मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

शनिवार, ३० जून, २०१८

वसंतास पत्र!




चि. प्रिय वसंतास,
सप्रेम आशिर्वाद. 

तुझं कॉलेज सुरु होऊन एव्हाना एक महिना होत आला. आताशा तुझं तिथं नीटसं बस्तान बसलं असावं. हल्लीच्या काळात पत्रलेखनाचा प्रकार मागे पडला आहे.  त्यामुळे हॉस्टेलवर माझे हे पत्र बघुन तुझ्या मित्रमंडळींना काहीसं आश्चर्य वाटण्याची शक्यता आहे. मी सध्या भ्रमणध्वनीचा वापर कसा करायचा हे शिकण्याच्या प्रयत्नात आहे. ते जमलं की मी तुला नक्कीच त्या माध्यमातून संपर्क करीन. परंतु पत्रलेखनाचा गोडवा काही वेगळाच! या माध्यमातुन ज्या व्यक्तीने आपल्याला पत्र लिहलं आहे ती व्यक्ती आपल्या जवळपासच वावरत आहे असा भास होतो. 

इथं यंदाच्या वर्षी पावसाला उत्तम सुरुवात झाली आहे. आपल्या शेतात सुद्धा पेरणीची कामं जोराने चालू आहेत. पावसानंतर कोकणातील विहंगम निसर्गाची तुला नक्कीच आठवण येत असावी. परंतु तु ज्या कार्यासाठी ज्या ध्येयाचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आला आहेस त्यावर तु लक्ष केंद्रित केलं आहे असा तर्क आम्ही काढला आहे. तु तसा जिद्दी आहेस आणि ह्याचा आम्हांला अभिमान आहे! 

मुंबईमध्ये पावसाळ्यात विविध प्रकारचे रोग थैमान घालतात. लेप्टोस्पायरोसिस, डेंगू यासारखे आजार हे अस्वच्छ पाणी आणि मच्छर यांच्या उपद्रवामुळे होतात. त्याविषयी थोडी जाणीव बाळगणे आणि काळजी घेणे हेच सर्वात उत्तम!! साचलेल्या पाण्यातून पायी चालणे टाळणे उत्तम! मच्छरदाणी लावणे हा काहीसा जुनाट प्रकार मानला जात असला तरी सुद्धा डासांपासून संरक्षणांसाठी हा उपाय उत्तम आहे. मित्रमंडळींना मच्छरदाणीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित कर! आपल्या भोवतालच्या मंडळींना एखाद्या योग्य गोष्टीसाठी प्रवृत्त करणे ही कला भविष्यातील आयुष्यात तुला उपयोगी पडेल. 

शहरातील महाविद्यालयातील शिक्षणपद्धती हे आत्तापर्यंत तू अनुभवलेल्या शिक्षणाच्या पद्धतीपेक्षा काहीशी वेगळी असणार. तिच्याशी जमवून घेण्यासाठी थोडा वेळ लागला तरी हरकत नाही. आपल्या भोवतालच्या मित्रमंडळींसोबत आपण ज्या गोष्टीत काहीसे अडखळलो आहोत त्या गोष्टींविषयी चर्चा करण्यास करण्यात काहीही गैर नाही. याप्रकारे आपण वैचारिक वैविध्य अनुभवतो आणि एखादा चांगलं उत्तर मिळण्याची शक्यता वाढीस लागते!

बारावीनंतर अभियांत्रिकी क्षेत्राकडे वळण्याचा कल तू दर्शविला आहेस.  खरं सांगायचं तर या विषयात मला फारसं काही कळत नाही. शेजारचे जंजिरे गेल्या रविवारी घरी आले होते. त्यांचा मुलगा पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजातून शिक्षण पूर्ण करून नोकरीस लागला आहे. त्यांनी चर्चेमध्ये काही उत्तम गोष्टींचा उल्लेख केला. सध्याची परिस्थिती पाहता कोणती  एक अभियांत्रिकी शाखा पुढील अनेक वर्ष मागणीत राहील असं छातीठोकपणे कोणीच सांगू शकणार नाही असं ते म्हणाले. परंतु एक गोष्ट मात्र खरी आपण जी कोणती शाखा निवडू त्यात सर्वोत्तम होण्याचा प्रयत्न कर! हा दृष्टिकोनच तुला आयुष्यात उपयोगी पडेल!!

तुझ्या आयुष्यातील पुढील काही वर्षे महत्वाची असणार आहेत. तसं म्हणायला गेलं तर सर्वांना आयुष्यभर मेहनत करावी लागते परंतु महाविद्यालयीन जीवनात केलेली मेहनत तुम्हाला तुला एका योग्य दिशेने प्रवास सुरू करण्यास मदत करु शकते. मी माझं पुर्ण आयुष्य शेतीमध्ये घालवलं आहे. कोकणासारख्या निसर्गरम्य परिसरात शेती उद्योगांवर उपजीविका करण्यासारखा आनंद नाही. आपल्या गरजा मर्यादित ठेवल्या की जीवन सुंदर भासू शकते. ही झाली जीवनाकडे बघण्याची एक दृष्टी! दुसऱ्या दृष्टीने पाहायचं झालं तर कोकणापासून काही तासांच्या अंतरावर मुंबईसारखी सर्व प्रकारच्या उत्कर्षाच्या संधी  उपलब्ध करून देणारी महानगरी आहे. या शहराने उपलब्ध करून दिलेल्या संधींचा वापर करुन आपल्या आयुष्याला कलाटणी देता येते. कोकणातील आयुष्य की मुंबईतील आयुष्य याविषयीचा निर्णय तू तुझ्या आयुष्याच्या विविध वळणांवर घेऊ शकतोस.  परंतु एकंदरीत शिक्षण प्राप्त करून घेतल्यानंतर जर  तू हा निर्णय घेतला तर ते योग्य राहील असं माझं वैयक्तिक मत!

मुंबई शहर तुझ्यासमोर असंख्य आकर्षणे उभी ठेवेल. ह्या आकर्षणांपासून दूर राहून आपलं कर्तव्य बजावणं हे काही प्रसंगी कठीण होऊ शकते. या गोष्टीमध्ये आपली संगत महत्त्वाची भूमिका बजावू शकते. तू आता मोठा झाला आहेस आणि तुझ्या प्रत्येक निर्णयात आमचा सहभाग असावा असे आम्ही बंधन घालून देणार नाही. परंतु ज्या क्षणी तुला आमच्या सल्ल्याची आवश्यकता वाटेल त्यावेळी नक्कीच आम्ही तुझ्यासाठी उपलब्ध असू. 

आईला तुझी खुप आठवण येते. फोनवरुन तुझा आवाज ऐकून तिचं थोडफार समाधान होतं. जेवणाची व्यवस्थित काळजी घेत रहा. बाहेर कितीही चमचमीत पदार्थ उपलब्ध असले तरी ते वारंवार खाऊ नयेत.  आपल्या तब्येतीचे बरेचसं नियंत्रण आपला आहार करतो. त्यामुळे नियमित आहार ठेवत जा. पावसाळ्यामध्ये उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळत जा. आपल्या गावाकडे रात्री लवकर झोपून सकाळी अभ्यासाला उठण्याची तुझी सवय आहे.  ती सवय जमेल तितकी चालू ठेव.  अभ्यासासाठी सकाळच्या वेळेसारखी प्रसन्न वेळ नाही. ह्या वेळी एकाग्रता सुरेख होते. ही सवय मुंबईत चालू ठेवण्यासाठी तुझ्या रुम पार्टनरच्या अभ्यासाच्या वेळा त्याच्याशी मिळतीजुळत्या असणं काहीसं आवश्यक असतं. याबाबतीत आवश्यक असल्यास त्याच्याशी चर्चा कर. काही बाबतीत आपण बदलायचं आणि काही बाबतीत त्याला बदलाची विनंती करायची. 

मुंबईतील गणेशोत्सव हा फार नावाजलेला आहे. हा गणेशोत्सव पाहण्यासाठी दुरवरुन लोक येतात. तुझ्या मनातसुद्धा मुंबईतील गणेशोत्सवाविषयी उत्सुकता असेलच. आपल्या कोकणात सुद्धा थोड्या दिवसातच गणपतीचे वारे वाहू लागतील. तुझ्या महाविद्यालयाला गणपतीच्या काळात पाच-सहा दिवस सुट्टी असावी अशी आम्हाला आशा आहे.  तसे असल्यास तु गावाला यायचा प्रयत्न कर. 

सतत अभ्यास करुन जर कंटाळा आला तर मित्रांसोबत मुंबईदर्शन सुद्धा कर! मुंबई ही एक मोठी नगरी आहे आणि त्यात पाहण्यासारखी अनेक ठिकाणे आहेत. 

बाकी आम्ही सर्व ठीक आहोत. मी ज्यावेळी शहरात शिकण्यास गेलो होतो त्यावेळी मनीऑर्डरची वाट पाहायचो. हल्ली तो प्रसंग येत नाही.  तरीसुद्धा कधी अचानक पैशाची गरज लागली तर तसे कळव! मी भ्रमणध्वनीच्या शिक्षणामध्ये पैसे नेट बँकिंगच्या माध्यमातून हस्तांतरित करण्यास शिकत आहे. 

तु सुद्धा आम्हाला पत्रांना उत्तर द्यायचा प्रयत्न कर !


सर्व मित्रमंडळींना प्रणाम व आशीर्वाद.
रत्नाकर !



रविवार, २४ जून, २०१८

मनःशांती



मान्सुनपुर्व पावसाच्या सरी आणि खरा मान्सुन यांच्यातला गोंधळ काल संपला असावा. ज्याप्रकारे पाऊस पडत होता त्यावरुन खरोखरीच्या मान्सुनला काल सुरुवात झाली असावी असं म्हणायला हरकत नाही. वातावरणात छानसा गारवा आला होता आणि त्यामुळे मन शांत काहीसं झालं. आणि मन शांत झालं की मग चांगले विचार येतात.  थंडावा अनुभवताना मागच्या डिसेंबरातील अमेरिकावारीची आणि तिथल्या थंडाव्याची आठवण झाली. 

२००१ ते २००७ या कालावधीत बराचसा वेळ अमेरिकेत व्यतित केला होता. २००५ नंतर व्यवस्थापकीय भूमिका बजावताना काही जेष्ठ अमेरिकन व्यवस्थापकांशी जवळून संपर्क आला होता. या सर्वांची दैनंदिन जीवनशैली ऐकून आणि काही प्रमाणात प्रत्यक्षात बघून थोडीफार समजून घेतली. या सर्वांतील महत्त्वाचा घटक म्हणजे ही लोकं जमेल तितका जीवनात शांतपणा ठेवण्यासाठी प्रयत्न करतात असं मला वाटलं. आधी म्हटल्याप्रमाणे हे सर्व जेष्ठ अमेरिकन व्यवस्थापक असल्यामुळे त्यांच्या बाबतीत आलेला अनुभव खरोखर संपुर्ण अमेरिकन जीवनसरणीचे प्रतिनिधित्व करेल असं मी म्हणणार नाही.  तरीदेखील त्यांच्या काही गोष्टी मला खूप आवडल्या.  सकाळी आठ वाजताच्या सुमारास ऑफिसात पोहोचणार. आठ ते चार किंवा आठ ते पाच या वेळात झपाटून गेल्यासारखं काम करणार आणि मग पाच वाजता उगाचच ऑफिसात न रेंगाळता थेट आपल्या घरी पोहोचणार. शांतपणे सहा-साडेसहा वाजता रात्रीचे जेवण आटपून निद्राधीन होणार ही अशी त्यांची जीवनशैली होती. हे सर्व आठवण्याचं कारण म्हणजे डिसेंबरातील अमेरिका भेटीत कोलंबस इथे माझ्या अमेरिकन व्यवस्थापकासोबत मी एका हॉटेलात थांबलो होतो.  त्याच्याबरोबर ऑफिसात जाण्या-येण्याची सोय असल्यामुळे औपचारिकतेची काही पुटं काही काळापुरता गळून पडली होती.  त्यामुळे रात्रीच जेवण सुद्धा त्याच्यासोबत एक-दोन वेळा हॉटेलात घेतले.  त्यावेळी सहा-साडेसहा वाजताच्या रात्रीच्या जेवणाची पुन्हा एकदा आठवण झाली आणि ते अनुभवलं सुद्धा!! आणि त्या भागातील हवामान सुद्धा ह्या शैलीला अनुकूल होते. संध्याकाळी पाच वाजता अंधार होत असल्यामुळे आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे लवकर झोपण्यासाठी अत्यंत अनुकूल वातावरण निर्माण होत असे. 
आता हे सर्व अनुभवताना शांततेसोबत एका श्रीमंतीचासुद्धा अनुभव येतो. ही सर्व उच्च दर्जाची हॉटेल्स, तिथे उपलब्ध असलेल्या उच्च दर्जाच्या सोयीसुविधा, हॉटेल्सच्या रेस्टॉरंटमध्ये पार्श्वभूमीवर वाजणारे  मंद असे संगीत ह्या सर्वांमुळं एकंदरीत आपल्याला जीवनाविषयी बरं वाटायला लागतं. आपण आपल्याला काहीसे कोणीतरी समजायला लागतो. अशावेळी मग एखादा जिवलग मित्र आपल्या गावापासून हजारो मैलावर भेटतो आणि मग गप्पा रंगतात. 

ह्या सर्व गोष्टींमुळे मग २००७ सालापर्यंतच्या वास्तव्याची आठवण आली. 
वास्तव्याच्या काळात शेवटचे काही महिने एक संभ्रम निर्माण झाला होता. हे सर्व सुख महत्त्वाचे की आपले जिव्हाळ्याच्या लोकांमध्ये संघर्षाचे जीवन महत्त्वाचे. त्यावेळी भारतात परतण्याचा निर्णय घेतला होता तो योग्य की अयोग्य हे ठरवण्याचा इथे प्रयत्न करणार नाही. परंतु तिथलं हे सुख एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आम्हांला झेपलं नव्हतं हेच खरं!

आता वळुयात ते कालच्या विचारांकडे!! पावसाने निर्माण झालेल्या थंडाव्यात मन बराच विचार करत होतं. आपल्याकडे वातावरणात थंडावा नसतो, सर्वच धूळ असते, सर्वत्र गर्दीचे वातावरण आहे, ट्रॅफिक जॅम असतात आणि आपल्या कार्यालयीन वेळा खूप रात्रीपर्यंत असतात.  आपण संध्याकाळी साडेसहा वाजता रात्रीच्या जेवणाऐवजी दिवसातला चौथा पाचवा चहा ढोसत असतो. या सर्व घटकांमुळे आपलं मन एका विचलित स्थितीत जात असावं. त्यामुळे रात्री नऊ-दहा वाजता घरी परतल्यावरसुद्धा एकदम शांत स्थितीत जाण्यास हे मन तयार नसतं. आपण वायफाय वापरून डेटा अधाशासारखा भक्षण करीत राहतो. आपल्या वार्षिक सुट्ट्यासुद्धा दूरच्या ठिकाणी असतात. जिथे पोहोचेपर्यंत आपण फार मोठी कार्बन फूटप्रिंट निर्माण करतो. प्रत्यक्ष निसर्गाच्या सानिध्यातील आपले क्षण फार कमी असतात. 

हे सर्व विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे आपण आपल्या मनाला शांततेचे फार मोजके क्षण देत असतो. आपण ज्या प्रकारची शहरातील जीवन संस्कृती गेल्या काही वर्षात विकसित केली आहे, ती एक समाज म्हणून आपल्या प्रगतीच्या या टप्प्यापर्यंत ठीक होती. परंतु समाजातील ज्या लोकांनी प्रगतीचा हा टप्पा गाठला आहे त्या लोकांनी दैनंदिन जीवनात मनःशांतीचे क्षण कसे आणता येतील याचा विचार करणे आवश्यक आहे. ही भोगवादी संस्कृती एका धोकादायक वळणाकडे पोचत आहे. आक्रस्ताळेपणाने बातम्या देणारे निवेदक, सहावा चेंडू टाकला जात नाही तितक्यात झपाट्याने आपल्यावर जाहिरातीचा मारा करणाऱ्या वाहिन्या या सर्व गोष्टी या जगात सर्वत्र अस्तित्वात नाहीयेत त्या आपणच विकसित केल्या आहेत आणि आपण त्या अजुन भयानक रुपाकडे नेत आहोत.  

पाऊस पडला, वातावरणात थंडावा आला की तेलकट, तिखट खाऊन मदिराप्राशन हा एक उपलब्ध पर्याय असला तरी मंद दिव्याच्या प्रकाशात शांत शास्त्रीय संगीत ऐकणं हा सुद्धा एक पर्याय असु शकतो ह्याची जाणीव ठेवा. मनाला शांत क्षणांची सवय असु द्यात नाहीतरी कायमस्वरूपी मानसिक अस्वास्थाकडे आपली वाटचाल अटळ आहे. 

अमेरिकेच्या मागील भेटीतील काही शांत क्षण!! 




































शनिवार, २३ जून, २०१८

भाग्यपरिवर्तन



सरकारने कायदे बनवायला सुरु केल्याच्या काळापासूनचे सर्व कायदे पाळण्याची जबाबदारी आपली आहे असे मानणारा वर्ग महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. साधारणतः सरकार जे काही कायदे बनविते त्यांचा आणि सर्वसामान्यांचा क्वचितच संपर्क येतो. परंतु २३ जून २०१८ हा दिवस मात्र येणाऱ्या भविष्यकाळात सर्वांच्या लक्षात राहणारा असेल. गेले एक दोन पिढ्या बाजारात जाताना लागलेली प्लॅस्टिक बॅग्सची सवय आता मोडुन काढावी लागणार आहे. 

माणसं बाजारात जाताना भाजी खरेदी आणि मासे मटण खरेदी अशी दोन उदात्त ध्येयं डोळ्यासमोर ठेवून जातात. भाजीखरेदीच्या वेळी निर्माण होणारा पेचप्रसंग कप्पेवाली कापडी पिशवी बनवुन किंवा घरी येऊन भाज्यांचे वर्गीकरण करुन सोडवता येण्यासारखा आहे. परंतु मासे -मटण खरेदीसाठी थेट कापडी पिशवी वापरणे व्यवहार्य नाही. अशावेळी घरोघरी चिकन, मटण , मासे ह्यांच्यासाठी वेगवेगळे डबे अस्तित्वात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भविष्यातील काही प्रसंगांचं हे काल्पनिक चित्रण. बहुतांशी प्रसंगात दोन शेजारणी आपल्या तिसऱ्या शेजारणीविषयी प्रत्यक्षात किंवा Whatsapp वर बोलत असल्याचं कल्पित करण्यात आलं आहे.   

१> 
पहिली शेजारीण - "अगं  ऐकलं का शेजारचे पाटील आज स्टीलचा मोठा डबा घेऊन गेले. दोन किलो चिकन मावेल त्याच्यात !" 
दुसरी शेजारीण - "आज पाव्हणे येणार असतील !!"

२> 
पहिली शेजारीण -  "त्या सावेंकडे म्हणे चिकन, मटण, माशाला एकच स्टीलचा डबा वापरतात."
दुसरी शेजारीण - "आमच्याकडं असला प्रकार नाही चालत ! आम्ही अगदी चिकन, मटण, कोळंबी, पापलेट सर्वांचे वेगवेगळे डबे बनविले आहेत !!"

३>  
पहिली शेजारीण -  " आज नेमके मी स्टीलचा डबा बाजारात न्यायचे विसरले. झाली ना मोठी पंचाईत !" 
दुसरी शेजारीण - "अय्या मग काय केलं?"
पहिली शेजारीण - "करणार काय!! मग काय बाजुला मस्त्यगंधा स्टील रेंटल एजन्सी मध्ये गेले ! आधार कार्ड क्रमांक देऊन प्रतिदिनी २५ रुपये भाड्यानं स्टीलचा डबा घेतला आणि मासे आणले!
दुसरी शेजारीण - "डबा चांगला आहे का?"
पहिली शेजारीण - "हो ना !! पण भरभक्कम डिपॉसिट घेतलं मेल्यांनी ! डब्बा परत नेऊन दिला की उरलेली रक्कम बँक खात्यात जमा होणार !

४> 
पहिली शेजारीण -  " अग काल कुलकर्णीकडचं बारसं कसं झालं?" 
दुसरी शेजारीण -  काहीसं फणकारून "झालं ठीक!" 
पहिली शेजारीण - "का ग!! काय झालं !"
दुसरी शेजारीण -  "अग रिटर्न गिफ्ट म्हणुन मीच पंडितांना दिलेला स्टील डब्बा काल मलाच परत मिळाला !!"

५> 
पहिली शेजारीण - "नाईकांनी म्हणे नवीन कार घेतली!"  
दुसरी  शेजारीण -  "का नाही घेणार? चार गाड्या घेतील आता!"
पहिली शेजारीण -  प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहते !!

दुसरी  शेजारीण -  "त्यांच्या जावयांचं स्टीलच्या डब्यांच्या विक्रीचे आणि भाड्यानं द्यायचं दुकान आहे !!

६> 
पहिली शेजारीण - "ती डिसोझा म्हणे हल्ली नवनवीन साड्या नेसून मासळीबाजारात जाते "  
दुसरी  शेजारीण -  "जाईल थोडे दिवस, येईल पुन्हा मार्गावर !"
पहिली शेजारीण -  प्रश्नार्थक चेहऱ्यानं पाहते !!
दुसरी  शेजारीण -  "दररोज फेसबुकावर फोटो टाकायचे असतात ना ! स्टेटससहित - "Buying Bombil in Steel Dabba, Also note my kanjivaram saree !!
पहिली शेजारीण -  "अरे मला कसं नाही सुचलं !! आताच तीन चार नवीन साड्या घेते मी !!"

थोडक्यात सांगायचं झालं तर पर्यावरणाच्या दृष्टीनं अत्यंत आवश्यक असणारा हा निर्णय आपल्या सामाजिक जीवनातसुद्धा बदल घडवून आणणार आहे. ह्या निर्णयामुळं काही आर्थिक संधी उपलब्ध होणार आहेत. कष्ट करण्याची तयारी असणाऱ्या युवकांनी ह्या संधीचा फायदा घ्यावा !

शुक्रवार, २२ जून, २०१८

दीर्घ पल्ल्यांची उद्दिष्टे!!


तुमच्या कळत नकळत तुमचं आयुष्य घडत असतं किंवा व्यतित होत असते. आयुष्य घडणे किंवा व्यतित होणे यामधील फरक काय असा विचार मनात येणं स्वाभाविक आहे. आयुष्य दोन प्रकार जगता येतं. पहिलं म्हणजे एक दीर्घ पल्ल्याचे उद्दिष्ट ठरवुन त्याचा पाठपुरावा करीत आयुष्य जगणं किंवा घडवणं आणि दुसरं म्हणजे आला दिवस घालवणं आणि अशी दिवसांची बेरीज करत आयुष्य व्यतित करणे. 
प्रत्येकाला दीर्घ पल्ल्याचे उद्दिष्ट असणं अनिवार्य नाही. तुम्ही आला दिवस जसा तुमच्यासमोर उभा ठाकेल तसा घालविणे यात आनंदी राहू शकत असाल तर त्यात काहीही चुक नाही. परंतु जर तुम्ही आला दिवस ढकलणे या पद्धतीने आयुष्य जगत असाल आणि त्यामुळे जर तुम्हाला खंत वाटत असेल तर मात्र तुम्हाला काहीतरी उपाय योजणे आवश्यक आहे. 

जीवनातील संघर्षाचे प्रमाण ज्यावेळी वाढत जाते त्यावेळी प्रत्येक दिवस यशस्वीरित्या पार पाडणे हेच एक मोठे दिव्य बनुन जाते.  त्यामुळे जीवनातील दीर्घ पल्ल्याची जी काही उद्दिष्टे आपण डोळ्यासमोर ठेवली असतात त्यांचा पाठपुरावा दैनंदिन जीवनात करणे जवळपास अशक्यप्राय होऊन जाते.  त्यामुळे बाह्य जगताने प्रभावित केलेल्या घटकांनी तुमचा दिवस निघून जातो. दिवसांचे परिवर्तन महिन्यांमध्ये, महिन्यांचे वर्षांमध्ये होत राहते आणि आयुष्यातील महत्त्वाची वर्ष कशी निघून गेली हे तुम्हाला समजत नाही. 

बाह्य जगतातील घटक हे तुम्हांला कशाप्रकारे प्रभावित करतात हे पाहणे मनोरंजक होऊ शकते. वानगीदाखल मुंबईतील एखाद्या व्यावसायिकाचे दैनंदिन आयुष्य पाहुयात. त्याचे आयुष्य प्रभावित करणारे तीन घटक असतात.  पहिलं म्हणजे त्याचं घर आणि सोशल मीडियावरील त्याचा अवतार. दुसरा घटक म्हणजे त्याचं घर ते कार्यालय हा प्रवास आणि तिसरा म्हणजे त्याचे कार्यालयीन आयुष्य. पहिल्या घटकांमध्ये असे आढळून येते की सोशल मीडियावरील तुमची थोडी देखील चांगली गोष्ट अगदी भव्यदिव्य रूपात प्रशंसित केली जाते आणि तुम्हाला कडवट गोष्टी आशा फारशा ऐकवल्या जात नाहीत. तुमच्या दैनंदिन प्रवासात तुम्ही एका महासागराचे भाग असतात आणि तिथे तुम्हाला वास्तवाची सदैव जाणीव करून दिली जाते. तिसरा भाग म्हणजे कार्यालयीन आयुष्य! इथं  तुम्हाला प्रशंसा कमी आणि परीक्षण जास्त असला प्रकार अनुभवायला मिळतो.  

आता दीर्घ पल्ल्याची उद्दिष्ट आणि हे तीन घटक यांचा संबंध काय असा विचार येण्याची शक्यता आहे. समजा तुमच्याकडे दीर्घ पल्ल्याची उद्दिष्ट शब्दरुपात बसवलेली आहेत तर तुम्ही पहिला टप्पा पार केला असे म्हणता येईल. दुसरा टप्पा म्हणजे तुमची या दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांप्रति असलेली निष्ठा!! दैनंदिन जीवनातील तुमच्या आसपास वावरणारा प्रत्येक घटक हा तुमची दीर्घ पल्ल्याच्या उद्दिष्टांप्रति असलेली निष्ठा विरळ करण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे या प्रत्येक घटकाला तोंड देऊन ज्या क्षणी तुम्हाला मोकळा वेळ मिळतो त्यावेळी दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांचे स्मरण करून त्यांच्या दिशेने अति सूक्ष्म का होईना परंतु एखादं पाऊल उचलणे आवश्यक आहे. एका मोठ्या समूहाचा भाग बनण्याची इच्छा मनात बाळगणे केव्हाही चांगले!! परंतु ही इच्छा बाळगत असताना आपण दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांप्रति असलेल्या आपल्या मनीषेला तिलांजली देत नाही आहोत ना याचा विचार ठेवणे करणे हे इष्ट ठरते! 

हे दीर्घ पल्ल्यांच्या उद्दिष्टांप्रति असलेल्या निष्ठेचे प्रकरण वाटते तितकं सोपं नाही. ही निष्ठा एका विशिष्ट मर्यादेपलीकडे गेली की मग तिचा ध्यास तुमच्या वैयक्तिक नातेसंबंधावर परिणाम करु शकतो. एखादा मोठा संशोधक, लेखक ह्यांची उदाहरणे पाहिली तर त्यांनी काही वेळा आपली वैयक्तिक आयुष्यं मागच्या शेगडीवर (Back burner वगैरे काय म्हणतात ते !) टाकलेली दिसतात. ह्या प्रवासात एका क्षणी ही व्यक्ती स्वप्रेमात पडून जाते !! 

अजुन एक महत्वाचा घटक! जग आणि जगातील संदर्भ इतक्या झपाट्यानं सध्या बदलत चालले आहेत की बऱ्याच तपस्येनंतर जेव्हा कोणी आपलं दीर्घकालीन उद्दिष्ट साध्य करतो त्यावेळी त्या उद्दिष्टयांचं माहात्म्य, संदर्भ ह्यांनी मुळ स्वरुपापासुन फारकत घेतली असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर असते. आणि त्यामुळं इतक्या मेहनतीनंतर, तडजोडीनंतर  समाधान वगैरे मिळण्याचा जो प्रकार असतो त्या बाबतीत काहीशी निराशा पदरी पडू शकते. 

एकंदरीत काय पैसा, समाधान, मानमरातब वगैरे गोष्टींची क्लिष्टता भयानक प्रमाणात वाढीस लागली आहे. ह्या बाबतीत किती डोकेफोड करायची ह्या बाबतीत आपल्या संकल्पना स्पष्ट ठेवणं फायद्याचं ठरु शकते.

गुरुवार, ७ जून, २०१८

वो शाम कुछ अजीब थी - भाग ३ विद्या सिन्हा



हिंदी चित्रपट संगीताचे काही खरोखरीचे जाणकार  रसिक असतात. मी अशा  जाणकारपणाच्या फार फार दूर आहे. उगाचच या विषयावर पोस्ट लिहून मी स्वतःला जाणकार समजु लागलो आहे असा कोणाचा (आणि माझाही) गैरसमज होता कामा नये, म्हणुन हे स्पष्टीकरण ! बाकी जरी मी सध्याच्या घडीला  जाणकार नसलो तरी ज्या वेगाने सध्या जाणकारपणाचं अवमुल्यन होत आहे, तो वेग पाहता पन्नास वर्षांनंतर लोक या ब्लॉगकडे पाहुन आदित्य पाटील हे हिंदी चित्रपट संगीताचे अत्यंत जाणकार व्यक्ती होते असे भाष्य करतील केवळ या आशेवर you tube च्या सहाय्यानं  एकेक कलाकारांना नजरेसमोर ठेऊन किंवा एखादी विशिष्ट थीम घेऊन मी या मालिकेचे एकेक पुष्प गुंफत आहे. आणि काही जणांच्या गतकालीन स्मृतींना उजाळा मिळत असल्यानं त्यांना ह्या पोस्ट्स आवडण्याची शक्यता वाढीस लागते. 
आजच्या पोस्टचा विषय आहे विद्या सिन्हा या गुणी अभिनेत्रीवर चित्रित केलेली काही गाणी! प्रत्येक क्षेत्रात काही अनाम वीर असतात. इंग्लिश मध्ये त्यांना unsung heroes संबोधण्याची प्रथा आहे. विद्या सिन्हा सुद्धा हिंदी चित्रपट सृष्टीतील मधील अशीच एक unsung  नायिका आहे. ह्या प्रकारात पद्माकर शिवलकर हे एक असेच नाव सदैव डोळ्यासमोर येत राहतं. तुम्ही कोणत्या काळात जन्मला आहात आणि त्या काळात एखादी महान व्यक्ती त्या क्षेत्रावर अनभिषिक्त सत्ता गाजवत असेल तर तुमच्या बाबतीत असं घडू शकतं. 

चित्रपटात नायकांना सहाय्यक अशी काहीशी, थंड वाऱ्याची सुखद झुळूक म्हणता येईल अशी भूमिका निभावण्यात विद्या सिन्हाचा हातखंडा होता.  संपुर्ण चित्रपट अथवा पडदा व्यापून टाकणाऱ्या भूमिका साकारणं हा तिचा केव्हाच प्रांत नव्हता. आता वळुयात विद्या सिंहाच्या गाण्यांकडे! तिचे अमोल पालेकर सोबतचे रजनीगंधा आणि छोटीसी बात हे चित्रपट गाजले. आणि त्यातली काही गाणी सुद्धा कायमची लक्षात राहण्याजोगी होती. 

जानेमन जानेमन तेरे दो नयन हे गाणं खरंतर चित्रित झालंय धर्मेंद्र आणि हेमामालिनीवर ! चित्रपटगृहात बसुन अमोल आणि विद्या हे गाणं पाहत असतात आणि मग स्वतःला बहुतेक त्या दोघांच्या जागी कल्पित असतात. ह्यात दोन प्रेमिकांचा खट्याळपणा टिपला गेला आहे.  

ह्या चित्रपटातील दुसरं लक्षात राहण्याजोगं गाणं म्हणजे न जाने क्यु होता हैं ये जिंदगी के साथ ! हिंदी चित्रपटातील गीतकार प्रेमी युगलांचे विविध भाव टिपण्यात कुशल आहेत. न जाने क्यु होता हैं गाण्यात आतापर्यंत न व्यक्त झालेल्या प्रेमाची कथा आहे. प्रेम स्वतःशी सुद्धा कबुल केलेलं नाही पण कोणाची गैरहजेरी मात्र बेचैनी निर्माण करत रहाते.  


रजनीगंधा फुल तुम्हारे हे गाणं, त्यातील भाव अतिसुरेख ! रजनीगंधाच्या फुलांचा सुगंध जसा वातावरणात दरवळत राहतो त्याचप्रमाणे माझ्या प्रियकराच्या आठवणी माझ्या मनात सदैव दरवळत राहतात आणि मला प्रसन्न ठेवतात. पुर्वीच्या काळातील नायिका स्वतःचे मन नायकांच्या प्रति समर्पित करीत असत.  माझ्या हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर नायकाचा अधिकार मी मान्य केला असं नायिका म्हणते. स्त्री मुक्ती संघटनांनी ह्या प्रकाराकडं लक्ष देऊन ही गाणी परत लिहून घ्यायला हवीत. 


तुम्हे देखती हूँ तो लगता हैं ऐसे हे देखील अत्यंत सुरेख गाणं ! इथं सुद्धा नायकाप्रती समर्पित होण्याची भावना गीतकारानं प्रकर्षानं मांडली आहे. अगर तुम हो सागर मैं प्यासी नदी हूँ ! वगैरे वगैरे 

ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए अंताक्षरी खेळताना ठ आल्यावर मदतीला येणारं हे गाणं!  गाण्यातील विशेष भूमिका उघड्याबंब संजीवकुमारची त्यामुळं विद्याला ह्या गाण्यात फारसा वाव नाही असं माझं मत !

समय तु धीरे धीरे चल - प्रेमात आकंठ बुडाल्यावर साऱ्या जगाने कालचक्रात पुढं निघुन जावं आणि आपण दोघांनी मात्र मागं थांबुन राहावं ह्या भावना सांगणारं हे गीत ! राजेश खन्ना आणि विद्यावर चित्रित केलं गेलेलं !

विद्या सिन्हा ! एक गुणी अभिनेत्री, शांतपणे आपल्या भुमिका निभावून जशी आली तशीच ह्या चित्रपटसुष्टीतून निघुन सुद्धा गेली! मात्र बासू चॅटर्जी आणि अन्य गीतकारांनी तिच्या व्यक्तिमत्वाला साजेशी अशी साधीसरळ, आशयघन गीते तिच्यासाठी लिहिली! 

(क्रमशः)

रविवार, ३ जून, २०१८

वो शाम कुछ अजीब थी - भाग २



एखादं गाणं आपल्याला का आवडतं ह्याचं विश्लेषण करणं हा खरंतर वृथा प्रयत्न करू शकतो. एखादं गाणं मनाला किंवा हृदयाला का छेडून जातं हे बराच वेळा आपल्याला सहजासहजी उमगलं नसतं. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न तुमची गणना कंटाळवाण्या माणसांत करू शकतो याची जाणीव असणे आवश्यक आहे. तरी देखील या संभाव्य धोक्याची जाणीव ठेवून आजची गाणी मी या भागात मांडत आहे.  

ही आवडलेल्या गाण्यांची शृंखला आहे हा एक मुक्तछंद प्रकार आहे! ठरवून इतके इतक्या पोस्ट मी लिहीन असा काही प्रकार यात असणार नाही. आजचा दुसरा भाग असला तरी त्यानंतरचा भाग कितीही दिवसाने महिन्यांनी अथवा वर्षांनीसुद्धा येऊ शकतो. 

पहिलं गाणं दिल की गिरह खोल दो !आता हे गाणं मी पहिल्यांदा सहावी-सातवीत असताना छायागीत कार्यक्रमात पाहिलं होतं.  त्यावेळी ते मनात कुठेतरी उमटून राहिलं असणार! कारण पुढे मोठं झाल्यावर अचानक हे गाणं पुन्हा एकदा ऐकल्यावर ते जबदस्त आवडलं. हे गाणं आवडण्यात पार्श्वभूमीवर वाजवली जाणारी संगीताची धून (prelude) हे महत्त्वाचं कारण आहे.  या गाण्यातील वातावरण काहीशी गूढतेची भावना निर्माण करतं असं मला वाटतं.  दोघांनाही एकमेकांविषयी प्रेमभावना निर्माण झाल्यावर पुढाकार कोणी घ्यायचा हे एका गीत स्वरूपात इथं नायिकेने काहीशा हळुवारपणे सांगितलं आहे. 

दुसरं गाणं म्हणजे ये दिल और उनकी निगाहों के साये! उत्तरेकडच्या बर्फाच्छादित डोंगराळ भागात चित्रीकरण केलेले आणि दिलीप कुमार वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित केलेले हे गाणं सुद्धा माझ्या मनात भरलं आहे. पुर्वीच्या काळात नायिका एकटीच निसर्गरम्य परिसरात किंवा नदीत बोट घेऊन फिरतेय आणि नायक लांबवरुन तिचा पाठलाग करत तिच्यापर्यंत पोहोचतो अशी गाणी बऱ्याच वेळा पहायला मिळायची. ह्या गाण्यातील शब्द बरेच अर्थसुचक आहेत. माझ्याभोवती तुझ्या नजरेचे घेरे पडले आहेत आणि बहुदा माझी त्यातुन सुटका होणं कठीणच आहे असे नायिका सुचवत असावी. 

एखादं गाणं आपण अगणित वेळा ऐकु शकतो. दो नैना और एक कहानी  माझ्यासाठी हे असंच एक गाणं आहे. आपल्या आईपासून अगदी छोट्या वयात दुरावल्या गेलेल्या जुगल हंसराजची जशी ही कहाणी आहे, त्याचप्रमाणे आपल्या नवऱ्याच्या अचानकपणे सामोऱ्या आलेल्या प्रेमप्रकरणामुळं दुखावल्या गेलेल्या शबाना आजमीची सुद्धा ही कहाणी आहे. या गाण्याचे शब्द अत्यंत सूचक आहेत. आईच्या आठवणीत अत्यंत बेचैन झालेल्या जुगल हंसराजला रात्री खूप बेचैन करीत असाव्यात. त्यामुळे एक रात्र संपून तिच्या आठवणींतून कसंबसं बाहेर येत असताना दुसरी रात्र उंबरठ्यावर धडकते. ही कहाणी नैनितालच्या झिलमध्ये सदैव वाहत राहते.  जुगल हंसराजच्या दिवंगत आईच्या मनातील ही गाणी कोणी ऐको वा न ऐको, अशीच ऐकवली जात आहे. काही लिखित स्वरूपात तर काही केवळ शाब्दिक स्वरुपात! आपल्या नवऱ्याचं काही रूप आपल्याला कळलेलं तर काही न कळलेलं!शबाना आझमी ही माझी शालेय जीवनातील आवडती अभिनेत्री तिच्या डोळ्यातील भाव आणि अभिनय केवळ अप्रतिम!!

अजून एक गाणं म्हणजे तुम इतना जो मुस्करा रही हो ! जगजीत सिंह ह्यांच्या गझलचे  निष्ठावान चाहते खूप आहेत. मी निष्ठावान चाहता नक्कीच नाही पण मला त्यांच्या काही गझलेतील शब्द खूप आवडतात.  आता ही गझल पहा ! 

डोळ्यात अश्रू आणि ओठावर हसू!!! तुझी खरी काय परिस्थिती आहे तू काय दाखवू पाहतेस!!
तू तुझे अश्रू जे आतल्या आत लपवु पहात आहेस.  ते एक दिवशी तुला अगदी विषाप्रमाणे त्रास देतील. 
 ज्या जखमांना काळाने भरून टाकलं आहे त्या आठवणींना तो उकरून का बाहेर काढत आहेस?
हे गाणं त्या दिवशीच्या कंपनीच्या कार्यक्रमात गाण्याचा मी अयशस्वी प्रयत्न केला. साथीला तीन चार जणांना कोरससाठी बोलावलं ! परंतु जे काय म्हटलं किंवा जितका काही म्हटलं त्यावर मी मनातल्या मनात खुश झालोय! या गाण्याच्या यशामध्ये अत्यंत अर्थपूर्ण शब्दांसोबत शब्दांमधील संगीत मोलाचा वाटा बजावतं !

पत्ता पत्ता बूटा बूटा हे अजुन एक आवडतं गाणं ! हा चित्रपट काही मी पाहिला नाही. परंतु गाण्यांच्या एकंदरीत शब्दावरून या दोन प्रेमिकांना दुनियेचा प्रचंड विरोध सहन करावा लागत आहे असं सूचित होतं. या गाण्याचं चित्रीकरण आणि संथपणे एका जागी बसुन प्रेमात रंगून गेलेल्या अमिताभ आणि जया यांना निसर्गरम्य परिसराच्या पार्श्वभूमीवरील पाहणं हा एक नयनरम्य आणि श्रवणीय अनुभव आहे. 

फजा भी है जवां जवां हवा भी हैं रवा रवा  हे सलमा आगाच्या आवाजातील आणि तिच्यावर चित्रित केलेलं गाणं मला असंच आवडतं. भारदस्त उर्दु शब्दांनी अलंकारित हे गाणं प्रेमात डुंबून गेलेल्या प्रेमिकांची मनस्थिती सांगतं. यातील काही काही शब्दरचना जबरदस्त आवडण्यासारख्या आहेत !

पुकारते हैं दूर से वो काफ़िले बहार के !
हर एक पल को ढूँढता हर एक पल चला गया !

प्रत्यक्षातील जीवनातील प्रेम केव्हांही इतकं रोमांचक नसावं! पण आपल्या शब्दांच्या जादूद्वारे ह्या गीतकारांनी आणि ह्या शब्दांमध्ये चपखल बसणाऱ्या संगीताच्या धुनीमुळे ही अजरामर झालेली काही गीतं ! 

पावसाळा जवळ येतोय ! असाच धुवांधार पाऊस पडावा आणि अशा कुंद वातावरणात अशीच सदाबहार गाणी ऐकत ह्या श्रुंखलेचा पुढील भाग लिहायची इच्छा व्हावी हीच आशा!

(क्रमशः )

भटकंतीचा महिना !

२६ जानेवारी ते २४ फेब्रुवारी ह्या २९ दिवसांत चांगलीच भटकंती झाली. त्यातील बहुतांशी प्रवास कामानिमित्त आणि एक जवळचा प्रवास शालेय स्नेहसंमेलना...