मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच

स्थळ - मुंबई २०६५ 

संदर्भ - विनय मांडे (वर्षे ९०) दैनंदिनी 

आज पहाटे थोडी लवकरच जाग आली. रात्रभर तशी बेचैनीत गेली. अखिलची तब्येत अगदी नाजुक बनली होती. कधी वाईट बातमी येईल ह्याचा भरवसा नव्हता. अखिल आणि सर्व शालेय मित्रांच्या आठवणी डोळ्यासमोरून अगदी झरझर सरकत राहिल्या. 

अखिल माझा बालपणीचा शालेय मित्र! लहानपणी मराठी माध्यमाच्या शाळेत अगदी धमाल दिवस घालविले. सरस्वती विद्या मंदिरची आमची बॅच तशी हुशार म्हणून गणली गेलेली. शालेय जीवनातील आठवणी अगदी हृदयाशी जपुन ठेवल्या. शालेय जीवनानंतर आम्ही सर्व दुरावले गेलो. मधली काही वर्षे फारसे एकमेकांच्या संपर्कात नव्हतो. मग २०१० च्या सुमारास फेसबुक, whatsapp ने आम्हांला एकत्र आणले ते कायमचे! 

whatsapp चा आमचा 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच ' ग्रुप म्हणजे एक धमाल कट्टा बनला. शालेय जीवनातील आठवणी, प्रत्येकाच्या जीवनातील सुखदुःखाचे क्षण सर्वांसोबत शेयर करण्याचे हे साधन बनले. आम्ही असे जवळ आलो की कधी दूर गेलोच नव्हतो. 

वर्षे पुढे सरकत गेली. केंद्रबिंदू आमच्यावरून आमच्या मुलांच्या जीवनाकडे वळला. मुलांच्या दहावी, बारावी, पदवी परीक्षामधील यशांचे आम्ही कोडकौतुक केले. हे करताना मग हळुहळू ह्या नवीन पिढीच्या लग्नाच्या निमित्ताने आमच्या भेटी होऊ लागल्या. कोणाच्या गुडघेदुखीचे, सांधेदुखीचे अपडेट 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' वर येऊ लागले. ह्यासाठी नवनवीन चिन्हांचा वापर वाढू लागला. वेगवेगळ्या जोक्सचे प्रमाण हळुहळू कमी होत गेले. जीवनातील अखिल आनंदाचा झरा वाहता ठेवणे फार कमी जणांना जमत राहिलं. ग्रुपवर अभंगाचे प्रमाण वाढत गेले. 

२०४० चे दशक मात्र सुरुवातीलाच दुःखी बातम्या घेऊन आले. आजारपणात आमचे दोन सवंगडी स्वर्गवासी झाले. मग ग्रुप अगदी हबकून गेला. जीवनाचे अंतिम सत्य सर्वांना अगदी अंतर्मुख करून गेले. वर्षे काळाच्या पडद्यामागे जात राहिली आणि त्यांच्यासोबत आमचे साथीदारही! गेल्या वर्षी कादंबरी गेली आणि मग मी आणि फक्त अखिलच राहिलो ह्या ग्रुपवर. काहींचे नंबर तसेच ग्रुपवर राहिले होते. 

मला अखिल हवा आहे! माझ्या बालपणाशी जोडणारा एकमेव दुवा अखिल; त्याची तब्येत सुधारावी अशी खुप खूप इच्छा! पण गेले दोन दिवस त्याचा काही पत्ता नाही. last seen चार दिवसांपूर्वीचे! 

बिनसाखरेचा चहा घेता घेता नवीन मेसेज whatsapp वर आला. धीर होत नव्हता तरी पाहिलं - मेसेज अखिलच्या मुलाकडून आला होता. तो उघडून पाहायची गरज नव्हती. 

आताशा मला खूप खूप एकट वाटतंय! 'सरस्वती विद्या मंदिर १९xx बॅच' चा ग्रुप उघडून पाहायची इच्छा सुद्धा होत नाही! हा ग्रुप कधीपर्यंत अस्तित्वात राहील कोण जाणे! अधुनमधून बालवाडीचा पहिला दिवस डोळ्यासमोर सरकत राहतो इतकं मात्र खरं! 

रविवार, २१ फेब्रुवारी, २०१६

लवचिकता

व्यावसायिक जग वाटतं तितकं पुर्णपणे कठोर नसतं, त्यातही क्वचित का होईना पण हृदयस्पर्शी क्षण येत राहतात. असाच एक क्षण गेल्या आठवड्यात आला. जिम (नाव बदललं आहे) ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर अमेरिकेत निवृत्त झाला. ह्या निमित्ताने भारतातील सर्व टीमने त्याच्यासोबत विडीयो कॉल केला. आपली ६० जणांची टीम समोर पाहून जिम बराच भावनाविवश झाला. सुरुवातीला नक्की काय बोलावं हे त्याला सुचेनासं झालं. मग मात्र त्याने स्वतःला सावरलं. 
खरं तर जिम उच्चपदस्थ! पण अमेरिकन संस्कृतीप्रमाणे सर्वजण त्याला एकेरीतच संबोधित होते. "जिम , उद्या सकाळी उठल्यावर तुला कसं वाटेल?" एकाने इथून विचारलं. आपल्या विचारांची सुसंगती लावण्यासाठी जिमने एक क्षणभर घेतला. मग त्याने आपलं मनोगत मांडलं. "रात्री बेरात्री, सुट्टीवर क्रुझवर असताना, कोण्या परिचिताच्या अंत्यविधीला असताना सुद्धा महत्वाच्या बाबींमध्ये निर्णय घेण्यासाठी त्याला फोन येत असत. सकाळी ७ वाजल्यापासुन मिटींग्स सुरु होत. ह्या कामाच्या सर्व रगाड्यात दिवस अगदी कसा निघून जाई हे सुद्धा कळत नसे! आणि उद्यापासून सकाळी पूर्ण दिवस कसा घालवायचा हा यक्षप्रश्न त्याच्यासमोर ठाकणार होता. बायकामुलांना जिम दिवसभर बाहेर असण्याची सवय होती. जिमला समुद्रकिनाऱ्याची खुप आवड होती. पण किती दिवस समुद्रकिनारा घेऊन बसणार?" जिमने पुन्हा एकदा एक क्षणभराचा विसावा घेतला. "कोणास ठाऊक दोन वर्षांनी मी कदाचित पुन्हा नोकरीच्या शोधात असेन!" जिमचे मनोगत पुढे काही काळ चालु राहिलं पण त्याच्या मनोगताचा हा भाग माझ्या चांगलाच लक्षात राहिला. 
आपलं सुद्धा असंच काही होत असतं. मोकळेपणाचे आयुष्य बालवाडीत कधीतरी संपल्यानंतर आपणही कधीतरी ह्या साचेबंध आयुष्याचे गुलाम होत जातो. साचेबंध आयुष्यासोबत एका ठराविक वैचारिक पद्धतीचे सुद्धा गुलाम होत जातो. आपल्याला विशिष्ट गोष्टी एका विशिष्ट पद्धतीनेच केलेल्या आवडतात कारण त्यातील एखादा भाग आपणास आवडत असतो. पण हा आवडता भाग, ही आवडती बाब वगळता बाकीच्या गोष्टींचे मुल्यमापन करण्याची आपण बऱ्याच वेळा तयारी दाखवत नाही. 
माझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर मला मुंबईची रहदारी आवडत नाही. म्हणून भली पहाट किंवा ऐन दुपार अशा कमी गर्दीच्या वेळा निवडून मी माझा प्रवास करण्याचं ठरवतो. आणि मग होतं काय की मी माझा कौटुंबिक वेळ कमी करतो. 
असंच म्हटलं तर सकाळी अभ्यास चांगला होतो अशी माझी समजूत! माझ्या मुलावर सुद्धा हीच सवय लावण्याचा मी आटोकाट प्रयत्न अगदी हल्ली हल्ली पर्यंत केला. 
आता आपण सवयीचे गुलाम का बनतो? एका विशिष्ट वयानंतर आपण आपलीच स्वतःविषयी एक अप्रत्यक्ष प्रतिमा बनवून घेतो. आणि मग ह्या प्रतिमेशी सुसंगत असे वागण्याचा प्रयत्न करीत राहतो. जीवनाच्या प्रवासात ह्या प्रतिमेचे आणि अनुषंगाने बनलेल्या आपल्या जीवनपद्धतीचे पुन्हा विश्लेषण करण्याचा आपण क्वचितच प्रयत्न करतो. 
जीवनप्रवास पुढे सरकत राहतो. काही लोकांशी आपलं अगदी मनापासून पटतं, काही लोकांशी आपण जुळवून घेण्याचा प्रयत्न करतो तर काही लोकांना मात्र आपण चक्क टाळतो. त्या लोकांविषयींच्या गैरसमजांचं ओझं घेऊन आपण जीवन व्यतित करत असतो. ह्या गैरसमजांची सुरुवात कधी झाली हे पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा असं आढळून येतं की आपण थोडा का होईना पण काही काळ हा एका सीमारेषेवर काढला असतो. एका बाजुला असतो विश्वास तर दुसऱ्या बाजूला गैरसमज! जर ही व्यक्ती खरोखर महत्वाची असेल तर गैरसमजांना पुर्णपणे टाळण्यासाठी तो एक अधिकचा मैल चालुन जाणे आवश्यक असतं. अशा वेळी थोडी लवचिकता दाखवणं आवश्यक असतं. 
आजच्या पोस्टचा मुख्य मुद्दा हाच! व्यावसायिक जीवनात लवचिकतेची हद्द दाखविणारे आपण वैयक्तिक जीवनात मात्र इतके अट्टाहासी का बनतो? 

ह्या सर्व विचारशृंखलेला चालना देणाऱ्या जिमचे आभार! त्याला दोन- तीन महिन्यानंतर संपर्क करुन समुद्रकिनाऱ्याचा कंटाळा आला आहे की काय हे विचारण्याचा माझा मानस आहे. जर त्याने स्वयंपाकघरात बायकोला मदत करण्यास सुरुवात केली तर लवचिकतेच्या ह्या परीक्षेत तो यशस्वी झाला असे म्हणता येईल!

सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

Valentine दिवस !

Valentine दिवसाचा बरेच दिवस चाललेला कल्लोळ काल एकदाचा संपला. "शब्दावाचुन कळले सारे" चे दिवस कधीच संपले. कधी काळी केलेल्या आणि फक्त दोघांत गुपित म्हणुन हृदयाशी जपुन ठेवलेल्या प्रितीचे दिवस केव्हाचेच सरले.   

जमाना बदलला. तरुणाईसोबत ज्यांचे लौकिकार्थाने प्रेम करण्याचे दिवस सरले असे लोक सुद्धा ह्या कल्लोळात सामील होऊ लागले. हे विधान स्फोटक आहे. प्रेम करण्याचे दिवस कधीच सरत नाहीत असं मानणाऱ्या सदाहरित लोकांचा जमाना आहे हा! मोठा सखोल विषय आहे हा! प्रेम म्हणजे नक्की काय असतं ह्यावर मोठमोठ्या दिग्गजांनी विश्लेषण केलं आहे

पूर्वीच्या काळातील काही प्रेमं तशी अव्यक्तच राहिली. कधी ते कोणाच्या हास्यावर फिदा झाल्याने झालेलं ते प्रेम होतं , तर कधी कोणाचे डोळे आवडल्याने झालेलं ते प्रेम होतं. ते वयच असं होतं  की आपलं कोणीतरी असावं अशी भावना प्रबळ झालेली असते दोघं दुर गेले ते परत न भेटण्यासाठी आणि एकमेकांची त्या वयातील प्रतिमा, रम्य आठवणी कायम ठेऊन! आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा डोळ्यात दोन आसवं आणण्याची क्षमता देणारं हे प्रेम होतं. हे अव्यक्त प्रेम असंच राहून देण्यातच जी गहराई आहे ती कशात नाही!

ह्या उलट आत्ताच! कोणाला पाहुन हृदयाचा अर्धा एक ठोका चुकतो , न चुकतो काय आणि मग सर्वांना झाली प्रेम व्यक्त करण्याची घाई! मागच्या पिढीने केवळ कल्पिलेल्या प्रेम व्यक्त करण्याच्या सर्व पातळ्या काही दिवसात पार पाडून होतात आणि मग सुरु होतो तो परीक्षणाचा काळ! आणि मग ह्या परीक्षणाच्या कसोटीला मात्र बरीच प्रेमं यशस्वीरित्या तोंड देऊ शकत नाहीत. बहुदा मागच्या पिढीतील सुद्धा देऊ शकली नसती. पण होतं काय आयुष्यभर जी प्रतिमा जपायची, ज्या आठवणी जपुन ठेवायच्या त्यांचा चक्काचुर होण्याचीच शक्यता वाढीस लागते

सांख्यिकीदृष्ट्या विचार केला तर तरुणाई एका दशकाची तर बाकीचं आयुष्य त्यामानानं मोठं

शेवटी प्रश्न प्राध्यान्यक्रमाचा आहे! क्षणिक मदहोष सुखं उपभोगायचं की आयुष्यभराच्या आठवणीचा अनमोल ठेवा घेऊन जगायचं ! हा दोन पिढींतील फरक! मला चिंता वाटते ती हल्लीच्या पिढीतील बहुसंख्य तरुणाईची! आयुष्याच्या सायंकाळी कोणत्या आठवणी त्यांना जपाव्या लागतील? 

नवीन पिढीच्या वरील वर्णनाला अपवाद असणारे अनेक प्रतिनिधी असतील, त्यांनी ह्या वर्णनाबद्दल मला क्षमा करावी 

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

आवर्तन - भाग ३

आवर्तन - भाग ३ 

अजेयाच्या दृष्टीसमोर जे दृश्य होते ते निर्विवादपणे मोहक होते. एका विस्तीर्ण भुभागावर हिरवीगार वृक्षांनी दाटी केली होती. हे वृक्ष विविध फळांनी लगडलेले होते. ही फळे निःसंशय अमृतासारखी मधुर असावीत कारण त्यावर विविध नयनरम्य पक्षांनी गर्दी केली होती. त्या पक्षांच्या मधुर रवांनी आसमंत भरुन गेला होता. ह्या वृक्षांच्या आधाराने उंच आकाशाला गवसणी घालु पाहणाऱ्या लता आणि त्यांची मोहक फुले ह्या दृश्याच्या  सौंदर्यात अजुन भर घालीत होत्या. हे सौंदर्य नजरेत भरुन घेत असतानाच अजेयाची पापणी क्षणभरासाठी लवली आणि आता त्याच्या नजरेसमोर नवीनच दृश होते
एक संगमरवरी दगडांनी बनलेला राजेशाही महाल त्याच्या नजरेसमोर होता. ह्या महालात अनेक दालने होती. ही दालने अत्यंत अलिशान अशा झुंबरांनी प्रकाशित झाली होती. वेगवेगळ्या दालनात उंची रत्ने, ज्ञानग्रंथ, सुमधुर खाद्यपदार्थ, सोमरस, हिरेमाणके ह्यांच्या राशी पडल्या होत्या. आणि सौंदर्यवान दासी ह्या प्रत्येक दालनात कोणाच्या तरी बहुदा आपल्या मालकाच्या प्रतीक्षेत हजर होत्या
अशा अनेक पापण्यांच्या उघडझापीमध्ये ह्या भुलोकीवरील शक्य त्या सर्व सुखांची दृश्ये अजेयाच्या समोर येऊन गेली. हे काय चाललं आहे ह्याचा त्याच्या मनात बराचसा संभ्रम निर्माण झाला होता. ह्या क्षणी मैथिलीची त्याला तीव्रतेने आठवण झाली होती
अचानक त्याच्या मेंदुमध्ये प्रचंड खळबळ माजली. कोणीतरी आपल्या विचारशक्तीचा ताबा घेत आहे असे त्याला खास वाटू लागलं. एक क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर त्या खऱ्यातर सिरीनगरीच्या पण आता स्वतःला सुवर्णनगरीच्या म्हणवुन घेण्यात भुषण मानणाऱ्या पितामहाची प्रतिमा झळकली. बहुदा त्याच्या मेंदूचा त्या पितामहाने ताबा घेतला होता. "हे अजेया! तुझ्या कल्पनाशक्तीची जितकी झेप जाईल तितकं सुखमय चित्र निर्माण करून ते वास्तवात उतरविण्याची क्षमता ही सुवर्णनगरी तुला प्रदान करीत आहे. आणि तु सारासार विचार करुन ह्या संधीचा स्वीकार करावास असा माझा तुला प्रस्ताव आहे"
अजेय पुर्णपणे गोंधळून गेला होता. ही आपल्या विचारशक्तीचा कोणीतरी ताबा घेतला आहे ह्याची जाणीव त्याला होत होती. आणि त्या स्थितीसुद्धा आपलं मी पण त्या बाह्यविचारशक्तीशी प्रतिकार करु पाहत आहे हे त्याला जाणवत होतं. सुखाची जी दृश्ये त्याच्यासमोर रेखाटली गेली होती ती अतिशय मोहक होती ह्यात काही संशय नव्हताच. पण आपल्या सिरीनगरीतील प्रियजन त्यांचं काय होणार? आपले काका कपाली त्यांच्या स्वागताचे काय होणार? त्याच्या मेंदूत शंकांचं नुसतं काहूर माजलं होतं. "अरे, इतका विचार का करतोयस! तुझ्या कल्पनाशक्तीत जर इतकी ताकद असेल तर तिच्या जोरावर तु तुझ्या सिरीनगरीतील सर्व प्रियजनांना इथं आणु शकतोस!" त्याच्या मेंदुत नवीन विचार आला. हा नक्कीच पितामह प्रेरित विचार होता. हळूहळू पितामह प्रेरित विचार आपणास पटू लागले आहेत अशी त्याला जाणीव होऊ लागली होती. सिरीनगरीशी प्रतारणा जरी केली तरी ती कोणाला कळणार सुद्धा नाही आणि मग त्यात अयोग्य असं काय अशी त्याची विचारधारणा होऊ लागली होती आणि अचानक तो क्षण उगवला
कोठेतरी दूरवर मैथिलीची प्रतिमा त्याच्या क्षीण होत झालेल्या विचारशक्तीपुढे प्रकटली. आणि मग सारं कसं अगदी स्पष्ट होऊ लागलं. ह्या पितामहाच्या पाशात अडकून जाण्याची कोणतीही इच्छा आता अजेयाला राहिली नव्हती. त्यानं एक क्षणभर आकाशाकडे पाहिलं. निळे आकाश अगदी स्वच्छ दिसत होतं. आणि त्या आकाशात कपालीची प्रतिमा प्रगटली होती. "मला कपालच्या स्वागतासाठी जायचं आहे." अजेय स्वतःशीच पुटपुटला. आकाश एक क्षणभर अंधारमय झालं होतं. आकाशातील तारकांनी आपल्या जागा बदलल्या होत्या आणि त्यांनी आपल्या बदललेल्या जागांनी आकाशात "मैथिली" हा शब्द लिहिला होता. काही क्षणातच पुन्हा एकदा तारकांनी आपली जागा बदलली आणि आता आकाशात "सदसदविवेकबुद्धी" हे शब्द साकारले गेले होते. संदेश अगदी स्पष्ट होता. मैथिली ही अजेयाची सदसदविवेकबुद्धी होती. ती केवळ माझी सदसदविवेकबुद्धीच नव्हे तर अजुन बरीच काही आहे. अजेय स्वतःशीच म्हणाला
बुद्धीचा भ्रम दूर झाल्यावर आणि सदसदविवेकबुद्धीची साथ असल्यावर सुवर्णनगरीतील सैनिकांचा पाडाव करणं ही अजेयासाठी काही कठीण गोष्ट नव्हती. अजेयाच्या विजयानंतर आकाशातुन त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली होती
काही काळातच तो पुन्हा एकदा त्या ज्योतीच्या मार्गाला लागला होता. रस्ता पुन्हा खडतर बनला होता. मागे सुवर्णनगरीची प्रतिमा त्याला दिसत होती, जिच्यात त्याला अजिबात रस नव्हता. त्याला ज्याचा शोध होता ती मैथिली त्याला कोठे दिसत नव्हती. पण आपल्या ध्येयाचा शोध असा थांबवणं त्याला शक्य नव्हतं. त्यानं वेगानं पुढील रस्ता धरला होता
(क्रमशः)

Life in A Metro !

सुट्टीमय आठवडा ! या आठवड्यात एक आगळीवेगळी घटना घडली.  सोमवारी होळीची आणि शुक्रवारी गुड फ्रायडेची सुट्टी मिळाली. लागोपाठच्या दोन आठवड्यात तीन...