बोर्डी हे महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर गुजरातच्या सीमेवर वसलेलं एक शांत गाव. गावाची लोकसंख्या अजूनही विरळ अशी म्हणावी असल्याने बोर्डी आपलं गांवपण टिकवून आहे. बोर्डीने आपलं हे गांवपण हे असंच टिकवून ठेवावं अशी माझी मनोमन इच्छा! पूर्वी बोर्डीची एक शैक्षणिक केंद्र म्हणून ख्याती होती. अजूनही इथं मोठ्या संख्येनं विद्यार्थी वसतिगृहात वास्तव्यास असतात. बोर्डी हे चिकूच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. चिकूच्या फळबागा इथं मोठ्या प्रमाणात आढळून येतात. फेब्रुवारी महिन्याच्या सुमारास इथं सुप्रसिद्ध अशा 'चिकू फेस्टिवल' चे सुद्धा आयोजन केले जातं. बोर्डीला लांबलचक असा समुद्रकिनारा लाभला आहे. अशा विविध कारणांसाठी बोर्डी हे एक पर्यटनस्थळ म्हणून जाणकार पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहे.
एखादं गाव पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आलं की अर्थातच तिथं विविध रिसॉर्टचे पेव फुटतं. शांत पर्यटक म्हणून भारतीय पर्यटकांची अजिबात ख्याती नाही. आम्ही पैसा मोजून आलो आहोत, त्यामुळे आम्ही इथं आमच्या मर्जीनं वागू असा काहीसा मुजोरपणा दुर्दैवानं रिसॉर्टमध्ये काही वेळा पाहायला मिळतो. माझ्यासारख्या शांततेच्या शोधात असलेल्या अनेक पर्यटकांच्या सृष्टीनं ही अत्यंत त्रासदायक गोष्ट ठरते. त्यामुळे आम्हांला बऱ्याच वेळा अशी रिसॉर्ट्स नकोशी वाटतात.
शांतताप्रिय पर्यटकांसाठी खाजगी निवासस्थानी वास्तव्य करणे हा एक पर्याय उपलब्ध असतो. २० ते २२ डिसेंबर दरम्यान आम्ही बोर्डी येथील ABB Villa ह्या अतिसुंदर बंगल्यात वास्तव्य केलं. आम्ही अनुभवलेलं एक सुंदर वास्तव्य सर्वांसोबत शेअर करावं या उद्देशाने लिहलेली ही ब्लॉग पोस्ट!
बोर्डी गावाची सायंकाळी लवकरच निद्राधीन होणारं गांव अशी ख्याती पूर्वीपासून आहे. बालपणी आम्ही आजोळी राहायला जात असू, त्यावेळी साडेसात वाजता रात्रीची जेवणं आटपून गावकरी चिडीचूप निद्राधीन होत असत. ABB Villa मध्ये सुद्धा आम्हांला हाच अनुभव आला. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे सहानंतरच अंधाराने आपले साम्राज्य प्रस्थापित केले होते. थंडी जोरदार होती. मुंबईतील लोकांना ही थंडी प्रचंड आहे असे वाटण्याची दाट शक्यता आहे. आम्ही वसईतून आल्याने आम्ही सुरुवातीला काहीसे आत्मविश्वासपूर्ण होतो. परंतु थोड्या वेळातच आम्ही लोकरीच्या कपड्यांचा आधार घेतला. एबीबी व्हिला हा अत्यंत एकांताच्या ठिकाणी म्हणावा असा आहे. जवळपास ५० -१०० मीटर अंतरापर्यंत तुम्हाला कुठेही वस्ती दिसत नाही. या संपूर्ण परिसरात फक्त एकटे दुकटे बंगले आहेत. त्यामुळे नीरव शांतता म्हणजे काय याचा अनुभव इथं तुम्हांला येतो.
श्रीकांत पाटील हे या बंगल्याचे मालक. या बंगल्याचा आराखडा त्यांनी मोठ्या कल्पकतेने रचिला आहे. खालच्या मजल्यावर एक आणि पहिल्या मजल्यावर दोन अशी एकूण तीन मोठ्या बेडरूम्स, खालील मजल्यावर प्रशस्त बैठकीची खोली, लागूनच असलेले मोठाले स्वयंपाकघर, भोवताली निळ्याशार पाण्यानं भरलेला तरणतलाव, गच्चीवर सोलार पॅनल, परिसरात विविध प्रकारच्या फुलझाडांची, फळझाडांची लागवड. अशा निसर्गरम्य वातावरणात तीन दिवस आम्ही मोठ्या आनंदात राहिलो.
पर्यटकांच्या दृष्टीने येथील वास्तव्य हे सुखकारक व्हावं यासाठी श्रीकांत पाटील यांनी छोट्या छोट्या गोष्टींचा सविस्तर विचार केला आहे. तीव्र हिवाळ्याची शक्यता लक्षात घेऊन प्रत्येक बेडरूममध्ये पुरेशा प्रमाणात ब्लॅंकेट पुरवली आहेत. पहिल्या मजल्यावर दोन बेडरूम्सच्या बाहेर दोघाजणांना झोपण्यासाठी मोठा बिछाना, ब्लॅंकेटस उपलब्ध आहेत. घरातील फ्रीज हा जीवनावश्यक जिन्नसांनी भरलेला असतो. थंड फरशीमुळे पाहुण्यांना सर्दी होऊ नये म्हणून स्लीपरचे जोड इतका सखोल विचार श्रीकांत ह्यांनी केला आहे. थेट बागेतून टीपॉयवर पहुडलेली सफेद वेलचीची केळी आम्हांला खुणावत होती. बागेत मोठाल्या बोरांचे झाड होतेच. एक काका बंगल्याची आणि आजूबाजूच्या परिसराची अत्यंत आपुलकीने निगराणी राखत होते. आम्हांला आमच्या वास्तव्यात त्यांनी हवा तेव्हा कित्येकदा गरमागरम चहा बनवून दिला. सकाळी आंघोळीसाठी गरमागरम बंबाचे पाणी उपलब्ध होते. आपण किती वाजता उठणार हे फक्त श्रीकांत ह्यांना कळविले की काका बंब त्यावेळी सुरु करत असत.
आम्ही एका विवाह समारंभासाठी इथे आलो असल्याने आमचे वेळापत्रक अगदी व्यस्त होते. त्यामुळं आम्हांला गच्चीवर जाऊन आकाशाचे निरीक्षण करण्याची संधी मिळाली नाही. परंतु सवडीने येणाऱ्या पर्यटकांसाठी ही मोठी सुवर्णसंधी असेल. आसमंतात कुठेही कृत्रिम प्रकाश अस्तित्वात नसल्याने आकाशातील अत्यंत मंद तारे सुद्धा केवळ डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतील. लोकरीच्या कपड्यांनीसुद्धा आमची थंडी न गेल्याने श्रीकांत यांनी आमच्यासाठी शेकोटीची व्यवस्था केली. आमच्यातील उत्साही मंडळींनी लगेचच शेकोटी पेटवण्यात पुढाकार घेतला. थोड्याच वेळात त्या शेकोटीच्या उबेचा आनंद लुटण्यासाठी आम्ही सर्वजण शेकोटीभोवती गोळा झालो. बऱ्याच वर्षांनी एका थंड प्रदेशात शेकोटीचा आनंद घेण्याचा अनुभव अविस्मरणीय असा होता.
श्रीकांत हे माझे मोठे बंधू संजीव यांचे खास मित्र. त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी शुक्रवारी रात्री एका चविष्ट मटन बिर्याणीचे आयोजन केले होते. ही चविष्ट मटन बिर्याणी खाऊन आम्ही सर्व तृप्त झालो. त्यानंतर संजीव आणि श्रीकांत यांनी आपल्या सुरेख गायनानं आमचे मनोरंजन केले. रात्रीचे अकरा वाजले होते. बोर्डीच्या मापकदंडानुसार ही मध्यरात्रीनंतरची वेळ! सकाळी लवकर उठून लग्न समारंभाला आम्हाला हजर राहायचे असल्याने आम्ही झोपायच्या तयारीत होतो. तेव्हा बोर्डीतील प्रसिद्ध शेतकरी आणि सुप्रसिद्ध 'द जंगल फार्म' चे (The Jungle Farm) मालक सूर्यहास चौधरी यांचे आगमन झाले. त्यानंतर गप्पांना बहर आला. पूर्वीच्या काळातील आठवणींपासून सुरू झालेल्या गप्पा सद्यकाळातील शेती उत्पादन आणि शेती उत्पादनातील विविध समस्या इथपर्यंत येऊन पोहोचल्या. सूर्यहास हे पारंपरिक पद्धतीने शेती करतात. The Jungle Farm ला ह्यावेळी अगदी धावती भेट दिली. पण लवकरच सवडीने भेट देऊन त्यावर मोठी पोस्ट लिहिण्याचा मानस आहे. सकाळी उठण्याचे भान ठेवून आम्ही बारा वाजता गप्पा आटोपत्या घेतल्या. या निसर्गरम्य थंड वातावरणात झोप ही अत्यंत गाढ असते. त्यामुळे केवळ पाच ते सहा तास झोपलो असलो तरी सकाळी प्रसन्नचित्ताने आम्ही उठलो.
परिसरात चिकू,बोरं, पपई, आंबे यांच्या झाडांसोबत विविध प्रकारची गुलाबं, जास्वंदी, सदाफुली आणि मला नावं माहिती नसलेले अनेक फुलं यांचा समावेश आहे. खास वैशिष्ट्य म्हणजे रुद्राक्षाचे झाड! श्रीकांत आणि त्यांची पत्नी बाबा अमरनाथ ह्यांच्या आशीवार्दानं पवित्र झालेली ह्या झाडाची रुद्राक्षे प्रत्येक जोडप्याला भेट देतात. हा एक खास अनुभव !
इथे अत्यंत शुद्ध अशा निळ्याशार पाण्याचा तरणतलाव आमच्यातील काही जणांना खुणावत होता. परंतु इतक्या थंड वातावरणात भल्या पहाटे त्यात डुंबण्याची हिंमत नसल्याने म्हणा किंवा लग्नाला जाण्याची घाई असल्याने म्हणा या तरणतलावाचा आनंद लुटण्याची संधी आम्हांला गमवावी लागली. परंतु जे कोणी पर्यटक सवडीने या ठिकाणी जातील, त्यांना या तरणतलावातून बाहेर काढणे हे जिकरीचे काम असेल हे नक्कीच मी सांगू इच्छितो.
या बंगल्याकडे जाण्याचा रस्ता शेवटची पाच मिनिटे अत्यंत खडबडीत असा आहे. सुरुवातीला आम्ही काहीसे कंटाळले होतो. परंतु हा खडबडीत असा रस्ता असल्याने तिथे अजिबातच वाहतूक नाही त्यामुळे शांतता अबाधित राहते ह्याची जाणीव ज्यावेळी आम्हांला झाली त्यावेळी त्या रस्त्याच्या खडबडीतपणाचे आम्ही आभार मानले. हल्लीच्या मुंबईत जो कोणी राहतो त्याला शांततेचे इतके मोल आहे की आपण शांततेसाठी जंग जंग पछाडू शकतो. दुर्दैव म्हणावे पण ही वस्तुस्थिती आहे.
अत्यंत शांततामय परिसरात आकर्षक वातावरणात वैयक्तिक आवडीनिवडी ध्यानात घेणारी एक अविस्मरणीय सहल जर तुम्हांला अनुभवायची असेल तर ABB Villa Bordi ला भेट देणे तुम्हांला क्रमप्राप्त आहे! श्रीकांत पाटील हे ९८२००२०४४९ ह्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उपलब्ध आहेत.
आम्ही घेतलेली परिसरातील काही छायाचित्र !
सुंदर वर्णन केले
उत्तर द्याहटवा