मराठी ब्लॉगर्स नेटवर्क - Marathi Bloggers Network!

रविवार, १७ मे, २०२६

पुढच्या शुक्रवारी ७ वाजता


'पुढच्या शुक्रवारी ७ वाजता' हे नाटक मनोविकाराच्या एक टोकाला गेलेल्या मुलाचं, मंगेशचं (सुदीप मोडक) कथानक आपल्यासमोर घेऊन येतं. दोन वेगवेगळ्या कारणांसाठी मंगेशला सुधारण्याचा प्रयत्न करणारे डॉ. अतुल  ( सतीश राजवाडे ) आणि राधिका (चैत्राली गुप्ते)  ही ह्या नाटकातील महत्त्वाची दोन पात्रं! वीस वर्षांपूर्वी अर्धवट राहिलेल्या ह्या दोघांमधील प्रेमकहाणीची ह्या कथानकालाअसलेली झालर! 

एखादया उत्तम कलाविष्काराच्या माध्यमातुन कलाकार जितकं काही चाहत्यांपर्यंत पोहोचवतो त्याहून बरंचसं अधिक असं चाहत्यांनी आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे मिळवावं असं मला नेहमीच वाटत आलं आहे. प्रत्येक चाहत्याच्या कल्पनाशक्तीप्रमाणं हे अधिक असं जे काही आहे ते बदलत राहतं. मला असंच बरंच काही ह्या नाटकातून मिळालं. 

Spectrum हा एक अर्थपुर्ण शब्द आहे. प्रकाशाचा वर्णपट ह्या अर्थी संबोधिण्यासाठी त्याचप्रमाणं मनःस्थितीच्या विविध अवस्था असतात, त्या सर्वांना एकत्रितरित्या संबोधण्यासाठी हा शब्द वापरला जातो. मंगेश मनोविकाराच्या टोकाच्या स्थितीत पोहोचला आहे. आपण आपल्याभोवती पाहिलं तर निराशा हल्ली कोणालाच चुकली नाही. हा काळाचा महिमा आहे. यशाच्या शिखरावर असणाऱ्या माणसांना सुद्धा ही निराशा हल्ली सोडत नाही तर बाकीच्यांचं काय? दैनंदिन दिवसात येणाऱ्या निराशेच्या क्षणापासून परत सम्यक स्थितीत घेऊन येण्यासाठी काहीतरी सकारात्मक घडावं लागतं,  कोणी जिव्हाळ्याचं माणुस आयुष्यात असावं लागतं किंवा तुम्ही मानसिकरित्या खंबीर असावे आवश्यक असतं.  

ही झाली सर्वसामान्य माणसाची कहाणी! मंगेशची कहाणी तर अगदी हृदयद्रावक म्हणावी अशीच आहे! बुद्धिमतेचं प्रचंड वरदान लाभलेला मंगेश वयाच्या चौदाव्या वर्षी आयुष्यात घडलेल्या कठीण प्रसंगामुळं भोवतालच्या निष्ठुर दुनियेच्या तावडीत सापडतो. एका नाजुक क्षणी अंमली पदार्थाची झालेली ओळख त्याला ह्या खोल दरीत खेचून घेऊन जाते.  पत्नीच्या अकाली जाण्यानं खचलेला डॉ. अतुल आपला व्यवसाय बंद करून दूरवर कुठंतरी जायच्या तयारीत असतानाच राधिका त्याच्या भेटीला येते.  आपल्याला भेटायला येण्यामागं आपलं सांत्वन करणं हा तिचा खरा हेतू नाहीए हे जाणण्याइतका अतुल तिला ओळखून असतो. मंगेशला ह्या स्थितीतून बाहेर काढण्याचं आव्हान तो स्वीकारतो त्याचं कारण वेगळं असं आहे.  

एखादया मनोरुग्णाला त्याच्या त्या अवस्थेतुन सामान्य स्थितीत आणण्याचा प्रवास रंगमंचावर अडीच - तीन तासांत उलगडुन दाखविण्याचं आव्हान झेपण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाटक, कलाकार करतात. ह्या आजारातील विविध संज्ञाचा योग्य वापर, त्या प्रेक्षकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न वाखाणण्याजोगा! आजारातून बरं होताना रुग्णाला कसं विविध स्थितींमधून जावं लागतं, त्याला कसे भास होत राहतात, त्यावेळी कसं त्याला जवळच्या माणसाची गरज असते हे सर्व काही खूप चांगल्या पद्धतीनं सादर करण्यात आलं आहे. नशील्या पदार्थांचा राक्षस आज नाक्या-नाक्यावर लपून बसला आहे. आपल्या युवकांचं  ह्या राक्षसापासुन रक्षण करणं कसं आवश्यक आहे हा संदेशही नाटक देतं. पण कुठंही हा संदेश अगदी भडक रूपात आपल्यासमोर येत नाही. 

नाटकाची संहिता, सादरीकरण एका उच्च दर्जाचं आहे. सतीश राजवाडेंविषयी थोडंफार ऐकून होतो, पण ह्या नाटकातील त्यांचा अभिनय पाहुन नक्कीच त्यांचा चाहता बनलो आहे.  एका प्रथितयश डॉक्टरच्या वागण्यातील आत्मविश्वास, भारदस्तता त्यांच्या अभिनयातुन अगदी परिपुर्णपणे पाहावयास मिळते. 

आपल्याला तिचा मनोमनी राग येतो असा राधिकेचा अभिनय आणि त्यातच तिचं यश सामावलेलं! कॉर्पोरेट जगातील संस्कृती तिनं अगदी हुबेहूब प्रेक्षकांसमोर आणली आहे. आपल्याला यशस्वी बनायचं आहे हे तिनं कधी कोणापासुन लपविलं नाही, कायद्याच्या चौकटीत राहून जमेल त्या मार्गानं आर्थिकदृष्ट्या यशस्वी बनायचं हे तिचं ध्येय आहे. त्यासाठीच तिनं अतुलवरील असलेल्या आपल्या प्रेमाला एका क्षणी दूर केलं. अशी विचारात सुस्पष्टता असणारी माणसं आपल्या भोवताली आपल्याला दिसत असतात. राधिका त्यांना अगदी हुबेहूब रूपात आपल्या समोर आणते. 

एक चांगलं कथानक लिहिल्याबद्दल सुदीप मोडक ह्याचं मनःपुर्वक अभिनंदन ! अमली पदार्थांचा आपल्या भोवताली असलेला विळखा, त्यापासुन आपल्या तरुण पिढीला असणारा धोका ( धारावीसारख्या झोपडपट्टीत राहणाऱ्या युवकांना तर अधिकच धोका!), त्यातुन बाहेर पडत यशस्वी होण्यासाठी करावा लागणारा संघर्ष हे सारं काही ह्या कथानकात अगदी संयतपणं आपल्यासमोर ह्या कथानकाद्वारे सुदीप ह्यानं आणलं आहे. अभिनयही चांगला म्हणावा असा ! 

मला हे नाटक आवडलं कारण नाटकात मंगेश निराशेच्या ह्या गर्तेत का सापडला ह्याचा शोध घेण्याचा खराखुरा प्रयत्न डॉ. अतुल करत राहतात. मंगेश नक्की कशापासून पळतोय हे मला शोधायचं आहे असं ते राधिकेला सांगतात. एका मुलाचं आयुष्य वाचविण्यासाठी सुरुवातीला केवळ एकदाच भेटायची तयारी दाखवली असताना नंतर मात्र ते आपला निवृत्तीचा विचार बदलतात.  इतकी खोलवर नसेल पण निराशा आपल्या सगळ्यांचा पाठलाग तर करतच असते ना? हा विचार माझ्या मनात घोळत राहिला. हे आपण उघडपणे मान्य करायला शिकणार का? एक समाज म्हणुन नैराश्य हा एक गहन प्रश्न बनतोय ह्याची कबुली आपण कधी देणार? 

मला हे नाटक आवडलं कारण कुठंही उथळपणा नाही. आपल्याकडं बावनकशी सोनं आहे तर मग बाकी उथळपणाची गरजच नाही हे नाट्यकर्त्यांना चांगलं ठावूक आहे. उगाचच पात्रांची खोगीरभरती नाही. सेट, संगीत ह्यावर उगाचच जास्तीचं लक्ष दिले नाही. मला आवडणाऱ्या  'No Nonsense' प्रकारात मोडणारं! कितीही बुद्धिमान माणूस असला तरी हॅकर्सना तासाभरात पळवुन लावणं हा एकमात्र खटकलेला मुद्दा ! 

पहिल्या प्रयोगाला पुढच्या काही रांगाच भरल्या होत्या; आज बऱ्याच भरल्या आहेत, पुढील प्रयोगाला हाऊसफुल्ल होऊ द्यात असे डॉ. राजवाडे प्रेक्षकांचं आभार मानताना म्हणाले. बऱ्याच अटी कबुल करून घेऊन मी पत्नीसोबत ह्या नाटकाला गेलो होतो. तिचं इथं आभार मानणं उचित ठरेल. आज ह्या नाटकाचा प्रयोग पुण्यात होता. पुणेकरांना आवडलं तर नक्कीच यशस्वी होईल हे नाटक ! 

सद्यस्थितीनुसार प्रेक्षकांत ज्येष्ठ नागरिकांचंच त्यातही महिलांचंच बहुमत होतं. पण काही वेळानं युवकवर्गाचा देखील काही प्रमाणात प्रवेश झाला. पुढील प्रवेशात हे प्रमाणसुद्धा वाढावं ही इच्छा !  बाकी मध्यंतरात आमच्या शेजारी पॉवरलूम, हँडलूम असे शब्द कानांवर पडले. पत्नीकडून त्याची अधिक माहिती गोळा करायला हवी. तितकीच सामान्यज्ञानात भर !

शनिवार, १६ मे, २०२६

The Folk आख्यान!





गेल्या शनिवारी "The Folk आख्यान" आणि आज (ह्या शनिवारी) "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" ह्या दोन दर्जेदार कलाकृती अनुभवण्यास मिळाल्या. 

आजची पोस्ट "The Folk आख्यान"  विषयी. महाराष्ट्राचं वैभव म्हणुन ज्यांना आपण संबोधू शकतो असे अभंग, भारूड, लावणी, गवळणी हे लोकसंगीताचे प्रकार वर्षोनुवर्षे महाराष्ट्राच्या गावागावांत समाजजीवनाशी अत्यंत जवळून निगडीत आहेत. हल्लीच्या संगणकाच्या विश्वात ह्या कला काळाच्या उदरात गडप होतील का असं भय वाटत असतांना तरुण कलावंतांनी सादर केलेला "The Folk आख्यान" हा कार्यक्रम एक अत्यंत सुखद धक्का देऊन जातो. 

ह्यातील बहुदा सर्व कलाकृती नवनिर्मीत असल्या तरी परंपरेशी आपली नाळ जोडुन आहेत. कलाकार खरोखरच लोकसंगीताला मूळ स्वरूपात सादर करतात. आपण २०२६ सालात हा कार्यक्रम पाहतो आहोत असं जाणवतच नाही इतकी ह्या कलाकारांची गुणवत्ता आहे. बहुदा ह्यातील बरेचसे कलाकार महाराष्ट्राच्या ग्रामीण भागांतून आल्यानं शहरी संस्कृतीनं त्यांच्या कलेच्या शुध्दतेवर घाला केला नाही. 

कार्यक्रमाच्या शेवटी जवळपास १५ मिनिटं सादर करण्यात आलेली असंख्य वाद्यांची जुगलबंदी केवळ अप्रतिमच ! यानिमित्तानं पारंपरिक, दुर्मिळ वाद्यांचा परिचय आपल्याला होतो. ह्या कार्यक्रमाच्या सादरीकरणामागं ह्या सर्व कलावंतांनी किती प्रचंड मेहनत केली असेल ह्याचा विचार करूनच थक्क व्हायला होतं. माझ्या मनात ह्या कार्यक्रमाने प्रचंड सकारात्मकता निर्माण केली. ह्या कार्यक्रमाचे निर्माते महाराष्ट्रातील लोककलाकारांना मदत व्हावी ह्यासाठी सक्रिय प्रयत्न करत असतात. आपल्या लोकसंगीताविषयी, संस्कृतीविषयी आस्था असणाऱ्या प्रत्येक मराठी माणसानं पाहावी अशी ही कलाकृती! ह्यातील सर्वच कलाकार युवा असल्यानं असे उपक्रम आपल्या संस्कृतीला प्रतिकुल वातावरणात देखील पुढे नेऊ शकतील हा आशेचा किरण ! बऱ्यापैकी महागडी तिकिटं असली तरी मैदानावरील सर्व आसने भरली होती, हा ही एक सकारात्मक संदेश ! बाकी आपले प्रेक्षक कितीही सुंदर कलाकृती असो आपल्या चमचमीत खाण्यावरील प्रेमाला कशी मुरड घालू शकत नाहीत हे पाहुन चांगलंच मनोरंजन झालं. 

खटकणाऱ्या काही गोष्टी ! साडेसहाची वेळ देऊन कार्यक्रम साडेसात वाजता सुरु करण्यात आला. सुर्यप्रकाश नाहीसा होण्याची आम्ही वाट पाहत होतो असं आयोजकांतर्फे सांगण्यात आलं. ही अत्यंत अस्वीकारार्ह अशी बाब आहे. तुमच्याकडं एक बावनकशी सोनं म्हणावं अशी कलाकृती आहे, त्यावर जीवापाड प्रेम करणारा प्रेक्षकवर्ग तुम्हांला लाभला आहे. त्यांना गृहीत धरू नका. सादरीकरणात पुर्णपणे व्यावसायिकता ठेवा. मुख्य सूत्रधाराच्या शब्दफेकीचं, भाषेवरील प्रभुत्वाचं कौतुक करावं तितकं थोडं! पण एकंदरीत निवेदनात कुठंतरी विषयांतर झाल्यासारखं वाटत राहिलं. उगाचच उथळ विनोदनिर्मिती करण्याचा प्रयत्न झाला. माझ्यासारख्या काहीशा आजच्या काळात कर्मठ म्हणता येईल अशा प्रेक्षकाला हे खटकलं ! वसईतील निसर्गाचा आधीच ऱ्हास होत असताना दहा मिनिटांचं मध्यंतर अशी घोषणा करून जवळपास पंचवीस मिनिटं उंच इमारतीच्या जाहिराती दाखवत राहणं चुकीचं आहे! वसईत आजही रात्री दहा वाजता निद्राधीन होणारा वर्ग अस्तित्वात आहे ह्याची जाणीव असायला हवी होती!

हे सर्व असलं तरी पुन्हा एकदा - "संधी मिळाल्यास हा कार्यक्रम बघाच !"

आज पाहिलेलं "पुढच्या शुक्रवारी सात वाजता" हे नाटक म्हणजे एक अत्यंत उत्कृष्ट कलाकृती ! त्यावरील पोस्ट लवकरच ! 

शुक्रवार, ८ मे, २०२६

अनंतिका !




सकाळी पावणेसात ते सहा पन्नास ह्या वेळात सूर्याच्या किरणांचं रूप पाहायला आणि अंगावर खेळवायला प्रसन्नदायी वाटतं. सहा एकावन्न झाले की ही किरणं तप्त होऊ लागतात. मी तासा - दोन तासाला जास्वंदीच्या रोपट्याला पाणी देत राहतो. मुंबईच्या भट्टीत गॅलरीत वाढणाऱ्या रोपट्यांविषयी माझ्या मनात दयाभाव निर्माण होत राहतो. त्यांना पुढील जन्म कोणत्यातरी जंगलात मिळो आणि तिथुन कोणत्याही महामार्गाची योजना निघू नये अशी मी परमेश्वराकडं मनोमन प्रार्थना करत राहतो. 

गावाकडील भाजीवाले साडेसात - आठच्या सुमारास आपापल्या जागी स्थिरावतात. तोवर सूर्याच्या किरणांनी दाहक रूप धारण केलेलं असतं. दोन मिनिटं ह्या उन्हात राहताच मला कससंच होऊ लागतं. लहानपणी मे महिन्यात तासनतास क्रिकेट खेळणारा आदित्य गेला कुठं असा प्रश्न मला पडत राहतो. अकराच्या सुमारास कार्यालयात निघताना ह्या भाजीवाल्यांना तळपत्या उन्हांत एकमेकांशी हसतखेळत गप्पा मारतांना पाहुन मी अचंबित होतो. मेट्रोच्या मार्गात नसते बदल केल्यानं मी हल्ली लोकल ट्रेनने कार्यालयात जातो. त्या वेळातील एकमेव वातानुकूलित लोकल आपल्या मर्जीनुसार पंधरा मिनिटांच्या कालावधीत केव्हांही येते, केव्हांतरी रद्द सुद्धा होते.  गेल्या आठवड्यापासून मी टोपीचा वापर सुरु केला आहे. ह्या एकंदरीत प्रकाराचा मी खूपच धसका घेतला आहे. यंदा पाऊस कमी असल्यानं हा प्रकार असाच काही महिने सुरु राहील ह्या धास्तीनं मी अधिकच चिंताग्रस्त होतो. 

..... 

मी पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूर अशा ग्रहावर एकटाच असतो.  ह्या उन्हापासून, ह्या तप्ततेपासून मुक्तता मिळाल्यानं मला खूप खूप आनंद झालेला असतो. माझ्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची सोय त्या सर्वशक्तिमानानं केलेली असते. भोवताली नानाविध बियाणी विखुरलेली असतात. त्यांचं प्रयोजन काहीसं मला उमजलं असलं तरीही मी त्याविषयी शाश्वत नसतो. त्यावेळी एक धीरगंभीर आवाज मनाच्या गाभाऱ्यात उमटतो. "तुझ्या मनोहर वसुंधरेचं साजिरे रूप ह्या अनंतिकेला देण्याची जबाबदारी तुझ्यावर मी सोपवत आहे!" 

हजारो वर्षे उलटून गेलेली असतात. त्या बियाणांच्या आधारे अनंतिकेला मिळालेलं ते साजिरे रूप पाहताना मला खूपच आनंद होत असतो. मी एक निमित्तमात्र असतो. 

वैचारिक साखळी - खरं आव्हान !

वैचारिक सुस्पष्टतेचा डोळ्यांत ठळकपणे भरणारा अभाव हा आजच्या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे.  स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्की योग्य का...