काळ कोणासाठी थांबत नाही, तो सदैव पुढेच जात असतो. बदलत्या काळानुसार
समाजाने स्वीकारलेल्या रूढी बदलत जातात. पूर्वी वर्ज्य असलेल्या रूढी
कालांतराने समाज स्वीकारतो. मद्यपान ही पूर्वीच्या काही पिढ्या वर्ज्य
असलेली गोष्ट आज समाजाने बर्याच प्रमाणात स्वीकारलेली आहे. ह्याबाबत असा
आक्षेप घेतला जावू शकतो की देव देखील सोमरस पान करायचेच ना ? पण आजच्या
लेखाचा विषय प्रामुख्याने सुशिक्षित मध्यमवर्गाशी निगडीत आहे. मी
जाणीवपूर्वक मद्यपानाच्या आहारी जाऊन संसाराची परवड करणाऱ्या लोकांविषयी
इथे वळत नाही. त्यांचे मनावर नियंत्रण नाही. पूर्वीचा शिक्षित वर्ग जो
बहुसंख्येने निर्व्यसनी असायचा तो आज विशिष्ट प्रसंगी मद्यपान करतो.
ह्यातील बहुसंख्य लोक एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जात नाहीत. मद्यपानाचा ते
आपल्या व्यावसायिक जीवनावर परिणाम होवून देत नाहीत. त्यांना मद्यपान का
करावे वाटते? मला ह्यात अनुभव नाही पण एकंदरीत असे जाणवते की व्यावसायिक,
वैयक्तिक जीवनातील ताणतणावापासून मुक्त होवून काही काळ एका वेगळ्या
विश्वाचा अनुभव घेता यावा म्हणून त्यांनी हा पर्याय स्वीकारलेला असतो. माझे
म्हणणे एकच की वेगळ्या विश्वात जाण्यासाठी केवळ मद्यपान हाच एक मार्ग
नाही, संगीत, भटकंती, चित्रकला अशा अनेक मार्गांचा आधार आपण घेवू शकतो. हे
पर्याय प्रथम अवलंबिण्याचा त्यांनी प्रयत्न करावा. मला खटकणारा मुख्य
मुद्दा म्हणजे घरगुती समारंभात ह्या मद्यपानाचा प्रवेश. ही सर्व दर्दी
मंडळी एका वेगळ्या बैठकीच्या खोलीत जावून हा कार्यक्रम करतात. त्यामुळे
सर्व लोक एकत्र येण्याची जी संधी होती ती गमावली जाते. घरात मद्यपान करणे
हा पुढील पिढीसाठी आपण एक सर्वमान्य शिरस्ता करून ठेवत आहोत हे मला खूपच
खटकते. दुर्दैवाने ह्या प्रथेला विरोध करणारी फार कमी अधिकारी मंडळी आता
शिल्लक राहिली आहेत.
ह्या लेखात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ह्या विषयावर एक खुली चर्चा व्हावी हाच एक उद्देश!
ह्या लेखात कोणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही. ह्या विषयावर एक खुली चर्चा व्हावी हाच एक उद्देश!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा