Monday, June 26, 2017

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ४
आज दिनांक २९ मे. आज सिंगापूर इथलं वास्तव्य संपवुन आम्ही हॉंगकॉंगला प्रस्थान करणार होतो. हे विमान सकाळी ८:४० वाजताचे असल्यानं आम्ही सकाळी ५ वाजताच विमानतळाकडे प्रयाण केलं. इतक्या सकाळी आम्हां सर्वांना नास्ता देणं शक्य नसल्यानं सर्वांना पॅकबंद कोरडा नास्ता आणि ज्युस देण्यात आला. तौफिक इतक्या भल्या पहाटे हॉटेलवर हजर होता आणि आमच्यासोबत आम्हांला सोडण्यास विमानतळावर सुद्धा आला. 

सिंगापूर एअरलाईन्सनं  आम्हां वीणा वर्ल्डवाल्यांना खास वागणुक दिली असं मला वाटून गेलं. आमच्यासाठी खास दोन तीन कॉउंटर उघडण्यात आले होते. त्यामुळं आमचं चेक-इन झटपट आटपलं. आणि मग मिळालेला वेळ आम्ही सर्वांनी विंडो शॉपिंग आणि फोटो शुटिंगमध्ये व्यतित केला. 


तिथं आम्ही सर्वांनी दिलेल्या नाश्त्याचा फडशा पाडला. निहारिका ही विमानतळावरील धावत्या मार्गिकेवरून वेगानं धावत पुढंमागं करीत होती. तिला ओरडण्याचा मी उगाचच प्रयत्न करत होतो. सुरुवातीला हा प्रयत्न यशस्वी झाला असं वाटलं पण नंतर मात्र तिनं आपली ही धावपळ सुरूच ठेवली. 

विमान तसं वेळेवर आलं होतं. पुन्हा एकदा A380 होतं. खिडकीची सीट मिळविण्याचा प्रयत्न सोहमशी वाटाघाटी अयशस्वी झाल्यानं सफल झाला नाही. सर्वजण वेळेवर स्थानापन्न झालो असलो तरी विमानानं वेळेवर उड्डाण केलं नाही. वैमानिकानं त्याबद्दल रीतसर दिलगिरी व्यक्त केली. चीनचे आणि बाजूच्या देशांचे संबंध दक्षिण चीन समुद्राच्या प्रश्नावरून ताणले गेले असल्यानं एका विशिष्ट वेळीच त्या समुद्रावरून उड्डाण करावं असं काहीसं तो वैमानिक म्हणाला असं मला वाटलं. चीन हा तसा दादागिरी करणारा देश असल्यानं मला फारसं आश्चर्य वाटलं नाही. हे प्रयाण तसं काहीसं नियमित स्वरूपाचं नव्हतं. इथं एका परदेशातून अजुन दुसऱ्या परदेशात आम्ही प्रवास करत होतो. 

शेवटी एकदा ८:४० चं विमान साडेनऊच्या आसपास निघालं. हवेत स्थिरस्थावर झाल्यावर लगेच हवाई सुंदरी आणि हवाई सुंदर मंडळींची खानपानसेवेची लगबग सुरु झाली. हिंदू नॉनव्हेज मिल मध्ये मासे आणि बाकीचे प्रकार होते. हवेत सर्व काही क्षम्य आहे ह्या विचारांती आम्ही फारसं मनाला लावून घेतलं नाही. 

हाँगकाँग जसं जवळ येत चाललं तसं विविध बेटं आम्हांला दिसू लागली. त्यापैकी काही बेटांचं प्राजक्ताने केलेलं छायाचित्रण!  

हॉंगकॉंगचे लँडिंग जरा हादरा देणारं असंच होतं. एकदम दणक्यात आपटून मग वैमानिकानं विमान वेळीच थांबविण्यात यश मिळविलं. हॉंगकॉंगच्या इमिग्रेशनसाठी लागणारा सहजसुलभ फॉर्म आम्ही आधीच भरुन ठेवला होता. हाँगकाँगचे इमिग्रेशन अधिकारी काहीसे खडूस असतात आणि उगाचच येणाऱ्या प्रवाशांना त्रास देतात असं सागरने बजावून ठेवलं होतं. तुमचा आवडता अभिनेता कोणता असा प्रश्न विचारल्यास अक्षयकुमार असं उत्तर द्यावं असं त्यानं आम्हांला बजावून ठेवलं होतं. चीनच्या अधिकाऱ्यांशी पंगा घेण्याच्या मूडमध्ये मी नसल्यानं असा काही प्रश्न विचारला गेल्यास निमुट तेच उत्तर द्यावं असं मी मनोमनी ठरवलं होतं. नशिबानं आमच्यापैकी कोणालाच हाँगकाँगचे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी त्रास दिला नाही. आणि त्यामुळं आमच्यापेक्षा सागरनेच जास्त सुटकेचा निश्वास टाकला. 
विमातळावर वाय फाय फ्री होतं. त्यामुळं मंडळी सर्व खाली माना घालून आपल्या भ्रमणध्वनीसोबत मग्न झाली. 

हल्ली प्रत्येक देशात स्थानिक गाईड असावेत असा नियम अंमलात आणला गेला आहे. आम्हांला लिली नावाची गाईड मिळाली होती. तिनं आमच्यासाठी सबवे सँडविच आणि सफरचंदच्या स्वादाचं शीतपेय ह्यांची सोय केली होती. भूक असो वा नसो समोर आलेल्या अन्नाला नाही म्हणायचं नाही ह्या तत्वाचा स्वीकार करून आम्ही त्याचा फडशा पाडला. 

अखेरीस बसमध्ये आसनस्थ होऊन आमच्या हॉंगकॉंगमध्ये प्रवासास आरंभ झाला. लिली स्वतःशीच बडबडत होती असं मला वाटत होतं. पण तिच्या बोलण्याकडं फारसं लक्ष न दिल्यानं वैतागुन तिनं आम्हां सर्वांना एकतर तुम्ही बोला किंवा मी बोलीन असा निर्वाणीचा इशारा दिला. तिच्या ह्या धमकीला आम्ही तसे घाबरत नव्हतो पण केवळ गाईड ह्या पदाचा मान म्हणून आम्ही तिच्या बोलण्याकडे लक्ष देण्याचं ठरवलं. 

हॉंगकॉंगचे बसमधून दिसणार दर्शन विहंगम वगैरे होतं असं मी उगाचच म्हणणार नाही. ऊन मी म्हणत होतं. 
काही वेळानं बस एका फारशा आधुनिक नसणाऱ्या भागात थांबली. टुकार अशा एका ज्वेलरी दुकानात आम्हांला नेण्यात आलं. आमचे अचंबित चेहरे पाहुन ही भेट वीणा वर्ल्डच्यातर्फे नसुन लिलीच्या आग्रहास्तव असल्याचा खुलासा तात्काळ सागरने केला.  
त्यांनतर आम्हांला समुद्रकिनाऱ्यावर नेण्यात आले. ही वेळ चुकीचीच होती . साडेपाच वाजले असले तरी उन्हाचे चांगलेच चटके बसत होते. 


ह्या फोटोत जे काही बंगले दिसत आहेत (दिसत नसले तरी आहेत असा समज करुन घ्या !) त्यातील एका बंगल्यात जॅकी चॅन राहतो आणि तुम्ही सुदैवी असल्यास तो काही वेळ बाहेर येऊन पर्यटकांना हात करतो असे सागर म्हणाला. लिली ही गाईड आम्हांला मिळाली म्हणजे आमचे सुदैव कितपत जोरात आहे ह्याची अटकळ आधीच आम्ही बांधली होती. त्यामुळं आम्ही जॅकीच्या दर्शनाची आस मनी धरली नाही. फारशा आकर्षक नसलेल्या बीचच्या भेटीनंतर आमची बस स्काय टेरेस हाँगकाँगच्या दिशेनं वेगानं दौडू लागली. हा मार्ग एका मार्गिकेचा होता. पण ड्रायव्हर अगदी कौशल्यानं बस हाकत होता. 


वाटेत लागलेलं हे एक क्रिकेटचं मैदान ! हॉंगकॉंग इथं होणारी सिक्स अ साईड ही स्पर्धा ह्याच मैदानावर होत असावी असा सोयीस्कर समज मी करून घेतला. 


जसजसं आम्ही उंचावर जात होतो तसतसं दृश्य विहंगम होत होतं. थोड्याच वेळात आम्ही स्काय टेरेस हाँगकाँग इथं पोहोचलो. हॉंगकॉंगचा हा सर्वाधिक उंचीचा भाग! इथून उंच बिल्डिंगवाल्या हॉंगकॉंगचा विहंगम दृश्य पाहायला मिळतं. इथं वारा अगदी वेगानं वाहत होता त्यामुळं छायाचित्रणास अडथळा येत होता. तरीदेखील जिद्दीनं आम्ही काही फोटो काढले.  


(फोटो सौजन्य - अभिजीत जोशी )

खाली उतरल्यावर इंद्रजित ह्यांनी चौकशी करून चहा कुठं मिळेल हे शोधून काढलं आणि मग आम्ही त्या प्रसन्न वातावरणात चहाचा आस्वाद घेतला. 

त्यानंतर एका चांगल्याशा उपहारगृहात भरपेट जेवण करून आम्ही पुन्हा खरेदीला लेडीज मार्केटमध्ये खरेदीला बाहेर पडलो. सकाळी चारच्या आधी उठलेले जीव खरंतर बिछान्यात जाऊन झोपण्याचे मनसुबे रचत होते पण देवाच्या आणि वीणा वर्ल्डच्या मनात मात्र वेगळंच होतं. 

लेडीज मार्केट म्हणजे flea मार्केट. इथं घासाघीस करण्यास पूर्ण वाव. पण आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या असा सल्ला आम्हांला  आधीच देण्यात आला होता. त्यामुळं मी सावधगिरीचा पवित्रा बाळगून होतो. 


फारशी काही खरेदी न करता आम्ही दिलेल्या वेळी परत आलो. आमच्या सहप्रवाशांचा मोबाईल आम्ही जिथं जेवण घेतलं त्या हॉटेलात राहिला होता. लिली आणि सागरनं मेहनत करून तो परत मिळेल ह्याची सोय केली. 

शेवटी बस पुन्हा एकदा सुरु झाली ती आम्हांला आमच्या ८२ मजली L'Nina ह्या हॉटेलवर घेऊन जाण्यासाठी! आम्हांला ३८ व्या मजल्यावर खोली मिळाली होती. ह्या मजल्यावरून हाँगकाँग शहराचं दिसणार रूपं अगदी विहंगम होतं. आकाशातून आपण एका चकमकणाऱ्या शहराकडं पाहत आहोत असा भास होत होता. 
सकाळी चारला सिंगापुरला उठलो तो नक्की आजचाच दिवस होता ना ह्याविषयी शंका व्यक्त करुन आम्ही झोपी गेलो. 

दिनांक ३० मे हॉंगकॉंग - डिस्नेलँड 

८२ मजली हॉटेलातील सर्व पाहुण्यांना एकत्र नास्ता द्यायचा म्हणजे खानसाम्याला किती मेहनत करावी लागत असणार ह्याचा विचार करतच आम्ही नवव्या मजल्यावरील ब्रेकफास्ट रूम मध्ये शिरलो. इथं बऱ्यापैकी प्रशस्त आसनव्यवस्था होती. चीनमध्ये असल्यानं आम्ही प्रत्येक पदार्थाकडे शंकेनं पाहत होतो. शेवटी मफिन, ज्यूस, अंडी आणि ब्रेडच्या आधारे आम्ही आमचा नास्ता आटपला. परंपरेला धरून थोडं छायाचित्रण सुद्धा केलं. उगाचच एखाद्या स्थळाला आम्ही फोटो न काढल्यामुळं न्यूनगंड यायला नको. 


काही मंडळींना बसमध्ये येण्यास उशीर झाला . त्यांची सागरने काहीशा मृदू स्वरात खरडपट्टी काढली. आणि बस डिस्नेलँडच्या दिशेनं धावू लागली. आज कोणतातरी फेस्टिवल असल्यानं रहदारी जास्त असू शकते असं सागर म्हणाला. त्यामुळं बुधवार असल्यानं सर्व राईड अगदी कमी गर्दीत मिळतील असा समज असलेली आमच्यातील काही मंडळी चिंतेत पडली. 

आतापर्यंत बसचा प्रवास कमी असल्यानं वीणा वर्ल्ड स्पेशल अंताक्षरी खेळण्यास सागरला संधी मिळाली नव्हती. ती उणीव त्यानं ह्या प्रवासात भरून काढली. सुधीर जोशी ह्यांनी आपल्या भारदस्त आवाजात जुनीपुराणी हिंदी गाणी गाऊन सर्वांचे मनोरंजन केलं. ते बारा जणांच्या ग्रुपमधील असल्यानं बाकीजण त्यांना अधूनमधून दाद देणं, त्यांची थोडीफार मस्करी करणं हे प्रकार सुरु होते. काही महिलावर्गाने सुद्धा अगदी जुनी गाणी गाऊन आपल्या रसिकतेचा प्रत्यय आणून दिला. सागरने सुद्धा चांगलं गायन केलं. वीणा वर्ल्ड ह्या सर्व टूर व्यवस्थापकांना गाण्यांचं प्रशिक्षण देत असावं असा मला संशय आहे. 

ग्रुप फोटो ही वीणा वर्ल्डची अजून एक प्रथा! डिस्नेच्या प्रवेशद्वाराशी काढलेला हा आमच्या ग्रुपचा फोटो ! डिस्नेमध्ये शिरल्यावर उन्हाचा प्रचंड दाह जाणवत होता. आम्ही त्याचा मुकाबला करत प्रथम 'It is a small world'  ह्या राईडच्या दिशेनं कूच केलं. ही राईड मला मनापासून आवडली. २००२ साली लॉस अँजेलिसला आम्ही दोघांनी डिस्नेला भेट दिली होती. त्यावेळी खरंतर लहान मुलांसाठी असलेल्या ह्या सर्व राईड आपल्याला सुद्धा आवडल्या म्हणून मी आश्चर्यचकित झालो होतो. आता अजुन १५ वर्षांनी सुद्धा मला ह्यातील बऱ्याच राईड आवडल्या. एकंदरीत आपल्यामध्ये अजुनही बाल्याचा काही अंश शिल्लक आहे ही भावना मला सुखावून गेली. 

ह्या राईडमध्ये जगभरातील बालकांच्या आवाजात विविध सुश्राव्य गीतं आपल्या कानांवर पडत राहतात. एकंदरीत दृकश्राव्य ह्यांचा अत्यंत सुंदर मिलाफ असलेल्या ह्या राईडचा आनंद लुटून आम्ही प्रसन्न मनानं बाहेर पडलो. सोहमला देखील ही राईड आवडली. २००२ च्या मानानं युनिव्हर्सलच्या राईड काहीशा जास्त आक्रमक झाल्या आहेत असं प्राजक्ता म्हणाली होती. त्यामानानं डिस्नेच्या राईड ह्या सुखदायक असतील अशी अपेक्षा ठेऊन आम्ही आलो होतो आणि ह्या पहिल्याच राईडनं आमची आशा पुर्ण केली. 
Mickey’s PhilharMagic

ह्या त्रिमितीय ऍनिमेशन प्रकारात आपण डिस्नेच्या विविध पात्रांच्या करामतीनं भारावुन जातो. छोटा चेतनच्या वेळी वापरलेला त्रिमितीय चष्मा वापरण्याची संधी पुन्हा एकदा मिळाली. ह्यात सांगायची गोष्ट अशी की पहिल्यांदा आम्ही इथं गेलो असता काही तांत्रिक कारणास्तव हा शो बंद झाला. आम्हां सर्वांची दिलगिरी व्यक्त करुन मग आम्हांला बाहेर जाण्यास सांगितलं गेलं. डिस्नेमध्ये सुद्धा तांत्रिक बिघाड होऊ शकतो बरं का मंडळी!  

Mystic Manor

जगभरातील काही खास गोष्टींचं हे काहीसं गूढ असं संग्रहालय! काहीसा विक्षिप्त असा जगभर प्रवास करणारा लॉर्ड हेनरि ह्याचं हे संग्रहालय. त्याच्या सोबत त्याचा माकड मित्र अल्बर्ट ! अंधारामुळं आणि हलणाऱ्या गाडीमुळं छायाचित्रणाचा दर्जा सुमार !Toy Soldier Parachute Drop
हा थोडाफार प्रमाणातील धाडसी खेळप्रकार ! ह्यात आपल्याला ह्या पॅराशूटमध्ये बसवून साधारणतः चार पाच मजल्याच्या उंचीपर्यंत वर नेलं जातं आणि मर्यादित वेगानं खाली आणलं जातं. हा प्रकार चार पाच वेळा केला जातो. सिंगल रायडर म्हणुन गेल्यानं माझ्या शेजारी अनोळखी टीनएजर बसला होता. ही राईड सुरु होण्याआधी त्यानं माझा हात पकडून सर्व काही ठीक होईल ना अशी नजरेनंच विचारणा केली. मी ही मोठ्या आत्मविश्वासानं त्याला हो रे बाबा सर्व काही ठीक होणार असं सांगितलं ! जणु काही हा सर्व प्रकार मीच डिझाईन केला होता किंवा मी ही राईड आतापर्यंत पाच दहा वेळा घेतली असेल. मग ज्यावेळी खाली थोड्याफार प्रमाणात वेगात आणलं जायचं त्यावेळी मी सुद्धा जोरात 'ओ .... ओ ' असं ओरडून घेतलं. हल्ली वाढत्या वयानुसार अशी मुक्तपणे बोंबलायची संधी मिळत नसल्यानं जिथं मिळते तिथं मुक्तपणे तिचा वापर करावा हा समवयस्कांना सल्ला ! Dumbo the flying elephant

राईडचा हा एक एकदम बच्चू प्रकार ! समोर दिसला म्हणुन घेतला. इथं रांगेत आमच्यासमोर एक चिनीवंशीय तिशीच्या आसपास असलेली स्त्री, तिचा मस्तीखोर मुलगा आणि छोटी मुलगी होती. तिला छोट्या मुलीला घेऊन काही वेळासाठी जायचं होतं. त्यामुळं आमच्याशी काहीतरी बडबडून ती त्या मुलाला आमच्यासोबत ठेवून गेली. ती परत येईपर्यंत तो मुलगा रागानं माझ्याकडं पाहत होता आणि मी ही त्याला जमेल तितकी खुन्नस देत होतो. शेवटी एकदाची ती बाई परत आली आणि मी सुटकेचा निःश्वास टाकला. त्या पोरग्यानं माझी फारशी तक्रार केली असं वाटलं नाही, कारण ती बाई मग आम्हांला धन्यवाद म्हणून निघून गेली. 

Cinderella Carousel

गावच्या जत्रेत असले प्रकार बहुदा आपण सर्वांनी पाहिले असणार. ही सुद्धा लुटुपुटीची राईड. सोहम नगरकर आणि कुलकर्णी कुटुंबियांसोबत राईड घ्यायला गेल्यानं मी आणि प्राजक्तानेच ही राईड घेतली. शूर मराठा सरदार आपल्या लाडक्या पत्नीसोबत घोडेस्वार होऊन परक्या मुलुखाची टेहेळणी करत आहे असं वर्णन करण्याचा मला इथं मोह होत आहे. Jungle river cruise 

हा एका बोटीतून प्रवास करण्याचा प्रकार ! ही राईड सुरु होण्याआधी पाण्याची कारंजी होती. तिथं यथेच्छ भिजणाऱ्या गोंडस चिनी बालकांचा हा एक फोटो ! वाढत्या वयानुसार आपल्याला कोणी गोंडस म्हणून संबोधित नाही आणि आपण असले प्रकार मनसोक्त करत नाहीत! असो !


राईडसाठी दोन प्रकारच्या रांगा होत्या. एक चिनी समजणाऱ्या लोकांसाठी आणि दुसरी न समजणाऱ्या ! आपलं नाव कोटणीस सांगून पहिल्या रांगेत शिरण्याचा मोह मी टाळला ! 


बोटीमध्ये आमच्या सोबत असलेला मार्गदर्शक उगाचच चित्रविचित्र आवाज काढून भय निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. आजूबाजूला खोटेखोटे हत्ती, मगर वगैरे येत होते. अशा वेळी आपण सुद्धा घाबरलो आहोत असा भास निर्माण केल्यास चांगली वातावरण निर्मिती होऊन सर्वांनाच बरं वाटतं. 
Hong Kong Disney Land Railroad
सोहम अजूनही नगरकर आणि कुलकर्णी ह्यांच्या सोबत होता. त्यामुळं मी आणि प्राजक्तानं रेलगाडीत बसून डिस्नेलँडची सफर केली. ह्या बऱ्याच विस्तृत भागात पसरलेल्या डिस्नेचा काही भागच ह्या रेलराईड मध्ये समाविष्ट होतो. इथं शूर मराठी सरदाराशी तुलना करण्यासारखं काही मला आढळलं नसल्यानं ती उपमा वापरली नाही. Fantasy Garden

इथं डिस्नेमधील विविध पात्रं आपल्याला भेट देतात किंबहुना आपण त्यांना भेट देतो. कडक उन्हानं काळवंडलेलो आम्ही ह्या फँटसी गार्डनमध्ये फारसा वेळ घालविण्याच्या मनःस्थितीत नव्हतो. पण बाकी ह्या लोकांनी ह्या सर्व पात्रांना चांगल्या पार्श्वभूमीवर सादर केलं आहे. 
डिस्नेराईड 

डिस्नेराईड दिवसातून दोन वेळा होते. दुपारच्या उन्हात इतका वेळ बसता येणार नाही म्हणून आम्ही संध्याकाळची राईड घेणं पसंत केलं होतं. मागच्या अनुभवावरून आम्ही बऱ्याच आधीपासून राईड जिथून जाईल आणि जिथं रात्रीची रोषणाई दिसेल अशी मोक्याची जागा पकडून रस्त्यावरच ठाण मांडलं होतं. त्या परिसरातील ही नयनरम्य दृश्ये !


थोड्या वेळानं राईड सुरु झाली आणि मिनी, मिकी वगैरे विविध पात्रे आपल्यासमोर मोठ्या आकर्षक स्वरूपात येतात. रात्रीच्या रोषणाईत हा प्रकार खूपच सुंदर वाटत राहतो. ह्या मुख्य पात्रांच्या सोबत अजून सहाय्यक पात्रे सुद्धा येतात. त्यांना खास द्यावीशी वाटते. दररोज चेहऱ्याला रंग फासून तोचतोच प्रकार न कंटाळता करणं हे सुद्धा कौतुकास्पदच ! 


राईड संपली आणि पाच मिनिटांच्या अंतरानं एक अविस्मरणीय अशी फटाक्यांची आतषबाजी सुरु झाली. संपूर्ण आकाशाला विविध रंगानी उजळून टाकणारी ही आतषबाजी अनुभवणं हा एक आयुष्यभरात लक्षात राहण्याजोगा अनुभव होता. त्याचं शब्दांत वर्णन करता येणं कठीणच ! ज्या अचुकतेनं हे विविध रंगांचे फटाके , नळकांडे आकाशात उधळले जातात त्याची दाद द्यायलाच हवी. ही आतषबाजी केवळ डोळ्यात साठवून घेण्यावर मी भर दिल्यानं त्याचे फोटो नाहीत!

रात्रीचे दहा वाजायला आले होते. सागर आपल्या बाकीच्या ट्रीपच्या गोष्टी आम्हांला सांगत होता. पुन्हा एका चांगल्याशा उपहारगृहात नेऊन चविष्ट जेवणाचा आस्वाद आम्ही घेतला आणि जड देहानं आणि पावलाने आम्ही बसकडे वळलो!

(क्रमशः )

वीणा वर्ल्ड - सिंगापुर हॉंगकॉंग मकाव - भाग ४

आज दिनांक २९ मे. आज सिंगापूर इथलं वास्तव्य संपवुन आम्ही हॉंगकॉंगला प्रस्थान करणार होतो. हे विमान सकाळी ८:४० वाजताचे असल्यानं आम्...