सर्वात मागच्या आसनाच्या प्रवाशांना आधी सोडलं जातं. गेटवर आल्यानंतर तिथं दिल्या जाणाऱ्या सूचनांकडे लक्ष देणं इष्ट! गेटवर विमानप्रवेशाची वाट पाहत असताना आपल्याला बऱ्याच वेळा आपलं विमान दिसत असते. बऱ्याच एअरलाईन्सचे स्वतःच हब असते जसं की ब्रिटिश एअरवेजचे लंडन, Lufthansa चे फ्रँकफर्ट! ह्यांची विमान मुंबईला येतात. आपण लवकर आलेलो असलो की हे विमान उतरल्यावर गेटपाशी येताना दिसतं, मग त्यातील प्रवाशी उतरतात आणि मग विमानतळ कर्मचारी ह्या विमानाचा ताबा घेतात. शेकडो प्रवाशांना लागणारे दोन तीन वेळेचं जेवण / स्नॅक्स, नॅपकिन्स, शीतपेये आणि मदिरापेये, नवीन कापडं ही सर्व सामुग्री एका तासाभरात त्याच विमानात परत चढवली जाते आणि नऊ - दहा तासाचा प्रवास करुन आलेलं हे विमान पुन्हा तितक्याच अवधीच्या प्रवासासाठी सज्ज होते. प्रत्येक एअरलाईन्स ही आपली अधिकाधिक विमान हवेत जास्तीत जास्त वेळ कशी उडत राहतील ह्यासाठी प्रयत्नशील असते. 
अजून एक मुद्दा हा headwind आणि tailwind च्या संदर्भात! आता शनिवारी फिलाडेल्फिया ते फ्रँकफर्ट प्रवासात tailwind च्या मदतीने आमच्या प्रवासाचा अवधी आठ तासांवरून सात तासावर आला. इंधन बचतीसाठी tailwind फार मोलाचा !

(क्रमशः )

रविवार, १० डिसेंबर, २०१७

बर्फाळ दिवस

सध्या कार्यालयीन दौरा सुरु असून अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावर वास्तव्य आहे . खरं तर अमेरिकेतुन ही पोस्ट लिहिण्याचा काही मनसुबा नव्हता . पण एकंदरीत ह्या दौऱ्यामध्ये बर्फमय वातावरण हात धुवून माझ्या मागे लागलं आहे . बघा न आजचा चांगला खास शनिवार सर्व पुर्वनियोजित कर्यक्रम बाजुला टाकुन हॉटेलच्या खोलीत काढावा लागला आहे. आणि त्यामुळं खिडकीतुन फोटॊ काढून आणि ते फ़ेसबुक / व्हाट्सअँप वर टाकण्याचा अतिरेक करून झाल्यावर आता करण्यासारखं काहीच न उरल्यानं  ब्लॉगकडे मोर्चा वळविण्यात आला आहे .

सूरूवात झाली ती येताना फ्रँकफर्ट विमानतळावर ! आधीच सहनशीलतेची परिसीमा पाहणारा ६ तासांचा थांबा कमी होता की काय म्हणून तिथं जोरदार बर्फवृष्टी सुरु झाली.  Lounge मध्ये बसून अवती भोवती  रसिक लोक असताना पाण्याचे घोट घेताना चेहऱ्यावर गंभीर भाव आणणं थोडं कठीणच, पण
सरावाने सर्व काही साध्य होते असं म्हणतात त्याप्रमाणे मी सुद्धा ही कला साध्य केली आहे.

Lounge चा नाद सोडून गेटसमोर येऊन बसलो. तिथंही सावळा गोंधळ उडाला होता. बरीच विमानं बर्फामध्ये नखशिखांत न्हाऊन निघाली होती आणि त्यांच्या अंगावरील बर्फ काढून टाकण्याचं काम मंदगतीने सुरू होते.

विमानउड्डाणाच्या वेळा बर्याच वेळा पुढे ढकलण्यात आल्या. दुसऱ्या विमानांची सफाई पाहून मन भरल्यानंतर शेवटी एकदा आम्हाला घेण्यासाठी बस आली. बराच लांब पल्ला बसनं पार पाडून आम्ही मग बर्फ पडत असतानाच विमानात शिरलो. बसल्यावर  जवळपास दोन तास विमानावरील बर्फ काढून टाकण्याचं काम पुरले. त्या वेळी घेतलेले फोटो.





त्या बर्फाळ दिवसाच्या आठवणी काहीशा धुसर होत नाहीत तो आज हा असला तुडुंब बर्फाचा दिवस उगवला आहे.

इथल्या हवामानखात्याचा अंदाज पुर्वीपासून अचूक ठरतो. आजही तो अचूक ठरला. माणसाला एका खोलीत बंद करून ठेवले की त्याची हालत कशी होते ह्याचा अनुभव मी घेतला. मऊ बिछान्यावर लोळत राहायला मिळत नाही ह्याची आठवडाभर वाटणारी खंत काही काळ लोळल्यावर नाहीशी झाली. खिडकीतून दिसणारं बर्फाचे द्रुश्य फेसबुकवर मित्रांना दाखवून त्यांना लाईक द्यायला भाग पाडलं. अंधार होताना एकाच पोझिशनमधुन प्रकाशाच्या विविध छटांचे आणि बर्फाचे फोटो काढले.


इतक्या सर्व प्रकारात रुम सर्विस करण्यात आली. त्यामुळे टापटीप रुमचे फोटो काढले.


ब्लॉग लिहायला सुरू केला iPad वर कारण बरेच फोटो त्यावर होते. पण iPad वर असलेले फोटो iPad वरच ब्लॉग लिहताना atach करण्याचा पर्याय न सापडल्याने फोटो android प्रणालीच्या मोबाईलवर आणले आणि पोस्टला जोडले. परंतु android फोनवरुन ड्राफ्ट म्हणून सेव केलेले version iPad वर उपलब्ध होत नव्हतं आणि त्यामुळं ही सर्व पोस्ट मोबाईलवर टाईप करावी लागली. पब्लिश केल्यानंतर apple प्रणालीच्या लोकांना संपूर्ण पोस्ट दिसावी ही आणि उद्याच्या प्रवासाआधी बर्फ थांबावा ही ईशचरणी प्रार्थना!!








भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...