मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, २३ जुलै, २०१७

वाढता वाढता वाढे!




महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात SSC बोर्ड ही एक नामवंत शिक्षण संस्था ! १९९० सालापर्यंत बहुतांशी मराठी घरांत आपल्या मुलांना SSC बोर्डाच्या शाळेत डोळे झाकुन घालण्याची पद्धती होती. कालांतराने हे चित्र पालटले. त्या काळात शिकलेल्या बहुतांशी मंडळींच्या मनात SSC बोर्डाच्या चांगल्या आठवणी मनात आहेत. SSC बोर्ड म्हटलं की अजुन एक आठवण असायची ती त्या बोर्डाच्या गुणवत्ता यादीची. साधारणतः पहिली १०० मुलं ह्या गुणवत्ता यादीत यायची आणि गुणवत्ता यादीत पहिल्या येणाऱ्या मुलास साधारणतः ९३ ते ९५ टक्क्यांच्या आसपास गुण मिळायचे. गुणवत्ता यादी नव्वदाच्या आसपास येऊन थांबायची. मग नंतर हळुहळू हे गुणांचे प्रमाण वाढु लागलं. मंगेश म्हसकरला ९६ टक्क्यांच्या आसपास गुण मिळाले आणि बऱ्यापैकी गाजावाजा झाला. 

आजच्या पोस्टचा विषय आहे तो SSC बोर्डातील वाढत्या गुणांची टक्केवारी.  मी आधी सांगितल्याप्रमाणं आधीच्या काळातील बोर्डात आलेली मुलं ९३ - ९४ टक्क्यांच्या आसपास गुण मिळवायची. त्यांना ९७ - ९८ टक्के मिळायचे नाहीत ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही भागाचा अभ्यास केला नसायचा किंवा त्यांना काही गणितं येत नसत. साधारणतः भाषा विषयात पुर्ण गुण देण्याची पद्धती नसे. कारण भाषा शिकवणारे शिक्षक विद्यार्थ्यांकडुन आलंकारिक भाषेची अपेक्षा करायचे. त्यामुळं पंधरा गुणांचं निबंधलेखन असलं की दहा - बारा गुणांहुन अधिक अपेक्षा विद्यार्थीसुद्धा करत नसत. संदर्भासहित स्पष्टीकरण म्हटलं की विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीने गगनभरारी घेतली पाहिजे अशी परीक्षकांची अपेक्षा असायची. ५० - ५० गुणांचं हिंदी संस्कृत घेण्यापेक्षा १०० गुणांचं संस्कृत घेण्याची मग पद्धती राजमान्य झाली. त्यामुळं अधिक गुण मिळण्याची शक्यता वाढीस लागली. 

नक्की वर्ष सांगता येत नाही, पण मधल्या काळात हा परीक्षकांचा जुना दृष्टिकोन कोठंतरी बदलला आणि आघाडीच्या विद्यार्थ्यांना मग ९७ - ९८ आणि  कधीतरी १०० टक्के सुद्धा मिळू लागले. ह्यामागची नक्की कारणं सांगण्यासाठी ह्या क्षेत्रातील मी तज्ञ नाहीये. पण माझा अंदाज एक दोन संभाव्य कारणांकडे झुकतो. 

१> CBSE, ICSE सारख्या बोर्डातील विद्यार्थ्यांच्या अधिकच्या टक्क्यांना स्पर्धात्मक असे गुण आपल्या बोर्डातील विद्यार्थ्यांना सुद्धा मिळावेत असं एक धोरण SSC बोर्डाच्या उच्चपातळीवर स्वीकारलं गेलं असावं. 

२> SSC बोर्डात शिकवणाऱ्या शिक्षकांची जी नवीन पिढी गेल्या काही वर्षात आली, तिनं गुणांच्या बाबतीत आधीच्या शिक्षकांइतकं कर्मठ धोरण स्वीकारलं नाही. ह्या नवीन शिक्षकवर्गाच्या  काहीशा मुक्त धोरणामुळं (ज्याला कारण १ सुद्धा काही प्रमाणात जबाबदार असावं ) एकंदरीत गुणांच्या टक्केवारीत लक्षणीय वाढ झाली. 

ह्या गुणवाढीबद्दल माझं एकच मत आहे. हल्लीचे ९० - ९१ टक्के पुर्वीच्या ९० - ९१ टक्क्यांच्या समतुल्य नाहीत. पण ह्याची जाणीव सर्वदुर पसरली नाही. त्यामुळं ह्या जाणिवेने  ज्या पालकांच्या मनात घर केलं नाही ते पालक दहावीतील ह्या गुणांमुळं आपल्या पाल्याविषयी, त्याच्या भविष्यातील यश कायम टिकवण्याच्या क्षमतेविषयी नको तितक्या अपेक्षा बाळगण्याची शक्यता वाढीस लागते. आणि मग त्या अपेक्षांचं अवास्तव ओझं घेऊनच ह्या विद्यार्थ्यांना आपलं भविष्य घडवावं लागतं. 

SSC बोर्डातील दहावीतील गुणांची टक्केवारी वाढविण्याचा निर्णय ज्या शिक्षणतज्ञांनी घेतला त्यांनी ह्या वाढत्या टक्केवारीच्या सामाजिक परिणामांचं दायित्व घेणं अपेक्षित आहे हाच माझा मुद्दा ह्या पोस्टद्वारे मी अधोरेखित करु इच्छितो. आता मी हाच आक्षेप CBSE, ICSE बोर्डातील विद्यार्थ्यांच्या बाबतीत का घेत नाही असंही काहीजण म्हणु शकता !  म्हणणं काही अंशी बरोबर आहे. पण फरक दोन बाबतीत आहे. एक म्हणजे ह्या बोर्डातील विद्यार्थ्यांच्या यशाचा प्रसिद्धीमाध्यमाद्वारे फारसा गवगवा काही कारणास्तव केला जात नाही. आणि दुसरी म्हणजे CBSE, ICSE बोर्डातील विद्यार्थी त्यांच्या अभ्यासक्रमामुळं पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमात जास्त सहजरित्या वाटचाल करु शकतात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...