मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २९ मार्च, २०२६

मनाला काबुत ठेवताना !


खंबीर मनाची माणसं हल्ली पुर्वीइतक्या वारंवारतेने दिसत नाहीत किंवा माणसांची खंबीरता वारंवार आपल्यासमोर येत नाही. ह्या दोन्ही गोष्टींच्या अनुभवानं मन पुर्वी आपसुक शांत होत असे. हल्ली भोवतालच्या माणसांशी सखोल संवाद क्वचितच होतो. सखोल संवाद अपघातानं होत नाही. सखोल संवाद घडवून आणण्यासाठी जाणकार, जगाचा अनुभव घेतलेली माणसं बैठकीत असावी लागतात, त्यांना बोलतं करण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी लागते. अशा माणसांची कदर करणारा समुह भोवताली असावा लागतो. हल्ली अशा माणसांची कदर करण्याची वृत्ती आपण एक समाज म्हणुन झपाट्यानं गमावत चाललो आहोत. 

वर्तमानपत्रांचं समाजजीवनातील स्थान मला अजुनही खूप महत्वाचं वाटतं. ती समाजातील अगदी साध्या बातम्या देखील आपणापर्यंत पोहोचवत असतात. त्यात भोवतालच्या जीवनातील विज्ञान समजावुन सांगणारं सदर असतं, तिथं जुनी माणसं आपलं मनोगत अजुनही मांडत असतात. मोबाईल, संगणकाद्वारे आपल्यापर्यंत पोहचणाऱ्या बातम्यांमध्ये, सदरांमध्ये जुन्या लोकांची मतं क्वचितच आपल्यापर्यंत पोहोचत असतात. केवळ ह्या माध्यमांवर अवलंबुन राहिल्यास एका महत्वाच्या दृष्टिकोनाला आपण मुकत राहतो. 

हल्ली सामाजिक क्षेत्रातील वावर असणाऱ्या व्यक्तींच्या अधःपतनाच्या बातम्या आपणासमोर येत राहतात. सामाजिक माध्यमांची गरज म्हणुन अशा प्रकारच्या बातम्यांचा भडीमार आपल्यावर होत राहतो. मी ह्या बातम्यांना दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न करतो. ह्या घटना समाजजीवनात प्रथमच घडत नाहीयेत फक्त समाजमाध्यमं त्यांना आपल्यासमोर अतिउग्र रूपात सातत्यानं आणत आहेत. मला कोणाचं समर्थन करायचं नाहीये. पण जीवनात अजुन खूप तीव्र अशी दुःख आहेत, तिच्याकडं एकतर आपलं लक्ष नाही किंवा आपल्याला त्याविषयी काही वाटत नाही. 

जीवनाच्या संघर्षाला दररोज अजिबात कुरकूर न करताना सामोरी जाणारी माणसं आपल्याला दिसत राहतात. सफाळे - केळवा इथून दररोज सकाळी चार वाजताची ट्रेन पकडून सात वाजता बोरिवलीला ताज्या भाज्या घेऊन येणाऱ्या भाजीवाल्या असतात, त्यात सत्तरीला पोहोचलेली एक वृद्ध महिला देखील आहे. थंडी, पाऊस, दुपारचं ऊन ह्याविषयी कधीही तक्रार करताना मी तिला पाहिलं नाही. 

आपल्या नियंत्रणातील गोष्टींविषयीच फक्त वाईट वाटून घेण्याचा प्रयत्न करावा. ज्या नियंत्रणात नाहीत त्यांच्याविषयी नाही! ज्या व्यक्तींशी बोलुन चांगलं वाटतं, ज्या गोष्टी (अर्थात समाजातील चालीरीतीला अनुसरून) केल्यानं बरं वाटतं, ज्या ठिकाणांना भेट दिल्यानं बरं वाटतं, जे पदार्थ (योग्य) ग्रहण केल्यानं मन प्रसन्न होतं असं सर्व काही करावं. जी माणसं आपल्या आयुष्यात आनंद आणतात ते त्यांना योग्य प्रकारे सांगावं. 

एका विशिष्ट मर्यादेपलीकडे स्वप्रतिमेची फिकीर बाळगू नये. स्वानंद आणि स्वप्रतिमेची फिकीर ह्यात निर्णय घ्यायचा झाल्यास स्वानंदाला झुकतं माप द्यावं. फक्त एकच गोष्ट ध्यानात ठेवावी की आपला स्वानंद दुसऱ्या कोणाच्या पीडेला कारणीभुत न व्हावा. आपल्यापायी कोणाला पीडा होऊ शकतेय ह्याची जाणीव, हे समाजभान आपण दर्शवावं. 

साध्या साध्या गोष्टी नकारात्मकतेकडे झुकू पाहणाऱ्या मनाला थोपवू शकतात. सकाळी लवकर उठुन स्नान करून देवपूजा / भगवंताचं स्मरण करणं हे देखील मनाला बरं वाटुन देऊ शकतं. निसर्गाच्या सानिध्यात जे राहतात त्यांना निसर्ग भरभरून देत राहतो, त्यांच्या मनाची काळजी तो वाहत राहतो. निसर्गाअभावी आपल्या महानगरांचं, त्यातील माणसांचं काय होणार ह्याची चिंता मात्र मला सतावत राहते. वरणभात, भाजी, चपाती, (मांसाहारी असल्यास मोजकाच सामिष आहार), सायंकाळी लवकर आणि मोजकं जेवणं ह्या साऱ्या गोष्टी मनाला प्रसन्न ठेवण्यासाठी कारणीभूत असतात. 

सतत तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या, भ्रमणध्वनीला खिळून राहणाऱ्या माणसांचं मन त्याच्या शांत स्थितीपासून दीर्घकाळ दूर राहतं . त्याला पूर्ण शांतीची आवश्यक वेळ न मिळाल्यास  ते बेभान होण्याची शक्यता वाढीस लागते. 

ही पोस्ट लिहूनही उद्या मी माझ्या मनाला शांत ठेवू शकेन असे अजिबात नाही. फक्त मनाची सैरभैर परिस्थिती ही कायम राहणारी नाही, परिस्थिती बदलताच पुन्हा एकदा मनाला मी काबुत आणू शकेन इतका विश्वास पुन्हा नव्यानं देण्याचे काम मात्र ही पोस्ट जरूर करेल. 

(पोस्टमधील छायाचित्र माझ्या कार्यालयातील सहकारीच्या नालासोपारा येथील शेतात डिसेंबरात घेतलेलं ! अशा ठिकाणांना दिलेल्या भेटी मनाला दीर्घकाळ शांत ठेवतात )

शनिवार, २१ मार्च, २०२६

विमानाचा U टर्न





एअर इंडियाचे प्रवाशांनी भरलेले एक विमान गुरुवारी दिल्ली आणि व्हॅन्कुव्हर दरम्यान उड्डाण करत असताना मध्येच परत फिरवण्यात आले.  या मार्गावर Air India ला Boeing 777-300ER वापरण्याची परवानगी आहे, परंतु या विशिष्ट उड्डाणासाठी 777 चे चुकीचे मॉडेल (Boeing 777-200LR) वापरण्यात आले. उड्डाण केल्यापासून नऊ तासांनी बिचारे प्रवासी आपल्या मुळ उड्डाणस्थानी परतले. ह्या प्रवाशांना परत इमिग्रेशन तपासणीतून जाऊन हॉटेलात विश्रांती घेऊन मग योग्य मॉडेलचा वापर करून कॅनडाला परत पाठविण्यात आले. 

ही बातमी वाचल्यावर माझ्या मनात आलेले विविध विचार 

१ ) आखातातील सद्यस्थितीमुळं हे विमान पुर्व दिशेनं जात होते. पृथ्वी गोल असल्याचा किती फायदा होतो हे हल्ली आपल्याला जाणवत आहे. पश्चिम दिशेला काही प्रश्न उद्भवले की विमानं पुर्व दिशेनं आपल्या इच्छित स्थळी जाऊ शकतात. जर पृथ्वी आयतघनाकृती (आयताचे त्रिमितीय रूप) असती तर हे असे शक्य झाले नसते.  पृथ्वीच्या निर्मात्यानं किती दूरवरचा विचार करून ठेवला आहे हे अशा वेळी आपल्याला जाणवतं. 

२) ह्या विमानातुन कित्येकजण असे असतील ज्यांनी अगदी मिनिटामिनिटांचा हिशोब करून कॅनडामध्ये आपल्या पुढील भेटीचं नियोजन केलं असेल. त्यांचं सर्व नियोजन धुळीस मिळालं असेल. 

३) माझ्यासारखे काही लोकं विमानात Flight Map सुरु करून बसले असतील. विमानानं U टर्न घेतला आहे हे समजताच त्यांच्या मनात किती वादळं निर्माण झाली असतील. अजून एक शक्यता म्हणजे एखादा प्रवासी उड्डाण केल्यापासुन दोन तीन तासांनी आपलं ठिकाण कुठं आहे ह्याची खातरजमा करून झोपी गेला असेल, तो / ती  काही तासांनी जागा / जागी  झाल्यावर आपण परत त्याच ठिकाणी आहोत हे समजल्यावर त्यांच्या मनात किती गोंधळ निर्माण झाला असेल. 

४) माहिती आणि तंत्रज्ञान आणि बहुतांश सर्वच क्षेत्रात Production Issue झाल्यावर प्रथम त्या परिस्थितीचं निराकरण केल्यानंतर मूळ कारण विश्लेषण बैठक बोलावली जाते. ह्या बैठकीत ह्या चुकीचं मुळ कारण नक्की कुठं आहे ह्यावर उहापोह केला जातो. कोण्या एका व्यक्तीच्या चुकीमुळं इतका मोठा गोंधळ होत असेल तर चूक त्या व्यक्तीची नसुन ती व्यवसाय प्रक्रिया निर्माण करणाऱ्या व्यवस्थापनाची असते हे मुलभूत तत्त्व. ह्या चुकांपासून शिकुन ही व्यवसाय प्रक्रिया अधिकाधिक प्रगल्भ करावी लागते. 

५) आता ह्या घटनेसाठी सुद्धा नक्कीच मूळ कारण विश्लेषण बैठक बोलावली जाईल. त्यात नक्की कोणते मुद्दे चर्चिले जातील हे जाणुन घेण्यासाठी मी उत्सुक राहीन. पण माझ्या कल्पनाशक्तीनुसार खालील कारणे असु शकतात. 

अ.  जसं एस. टी. स्टॅण्डवरील कर्मचारी बस क्रमांक MH 4756 कोल्हापूर, MH 3027 सातारा अशा प्रकारे वेगवेगळ्या एसट्या विविध मार्गावर पाठवत असतो, त्याचप्रमाणे दिल्ली विमानतळावर बसलेला कर्मचारी विविध मार्गांवर विमानांना पाठवत असावा. बहुतेक त्याच्या चष्म्याचा नंबर चुकीचा असल्यानं Boeing 777-300ER ऐवजी त्यानं Boeing 777-200LR विमानाकडं पाहुन त्या विमानास कॅनडाला जाण्यास परवानगी दिली. 
ह्यावर खालील प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येतील.
१. विमान वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा चष्मा नंबर वेळच्या वेळी तपासुन घ्यावा. अधिक खबरदारी म्हणुन दोघा जणांनी मिळून विमानाचा मॉडेल नंबर तपासून मगच त्याचे वाटप करावे. 
२. चार तासांचं उड्डाण झाल्यानंतर परत फिरण्याऐवजी अधिकारी व्यक्तींनी कॅनडाच्या अधिकारी व्यक्तींशी बोलणी करून अपवादात्मक परिस्थिती म्हणुन Boeing 777-200LR ला कॅनडामध्ये प्रवेश करण्यास एकदाच परवानगी देण्याची विनंती करावयास हवी होती. अशी विनंती प्रत्यक्षात केली गेली असल्यास जर ती का फेटाळली गेली असेल त्या फेटाळण्याचं सुद्धा मूळ कारण विश्लेषण केलं गेलं पाहिजे. 
३. कॅनडाला Boeing 777-200LR च्या नावाविषयी अंकशास्त्रानुसार काही समस्या असल्यास त्याचं निराकरण करण्यात यावं. किंवा त्यातील तांत्रिक बाबीविषयी काही उणिवा असल्यास त्यांचं निराकरण करावं. 
४. ह्या समस्यांचं मुळ भारत - कॅनडा देशांमधील ताणलेल्या राजनैतिक संबंधांशी निगडित असल्यास ते सुधारण्यावर लक्ष केंद्रित करण्यात यावं. 

वाचकांपैकी कोणाला ह्या बैठकीची आतल्या गोटातील बातमी मिळाल्यास मला ती कळवावी. बाकी ह्या घटनेतून निष्पन्न झालेल्या सकारात्मक गोष्टी - 
१. वैमानिकानं स्थिरमनाने आकाशातील वाहतुकीचे सर्व नियम पाळत U टर्न घेतला.  अवकाशातील विमानांची वाढती संख्या पाहता हळूहळू अशा U टर्न घेणाऱ्या विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं भविष्यात अवकाशात वाहतुक पोलीस ठेवावेत. 
२. आतापर्यंत ह्या विमानातील कोणत्याही प्रवाशाने तक्रार केल्याचं वाचनात आलं नाही. बातमीत असंही म्हणण्यात आलं होतं की पश्चिम दिशेनं आखातातून जाणारे प्रवाशी आपल्या प्रवासाला उशीर होईल, विमान परत फिरेल ह्या शक्यतांच्या  अशा मानसिक तयारीतच असतात. पण पूर्व दिशेनं जाणाऱ्या प्रवाशांची मात्र अशी मानसिक तयारी नसते. मी हे वाचून धन्य झालो. ह्या पुढं पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व दिशेला जाणाऱ्या विमानांतील सर्व प्रवाशांनी अशा शक्यतांची तयारी ठेवावी.  जगाचं पुढं काय होईल कोणास ठावूक ?

शनिवार, ७ मार्च, २०२६

२०२६ फ्रेब्रुवारी - अमेरिका दौरा

गेल्या शनिवारी दोन आठवड्यांच्या अमेरिका भेटीनंतर मी मुंबईत परतलो. ह्या भेटीचा संक्षिप्त वृत्तांत. जाणकारांच्या माहितीसाठी - कामासंबंधित कोणतीही माहिती ह्या ब्लॉगमध्ये देता येत नसल्यानं हा माणुस केवळ फिरायला जातो की काय असा आपला (गैर) समज होत असल्यास त्यात आपली काही चूक नाही. मी फक्त इतकं स्पष्टीकरण देऊ इच्छितो की मी तिथं जाऊन कामंही करतो. 

सदैव ब्रिटिश एअरवेजने जाणारा मी!  ह्यावेळी मात्र मी इथीहाद ह्या विमानकंपनीच्या विमानानं अबुधाबी मार्गे प्रवास केला. इमिरेट्सची बिझनेस क्लासमधील निर्विवादपणे सर्वोत्तम! अगदी एक - दोन वर्षापूर्वी इथीहाद त्याच्या जवळपास सेवा देत असे असं जाणकार सांगतात. पण माझी मात्र ह्या संपुर्ण प्रवासात घोर निराशा झाली. सेवेमधील तत्परता, जेवणाचा दर्जा ह्या बाबतीत नक्कीच सुधारणेस वाव आहे. मदिरापान हे आपलं क्षेत्र नसल्यानं त्याबाबतीत मी काही बोलु शकत नाही. 

ब्रिटिश एअरवेजचे विमान सकाळी दोन वाजताचे. घरातुन दहा वाजता निघाल्यावर घरची मंडळी झोपायला तयार. मुंबई ते लंडन नऊ तास तर लंडन ते फिलाडेल्फिया सहा तास अशी प्रवासाच्या दोन टप्प्यातील अगदीच विषम म्हणता येणार नाही अशी विभागणी. पहिल्या टप्प्यात झोप घेण्याची चांगली संधी! ही माझं ब्रिटिश एअरवेजच्या पारड्यात माप टाकण्याची महत्वाची कारणं ! माझ्या आवडत्या लंडनची ओझरती भेट हे महत्वाचं !

ह्या उलट इथीहादचे विमान सकाळी पावणेपाच  वाजताचे ! पहिला टप्पा मोजुन मापून तीन तासांचा तर दुसरा चौदा तासांचा! घरच्यांच्या आणि आपल्या झोपेचं खोबरं ! 


अबुधाबीस थांबा घेतला असता तिथं काढलेले फोटो. 



अबुधाबी हे एकमेव विमानतळ असे आहे जिथं अमेरिका देशातील इमिग्रेशन आधीच पार पाडलं जातं. त्यामुळं अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर आपण तेथील देशांतर्गत विमानातुन प्रवास केल्यासारखं थेट बॅग्ज घेऊन विमानतळाबाहेर पडू शकतो. 
चौदा तासांचा सलग विमान प्रवास हे म्हणायला गेलं तर दिव्यच ! प्रवासमार्ग दाखविणारे हे चित्र !








इथीहादने स्वतःहुन फक्त एकदाच जेवण दिलं. मी काही वेळानं न राहवून चहा, ब्रेड मागवुन घेतला.  डोळ्यांना आराम द्यावा म्हणून ह्या चौदा तासांत मी केवळ एकच चित्रपट पाहिला. बऱ्यापैकी झोपलो. 

JFK विमानतळावर वेळेवर आगमन झालं. बॅग्स सुद्धा  तात्काळ आल्या. सहा डॉलर्स खर्च करून घेतलेल्या ट्रॉलीवर चढवून उबेरचे आरक्षण करून हॉटेलच्या दिशेनं मार्गस्थ झालो. बऱ्याच वर्षांनी झालेलं न्युयॉर्कचं दर्शन काहीसं मनाला खिन्न करून गेलं. शहर काहीसं जुनं वाटू लागलं आहे. बऱ्याच ठिकाणी बांधकामं सुरु होती. एका आठवड्यापूर्वी झालेल्या मोठ्या बर्फवृष्टीतला बर्फ मातीत मिसळून त्याचं गोजिरेपण बर्फ हरवुन बसला होता. फिलाडेल्फियामध्ये अजिबात न दिसणारी रहदारी इथं तात्काळ जाणवली.  

"New York Marriott at the Brooklyn Bridge" ह्या हॉटेलात आमचं आगमन झालं. फिलाडेल्फियामधील प्रशस्त खोल्यांची सवय झाल्यानं ही खोली अगदीच लहान वाटत होती.  Brooklyn Bridge चे दर्शन देणाऱ्या बाजुची खोली मला मिळाली नाही.  सचैल स्नान करून ग्रबहब मधुन रात्रीचे जेवण मागवलं. भारतात झोमॅटोवरून घरात अगदी अर्ध्या तासांत आपल्या आवडीचं जेवण आपल्याला मिळतं.  इथं किमान एक तासभराची प्रतीक्षा आपणास करावी लागते. ह्या वास्तव्यात पाऊण तासानंतर ऑर्डर रद्द होण्याचा दुर्धर प्रसंग माझ्यावर तीन वेळा ओढवला. संयम महत्वाचा असतो !




दुसरा दिवस हा प्रेसिडेंट्स डेच्या सुट्टीचा असल्यानं सहकाऱ्यांनी उणे तापमानात सुद्धा न्युयॉर्कची मनसोक्त सैर केली. मी मात्र थोडक्यात आटपलं! 


तीन दिवस न्युयॉर्क ब्रुकलिन कार्यालयात अगदी सखोल चर्चा झाली.  तिसऱ्या दिवशी सायंकाळी आम्ही उबेरने फिलाडेल्फियाला आलो. मार्गात आलेल्या अनेक पुलांपैकी एका पुलावरील हा व्हिडीओ !


इथंही कार्यालयात दोन दिवसांची परिषद, सहकाऱ्यांशी चर्चा असा अगदी व्यस्त कार्यक्रम होता. बालमित्र अजय अगदी वेळात वेळ काढून मला नेहमीप्रमाणे भेटायला आला. रविवारी सकाळी कार्यालयीन सहकाऱ्याच्या घरी मोठ्या टीव्हीवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामना पाहावयास गेलो. भारतानं दणकून मार खाल्ल्यावर रविवार सकाळच्या झोपेचं खोबरं केल्याचं दुःख झालं. 

दुपारपासून पुन्हा एकदा जोरदार बर्फवृष्टीस सुरवात होण्याचा हवामानखात्याचा अंदाज होता. अगदी सव्वातीन - साडेतीन पासून बर्फवृष्टीस सुरुवात होईल इतकं अचूक अनुमान त्यांनी वर्तवलं होते. त्यानुसार बर्फवृष्टीस सुरुवात झाली देखील ! सायंकाळी आम्ही सर्व सहकारी हिवाळ्याची वस्त्रे परिधान करून खाली उतरलो. तिथं फोटो शूट केलं. मी थोडा रॅम्प WALK सुद्धा केला. त्याचा व्हिडीओ प्रसिद्ध केल्यास विविध जाहिरात कंपन्यांकडुन माझा पिच्छा पुरविला जाण्याचा धोका ध्यानात घेऊन मी तो मोह टाळत आहे. 







पुढील तीन दिवसातील बर्फमय परिसराची नयनरम्य चित्रं ! तापमान शुन्याच्या आसपासच रेंगाळत असल्यानं कार्यालयात अथवा बाहेर फिरायला जाताना अगदी युद्धाला जावं त्याप्रमाणं तयारी करावी लागत होती. 
शनिवार सकाळ 

रविवारी मध्यरात्री 


रात्री जेट लॅगने नेहमीप्रमाणं दीड - दोनला जाग आली असता खिडकीतून हे विहंगम दृश्य दिसलं. 











माझी खोली पहिल्या मजल्यावर होती.  खिडकीत एक इवलुसे झाड होते. त्याला बिचाऱ्याला खट्याळ बर्फानं पुर्णपणे आच्छादुन टाकून त्याला जबरदस्तीनं झोके घ्यायला भाग पाडलं. मी प्रथम जेव्हा हे दृश्य पाहिलं तेव्हा "डायनासोर येती घरा तोचि दिवाळी दसरा" ह्या सुप्रसिद्ध मराठी म्हणीची मला आठवण झाली. मराठी माध्यम झिंदाबाद !




हॉटेलच्या प्रवेशद्वाराच्या कमानीची दोन छायाचित्रे !







बर्फ पडत असला तरीही काम जोरात सुरूच राहिले. 

गुरुवारी रात्री १० वाजता JFK विमानतळावरून माझं परतीचं विमान होतं. विल्मिंग्टन ते JFK हा थोडा दूरचा प्रवास असल्यानं मी थोडा आधीच निघालो. बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानतळावर तुमच्या उड्डाणाच्या चार तास आधी तुम्हांला बॅग्स चेकइन करण्यास परवानगी दिली जात नाही. त्यामुळं आधी आलेल्या मला जवळपास तासभर ताटकळत बसावं लागलं.  इथं इतिहादच्या प्रवाशांसाठी आमच्या कंपनीची Chase Sapphire Lounge आहे. इथं मागविलेलं सॅल्मोन पुलाव. ह्याक्षणी भारतात शुक्रवार झाल्याची मनाची समजूत घालत Salmon चा स्वाद घेतला. 







विमानात प्रवेश करेपर्यंत दोन आठवड्यातील दगदगीनं पुर्ण दमलो होतो. बसताक्षणी मला डुलकी लागली. तासाभरानं जाग आली तरीही विमान जागच्या जागी होते. विमानात बसलेल्या एका प्रवाशाने विनंती केल्यानं किंवा इतर काही कारणांमुळं त्याला त्याच्या बॅगेसकट खाली उतरविण्यात आले.  मनात अनेक शंकांचं वादळ निर्माण झालं. 

अजुन एक भिती मनात होती. अबुधाबीला उतरल्यानंतर केवळ दीड तासांत मुंबईचं विमान होतं. त्यामुळं एक तास उशीर झाल्यानं ते विमान मिळण्याची शक्यता कमी झाली होती. हे विमान चुकलं तर बऱ्याच वेळा दुसरं विमान दुसऱ्या दिवशी मिळतं असे ऐकून होतो.  सुदैवानं ह्या वैमानिकानं उड्डाण केल्यावर विमान भरधाव वेगानं दौडवलं. 

विमानातील मेन्यूची आणि भोजनाची चित्रं !











अबूधाबीला उतरल्यानंतर मुंबईचं विमान सुटायला केवळ पाऊण तास उरला होता. माझ्यासोबत मुंबई विमान पकडणारे अजून दोघं तिघं होते. आम्ही ह्या विमानातून धावत थेट पळ काढला. सुरक्षा तपासणी वगैरे आटपुन मुंबईच्या विमानात स्थानापन्न झालो त्यावेळी त्याच्या उड्डाणास अजून पंचवीस मिनिटं होती. म्हणजेच एका विमानातुन दुसऱ्या विमानात मी केवळ वीस - बावीस मिनिटात प्रवेश केला होता. हा माझा जागतिक विक्रम आहे ! विमानात प्रवेश करताना तिथल्या कर्मचाऱ्यास माझ्या बॅग्स माझ्यासोबत ह्या विमानात येण्याची शक्यता किती आहे असे हसत हसत विचारलं. आम्ही तुमच्या बॅग्स नक्की घेऊ असे त्यानं मला आश्वासन दिलं. 

इथल्या एअर होस्टेसने मला अप्रतिम अशी चिकन बिर्याणी खाऊ घातली. अबूधाबीत अजुनही शुक्रवार असल्यानं चिकन बिर्याणी खाणं प्रशस्त आहे अशी मी माझ्या मनाची समजुत घातली. त्याचं बहुतेक गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि Salmon / चिकन बिर्याणी ह्या सर्व प्रकारात मन वढाय वढाय झालं असावं ! 



आमच्या मुंबईत गेल्या शनिवारी सकाळी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास उतरलो. दोन्ही बॅगाची सुद्धा लगेचच भेट झाली. साडेतीन वाजता घरात प्रवेश केला आणि चार वाजता स्नान आटपून निद्राधीन झालो. ब्रिटिश एअरवेजचे विमान साडेअकरा वाजता येतं. त्यामुळं दोन वाजता निद्राधीन होता येतं. कोणास ठाऊक कसं पण दहा वाजेपर्यंत गाढ झोप लागली. 

दुपारी टीव्ही सुरु केला.  आखातात युद्ध सुरु झाल्यानं अबुधाबी आणि त्या भागातील इतर विमानतळे बंद करण्यात आली होती. जर माझं अबू धाबीला येणारं विमान अजून अर्धा तास उशिरानं आलं असतं तर बहुदा मी ही अडकलो असतो. सुदैवानं त्या परिस्थितीचा सामना करावा लागला. माझे काही सहकारी दुबईत तर काही अमेरिकेत अडकून बसले. त्यांना परतताना बुधवार - गुरुवार उजाडला. ब्रिटिश एअरवेज झिंदाबाद! 

या चिमण्यांनो परत फिरा रे !

आमची गॅलरी चिमण्यांना आवडते असं दिसतंय. हल्ली पहाटे लवकर उजाडत असल्यानं सव्वा सहाच्या सुमारास येऊन त्या चिवचिवाट करू लागतात. चिमण्यांच्या चि...