वैचारिक सुस्पष्टतेचा डोळ्यांत ठळकपणे भरणारा अभाव हा आजच्या समाजासमोरील सर्वात मोठा प्रश्न आहे. स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी नक्की योग्य काय ह्याची जाण आपल्याला नाही. समाजानं ठरवुन दिलेल्या यशाच्या तथाकथित मापदंडांच्या मागे धावण्यात आपली शक्ती आपण वाया घालवत आहोत. कोणत्याही मनुष्यानं निवांत बसुन आपल्यासमोरील परिस्थितीचा शांतपणे विचार केल्यास त्याला / तिला स्वतःसाठी योग्य मार्ग सापडु शकतो. पण आपण सर्व काही बाजुला सारून परिस्थितीचा सखोल विचार करायला क्वचितच बसतो. ह्याची अनेक उदाहरणं मी नंतरच्या पोस्टमध्ये क्रमशः देईन.
आजच्या ह्या छोटेखानी पोस्टमध्ये आपण एका साखळीचा उल्लेख करू इच्छितो. सोशल मीडियाचे कुटुंबाला लागलेलं व्यसन ! => स्वयंपाकघरात उत्साहानं तरुण पिढीला आवडतील असे नवीन पदार्थ शिकू पाहणाऱ्या गृहिणींची झपाट्यानं कमी होणारी संख्या => कालानुरूप ह्या गृहिणींना आवश्यक असणारी पण न मिळणारी स्वयंपाकघरातील पुरुषांची साथ => घरातील सदस्यांच्या संवादाच्या विविध तऱ्हा => त्यामुळं संवादाच्या पहिल्या चकमकीतच ठिणग्या उडून संवादाचं पुढं न जाणं => घरातील जेवणांकडं पाठ फिरवणारी तरुण पिढी => झोमॅटो / स्वीगीवरून मागवल्या जाणाऱ्या चविष्ट पण तेलकट, मिठाचं प्रमाण जास्त असणाऱ्या पदार्थांचं सेवन => प्रोटीन वेडापायी शरीरातील पचनसंस्थेवर पडणारा ताण => बऱ्याच वेळा विनाकारण वैद्यकीय तपासणीच्या मागं लागणं => आपण एखाद्या मॉडेलप्रमाणं दिसावं असा विविध वयोगटातील लोकांचा अट्टाहास => ह्या सर्वांसाठी लागणारा भरमसाट पैसा => हा पैसा मिळविण्यासाठी नोकरी / व्यवसायात यशस्वी होण्याचं प्रत्येकावर असणारं दडपण => जगात कधीही, केव्हाही फक्त विशिष्ट टक्के (२०-२५% टक्के) लोकंच यशस्वी होऊ शकतात ह्या मुलभूत तत्वाचा बहुतेकांना पडलेला विसर => ह्या सर्व कारणांमुळं येणारा तणाव / नैराश्य
आपल्याला जी काही बुद्धी लाभली आहे, कष्ट करण्याची आपली जी क्षमता आहे, आपल्याकडं जी काही संवादकला आहे, लोकांना सोबत घेऊन जाण्याचं जे कौशल्य आपल्याला लाभलं आहे, आपल्यात धोका पत्करण्याची किती तयारी आहे हे आणि इतर काही घटक आपण ह्या दुनियेत किती यश मिळवणार ह्याच्या सीमारेषा आखुन देतात. ह्याची जाणीव ठेवून सातत्यानं दुधी, गलका, शिराळे, पडवळ ह्या भाज्यांचं सेवन करणारी व्यक्ती ह्या दुनियेत निःसंशय सुखी होणार - इति आदित्य !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा