मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!
अभ्यास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
अभ्यास लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, १७ जुलै, २०२०

दहावी परीक्षा - व्यावसायिक आयुष्यातील पहिली पायरी !



दहावी परीक्षांच्या ICSE आणि CBSE ह्या दोन परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. SSC बोर्डाचा लवकरच जाहीर होईल. माझ्या अनुभवावर आधारित हे दोन शब्द ! 

व्यावसायिक जगात यशस्वी होण्यासाठी तुमच्याकडं आवश्यक असलेल्या गुणांपैकी खालील हे असे गुण  ज्यांची दहावीच्या परीक्षांत सुद्धा चाचपणी  होते. 


१) मुळ संकल्पनांची समज 
मेहनत तुम्हांला एका विशिष्ट मर्यादेपर्यंत यश मिळवुन देऊ शकते. निर्विवाद यश मिळविण्यासाठी मुळ संकल्पनांची समज अत्यावश्यक आहे! 
२) कॉमन सेन्स 
मेहनत, मुळ संकल्पनांची उमज ह्या घटकांसोबत प्रत्यक्ष कामगिरी (आपल्या उदाहरणात परीक्षेचा पेपर) करत असताना कोणता तरी surprise factor तुमच्या समोर उभा ठाकणारच ! अशा वेळी उपलब्ध माहिती आणि पुर्वानुभव ह्यांच्या आधारावर योग्य निर्णय घेण्याची क्षमता म्हणजे कॉमन सेन्स !
३) जिद्द, चिकाटी - Never Give Up Attitude  
दहावी, बारावी म्हणा किंवा आयुष्यातील कोणताही महत्त्वाचा टप्पा म्हणा ! ही वर्ष - दोन वर्षे , अनेक वर्षांची मेहनत असते. ह्या दीर्घ प्रवासात तुम्हांला निराशेचे क्षण येणारच ! एखाद्या किंवा दोन  - तीन सराव परीक्षांत कमी गुण मिळु शकतात. पण ज्या परीक्षेतील कामगिरी खरोखर गणली जाते त्यावेळी तुम्ही आपली सर्वोत्तम कामगिरी सादर करणे आवश्यक असते. त्यामुळं जोवर ती परीक्षा झाली नाही तोवर काहीही बिघडलं नाही हे स्वतःला समजावत रहा ! 

आता वळुयात बाकीच्या मुद्यांकडे ! 
शिकवणी वर्गाशिवाय खरंतर  काहीच अडत नाही. ते तुमचा उगाचच वेळ घेतात. दररोज घरी येऊन जो विद्यार्थी नियमितपणे एक धड्याचा स्वतःहुन अभ्यास करतो, स्वतःच्या नोट्स काढतो त्याला शिकवणीची गरज नाही ! बरेचसे शिकवणी वर्ग मुलांना दमवितात. शाळा आणि शिकवणी मिळुन साधारणतः १० तास खर्च होत असतील तर स्वअभ्यास करण्याची संधीच मुलांना मिळत नाही. 

शाळेत बऱ्याच वेळा तुम्हांला शिकवणी वर्गात सर्व काही शिकवलं गेलं आहे असं गृहीत धरलं जातं शाळेत काही (आगाऊ) विद्यार्थी असतात ज्यांना आपल्याला समजलं आहे हे उगाचच सर्वांसमोर दाखवुन द्यायचं असते त्यामुळं त्यांनी गणितं सोडवुन दाखवली की बाकी सर्वांना सुद्धा ती समजली आहेत असं सोयिस्कर गृहितक बरेचसे शिक्षक करतात. त्यामुळं केवळ यांत्रिकदृष्या काही मुलं गणिताच्या स्टेप्स मांडतात पण मुळ संकल्पनांचा आनंदी आनंदच असतो ! "सर मला हे समजलं नाही ! परत समजावुन सांगा ! " हे भरवर्गात सांगायचे धारिष्ट्य जो मुलगा / मुलगी दाखवु शकतो त्यांनी व्यावसायिक जगात आवश्यक असणारा एक अत्यंत महत्वाचा गुण आत्मसात केला असे म्हणता येईल ! 

पुर्वी (मराठी माध्यमाच्या - हे माझ्या अनुभवावर आधारित!)  उत्तरपत्रिकांचे परीक्षण करताना जणु काही प्रत्येक उत्तर विविध पैलुंवर तपासुन पाहिलं जात असावं. उत्तरात अपेक्षित असणारे सर्व मुद्दे मांडणं ही गोष्ट तुम्हांला पुर्ण गुण मिळवुन देण्यासाठी पुरेशी नसे. ते योग्य क्रमानं मांडले गेले आहेत का, शब्दांचा योग्य वापर केला गेला आहे की नाही, शुद्धलेखन वगैरे अनेक घटकांची तपासणी केली जात असे. त्यामुळं नव्वद टक्क्यांच्यावर जाणं तितकंसं सोपं नसायचं. हल्ली बहुदा उत्तरात अपेक्षित असणारे सर्व मुद्दे मांडणं ह्या एकमेव निकषावर पुर्ण गुण मिळत असावेत. त्यामुळं सरासरी गुणवारीचं प्रमाण वाढलं आहे! आणि त्यामुळं स्वअभ्यास करुन घवघवीत यश मिळु शकते ह्या संकल्पनेस जोरदार पुष्टी मिळते !

सायन्स, सोशल सायन्स ह्या विषयांसाठी स्वतःच्या नोट्स  बनविणे हा घटक शेवटच्या दोन महिन्यात आणि परीक्षेच्या कालावधीत फार महत्वाचा ठरतो! 

साधारणतः नोव्हेंबरच्या शेवटी पुर्ण पेपर सोडविण्यास सुरुवात करावी. व्यावसायिक जगात कोणताही प्रश्न सोडविताना Top Down आणि Bottom Up असे दोन दृष्टीकोन स्वीकारले जातात. का कोणास ठाऊक पण संपुर्ण पुस्तकांचा अभ्यास करुन परीक्षा देणे हा Bottom Up दृष्टिकोन आणि आधीच्या बऱ्याच वर्षांच्या पेपरचा अभ्यास करुन परीक्षेसाठी सज्ज होणे हा Top Down दृष्टिकोन असे मला वाटतं. ह्या दोन्ही दृष्टिकोनांचे योग्य मिश्रण साकारता यायला हवे ! 

आयुष्याकडं बघण्याचे अनेक दृष्टिकोन आहेत. दहावी, बारावी, पदवी परीक्षा, व्यावसायिक आयुष्य, वैयक्तिक आयुष्य हे आयुष्याचे ढोबळमानाने महत्वाचे टप्पे आपण मानु शकतो ! लेखाच्या आरंभीस नमुद केलेले तीन (आणि तत्सम) गुण  ह्या सर्व टप्प्यांत वारंवार परिक्षले जातात. दहावीतील यश - अपयश गुणांच्या निकषावर न पाहता ह्या वरील तीन गुणांपैकी आपण कोणते गुण प्रदर्शित करु शकलो, ह्या अनुभवातून काय शिकू शकतो ह्याचं परीक्षण करणे योग्य ठरेल. आयुष्य प्रत्येकाला अनेक संधी देत राहणार! दहावी - बारावी ह्या सर्व संधींपैकी  सुरवातीच्या दोन संधी आहेत हे लक्षात ठेवणं योग्य ठरेल ! 

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९

बारावीच्या पाल्यांची तणावाची स्थिती !



अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनं अकरावी-बारावी या इयत्तेमध्ये कोणत्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा याबाबतीत बहुतांशी पालकवर्गात संभ्रमाचे वातावरण आहे. मला जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मी इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही माहिती माझे कंपनीतील सहकारी आणि माझा अभियांत्रिकी महाविद्यालयातील मित्र राहुल ह्यांनी दिली आहे. त्यांचे मनःपुर्वक आभार! 

सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे की सद्यकालीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तीन प्रकारात आपण वर्गीकरण करु शकतो.  
१) पहिला प्रकार म्हणजे VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.  यातील बहुतांशी विद्यालय सीईटी ह्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश देतात. सीईटी परीक्षा २०० गुणांची असुन ती एकच प्रवेशपरीक्षा असते

या सर्व प्रकारात बारावीच्या एचएससी बोर्डाच्या परीक्षेचे माहात्म्य कमी होत असलं तरी ह्या बोर्डाच्या परीक्षेत तुम्हांला किमान ७५ टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये!  

या विद्यालयांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काहीशी वेगळी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. 

३) तिसरा प्रकार आयआयटीच्या प्रवेश परीक्षा! 

आयआयटीच्या प्रवेश परीक्षा दोन पातळीवर घेण्यात येतात. आयआयटी मेन्स या परीक्षेद्वारे प्रथम पात्रता फेरी घेण्यात येऊन त्याद्वारे आयआयटी ॲडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. आयआयटी मेन्स या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी मिळते.  जानेवारी आणि एप्रिल अशा दोन महिन्यात ही परीक्षा घेण्यात येऊन ह्या दोघातील सर्वोत्तम कामगिरी विचारात घेतली जाते. या परीक्षेत गुणांची विशिष्ट पातळी पार केल्यास तुम्हाला आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेला बसता येतं.  परीक्षेतील संपूर्ण भारतातील तुमच्या क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या आयआयटीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश मिळतो हे ठरवले जाऊ शकते.  सर्व आयआयटीचे प्रथम पसंतीची  आयआयटी / द्वितीय पसंतीची आयआयटी असे काहीसे अलिखित वर्गीकरण आढळुन येतं.  विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट आयआयटी निवडण्याकडे कल दिसून येतो जसे की मुंबईची आयआयटी सर्व भारतभर प्रसिद्ध आहे! एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या आयटीमध्ये प्रथम पसंतीची नसलेली शाखा घेण्यापेक्षा VJTI /SPIT मध्ये प्रथम पसंतीची शाखा निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. 

यामध्ये अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे जर  तुमचा मुलगा मुलगी सीबीएससी बोर्डामध्ये दहावीपर्यंत शिकत असेल तर अकरावी बारावी मध्ये सुद्धा हेच बोर्ड चालू ठेवायचे की एचएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या अकरावी बारावी या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? सध्या बऱ्याच ठिकाणी बोर्डाच्या परीक्षेमध्ये किमान ७५ टक्क्यांची अट घालण्यात आल्यानं तुलनेनं सोप्या असलेल्या HSC बोर्डात प्रवेश घेण्याकडं विद्यार्थ्यांचा कल दिसुन येतो.  

आता महत्त्वाचा मुद्दा!! म्हणजे या तीन प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करू शकेल किंवा त्याची शक्यता वाढवू शकेल असा नक्की कोणता क्लास आहे ज्यात आपण प्रवेश घ्यायला हवा !

सुरवात करूयात वर उल्लेखलेल्या तिसऱ्या प्रकाराकडे
ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पेस, Allen, Resonance हे शिकवणी वर्ग नक्कीच उत्तम मानले जातात.  यातील Allen, Resonance हे शिकवणी वर्गांच्या कोटा शहरात मुख्य शाखा आहेत आणि मुंबई शहरात त्यांच्या इतर शाखा आहेत. या तिन्ही शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला त्यांच्या फीमध्ये सवलत मिळू शकते. असं म्हटलं जातं की जर तुम्ही यातील कोणत्याही एका शिकवणी वर्गाच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि ते तुम्ही ती गुणपत्रिका घेऊन तुम्ही बाकीच्या क्लासेसकडे गेलात तर त्या गुणांच्या आधारे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळू शकते! लक्षात येण्यासारखा अजून एक प्रकार म्हणजे हे सर्व शिकवणी वर्ग एकमेकांचे चांगले शिक्षक पळवण्याच्या मागे लागलेले असतात असे ऐकिवात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा मानस दृढ असतो त्यांच्यासाठी हे वरील तीन शिकवणी वर्ग उत्तम होत!!

आय आय टी ऍडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्याची तयारी करणे हे काहीसे मानसिक तणावाचे कारण बनू शकतं! आणि यामुळेच साधारणतः अकरावीच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा निर्णय बदलून ते बाकीच्या दोन पर्यायांच्या दृष्टीने तयारी करू लागतात. अशा वेळी मात्र जर तुम्ही त्यावरील तीन शिकवणी वर्गात जात असाल तर मात्र काहीशी बिकट परिस्थिती होऊ शकते. कारण या शिकवणी वर्गांचे लक्ष आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेकडे असते आणि तुम्हाला ह्या क्षणी मात्र या क्लिष्ट अभ्यासक्रमांमध्ये तिळमात्र रस नसतो. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये! जर तुम्ही सुरुवातीपासून बिट्स पिलानी अथवा व्ही आय टी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही प्रामुख्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता! इथं प्रवेश घेतल्यास आय आय टी ऍडव्हान्सच्या क्लिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष देण्याचे तुमचे श्रम वाचू शकतात! 

३) VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.
ज्याप्रमाणे या दोन संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे खास असे प्रवेश वर्ग आहेत त्याचप्रमाणे सीईटीसाठी खास प्रवेश तयारी करून घेणारे शिकवणी वर्ग आहेत हे बहुदा सायन्स परिवार यासारख्या शिकवणी वर्गांचा समावेश होतो. 

आपल्या मुलाची क्षमता किती आहे आणि त्या क्षमतेनुसार त्याच्यासाठी कोणता पर्याय योग्य असेल हे आपल्याला आधीपासुन कळायला हवं असंच सर्व पालकांना वाटत असतं. परंतु हे माहिती करुन घेण्यासाठी खात्रीलायक असा मार्ग नाही. त्यामुळं सर्वजण सर्वात महत्वाकांक्षी पर्यायाची म्हणजेच IIT Advanced ची तयारी करुन घेणाऱ्या शिकवणी वर्गांची निवड करतात. हे क्लास घेणारे सुद्धा स्वतःचा फायदा नजरेसमोर ठेऊन तुमच्या मुलाच्या खऱ्या क्षमतेचं चित्र केव्हाही तुम्हांला सांगत नाही. साधारणतः एका वर्षांनी वगैरे आपल्याला IIT Advanced झेपणार नाही हे उमजुन चुकलेली अनेक उदाहरणं मी ऐकली आहेत. परंतु ह्यावेळी तुमचे परतीचे सर्व मार्ग कापले गेलेले असतात. त्यामुळं भावनाविवश न होता आपल्या मुलांच्या क्षमतेचं वस्तुनिष्ठ परीक्षण करुन मगच योग्य पर्याय निवडावा !

बाकी ह्या सर्व बारावीला असणाऱ्या मुलांना इतक्या तणावातून आपण का जायला भाग पाडत आहोत? स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाची परीक्षा आणि IIT प्रवेशासाठी IIT च्या परीक्षा असा सोपा मार्ग का अवलंबु नये? अगदीच झालं तर स्थानिक अभियांत्रिकी प्रवेशासाठी स्थानिक बोर्डाच्या परीक्षेसोबत तुम्हांला IIT मेन्स विचारात घेता येईल. जेणेकरून मुलांची एका अधिकच्या प्रवेशपरिक्षेतुन (CET) सुटका होईल. 

इथं दोन बाबी जाणवतात. पहिली म्हणजे आपण शिक्षणक्षेत्राचा बाजार मांडला आहे. पालकांकडुन अव्वाच्या सव्वा पैसे उकळण्याचे ह्या प्रवेशपरीक्षा हे एक साधन बनले आहे. दुसरी बाब म्हणजे आयुष्य अधिकाधिक क्लिष्ट बनविण्यात आपला कोणी हात धरु शकणार नाही !


मी गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीचे क्लासेस ही पोस्ट लिहिली होती. त्याच पोस्टमध्ये थोडा बदल करुन आज ही पोस्ट लिहत आहे. 



शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८

अभियांत्रिकी प्रवेशासाठी बारावीचे क्लासेस



अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रवेशाच्या पुर्वतयारीच्या दृष्टीनं अकरावी-बारावी या इयत्तेमध्ये कोणत्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घ्यावा याबाबतीत माझ्या मनात काहीसे संभ्रमाचे वातावरण आहे. मी ही पोस्ट लिहत आहे याचा अर्थ हा संभ्रम दूर झाला असा नाही. मला जी काही माहिती मिळाली आहे ती माहिती मी इथे संक्षिप्त स्वरुपात मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. मला ही माहिती माझे कंपनीतील सहकारी क्ष ह्यांनी दिली आहे. त्यांचे मनःपुर्वक आभार! या विषयावर त्यांच्याशी चर्चा करुन अधिक माहिती मिळवण्याचा माझा प्रयत्न सुरू राहील आणि काही काळानंतर आपल्याला अजून एक पोस्ट कदाचित पहायला मिळू शकते. 

सर्वप्रथम आपल्याला लक्षात घेणे आवश्यक आहे की सद्यकालीन अभियांत्रिकी महाविद्यालयांचे तीन प्रकारात आपण वर्गीकरण करु शकतो.  
१) पहिला प्रकार म्हणजे VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.  यातील बहुतांशी विद्यालय सीईटी ह्या प्रवेशपरीक्षेतील गुणांच्या आधारे तुम्हाला प्रवेश देतात. सीईटी परीक्षा २०० गुणांची असुन ती एकच प्रवेशपरीक्षा असते

या सर्व प्रकारात बारावीची एसएससी बोर्डाची परीक्षेचे माहात्म्य बहुतांशी कमी होऊन जाते. त्या परीक्षेतील गुणांना अभियांत्रिकी परिक्षा महाविद्यालयांच्या प्रवेशाच्या दृष्टीने कोणतेही महत्त्व उरत नाही. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये!  या विद्यालयांची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी काहीशी वेगळी तयारी विद्यार्थ्यांना करावी लागते. 

३) तिसरा प्रकार आयआयटीच्या प्रवेश परीक्षा! आयआयटीच्या प्रवेश परीक्षा दोन पातळीवर घेण्यात येतात. आय आय टी मेन या परीक्षेद्वारे प्रथम पात्रता फेरी घेण्यात येऊन त्याद्वारे आय आय टी ॲडव्हान्स या परीक्षेला पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात येते. उपलब्ध माहितीनुसार यंदाच्या वर्षापासून आयआयटी मेन या परीक्षेला बसण्याची विद्यार्थ्यांना दोन वेळा संधी देण्यात येणार आहे. या गुणांची विशिष्ट पातळी पार केल्यास तुम्हाला आयआयटी ॲडव्हान्स परीक्षेला बसता येतं.  परीक्षेतील संपूर्ण भारतातील तुमच्या क्रमांकानुसार तुम्हाला कोणत्या आयआयटीमध्ये कोणत्या शाखेत प्रवेश मिळतो हे ठरवले जाऊ शकते.  एखाद्या या सर्व आयआयटीचे प्रथम पसंतीची  आयआयटी / द्वितीय पसंतीची आयआयटी असे काहीसे अलिखित वर्गीकरण आढळुन येतं.  विद्यार्थ्यांचा काही विशिष्ट आयआयटी निवडण्याकडे कल दिसून येतो जसे की मुंबईची आयआयटी सर्व भारतभर प्रसिद्ध आहे! एखाद्या प्रसिद्ध नसलेल्या आयटीमध्ये प्रथम पसंतीची नसलेली शाखा घेण्यापेक्षा VJTI /SPCEमध्ये प्रथम पसंतीची शाखा निवडणे हा उत्तम पर्याय असू शकतो. 

यामध्ये अजून एक मुद्दा आहे. तो म्हणजे जर  तुमचा मुलगा मुलगी सीबीएससी बोर्डामध्ये दहावीपर्यंत शिकत असेल तर अकरावी बारावी मध्ये सुद्धा हेच बोर्ड चालू ठेवायचे की एचएससी बोर्डाशी संलग्न असलेल्या अकरावी बारावी या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा? याबाबतीत सध्यातरी माझा संभ्रम कायम आहे. 

आता पोस्टच्या शीर्षकातील महत्त्वाचा मुद्दा!! म्हणजे या तीन प्रकारच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपल्या पाल्याला मदत करू शकेल किंवा त्याची शक्यता वाढवू शकेल असा नक्की कोणता क्लास?

सुरवात करूयात वर उल्लेखलेल्या तिसऱ्या प्रकाराकडे
ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी मध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासाठी पेस, Allen, Resonance हे शिकवणी वर्ग नक्कीच उत्तम मानले जातात.  यातील Allen, Resonance हे शिकवणी वर्गांच्या कोटा शहरात मुख्य शाखा आहेत आणि मुंबई शहरात त्यांच्या इतर शाखा आहेत. या तिन्ही शिकवणी वर्गात प्रवेश घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रवेश परीक्षा द्यावी लागते. त्यात मिळणाऱ्या गुणांनुसार तुम्हाला त्यांच्या फीमध्ये सवलत मिळू शकते. असं म्हटलं जातं की जर तुम्ही यातील कोणत्याही एका शिकवणी वर्गाच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळवले आणि ते तुम्ही ती गुणपत्रिका घेऊन तुम्ही बाकीच्या क्लासेसकडे गेलात तर त्या गुणांच्या आधारे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये सवलत मिळू शकते! लक्षात येण्यासारखा अजून एक प्रकार म्हणजे हे सर्व शिकवणी वर्ग एकमेकांचे चांगले शिक्षक पळवण्याच्या मागे लागलेले असतात असे ऐकिवात आहे. ज्या विद्यार्थ्यांचा आयआयटीमध्ये प्रवेश घेण्याचा मानस दृढ असतो त्यांच्यासाठी हे वरील तीन शिकवणी वर्ग उत्तम होत!!

आय आय टी ऍडव्हान्सची परीक्षा उत्तीर्ण होणे अथवा त्याची तयारी करणे हे काहीसे मानसिक तणावाचे कारण बनू शकतं! आणि यामुळेच साधारणतः अकरावीच्या दुसऱ्या सत्रामध्ये काही विद्यार्थ्यांचा निर्णय बदलून ते बाकीच्या दोन पर्यायांच्या दृष्टीने तयारी करू लागतात. अशा वेळी मात्र जर तुम्ही त्यावरील तीन शिकवणी वर्गात जात असाल तर मात्र काहीशी बिकट परिस्थिती होऊ शकते. कारण या शिकवणी वर्गांचे लक्ष आयआयटीच्या प्रवेशपरीक्षेकडे असते आणि तुम्हाला मात्र याक्लिष्ट अभ्यासक्रमांमध्ये तिळमात्र रस नसतो. 

२) दुसरा प्रकार म्हणजे स्वतःची प्रवेशपरीक्षा घेणाऱ्या बिट्स पिलानी आणि व्ही आय टी सारखी अभियांत्रिकी महाविद्यालये! जर तुम्ही सुरुवातीपासून बिट्स पिलानी अथवा व्ही आय टी सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय ठरवला असेल तर तुम्ही प्रामुख्याने या संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणाऱ्या शिकवणी वर्गांमध्ये प्रवेश घेऊ शकता! इथं प्रवेश घेतल्यास आय आय टी मेन्सच्या क्लिष्ट अभ्यासक्रमावर लक्ष देण्याचे तुमचे श्रम वाचू शकतात! 

३) VJTI / SPCE आणि मुंबईतील सर्व अभियांत्रिकी विद्यालये.
ज्याप्रमाणे या दोन संस्थांच्या प्रवेश परीक्षेसाठी तयारी करून घेणारे खास असे प्रवेश वर्ग आहेत त्याचप्रमाणे सीईटीसाठी खास प्रवेश तयारी करून घेणारे शिकवणी वर्ग आहेत हे बहुदा सायन्स परिवार यासारख्या शिकवणी वर्गांचा समावेश होतो. 

पोस्टच्या आरंभी म्हटल्याप्रमाणे ह्या विषयावर मी अजुन चर्चा सुरु ठेवली आहे. त्यामुळे पुढील काळात अधिक परिपुर्ण माहितीनिशी मी परत येईन! तोवर जर तुम्हांला तुमचा निर्णय बनवायचा असेल तर ह्या पोस्टच्या आधारे तुम्ही शिकवणी वर्गांना योग्य प्रश्न विचारुन मगच निर्णय घ्या !!

रविवार, २३ जुलै, २०१७

वाढता वाढता वाढे!




महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात SSC बोर्ड ही एक नामवंत शिक्षण संस्था ! १९९० सालापर्यंत बहुतांशी मराठी घरांत आपल्या मुलांना SSC बोर्डाच्या शाळेत डोळे झाकुन घालण्याची पद्धती होती. कालांतराने हे चित्र पालटले. त्या काळात शिकलेल्या बहुतांशी मंडळींच्या मनात SSC बोर्डाच्या चांगल्या आठवणी मनात आहेत. SSC बोर्ड म्हटलं की अजुन एक आठवण असायची ती त्या बोर्डाच्या गुणवत्ता यादीची. साधारणतः पहिली १०० मुलं ह्या गुणवत्ता यादीत यायची आणि गुणवत्ता यादीत पहिल्या येणाऱ्या मुलास साधारणतः ९३ ते ९५ टक्क्यांच्या आसपास गुण मिळायचे. गुणवत्ता यादी नव्वदाच्या आसपास येऊन थांबायची. मग नंतर हळुहळू हे गुणांचे प्रमाण वाढु लागलं. मंगेश म्हसकरला ९६ टक्क्यांच्या आसपास गुण मिळाले आणि बऱ्यापैकी गाजावाजा झाला. 

आजच्या पोस्टचा विषय आहे तो SSC बोर्डातील वाढत्या गुणांची टक्केवारी.  मी आधी सांगितल्याप्रमाणं आधीच्या काळातील बोर्डात आलेली मुलं ९३ - ९४ टक्क्यांच्या आसपास गुण मिळवायची. त्यांना ९७ - ९८ टक्के मिळायचे नाहीत ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही भागाचा अभ्यास केला नसायचा किंवा त्यांना काही गणितं येत नसत. साधारणतः भाषा विषयात पुर्ण गुण देण्याची पद्धती नसे. कारण भाषा शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांकडुन आलंकारिक भाषेची अपेक्षा करायचे. त्यामुळं पंधरा गुणांचं निबंधलेखन असलं की दहा - बारा गुणांहुन अधिक अपेक्षा विद्यार्थीसुद्धा करत नसत. संदर्भासहित स्पष्टीकरण म्हटलं की विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीने गगनभरारी घेतली पाहिजे अशी परीक्षकांची अपेक्षा असायची. ५० - ५० गुणांचं हिंदी संस्कृत घेण्यापेक्षा १०० गुणांचं संस्कृत घेण्याची मग पद्धती राजमान्य झाली. त्यामुळं अधिक गुण मिळण्याची शक्यता वाढीस लागली. 

नक्की वर्ष सांगता येत नाही, पण मधल्या काळात हा परीक्षकांचा जुना दृष्टिकोन कोठंतरी बदलला आणि आघाडीच्या विद्यार्थ्यांना मग ९७ - ९८ आणि  कधीतरी १०० टक्के सुद्धा मिळू लागले. ह्यामागची नक्की कारणं सांगण्यासाठी ह्या क्षेत्रातील मी तज्ञ नाहीये. पण माझा अंदाज एक दोन संभाव्य कारणांकडे झुकतो. 

१> CBSE, ICSE सारख्या बोर्डातील विद्यार्थ्यांच्या अधिकच्या टक्क्यांना स्पर्धात्मक असे गुण आपल्या बोर्डातील विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावेत असं एक धोरण SSC बोर्डाच्या उच्चपातळीवर स्वीकारलं गेलं असावं. 

२> SSC बोर्डात शिकवणाऱ्या शिक्षकांची जी नवीन पिढी गेल्या काही वर्षात आली, तिनं गुणांच्या बाबतीत आधीच्या शिक्षकांइतकं कर्मठ धोरण स्वीकारलं नाही. ह्या नवीन शिक्षकवर्गाच्या  काहीशा मुक्त धोरणामुळं (ज्याला कारण १ सुद्धा काही प्रमाणात जबाबदार असावं ) एकंदरीत गुणांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. 

ह्या गुणवाढीबद्दल माझं एकच मत आहे. हल्लीचे ९० - ९१ टक्के पुर्वीच्या ९० - ९१ टक्क्यांच्या समतुल्य नाहीत. पण ह्याची जाणीव सर्वदुर पसरली नाही. त्यामुळं ह्या जाणिवेने  ज्या पालकांच्या मनात घर केलं नाही ते पालक दहावीतील ह्या गुणांमुळं आपल्या पाल्याविषयी, त्याच्या भविष्यातील यश कायम टिकवण्याच्या क्षमतेविषयी नको तितक्या अपेक्षा बाळगण्याची शक्यता वाढीस लागते. आणि मग त्या अपेक्षांचं अवास्तव ओझं घेऊनच ह्या विद्यार्थ्यांना आपलं भविष्य घडवावं लागतं. 

SSC बोर्डातील दहावीतील गुणांची टक्केवारी वाढविण्याचा निर्णय ज्या शिक्षणतज्ञांनी घेतला त्यांनी ह्या वाढत्या टक्केवारीच्या सामाजिक परिणामांचं दायित्व घेणं अपेक्षित आहे हाच माझा मुद्दा ह्या पोस्टद्वारे मी अधोरेखित करु इच्छितो. आता मी हाच आक्षेप CBSE, ICSE बोर्डातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत का घेत नाही असंही काहीजण म्हणु शकता !  म्हणणं काही अंशी बरोबर आहे. पण फरक दोन बाबतीत आहे. एक म्हणजे ह्या बोर्डातील विद्यार्थ्यांच्या यशाचा प्रसिद्धीमाध्यमाद्वारे फारसा गवगवा काही कारणास्तव केला जात नाही. आणि दुसरी म्हणजे CBSE, ICSE बोर्डातील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमामुळं पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमात जास्त सहजरित्या वाटचाल करु शकतात. 

शनिवार, ९ जुलै, २०१६

CBSE, ICSE वगैरे वगैरे!

प्रस्तावना - हा लेख मी २०१६ साली लिहिला. त्यावेळी सोहम सातव्या इयत्तेत होता. त्यामुळं बरेचसे संदर्भ त्याच्या सातवी इयत्तेतील अभ्यासक्रमाशी आणि परीक्षा पद्धतीशी निगडित आहेत. 

सद्यकाळात ज्यांची चलती आहे अशा CBSE, ICSE वगैरे बोर्डात बरेचजण आपल्या मुलांना प्रवेश घेतात. ह्या पोस्टचा हेतु पुर्णपणे ह्या बोर्डांच्या विरोधात नाही. ह्या बोर्डात जाणाऱ्या मुलांना अगदी लहान वयापासून ताणतणावाला तोंड द्यावं लागतं, हा ह्या बोर्डांविषयी घेतला जाणारा मुख्य आक्षेप! जर सकारात्मक बाजु पहायला गेलं तर केवळ अभ्यासाव्यतिरिक्त बाकीच्या क्षेत्रात आवश्यक असणारे गुण (वक्तृत्व, नृत्य इत्यादी) विकसित करण्यात ही बोर्ड हातभार लावतात. 

जर आपण आपल्या पाल्यास ह्या बोर्डांच्या शाळेत घातलं असेल तर त्यांना शालेय जीवनात सामोऱ्या जाव्या लागणाऱ्या ताणतणावास तोंड देण्यास मदत करणे हे आपलं कर्तव्य आहे. उगाचच नकारात्मक शेरे मारुन त्यांचा आत्मविश्वास कमी करु नये. बरीच शक्यता अशी आहे की आपण आपल्या लहानपणी इतक्या प्रमाणात अभ्यास केला नसणार त्यामुळे उगाचच आपल्या मुलांसमोर गमजा मारु नये!


ह्या बोर्डांच्या दोन घटक चाचण्या आणि मग सहामाही परीक्षा; पुन्हा दोन घटक चाचण्या आणि मग वार्षिक परीक्षा अशी आखणी असते. अभ्यास चालू असताना मुलांना आणि पालकांना तीन पातळ्यांवर प्रयत्नशील राहावं लागतं. 
१> शालेय अभ्यास 
२> वह्या पूर्ण करणे 
३>  प्रोजेक्ट्स 

हे सर्व काही आलेखाच्या माध्यमातून दर्शविण्यासाठी मी काही गृहीतक करत आहे. एक शैक्षणिक वर्ष वर्षभरातील सुट्ट्या आणि शाळेचे उद्योग वगळता साधारणतः ९ महिने (३४ आठवडे) चालतं. त्यात एकंदरीत ६ परीक्षा येतात. दीड ते दोन आठवडे चालणारी एक परीक्षा असं लक्षात घेता १०-१२ आठवडे परीक्षेत जातात. मग प्रत्यक्ष शिकविण्यासाठी फक्त २० -२२ आठवडे उरतात. पुर्ण वर्ष ५२ आठवड्याचं आणि प्रत्यक्ष शिकविण्यासाठी फक्त २२ आठवडे हे काहीसं पटायला कठीण असलं  तरी पण फार तर फार २-३ आठवड्याचा फरक असण्याची शक्यता आहे! 

आता आपण प्रथम घटक चाचणी कडे वळूयात. ह्याला ही बोर्डे उगाचच काहीतरी मोठे नाव देतात. पण मराठी माध्यमात शिकलेल्या माझ्यासारख्या माणसासाठी ही प्रथम घटक चाचणीच! 
 

प्रथम घटक चाचणी 

१> शालेय अभ्यास - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पाच आठवड्यात पन्नास एककांपर्यंत पोहोचतो. शाळेत फक्त नमनापुरतं  धड्याची तोंडओळख करुन दिली जाते. बाकी सर्व मग आपल्याला घरी किंवा शिकवणीमध्ये पाहावं लागतं. पाच आठवड्यानंतर ज्यावेळी घटक चाचणी येते त्यावेळी मुलांना ही ५० एकक लक्षात असणं आवश्यक असतं. 

२> वह्या पूर्ण करणे  - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो. 


३>  प्रोजेक्ट्स -  हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.

खालील आलेख हा केवळ शालेय अभ्यास लक्षात घेऊन काढला गेला आहे. त्यात बाकीचे दोन घटक समाविष्ट केल्यास तो महिना २० एककने उंचावला जाईल.



द्वितीय घटक चाचणी 

१> शालेय अभ्यास - आता आपण पन्नासपासुन आरंभ करतो आणि हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पाच आठवड्यात शंभरपर्यंत पोहोचतो.  पाच आठवड्यानंतर ज्यावेळी घटक चाचणी येते त्यावेळी मुलांना ही ५१- १०० ही पन्नास एकक लक्षात असणं आवश्यक असतं. 

२> वह्या पूर्ण करणे  - हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो. 

३>  प्रोजेक्ट्स -  हा घटक आठवड्याला १० एकक ह्या वेगानं पुढं जात राहतो.

खालील आलेख हा केवळ शालेय अभ्यास लक्षात घेऊन काढला गेला आहे. त्यात बाकीचे दोन घटक समाविष्ट केल्यास तो महिना २० एककने उंचावला जाईल.
 





शालेय अभ्यास सहामाही 

द्वितीय घटक चाचणी संपली की साधारणतः एक दोन आठवड्यात सहामाही परीक्षा येते आणि ज्यात मुलांना १ -१०० एककांची उजळणी करता येणं आवश्यक असतं. आणि हा सर्वात तणावाचा काळ बनतो.

 
 मी आधी ह्या बोर्डांचा मोठा टीकाकार होतो. आणि आदर्शवादी एस. एस. सी. बोर्डच कसं चांगलं ह्या बाजुने मोठ्या हिरीरीने वादविवादात भाग घ्यायचो. पण जसजशी व्यावसायिक जगातील अनिश्चिततेला अधिकाधिक तोंड द्यावं लागलं तसतसं मी माझं मत हळुहळू बदललं. पुढील आयुष्यात येणाऱ्या कठीण काळास अधिक चांगल्या प्रकारे तोंड देण्यासाठी ह्या बोर्डांत आपल्या पाल्यास टाकण्यास हरकत नाही अशा मताचा मी बनलो आहे. पण ह्या बोर्डांत आपल्या पाल्यास टाकल्यास आपल्या एस. एस. सी. बोर्डाच्या आदर्शवादी मुल्यांची सतत आपल्या मुलांस आठवण करुन देऊ नये हे लक्षात असु द्यावं. 

ह्या बोर्डांच्या कार्यपद्धतीत सुधारणा आणण्यासाठी काही सुचना आहेत. इतकी लठ्ठ पुस्तके तीन तीन मजले मुलांना चढवुन न्यावी लागतात. त्याऐवजी इतक्या फी घेणाऱ्या ह्या शाळांनी मुलांना पुस्तकांच्या दोन प्रति द्याव्यात आणि एक प्रत शाळेत ठेवण्यासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करुन द्यायलाच हवी. 
सर्वागीण विकासासाठी प्रोजेक्ट वगैरे झूट आहे. ह्यात पालकांचाच आणि त्यातही आयांचाच जीव मेटाकुटीला येतो. कहर म्हणजे परीक्षेच्या दिवशी प्रोजेक्टचे सबमिशन ठेवण्याचा अविचारसुद्धा हे लोक करू शकतात. 

बाकी हा सारा प्रकार पाहता ऑफिसामध्ये आपल्याकडुन असणाऱ्या अपेक्षा कधीकधी रास्त वाटू लागतात! 

भारताचे पितामह - दादाभाई नवरोजी

मराठी शाळेच्या इतिहासाच्या पुस्तकांत ज्यांच्याशी आपला परिचय झाला, ज्यांच्या आदरणीय व्यक्तिमत्त्वांनी आपल्याला भारावून सोडलं अशा व्यक्ती बऱ्य...