आयुष्यात एका वळणानंतर मनुष्याच्या जीवनातील संपत्ती, नुसता बुद्ध्यांक (IQ) ह्यांचं महत्त्व अग्रस्थानावर कायम राहत नाही. काही सन्माननीय अपवाद वगळले तर ह्या वयात तुम्ही काहीतरी नेत्रदीपक करून दाखविण्याची शक्यता मावळू लागलेली असते. पस्तिशी - चाळिशीनंतर कुठंतरी आयुष्यातील उभारीचा काळ संपल्याची जाणीव मनात डोकावू लागते. मग सुरु होतो आपल्या जीवनाचा, भोवतालच्या परिस्थितीचा एका वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेण्याची धडपड. ह्या संदर्भातील काही मुद्दे.
१. ह्या वयातील व्यावसायिक, वैयक्तिक जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात. आपण स्वतःच्या हुशारीवर, श्रीमंतीवर सर्व काही निभावून नेऊ शकतो हा अट्टाहास चुकीचा ठरू शकतो. त्यामुळं माणसं जोडून ठेवायला हवीत. आपली तत्त्वं आणि माणसं जोडून ठेवण्याची गरज ह्यातील सुवर्णमध्य साधता यायला हवा. तत्त्वांशी विशिष्ट प्रमाणाबाहेर केलेली तडजोड संवेदनशील माणसाला त्रासदायक ठरू शकते. इथं आपल्या भावनिक बुद्ध्यांकाची कसोटी लागते. त्रासदायक अशी तडजोड काही केल्यांनतर त्या परिस्थितीतून किती झटकन तुम्ही बाहेर येऊ शकता हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकावर अवलंबून असते.
२. व्यावसायिक, वैयक्तिक जीवनात तुमची कर्तव्यं असतात. ह्या कर्तव्यांना संबंधित अशा सर्व घटनांवर आपल्याला पूर्ण लक्ष द्यायचं असतं. एकलव्य बनायचं असतं. पण त्याच वेळी तुमच्या जीवनात घडणाऱ्या इतर घटनांमध्ये तुमची उपस्थिती, तुमचा सक्रिय सहभाग असतो. आपला दिवस, सप्ताह, महिना ह्यांचं एका काल्पनिक कागदावर चित्र आखून कर्तव्यं आणि त्या पलीकडील असलेल्या आयुष्याला त्यावर योग्य ते स्थान देणं हे तुमच्या भावनिक बुद्ध्यांकाचं महत्वाचं काम ! हे चित्र योग्य कालावधीनंतर बदलत राहतात. 'और क्या ऐहदे वफा होते हैं, लोग मिलते हैं जुदा होते हैं' प्रकार घडत राहतात.
३. हल्ली बरीच माणसं आयुष्यात काहीच घडलं नाही की निराश होतात. ह्या निराश होण्यासाठी काहीच न घडण्याचा कालावधी अगदी काही तासांपासून सुद्धा सुरु होऊ शकतो. इथं आपले संस्कार कामी येऊ शकतात. गॅजेटपासून तुम्ही जितकं दूर राहाल तितकं तुम्हांला स्वत्व गवसेल आणि एकदा का स्वत्व गवसलं की नैराश्यापासून दूर राहायला तुलनेनं सोपं जाईल. आपल्या शहरातील मोकळ्या जागांचा अभाव हा मोठ्या चिंतेचा विषय तो ह्याच कारणास्तव! ह्या अभावामुळं लोक घरात कोंडून घेऊ पाहताहेत किंवा महामार्गावर गाड्या घेऊन वाहतूककोंडीत भर घालीत आहेत.
४. आयुष्यात दीर्घकालीन आणि तात्कालिक ध्येयं असतात. त्यातही तुमची वैयक्तिक आणि संघटनेची ध्येयं असतात. सतत बदलणाऱ्या भोवतालच्या परिस्थितीत सर्वांना सोबत घेत जाऊन ह्या ध्येयांच्या विविध छटांना न्याय देण्यासाठी आवश्यक असणारा गुणधर्म म्हणजे भावनिक बुद्ध्यांक !
५. आयुष्याच्या उत्तरार्धात सर्वशक्तिमानाशी मिसळून जाण्याची प्रक्रिया जमेल तितकी लवकर सुरु करण्याची प्रगल्भता म्हणजे तुमचा भावनिक बुद्ध्यांक. ह्यासाठी देवांचे नामस्मरण करणे, स्वाभिमानाला योग्य ठिकाणी मुरड घालणे, सखोल वाचनात स्वतःला झोकून देणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.
६. गावात वास्तव्य करणाऱ्या लोकांचा भावनिक बुद्ध्यांक पाहून मी नेहमीच अचंबित होत आलो आहे. जीवनातील विविध घटनांकडे तटस्थपणे पाहण्याची प्रगल्भता ह्यातील बऱ्याच लोकांकडे असते. निसर्गाची असलेली जवळीक ह्यात मोठा हातभार लावत असावी असा माझा कयास. म्हणूनच पोस्टमध्ये एका डेरेदार वृक्षाचं छायाचित्र! पोस्टशी अजिबात संबंध नसणारी छायाचित्रं पोस्टमध्ये बिनधास्त जोडून देणे ही माझी सवय !
कालच्या वसई भेटीत घरच्या जाणकार मोठ्या लोकांसोबत केलेल्या चर्चेचा ह्या पोस्टमध्ये मोठा सहभाग आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा