मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, १९ जुलै, २०१७

खट्याळ वासरू !


लहानपणी मराठी पुस्तकात खट्याळ वासराची गोष्ट होती. मोठी माणसं जे काही चार अनुभवाचे बोल सांगतील ते ऐकायची ह्या खट्याळ वासराची अजिबात तयारी नसायची. पुर्वीच्या काळी प्रत्यक्षात आणि गोष्टींत अनुभवी माणसांचा आणि सत्याचा विजय व्हायचा. हल्ली सर्व काही बदललंय. जो जास्त आक्रमक, गडबड करणारा त्याचा काही काळापुरता का होईना पण विजय होतो. 

भारतीय क्रिकेटमध्ये सध्या काही चाललंय त्या निमित्तानं ही पोस्ट ! म्हणजे भारतीय संघ चांगला खेळतोय पण जगात नंबर एक वगैरे अजिबात नाहीये. गेल्या मोसमात १३ कसोटी सामने भारतात खेळुन आपण त्यातील बहुतांशी सामने जिंकले आणि त्यामुळं आपली जागतिक क्रिकेटमधील क्रमवारी वर गेली. ही जागतिक क्रमवारी वगैरे सब झूट आहे. जो पर्यंत तुम्हांला ऑस्ट्रेलिया, दक्षिण  आफ्रिका आणि इंग्लंड मधील वेगवान आणि चेंडू स्विंग होणाऱ्या खेळपट्ट्यांवर सामने जिंकता येत नाहीत तोवर बाकीच्या फुगवलेल्या आकडेवारीला काही अर्थ नाही. बाकी जागतिक क्रमवारीचा शौक आपण भारतीय सोडून बाकी कोणाला फारसा असेल असं मला वाटत नाही. 

आता तुम्ही म्हणाल की ICC च्या स्पर्धेतील भारताची कामगिरी कशी जबरदस्त असते. आता हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. म्हणजे खऱ्या क्रीडाशौकिनांच्या दृष्टीनं ! म्हणजे इंग्लंडमधील मे - जुन मधील महिने म्हणजे त्यांच्या क्रिकेट मोसमाचा पूर्वार्ध, ह्या महिन्यांत खेळपट्टीवर गवत असायला हवं, आणि चेंडू स्विंग व्हायला हवा. पण भारताची कामगिरी अशा स्पर्धांत चांगली झाली नाही तर पुरस्कर्त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो मग खेळपट्ट्यांचं रुप अगदी उघडेबोडकं होतं. अगदी राजकोटच्या खेळपट्टीप्रमाणं! मग सामना हरलेला मॉर्गन कुठंतरी बोलून जातो - "आम्हांला Home Advantage मिळालाच नाही" मला अशा TOI मध्ये अगदी कोपऱ्यात आलेल्या बातम्या बरोबर दिसतात. बाकी आपण बाकीच्या देशांचे आपल्या आर्थिक क्षमतेच्या जोरावर हात पिळू शकतो ह्याचा मला एक देशप्रेमी म्हणुन फार मोठा अभिमान वाटतो ही बाब वेगळी !

बाकी आंतरराष्ट्रीय क्रिकेटकडे एक शुद्ध रसिक म्हणुन पाहणं मी बऱ्याच आधीपासुन थांबवलं. जर क्रिकेटच्या शुद्धतेची तल्लफ आली तर मी रणजी सामने फॉलो करतो. तिथं शुद्ध क्रिकेट अनुभवायला मिळण्याची शक्यता बरीच जास्त असते. 

आता मुळ मुद्द्याकडं ! प्रकार असा झाला की विराट आणि भारताचे या आधीचे प्रशिक्षक अनिल कुंबळे ह्यांच्यात काही काळापासुन मतभेद निर्माण झाले होते. दोन किंवा अधिक माणसं एकत्र आली की मतभेद हे होणारच. पण त्यातील कोणी एकानं जरा जास्तच ताणुन धरलं किंवा हे मतभेद वैयक्तिक पातळीवर घेतले की परिस्थिती मग बिकट होते. इथंही तसंच झालं. विराट म्हणजे भावनिक असंतुलनाच्या सीमारेषेवर हिंदकोळे घेणाऱ्या बऱ्याच भारतीय तरुणवर्गाचा प्रतिनिधी ! हे मतभेद त्याला झेपले नसावेत, गडी गेला बॉसच्या बॉसकडं ! म्हणजे भारतीय क्रिकेट मंडळाकडं; ऑफिसात स्किप लेव्हल मीटिंग होतात तसला हा प्रकार झाला. म्हणजे स्किप लेव्हल मीटिंगच्या मी विरोधात आहे असला अर्थ बिलकुल कोणी काढु नये! इथं नक्की काय झालं असावं हे समजायला जोवर विराट आत्मचरित्र लिहीत नाही तोवर वाव नाही. पण अंदाज बांधला तर असं वाटतं की विराट म्हणाला असेल "मी नाही जा ! एकतर तो राहील नाहीतर मी !" आता बोर्डानं विचार केला असावा सध्या ह्या दोघांतील आपल्याला विराटची जास्त गरज आहे म्हणून मग त्यांनी कुंबळेला समजावलं असेल की सध्या तू शांत बस. बाकी कुंबळे पडला इंजिनीयर ! आयुष्यात असे चढाव उताराचे प्रसंग येतातच हे त्यानं सबमिशन, सेमिस्टर ह्या सर्व गोष्टींतुन अगदी पुर्वीपासून पाहिलं असेल. त्यामुळं तो शांतपणे बाजुला झाला. अगदी धरणात बुडालेल्याकाही मित्रांपैकी वाचलेल्या मित्राची मुलाखत घेण्याचं मानवी संवेदनशीलतेला काळिमा फासण्याचं कृत्य करणाऱ्या वाहिन्यांपासुन सुद्धा तो दूर राहिला. विराटची पसंती रवी शास्त्रीला होती आणि त्यानं ते अगदी जगजाहीर केलं होतं. आणि बोर्डानं ह्या पदासाठी अर्ज मागावयाचा फार्स करुन मग शास्त्रीमहाशयांची नेमणुक केली. आता त्या सर्व प्रकारात मला जिच्या अस्तित्वाचं प्रयोजन समजलं नाही अशी CAC (Cricket Advisory Committee) ही समिती अस्तित्वात होती. ह्यात तीन महारथी सचिन, गांगुली आणि लक्ष्मण होते आणि त्यांनी मुख्य प्रशिक्षकाच्या सहाय्यक पदासाठी राहुल आणि झहीर ह्यांची शिफारस केली होती. ह्या सर्व शिफारसी धाब्यावर बसवुन शास्त्री ह्यांनी आपल्या पसंतीच्या लोकांचं घोडं पुढे दामटले. 

एकदंरीत काय हा सर्व वैयक्तिक पसंतीचा कारभार सुरु आहे. अनुभवी लोकांचं म्हणणं पुर्णपणे दुर्लक्षित केलं जात आहे. सद्यकालीन खेळाडूंमध्ये विराट निर्विवादपणे अग्रगण्य आहे. पण एका व्यक्तीचं शहाणपण शहाण्या माणसांच्या एकत्रित शहाणपणापेक्षा जास्त काळ श्रेष्ठ ठरू शकत नाही हे सर्वकालीन सत्य त्यानं लक्षात घ्यायला हवं. आणि राहता राहिला तो शास्त्री! आपल्या Executive Presence चा वापर करुन त्यानं स्वतःचा बरंच हित साधुन घेतलं आहे. हा इतका चांगलं बोलतो की दारुण पराभवाचं सुद्धा असलं समर्थन करील की आपल्यालाच आपल्या मनात आलेल्या भारतीय खेळाडूंविषयीच्या रागाबद्दल अपराधीपणा वाटेल. 

जाता जाता सचिन, गांगुली आणि लक्ष्मण ह्या अनुभवी त्रयीबद्दल. ज्ञानी माणसाला, कलाकाराला आपला मान आपल्याला राखता हवा. जिथं आपल्या कौशल्याची कदर केली जात नाही तिथुन शांतपणे बाजुला होता आलं पाहिजे, जसं अनिलने केलं तसं. ज्यांनी कदर केली नाही त्यांना योग्य वेळी त्याची जाणीव होतेच फक्त ती जाणीव सामाजिक पातळीवर उघडपणे मान्य करण्याचा मोठेपणा त्यांना दाखवता येतो का नाही हे ठाऊक नाही.  

रणजी मौसम कधी सुरु होतोय कुणी सांगाल का?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

ज्ञानामृताचे (हेवी) डोस

  दो न पिढ्यांमध्ये मतभेद असणं हे मनुष्यजातीच्या जिवंतपणाचं लक्षण आहे. आपले नातेवाईक आणि आपण ह्यांच्यातील नात्यांमध्ये आयुष्यभर स्थित्यंतर ह...