मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

आवर्तन - भाग ३

आवर्तन - भाग ३ 

अजेयाच्या दृष्टीसमोर जे दृश्य होते ते निर्विवादपणे मोहक होते. एका विस्तीर्ण भुभागावर हिरवीगार वृक्षांनी दाटी केली होती. हे वृक्ष विविध फळांनी लगडलेले होते. ही फळे निःसंशय अमृतासारखी मधुर असावीत कारण त्यावर विविध नयनरम्य पक्षांनी गर्दी केली होती. त्या पक्षांच्या मधुर रवांनी आसमंत भरुन गेला होता. ह्या वृक्षांच्या आधाराने उंच आकाशाला गवसणी घालु पाहणाऱ्या लता आणि त्यांची मोहक फुले ह्या दृश्याच्या  सौंदर्यात अजुन भर घालीत होत्या. हे सौंदर्य नजरेत भरुन घेत असतानाच अजेयाची पापणी क्षणभरासाठी लवली आणि आता त्याच्या नजरेसमोर नवीनच दृश होते
एक संगमरवरी दगडांनी बनलेला राजेशाही महाल त्याच्या नजरेसमोर होता. ह्या महालात अनेक दालने होती. ही दालने अत्यंत अलिशान अशा झुंबरांनी प्रकाशित झाली होती. वेगवेगळ्या दालनात उंची रत्ने, ज्ञानग्रंथ, सुमधुर खाद्यपदार्थ, सोमरस, हिरेमाणके ह्यांच्या राशी पडल्या होत्या. आणि सौंदर्यवान दासी ह्या प्रत्येक दालनात कोणाच्या तरी बहुदा आपल्या मालकाच्या प्रतीक्षेत हजर होत्या
अशा अनेक पापण्यांच्या उघडझापीमध्ये ह्या भुलोकीवरील शक्य त्या सर्व सुखांची दृश्ये अजेयाच्या समोर येऊन गेली. हे काय चाललं आहे ह्याचा त्याच्या मनात बराचसा संभ्रम निर्माण झाला होता. ह्या क्षणी मैथिलीची त्याला तीव्रतेने आठवण झाली होती
अचानक त्याच्या मेंदुमध्ये प्रचंड खळबळ माजली. कोणीतरी आपल्या विचारशक्तीचा ताबा घेत आहे असे त्याला खास वाटू लागलं. एक क्षणभर त्याच्या डोळ्यासमोर त्या खऱ्यातर सिरीनगरीच्या पण आता स्वतःला सुवर्णनगरीच्या म्हणवुन घेण्यात भुषण मानणाऱ्या पितामहाची प्रतिमा झळकली. बहुदा त्याच्या मेंदूचा त्या पितामहाने ताबा घेतला होता. "हे अजेया! तुझ्या कल्पनाशक्तीची जितकी झेप जाईल तितकं सुखमय चित्र निर्माण करून ते वास्तवात उतरविण्याची क्षमता ही सुवर्णनगरी तुला प्रदान करीत आहे. आणि तु सारासार विचार करुन ह्या संधीचा स्वीकार करावास असा माझा तुला प्रस्ताव आहे"
अजेय पुर्णपणे गोंधळून गेला होता. ही आपल्या विचारशक्तीचा कोणीतरी ताबा घेतला आहे ह्याची जाणीव त्याला होत होती. आणि त्या स्थितीसुद्धा आपलं मी पण त्या बाह्यविचारशक्तीशी प्रतिकार करु पाहत आहे हे त्याला जाणवत होतं. सुखाची जी दृश्ये त्याच्यासमोर रेखाटली गेली होती ती अतिशय मोहक होती ह्यात काही संशय नव्हताच. पण आपल्या सिरीनगरीतील प्रियजन त्यांचं काय होणार? आपले काका कपाली त्यांच्या स्वागताचे काय होणार? त्याच्या मेंदूत शंकांचं नुसतं काहूर माजलं होतं. "अरे, इतका विचार का करतोयस! तुझ्या कल्पनाशक्तीत जर इतकी ताकद असेल तर तिच्या जोरावर तु तुझ्या सिरीनगरीतील सर्व प्रियजनांना इथं आणु शकतोस!" त्याच्या मेंदुत नवीन विचार आला. हा नक्कीच पितामह प्रेरित विचार होता. हळूहळू पितामह प्रेरित विचार आपणास पटू लागले आहेत अशी त्याला जाणीव होऊ लागली होती. सिरीनगरीशी प्रतारणा जरी केली तरी ती कोणाला कळणार सुद्धा नाही आणि मग त्यात अयोग्य असं काय अशी त्याची विचारधारणा होऊ लागली होती आणि अचानक तो क्षण उगवला
कोठेतरी दूरवर मैथिलीची प्रतिमा त्याच्या क्षीण होत झालेल्या विचारशक्तीपुढे प्रकटली. आणि मग सारं कसं अगदी स्पष्ट होऊ लागलं. ह्या पितामहाच्या पाशात अडकून जाण्याची कोणतीही इच्छा आता अजेयाला राहिली नव्हती. त्यानं एक क्षणभर आकाशाकडे पाहिलं. निळे आकाश अगदी स्वच्छ दिसत होतं. आणि त्या आकाशात कपालीची प्रतिमा प्रगटली होती. "मला कपालच्या स्वागतासाठी जायचं आहे." अजेय स्वतःशीच पुटपुटला. आकाश एक क्षणभर अंधारमय झालं होतं. आकाशातील तारकांनी आपल्या जागा बदलल्या होत्या आणि त्यांनी आपल्या बदललेल्या जागांनी आकाशात "मैथिली" हा शब्द लिहिला होता. काही क्षणातच पुन्हा एकदा तारकांनी आपली जागा बदलली आणि आता आकाशात "सदसदविवेकबुद्धी" हे शब्द साकारले गेले होते. संदेश अगदी स्पष्ट होता. मैथिली ही अजेयाची सदसदविवेकबुद्धी होती. ती केवळ माझी सदसदविवेकबुद्धीच नव्हे तर अजुन बरीच काही आहे. अजेय स्वतःशीच म्हणाला
बुद्धीचा भ्रम दूर झाल्यावर आणि सदसदविवेकबुद्धीची साथ असल्यावर सुवर्णनगरीतील सैनिकांचा पाडाव करणं ही अजेयासाठी काही कठीण गोष्ट नव्हती. अजेयाच्या विजयानंतर आकाशातुन त्याच्यावर पुष्पवृष्टी झाली होती
काही काळातच तो पुन्हा एकदा त्या ज्योतीच्या मार्गाला लागला होता. रस्ता पुन्हा खडतर बनला होता. मागे सुवर्णनगरीची प्रतिमा त्याला दिसत होती, जिच्यात त्याला अजिबात रस नव्हता. त्याला ज्याचा शोध होता ती मैथिली त्याला कोठे दिसत नव्हती. पण आपल्या ध्येयाचा शोध असा थांबवणं त्याला शक्य नव्हतं. त्यानं वेगानं पुढील रस्ता धरला होता
(क्रमशः)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

२०२४ अनुभव - भाग १

२०२४ वर्षी जीवनानं, जीवनातील व्यक्तींनी मला शिकविलेल्या महत्वाच्या गोष्टी पुढील काही दिवसांत प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. नक्की किती आणि काय ...