मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

मंगळवार, २३ मे, २०१७

घोंघावणाऱ्या शक्यतांचं भेंडोळं !



म्हटलं जातं की अज्ञानात सुख असतं! ह्या मागील मुख्य मतितार्थ असा की सत्य परिस्थिती ज्ञात असणं वर्तमानकाळात आनंदानं जगण्यासाठी बऱ्याच वेळा अडथळा बनु शकतं. एकंदरीत जगात धडपडणाऱ्या करोडो लोकांत आपलं नेमकं स्थान कोणतं, आपल्या भविष्यात नेमकं पुढं काय वाढून ठेवलं आहे ह्या बाबतीत सत्य परिस्थितीची जाणीव असणं नेहमीच आनंददायी असतं असं नव्हे. म्हणुन ह्या घटकांविषयीचं अज्ञान सद्यकाळात माणसाला आनंदानं जगू देतं !

आता घोंघावणं म्हटलं म्हणजे मधमाशा आल्या आणि भेंडोळं म्हणजे त्रिमितीय वर्तुळाकार! म्हणून पोस्टच्या आरंभीच्या दोन प्रतिमा! खरंतर ह्या दोघांची मिळुन एक प्रतिमा बनवायला हवी! जन्मापासुन मनुष्याभोवती अनेक शक्यता घोंघावत असतात. बालक कोणत्या देशात, धर्मात जन्मलंय, त्या कुटुंबाची आर्थिक स्थिती कशी आहे ह्यावर ह्या शक्यतांच्या भेंडोळ्याचं वैविध्य अवलंबुन असतं. लहानपणी ह्या शक्यतांमधील नेमकी कोणती प्रत्यक्षात साकार होणार आहे ह्याविषयी क्लिष्टता थोडी कमी असते. म्हणजे पोरगं कोणत्या माध्यमाची कोणती शाळा निवडणार, कोणत्या खेळात सहभागी होणार वगैरे वगैरे! 

हळूहळू मग ह्या शक्यता क्लिष्ट रूप धारण करू लागतात. शालेय शिक्षण संपुन महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करताना कला, वाणिज्य आणि विज्ञान अशी तीन पुर्णतः वेगळी भेंडोळी बालकाभोवती घोंघावू लागतात. कोणतीही एक निवड बालकास अगदी वेगळ्या मार्गावर घेऊन जाणारी असते. मग बारावी नंतर समजा अभियांत्रिकीची कोणती शाखा निवडायची हा मोठा यक्ष प्रश्न येतो. पदवी प्राप्त केल्यानंतर नोकरी, धंद्यातील प्राथमिक निवड ही आपल्याला अगदी वेगवेगळ्या मार्गांवर घेऊन जाते. तसंच मग जीवनसाथीची निवड! 

ह्या विविध प्रसंगी आपल्याभोवती विविध शक्यता असल्या तरी आयुष्य एकच असतं. त्यामुळे प्रत्येकवेळी ह्या वेगवेगळ्या भेंडोळ्यातील केवळ एकच पर्याय आपल्याला निवडता येतो आणि आपण एकच पर्याय निवडलेला असतो. ह्या प्रत्येक Decision Point (निर्णयबिंदूंना) जोडून आपल्या आयुष्याची प्रवासरेषा बनलेली असते. 'इस मोड़ से जाते हैं कुछ सुस्त कदम रस्ते कुछ तेज कदम राहे!' हे गाणं केवळ भविष्यात मी ही पोस्ट लिहिणार आहे म्हणुन गुलजार ह्यांनी लिहिलं आहे हा माझा दावा आहे! मोकळ्या वेळात ह्या प्रत्येक milestone च्या वेळी समजा आपण वेगळा निर्णय घेतला असता तर काय झालं असतं ह्या शक्यतांच्या भेंडोळ्यांचं कल्पनाचित्र रंगवणं हा माणसांचा आवडता छंद असतो. 

वाढत्या वयानुसार माणसं काहीशी हेकेखोर मनोवृत्ती धारण करतात. भोवती असलेल्या अनेक शक्यतांपैकी बऱ्याचशा शक्यता ते सरळसरळ धुडकावून लावतात, कारण एकच की मला ह्या वयात अशी तडजोड करणं जमणार नाही. आणि मग आयुष्याच्या कोणत्याही क्षणी आयुष्य पुनर्रव्याखित होऊ शकतं हा सिद्धांत निरभ्र आकाशात दूरवर दिसेनासा होतो. हेकेखोर मनोवृत्तीला आपण आपल्यासोबत बाळगत असलेलं baggage (किंवा लोखंडी वजनदार गोळा) असं समजायला हरकत नाही. 

अजून एक मिती! भुतलावर विविध आजार, अपघात ह्या शक्यतांचं भेंडोळं प्रत्येक माणसाभोवती असतंच. काळजी घेऊन ह्यांची शक्यता कमी करणं आपल्या हातात असतं पण ती आपण पूर्णपणे शून्यावर आणू शकत नाही. त्यामुळं जीवनातील ह्या अशाश्वततेबद्दल भान असु देणं इतकंच आपल्या हाती असतं! आता रिमा लागू अचानक गेल्या. आपल्या सगळ्यांना अगदी हुरहूर लावुन गेल्या. त्यांना कधी ह्या शक्यतेच्या अस्तित्वाची जाणीव झाली असेल काय?  

जाता जाता समजा ह्या विश्वाचा जो कोणी सूत्रधार असेल तो ह्या सर्व शक्यता ह्या विश्वात अशा मुक्त स्वरूपात सोडून देत असेल. आणि जी शक्यता एखाद्या जीवाच्या, वस्तुच्या किंवा वास्तुच्या बाबतीत प्रत्यक्षात साकार होत असेल ते त्या जीवाचं, वस्तूचं वा वास्तूचं प्रारब्ध!! विश्वातील अगणित ग्रहांपैकी केवळ पृथ्वीवर जीवनसृष्टी निर्माण व्हावी आणि बाकी ग्रहांवर होऊ नये हे ही शक्यतांच्या भेंडोळ्याचेच उदाहरण! 

गुरुवार, १८ मे, २०१७

डेट भेट


ह्या आठवड्यात एका सुंदर फ्रेंच भाषेतील चित्रपटाचा काही भाग पाहण्यात आला. ऑफिसातुन आधीच उशिरा आल्यानं तो अधिक उशिरापर्यंत जागून पूर्ण पाहिला नाही. पण जितका काही भाग पाहिला त्यावर ही पोस्ट!

चित्रपटाचं कथानक एका  प्रतिभावंत कलाकाराभोवती गुंफलं गेलं आहे. त्याची प्रतिभा लेखणीद्वारे झरझर व्यक्त होत असली तर प्रत्यक्षात मात्र त्याला ह्या भावना व्यक्त करण्यास जमत नसतं. त्यामुळं ह्या अडचणीवर मात करण्यासाठी परदेशातील चालीरितीनुसार तो ह्या क्षेत्रातील एका तज्ञ सल्लागाराची नेमणुक करतो. आता चित्रपट म्हटला म्हणजे ही सल्लागार एक स्त्री असणं ओघानं आलं. आणि अजुन रंगत आणायची म्हटली तर ही सल्लागारच आपल्या नायकात भावनिकदृष्ट्या गुंतणार हे ही आलंच. 

काही हॉलिवुड चित्रपटातील संवाद खूप अर्थपूर्ण असतात. कथानक सरळसोपं असतं, पात्र मोजकी असतात. कथानक उलगडतं ते केवळ संवादांतून; कथेतील पात्रांच्या भावनांच्या गुंत्यातून हळुवारपणे आपली वाट शोधत! You've got a mail आणि बहुदा Harry met Sally हे ह्या धाटणीतील काही चित्रपट! हा चित्रपट सुद्धा काहीसा त्या धाटणीतील!

सुरुवातीला थिअरीचे पाठ झाल्यावर सल्लागारबाई नायकाला रोल प्ले करायला सांगतात. 

सल्लागारबाई : - "तु रेस्तरॉमध्ये जातोस आणि अचानक तुला आवडणारी मुलगी एकटीच एका टेबलवर बसलेली दिसते, आता तू काय करशील ?" 

नायक - (काही वेळ विचार करुन) "बहुदा मी माझं टेबल पकडून बसेन आणि तिचं माझ्याकडं लक्ष जातंय का ह्याची वाट पाहीन!"

सल्लागारबाई पुर्ण हताश!! त्यांच्या चेहऱ्यावरील हे भाव पाहून 

नायक - "मी तिच्या टेबलापाशी जाईन!" 

रोल प्ले 

नायक - "आपली हरकत नसेल तर मी काही वेळ आपल्याला सोबत देऊ का?

नायिका - (एका सेकंदात त्याला आपादमस्तक न्याहाळून केवळ चेहऱ्यावर हावभावाद्वारे होकार देते ! हावभावाद्वारे पुढील भावना योग्यप्रकारे व्यक्त होतात - म्हणजे तुम्ही इथं बसावं अशी माझी मनापासुन इच्छा नाहीए! पण वेळ घालविण्यासाठी माझ्याकडं दुसरा सध्या उपलब्ध पर्याय नाही आणि तु तसा काही मला उपद्रव देशील असं तुझ्या चेहऱ्याकडं पाहुन मला वाटत नाही. )

नायक - "आपण इथं एकट्याच बसला आहात का?" 

नायिका - ("दिसत नाही का तुला, डोळे तपासून घे " - मनातील हे भाव प्रचंड प्रयत्नांद्वारे लपवून ) - "हो मैत्रिणीची वाट पाहत आहे!"

नायक - "असं का? तुमची मैत्रीण ट्रॅफिक मध्ये अडकली असेल का?"  

सल्लागार टाइमआऊटची खुण करते.    

सल्लागार - "इथं मैत्रीण महत्वाची नाही. तू संवाद तुझ्या नायिकेभोवती केंद्रित कर! तिला काही कॉम्प्लिमेंट्स दे !"

रोल प्ले 
नायक - "तुम्ही सुंदर दिसताहात!"

सल्लागार प्रचंड वैतागून टाइमआऊटची खुण करते.

सल्लागार - " This is too direct. तुम्ही आताच संवादाला सुरुवात केली आहे आणि तू असा थेट मुद्याला हात घालू शकत नाही. म्हणजे घालू शकतोस पण ते अप्रत्यक्षपणे व्यक्त व्हायला हवं!

रोल प्ले 
नायक - "बाकी तुझं कसं व्यवस्थित चाललंय ना  "
नायिका - (मला काय धाड भरलीय! मनातील हे भाव महत्प्रयासानं दूर सारून!) "ठीक चाललंय. जीवन बरंचसं एकसुरी बनून गेलंय. जीवनात काही happening असं होतंच नाहीए!"

नायक - (क्षणभर थांबून) - "गेल्या पाच मिनिटात माझं आयुष्य मात्र आमुलाग्र बदलून गेलंय! (इथं आमुलाग्र हा योग्य शब्द आहे का हा वादाचा मुद्दा) माझ्या जीवनात प्रचंड चैतन्य निर्माण झालंय. वगैरे वगैरे "

सल्लागार प्रचंड आश्चर्यचकित होऊन टाईमआउटची खुण करते. "हा संवाद अचानक कुठून ह्या पात्राला सुचला - ही भावना!" 

बाकी क्षणापासुन मग कथानक, संवाद अधिक प्रगल्भ होत जातात. पुढील भाग म्हणजे त्याचा गोषवारा !

संवादात मुख्य जबाबदारी पुरुषावर असते. म्हणजे बरेचसे पुरुष ह्या बाबतीत मठ्ठ असतात. आणि स्त्रिया त्यांना तसंही स्वीकारतात!  तरीपण खालील मुद्द्यांवर त्यांनी प्रयत्न करायला हरकत नसावी.  आधुनिक स्त्रीला बौद्धिक पातळीवरील संवाद आवडतात. पुरुषास फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक क्षेत्रांची माहिती असणं चांगलं. बाकी क्रीडा, राजकारण आणि ऑफिस ह्या विषयांवर स्त्रीने स्वतःहून रस दाखविल्याशिवाय चर्चा सुरु करू नये. फॅशन, आर्ट, फिल्म, नाटक ह्या विषयांवर स्त्रीच्या कम्फर्ट झोनची मर्यादा जाणुन घ्यावी आणि चर्चा त्यात मर्यादित ठेवावी. मधुनच स्त्रीला अप्रत्यक्ष दाद द्यावी आणि मग तिला ती दाद आवडल्यास बोलणं चालू ठेवावं. अशा वेळी ती बहुदा शांत राहुन ती दाद मनातल्या मनात घोळवत राहण्याची शक्यता गृहित धरावी. जर स्त्री बोलू लागली तर चांगल्या श्रोत्याची भूमिका निभावता यायला हवी. बोलत्या स्त्रीला मध्येच खंडित करण्याची अरसिकता दाखवेल तो पुरुष आपलं दुर्दैव आपल्या हातानं ओढवून घेतो!

सर्व काही ठीक झालं तर महाराष्ट्रात "हात तुझा हातात" किंवा फ्रांसमध्ये फ्रेंच व्हर्जनने भेटीची सांगता करावी. 

चित्रपट पूर्ण काही पाहता आला नाही. महाराष्ट्रातील विवाहित पुरुषासाठी असं काही मार्गदर्शन मिळण्याची नितांत आवशक्यता आहे. "वांग्याची भाजी चांगली झाली" हे विधान कितीही मनापासुन केलं तर बायकोची संशयास्पद नजर आपला चेहरा निरखून पाहते हे कित्येक वर्ष मी अनुभवलं. त्यामुळं ही कॉम्प्लिमेंट असू शकत नाही. पण "वांग्याची भाजी चांगली झाली" ह्या वाक्यानंतर पॉझ घेऊन मग दबल्या आवाजात "तुझ्या मानानं" किंवा "तुझ्या परीनं " बोलावं. ह्यात तुमच्या विनोदबुद्धीला दाद मिळण्याची शक्यता जास्त असते हा स्वानुभव! बाकी धोकाही असतोच! पण धोका घेतल्याशिवाय दाद मिळणार थोडीच!

रविवार, १४ मे, २०१७

लिंक रोड - दीडेक तास किशोरजींच्या सोबत



आपांनी घड्याळाकडं नजर टाकली. रात्रीचे सव्वानऊ झाले होते. मग त्यांनी आपल्या 'To Do List' कडे नजर टाकली. सकाळपासून त्यातील दोन गोष्टी  संपल्या होत्या आणि चार वाढल्या होत्या. अजुन कार्यालयात थांबण्यात काही अर्थ नाही हे उमजून घेऊन आपा खाली उतरले. 

गोरेगाव स्पोर्ट्स संकुलापर्यंत आपण ताशी पंधरा किलोमीटरचा वेग गाठू शकलो ह्याबद्दल आपा मनातल्या मनात खुश झाले. असंच एकदा मोकळ्या रस्त्यावर 
'मुसाफिर  हूँ  यारों , ना घर हैं ना  ठिकाना 
मुझे  बस चलते जाना हैं,  बस  चलते जाना' !!

हे गाणं गात जावं अशी इच्छा त्यांच्या मनी प्रकट झाली. 

लिंक रोडवर पोहोचण्यासाठी वाहनांची लागलेली रांग पाहून आपा हिरमुसले झाले. पण शेवटी त्यांनी मागचा रस्ता पकडण्याऐवजी हाच रस्ता धरला. काही वेळानं डावीकडे वळण्याचा हिरवा सिग्नल नेमकी आपांची गाडी येताच लाल झाला. तेव्हा दूरवरून त्यांना किशोरचे सूर ऐकू आले. 

'ये लाल रंग  कब मुझे  छोड़ेगा 
मेरा  गम कब तलक मेरा दिल तोड़ेगा '

डावीकडे वळण घेण्यासाठी वाट बघत असलेल्या आपांना रस्त्याच्या कोपऱ्यात दबा धरून बसलेला ट्रॅफिक पोलीस दिसला. लाल सिग्नलवर आपण हे वळण घेतल्यावर त्यानं आपल्याला कसं पकडलं होतं ह्याच्या आपांच्या क्लेशदायक स्मृती जागृत झाल्या. किशोरजी एव्हाना आपांच्या बाजूलाच विराजमान झाले होते. किशोरजींनी बहुदा आपांच्या मनातल्या ट्रॅफिक पोलीसांविषयीच्या भावना ओळखल्या असाव्यात. 

खिज़ा के फूल पे आती कभी बहार नहीं 
मेरे नसीब पे मेरे दोस्त तेरा प्यार नहीं! 

किशोरजी गुणगुणत असलेलं हे गाणं आपल्या मनातील ट्रॅफिक पोलीसाविषयीच्या भावना कशा बरोबर व्यक्त करतं ह्याविषयी आपांच्या मनात समाधान निर्माण करुन गेलं. 

लिंक रोड तुडुंब भरुन गेला होता. दुचाकीस्वार, रिक्षावाले आपांच्या गाडीपासून दोन्ही बाजूला ५० मिमी अंतर ठेवून आपली वाहनं पुढे दामटण्याचा प्रयत्न करीत होते. आपांची गाडी आपांप्रमाणं दडपणात आली होती. शेवटी एका बाइकनं तिला हळुवार स्पर्श करुन पुढे मुसंडी मारली. आपांचा अनावर झालेला संताप किशोरजींच्या ह्या गाण्यामुळं काहीसा निवळला. 

छूकर मेरे मन को किया तूने क्या इशारा !

तरीपण गाडीच्या सर्व बाजूला पडलेले ओरखडे पाहून लोक काय म्हणतील हा विचार त्यांच्या मनात आलाच. किशोरजी गाऊ लागले. 

कुछ तो लोग कहेंगे लोगोंका काम हैं कहना 
छोडो बेकार की बातों को कही बीत न जाये रैना!!

इंफिनिटी मॉल केवळ ३० ते ४० मीटर वर होता. कधी कधी आपण गाडी आणत नाहीत तेव्हा हेच अंतर आपण पाच मिनिटात चालत जातो ह्याची आपांना आठवण आली. पण हल्ली आपण कारनेच आलो हे त्यांना आठवलं. किशोरजींनी काहीशी खूण केली. अचानक लताजींच्या सुमधुर आवाजात गाणं ऐकू आलं. 

आज कल पाँव जमीं पर नहीं पड़ते मेरे।  

ती खूण हे मी लताजींचं गाणं ऐकवतो आहे ह्यासाठी होती हे आपांना आता कळलं. लताजींची दुसरी ओळ आपांच्या मनात दुसराच विचार आणून गेली. 

बोलो देखा हैं कभी तुमने मुझे उड़ते हुए!

आपली कार हवेत उडू लागली तर किती बरं होईल ह्या विचारानं आपा थोडे उत्साहित झाले. 

त्यांनी किशोरजींकडे नजर टाकली. 

मंज़िले अपनी जगह हैं रास्तें हैं अपनी जगह 
अगर कदम (ट्रैफिक) साथ ना दे तो मुसाफ़िर क्या करें!

किशोरजींचं गुणगुणणे सुरूच होतं. आज ट्रॅफिक खूपच भयंकर होता. दोन आठवड्यापूर्वी आपण इथंच उबेरमध्ये पन्नास मिनिटं अडकलॊ होतो ह्याची त्यांना आठवण झाली. किशोरजींनी तात्काळ गाणं बदललं.  

वो शाम कुछ अजीब थी  ये शाम भी अजीब हैं 
वो  (ऑटोरिक्षा) कल भी पास  पास  थी  वो  आज भी करीब हैं।  

तीस मिनिटं झाली तरी आपा इन्फिनिटी मॉलपर्यंत पोहोचले नव्हते. मध्येच संतापानं त्यानं एका रिक्षावाल्याला कोपऱ्यात चेपून आपली कार पुढे दामटली. रिक्षावाल्यानं नजरेनं त्यांना जबरा खुन्नस दिली. किशोरजींचं लक्ष रिक्षावाल्याकडं गेलं. 

आपकी आँखोमे कुछ महके हुए से राज हैं 
आपसे भी खूबसूरत आपके अंदाज हैं। 

किशोरजींनी  रिक्षावाल्यासाठी इतक्या चांगल्या गाण्याची निवड करावी ह्याचा आपांना तीव्र खेद वाटला. आणि आपा स्वतः गुणगुणू लागले  

मै शायर (ड्रायव्हर) बदनाम ओ मै चला 
महफ़िल से नाकाम मैं चला।  

किशोरजीनी आपांचा मूड ओळखला. आणि ते गाऊ लागले. 

बड़ी सुनी सुनी हैं जिंदगी ये जिंदगी।  

बराच  वेळ शांततेत गेला. किशोरजीनी मग गाण्यास सुरुवात केली. 

कहाँ तक ये मन को अँधेरे छुएंगे 
उदासी भरे दिन कभी तो ढलेंगे। 

खरंतर मे महिन्यापासून नेहमी आपा पावसाची वाट पाहायला सुरुवात करीत. पण ह्यावर्षी पावसाळ्यात ट्रॅफिकची काय हालत होणार ह्या विचारानं त्यांना खूप चिंताग्रस्त केलं होतं. किशोरनी त्यांच्या मनातील भावना नेमक्या ओळखल्या. 

चिंगारी कोई भड़के तो सावन उसे बुझाये 
सावन जो अगन लगाए तो उसे कौन बुझाये।

इन्फिनिटी कसाबसा पार झाला होता. घड्याळ्याच्या काट्यांनी दहा ओलांडले होते. किशोरजींची झोपण्याची वेळ झाली असावी. 

चला जाता हूँ किसी की धुन में 
धड़कते दिल के तराने लिए।  

ह्या ओळी गुणगुणत हा मस्त कलंदर कलाकार माझ्या गाडीबाहेर पडला. वाहतूक मंदगतीनं का होईना पुढे सरकत होती. पण किशोरजींच्या जाण्यानं मन खूप उदास झालं होतं. अशा ह्या ट्रॅफिकमध्ये आपल्यासोबत कोणी नाही हे जाणवलं होतं. 

कोई हमदम ना रहा कोई सहारा न रहा 
हम किसीके ना रहे कोई हमारा ना रहा !

क्या बताऊँ मैं कहा यूही चला जाता हूँ 
जो मुझे राह दिखाए वो सितारा ना रहा।  

ह्या गाण्याच्या ओळी हवेत विरतात न विरतात तोच आपांचा भ्रमणध्वनी खणखणला. "काय अजून ऑफिसातून निघाला की नाही!" आपल्या धर्मपत्नीच्या ह्या सुस्वरातील धमकीवजा प्रश्नानं आपांची सर्व उदासी दूर झाली होती. मिठचौकी पार पडली होती आणि 'पल पल दिल के पास' हे गाणं गुणगुणत आपा भरवेगानं घराकडं निघाले होते!

गुरुवार, ११ मे, २०१७

Trapped - अंतिम भाग



आधीच्या भागाच्या लिंक्स 

भाग पहिला 

भाग दुसरा 

भाग तिसरा 

भाग चौथा 

भाग पाचवा 

भाग सहावा 
 http://patil2011.blogspot.in/2016/11/trapped.html

भाग सातवा
http://patil2011.blogspot.in/2017/01/trapped.html

भाग आठवा
http://patil2011.blogspot.in/2017/02/trapped.html
  

परस्वामीचा संताप अनावर झाला होता. योगिनी, नवस्वामी अगदी आनंदात दिसत होते. आणि त्याचा आर्यन त्या दोघांच्या ताब्यात होता. महत्प्रयासाने त्यानं योगिनी आता नवस्वामींची होणार ह्या गोष्टीचा स्वीकार केला होता.  पण आर्यनविषयी मात्र आता त्याला अनावर प्रेम दाटून आलं होतं. परंतु तो आता हतबल होता. त्याच्याकडं आता मानवी देह नव्हता आणि त्यामुळं आपल्या भावनांना कृतीत परिवर्तित करण्यासाठी त्याच्याकडं माध्यमाची कमतरता होती. 

आर्यननं त्याचं अस्तित्व केव्हाचं ओळखलं होतं आणि त्यामुळं तो खिदळत होता. पण ह्यावेळी योगिनी आणि नवस्वामीसुद्धा खिडकीच्या दिशेनं पाहत होते. योगिनीकडेसुद्धा आपलं ह्या रूपातील अस्तित्व ओळखण्याची क्षमता निर्माण झाली आहे ह्याविषयी आता परस्वामीला तिळमात्र शंका राहिली नव्हती आणि तिनं हे सारं नवस्वामीकडे उघड केलं ह्याचाही त्याला प्रचंड खेद होत होता. 

अत्यंत निराश मनःस्थितीत त्यानं तिथुन निघून जाण्याचा निर्णय घेतला. कापसासारखं त्याचं ते अस्तित्व रस्त्याच्या पलीकडच्या भागात आलं आणि त्याची नजर रस्त्याच्या कडेला झोपलेल्या वेड्याकडं गेली. हा वेडा इसम त्याच्या परिचयाचा होता. त्याच्याच जमातीने त्याच्या मदतीसाठी ह्याचा मेंदु ताब्यात घेतला होता. अधुनमधून खबरीसाठी परस्वामी त्याचा वापर करायचा. त्याला पाहून अचानक  त्याच्या मनात एक भयंकर कल्पना आली. 
भावनेच्या उद्रेकात वाहुन गेलेल्या परस्वामीनं आपलं सर्व कौशल्य पणाला लावलं. सुरुवातीला त्याला अपयश आलं. पण त्यानं आपले प्रयत्न सुरूच ठेवले. 

योगिनीने नवस्वामीचा हात घट्ट पकडून ठेवला होता. पण काही वेळातच आर्यन शांत झाला आणि काही वेळ खेळून निघून गेला. आता खिडकीबाहेर योगिनीला कसलंच अस्तित्व दिसत नव्हतं. तिनं सुटकेचा निश्वास टाकला. आजच्या रात्रीपुरता तरी हा निघुन गेला असावा असं तिनं स्वतःलाच आश्वासक स्वरात समजावलं. ह्या क्षणाला तिला नवस्वामींच्या मानसिक आधाराची गरज होती. पण तो मात्र काही वेळ जागा राहून झोपी गेला होता. आपलं हे उद्विग्न मन असंच शांत करत झोपायचा ती प्रयत्न करत होती. 

अचानक तिला बाल्कनीबाहेर काही चाहुल लागली. नको त्या शंकेनं तिच्या मनात काहूर माजवलं. नवस्वामीला उठविण्याचा विचार तिनं कसाबसा हाणून पाडला. काही क्षण शांततेत गेले. शेवटी तिला राहवलं नाही. ती हलक्या पावलाने बाल्कनीच्या दिशेनं गेली. 

. . . 
. .. 

तिनं दाराच्या नॉबला हात लावला तोच दार बाहेरून जोरात ढकललं गेलं. त्या आघातानं योगिनी जमिनीवर जोरात पडली. खरंतर नवस्वामी गाढ झोपणारा, पण आज तोही काहीसा अस्वस्थ असावा. ह्या आवाजानं त्याला लगेचच जाग आली. पाहतो तो काय, योगिनी जमिनीवर पडली होती. तिला बराच मुका मार लागला असावा. वेदनेनं तिचा चेहरा अगदी रडवेला झाला होता. आणि एक वेडा इसम हातात मोठा दगड घेऊन हिंस्त्रक नजरेनं नवस्वामीकडे पाहत होता. योगिनीला सारं काही उमजायला वेळ लागला नाही. 

"परस्वामी आहे तो !!" ती आर्त स्वरात किंचाळली. नवस्वामी प्रचंड हादरला. पण त्याच्याकडं वेळ कमी होता. त्यानं क्षणाचाही  विलंब न लावता खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्याकडं झेप घेतली. तिथं लाकडाचं एक शिल्प होतं. योगिनीला अशा कलात्मक गोष्टींची फार आवड होती. एक सहस्त्रांश सेकंद त्यानं योगिनीकडे पाहिलं. हे तिचं आवडतं शिल्प तो हाणामारीसाठी वापरणार होता आणि त्याला त्यासाठी योगिनीची परवानगी हवी होती. अशा परिस्थितीतही योगिनीला त्याचं हे वागणं प्रचंड आवडलं. 

परस्वामी मोठ्या असूयेनं त्या दोघांचा हा मूक संवाद पाहत होता आणि त्यामुळं त्याच्यात काहीसा गाफीलपणा आला होता. आणि त्यामुळंच वेगानं त्याच्या डोक्यावर आलेलं हे शिल्प त्याला फार उशिरा दिसलं. त्यानं शेवटच्या क्षणी दूर व्हायचा प्रयत्न केला पण तोवर उशीर झाला होता. ते वजनदार शिल्प त्याच्या डोक्यावर आदळून गेलं. वेडयाच्या देहातील परस्वामीला प्रचंड वेदना झाल्या. त्यातच नवस्वामी वेगानं त्याच्या अंगावर झेपावला. त्याही परिस्थितीत काही मिनिटं परस्वामीने त्याच्याशी मुकाबला करण्याचा प्रयत्न केला पण सदैव भुकेल्या असणाऱ्या आणि मस्तकाला मार बसलेल्या एका वेड्याच्या देहाच्या माध्यमातून हा लढा लढणं त्याला कठीण जात चाललं होतं. 

एका क्षणाला परस्वामीने निर्णय घेतला. त्यानं नवस्वामींच्या पकडीतून कशीबशी आपली सुटका केली आणि बाल्कनीतून तो बाहेर पडला. नवस्वामी जोरजोरात "चोर चोर!" असा आरडाओरडा करु लागला. खाली असलेला गुरखा वेगानं परस्वामीच्या दिशेनं धावला. त्याला चुकविण्यासाठी परस्वामीने रस्त्यावर धाव घेतली. 

कर्रर्रर्र ... भरदार वेगानं जाणाऱ्या तवेराच्या ब्रेकच्या आवाजानं सर्व वसाहतीला जाग आली. 

. . 
. .. 

... 

रस्त्यावरील दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचं पाणी झालं होतं. त्या चोराचा  संपूर्ण देह छिन्नविच्छिन्न झाला होता. गाडीचं चाक त्याच्या डोक्यावरून गेलं होतं. 

... 

... 

ह्या वेड्याला गेले काही महिने दररोज पाहणारी  लोक मात्र हा चोरीचं काम करत असेल ह्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हती. पण नवस्वामी, गुरखा आणि मुख्य म्हणजे CCTV च्या पुराव्यानंतर त्यांचाही पूर्ण विश्वास बसला. 

रस्त्यावर झेप घेताना आपल्या दिशेनं वेगानं येणारी तवेरा पाहून परस्वामीनं स्वतःला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता. पण तोवर खूप उशीर झाला होता. चाक मेंदूवरून गेल्यानं त्याचं हे आभासी अस्तित्वालाच इजा झाली होती. त्याच्या त्या अस्तित्वाचा प्रकाश क्षणाक्षणाला क्षीण होत चालला होता, एका विझत चाललेल्या दिव्याच्या ज्योतीप्रमाणं! कोट्यावधी प्रकाशवर्षे दूरच्या विश्वातून आलेला आणि केवळ योगिनीसाठी आपल्याच जमातीविरुद्ध 
पेटून उठलेला परस्वामी आज आपलं अस्तित्व गमावून बसला होता. 

पोलीस चौकशीमुळे योगिनी आणि नवस्वामींचे पुढील काही दिवस अगदी व्यस्त गेले. महिनाभरात  सर्व काही आलबेल झालं. योगिनीसुद्धा हळूहळू सावरली. परस्वामीचा काही वावर जाणवला नव्हता. शेवटी अशाच एका मोकळ्या सायंकाळी तिनं न राहवुन नवस्वामीकडं विषय काढला. ज्या प्रकारे तो वेडा इसम अपघातात ठार झाला त्यानुसार परस्वामी आपलं अस्तित्व पूर्ण गमावून बसला असेल अशी आपल्या मनातील आशा तिनं स्वामीला बोलून दाखवली. स्वामीला तेच वाटत होतं. एक क्षणभर त्यानं योगिनीकडं पाहिलं आणि मग दोघंही एकमेकांच्या मिठीत घट्ट विसावले. आकाश पूर्णपणे निरभ्र झालं होतं. योगिनीचा लढा संपला होता. 

(संपूर्ण)

P.S. स्वामीच्या बाहुपाशातून दूर झालेल्या योगिनीची नजर आर्यनकडे गेली. त्याची नजर तिला वेगळीच वाटली. तिच्या देहातून एक विजेची लहर प्रचंड वेगानं गेली. खरोखर मी मुक्त झाले का? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी तिला किती थांबावं लागणार होतं कोणास ठाऊक?

बुधवार, ३ मे, २०१७

वसंत बहरत नाही!

(संदर्भ - उत्तर अमेरिकेतील हिवाळा आणि त्यानंतरचा वसंत ऋतू. हा केवळ उदाहरणादाखल !)

मनाला उदासीन करणारा हिवाळा तोच आहे. आयुष्यातील चैतन्याच्या  क्षणभंगुरतेची जाणीव करुन देणारे बर्फाचे ढिगारे तितकेच आहेत. पण आजकाल ते ही मनाला फारसे खिन्न करीत नाहीत. सहा मासांच्या त्या पांढऱ्या रंगाच्या सदैव प्रदर्शनानं मन कोशात जाऊन हरवत नाही.  






नेहमीप्रमाणं तो निर्दयी हिवाळाही एका क्षणी थकुन जातो. केवळ ह्या क्षणाच्या आगमनासाठी सर्व दुःख सहन केलेले पुष्पांकुर, तृणांकूर आनंदाच्या भरात फोफावून निघाले तरीही त्यांची जीवनावरील ही अतुट श्रद्धा आजकाल मनाला मोहवीत नाही! 





का कोणास ठाऊक आजकाल (मनातला) वसंत बहरत नाही! हे असे का होते हे उमजत नाही पण खंत हीच की न बहरलेला वसंत मनाला खटकतसुद्धा नाही! 

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...