आज दिनांक ३१मे २०१७. हॉटेल ल निनाला गुड बाय करत आम्ही सकाळी लवकरच मकावच्या फेरीसाठी निघालो. एकंदरीत मकावचे प्रशासन हा काहीसा गुंतागुंतीचा प्रकार आहे. मकावला काही प्रमाणात स्वायत्तता असली तरी चीनच्या सरकारचे नियंत्रण ह्या प्रदेशावर आहे.
आमच्या बसने आम्हांला हाँगकाँगच्या टर्मिनलजवळ सोडलं. तिथं मग सागरने नेहमीप्रमाणं आम्हांला विविध सोपस्कार पार पाडत फेरीची तिकिटं मिळवुन दिली. तिथं केसरीचा देखील एक ग्रुप आला होता. शेवटच्या क्षणी त्यांचा थोडाफार गोंधळ उडाला होता. त्यांना सागरने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत करून दिली.
बऱ्याच ठिकाणी स्थानिक नागरिकांना विशिष्ट रांगा होत्या जिथं त्यांची प्रवेश प्रक्रिया लवकर पूर्ण होत असे. एका मोठ्या ग्रुपचे सदस्य असल्यानं जरी विलंब होत असला तरी परदेशात स्वतःच्या देशाच्या नागरिकांना प्राधान्य देण्याची प्रवृत्ती सर्वत्र आढळुन येते. आपल्याच देशात अफाट लोकसंख्येमुळं आपण आपल्या देशबांधवांना फारसं महत्व देत नाही, ह्या काहीशा खंतावणाऱ्या भावनेच्या आठवणीनं पुन्हा उचल खाल्ली.
थोड्या वेळानं फेरी आली आणि आम्ही आमच्या बॅगांसोबत फेरीच्या दिशेनं कूच केलं. इथं काही वेळ आपल्यालाच आपल्या बॅगा उचलून न्यायची वेळ येते त्यामुळं एकतर आपण त्यासाठी सक्षम असायला हवं किंवा हलकं सामान घेऊन प्रवास करण्याची आपणास सवय असावी.
फेरीचा आतील भाग प्रशस्त होता. एकंदरीत आसनांची सोय पाहता विमानाच्या बैठक व्यवस्थेशी साधर्म्य दिसुन येत होतं. पण साधर्म्य इथंच संपत होतं. भोजन व्यवस्था अथवा समोरील स्क्रीनवर करमणुकीची साधनं असला प्रकार नव्हता.
बोट सुरु झाली आणि पाण्यावर हिंदकोळे घेत तिचा प्रवास सुरु झाला. बस लागणारे प्रवासी, विमान झपाट्यानं उतरू लागल्यावर कानात दडे बसणारे प्रवासी मी बरेच अनुभवले आहेत. आज फेरीचे हिंदकोळे न अनुभवणारे प्रवासी अनुभवायची वेळ येते की काय अशी शंका मनात निर्माण झाली. पण सुदैवानं आमचा सर्व ग्रुप सहीसलामत प्रवास पुर्ण करू शकला.
थोड्या वेळातच मकाव आलं. मकावचं इमिग्रेशन बरंच लांबवर आहे आणि फेरीपासून तुम्हांला दहा पंधरा मिनिटं बॅगा घेऊन कूच करावं लागेल ह्याची पुर्वसुचना सागरने आधीच दिली होती. त्यामुळं ही पंधरा मिनिटांची चाल सहन करायला आम्हांला काही कष्ट पडले नाहीत. मकावचे इमिग्रेशन अधिकारी पाहुण्यांना त्रास देण्यासाठी हाँगकाँगच्या अधिकाऱ्यांइतके कुख्यात नसावेत असा अंदाज एकंदरीत सागरच्या बोलण्यावरून आम्ही काढला होता.
प्रत्यक्षात सुद्धा तसाच अनुभव आला. अचानक इतके "वीणा" ईट आलेले पाहुन त्यांनी चक्क एक नवीन कक्ष देखील चालु केला. आपली रांग बरीच लांब असेल तर निरर्थकपणे केवळ ९० अंशाच्या कोनात समोर न पाहता ३० अंशाच्या कोनात उजवी आणि डावीकडे पाहत राहावं आणि एखादा नवीन काउंटर उघडल्यास झपाट्यानं तिथं धाव घ्यावी ही "नवरा Formatting" ह्या कार्यक्रमांतर्गत लग्नानंतर मिळालेली शिकवण इथं कामी आली. ही शिकवण वेळोवेळी बोरिवली स्टेशनवर उपयोगी येते. अशा वेळी मी त्या रांगेत प्रथम स्थान मिळविल्यानंतर नजरानजर होताच "बघ मी कसा स्मार्ट आहे" ह्या माझ्या नजरेतून दिलेल्या मेसेजला "मी शिकवलं म्हणून " हे उत्तर सुद्धा नजरेतूनच मिळतं. आणि मग दोघांच्या चेहऱ्यावर आपोआप हसू येतं !
मकावचे प्रथम दर्शन ! इथंच एक छोटासा विमानतळ देखील आहे.
इथून आम्ही भोजनस्थळाच्या दिशेनं प्रस्थान केलं. इथं प्रचंड गर्दी होती. कसंबसं बसण्याच्या जागा मिळवुन आम्ही भोजन आटपून घेतलं. खरंतर जेवण होतं चवदार पण गर्दीमुळं आटपते घ्यावं लागलं.
भोजनानंतर आमचा मोर्चा मकाव टॉवरकडे वळला. ह्या टॉवरची उंची ३३८ मीटर असून २३३मीटरच्या उंचीवर स्कायवॉक आणि बंजी जम्पिंगचे पर्याय उपलब्ध आहेत. ह्या ठिकाणावरून घेतलेलं मकाव शहराचं मनोहर दृश्य !
आकाशचालीसाठी निघालेली ही मंडळी ! ही बसलेली स्त्री काहीशी घाबरली होती. बसण्याआधी तिनं नको नको म्हणत थोडाफार विरोध केला पण नंतर मात्र ती शांत झाली. ह्या टॉवरच्या बाह्य रिमवरुन ही मंडळी आपली आकाशचाल पुर्ण करत होती.
त्या नंतर मी बंजी जम्पिंग करणारा एक युवक अगदी जवळुन पाहिला. त्यानं व्यवस्थित तयारी केली. बाजूला असणाऱ्या कॅमेरांच्या दिशेने हातवारे केले पण ज्यावेळी प्रत्यक्ष तो क्षण आला त्यावेळी तो काहीसं गंभीर झाला. ज्या वेगानं तो खाली गेला त्यावेळी माझ्या हृदयाचा ठोका चुकला. केवळ एका दोराच्या शाबुत राहण्याच्या शक्यतेवर आपलं पूर्ण जीवन पणाला लावणं कदाचित मला शक्य होणार नाही. कदाचित कशाला अजिबातच !
त्या नंतरचे पर्यटनस्थळ होते ते एक म्युझियम - Museu do Vinho (Macau)! इथं एका भागात विविध प्रकारच्या कारचा इतिहास त्यांच्या मॉडेलच्या रूपांतून मांडला गेला होता आणि दुसऱ्या भागात शेतीचा (बहुदा इथला स्थानिक) इतिहास विविध अवजारं वगैरेच्या माध्यमातून मांडला गेला होता. द्राक्ष आणि मद्य म्हटलं की दर्दी लोकांना त्यांची चव घेण्याची सोयसुद्धा उपलब्ध करून देण्यात आली होती. कधी नव्हे ते मी सुद्धा स्वतःचे फोटो काढून घेण्यात रस दाखविला.
ह्या म्युझियमच्या भेटीनंतर अजून एक स्थळदर्शन होतं आणि ते म्हणजे तीन वेळा जाळून सुद्धा पुन्हा उभारल्या गेलेल्या चर्चची भिंत ! पण उन्हातून चालत जाण्याचा पर्याय आम्ही न स्वीकारता बसमध्ये बसून राहणं पसंत केलं. जे कोणी लोक जाऊन आले त्यांच्या उन्हानं कोमजलेल्या मुद्रा पाहून त्यांना 'कशी होती भिंत ?" हा प्रश्न विचारणं औचित्याला धरून इष्ट होणार नाही असा ग्रह करून आम्ही गप्प बसलो.
सायंकाळ होत आली होती. आमचं हॉटेल हॉलिडे इन् एका आलिशान मॉलच्या परिसरात होतं आणि तिथंच कॅसिनोसुद्धा होता. ह्या परिसराचं नाव 'Estrada do Istmo' असं आहे. इथं हरवलात तर तुम्हांला शोधणं फार कठीण जाईल अशी तंबी सागरने आधीच देऊन ठेवली होती. रूममध्ये चेकइन करण्यासाठी बरेच सोपस्कार (पासपोर्ट घेऊन ) सागर करत होता. तो वेळ आम्ही छायाचित्रणासाठी सत्कारणी लावला.
रूमच्या चाव्या मिळाल्या पण एका तासातच परत यायचं होते ते जेवणासाठी ! रूमच्या बाहेरील पाईप दृश्य !
पुन्हा रूम मधून खाली उतरल्यावर सागरसोबत आमची वरात निघाली ती जेवणाच्या दिशेनं ! हा मॉल खरोखर आधुनिक होता. जागतिक दर्जाच्या सर्व प्रतिशयत ब्रँडची दुकानं इथं पावलोपावली होती! नशिबानं ह्या सर्व किंमतींचा अंदाज बाहेरूनच येत असल्यानं खरेदीचा हट्ट वगैरे झाला नाही. का कोणास ठाऊक पण इथं माझे बरेच फोटो मी काढून घेतले. सरासरी एका वर्षात माझे जितके फोटो निघतील तितके ! बहुदा मॉल चांगला होता किंवा शर्ट चांगला आहे असा माझा समज झाला म्हणून ! जागतिक दर्जाच्या लेखकाचे जागतिक दर्जाच्या मॉलच्या पार्श्वभुमीवर फोटो असा मथळा १०० वर्षानंतर कोणीतरी ह्यातील एखाद्या फोटोला देईल असा माझा अंदाज आहे !
रुचकर जेवणानंतर आम्ही भोवतालच्या नयनरम्य परिसराचा फेरफटका मारण्यासाठी निघालो. डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा परिसर होता. आम्ही जमेल तितकी फोटोग्राफी करून घेतली.
बाकी मग वचन दिलेल्या १० मिनिटांऐवजी २० मिनिटं घेऊन आम्ही बाहेर आलो तर दोघांचाही संयम संपत आला होता. मग पुन्हा एकदा त्या आलिशान मॉलचं दर्शन घेऊन आम्ही रूमवर परतलो. उद्याचा दिवस होता तो परतीचा
मकाव - हॉंगकॉंग - सिंगापूर - मुंबई असा परतीचा प्रवास ! खरंतर आज दिनांक १६जुलै ह्या सहलीला दीड महिना होऊन गेला आणि त्यामुळं बऱ्याच आठवणी धुसर झाल्या. ह्या सहलीतील सहप्रवाशांचा उल्लेख सुद्धा मी फारसा केला नाही. नगरकर डॉक्टर कुटुंबिय, सांगलीचे कुलकर्णी (ऍसिडिक इंद्रजित, उत्साही अमिता आणि आपल्या हजरजबाबी बोलण्यानं सदैव लक्षात राहील अशी निहारिका), बारा जणांच्या ग्रुप मध्ये आलेलं उत्साही आधुनिक जोशी कुटुंबिय आणि त्यांचे नातेवाईक आणि सर्व सहप्रवासी - आपण ही सहल खूपच संस्मरणीय केली ! खास आभार सागरचे त्यानं सर्वांचीच अगदी मनापासून काळजी घेतली !
खरंतर सारं काही फुरसतीत लिहायला हवं होतं पण पुर्णपणे जमलं नाही! शेवटचा दिवस केवळ प्रवासाचा असल्यानं त्याच वर्णन मी लिहीन असं वाटत नाही. जितकं जमलं तितकं लिहिलं! गोड मानुन घ्यावं !
(समाप्त )
आधीच्या भागांच्या लिंक्स
भाग १
http://patil2011.blogspot.in/2017/06/blog-post.html
भाग २
http://patil2011.blogspot.in/2017/06/blog-post_3.html
भाग ३
http://patil2011.blogspot.in/2017/06/blog-post_11.html
भाग ४
http://patil2011.blogspot.in/2017/06/blog-post_26.html
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा